Tuesday 31 July 2012

फॅमिली डाक्टरायची हे आखरी पिढी



दोस्ताय हो या आंधी तं हरेक मंगयवारी तुमच्यातल्या काईचे फोन येतचं होते, पन मांगच्या मंगयवारी 'मायचं बिल देता का?' या भागावर्त इतके फोन आले का लेयनार्‍याले समाधान व्हावं आन् आपलं लेयेन वाचनार्‍यायच्या कायजापावतर जावे हे जवा तुमच्या फोनच्यानं कयते त्याची खुसी सबुदात नाई सांगता येत. मी सार्‍यायले पुन्यांदा धन्यवाद देतो. तुमचं पिरेम हेच लेयन्याची ऊर्जा असते. काई वाचकायची असी मागनी होती का त्या डाक्टरांच्या अखीन काही आठोनी आठवत असतीनं तं जरूर लिहा.

माह्या लहानपनी खरं तं पयस्याले लय लय किंमत होती. त्याच्याच्यानं तो खर्च करतानी मानूस इचार करूनच खर्च करे. होईन तवरिक निभून न्याची पाहे. आता कसं थोडसं दुखलं तं डाक्टर सिवाय पर्याय नाई, पन तवा कसं होतं का समजा पाय मुरगयला आन् सुजला तं जानकार सांगे 'अरे' थो अमका अमका पाला कोनाले सांगून आनून घे आन् बांध. कमरीचे म्हनलं की या बोटाच्या कांडय़ावानी बिना पाल्याचा येल हाय आपल्या शायेच्या पलीकून थो हातभर तोडून आनाचा. त्याले कुटाचा आन् त्याच्यात शेंदूर आन् आंड फोडून त्याले एकात मिसयून त्या लगद्याचा लेप चांगल्या कापडय़ाच्या पट्टीवर्त घेऊन तो कमरीले बांधून आराम कराचा. तीन दिवस असं कराचं. पाहय़ आरम पडते का नाई? कोनी दुसरा इलाज सांगतानी सांगे, अरे नदीच्या थडीनं हडसन निघानी असनं आता. ते उपडून आनाची आन् आपन मेथीची भाजी करतो तसी करून खाची. आता सांगनारे भेटत नाई आन् भेटला तं ते कुटाना कोन करत बसनं. त्या परीस आनला बजरंग लेप आन् लावला असे नयतूरने पोरं म्हनते.

आमच्या गावाले दुसरे सरकारी डाक्टर आले ते डॉ. सुधाकर पुरी. मी त्यायच्या कुटुंबाचा घटकचं झालो होतो. एक डाव वयनी पोरायले घेऊन माहेरी नागपूरले गेल्या होत्या. म्या संध्याकायच्या दवाखान्यात जाऊन त्यायले इचारलं का, ''तुमी घरी जेवाले येता का मंग आपल्या दोघांचा डबा घेऊन मी तुमच्याकडं येऊ ?'' ते म्हने, ''डबाचं घेऊन ये. मी जेवायला येणार म्हटलं की आईपासून सगळे जेवायचे थांबतात. त्यापेक्षा डबाचं घेऊन ये.'' राती नऊ साडे नवले आमी जेवनं केलं आन् गोठे करतं बसलो. बैयलाच्या घंटय़ायच्या आवाजा संग खासर (बैलगाडी) थांबल्याचा आवाज झाल्याच्यानं म्या घडाय पाह्यलं तं रातीचे साडेअकरा वाजले होते. त्यायनं आवाज देल्यावर्त म्याचं दाठ्ठा (दार) उघडला. जवयगाववून ते दोघे आले होते. ते समोरच्या बेंचावर बसल्यावर्त सांगाले लागले,''डाक्टरसायेब घरी दोन मयन्याचं लेकरू हाय. थे सकायपासून निस्त रडून रायलं. रडून रडून अदमुसा होते, पन मायच्या दुदाले तोंड

नाई लावून रायला. आजूबाजूचे लोकं आपापल्या वसरीत बसून हाय. तुमाले न्यासाठी आलो डाक्टर सायेब आमी. डाक्टर सायबान हे आयकून घेतल्यावर्त त्यायले सांगतलं का,''मी तुम्हाला औषध लिहून देतो. तुम्ही बच्चूभाईकडे जा. ते माडीवर झोपले असतीन. त्यायले आवाज द्या. ते उठल्यावर माझं नाव सांगा म्हणजे ते खाली येऊन दुकान उघडून तुम्हाला औषध देतील. ते घेऊन या. मी ते कसं द्यायचं ते समजावून सांगतो.''

ते गयावया करत होते का, ''तुमी चाल्ले अस्ते तं खूप बरं झालं अस्त डाक्टरसायेब.'' आखरीले ते दोघं दवाई आनाले गेल्यावर म्या डाक्टर सायबाले म्हनलं, ते एवढे कायुतीले आलेत. चाला ना, वाटल्यास मी येतो तुमच्या संग. माह्या डोया म्होर सारा सीन उभा झाला. ते इतकुसं लेकरू त्याचा अकात त्याच्याच्यान सारं घर कायजीत जागं आन् शेजारीपाजारी डाक्टर येतेतं या आसीवर वाट पाह्यत असतीन असं चित्र मलेच दिसाले लागलं. ते दवाई घेऊन आल्यावर्त त्यायनं आखीन डाक्टर सायबाले आग्रव कराले लागले. तसे डाक्टर सायेब म्हने, ''निघा तुम्ही पुढे मी याला घेऊन मोटारसायकलने येतो.'' टायमाचा अंदाज घेऊन डाक्टर सायबानं त्यायच्या राजदूत फटफटीले किक मारली. आमी गावापासी आलो. ते वाट पाहत थांबूनचं होते. इतकी रात झाल्याच्यानं गाव झोपलं होतं. मले त्यायच्या घरापासी जाची घाई झाली होती. त्यायचं खासर एका घरा शेजी त्यायनं थांबवलं तं मले वाटलं बाजूच्या गल्लीत घर असनं, पन नाई समोरच्या घरची साखयी यानं वाजोली चांगली तीन-चार खेपा. साखयी वाजोल्यावर्त आतून दाठ्ठा उघडला. गावा संग शेजारीपाजारी झोपले हे तं ठीक, पन इथ तं पेशंट आन् अवघं घर झोपलेलं पाहून मलेच चक्कर याची वक्ता आली.

आमी वापेस निंघालो तवा रस्त्यात म्या डाक्टर सायबाले म्हणलं, ''डाक्टरसायेब माफ करा बुवा. माह्याच्यानं तुमाले झटका झाला.'' त्याच्या वर ते म्हनेत, ''झटका बसणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती आणि तुला सांगू मी पेशंटसाठी नाही तुझ्या समाधानासाठी मुद्दाम आलो. आम्हाला इतकी सवय झाली असते की, येणार्‍याच्या सांगण्याच्या पद्धतीने आम्हाला पेशंट खरचं सिरीयस आहे की नाही याची कल्पना येते. तसं असतं तर ते पेशंटला घरी ठेवून नाही इथ घेऊन आले असते. पण मी तुला घेऊन न जाता हे सांगितलं असतं तर तुला पटलं नसतं आणि त्यात तुझी काही चूक नसती. आमचा अनुभव तुला कसा असणार?''

मी लहान असतानी बिन सरकारी आमच्या गावच्या बाजूचे डाक्टर होते डॉ. रामकृष्ण ठोकळ. ते दवाई आयुर्वेदिक लिहून देत आन पेशंटले सुई देत. तवा पेशंटचा सुई देल्ली का आपलं दुखनं बसते याच्यावर्त लय इस्वास. कवा कवात पेशंटचं म्हने एखांद पॉवरबाज इंजेक्सन देऊन ह्या डाक्टरसायेब मंग खटखट नाई राहतं. हेयी त्यांले नाराज ना करे. त्यायच्या आजूबाजूले चार-पाच जन बसून नाई असं कवाचं ना होये. ते सारे त्यायच्या गोठी आयकासाठी बसत. माह्या मोठय़ा भावाचं मेडिकलचं दुकानं होतं. त्यांच्या वसरीत पलीकडच्या भितीकडून पेशंट तपासाचा टेबल, पडद्या मांग. बाजुले एका मोठय़ा स्टूलवर वातीचा स्टो सिरींज उकयासाठी. तवा काई ता सारके युज अँड थ्रो अशा सिरींजा नव्हत्या निंघाल्या. आमच्या गावालं मंगयवारचा बजार. त्याच्याच्यानं दिवसभर पेशंटले पेशंट सुरूचं राहे. मंगयवारी थो वातीचा स्टो पेटूनचं राहे. त्याच्यावर्त जरमलच्या गंजात दोन-तीन काचेच्या सिरींजा आन् पाच-सहा सुया पान्यासंग उकयत राहे.

आता सुधारना खूप झाल्या. सकायी मोतीबिंदूच्या अपरेसनसाठी गेलेला पेशंट लेसर का काय म्हन्ते त्यानं अपरेसन करून दुपारी जेवाले घरी येते. पह्यले अपेंडिकच्या अपरेसनले जर बोरीवून पेशंट गेला तं गावाले धाकधुकं लागे. आता तं बायपासचा पेशंट पाच-सहा दिवसात हासत घरी येते. आता सारी पयस्याची दुकानदारी झाली आन् त्याच्याच्यानं पेशालिस्ट डाक्टराच्या जमान्यात फॅमिली डाक्टरायची हे आखरीची पिढी हाये. यवतमायले माह्या ओयखीचे डॉ. हरीश झंवर आन् डॉ. दि. का. बडे हे असेचं. आता तं पह्यले दीडसे, दुसर्‍यान गेले का शंभर. त्यायच्या पॅडवर्त छापूनचं यादी अस्ते. त्याच्यावर्त खुना केल्या का हे तपासून रिपोट दाखवा म्हन्ते. एक डाव माही आजी हा ताल पाह्यल्यावर म्हने, बावू हा कमी सिकला हाय कारे? दुसर्‍याले इचारून आपल्याले काय झालं सांगते.

डॉ. बडे अजूनयी मुलाला नावाने ओयखतात. माह्या मधण्या मुलीला दोन पोरं हाय, पन आपली नितू काय म्हंते असं इचारतेत. चार मयन्या पयले ताप आला म्हून गेलो. बळी काई बोल्लो नाई. त्यायनं दवायीच्या चिठ्ठी संग रक्त तपासाले चिठ्ठी देल्ली आन् त्यायची शंका खरी ठरली, साकर निंघाली. याले म्हंते डाक्टर! फॅमिली डाक्टर म्हनलं का फॅमिलीतलं असल्यावानी अधार वाट्टे मानसाले. ते जे सल्ला देतीनं तो योग्य देतीलनं हे गॅरंटी अस्ते. असा फॅमिली टच असल्याच्यानंचं फॅमिली डाक्टर नाव पडलं असनं लेका!

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच जीवापासून!


आपण कोण आहोत? आपल्या जीवनाला काही हेतू आहे का? या प्रश्नांचा वेध घेत असता पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राकडून जी सामान्य माणसांना समजू शकेल अशी माहिती मिळू शकते. तिची मांडणी या आधीच्या लेखांकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, ही माहिती मुख्यत: निर्जीव पदार्थाबाबत आहे. आमचे व सर्व सजीवांचे देहदेखील पदार्थमय आहेत, जे निष्प्राण झाल्यानंतर निर्जीव पदार्थातच रूपांतरित होतात. या विश्वातील सर्व निर्जीव पदार्थ व ऊर्जा एकाच मूलतत्त्वाची निर्मिती असून सृष्टीच्या आरंभी तर अवकाश - काळासह सर्व ब्रह्मंड एकाच बिंदूमध्ये सामावले होते, असा विज्ञानाचा बहुमान्य तर्काधारित निष्कर्ष असल्याचेही आपण मागील लेखांकात पाहिले. परंतु या माहितीने आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

भौतिक पदार्थमय देह हा आपल्या मानवी अस्तित्वाचा केवळ एक भाग आहे. कोणताही जीव निव्वळ पदार्थमय नसतो. पदार्थमय देहात प्राण असेल तरच आपण त्या देहाला 'सजीव' म्हणतो. अचेतन सृष्टीची सचेतन होण्याकडे जी वाटचाल सुरू झाली, त्या यात्रेतील पहिला टप्पा प्राण आहे. प्रत्येक सजीव देह हा सूक्ष्म पेशींचा (सेल) बनलेला असतो. एकच पेशी असलेले कित्येक सूक्ष्म जीवाणू असतात तसेच कोटी-कोटी पेशींनी मिळून घडविलेले मानवासारखे व मानवापेक्षाही अगडबंब देह असलेले प्राणी असतात. मात्र या नानाविध देहरचनांचा मूळ घटक असलेल्या पेशींची कार्यपद्धती बरीचशी सारखी असते. अगदी वेगळी कार्यपद्धती असणार्‍या पेशी कदाचित पृथ्वीवर फार पूर्वी अस्तित्वात आल्याही असतील; परंतु त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. विशाल अंतराळातील दूरवरच्या एखाद्या किंवा अनेक ग्रहांवर अशी वेगळी कार्यपद्धती असणार्‍या पेशी व त्या पेशींपासून तयार झालेले सजीव प्राणी अस्तित्वात असतीलही, मात्र त्याबाबत कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनतरी आढळलेला नाही.

पृथ्वीवरील प्रत्येक जीवपेशीला एक पातळ त्वचा असते, ज्या त्वचेतून काही द्रव व अतिसूक्ष्म घन पदार्थ आत येऊ शकतात व बाहेरही टाकले जाऊ शकतात. ही पातळ त्वचा त्या पेशीला बाह्य जगापासून वेगळे करते. भोवतालच्या वातावरणातून पोषक घटक आत शोषून घेणे, त्या घटकांवर रासायनिक प्रक्रिया करून स्वत:चे पोषण व दुरुस्ती करणे आणि स्वत:सारखीच दुसरी पेशी निर्माण करून निष्प्राण होणे, हे कार्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये अविरत सुरू असते. पेशीच्या गाभ्यात लांबलचक साखळी असलेले न्यूक्लिक अँसिडचे 'डीएनए' नावाने ओळखले जाणारे जे रेणू असतात, त्या 'डीएनए'मधील जीन्स नावाचे घटक हे त्या-त्या सजीवांच्या देहरचनेचे गुणधर्म ठरवितात. पेशींच्या आत सतत सुरू असलेले हे नवनिर्मितीचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे, जलदगतीचे व प्रचंड उलाढालीचे असते. हजारो रेणूंची त्यासाठी ठरावीक कार्यक्रमानुसार धावपळ सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे रेणू वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पाडत असतात. एखाद्या अजस्र कारखान्यासारखी प्रत्येक पेशीच्या आतली कार्यपद्धती असते. पोषण, दुरुस्ती व नवनिर्माण या कामांसाठी आवश्यक ते पदार्थमय घटक बाह्य वातावरणातून शोषून घेणे व प्रक्रिया झाल्यानंतर अनावश्यक द्रव्य पुन्हा बाह्य वातावरणात सोडून देणे, हे कामही अखंड सुरूच असते. अगदी स्वत:च्या त्वचेची निर्मिती व दुरुस्तीदेखील पेशींच्या आतूनच होत राहते.

अशा लक्षावधी पेशींचा मिळून आपला एक-एक अवयव बनतो. त्या पूर्ण अवयवांच्या निर्मितीचा आराखडा प्रत्येक पेशीजवळ असतो. अनेक अवयवांचा मिळून आपला देह बनतो. प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे; परंतु सर्व अवयव एकमेकांना पूरक असतात. कोटय़वधी पेशींचा समूह असलेला देहदेखील ढोबळमानाने पेशींसारखेच कार्य करतो. देहाबाहेरून पोषक अन्न आत घेणे, त्यावर प्रक्रिया करून देहाचे पोषण करणे, अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे, नवीन देहाची निर्मिती करणे व नंतर निष्प्राण होणे!

पृथ्वीच्या पोटात, पृष्ठभागावर व वातावरणात सूक्ष्म जीवाणूंची अफाट संख्या असते. आपल्या मानवी दृष्टीला हे जीवाणू दिसत नाही; परंतु आपल्या देहाच्या आत व देहाच्या त्वचेवरदेखील अब्जावधी जीवाणू नांदत असतात. आपल्या देहातील नित्य निष्प्राण होणार्‍या पेशी हे जीवाणू फस्त करतात. ते अतिशय उंच जागी व अतिखोल विवरांमध्ये तसेच कडाक्याच्या थंडीत व होरपळणार्‍या उष्णतेतदेखील टिकाव धरून राहतात. हे सूक्ष्म जीवाणूदेखील पेशींचेच बनले असतात व त्यांच्या पेशीतदेखील व नमूद केलेले कार्य सुरू असते.

सर्व सजीव पेशींची रचना व कार्यपद्धती मूलत: समान असल्यामुळे पृथ्वीवर आता आढळून येणार्‍या व ज्यांच्या देहरचनांचा अभ्यास होऊ शकतो अशा पूर्वी नष्ट झालेल्या सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच आद्य जीवापासून किंवा पेशीपासून झाली असावी, असा जीवशास्त्राच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. म्हणजेच पदार्थविज्ञानशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्रदेखील अद्वैताकडे इशारा करते असे मानावे लागेल.

सजीवसृष्टीचा प्रारंभ आपल्या पृथ्वीवर सुमारे साडेतीन कोटी वर्षापूर्वी झाला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. प्रथम जीव कसा जन्मला. याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. ज्वालामुखीच्या स्फोटातून निर्माण झालेल्या ढगात मिथेन, अमोनिया व हायड्रोजन विपुल प्रमाणात एकत्र असावे व विजेच्या कडकडाटामुळे त्यांच्या संयोगातून अमिनो अँसिड्स व साखरेसारखे क्लिष्ट रचना असलेले रेणू तयार होऊन जीवनाची उत्पत्ती झाली असावी, असा काही वैज्ञानिकांचा अंदाज आहे. दुसरे काही वैज्ञानिक मात्र सूक्ष्म सजीव प्रथम परग्रहावरून अथवा अंतराळातून उत्कापातासोबत अथवा धूमकेतूच्या शेपटीवर स्वार होऊन पृथ्वीवर आले व त्यांनीच येथे जीवनाचा विस्तार केला, असे मानतात. वैज्ञानिकांचा तिसरा गट असे मानतो की, तीन कोटी वर्षापूर्वी सूर्य सध्यापेक्षा कमी तेजस्वी असल्यामुळे पृथ्वीवर हिमयुग होते व शेकडो फूट जाडीचा बर्फाचा थर समुद्रावर पसरला होता. त्या थराखाली समुद्राच्या तळाशी जीवनिर्मितीला पोषक वातावरण व घटक असल्यामुळे तिथे प्रथम जीवनिर्मिती झाली असावी. इतरही काही वेगळ्या मान्यता आहेत.

सारांश, पृथ्वीवर सजीवसृष्टीचा प्रारंभ नेमका कसा व कोणत्या कारणाने झाला याबाबत वैज्ञानिकांचे एकमत नाही. मात्र आज अस्त्विात असलेल्या सर्व सजीवांचा आद्य पूर्वज एकच असावा याबाबतीत मात्र दुमत आढळून येत नाही. आपल्या सामान्य भाषेत असे म्हणू की किडय़ामुंग्यांसह आपण सर्व सजीवांमध्ये एकच प्राणतत्त्व प्रवाहित असतो.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881574954

Monday 30 July 2012

आता आदिवासींनी कोणता आदर्श घ्यावा?



24 मार्च, 2012 रोजी झारखंडची राजधानी रांची येथे सरहूल महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात मी उपस्थित होतो. 25 मार्च, 2012 रोजी झालेल्या भारतीय पातळीवरील दलित, आदिवासी नाटय़संमेलनाचा प्रमुख पाहुणा या नात्याने मला निमंत्रित करण्यात आले होते. आंबेडकर प्रेरणेचा नाटय़लेखक याच नात्याने मला बोलाविण्यात आले होते हे संयोजक अश्विनीकुमार पंकज यांनी सांगितले होते. नाटय़संमेलन सरहूल महोत्सवाला जोडून ठेवण्यात आले होते आणि आदिवासींचा हा राष्ट्रीय महोत्सव आम्ही पाहावा हीच त्यामागची धारणा होती.

सरहूल महोत्सव म्हणजे आदिवासींचा पारंपरिक निसर्गपूजेचा महोत्सव. 'सरहूल' अथवा 'सकुवा' हे एका वृक्षाचे नाव आहे. हा वृक्ष आपल्याकडील कडुनिंबासारखा वृक्ष. वसंतऋतूत या वृक्षाला चैतपालवी फुटते. या वृक्षांची

फुलोर्‍याची नाजूक डहाळी पाहुण्यांच्या अथवा नातलगांच्या उजव्या कानावर खोवायची आणि हात जोडून 'जोहार' या शब्दाने अभिवादन करायचे ही तिथली प्रथा. त्यानंतर नटूनथटून आलेल्या आदिवासींनी वृक्षाभोवती फेर धरून लयबद्ध नृत्य करायचं. अख्खा गावच मग या नृत्यात सहभागी होतो. आमच्याकडच्या गणेशोत्सवाची आठवण व्हावी अशी ती मिरवणूक असते. या मिरवणुकीत राज्यपाल, कुलगुरू, मुख्यमंत्री सगळेच सहभागी होतात. झारखंड हे 10-11 वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेले स्वतंत्र राज्य. हा पूर्वीचा बिहार. या झारखंडमध्ये आठ आदिवासी समूह असून प्रत्येक आदिवासीची स्वतंत्र बोली आहे. त्यातील 'खडिया' आणि 'मुंडा' हे आदिवासी विशेष प्रगत आहेत. खडियांची स्वतंत्र लिपी असून त्या भाषेत लेखन करणार्‍या लेखकांची संख्या सुमारे पाचशे आहे. हे आदिवासी घराबाहेर पडले की, नागपुरी बोलतात. नागपुरी ही एक आदिवासी जमात असून त्यांच्या बोलीला 'नागपुरी' म्हणतात. हैदराबाद संस्थानातली माणसं घराबाहेर पडली की, जसं हिंदी, उर्दू भाषेत बोलत तसा हा व्यवहार चालतो. नाहीतरी या प्रदेशाला 'छोटा नागपूर' याच नावाने लोक ओळखत असत आणि आमच्या काळी शाळेत भूगोल शिकताना आम्ही 'छोटा नागपूर' म्हणून ओळखत होतो.

या आठही बोलीत गरीब आणि श्रीमंत यासाठी शब्दच नाहीत. पंकजकुमारांनी आम्हांला माहिती दिली. दोन हजार वर्षे उलटून गेली. आमच्या वृक्षपूजेचे रूपांतर मूर्तिपूजेत झाले नाही की, देऊळ संस्कृतीत झाले नाही. सरहूल महोत्सवात कोणी पुरोहितही नव्हता. जे होते ते आदिवासी पंडितच होते. त्यामुळे इथे जमाती आहेत, पण जाती नाहीत. तरीपण भारत सरकार आमचा उल्लेख 'जनजाती' म्हणून करतात हे त्यांना फारसे रुचत नाही. महाराष्ट्रातील औरंगाबादसारख्या दीडदोन हजार किलो मीटरवरच्या लेखकाला त्यांनी पाहुणा म्हणून का बोलवावे याचे मला आश्चर्य वाटत होते. त्यांना मराठी येत नव्हते आणि धड इंग्रजीही येत नव्हते. उद्घाटन

समारंभात रंगमंचावर आम्ही चौघेच होतो. उद्घाटक म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री अजरुनसिंग मुंडा, दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रसिद्ध अभ्यासक आणि हिंदी साहित्याचे समीक्षक डॉ. तलवार, हरियाणाचे माजी राज्यपाल डॉ.

माताप्रसाद जे 'दलित नाटय़लेखक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे 'गौतम बुद्धा' या विषयावरचे नाटक या क्षेत्रातील मंडळींना खूप आवडलेही होते. अशा या रंगमंचावर मी चौथा पाहुणा होतो. झारखंडचे मुख्यमंत्री अजरुन मुंडा अतिशय तरुण आहेत. त्यांनी पारंपरिक पद्धतीने नगारा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात अश्विनीकुमार यांनी केलेले प्रास्ताविक अद्भुत होते. मला स्वत:ला अंतमरुख करणारे होते. झारखंड या प्रदेशातील 50 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. 'फॉरेस्ट कायदा' अस्तित्वात आला आणि आदिवासींची ससेहोलपट सुरू झाली. ते मैदानी प्रदेशात स्थलांतरित झाले. 'स्वस्तातला मजूर' म्हणून या भागातल्या जमीनदारांनी आदिवासींवर वेठबिगारी लादली. शिक्षण नाही, रोगराईनिवारण करण्यासाठी औषधांची सोय नाही आणि उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही. जे होते ते इंग्रजांनी ताब्यात घेतलेले. अशा या आदिवासींकडे शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी ºिश्चन मिशनर्‍यांचे लक्ष गेले. त्यांनी शाळा आणि दवाखाने सुरू केले.

माणसांच्या रूपाने आपल्या मदतीला देव धावून आला असे आदिवासींना वाटू लागले. शिकता शिकता हे आदिवासी ºिश्चन झाले. खरेतर आपणाला 'आदिवासी' म्हणूनच जगायचे होते; पण ºिश्चन धर्म आपल्यावर लादला हे रांची येथील 'केरकट्टा' या नावाच्या आदिवासी मुख्याध्यापकाला कळले. त्याने धर्मातर रोखले. तो राजेंद्रबाबूंच्या सहवासात आला. आदिवासींना त्याने स्वातंर्त्यचळवळीत आणले. 1952च्या निवडणुकीत भारतातील सर्वाधिक मते घेणारे उमेदवार म्हणून आपण पं. जवाहरलाल नेहरूंना ओळखतो. पण या निवडणुकीत सर्वांत जास्त मते घेणारे उमेदवार होते केरकट्टा. ते खासदार झाले. स्वातंर्त्यानंतर संघपरिवाराच्या लक्षात आले. पूर्वोत्तर भारत धर्मातरामुळे धोक्यात आहे. संघकार्यकत्र्यांनी संपूर्ण आदिवासींच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. अगदी नकळतपणे आदिवासींचे हिंदूकरण सुरू झाले. दरम्यान, आदिवासींमध्ये विचारवंतांचा एक वर्ग निर्माण झाला होता. प्रा. डॉ. रामप्रसाद मुंडा हे रांची विद्यापीठातले विश्वविख्यात 'अँथ्रापॉजलिस्ट' होते.

गेल्या वर्षीच त्यांचे निधन झाले. झारखंडी भाषा आणि संस्कृतीच्या अध्ययन विभागाचे ते संस्थापक आणि विभागप्रमुख होते. आपण कुठल्याही धर्माचा स्वीकार न करता केवळ आदिवासी म्हणून या राज्यात स्वतंत्रपणे जगू शकतो ही नवी जाणीव तेथील आदिवासी विचारवंतांमध्ये आज रुजली आहे. हे राज्यघटनेमुळे शक्य आहे आणि राज्यघटनेचा मसुदा लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे होते. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील साहित्य आणि रंगभूमीची नवीन चळवळ सुरू झाली. म्हणूनच या महोत्सवात महाराष्ट्रातील दलित रंगभूमीच्या लेखकांना आम्ही निमंत्रित केले आहे. त्यात प्रा. भगत, प्रेमानंद गज्वी आणि डॉ. कुमार अनिल हे उपस्थित आहेत. त्यांचे प्रास्ताविक ऐकून आम्ही थक्क झालो. आज मला हे सर्व आठवलं त्याचं तसंच एक महत्त्वाचं कारण आहे. एक महिन्यापूर्वीच अजरुन मुंडा यांच्या हेलिकॉप्टरला लहानसा अपघात झाला आणि त्यातून ते बालंबाल वाचले. म्हणून त्यांच्या पुरोहितांनी (एका राजकीय सल्लागारांनी) त्यांना मुळात त्यांचा निवास शापित असून तो शापमुक्त करायला सांगितले. अजरुन मुंडांनाही हे पटलं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आवारात मारुतीचे मंदिर बांधण्यात आले. संकटमोचन हनुमानमूर्तीची तिथे प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगल सोहळ्याप्रसंगी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. झारखंडसह भारतातल्या असंख्य लोकांनी हा मंगलसोहळा दूरदर्शन वृत्तवाहिनीवरून पाहिला. मा. अजरुन मुंडा यांच्या उपस्थितीत पंकज यांनी केलेले प्रास्ताविक आठवले. केरकट्टा यांचे अनुयायी आणि एक लेखक अश्विनीकुमार सांगत होते, आम्हांला कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता सन्मानाने जगता आले पाहिजे. राज्यघटनेत तशी तरतूद आहे आणि त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री हनुमानमंदिराची स्थापना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करून संदेश देत होते, आपण हिंदू आहोत आणि हिंदू देवदेवताच आपले संरक्षण करू शकतील. अजरुन मुंडा हेलिकॉप्टरच्या अपघातातून बालंबाल बचावले; पण त्याच बिहार प्रांतात मोरारजी देसाई यांच्या विमानाला अपघात झाला होता आणि नव्वदी ओलांडलेला भारताचा हा माजी पंतप्रधान पायी चालत अपघात स्थळापासून दूर गेला होता. मोरारजी धर्मश्रद्धेने हिंदू होते. पण त्यांनी असे काही करून जनतेला शापमुक्तीचा संदेश दिल्याचे मला स्मरत नाही. मी सेक्युलर आहे; पण धर्म विरोधी नाही. धर्म ही वैयक्तिक पातळीवरील श्रद्धा म्हणून पाळायला आमच्या घटनेने कधीच विरोध केला नाही. धर्मश्रद्धा असणे वाईट असेही मला म्हणायचे नाही. पण जनतेला जेव्हा धर्मभोळेपणा एक राजकीय अजेंडा म्हणून सांगितले जाते तेव्हा काय होतेहे आपण आपल्या इतिहासाला विचारायला नको का? देवगिरीच्या समर्थ राजवटीला आमचा प्रधान देऊळ बांधून बसला आणि खिलजीने सर्व साम्राज्य पार बुडवून टाकले. प्रजेचे शत्रूकडून रक्षण कसे करता येईल यासाठी 365 दिवसांत 1400 व्रतं कशी करावीत या विषयावरचा 'चतुर्वर्ग चिंतामणी' हा ग्रंथ लिहिण्यात हेमाद्री पंडिताने किती वेळ घालवला? छत्रपती शिवाजी महाराजांनी देवळाच्या व्यवस्थापनासाठी देणग्या दिल्या; पण देवळे बांधण्यात स्वत: लक्ष न घालता किल्ले बांधून प्रजेचे रक्षण करण्याची तरतूद केली. आम्ही इतिहास कशासाठी शिकायचा? इंग्रज पुण्यावर तोफा डागत होते तेव्हा आमचे शूर पेशवे शनिवारवाडय़ात अभिषेक घालत बसले. तरी पराभूत झालेच ना!

आता दुसरा प्रश्न असा की, या निवासात एखादा मुस्लिम अथवा ºिश्चन मिशनरी कधीच मुख्यमंत्री होणार नाही असे गृहीत धरायचे का? आणि झालाच तर या मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याने उचलयाची का? की या मंदिराचा अर्धा भाग मशिदीला देऊन नव्या अयोध्याकांडाची तरतूद करून ठेवायची? असो. आता मा. अजरुन मुंडा यांची गणना चातुर्वण्र्य अवस्थेत करायची की नाही. तसे ठरले तर त्यांचा वर्ण कोणता? आणि मग हे मुंडाजी कर्मविपाकाचा सिद्धान्त ग्राह्य मानणार की नाही? अर्थात, यासाठी त्यांना फार परिश्रम करावे लागणार नाहीत. अनेक भारतीय विद्यापीठांत ज्योतिर्विज्ञान आणि संस्कृत या विषयांचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आदेश 10 वर्षापूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला असून मा. कपिल सिब्बल यांच्याकडे चौकशी करून तज्ज्ञ व्यक्तींचा शोध घेता येईल. मी असे आक्रमक लिहीतही नसतो; पण राज्यकत्र्यांचे खासगी जीवनही जनतेला संदेश देणारे असते याचा विसर पडता कामा नये. पण जी कृती मानवी कर्तृत्वाला हीन ठरवतेतिचा का म्हणून निषेध करू नये? कुणी कोणता धर्म पाळावा, त्यासाठी कोणत्या विधींचा वापर करावा याबद्दल कुणीच तक्रार करणार नाही. ज्या वास्तूत मी अजरुन मुंडांनी हनुमानमंदिर बांधले ते त्यांचे व्यक्तिगत मालकीचे घर नव्हते आणि नाही. त्यांनी स्वत:च्या घराला शापमुक्त केले असते तर आपण काहीच तक्रार केली नसती.पण त्यापेक्षा मला त्यांच्या या कृतीने अधिकच अंतमरुख केले. केवळ आदिवासी म्हणून आपले स्वातंर्त्य जपू इच्छिणार्‍या आदिवासींचे हे 'भगवेकरण' नव्या गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करेल यामुळे मी अधिक अंतमरुख झालो. आपल्या देशात सेक्युलॅरिझमचा स्वीकार हे आपले देशपातळीवरचे केवळ राजकीय धोरण नाही, तर ती भारतीय बहुभाषी, बहुधर्मी जनतेची जगण्याची गरज आहे हे निदान राजकीय नेतृत्वाने तरी लक्षात ठेवावे एवढेच मला सुचवायचे आहे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

दोन नंबरचं कुत्रं'

   
'वैनी, कुत्रं आवरा तुमचं ''

''सल्लू.. चूप.. इकडे ये''

''सल्लू कोन?''

''कुर्त्याचं नाव हाय.. अल्सेशन कुत्रं हाय''

''बापारे! याच्या आंगावर चहुकडून केसचं केसं हायेत''

''याचा पुढचा भाग कोनता अन् मागचा कोनता तेही समजत नाही''

''तुमच्या भावानं बारा हजारात विकत आनलं मुंबईहून''

''भाऊले लय पगार हाय वाटते?''

''सतेचाळीस हजार पगार आहे.. वरतून खुळन अलग''

''म्हनजे हे दोन नंबरच्या पैशाचं कुत्रं हाये''

''तसंही म्हटलं तरी चालते''

''याले बाहीर जाऊ देऊ नका वैनी''

''काहून''

''तुमच्या कॉलनीतली कुर्त्ये अचाट हायेत, असं निपक कुत्र दिसलं की त्याच्यावर लाइन मारतात''

'मी त्याले कुठंच जाऊ देत नाही''

''याले फक्त खिचळी खायाले शाळेत पाठोत जा''

''कोनती खिचळी?''

''तुमच्या घरापाशी प्रायमरी शाळा हाये किनी? रोज त्या शाळेत खिचळी शिजवतात, रोज लय मोठी खिचळी उरते, मास्तर उरली खिचळी कुर्त्याले टाकून देतात, सारे गावातले कुत्रे खिचळी वाटपाच्या टाइमले न चुकता हजर राह्यतात, संड खिचळी खातात, शाळेतल्या लेकरापेक्षा कुत्रेच जास्त सुधरले''

''आमचा सल्लू खिचळी खात नाही''

''मंग काय खाते?''

''रोज बिस्कीट खाते, काजू, बदाम खाते''

''गरिबाले काजू बदाम पाहाले भेटत नाहीत अन् तुम्ही कुर्त्याले चारता?''

''आमचा कुत्रा दुसरं काही खातच नाही''

''आमच्या खेडय़ातले कुत्रे जे सापडलं ते खातात,

खतावर खरकटं फेकलं की पाचसहा कुत्रे धाव घेतात, माह्या घरचं कुत्र दिवसभर खंडारे झांबलते''

''आमचा सल्लू तसा नाही, आम्ही त्याची घरच्या मेंबरसारखी सोय करतो.. त्याले झोपायले गादी.. बसाले खुर्ची.. पहाले टीव्ही''

''कुर्त्याले टीव्ही? कमाल झाली आता''

''आमचा सल्लू नशीबवान आहे''

''शहरातला मालक त्याच्या कुर्त्याले झोपाले गादी देते, हे गोष्ट जर माह्या कुर्त्याले समजलीतं माहा कुत्रं मले फाडूनच खाते''

''आताच आमच्या सल्लूचा वाढदिवस झाला''

''कुर्त्याचा वाढदिवस?''

''त्याच्या वाढदिवसाले आम्ही कार्ड छापले.. गुलाबजामूनची पंगत देली''

''बापारे.. लय खर्च केला''

''तुमच्या भाऊची वरकमाई तगडी आहे ना''

''कोन्या डिपार्टमेंटले असतात भाऊ?''

''ते कृषी अधिकारी आहेत ना.. संध्याकाई घरी आले की नोटाचे बंडलच आनतात, पगाराच्या चारपट वरकमाई करतात, म्हनून आम्ही यंदा नवा बंगला घेतला, सात लाखाची गाडी घेतली, तीनचार प्लॉट घेतले''

''अन् तुम्ही काय करता दिवसभर?''

''मी बंगईवर झोके घेते, आमच्या घरी सैपाकाले बाई आहे.. भांडे धुयाले बाई.. धुन्याले बाई.. पुसपास कराले बाई''

''तुमचे हातपाय दाबाले एखांदी बाई ठेवून द्या''

''आमाले पैशाचं काय करावं ते समजत नाही.. तुमचे भाऊ दरसाल गाडी बदलतात''

''पाह्यजा.. एखांद्या साली भाऊ तुमाले बदलतीन, मानसाजोळ जादा पैसा आला की गुन सुटतात, म्हनून तं भाऊ रोज बिअर बारवर दिसतात''

''आजकाल फॅशन झाली ते.. आम्ही नवराबायको फॅशनचं राह्यतो''

''म्हनून तुम्ही केसाची बॉबकट केली वाटते?''

''तुमच्या भावाले आवडते बॉबकट! ते म्हंतात आपून स्टॅंडर्ड कॉलनीत राह्यतो.. स्टॅंडर्ड दिसलं पाह्यजे, म्हनून मी साडय़ा घालनं बंद केल्या''

'मग काय घालता?''

''मी मॉडर्न ड्रेस शिवले''

''त्याच्यापेक्षा कॅटरिनासारखा बांडा फराक घालत जा, म्हनजे तुम्ही सोळा वर्षाच्याच दिससान.. आता किती वय आहे तुमचं?''

''वय पस्तीस अन् वजन सत्तर''

''म्हनजे डबलच झालं''

''मले वात हाये.. वरून चांगली दिसते, पण उठताबसता चमका निगतात, दवाखान्यात लय खर्च केला, पण काही फायदा नाही''

''दोन नंबरच्या पैशावाल्याचं असंच राह्यते''

''म्हनजे?''

''तुमाले राग येऊ देऊ नका.. तुम्ही दिवस खायात गमावता अन् रात झोप्यात गमावता.. उरल्या टाईमात झोके घेता म्हनून अशा बिमार्‍या होतात''

'तरी मी काहीच खात नाही, गोड बंद.. तिखट बंद..''

'एवढा पैसा असून सुख आहे काय तुमाले?''

''तरी आम्ही दानधरम करतो, यंदा देवळासाठी पाच हजार वर्गनी देली''

''काही फायदा नाही.. सातारा लुटनं अन् पुन्याले दान करनं.. अशा हरामाच्या पैशाले देव कावला''

''तुमचे भाऊ कमावतात अन् मले भरून द्या लागते''

''काही दिवसानं त्याहीचा नंबर लागीन.. हरामाचं लय दिवस पचत नसते वैनी.. असं आंगातून फुटून निंगते, असे कुर्त्याचे वाढदिवस केल्यापेक्षा गरिबाच्या लेकराले शिक्षनाले मदत करा, गरिबाच्या पोरीची लग्नाची पंगत द्या, खेडय़ातले आपलेच भाऊबंद परिस्थितीनं घायळ झाले, त्याहिले दुबार पेरणीसाठी मदत करा.. अशी

बेमानीची इस्टेट कमावून काय फायदा? अशी इस्टेट असली की पोट्टे दाऊदसारखे निंगतात, आखरीले इमानदारीच कामी येते, काही कुठी स्वर्ग-नरक नाही.. सारं जाग्यावरच भरून द्या लागते''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

Saturday 28 July 2012

प्रबोधनकारांचे विचार रावते विसरलेत का?



हे जादूटोणाविरोधी बिल.. आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहे. उद्या आम्ही आमच्या घरी भक्तिभावानं, श्रद्धेपोटी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल तुमचं आर्थिक नुकसान झालं आणि आम्हाला सहा महिने जेलमध्ये पाठवाल. आमचे वारकरी श्रद्धेनं पंढरपूरला पायी जातात. तुम्ही म्हणाल तुमचं शारीरिक नुकसान झालं आणि वारकर्‍यांना जेलमध्ये पाठवाल. सहा महिने ते सात वर्षे. आम्ही भक्तिभावानं दोन तास पूजा केली तर तुम्ही म्हणाल आमचं मानसिक नुकसान झालं आणि तुम्ही आम्हाला जेलमध्ये पाठवाल..!''

एवढय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार गुरुनाथ कुळकर्णी (ते वकीलही होते) उभे राहिलेत. म्हणू लागले, ''अहो रावते, असं या जादूटोणा बिलात काहीही नाही. कुठे आहे ते दाखवा. तुम्ही कुणाच्या आधारावर हे बोलता?''

''तुम्ही गप्प बसा! मला थांबवू शकत नाही. बिलावर आमदाराला बोलता येतं. कितीही बोलता येतं. हा माझा अधिकार आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. माझं म्हणणं खोडा, पण आता मी बोलणारचं.. असं म्हणत आ. दिवाकर रावते बोलत राहिले. आ. गुरुनाथ कुळकर्णी आणि इतरांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आ. दिवाकर रावते बोलत राहिले, हे बिल हिंदू धर्मविरोधी आहे असं सांगत राहिले. त्या दिवशी विधानपरिषदेतील त्यांचं हे भाषण अपूर्ण राहिलं. 2006 सालची ही गोष्ट. मुंबईचं अधिवेशन संपलं. अजूनही विधानपरिषदेत आ. दिवाकर रावते हे ऑनलेग आहेत. म्हणजे बिलावर पुन्हा दुसर्‍या अधिवेशनात चर्चा सुरू झाली तर आ. दिवाकर रावतेंच्या बोलण्यापासून त्याची सुरुवात होणार! आ. रावतेंच्या भाषणांच्या बातम्या मोठय़ा प्रमाणावर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या.'जादूटोणाविरोधी बिल' हा खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळं महाराष्ट्रभर बातम्या वृत्तपत्र माध्यमातून पसरल्या. पण असं बिलात काहीही नाही. हे मुद्दाम चुकीचं मत मांडलं आहे असं मात्र कुणाही वर्तमानपत्रानं सोबत लिहिलं नाही. याविरुद्ध मत मांडणारं दुसर्‍या कुणाचं भाषणच झालं नसल्यामुळं वृत्तपत्रातून तशी बातमी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही.सनातन्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवून दाखवून वारकर्‍यांना, धार्मिक लोकांना भडकवलं. हे खोटंनाटं सांगून लोकांना भडकवणं आजही सुरू आहे. सनातन्यांचं मी समजू शकतो. कारण गोबेल्सप्रणीत अफवा पसरविण्याच्या यंत्रणेमध्ये ते तरबेज आहेत. त्यांच्या गुरूंनी त्यांना त्या पद्धतीनं 'ब्रेनवॉश' करूनच जनतेत सोडलं आहे. याची महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याला व त्यातील 'एटीएस'(अँन्टी टेररिस्ट स्कॉड) ला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं सनातन संस्था आणि तिचे मुखवटे असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पण या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा प्रखर डोस पाजणार्‍या प्रबोधनकार ( म्हणूनच त्यांना 'प्रबोधनकार' ही पदवी लोकांनी बहाल केली.) ठाकरेंचा वारसा असणार्‍या शिवसेनेच्या (मा. बाळासाहेब ठाकरेंचे ते वडील आहेत) आ. रावतेंनी असा खोटा, चुकीचा, समाजविघातक प्रचार का केला?आ. दिवाकर रावते हे उत्तम संसदपटू आहेत. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विधानपरिषदेत अत्यंत लढाऊ पद्धतीनं, लोकांचे प्रश्न जिव्हाळय़ानं लावून धरताना, लोकांसाठी लढताना मी आणि महाराष्ट्रानं पाहिलं आहे.म्हणूनच जेव्हा सामाजिक न्यायमंर्त्यांनी विरोधी पक्षाच्या सहमतीनं हे बिल आणूया, त्यांच्याही सूचनांचा विचार करूया, असं ठरवलं. माझ्यावर काही जबाबदारी सोपवली. तेव्हा 2005 साली सगळय़ात पहिले मी आ. दिवाकर रावते यांना भेटलो. त्यांच्यासोबत छान चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयासंबंधी बोलताना ते म्हणाले, ''अहो मानव, तुम्ही आता हे काम करता आहात, पण मी आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंसोबत या परिवर्तनाच्या लढाईत सामील आहे. शिवसेनेच्या जन्माआधीपासून माझ्यावर हा संस्कार (प्रबोधनकार ठाकरेंचा) झाला आहे. आमच्यासाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन' काही नवं नाही.'' त्यानंतर विस्तारानं त्यांच्यासोबत चर्चा झाली. मूळ बिलात बदलासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अतिशय अनुकूल प्रतिसाद दिला. त्यानंतर आ. सुभाष देसाईंशी चर्चा केली. त्यांनीही पहिल्या भेटीत अत्यंत मोलाच्या सूचना केल्या. एवढंच नव्हे, तर. डिसेंबर 2005 मधील अधिवेशनात हे बिल मांडण्याचं ठरलं. कॅबिनेटची सही झाली. बिल छपाईला जाण्याआधी मी आ. सुभाष देसाईंना दाखवलं. त्यांनी सुचवलं.''मानव,'दैवीशक्ती','देवी', 'देव' असे शब्द बिलात ठेवू नका. त्याऐवजी 'अतिंद्रिय शक्ती', 'अतिमानुष शक्ती' असे शब्द वापरा.'' केवळ सुचवलंच नाही तर माझ्यासोबत बसून ते शब्द जिथे-जिथे आहेत तिथे-तिथे आम्ही एकूण दहा बदल केले. त्यानंतर तडक मी कायदा विभागाचे सचिव श्री. शिंदेकरांकडे गेलो. त्यांना आ. सुभाष देसाईंनी सुचवलेले बदल सांगितले. त्यामुळं बिलात फरक पडत नाही. हे त्यांना पटल्यावर त्यांनी हे बिल रात्री 10 वाजता छपाईला पाठवलं. मुख्यमंर्त्यांशी फोनवर ते बोलले. आ. देसाईंनी सुचविलेल्या बदलासंबंधी सांगितलं. मुख्यमंर्त्यांनी संमती दिली. ना. हांडोरेंना सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कॅबिनेटची सही झाल्यावरसुद्धा 10 ठिकाणी बदल करण्यात आले. पंधरा दिवस आधी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्या वतीनं बिलासंबंधी बोलण्यास मी मातोश्रीवर गेलो होतो. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर वेगळंच वातावरण होतं. राज ठाकरे नाराज होऊन बाहेर पडणार अशी बातमी होती. बाळासाहेब ठाकरे फार वेगळ्या मूडमध्ये होते. शिवसेना नेत्यांची, आमदार, खासदारांची सारी धावपळ सुरू होती. त्यामुळं बाळासाहेब भेटू शकले नाहीत; पण त्याही वातावरणात उद्धव ठाकरे अर्धातास बोलले. '' हे काम आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. बिलाच्या मथळ्यात 'अंधविश्वास' हा शब्द होता. ते पाहून ते म्हणाले, 'अंधविश्वास' हा शब्द कशाला ठेवता? मग श्रद्धा, अंधश्रद्धा ही भानगड येते. त्यापेक्षा 'अघोरी प्रथा' हा शब्द वापरा. उद्धव ठाकरेंशी त्या दिवशी नीट बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर सोमवारी भेटायचं ठरलं, पण सोमवारी उद्धवजींचा फोन बंद होता. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला होता. शिवसेनेमधलं कुणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं आणि मला नागपूर अधिवेशनात पोहोचायचं असल्यानं थांबणं शक्य नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना उद्धव ठाकरेंची सूचना सांगितली. मुख्यमंर्त्यांनी आनंदानं संमती दिली. ''ठीक आहे, बिलाच्या मथळ्यातून 'अंधविश्वास' शब्द काढून टाका. त्याऐवजी 'अघोरी प्रथा' शब्द टाका.'' आणि मग बिलाचं नाव झालं, 'महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन.' हा सारा इतिहास मी का सांगतो आहे? कारण सगळ्यांच्या सहमतीनं हे बिल संमत व्हावं असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारनं हे बिल आणलं. भाजप पक्षानं 100 टक्के संमती दिली. शिवसेनेनं 100 टक्के संमती देण्याआधीच हे बिल सभागृहात मांडून 16 डिसेंबर 2005 साली विधानसभेत संमत झालं. पण तोवर शिवसेनेनं सुचविलेल्या अनेक सूचना या बिलात अंतर्भूत झाल्या आहेत. असं असताना आ. दिवाकर रावतेंनी या बिलाच्या विरोधात सनातन्यांची सुपारी का घेतली? ते सनातन्यांची भाषा का बोलतात? प्रबोधनकार ठाकरेंची भाषा ते विसरले आहेत काय? ते जे आज या बिलासंबंधी खोटंनाटं (होय, जाणीवपूर्वक हा शब्द मी वापरतो आहे) बोलताहेत ते पाहून प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्म्याला (प्रा. रावते मानतात म्हणून) वेदना होत नसतील का? मला माहीत आहे, आ. दिवाकर रावतेंना बिल चांगलं कळतं. हा त्यांचा गैरसमज नाही. ते मुद्दाम खोटं बोलून बिलासंबंधी अपप्रचार करताहेत. त्यांनी खरं बोलून या बिलाला विरोध करावा, असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी म्हणावं, परिशिष्टातील 12 कलमांना माझा विरोध आहे. भूत काढण्याच्या नावाखाली छळ होऊन माणसं मेली तरी चालतील, चमत्कारी बाबांनी लोकांना ठगवलं तरी चालेल, जादूटोण्याच्या संशयापायी छळ होऊन माणसं मेली तरी चालतील..वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुबुद्ध जनतेला माझं जाहीर आवाहन आहे की, या बिलाला विरोध करणार्‍या सगळ्यांनाच आपण जाहीर धारेवर धरा. आडवेतिडवे प्रश्न विचारा, जाब विचारा, तुमच्याजवळ या बिलाची प्रत नसेल तर ती मी ु.रलरपी.ेीस.ळप(ही अ.भा.अंनिसची साईट आहे) या साईटवर टाकली आहे. तिथून प्रिंट करून ही प्रत मिळवा आणि सनातन्यांचं कारस्थान उधळून लावा. त्यांना या देशात पुन्हा चातुर्वर्ण आणायचा आहे. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उतरंड निर्माण करायची आहे. सार्‍या प्रकारच्या अंधश्रद्धा पुन्हा समाजात रुजवायच्या आहेत. पुन्हा मनुस्मृतीचे कायदे या समाजावर लादायचे आहेत. अस्पृश्यतेचं समर्थन करणारीही मंडळी आहे हे लक्षात ठेवा. खोटं वाटत असेल तर 'सनातन प्रभात' वाचा, वर्षभराचे अंक चाळा. म्हणजे याचं खरं स्वरूप तुम्हाला दिसेल. म्हणूनच वारकर्‍यांचं आवरण ओढलेले छुपे सनातनी म्हणतात, ''आम्ही आधी हिंदू आहोत, नंतर वारकरी आहोत. मनुस्मृती चांगली आहे. म. फुले-सावित्रीबाई

फुले यांनी काहीच केलं नाही. या देशात स्त्रियांना स्वातंर्त्य, शिक्षण होतंच. सगळं वाईट

मुसलमानांमुळं झालं आहे. आधुनिक भारतातल्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण हे चालू द्यायचं का? आजच्या पिढीनं हे ठरवायचं आहे. जादूटोणाविरोधी बिल हे केवळ निमित्त.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Friday 27 July 2012

सत्तेचे तुंबलेले गटार


स्व च्छता शिकवणारे एक गुरू होते. त्यांच्याकडे शिक्षण पूर्ण करून एक शिष्य गावाकडे आला. गावात येताच त्याला बेंदाडात लडबडलेले डुक्कर दिसले. ताजे ताजे शिकलेले त्याच्या डोक्यात होते. घाण झालेल्या डुकराला आंघोळ घालून स्वच्छ करावे असा विचार त्याच्या मनात आला. तो डुकराला पकडण्यासाठी झेपावला. डुक्कर असे का हाती लागते? डुकर सटकले. शिष्य त्याच्या मागे. खूप धावाधाव करून महत्प्रयासाने त्याने त्यास पकडले. आंघोळ घातली. तेवढय़ात त्याला दुसरे डुक्कर दिसले. आता शिष्य त्याच्या मागे धावू लागला. त्याला पकडून आंघोळ घालीसतोवर तिसरे.. तिसर्‍याला घातली तेवढय़ात पहिला पुन्हा बेंदाडात लडबडून आलेला. शिष्याची दमछाक झाली. काय करावे काही सुचेना. तेवढय़ात तिकडून गुरुजी आले. दमलेला शिष्य पाहून त्यांनी विचारले, ''काय झाले?'' धापा देत शिष्य म्हणाला, ''तुमच्याकडे स्वच्छतेचे धडे घेऊन आलो. येथे येताच घाण झालेली डुकरे पाहिली. त्यांना पकडून आंघोळ घालतोय. एकाला घातली की दुसरा. दुसर्‍याला घातली की तिसरा.. पुन्हा पहिला घाण होऊन येतो. मी तर दमून गेलोय. काय करावे काही समजत नाही.''

गुरुजी शांतपणे म्हणाले, ''अरे, डुकरांना आंघोळी घालण्यापेक्षा ज्या गटारात ही डुकरे लडबडून येतात ते गटार का साफ करीत नाहीस?'' शिष्याच्या डोक्यात प्रकाश पडला. भ्रष्टाचाराचेही नेमके हेच आहे. एकेक पुढारी पकडून त्याला आंघोळी घालण्यापेक्षा ज्यामुळे हे पुढारी भ्रष्टाचार करतात ते गटारच का साफ करू नये? हे गटार सत्तेत तुंबले आहे. आमच्या राज्यकत्र्यांना

मिळालेल्या संपत्तीच्या अमर्याद अधिकारांमुळे भ्रष्टाचार माजला आहे. सत्तेच्या हातातील संपत्तीचे अधिकार मर्यादित केले की, गटार तुंबणार नाही हे माहीत असूनही सगळे भ्रष्टाचाराचे विरोधक त्या शिष्यासारखे भ्रष्टाचार्‍यांमागे धावताना दिसतात. कोणीच गटार साफ करायला तयार नाही. सत्तेच्या शिंक्यावर जोपर्यंत संपत्तीचे लोणी ठेवलेले आहे तोपर्यंत लोणी गट्टम करण्याच्या इराद्याने तेथे बोके येणारच. तुम्ही लोण्याचे रक्षण करण्यासाठी दोन उपाय करू शकतात. एक तर बोक्यांवर संस्कार करायचे. बाबांनो, हे लोणी खाऊ नका अशी शिकवण द्यायची. बोके काही ऐकणार नाहीत. दुसरा मार्ग लोण्याच्या रक्षणासाठी वॉचमन नियुक्त करायचा हा आहे. 'लोकपाल'ची कल्पना ही वॉचमन नेमण्यासारखीच आहे. कोणी म्हणतो, वॉचमनच्या हातात काठी द्या. तो बोके हाकलून लावील. कोणी म्हणतो, त्याच्या हातात बंदूक द्या. मारून पाडील. सरकार आणि अण्णांच्या टीममध्ये एवढाच मतभेदाचा मुद्दा आहे. सत्तेच्या शिंक्यावरचे लोणी सांभाळायला नेमलेल्या

वॉचमनच्या हातात भले काहीही दिले तरी शेवटी तोही एक माणूसच असणार आहे. राग, लोभ, माया, मत्सर त्यालाही असणारच. बोके त्याची नजर चुकवून कधी लोणी गट्टम करतील याचा त्याला पत्ताही लागणार नाही. वॉचमन फारच सतर्क असला व डोळ्यांत तेल घालून बसला, तर हे बोके त्याला म्हणतील, का उगाच ताप करून घेतोस? निम्मे तू खा निम्मे आम्हांला दे. वॉचमन पघळणारच नाही याची काय खात्री? वॉचमन बोक्यांपेक्षा हुशार असला तर म्हणेल, हे पाहा बोक्यांनो, तुम्ही इथे गर्दी करू नका. तुम्हांला लोणी मिळत राहील अशी व्यवस्था करतो. बोके राजी झाले तर वॉचमन आणि बोके मिळून सगळा लोण्याचा गोळा फस्त करतील. तात्पर्य एवढेच की, सत्तेच्या हातात संपत्ती ठेवून तुम्ही भ्रष्टाचारविरोधी केलेली कोणतीही उपाययोजना परिणामकारक ठरू शकत नाही.

एक काळ असा होता जेव्हा धर्मसंस्था आणि राज्यसंस्था एकत्र होत्या. राजाला देवाचा उत्तराधिकारी मानले जात असे. देव सृष्टीचा पालनहार तसा राजा प्रजेचा पालनहार समजला जाई. रेनेसान्सची चळवळ सुरू झाली तेव्हा राज्यसत्ता म्हणाली, मला धर्मसत्तेच्या सोबत नांदायचे नाही. राज्यसत्ता, धर्मसत्ता विभक्त झाल्या. त्यानंतर लोकशाही आली. परंपरेने राजा नियुक्त होण्याऐवजी आता लोक आपले कारभारी निवडू लागले. पुढे सत्तेने आपला काळा पदर पसरायला सुरुवात केली. सर्वांत आधी अर्थसत्ता, त्यापाठोपाठ अन्य व्यवस्था राजसत्तेने काबीज केल्या. अंकित केल्या. मानवीजीवनाचे सर्व व्यवहार राजसत्तेच्या पंखाखाली आले. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व व्यवहारात राजसत्ता ढवळाढवळ करू लागली. साम्यवादी विचाराने या प्रक्रियेला खतपाणी घातले. 1947 साली आपल्या देशाला स्वातंर्त्य मिळाले. त्याच्या काहीसे अगोदर रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली होती. त्या क्रांतीचा मोठा प्रभाव नेहरू व त्या काळातील अनेक नेत्यांवर होता. त्यामुळे स्वतंत्र देशाच्या उभारणीच्या पायाभरणीतच गफलत झाली. पुढे त्या चुका वाढतच गेल्या. लोककल्याणकारी म्हणत सरकार लोकजीवन नियंत्रित करू लागले. अर्थव्यवहारात ढवळाढवळ करू लागले. शेतीमालाची आयातनिर्यात असो की कापूस एकाधिकार, यांचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना आजही भोगावे लागत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांनी ग्रामीण भागातील मुलांची कशी वाट लावली हे सांगण्याची गरज नाही. गावोगाव त्याचे पुरावे दिसतात. सरकारने गरिबांच्या कल्याणाच्या नावाने अनेक योजना सुरू केल्या. अब्जावधी रुपयांच्या या योजना. त्या राबविण्यासाठी करवसुली. या करांच्या रकमांनी सरकारची तिजोरी भरली. ही तिजोरी ज्यांच्या हातात राहील ते तळ्याचे पाणी चाखणारच. शिवाय या योजना राबविण्यासाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांची याच पैशातून चंगळ होणार हे उघड आहे. गरिबांच्या कल्याणाच्या नावाने सुरू झालेल्या योजना म्हणजे भ्रष्टाचाराची कुरणे होत. लोककल्याणाच्या नावाखाली निर्माण झालेल्या योजनांची अशा प्रकारे वाताहत झाली आहे. यातून आपण धडा घेणार आहोत की नाही, की पुन्हा सरकार मायबाप आहे असेच म्हणणार? हाच खरा प्रश्न आहे.

रेनेसान्सच्या काळात जसे राज्यसत्ता धर्मसत्तेपासून विभक्त झाली तशीच आज अर्थसत्ता व अन्य सत्ता ह्या राजसत्तेपासून विभक्त होऊ मागत आहेत. त्या प्रक्रियेला वेग देण्याऐवजी सत्तेचे गटार कायम ठेवून जर कोणी 'लोकपाल'च्या भरवशावर भ्रष्टाचार कमी होईल असे मानत असेल तर त्याच्या हातात निराशेशिवाय दुसरे काही लागेल असे वाटत नाही.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही करण्याची गरज नाही. जे सरकार करीत आहे ते थांबविले तरी खूप मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार थांबू शकतो. सरकारच्या हातापासून संपत्तीची तिजोरी लांब कशी ठेवता येईल याचा विचार व्हावा. ते शक्य आहे का? होय आहे. ज्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यल्प आहे त्या देशात नेमके हेच केलेले दिसून येते. सरकार हीच भ्रष्टाचाराची जननी आहे. सरकारचा विस्तार कमी केला, की त्या प्रमाणात भ्रष्टाचार कमी होतो. गटारात लडबडलेली डुकरे धूत बसण्यापेक्षा किंवा त्यांना तुरुंगात पाठविण्यासाठी 'लोकपाल' नियुक्त करण्यापेक्षा गटार साफ करणे जास्त निकडीचे आहे.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत)

भ्रमणध्वनी-9422931986

Thursday 26 July 2012

प्रश्न समजला पण उमजणार केव्हा?



'सारे भारतीय माझे बांधव आहेत' या प्रति™ोत एका कवीने, 'सारे भारतीय कधी कधी माझे बांधव आहेत' अशी पुस्ती जोडली. शेतकर्‍यांविषयीचा समाजाचा आकस व दु:स्वास पाहता 'शेतकरी सोडून सारे भारतीय माझे बांधव आहेत' अशी सुधारणा प्रति™ोमध्ये केली जावी असे मला वाटते.

'भारतीय शेतकरी कर्जामध्येच जन्म घेतो, कर्जामध्येच जगतो व कर्जामध्येच मरतो' हे तर आपण लहानपणापासून ऐकतो आणि वाचतो आहोत. 134 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्येही शेतकर्‍यांची दुरवस्था, त्याचा कर्जबाजारीपणा भरभरून सांगितला आहे. पण त्याहीकडे लक्ष न देता आम्ही शेतकर्‍यांनाच आळशी, अज्ञानी, अडाणी ठरवून मोकळे झालो. त्यामुळे तो कर्जबाजारी असलाच तर दोष शेतकर्‍यांचा त्याला आम्ही काय करावे? असा साळसूदपणा प्रति.खेतील 'सारे बांधव' दाखवीत राहिले. आता तेच बांधव साळसूदपणे प्रश्न विचारतात. पूर्वीही शेतकरी कर्जबाजारी होता, आताही आहे. पण तेव्हा तो आत्महत्या करीत नव्हता. पण आता तो कर्जबाजारीपणाच्या ताणातून आत्महत्या करतो, असे म्हटले जाते ते कसे?

पूर्वीही तो कर्जबाजारी होता. पण आत्महत्या करीत नव्हता. कारण भांडवल खाऊन जगण्याची सोय होती. जमिनीचा आकार बर्‍यापैकी असल्यामुळे वेळप्रसंगी जमिनीचा तुकडा विकून खाण्याची सोय होती. गोठय़ात गुराढोरांची संख्या बर्‍यापैकी होती. वेळप्रसंगी ती विकून गुजराण करता येत होती. शेतीत झाडं होती. आंबराई होती. ती तोडून विकून खाता येत होती. जमीन सुपीक होती. ही सुपीकतासुद्धा ओरबडून खाण्याची सोय होती. आज जमीन नापीक झाली असेल तर त्यामुळे. मी खेडय़ात अशी असंख्य घरे पाहिली आहेत की, ज्या घरावर टिनांचे पत्रे होते ते विकून त्याऐवजी कवेलू टाकले व या व्यवहारात जी 'मार्जीन' राहिली ती खाल्ली आणि जगला. चांगल्या बैलाची जोडी विकून त्याऐवजी दुय्यम दर्जाची बैलजोडी विकत घेतली. शिल्लक राहिलेल्या मार्जीनवर काही सांजी भागविल्या व जगला. लहानपण म्हणजे खेळण्याचे वय व म्हातारपण म्हणजे विश्रंतीचे वय हा नियम तोडून शेतकर्‍यांनी बालपण व म्हातारपणसुद्धा शेतीत जुंपले तरीही तो कर्जबाजारीच राहिला. कायम तोटय़ात राहिलेली शेती. त्यामुळे शेतीवर कायम कर्जबाजारीपण आणि या कर्जबाजारीपणाच्या ताणातून भांडवल खाऊन, मार्जीन खाऊन का होईना जगण्याची केलेली सोय त्यामुळे तो कर्जबाजारी असतानासुद्धा आत्महत्या करीत नव्हता. पण आता भांडवल व मार्जीन खाऊन जगण्याची सोयसुद्धा संपली आहे. विकायला जमीन नाही. जमिनीची सुपीकताही संपलेली. गोठय़ातील गुरंढोरं जवळपास संपुष्टात तरी आलेली आहेत किंवा त्यांच्या शरीराचे सापळेच तेवढे शिल्लक आहेत. शेतावरील झाडे तर केव्हाचं आडवी झाली आहेत. अशा अवस्थेत तो आत्महत्येच्या कडेलोटावर येऊन पोहोचला आहे. तरीही त्याच्याबद्दल सहानुभूती का नाही? अभिजनांची मानसिकता त्याच्याविरोधी का आहे?

खरेतर शेतकर्‍यांच्या बाजूने कोणीच नाही. कोणतेही तत्त्वज्ञान नाही. तत्त्वज्ञान 'डावे' असो वा 'उजवे' शेतकर्‍यांच्या बाजूने नाही. उजव्या बांधवांच्या तत्त्वज्ञानानुसार शेतकरी 'क्षुद्र' आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पायरीनेच राहावे असे त्याला वाटते. त्यांच्या कर्मविपाक सिद्धांतानुसार शेतकरी गेल्या जन्मीचे पाप या जन्मी भोगतो आहे. त्याला उजव्या विचारसरणीचे बांधव काय करणार? तर डाव्या विचारसरणीमध्ये शेतकरी जमिनीचा मालक आहे. तो मालक आहे म्हणजेच 'आहेरे' आहे. शेतकरी 'आहेरे' आहे म्हणून 'शोषक' आहे आणि 'शोषक' आहे म्हणून तो 'खलनायक' आहे. 'जगातील कामगारांनो एक व्हा' म्हणणार्‍यांनी जगातीलच काय, पण या देशातीलच शेतकर्‍यांना एक करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यांना एक मानले नाही. उलट अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, ओलिताचा शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, धान, ऊस, कापूस, सोयाबीनचा शेतकरी अशा प्रचंड चिरफाळ्य़ा वैचारिक पातळीवर शेतकर्‍यांच्या करून ठेवल्या. म्हणजेच एका अर्थाने त्याच्या बाजूने ना 'उजवे' बांधव होते ना 'डावे' बांधव. एवढेच काय तर परमेश्वरही त्याच्या बाजूने कोठे होता? याबाबतीत पुराणातील 'बळीराजा'ची कथा मोठी उद्बोधक आहे. बळीराजा चांगला आहे. सज्जन आहे. हे दाखले पुराणातच आहेत. बळीराजाच्या सज्जनपणामुळे इंद्राचे आसन डळमळीत व्हायला लागले आणि प्रत्यक्ष परमेश्वराने वामनाचा अवतार घेऊन बळीला पाताळात गाडले अशी ती कथा आहे. बळी कसा होता याबाबतीत 'पुराणातील वांगी' पुराणात जरी ठेवली तरी आजही गावखेडय़ातील मायमाऊली, 'इडापीडा टळो बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना करते. त्याच बळीला मात्र परमेश्वर पाताळात गाडतो. शेतकर्‍यांच्या बाजूला ना डावे ना उजवे, ना प्रत्यक्ष परमेश्वर. त्या शेतकर्‍यांनी सैतानाकडून तरी अपेक्षा कशी ठेवावी?

शेतकर्‍यांनी असे करावे, तसे करावे, हे करावे ते करावे, असे करू नये, तसे करू नये. यातून फार तर आपल्या मार्गदर्शनाचा 'कंड' आपण जिरवू शकतो. स्वातंर्त्यानंतरच्या 64 वर्षात मार्गदर्शनाचा कंड बर्‍यापैकी जिरवूनही झाला. तरीसुद्धा शेतकर्‍यांची दुरवस्था कमी न होता ती वाढत वाढत आत्महत्येच्या टोकाला येऊन पोहोचलेली आहे. याचे कारण जखम पायाला आणि पट्टी शेंडीला असा उपचार सुरू आहे. शेती तोटय़ात आहे. शेती तोटय़ातच राहते म्हणून शेतकरी कर्जबाजारी आहे आणि शेती तोटय़ातच राहावी असे सरकारी धोरण आहे म्हणून शेतकरी कर्जबाजारीपणाच्या ताणातून मरतो आहे. हे वास्तव कटू असले तरी या वास्तवाला सामोरे गेल्याशिवाय शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात सी. सुब्रमण्यम उद्योगमंत्री होते. नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात सी. सुब्रमण्यम यांची केंद्रीय कृषिमंत्री म्हणून नेमणूक होते. 'अल्टरनेट रिव्हाल्युशन' या पुस्तकात सी. सुब्रमण्यम लिहितात, 'मला प्रचंड राग येतो. उद्योगमंर्त्यांऐवजी देशाचा कृषिमंत्री करून शास्त्रीजींनी आपली पदन्नावती केल्याची भावना होते. माझा संताप मी त्यांच्या कानावर घालतो. ते माझी समजूत घालतात व मी ते पद स्वीकारतो.' आणि ते पुढे लिहितात, 'उद्योगमंत्री असताना उद्योगाचा ताळेबंद मांडण्याची माझी सवय मी कृषिमंत्री असतानाही सुरूच ठेवतो. लवकरच माझ्या लक्षात येते. या देशातील शेती प्रचंड तोटय़ात आहे. तोटय़ात आहे आणि फक्त तोटय़ातच आहे.'

या प्रसंगात अनेक गोष्टींचा उलगडा होतो. एका बाजूला हा देश 'कृषिप्रधान' आहे असे जाहीरपणे म्हटले गेले असले तरीही किंमत मात्र उद्योगांनाच होती. म्हणूनच उद्योगमंत्री जेव्हा कृषिमंत्री होतो तेव्हा तो त्यांना अपमान वाटतो. चाळीस-पन्नास वर्षापूर्वी शेती फक्त तोटय़ात आहे ही जाणीव कृषिमंर्त्यांना होते. अर्थात ही कबुली ते आपल्या आत्मचरित्रात निवृत्तीनंतर देतात. जी बाब सी. सुब्रमण्यम यांच्या लक्षात येते तीच बाब अण्णासाहेब शिंदे, माजी कृषिमंत्री अजितसिंगही कालांतराने मान्य करतात. पण ही बाब केवळ कबुलीजबाबापुरतीच मर्यादित राहते. उपाययोजनेमध्ये तिचे रूपांतरण होत नाही आणि कधी झाले नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येला हे कारण आहे. हे सत्ताधार्‍यांना समजलेच नाही असेही नाही. खुद्द पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 15 ऑगस्ट 2006 रोजी याविषयी लाल किल्ल्यावरून जाहीर चिंताही व्यक्त केली होती. 18 ऑक्टोबर 2006 रोजी दिल्ली येथील दुसर्‍या राष्ट्रीय कृषी परिषदेत, 'शेतीची अवस्था बिकट आहे. शेतीविषयक व ग्रामीण विकासाविषयींच्या आपल्या दृष्टिकोनात मूलभूत बदल करण्याची वेळ आली आहे,' असेही प्रतिपादन पंतप्रधानांनी केले होते. परंतु अजूनही त्यांना 'मुहूर्त' सापडलेला दिसत नाही. डॉ. स्वामिनाथनच्या अध्यक्षतेखाली तयार असलेला राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल अजूनही तसाच धूळ खात पडलेला आहे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र जाधवांनी तयार केलेला अहवालही कचर्‍याच्या पेटीत पडून आहे. एकूणच प्रश्न समजला आहे, पण अजूनही तो उमजत नाही किंवा उमजण्यासाठीचा 'मुहूर्त' अजूनही सापडत नाही. शेतकरी मरत असताना त्याची लाज, खंत, खेद जर कोणालाच वाटत नसेल तर निराशेने प्रति™ोत बदल करावासा वाटतो 'शेतकरी सोडून सारे भारतीय माझे बांधव आहेत' तो यामुळेच.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

दोन प्रकारचे लोकं!

   

प्रिय वाचकहो, तुमच्या आमच्या जगण्यावर 'दोन' या आकडय़ाचा फार प्रभाव आहे किं वा या विश्वाची विभागणीच दोन भागात झाली आहे. बघा, पृथ्वी अन् आकाश. पृथ्वीवरची माणसं बरं-वाईट झालं की आकाशात जातात. तिथेही कुठे जातात? स्वर्गात किंवा नरकात का? तर वर म्हणजे आकाशात दोनच प्रवृत्ती राहतात देव अन् दानव. तिथे ग्रहही दोन चंद्र अन् सूर्य. त्यामुळे पृथ्वीवर कधी दिवस तर कधी रात्र. तिथे गेल्यावर जो हिशोब होतो तो होतो पाप-पुण्याचा. कारण देवाने दोनच प्रकारची माणसं निर्माण केलीत चांगली किंवा वाईट! म्हणजे काही भारतासारखी, काही पाकसारखी. माणसातले आणखी दोन प्रकार, एक म्हणजे माणूस अन् दुसरं बाई माणूस. माणसाला जगण्यासाठी दोन पर्याय असतात विवाहित किंवा अविवाहित. विवाहावरून आठवलं भारतात सासू-सुनाही दोन प्रकारच्या असतात वास्तवातल्या अन् दुसर्‍या मालिकांमधल्या. विवाहातही दोन गमती, एकतर तुम्ही विवाहित राहू शकता किंवा आनंदात. कारण भावना दोनच प्रकारच्या असू शकतात आनंदाच्या किंवा दु:खाच्या. आनंदाच्या आपल्या कल्पनाही दोनच श्रीमंत आणि गरीब! गरीब हा आनंदी राहू शकतो पण श्रीमंत असला म्हणजे तो आनंदातच आहे असं बरेच लोक समजतात. तसं समज असणार्‍यांना बुद्धिवादी म्हटलं जातं आणि इतरांना इतर म्हणजे पुन्हा दोन प्रकार! त्यात बुद्धिवाद्यांमध्ये दोन भाग आध्यात्मिक विचारसरणी अन् वैज्ञानिक विचारसरणी. (मा. भटकरांसारखे काही प्रज्ञावंत या दोन्ही विचारसरणी एकाच बंडीला जुंपायच्या प्रयत्नात आहेत) ही दोन प्रकाराची कल्पना अमेरिकेने 8-10 वर्षांपूर्वी अधोरेखित केली की एक तर तुम्ही अमेरिकेच्या बाजूने किंवा दहशतवादाच्या बाजूने. कारण कायद्याशी संबंधित दोनच लोक असतात एक गुंड अन् दुसरे पोलीस. कायद्याची लढाई कोर्टात गेली की तुम्ही एक तर जिंकता किंवा हरता. आता ही गोष्ट एकतर खरी असू शकते किंवा खोटी असू शकते. खरं खोटं राम किंवा कृष्ण जाणे. राजकारण्यांनी रामही दोन केलेत तुमचा आमचा राम वेगळा अन् भाजपाचा राम वेगळा. सत्तेत असताना विसरला जातो अन् विरोधात असताना आठवतो तो. तसं योग्य वेळी विसरणं अन् योग्य वेळी आठवणं हे राजकारण्यांबरोबरच सिनेमावाल्यांना चांगलं जमतं. जे मनमोहन देसाईच्या सिनेमात असायचं. त्यांचा सिनेमा व्यावसायिक प्रकारात मोडायचा. कारण तो यशस्वी व्हायचा. कारण तसे सिनेमे दोन प्रकारचे असतात एक व्यावसायिक अन् दुसरा समांतर! (यशस्वी असतात ते व्यावसायिक अन् ज्यांना पुरस्कार मिळतात ते समांतर) व्यावसायिकमध्ये पुन्हा दोन. एक कथा असलेले अन् दुसरे कथा नसलेले! कथा नसलेल्या सिनेमात कथेच्या गरजेसाठी अंगप्रदर्शन करणार्‍या नटय़ा असतात. त्याही दोन प्रकारच्या कपडे घालणार्‍या, कपडे न घालणार्‍या. किती कपडे घालायचे निर्माता ठरवतो अन् ते कुठे कितीदा काढायचे दिग्दर्शक ठरवतो. तसं चांगल्या सिनेमासाठी आणखी दोघं लागतात गीतकार, संगीतकार. खूप लोकं सिनेमात पैसा गुंतवतात तो काळय़ाचा पांढरा करायला. कारण पैसा पण दोन प्रकारचा काळा अन् पांढरा. हे रंगही खूप ठिकाणी जोडीने येतात. रागात ते लाल पिले असतात अन् खूप मार खाल्ल्यावर काळे-निळे होतात तर मंगल प्रसंगी हळद-कुंकू बनून येतात. अशा मंगल प्रसंगाकरिता आपला चॉईस असतो डॉक्टर किंवा इंजिनिअर. कारण यांच्याकडेच गाडी-बंगला, नोकर-चाकर असतात. इतरांचे खायचे-प्यायचे वांधे असतात. (असा एक सर्वसाधारण समज आहे) पण आजकाल असं काही राहय़लं नाही म्हणा. कारण लोकांच्याही आवडी-निवडी बदलल्यात, असे लेख कोणाला आवडतात तर कोणी सोडून देतात..

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

Monday 23 July 2012

गोष्ट आजची की खरंच खूप वर्षापूर्वीची?

खूप वर्षापूर्वीची गोष्ट. भारतवर्षात एक राजा होऊन गेला. त्याचे नाव भीमसेन. त्याच्या पित्याचे नाव शूरसेन. तो आपल्या नावाप्रमाणेच पराक्रमी होता. निधनापूर्वी त्याने आपल्या पुत्रांना एक मौलिक उपदेश केला. आपण शूरवीरांचे वारस. शूरवीरांनी लढायचे असते; पण आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी. चार दिशांना चार राज्ये आहेत. त्यांच्या कोंडीत सापडलेला आपला चिमुकला देश आहे. या चार देशांचे राजे बाहेरच्या राज्यांची मदत घेतात. आपण कष्टाने पिकवलेले अन्नधान्य लुटून नेतात. परस्परांत वाटून खातात. आपली मात्र कायम उपासमार होते. तुम्ही असा काही उपाय करा की, ज्यामुळे आपल्या प्रजाजनांचे कष्ट कमी होतील, त्यांची उपासमार थांबेल आणि चारही बाजूंनी घेरलेल्या देशांशी आपले संबंध सलोख्याचे राहतील. राजा शूरसेन मरण पावला; पण त्याचा उपदेश भीमसेनाने मनात रुजवला. अहोरात्र कष्ट केले. चार राज्यांच्या राजांना पटवून दिले. आपण परस्परांत लढण्याऐवजी एकजुटीने कष्ट करू. मिळेल त्याचे समान वाटप करू. चार देशांचे आणि मधे सापडलेल्या आमच्या प्रदेशाचे एकच राज्य करू. बाहेरचे राजे आमचे धन लुटून नेतात. त्यांचा एकजुटीने प्रतिकार करू. सगळ्य़ांना ही कल्पना आवडली. सर्वानी एकजूट केली. एका नव्या साम्राज्याची निर्मिती केली. सर्वानी परस्परांशी कसे वागावे याची चर्चा केली. चर्चेचा ग्रंथ केला आणि इथून पुढे या ग्रंथाचे सर्वानीच पालन करावे असा फतवा काढला. राजा भीमसेनावर सर्व राजे खूश झाले. ते म्हणाले, ''आता या ग्रंथाप्रमाणे सर्वानी वागावे. यावर देखरेख ठेवण्याचे काम तुम्हीच करा.'' राजा भीमसेन यांनाही ही सूचना आवडली. राजा भीमसेनाने सर्वाकडून एक वचन घेतले. आता आपल्यापैकी कुणीही मोठा नाही. कुणीही छोटा नाही. आपले वाद निर्माण झालेच, तर ते याच ग्रंथाच्या आधारे मिटवू. ग्रंथाची प्रतिष्ठा राखू. या ग्रंथात हवे तर एकमताने चर्चा करून बदल घडवून आणू; पण या ग्रंथापेक्षा कुणी मोठा नाही अशी प्रतिज्ञा करू. सर्वानी प्रतिज्ञा घेतली. जगाला धाक वाटेल असे नवे साम्राज्य निर्माण झाले. राज्य ग्रंथाच्या आधारे सुरू झाले.

सगळे राजे परस्परांशी सहकार्याने वागू लागले. वाद उद्भवले की, राजा भीमसेनाचा सल्ला घेऊ लागले. बाहेरच्या राज्यांचे अतिक्रमण थांबले. परस्परांशी लढून शक्ती खर्च करण्यापेक्षा आपल्या साम्राज्याचे उत्पन्न कसे वाढेल यावर ती शक्ती खर्च होऊ लागली. पण काही लोक स्वभावत: आळशी असतात तर काही लोभी. ग्रंथाआधारे न्यायनिवाडा होतो म्हणून काय झाले? अखेर न्यायनिवाडे देणारी माणसेच तर असतात! अशा जागेवर चुकूनमाकून एखादा लोभी माणूस न्यायनिवाडा करण्यासाठी बसला की, तो आपल्या स्थैर्यासाठी चार लोकांचे बळ वापरणारच. त्यांचे पाठबळ मिळावे म्हणून तो मोहबळाचे अस्त्र वापरणारच. राजा

भीमसेन जसजसे वृद्ध होऊ लागले तसतसे त्यांना तशा मूठभर लोकांचे संख्याबळ वाढू नये म्हणून काय करता येईल, असा प्रश्न भेडसावू लागला. खरेतर यावर एकच उपाय होता. तो म्हणजे ग्रंथाविषयी जागरूकता वाढवणं. राजा भीमसेनांच्या देशात एक प्रथा होती. दसर्‍याच्या दिवशी राजा हत्तीवर बसून नगरप्रदक्षिणा करीत असे. यानिमित्ताने प्रजेला राजाचे दर्शन होत असे. लोकांचे राजाविषयीचे प्रेम वाढत असे. भीमसेन राजाने या प्रथेत बदल केला. एका दसर्‍याच्या दिवशी राजहत्तीच्या अंबारीत आपण सिद्ध केलेला ग्रंथ ठेवला. स्वत: राजा अश्वारूढ होऊन हत्तीच्या मागे निघाला. गर्दी कुतूहलाने हे दृश्य पाहू लागली. हत्तीचा डौल दिमाखदार वाटावा म्हणून हत्तीच्या मागेपुढे चार प्रशिक्षित श्वानांची योजना केली. आपण अश्वारूढ राजाच्या पुढे आहोत, राजहत्तीचे संरक्षक आहोत हे लक्षात आल्यामुळे ते श्वानही आता डौलात चालू लागले. एका दसर्‍याला सुरू झालेली ही प्रथा पुढे अधिकच वैभवसंपन्न झाली. ग्रंथाची प्रतिष्ठा वाढली. 'ग्रंथापेक्षा अन्य कुणी श्रेष्ठ असू शकत नाही' हा विचार रुजला. राजा भीमसेनाचे समाधान झाले आणि एके दिवशी राजा भीमसेनाचे निधन झाले. प्रजाजन व्याकूळ झाले. भीमसेन गेले पण ग्रंथरूपाने ते आता उरले या विचाराने प्रत्येक दसर्‍याची मिरवणूक आता अधिक वैभवसंपन्न होऊ लागली. आणि एके दिवशी प्रजेवर दुसरा आघात झाला. राजहत्ती मरण पावला.

दसरा जसजसा जवळ येऊ लागला तसतसा प्रत्येकासमोर एकच प्रश्न पडला. ग्रंथाची मिरवणूक काढायची कशी? राजहत्तीची जागा अन्य कुण्या हत्तीला द्यायला कुणीच तयार नव्हते. म्हणून चार श्वानांनी बैठक घेतली. सल्लामसलत केली आणि ते प्रजेला म्हणाले,

''मित्रहो, काळजी करू नका. ग्रंथ याच अंबारीत ठेवला जाईल. या अंबारीला दोन दांडय़ा लावल्या जातील. त्या दांडय़ा आम्ही आमच्या पाठीवर घेऊ. मिरवणूक पूर्ववत निघेल.''

त्यांचा हा विचार लोकांना पटला. पण एकदोघांनी शंका व्यक्त केली. ''ग्रंथ अंबारीतच राहील हे ठीक; पण तो तुमच्या पाठीवर ठेवून प्रदक्षिणा घालताना ग्रंथाची उंची कमी होईल त्याचे काय?'' पण लगेच श्वानांनी सांगितले, ''ग्रंथाची उंची कशी कमी होईल? ग्रंथात

फेरबदल केले तर त्याची उंची कमीजास्त होईल. आपण ग्रंथात कुठे फेरबदल करीत आहोत?'' हाही विचार लोकांना पटला. तेव्हा श्वान म्हणाले, ''ग्रंथाची उंची आहे तेवढीच राहणार आहे. फरक फक्त तुमच्या दृष्टीचा असणार आहे. ग्रंथ राजहत्तीवर होता तेव्हा तुम्ही माना उंचावून त्याकडे पाहत होते. आता तो आमच्या पाठीवर आला तर माना उंच न करताही तुम्ही पाहू शकता.'' अखेर सर्वानुमते श्वानांचा निर्णय मान्य झाला. श्वानांच्या पाठीवर अंबारी ठेवण्यात आली. नगरप्रदक्षिणा सुरू झाली. पुढच्या वर्षी नवा पेच निर्माण झाला. प्रजेने श्वानांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या वर्षावामुळे प्रत्येक श्वानाला वाटले, अंबारी फक्त आपल्यामुळेच पेलवली गेली. म्हणून प्रत्येक श्वानाने आग्रह धरला, आता ही अंबारी मी एकटाच वाहून नेणार. ती माझ्या पाठीवर ठेवा. प्रत्येक श्वानाने हाच आग्रह धरला. आता हे भांडण मिटवायचे कसे? एवढय़ात एक लबाड कोल्हा तिथे आला. तो म्हणाला, ''मित्रहो, असे भांडू नका. त्याऐवजी आपण या अंबारीचे समान चार भाग करू आणि प्रत्येकाच्या पाठीवर ते चार तुकडे ठेवू.''

''हो, पण मग ग्रंथाचे काय करायचे?''

''ग्रंथाचेही चार विभाग करू ना!'' कोल्हा म्हणाला. ग्रंथाचेही चार तुकडे करायचे! ही कल्पनाच प्रजेला सहन झाली नाही. प्रजाजनांनी टाहो फोडला.

''अरे, तुम्ही चौघे आहात. एकजुटीने अंबारी उचला म्हणजे ग्रंथही सुरक्षित राहील आणि अंबारीचेही तुकडे होणार नाहीत.''

पण प्रजेचा हा केविलवाणा आक्रोश कुणी ऐकलाच नाही. पाहता पाहता ही वार्ता विंध्याचल प्रदेशातल्या परिप्राजकांना लागली. त्यांच्या नेत्याने एक बलदंड हत्ती निवडला आणि थेट भीमसेन राज्याच्या प्रदेशात पोहोचले. ऐन दसर्‍याच्या दिवशी परस्परांत भांडणार्‍या श्वानांची पर्वा न करता त्यांनी ती अंबारी उचलली आणि आपल्यासोबत आणलेल्या हत्तीवर प्रतिष्ठापित केली. प्रजेने हत्ती पाहिला. त्यावरची अंबारी पाहिली आणि प्रजा हरखली. नगरप्रदक्षिणा सुरू झाली. सर्व मिरवणूक निर्विघ्न पार पडली. या हत्तीच्या अवतीभवती श्वानांऐवजी चार हुशार कोल्ह्यांची नियुक्ती केली. कोल्ह्यांनी चातुर्यपूर्ण संभाषण केले. त्यांनी प्रजाजनांची मने जिंकली. श्वानांची राजमान्यता संपुष्टात आली. राजा भीमसेनाचा पायंडा सुरू राहिला.

बिसापाने गोष्ट संपवली. व्यास ती गोष्ट मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. गोष्ट संपल्यानंतर व्यास तंद्रीतून बाहेर आले आणि बिसापाला म्हणाले,

''पण बिसापा, मला एक कळले नाही. भीमसेन राजाच्या प्रजेने हा एवढा मोठा बदल मान्य कसा केला?''

''एवढा मोठा बदल?''

''नाहीतर काय? भीमसेनाच्या प्रदेशातून त्यांचा ग्रंथ थेट विंध्याचल पर्वताकडे गेला आणि तरी लोक गप्प?''

बिसाप हसला आणि म्हणाला, ''मुनिवर्य तुम्ही भारतवर्षात तरी आहात. मी मात्र गांधार देशातला. तेव्हा जी गोष्ट मला सहज कळली ती तुम्हांला मात्र कळू नये याचे मला आश्चर्य वाटले.''

''म्हणजे काय?''

''म्हणजे असं की, हत्तीला पर्याय हत्तीच असू शकतो हे त्या विंध्याचलच्या नेत्याला कळले. इथे खरा प्रश्न ग्रंथ परिशीलनाचा नसतो. तो असतो ग्रंथप्रदर्शनाचा. दर्शन हत्तीवरून झाले याचे समाधान प्रजेला झाले.''

''पण मला ती श्वानाऐवजी कोल्ह्यांची योजना..?''

''नुसता प्रामाणिकपणा काय कामाचा? कोल्हा प्रामाणिक असो नसो, तो चतुर असतो हे तुम्हांला माहीत आहेच ना?'' एवढे बोलून बिसाप निघून गेला. व्यास त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला. इसाप सगळ्य़ांना माहितंय; पण बिसाप मात्र कमी लोकांना. मी ही बिसापाची गोष्ट वाचली आणि उगाच विंध्याचल, हत्ती, एकजुटीचा उपदेश आणि नियमांचा ग्रंथ या उल्लेखांमुळे मला आजच्याच वर्तमानातील वाटली. माझी शंका खरी की खोटी? अजून मला कळले नाही.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

अजाबरावची ठसन


    

''बोलो भय्या.. क्या होना?''

''सायकल होना भाडेसे''

'क्या नाम है तुम्हारा?'

''अजाबराव''

''कहां रहते?''

''बोंदरखेड''

''पहचान?''

''म्हणजे?''

''तुम्हारा कौन पहचान का है?''

''भौत है.. आमदार, खासदार वयखते मेरेकू''

''दर्यापूर में कौन पहचान का है?''

''भौत है, डांगे मास्तर है.. हमारे गावके लालाकी अडत है दर्यापूर में''

''उनको लाव यहा''

''क्या बोलते राज्या.. टप्परशाप सायकल के वास्ते कोई आयेंगा क्या?''

''बगर पहचान के सायकल नही मिलती''

''म्हणजे मी चोट्टा दिसतो काय तुले?''

''वैसी बात नही भय्या''

''तीन पैशाच्या सायकलसाठी वयख मांगून राह्यला.. भरोसा नाही काय? फेक तिकडे तुही सायकल.. चाललो मी..''

''काय झालं अजाबराव.. काहून काताहून राह्यले?''

''मले वयख मांगून राह्यला ससरीचा''

''कोन?''

''तो सायकलवाला, मी भाडय़ानं सायकल मागाले गेलो.. तो म्हणते वयख सांगा? त्याले काय मालूम.. शरद पवारशी वयख हाय या पठ्ठय़ाची, अजाबराव म्हणता घंटा लागते''

''सायकल कायले पाह्यजे तुमाले?''

''अरे मी त्याले सांगून राह्यलोकी मी बोंदरखेडचा अजाबराव आहो, गावातून अँटोनं दर्यापुरात आलो, मले कमालपुरले जायाचं हाय.. नऊची एसटी हाय.. स्टॅण्डवर बसल्यापेक्षा मले वाटलं मेडिकलच्या दुकानातून गोया आनाव.. दुकान स्टॅण्डपासून दूर हाये म्हणून मी सायकल घेऊन चाललो होतो, पण तो म्हणते वरख सांगा?''

''बरोबर हाय त्याचं.. वयख शिवाय सायकल भेटत नाही दर्यापुरात''

''अबे पण मानसाले काही किंमत असते की नाही श्यामराव.. तीन पैशाच्या सायकलसाठी वयख कायले पाह्यजे? अशा डंगर्‍या सायकली माझ्या घरी खतावर पळेल हायेत, मले वयख मांगते ससरीचा.. मी सारी दुनिया हिंडलो, पण मले आजून कोनं वयख मागितली नाही.. आमदार, खासदार मले रामराम करतात.. अन् हा खोक्यातला मले वयख मागून राह्यला''

''सायकल चोरी जातात म्हणून तो वयख मागते''

''अबे मी चोट्टा दिसून राह्यलो काय? दुकानातून गोया आणत होतो अन् त्याची सायकल वापस करत होतो, तेवढा त्याले भरोसा नाही, अशा सतरा सायकली एका दिवसात इकत घेतो.. तो काय समजला मले? अजाबराव म्हणता घंटा लागते, तू काय वयख मागतं म्हणा.. खुद्द मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन गेले''

''कधी हो?''

''माह्य घर पुरात वाहून गेलं होतं त्यासाली सव्र्हे कराले आले होते.. अन् तो मले वयख..''

''कुठं चालले तुम्ही?''

''मी कमालपुरले चाललो, भासीचे फायनल हाये..''

''इथून नऊची गाडी हाये''

''मग इथी कायले बडबड करून राह्यले? एसटी पाहून घ्या''

''एसटी कुठं लागते?''

''चौकशी ऑफिसले विचारा''

''चौकशी ऑफिसात विचारतो.. आपल्याले कोनाचा भेव हाय काय? ओ साहेब.. शुक शुक.. इकडे पाहा आगुदर''

''बोला?''

''कमालपूरची गाडी कधी लागते?''

''आताच गेली पाच मिनिटे झाले''

''ऑ?, अशी कशी गेली?''

''नऊचा टाइम असते तिचा.. आज राइट टाइम गेली''

''त्या रोजी एक घंटा लेट गेलती अन् आज कशी राइट गेली?''

''आजकाल राइट टाइम सुटतात गाडय़ा''

''अरे पण मी इथीच होतो ना.. मले आवाज द्या लागत होता.. प्रायव्हेट गाडय़ावाले कसे आवाज देतात? भोंग्यातून आऊट करा लागत होतं''

''भोंगा बंद आहे''

''दुसरी गाडी किती वाजता आहे?''

''पाच वाजता''

''घ्या दाबून.. आता आली किती घोये खोसी? मले अर्जट जायाचं हायं.. त्या गावात अँटो जात नाही''

''त्याले मी काय करू?''

''तुम्ही गाडी लवकर कशी सोडली?''

''लवकर नाही.. राइट टाइम गेली''

''अशी कशी गेली? नाही ताहा दोन दोन घंटे लेट करता.. अन् आज कशी राइट गेली?''

''बोर्डावर नऊचा टाइम आहे.. वाचून घ्या..''

''ते सांगू नका.. मले वाचता येत नाही काय? अळानी समजले काय?''

''तुम्ही एवढे बॅलिस्टर आहात मंग मगापासून हुज्जत कायले करून राह्यले?''

''हुज्जत कोन करून राह्यलं? मी तुमाले एवढेच इचारून राह्यलो की गाडी गेली कशी?''

''राइट टाइम गेली''

''काहून गेली?''

''तुम्ही फुटा इथून.. डोकं खाऊ नका''

''काहून फुटा? फुकटचा पगार घेता काय?''

''हे पाहा.. जास्त बकबक करू नका.. मॅनेजरजवळ कम्पलेंड करा''

''मी मंर्त्यालोक जातो, मले झांगो समजले काय? आता फोन करतो तं पाच गाडय़ा बलावतो.. अजाबराव म्हणता घंटा लागते.''

''मंग बलावा.. तोंड कायले वासून राह्यले.. चला निघा इथून''

''ओ साहेब.. शिल्लक बोलू नका''

''जाय.. लय पाह्यले तुह्यासारखे''

''म्याही लय पाह्यले.. फेक तुही एसटी.. तुह्या एसटीच्या भरोसावर नाई मी.. अशा सतरा एसटय़ा इकत घेतो.. तुले काय वाटते? ह्या पठ्ठय़ा पैदल जाईन कमालपुरले.. हा चाललो पैदल.. मले असा तसा समजला काय? अजाबराव म्हणता घंटा लागते''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9561226572

वासनवेल

     A A << Back to Headlines     
मृग नक्षत्रात दणकावून पाऊस पडतो. शेताच्या बांधबंधार्‍याने झाडं असतातच. उन्हाळ्यात ही झाडं उघडी उघडी एकटी, मोकळी दिसतात; पण पावसाच्या पाण्याने जमिनीत पडून असलेलं वेगवेगळ्या रानवनस्पतींचं वेलीजाळीचं बियाणं टरारून वर येते. पाहता पाहता बांधावरची झाडं सगळी वेलविळख्यांनी गुरफटून जातात. कपडे घातलेल्या बाई-माणसाने अंगावर पुन्हा शाल पांघरूण घ्यावी तशी ही झाडे वेलीवळ्यांचे घुंगट घेऊन उभी असलेली दिसतात. पावसाळा, हिवाळा संपला की पुन्हा ह्या हंगामी वेली आपली जागा धरून खाली खाली दबून नाहीशा होऊ लागतात. चरायला सोडलेली गुरंढोरं, गाई, बकर्‍या शेंडेखुडी करून वेलींना होत्याचं नव्हतं करतात.

जशा बांधबंधार्‍याने किंवा शेत बंधार्‍याने वेली वाढतात तशाच माणसाच्या मनावरही वेगवेगळ्या विचारांच्या वेली वाढतच असतात. कधी ती विचारवेल मनाला पार गुरफटून घेते. सुदबुद हरवते. दुसरं काही सुचूच देत नाही आणि आयुष्य मग एकारून जाते. त्यातल्या काही वेली ह्या अमरवेलीसारख्या असतात. अमरवेली जशा ज्या झाडावर चढल्या, वेली विळखा मारून बसल्या त्या झाडाला गुदमरून मारून टाकतात. तशाच ह्या अविचाराच्या वेली माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास करतात.

दृष्टांतपाठामध्ये या 'जळमांडवी'चा मोठा समर्पक दृष्टांत आलेला आहे. तो ऐकून सगळ्या मानवजातीसाठी मोठा समर्पक वाटतो. जळमांडवी ही एक प्रकारची पानवेल असून ती पाणी स्वच्छ राखते असा समज आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष झाले आणि तिची नको तेवढी वाढ होऊ दिली तर मात्र, ती सगळा जलाशय, सगळी विहीर व्यापून टाकते. पाणीच दिसू देत नाही. मग पाण्याचे प्रदूषण वाढते. कारण वारा वाहतो, वाहत्या वार्‍याने तिच्या मुळावर, पानांवर रजधूळ बसते. तिथे आणखी बेंचळ उठतात. त्यामुळे थोडय़ाच दिवसात सगळी विहीर जळमांडवीने भरून जाते. तिथे उदक आहे. असा काहीच भाव त्या ठायी राहत नाही. मग ती जळमांडवी काढून टाकायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही.

स्त्री असो अथवा पुरुष. मनावर वारंवार उगवणार्‍या अशा भाववेली काही क्षणापुरता आनंद देत असल्या, आल्हाददायक वाटत असल्या तरी अतिरेक झाला तर वाईटच. त्यातल्या त्यात ती वेल व्यसनाची असेल, वासनेची असले तर वाईटच वाईट. लोपाबाई आणि सखाराम पानझाडेच्या मनावर असाच आकर्षण. सखाराम लोपाबाईच्या कुणबिकीत कामासाठी होता. तिचं लग्न झालेलं, पण बापाच्या आजारात माहेरी आली आणि सखाराम पानझाडेच्या प्रेमात पडली. आपल्या तिकडच्या नवर्‍यापेक्षा तिला तोच खूप आवडू लागला. सासरी राहून जाच सोसणं, काम करणं, बंधनात राहणं यापेक्षा माहेरी राहून सखारामशी रत होणं यात ती रममाण झाली.

सासरहून नवरा न्यायला आला, पण गेली नाही. मग नवर्‍याने सोबत माणसं आणून तिला ओढून न्यायचं ठरवलं. चहापत्ती आणायला किराणा दुकानावर गेली तेव्हा तिला धरून नवरा ओढू लागला. सोबतच्या ऑटोत टाकण्यासाठी धडपडू लागला. तर तिने नेसत्या लुगडय़ाचा पदर त्याच्या हाती तो तसाच राहू देऊन स्वत:भोवती गोल फिरून लुगडं त्याच्या हाती सोडून दिलं आणि नागडीच रस्त्यातून पळत निघाली. पळताना सगळ्या लोकांनी पाहिली. समाजात, गावात बापाची, भावाची पच्ची झाली.

नवराही हबकला. अशा आब गमावू बायकोसोबत संसार केल्यापेक्षा दुसरी बायको केलेली बरी. म्हणताना परत गेला. थोडय़ाच दिवसात त्याने दुसरं लग्न केलं. लोपाबाईला ते बरं झालं. सखाराम पानझाडे सोबतचं तिचं प्रणयपर्व सुरूच होतं. एक दिवस आजारी बापाने दोघांना रंगेहाथ पकडलं. पोरीला मारझोड केली. सखारामला कामावरून हाकलून दिलं. मग त्यांच्या भेटीसाठी चोरून दुसर्‍याच्या शेतात, गावशिवारातल्या लपणीच्या जागा हेरून व्हायला लागल्या. चर्चा सगळीकडे पांगाळत गेली. तिच्या ह्या बदनामीमुळे भावाचं लग्न जुळणं कठीण झालं. सोयरिकी परत जायला लागल्या. मग भाऊ आपली रोजची कामधामं सोडून त्यांच्याच पाळतीवर राहू लागला. वढय़ाखडय़ात शोध घेऊन दिसतील तिथं त्यांना मारझोड करू लागला. हा घरचाच नवीनच अडथळा तयार झाला. भावाच्या जाचातून सुटण्यासाठी तिने नवाच आराखडा तयार केला.

एक दिवस सकाळीच लोकांना लोपाबाईच्या घरामुळे तिच्या रडण्याचा गहबला ऐकायला आला. सगळं गाव दारात जमा झालं.

''भावानं रात्री जीव देला, महा जिवाभाचा भाऊ मले सोडून गेला,'' लोपाबाई आक्रोश करत रडत होती. कपाळावर झोडून झोडून घेत होती.'' महा जिवाभावाचा भाऊ मले सोडून गेला व माय, आता मी कोणाच्या भरोशावर जगू व माय? आता माह्या लखवा होयेल बापाले कोण पोसंल? बापाची पंधरा एकराची कुणबिक कोण पोसील?''

लोपाबाई आभाळाकडे पाहून रडत होती. आभाळतल्या देवाला प्रश्न विचारीत होती, पण तिच्या दारात चित्र मोठं विचित्र निर्माण झालं होतं. ती रडत होती, पण लोक तिच्या रडण्याला हसत होते. ती आभाळातल्या देवाला प्रश्न विचारीत होती, पण भोवती जमा झालेले टगेच तिच्या प्रश्नाला एकमेकांना ढोसलून उत्तर देत होते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं, 'सखाराम पानझाडे... सखाराम पानझाडे..'

अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी, भावाच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी पंचनामा करायला पोलीस आले. गावात कुणकुण होतीच. दोनच दणक्यात सखाराम पानझाडे आणि लोपाबाई कबुलले.

'आमच्या भेटीगाठीत आडथळा आणत होता म्हणून म्याच रात्री भावाच्या मटणाच्या भाजीत थिमिट खाऊ घातलं..'

यांच्या मनाला वेटाळून टाकलेल्या वासनवेलींनी असा अवसानघातकी विळखा घातला होता. तो ओरबडून बाजूला करण्याऐवजी सखाराम आणि लोपा दोघेही त्या वासनवेलीच्या विळख्यात झाकोळून गेले होते. आधी सगळं खूपच गोंडस, मधाळ वाटायचं. मनाला गुदगुल्या व्हायच्या आणि त्या होतचं असतात. कारण अनैतिक संबंधातलं, विवाहबाह्य संबंधातलं थ्रील मोठ मोहतुंकी असतं. सुखद अनुभूती देत असतं. कारण वास्तवातल्या घरसंसारी भनभनत्या विश्वापेक्षा अंतरंगी साकार होत असलेलं, ते भावविश्व खूपच आनंददायी वाटत असतं.

परस्परांवर केल्या जाणार्‍या प्रेमात आनंद असतोच. कारण प्रेमासारखं चैतन्यशाली दुसरं काही नसतं. कारण प्रेमात मोठी शक्ती असते. म्हणून तर राधाकृष्णाची प्रेमकथा गाण्यांचा विषय होऊन प्रेमसंबंधातील नवेनवे कलांकृत निर्माण करीत असतो; पण या प्रेमशक्तीला मर्यादा असतात. योग्य प्रकारे तिचा वापर केला गेला नाही तर मग अशी लव्ह स्टोरीची 'क्राईम स्टोरी' होते. विहिरीतील पाणी स्वच्छ राहावं म्हणून जळमांडवीची कलम टाकली जाते; पण तिची निगा राखली नाही तर नवीन जुंबाड वाढीला लागतात. अख्ख्या विहिरीतलं पाणी प्रदूषित होतं.

आपल्या जीवनाचा नितळ जलप्रवाहसुद्धा दूषित करण्यासाठी वेळोवेळी अशा विघातक गोष्टीचे आक्रमण सुरूच असते. मात्र, पिकातल्या तणकटाला वेळीच त्याची जागा दाखविली नाही तर मात्र, पीक दबते खाली आणि तणच येते वर. म्हणूनच म्हटलं जातं,

''चालताना गडय़ा असं जपून चालावं, निसरडी वाट तिथं, चालणं टाळावं.''

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी

गेल्या शनिवारी 'खेळ मनाचा' प्रसिद्ध झाला. मोबाईल खणखणू लागला. या जादूटोणाविरोधी बिलात तर विरोध करण्यासारखं काही नाही. तरी याला विरोध का? असे प्रश्न मला विचारले जाऊ लागले. पुण्याच्या एका कीर्तनकारांनी (ते तोपर्यंत बिलाला सक्रिय विरोध करत होते. फोनवर माझ्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यांच्याजवळ बिलाची प्रत होतीच. त्यातील प्रत्येक मुद्याबाबत बारीकसारीक शंका काढून पूर्ण शंकानिरसन करून घेतलं. नंतर ते मला म्हणाले, ''मानव, तुम्ही छान समजावून सांगितलं. या बिलात विरोध करण्यासारखं काहीही नाही. उलट ते समाजहिताचं आहे. तुम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांचं शंकानिरसन केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांचा विरोध मावळेल.''

त्यांचा विरोध प्रामाणिक होता म्हणून त्यांचं समाधान झालं. मला खात्री आहे की, थोडीशीही समाजाविषयी कणव असणारा प्रत्येक प्रामाणिक माणूस या बिलाचं समर्थनच करेल. मग विरोध का? सनातन संस्थेच्या गोबेल्स, गणित, खोटय़ा प्रचाराविषयी मी मागच्या लेखात लिहिलं आहेच. त्यांच्या आक्रमक खोटय़ा प्रचाराला अनेक सरळ धर्मप्रेमी माणसं बळी पडतात आणि काही आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी वेड पांघरूण पेडगावला जातात.

आळंदीच्या एका मोठय़ा कीर्तनकारांचे खूप फोन यायचे. मला ते खूप शिव्या घालायचे. आवाजावरनं ते वयस्क कीर्तनकार आहेत हे माझ्या लक्षात आल्यामुळं एरवी कुणाचीही धमकी मुळीच ऐकून न घेणारा मी शांतपणे त्यांचं बांलणं ऐकत असे. शांतपणे त्यांचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत असे. ''तू हिंदूची औलाद नाही. मुसलमानाची औलाद आहे.'' अशी सुरुवात करणारे ते कीर्तनकार नंतर बरेच शांत होत असत. आळंदीला जाऊन मी त्यांच्यासोबतच चर्चा केली. बिलात काय आहे ते समजावून सांगितले. त्याची प्रत त्यांना दिली. त्यांचा एकच आग्रह मुसलमान.. मुसलमान.. मुसलमान. ते जे बोलत होते ते मी लिहिणं शक्य नाही. कुठलाही 'माणूस' त्याचा उच्चारही करू शकत नाही. म्हणून त्यांचे नाव जाहीर लिहीत नाही. शेवटी मी त्यांना म्हणलो, ''मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो. तीन पिढय़ांपासून माझं घर वारकर्‍यांचं घर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतपरंपरेचं धर्मातील अंधश्रद्घा दूर करण्याचं मोलाचं काम करण्यासाठीच मी अ. भा. अंनिसची स्थापना केली. गेली 30 वर्षे ते काम करतो आहे. फक्त कीर्तन माध्यमाचा वापर न करता भाषण माध्यमाचा वापर करतो आहे. मी तुम्हांला, वारकर्‍यांना बापासारखा समजतो. आपला समजतो. म्हणून माझ्यावतीनं मी खूप तळमळीनं तुम्हांला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जोवर या देशात मुसलमान आहेत तोवर एकही समस्या सुटू शकत नाही. तोवर कोणताही बदल, सुधारणा करता कामा नये असंच तुमचं मत असेल तर आधी या देशातील 22 कोटी मुसलमान मारून टाका. मगच आपण धर्मसुधारणा - अंधश्रद्घा निर्मूलन या विषयासंबंधी बोलू..''

माणसाला सहिष्णुता शिकवणार्‍या वारकरी संप्रदायाचा एखादा समुदाय एवढय़ा विषारी विचारांचा असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. पण हे सनातनी विचारांचं विष पेरण्याचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि त्यांच्या हाती 'ब्रेन वॉशिंग'सारखं प्रभावी, आधुनिक हत्यार आलं आहे. यासंबंधी नंतर विस्तारानं लिहीनच. पण या बिलासंबंधी मुद्दाम गैरसमज पसरविण्याचं राजकीय कौशल्य कुणाचं? मला पहिल्यांदाच जाहीररीत्या सांगून टाकलं पाहिजे, की भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा 'युवा स्तंभ' चालवत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करून टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी भाजपतर्फे अशोक मोडक या आमदारांना प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात मा.गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंगजी फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल, असं एक मतानं सांगितलं.

मा. अशोक मोडक अतिशय आग्रही. पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळं आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळींना महत्त्वाचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळं या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात, ''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द, त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्याची जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2005 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितली. सुरुवातीस आ. लोढा माझ्याशी बोलण्यास तयारच होईना. सनातन्यांनी त्यांना एवढं भडकवलं होतं, की ते मला बहुधा राक्षस (मानव नाहीच) समजत असावेत. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले, ''मानव, हे तर फारच चांगलं बिल झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्ही धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठीच या बिलात काही तरी टाका. चांगल्या धार्मिक रूढी-परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी..'' मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. 'या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या कोणत्याही चांगल्या रूढी-परंपरेचा समावेश नाही' अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्यांचं 13 वं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळे आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळं आम्ही गप्प बसलो.

2005 साली 26 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत, बहुमतानं हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं. त्यावर काही भाषणं झाली. त्यात आ. देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आणीबाणी काळातील व

माझ्या नागपूर वास्तव्यातील आमचे एक जिंदादिल स्नेही गंगाधर फडणवीस यांचा तडफदार

मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीस हा आम्हा सगळ्यांचा कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय. पुढच्या

मुंबई अधिवेशनात त्यांनी या 13व्या कलमाकडे माझं लक्ष वेधून घेतलं. ते वकीलही आहेत. मी ते 13 वं कलम खूप गांभीर्यानं घेतलं.

काय आहे 'ते' कलम?

13. शंका दूर करण्यासाठी याद्वारे उसे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमात एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल (कारण या 12व्या कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही असं व्याख्येत 2 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणार नाही.

चांगल्या रूढी-परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे 13 वं कलम समाविष्ट केलं आहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्याकडे गेलो. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे 13वं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. ''भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवतात. मग क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात ते योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.'' एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत, तर अनेक तास माझ्यासोबत बसून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली.

पण पुढे म्हणाले, ''पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या रूढी-परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्‍या धार्मिक, विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो.'' सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.चंद्रकांत हांडोरेही रिलॅक्स झाले. पण मग ''उद्या आम्ही, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल, शारीरिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करत असलो तर म्हणालं तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल.'' असं कोण म्हणालं? का म्हणालं? वृत्तपत्रात मोठमोठे मथळे बातम्या छापून आल्यानं. असं बिलात कुठेही नसतानाही सनातन्यांच्या खांद्याला खांदा लावून या बिलाच्या विरुद्ध असा गोबेल्सप्रणीत खोटा प्रचार करण्याची सुपारी कुणी घेतली आहे? का घेतली असावी? पाहू पुढच्या शनिवारी.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी : 9371014832

Thursday 19 July 2012

शेतकरीविरोधी कायद्यांचा गळफास

    A A << Back to Headlines     
शेतकर्‍यांच्या दुर्दशेबद्दल बोलले जात होते. उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे शेतकर्‍यांची दुर्दशा झाली आहे, असे ठाम प्रतिपादन ते करीत होते. त्याने तोडलेले तारे पाहून मला एक विनोद आठवला. एका दवाखान्यात एक रोगी पांघरूण घेऊन झोपला होता. डॉक्टर त्याच्या खाटेजवळ गेले. हाक मारली. तो गाढ झोपला होता. उठला नाही. डॉक्टरांनी पुन्हा हाक मारली. काहीच हालचाल नाही. डॉक्टरांनी सिस्टरला बोलाविले.''ही इज डेड. विल्हेवाट लावा.'' असे म्हणून ते पुढे निघून गेले. रोगी खडबडून जागा झाला.''अहो, मी मेलो नाही..'' ओरडू लागला. सिस्टर म्हणाल्या,''गप्प बैस.. तुला जास्त समजते का डॉक्टरांना?'' या शहाण्या डॉक्टरांसमोर शेतकर्‍यांची परिस्थिती त्या रोग्यासारखी झाली आहे. 'तो पाऊस माझ्या गावी आलाच नाही ज्याबद्दल तुम्ही एवढे भरभरून बोलत आहात' हे त्यांना कोणीतरी ओरडून सांगायला हवे.

शेतीच्या क्षेत्रातील अनेक कायदे कालबाह्य झालेले आहेत. अनेक कायदे अडचणी निर्माण करीत आहेत. कोणीतरी त्याची तपशीलवार यादी करायला हवी. मात्र जे तीन कायदे आज शेतकर्‍यांच्या गळ्याचा फास बनले आहेत त्यांचा आपण विचार करू.

जमीन अधिग्रहणाचा कायदा

मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकार होता. म्हणून सरकारला शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण करता येत नव्हत्या. नेहरूंच्या काळात जे अधिग्रहण करण्यात आले ते न्यायालयांनी बेकायदेशीर ठरविले. यावर नेहरू आणि त्यावेळच्या कायदेमंर्त्यांनी एक शक्कल काढली. घटनेत नवे परिशिष्ट जोडले व घटनेत अशी दुरुस्ती करून घेतली की या परिशिष्टात जे कायदे येतील त्याविरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. मूळ घटनेत नसलेले हे परिशिष्ट मुळात शेतकर्‍यांचा जीव घेण्यासाठी अस्तित्वात आले. जमीन अधिग्रहणाचा कायदा या परिशिष्टात घालण्यात आला. शेतकर्‍यांचे हातपाय बांधून त्याची जमीन काढून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. हा कायदा आजही तसाच आहे व तो घटनेच्या नवव्या परिशिष्टात आहे. गंमत अशी की, त्या काळात जमीन अधिग्रहणाचा कायदा व्हावा यासाठी कोणाचा विरोध झाला नाही. डाव्या पक्षांनी तर त्यासाठी आग्रह धरला होता. आज तेच डावे 'सेझ'साठी होणार्‍या अधिग्रहणाचा विरोध करीत आहेत. कुर्‍हाडीला दांडा आपणच द्यायचा आणि जेव्हा ती झाड तोडायला लागली तेव्हा आपणच थयथयाट करायचा असा हा प्रकार आहे. जमीन अधिग्रहणाचा जुनाच कायदा आजही तसाच आहे. या सरकारने नवा कायदा तयार केला आहे; परंतु जनलोकपालच्या गदारोळात तो मागे पडला. आता केव्हा येईल कोणास ठाऊक? शेतकर्‍यांची जमीन काढून घेण्याचा अमर्यादित अधिकार सरकारकडे असेल तर तेथे खुली व्यवस्था आहे असे कसे म्हणता येईल?

सिलिंगचा कायदा

स्वातंर्त्याची पहाट होत असताना तेलंगणात जमीनदारीविरुद्ध सशस्त्र लढा उभा राहिला. जमिनीचे फेरवाटप करा, अशी त्यांची मागणी होती. विनोबा भावे गांधीजींचे शिष्य. त्यांनी अहिंसक पद्धतीने जमिनीच्या फेरवाटपाला सुरुवात केली. भूदान आंदोलन सुरू झाले. तिकडे पंडित नेहरूंनी सिलिंगचा कायदा आणला. कोरडवाहू 54 एकर, बागायत 18 एकर. यापेक्षा जास्त जमीन ठेवता येणार नाही. कायदा आला. कोणी कोर्टात आव्हान देऊ नये म्हणून तो घटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्यात आला. महाराष्ट्रात वसंतराव नाईक व शंकरराव चव्हाण यांच्या काळात या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली. अनेकांची जादा जमीन काढून ती भूमिहिनांमध्ये वाटप करण्यात आली. खरेतर जमीनधारणेचा हा कायदा पक्षपाती होता. उद्योगासाठी तशी कोणतीही मर्यादा लागू केलेली नाही. मग शेतीलाच का? असा प्रश्न शेतकर्‍यांच्या तथाकथित सुपुत्रांना पडला नाही. दिल्लीची ताबेदारी करण्यात त्यांनी धन्यता मानली. परिणाम काय झाला? चौपन्न एकरवाल्या शेतकर्‍याला चार मुले झाली. त्यांच्या वाटण्या झाल्या. प्रत्येकी तेरा एकर आले. दुसर्‍या पिढीत त्यांना चार मुले झाली. त्यांच्यात वाटण्या झाल्या व ते अल्पभूधारक झाले. शेतीच्या बाहेर रोजगार निघाले नाहीत. शेतीवर भार वाढत गेला व शेतीचे लहान-लहान तुकडे पडत गेले. आज 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. बरे, ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांचे तरी कल्याण झाले का? तेही नाही. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. त्यात सिलिंगमध्ये ज्यांना जमिनी मिळाल्या त्या शेतकर्‍यांची संख्या कमी नाही. या उलट ज्यांना जमिनी नाहीत म्हणून ज्यांनी गाव सोडले, शहरात जाऊन मोलमजुरी केली त्यांची परिस्थिती सुधारली. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे हाल झाले, ज्यांना मिळाल्या त्यांचीही वाताहत झाली. असा कायदा आजही जसाचा तसा लागू असताना कोण म्हणेल की खुली व्यवस्था आली आहे?

जीवनावश्यक वस्तूंचा कायदा

एकदा दुष्काळ पडला. व्यापारी चढय़ा भावाने धान्य विकू लागले. तेव्हा काही लोक महम्मद पैगंबरांकडे गेले. म्हणाले, ''तुम्ही राजे आहात. गरिबांना स्वस्त धान्य मिळेल यासाठी त्या व्यापार्‍यांना कमी भावात माल विकायला सांगा.'' महम्मद पैगंबरांनी ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ''मी बाजारात हस्तक्षेप करणार नाही. आपण बाजारातून माल विकत घेऊ व गरिबांना ते देऊ.'' महम्मद पैगंबरांनी बाजाराबद्दल जी भूमिका घेतली ती जर आमच्या सरकारला घेता आली असती तर त्यात खरोखरच गरिबांचे भले झाले असते. आमच्या सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा कायदा केला. गरिबांना वस्तू स्वस्त मिळाव्यात म्हणून शेतीमालाच्या बाजारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला मिळाला. माकडाच्या हातात कोलीत गेल्यावर माकड काय करणार? सरकारने जीवनावश्यक वस्तूंची यादी केली. त्यात साखर आणि कांदा यांसारख्या वस्तूही समाविष्ट केल्या. परिणाम असा झाला की, जेव्हा कांदा दहा रुपये किलोने विकला जाऊ लागला तेव्हा सरकारने निर्यातबंदी लागू केली. कांदा कोसळला. दहा पैसे किलोने विकावा लागला. तेव्हा सरकारला दाद ना फिर्याद. साखरेवर लेव्ही लावण्याचा अधिकार याच कायद्याने दिला. हाही कायदा घटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्यात आला. म्हणजे याविरुद्ध कोर्टात जाता येत नाही. बाजारात हस्तक्षेप करण्याचे अमर्याद अधिकार सरकारला

देणारे कायदे अस्तित्वात असतील तर त्या देशात खुलीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण आले असे कसे म्हणता येईल?

(लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत)

भ्रमणध्वनी - 9422931986

जिंदगी, एक सफर, था सुहाना..



परवाच माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या एका स्नेह्याशी बोलताना मी म्हणालो की, तुम्ही सिनेमाचा सुवर्णकाळ अनुभवलाय. 60 आणि 70 चा सुंदर गाण्यांचा, 25-50 आठवडे चालणार्‍या सिनेमांचा काळ तुम्ही अनुभवला. थिएटरमधली चेंगराचेंगरी, मारामारी, तिकिटांचा काळाबाजार, नटांसाठी वेडे झालेले प्रेक्षक हे सारं तुम्ही अनुभवलं, सिनेमाची खरी मजा तुम्ही घेतली.

आणि आज राजेश खन्ना गेल्याची बातमी ऐकली. बायको म्हणाली, अहो राजेश खन्नाबद्दल रेडिओवर काहीतरी चुकीचं ऐकलं, टीव्ही लावा बरं. मुळात तिने बरोबरच ऐकलं होतं पण ते बरोबर आहे हे मानायची तिची तयारी नव्हती. ज्याचे गाणे गुणगुणल्याबरोबरच, ज्यांच्या खांद्यावर शाल घेण्याच्या स्टाईलची आम्ही टिंगल केली तो अनंताच्या सफरला निघून गेला होता. त्याचा सुपरस्टारवाला काळ मी अनुभवला नव्हता, पण त्याच्यासाठी वेडय़ा झालेल्या प्रेक्षकांचे किस्से मात्र भरपूर वाचले-ऐकले होते.

यश तुझ्या डोक्यात गेलं होतं हे तू मान्य करतोस की नाही या एका पत्रकाराच्या प्रश्नावर तो म्हणाला होता 'मुली मला रक्ताने पत्र लिहायच्या, जिथे मी जाईन तिथे तरुण-तरुणी माझ्या पायावर लोळण घ्यायच्या. माझ्या ओझरतं व्हावं म्हणून काहीही करायचे, इतकं झाल्यावरही मी जमिनीवर राहिलो असतो तरच नवल! हे खोटंही नव्हतं. एका कॉलेजच्या गॅदरिंगच्या उद्घाटनाला राजेश खन्ना गेला असता तो कारमधून उतरताच कारपासून ते स्टेजपर्यंत तरुण-तरुणी झोपले आणि त्याला म्हणाले, तू राजेश खन्ना आहेस, तू जमिनीवर पाय ठेवायचा नाही. तू आमच्या अंगावरून चालत जा. हा किस्सा मी वाचला होता.

त्याने कधीच दाढी-मिशा लावून म्हातार्‍याचा रोल केल्याचं आठवत नाही व झुपकेदार मिशी लावून डाकू बनून तो घोडय़ावर बसल्याचंही आठवत नाही. आपला रोमॅंटिक लूक त्याने कायम जपला. त्याने घातलेल्या गुरुशर्टची फॅशन अगदी दहा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत होती. आज तुम्ही गुरुशर्ट घातला तर लोकं तुम्हाला म्हणतात, 'दादा, शार्ट कुर्ती पहने क्या? दस्तुरखुद्द अमिताभ म्हणाला होता, 'माझ्या संघर्षाच्या काळात राजेश खन्नाच्या सिनेमांना असणार्‍या लांबच लांब रांगा पाहून मी आश्चर्यचकित व्हायचो. प्रेक्षकांचं इतकं वेड पाहून मी विस्मित होत असे. कालांतराने त्याच अमिताभने त्याचा सुपरस्टारपदाचा किताब हिरावून घेतला ही बाब अलाहीदा. अमिताभ बच्चन हिरो असणार्‍या 'बॉम्बे टू गोवा' सिनेमात ड्रायव्हर व कंडक्टरचं नाव अनुक्रमे राजेश व खन्ना असं होतं. त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च काळात त्याने राजेश खन्ना मॅनिया निर्माण केला होता. मॅनिया या शब्दाचा नेमका अर्थ विशद करणारा तो काळ होता. आपल्या सिनेमात त्याने काम करावे म्हणून नोटांची बंडलं घेऊन निर्मात्यांच्या गाडय़ांच्या रांगा त्याच्या घरासमोर उभ्या असायच्या.

आपल्या संघर्षाच्या काळात अक्षयकुमारने ज्या बंगल्यासमोर उभे राहून फोटो काढले होते तो बंगला राजेश खन्नाचा होता. कालांतराने अक्षयकुमारने तोच बंगला विकत घेतला आणि राजेश खन्नाच्याच मुलीशी लग्न केले, हाही एक योगायोग.

राजेश खन्ना आणि किशोरकुमार 'आराधना' या चित्रपटापासून फार्मात आले. राजेश खन्नाला किशोरकुमारचा आवाज असा काही मॅच झाला की पडद्यावर राजेश खन्नाच गातोय असा भास होत असे. किशोरकुमारला निर्मार्त्यांनी एकदा सांगितले की, एका नवीन नटासाठी तुम्हाला पाश्र्वगायन करायचंय. त्यावर किशोरकुमारने त्या नटाला माझ्या घरी पाठवा, मला त्याची मुलाखत घ्यायचीय असे सांगितले. ठरल्यावेळी तो नट किशोरकुमारकडे हजर झाला. किशोरकुमारने त्याला अनेक वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडले आणि शेवटी आता तुम्ही निघा करून परत पाठविले. त्या नटाने निर्मात्याकडे जाऊन किशोरकुमारबद्दल बरीच आगपाखड केली, पण जेव्हा त्या नटावर चित्रीत झालेलं गाणं त्यानं पाहिलं तेव्हा मात्र तो वेडावला आणि म्हणाला 'ये आवाज तो मेरी लगती है' तेव्हा किशोरकुमार त्याला म्हणाला, मला तुझी मुलाखत घ्यायची नव्हती तर तुझ्या बोलण्याची लकब, तुझ्या अदा बघायच्या होत्या. ज्यांचा अभ्यास करून मी तुझ्यासाठी गाणे म्हटले, तो नट राजेश खन्ना होता. पुढे किशोरकुमार गेल्यानंतर त्यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात बोलताना राजेश खन्ना म्हणाला - 'आज मैने अपनी आवाज खो दी है' 69 ते 72 या चार वर्षांत सतत 15 सुपरहिट देणारा तो एकमेव सुपरस्टार आहे. हा एक रेकॉर्ड आहे. सिनेसृष्टीच्या रोमॅंटिक युगाचा तो शेवटचा शिलेदार होता. दुश्मन सिनेमात स्वत:सोबतच्या लहानग्याला मुमताजच्या बायोस्कोपवर फुकटात सिनेमा दाखविणार्‍या राजेश खन्नाला मुमताज म्हणते, ओ बाबू अपना नाम तो बताते जा त्यावर राजेश खन्ना उद्गारतो सुना नही बच्चेने क्या कहा 'दुश्मन चाचा! चाचा बच्चेका तेरा नही! हे तो त्याच्या जगप्रसिद्ध डोळे मिचकावून, मान तिरपी करत म्हणण्याच्या स्टाईलने म्हणतो. ते इतकं मस्त वाटतं की रंगा खुश हो जाता. असे अनेक क्षण आता तुमच्या-माझ्या भोवती रुंजा घालतील. 'आनंद'मध्ये ज्या दारासिंगला तो गुरू म्हणतो तो त्याच्या तीन-चार दिवस आधीच निघून गेला. आपलं भावविश्व व्यापून टाकणारे, आनंदाचे चार क्षण आपल्या ओंजळीत टाकणारे एक-एक करून आपल्यातून निघून जात आहेत. आणि आपण 'कारवा गुजर गया गुबार देखते रहे' असे म्हणत हतबल उभे आहोत असं मला अनेकदा वाटतं. शेवटी 'आनंद'मधलाच संवाद मदतीला येतो 'जिंदगी और मौत उपरवालेके हाथमें है जहापनाह! हम सब तो रंगमंच की कठपुतलीया है जिसकी डोर उपरवालेके हाथ में बंधी है कब, कौन, कैसे उठेगा कोई नही जानता. हाù हाù हाùù

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650
     

इस्रायली शेतीचे खूळ व खुळखुळा



इस्रायली शेतीचे 'खूळ' तसे नवीन नाही. काँग्रेस संस्कृतीने हे खूळ जाणीवपूर्वक जोपासत त्याचा खुळखुळा म्हणून वापर केला. रडणार्‍या मुलाची वेदना समजून न घेता त्याचे लक्ष अन्यत्र वेधून घेण्यासाठी त्याला आपण काऊ आला, चिऊ आली म्हणत समजावतो. तरीही मुलगा रडण्याचं थांबवीत नसेल तर वेळप्रसंगी 'बागुलबुवा'ही दाखवितो. वेगवेगळे खुळखुळेही त्याच्यासमोर वाजवतो व त्याचं दुखणं जरी थांबविता येत नसले तरी त्याचं रडणं तात्पुरतं का होईना थांबविण्यात आपण यशस्वी होतो. स्वातंर्त्यानंतरच्या 64 वर्षांत शेतकर्‍यांच्या 'दुखण्या'बाबत आपण यापेक्षा काही वेगळे केले नाही. त्यामुळे त्याचे दुखणेही थांबले नाही., रडणेही थांबले नाही. आतातर त्याने रडणे बंद करून सरळ सरळ 'मरणे' सुरू केले आहे. तरीही आमचे खुळखुळे वाजविणे सुरूच आहे. फरक फक्त एवढाच आहे की यावेळेस हा इस्रायली शेतीचा खुळखुळा काँग्रेसऐवजी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वाजविला म्हणून त्याची विशेष दखल घेणे भाग पडले.

गेल्या महिन्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन गडकरींच्या नेतृत्वात पन्नास जणांचे शिष्टमंडळ इस्रायलला जाऊन आले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपल्याकडे 'मावंद' करण्याची प्रथा आहे. त्यामुळे इस्रायल शेतीची तीर्थयात्रा करून आलेल्या गडकरींनी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात गेल्या आठवडय़ात धूमधडाक्यात मावंद केले. भाषणाचे भोजन दिले आणि शेतकर्‍यांना उपदेशाचा तीर्थप्रसादही दिला. या कार्यक्रमात व्यासपीठावरच पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकरही होते. खरेतर युती सरकारच्या काळात ज्या वेळेस मा. मनोहरराव जोशी मुख्यमंत्री होते. त्यांच्याच मंत्रिमंडळात खुद्द मा. नितीन गडकरी मंत्री होते. त्या वेळेस इस्रायलला जाण्यापेक्षा इस्रायली शेतीची गंगा विदर्भातील अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठात आणण्याचा 'भगीरथ' प्रयत्न झाला होता. याचे कदाचित गडकरींना स्मरण नसावे. ती गंगा येथे अवतरण्यापूर्वीच ती प्रत्यक्ष अवतरल्याच्या बोंबाही ठोकल्या गेल्या होत्या. त्या गंगा दर्शनासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मोठय़ा संख्येने आणून 'कुंभमेळा'ही कृषी विद्यापीठाच्या 'अंगणी' भरला होता. इस्रायल शेतीची गंगा 'आली रे अंगणी' म्हणता म्हणता ती गंगा कधी व कशी आटली? कोठे लुप्त झाली कळलेच नाही. या विषयावर ना कधी सरकार बोलले ना विद्यापीठ. नापंजाबराव कृषी विद्यापीठाचे आजी, माजी कुलगुरू बोलले. इस्रायल शेतीचा प्रयोग यशस्वी झाला की अयशस्वी, कोणी या विषयावर चकार शब्दाने बोलले नाही. 'मावंदा'च्या कार्यक्रमात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर हे किमान या प्रसंगी 'मौन' सोडतील असे वाटले होते. पण त्यांनीही कृषी विद्यापीठातील इस्रायल शेतीप्रयोग करोडो रुपयांचा चुराडा केल्यानंतरसुद्धा अल्पावधीतच का गुंडाळला यावर तोंड उघडले नाही.

आपल्या देशातील शेतकर्‍यांचे दु:ख समजून घेण्यापेक्षा त्याला दूषणं देण्यात व हिणविण्यातच आपला सगळा पुरुषार्थ खर्ची पडला आहे. तो अडाणीच आहे., आळशी आहे, मूर्ख आहे, त्याला अक्कलच नाही, तो दारूच पितो, मुलामुलींच्या लग्नात खर्चच अधिक करतो, अशी नावे ठेवण्यातच 'विचारवंतांनी' आपली अक्कल पाजळली आहे. त्यामागची मानसिकता खरेतर वेगळी आहे. 1 जुलै 1879 च्या पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामध्ये ती प्रतिबिंबित होते. ते म्हणतात, 'पुणे येथील सार्वजनिक सभेला शेतकरी-कष्टकरी यांच्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच नव्हे, तर नैसर्गिक आहे असे वाटते!'

पुढे जाऊन ते म्हणतात, 'सांस्कृतिकदृष्टय़ा श्रेष्ठ असलेल्या अल्पसंख्याकांचीच सत्ता समाजावर चालत असते, किंबहुना ती चालत राहणे स्वाभाविकच आहे.' शेती न करणारा श्रेष्ठ व शेती करणारा शेतकरी कनिष्ठ हे एक वेळा निश्चित झाल्यावर 'श्रेष्ठांनी' शेतकर्‍यांना कायम हिणवावे यात नवल नाही. चातुर्वर्णाच्या उतरंडीमध्ये शेतकरी 'क्षुद्र' ठरत असेल तर शेतकर्‍याने त्याच्या पायरीनेच राहिले पाहिजे. फक्त आता तसे उघडपणे म्हणता येत नाही. इस्रायल शेतीचा गवगवा उगाच होत नाही. उघडपणे जोरात म्हणता येते, 'इस्रायलचा शेतकरी पाहा वाळवंटातसुद्धा नंदनवन फुलवितो. दोन-अडीच इंचसुद्धा येथे पाऊस पडत नाही तरीही विपरीत परिस्थितीत तो हे करतो.' हे म्हणत असताना अप्रत्यक्षपणे येथील शेतकर्‍यांना हिणविण्यासाठी 'स्वगत' म्हटले जाते.

'पण गध्या तू. सुपीक जमीन आहे, हवामान अनुकूल आहे. पावसाचे पाणीही मुबलक आहे. तरीही तू आपला रडतोच.'

हेच 'स्वगत' पुढे निष्कर्षावर येते. 'तूच नालायक, आळशी, अडाणी, व्यसनी, तुझ्यातच दोष. त्याला आम्ही काय करणार?' आज तारीख आठवत नाही; पण चार-पाच वर्षांपूर्वीच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या 'अँग्रोवन' या दैनिकात ठसठसीत मथळाच होता, 'आळशी शेतकरीच आत्महत्या करतात,' असं म्हणायला कोणाला लाज, शरम वाटत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून मी एक प्रश्न सातत्याने विचारतो आहे. त्याचे उत्तर अजूनपावेतो कोणी देत नाही. आज पुन्हा तोच प्रश्न विचारतो, 'इस्रायलच्या शेतकर्‍यांना त्यांच्या सरकारकडून कोणती व कशी मदत मिळते? त्यांना मिळणारे उघड अनुदान किती? व छुपी अनुदान कशी, किती व कोणत्या स्वरूपात दिल्या जातात? याचे उत्तर आधी द्या व नंतरच भारतीय शेतकर्‍यांना नाव ठेवा. परंतु दुर्दैवाने प्रश्नाचे उत्तर कोणी देत नाही. तरीही भारतीय शेतकर्‍यांच्या नावाने बोटे मोडणे थांबत नाही. पाश्चात्त्य शेतकर्‍यांचे कोडकौतुक करण्याआधी त्यांना अनुदानाच्या स्वरूपात दिल्या जाणार्‍या मदतीचे आकडे जरा भारतीय शेतकर्‍यांसमोर ठेवा. तेही होत नाही. कारण तसे केले तर भारतीय शेतकर्‍यांना आळशी म्हणणार्‍यांची पोल खुलते ना.

प्रत्येक शेतकर्‍याला दरवर्षी लाखो रुपये अनुदान देणार्‍या राष्ट्रांच्या शेतकर्‍यांची टीचभरही मदत न मिळणार्‍या भारतीय शेतकर्‍यांशी तुलना कशी करता? लाज वाटायला पाहिजे, पण ती वाटत नाही. हे पुनश्च इस्रायल शेतीच्या निमित्ताने स्पष्ट झाले.

विकसित देशात 2 ते 3 टक्के दराने व चीनमध्ये शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा शेतकर्‍यांना केला जातो. हे आम्ही सांगणार नाही,पण भारतीय शेतकर्‍यांना दूषणं मात्र देत राहणार.

भारतात एकूण शेती उत्पादनाच्या फक्त .32 टक्के खर्च शेती संशोधनावर सरकार करणार. हाच खर्च विकसनशील देशात आपल्यापेक्षा चार ते पाचपटीने केला जातो. तर विकसित देशात 7 टक्क्यांपर्यंत हा खर्च केला जातो हे कधी सांगणार नाही,बोलणार नाही. सरकारवर ठपका न ठेवता दोषांचं सारं खापर फोडणार शेतकर्‍यांच्याच डोक्यावर. शेतकरी आज पूर्णत: कोलमडून पडला आहे. त्याला सावरण्याऐवजी त्याच्याच मोडक्या कुपावर लाथ मारणे अजूनही सुरू आहे. पण का?

कामाचे तास वाढले, पण पगार कमी झाला असे कधी होत नाही. कारखान्याचे उत्पादन वाढत आहे आणि कारखानदाराचे 'उत्पन्न' कमी होत आहे असेही होत नाही. व्यापार्‍यांचा व्यापार वाढतो आहे, पण त्याचे उत्पन्न मात्र कमी कमी होत आहे असे कधी होणेच शक्य नाही. पण शेतीमध्ये मात्र एका बाजूला 'उत्पादन' वाढतेच आहे, पण ही उत्पादन वाढ करणार्‍या उत्पादक शेतकर्‍यांचे 'उत्पन्न' मात्र कमी कमी होत आहे. हा 'चमत्कार' फक्त शेतकर्‍यांच्याच बाबतीत कसा काय होत आहे? हेही इस्रायली शेतीचा खुळखुळा वाजविणार्‍यांनी जरा समजून सांगितले पाहिजे. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे माजी सदस्य डॉ. रमाकांत पितळे यांचे 'रिच अँग्रीकल्चर अँन्ड पुअर फार्म्स' या पुस्तकात दिलेल्या आकडेवारीनुसार 1990-91 मध्ये शेतकर्‍यांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 3802 रु. म्हणजेच महिना 318 रुपये होते. तेच उत्पन्न 2002-2003 मध्ये 3732 रुपयांपर्यंत म्हणजेच महिना 311 रु.पर्यंत खाली आला. हरितक्रांतीनंतर काही वर्षे शेतीचे उत्पादन वाढले तसेच शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढले, पण नंतर 'उत्पादन' वाढत गेले पण शेतकर्‍यांचे 'उत्पन्न' मात्र कमी कमी होत गेले. शेतकर्‍यांनी उत्पादनवाढ केल्यानंतर त्याला शाब्बासकी किंवा बक्षीस मिळायला हवे होते; परंतु शेतकर्‍यांना उत्पादन वाढविल्याची 'शिक्षा' मिळाली. त्याचे 'उत्पन्न' कमी झाले. हेच जर कामगारांच्या, कारखानदारांच्या किंवा व्यापार्‍यांच्या बाबतीत झाले असते तर?

व्यापार वाढविल्याने उत्पन्न घटले असते तर व्यापार्‍याने व्यापारच बंद केला असता. कारखान्याचे उत्पादन वाढविल्यानंतर 'उत्पन्न' कमी झाले असते तर त्याने उत्पादन कमी केले असते किंवा कारखानाच बंद केला असता. परंतु शेतीचे उत्पादन वाढत असतानाही शेतकर्‍यांचे 'उत्पन्न' का कमी होत आहे? हा चमत्कार का व कसा घडतो आहे याची उकल न करता परत त्याला 'उत्पादन' वाढवायला सांगणे म्हणजे शेतकर्‍यांनी आपल्याच हाताने आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे नाही का? इस्रायली शेतीचा खुळखुळा शेतकर्‍यांसमोर वाजवताना मा. नितीन गडकरींचा हेतू प्रामाणिकही असेल, पण परिणाम मात्र काय होणार? आधीच उत्पादनवाढीमुळे संकटात सापडलेला शेतकरी अधिकच कर्जाच्या दलदलीत फसणार व त्यातच मरणार.

कुपोषणामुळे एखाद्या स्त्रीचा चेहरा खप्पड झाला आहे, पोट खपाटी गेले आहे, शरीरावरचे मांस झडून शरीर म्हणजे केवळ हाडाचा सापळा बनले आहे. अशा स्त्रीच्या पोषणाची व्यवस्था न करता तिला जर कोणी 'ब्युटी पार्लर'मध्ये जा, असा सल्ला दिला तर कसे वाटेल?

गेल्या आठवडय़ात नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात मा. नितीन गडकरींनी जेव्हा इस्रायली शेती शेतकर्‍यांना सांगितली तेव्हा मला नेमका 'ब्युटी पार्लर'मध्ये जा, असा सल्ला देणारा माणूस आठवला.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842