Wednesday 31 October 2012

डॉ. जिल टेलरचे मनोवेधक अनुभव


डॉ.जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuro-scientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी नेमका काय संबंध असतो, याबाबतीत संशोधन करीत असताना वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्नव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या मेंदूची शल्यक्रिया करून लिंबाच्या आकाराची साकळलेल्या रक्ताची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर विलक्षण जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या परिणामी डॉ. टेलर सुमारे आठ वर्षानंतर पूर्ववत नॉर्मल होऊ शकल्या. त्या मेंदूतील बिघाडाच्या अवस्थेत त्यांना जे अनुभव आले त्यांचे वर्णन त्यांनी My Stroke of Insight (A Brain Scientist Personal Journey) या 2008 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे. त्यांचे हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जगभर गाजले व 2008 साली टाईम मासिकाने जगतातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला. डॉ. जिल टेलर यांचे ते मूळ पुस्तक मला अद्याप मिळाले नाही; परंतु चित्रा बेडेकर यांनी डॉ. टेलर यांच्या अनुभवांची कथा 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सादर केली आहे. चित्रा बेडेकर या स्वत: संरक्षण खात्यातील संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी पदावर होत्या व लोकविज्ञान चळवळीशीही त्या निगडित आहेत.

आपल्या मेंदूचे जे वरचे आवरण असते त्याचे डावा व उजवा असे दोन अर्धगोल हिस्से असून ते दोन्ही भाग एका सेतूने एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डाव्या व उजव्या अर्धगोलांत माहितीची सतत देवाणघेवाण सुरू असते व ते एकमेकांना पूरक असे कार्य करीत असतात. मात्र ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोचलेल्या माहितीवर कशा प्रकारे संस्करण करायचे, याची प्रत्येक अर्धगोलाची कार्यपद्धती अगदी परस्परभिन्न असते. मानवी मेंदूच्या या वरच्या आवरणांमध्ये ज्या चेतापेशी .(neurons) असतात त्या इतर कोणत्याही प्राण्याच्या मेंदूत आढळून येत नाहीत. मानवी मेंदूच्या या बाह्य आवरणाला neo-cortex असे नाव आहे. आपल्या मेंदूच्या आतल्या भागातील पेशी मात्र इतर सस्तन प्राण्यांसारख्याच असतात. मानवी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांच्या भिन्नभिन्न कार्यपद्धतीचे सुरेख वर्णन चित्रा बेडेकरांनी डॉ. जिल टेलर यांच्या पक्षाघाताच्या घटनेच्या संदर्भात जे केले आहे ते त्यांच्याच शब्दांत वाचणे योग्य राहील. त्या लिहितात :''माणसाच्या मेंदूचा डावा अर्धगोल 'बुद्धिवादी' असतो. बुद्धी वापरून परिस्थितीचा सतत अर्थ लावत असतो. उलट उजवा अर्धगोल अंत:प्रेरणेने, अंत:स्फूर्तीने चालतो. डाव्याला कालप्रवाहाचं भान असतं तर उजवा वर्तमान क्षणातच मग्न असतो. डावा भाषा वापरतो, शब्दांमार्फत बोलत राहतो, उजवा नि:शब्दपणे अनुभव घेत असतो. डावा मेंदू परिस्थितीचे तुकडे करून विश्लेषण करतो तर उजव्याला समग्रतेचं सर्वसमावेशक भान असतं. डाव्या मेंदूच्या प्रेरणांच्या प्रभावाखाली आपण प्रत्येक क्षणी जगाशी व्यवहार करीत राहतो, इतरांशी शब्दबंबाळ बोलत, ऐकत राहतो, काल-आज-उद्याच्या चक्रात अविरत धावत राहतो. आपण एकटे आहोत, एकाकी आहोत, असुरक्षित आहोत आणि सतत धडपड केल्याशिवाय, स्वार्थ साधल्याशिवाय टिकू शकणार नाही असं आपल्याला वाटत असतं. जिलच्या मेंदूचा डावा अर्धगोल जेव्हा निकामी झाला तेव्हा तिला उजव्या मेंदूच्या प्रभावाखाली एक वेगळा विलक्षण अनुभव आला. जणू एक साक्षात्कार झाला! मी संपूर्ण विश्वाशी एकरूप आहे असा समग्रतेचा अफाट अनुभव तिला आला. तो कालातीत होता, 'स्व'च्या पलीकडचा होता, शब्दांच्या पलीकडचा होता. एका असीम आंतरिक शांततेचा तो अनुभव होता.''

आपलं हे उजवं मन म्हणजेच उजव्या अर्धगोलाची कार्यपद्धती कोणताही सुटा, अलग क्षण अगदी स्पष्टपणे जसाच्या तसा आठवण्याची क्षमता आपल्याला देतं. आपल्या अवतीभवतीच्या गोष्टीचं एकमेकांशी कसं नातं आहे हे लक्षात ठेवण्यासाठीच आपल्या या उजव्या मनाची म्हणजेच मेंदूच्या उजव्या अर्धगोलाची योजना झालेली आहे. निरनिराळ्या वस्तूंमधल्या सीमारेषा धूसर होऊन मनाने चितारलेलं एकच विशाल, व्यामिश्र चित्र आपण आठवू शकतो. दृश्य, हालचाली, गुणधर्म यांची सरमिसळ असणारं प्रत्येक क्षणाचं ते परिपूर्ण चित्र असत.ं

आपल्या उजव्या मनाला वर्तमान क्षणाशिवाय दुसरा कोणताच काळ ठाऊक नसतो. उजव्या मनासाठी प्रत्येक क्षण विविध संवेदनांनी ओतप्रोत भरलेला असतो. आनंदाचा अनुभवसुद्धा त्या वर्तमान क्षणातच नांदत असतो. आपल्यापेक्षा विशाल असणार्‍या कशाशी तरी आपण जोडलेले आहोत याचा अनुभवसुद्धा वर्तमान क्षणातच येत असतो. आपल्या उजव्या मनासाठी आदिअंतविरहित, समृद्ध असा वर्तमान क्षण म्हणजेच सर्व काही असत.ं

कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे करण्यासाठी नेमून दिलेली नियम आणि बंधनांची जी चौकट असते ती उजव्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसते. त्या चौकटीबाहेर अंत:प्रेरणेने विचार करायला हे मन मुक्त असतं. प्रत्येक नव्या क्षणासोबत येणार्‍या शक्यतांचा हे उजवं मन सर्जनशीलपणे वेध घेतं. कोणत्याही अडथळ्याशिवाय, न्यायनिवाडय़ाशिवाय आपल्यातल्या कलात्मक प्रवाहांना मुक्तपणे हे मन वाहू देतं. उजव्या मनासाठी वर्तमान क्षण म्हणजे जणू प्रत्येक जण, प्रत्येक वस्तू एकात्मिकपणे एकमेकांशी जोडलेले असण्याची वेळ असते. मानवजातनामक एका व्यापक कुटुंबाचे आपण सर्व सदस्य असल्याप्रमाणे उजवं मन सर्वाना समान लेखतं. विश्वातल्या या सुंदर ग्रहावर माणसाचं जीवन टिकून राहण्यासाठी माणसामाणसांतल्या नात्याची या मनाला जाणीव असते. सर्व माणसांमधली सामाईकता हे मन ओळखून असतं. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कशी जोडलेली असते आणि आपण सर्व जण एकत्र येऊन कसं एक पूर्णत्व आकारलेलं असतं याचं एक विशाल रेखाटन या मनाला दिसत असतं. दुसर्‍याविषयी सहानुभाव वाटण्याची, त्याच्या भूमिकेत शिरून त्याच्या भावना जाणण्याची क्षमता आपल्या मेंदूच्या उजवीकडच्या कॉर्टेक्सच्या पुढच्या भागामुळे आपल्याला लाभलेली असते.

'यांच्या तुलनेत आपल्या मेंदूचा डावा अर्धगोल म्हणजे अगदी दुसरं टोक असतं. माहितीवर संस्करण करण्याची त्याची तर्‍हासुद्धा संपूर्णपणे वेगळी असते. उजव्या अर्धगोलाने निर्माण केलेल्या प्रत्येक समग्र, संपन्न क्षणाला कालक्रमानुसार एकत्र गुंफण्याचं काम डावा अर्धगोल करतो. हा क्षण ज्या तपशिलांनी बनलेला आहे त्याची तुलना क्रमाने आधीच्या क्षणातल्या तपशिलांशी तो करतो. सलगपणे, पद्धतशीरपणे त्या तपशिलांची जुळणी करून आपला डावा अर्धगोल वेळ किंवा काळ ही संकल्पना तयार करतो. त्यामुळेच भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ अशी त्या क्षणांची विभागणी आपण करत असतो. अशा कालदर्शक रचनेमुळे कोणती गोष्ट कशाच्या आधी घडायला हवी हे आपण ठरवू शकतो. म्हणजे आपल्या बूट आणि मोज्यांकडे तर बूट घालण्याआधी मोजे घालायला हवेत हे ठरवायला आपला डावा अर्धगोल मदत करतो. कोणत्याही कृतीचं निगामी पद्धतीने (deductive method) तो आकलन करून घेत असतो. म्हणजे 'अ' हा 'ब' पेक्षा मोठा आहे, 'ब' हा 'क' पेक्षा मोठा आहे. म्हणून 'अ' हा 'क' पेक्षा मोठा आहे असं निगामी तर्कशास्त्र आपला डावा अर्धगोल वापरत असतो.

मानवी मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीबाबत डॉ. जिल टेलर यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचे चित्रा बेडेकर यांनी केलेले आणखी वर्णन आपण पुढील लेखात पाहू.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

माहेतीन घरं


शंकर बडेमाहं जलमगाव यवतमाय जिल्ह्यात पह्यलंच बोरी अरब आन् आताचं बोरीस्वामी चंद्रशेखर. माहे बावाजी त्यायले आमी नाना म्हनो अन् गाववाले मुनीमजी. ते नगर म्हंजे अहमदनगर जिल्ह्याच्या पार्थडी तालुक्याच्या वडगांव बडय़ाचं इथून दुकाय पडल्यानं गाव सोडून पोट जगवासाठी म्हून पह्यले यवतमायले आले ते मायबापासंग. तवा ते सहा-सात वर्साचे होते. तिथून मंग सारे बोरीले याच्यासाठी का इथयी कापसाचे जीनं होते. कंपन्याचे आफीस होते म्हंजे गेल्या गेल्या काम भेटाचा चानस होता. त्यायनं लहानपनापासून लढ्ढा मालानी अँड सन्स या फर्ममधे तेवीस वर्स आन् श्री जोधराजजी बाजोरीया यायच्याकडं सतरा वर्स मुनिमजी केली. सोताच्या कमाईतून थोडी थोडी अरा अरामान शेती आन् मंग आखरीले घर घेतलं. लहानपनापासून ज्या घरानं मले मोठं केलं. ते बोरीचं घर. खूप आठोनीच्या त्या घराच्या अजूनयी लहानपनात घेऊन जाते. ते घर दोन मजली. खाली जवय जवय सात-आठ खोल्याचं घर आन् अरध्या भागावर माडी. घर सडकीले लागून. माडीच्या भिती मातीच्या आन् खालच्या मातीचं. आता खालची जमीन रोज गर्दीच्या पांढर्‍या मातीनं सारवलया जाये. पन भितीले घरी देवीचे घट राहे म्हून नवरातीच्या आंधी तवा दगडूमामा कामावर राहे तं त्याले आंदिलल्या दिसी माय सांगून ठुवे का, 'दादा घरी गेल्यावर्त माह्या घरी निरूप देजो उद्या सारवनाले या लागते म्हून. हे दरसालचं असल्याच्यानं मामाले बाकी मालूमचं राहे. दुसर्‍या दिसी मामा आन् पारबतामामी. मामा लाकडाच्या सिडीवर वर्त आन् खालून द्याले मामी.

माडीवर्त मधांतल्या खंब्याले माय रई लावे. आता तं सारा आयत्याचा जमाना आला त्यायले याची मजा आन् त्या मागचं कष्ट समजनारच नाई. माय रई लावे तवा घुसयनार ताक पायतानी आन् रईच्या दोरीचा येणारा लयबद्ध आवाज आयकतानी आन् आखरीले ताथा लोण्याचा गोया जिभीले उगीचंच पाणी सोडे. तवा सयपाक चुलीवरच राह्ये त्यासाठी मातीचाच सयपाकाचा मोठा वटा उला असलेली मोठी चूल. वटय़ाच्या त्या कोंटय़ात लहान चूल कवा पावन्याची गडबड असली तं ते लागे. मायचा भाकरी थापतानी बिल्लोराचा होणारा किनकिन आवाज त्याच्यात उल्यावर असलेल्या कास्याच्या कासील्यात शिजाले वरनासाठी सिजाले ठुलेली तुरीची दाय सिजत आल्यावर त्याच्या वाफीनं झाकनं म्हून ठुलेली थुडथुड उडनानी वाटी तिच्या आवाजानं भूक चेलवून टाके. सकायी चार वाजता उठलेली माय सडा टाकण्यापासून सयपाक अटपला का आमाले वाढून लगलग चार घास पोटात ढकलसे का वावरात निंदाले गेलेल्या बायामांग ध्यान द्याले निंघे. सांजीले घरी आली का हातपाय धुवून पोरीनं केलेला च्या पोटात ढकलला का देवाले दिवा लावून हात जोडनं झाले का रातीच्या सयपाकाची तयारी सुरू असतानी गडी कोटय़ातून बादलीभर दूद घेवून ये. मंग मोठय़ा पितयी गंजात (अंदरून कलयी केलेल्या) ते दूद तपवाले ठुवे. सार्‍यायचे जेवन अटपले का आखरीची झाक पाकं करून चुलीवर पोतेर फिरवता फिरवता जीनातले दहाचे टोले पडे. अशी माय कामाले जुतल्या जुतून पन वटवट नाई का बडबड नाई. कवा हे दुखते नाई का ते दुखते नाई. आता हे सारं आठोलं का डोयात पानी कवा आलं समजू पडत नाही.

आमा सहायी बईन भावाचे लगन याच घरानं पाह्यले तवा सुखावला. तं मोठी वयनी गेली मंग काई वर्सानं नाना गेले तवा दुखावलायी. घराची आपल्याले आन् आपली घराले इतकी आदत पडून जाते त्यालेचं नातं जुयन म्हनतेत. एक वक्ता असी आली का बायकोपोरं घेवून घरचं नाई तं गावचं सोडा लागलं. या दुखाले शब्दात नाई सांगता येत. ज्या वयात मानसाचा जन्म बसत असते त्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी जगन्याची नईन इनिंग सुरू करा लागली. टेंपररी लिझच्या जागेवर नेताजी चौकात सुभाष पावडे या कवी मित्राच्या ओयखीनं बेकरी अँटमचं दुकान सुरू केलं. त्याच्या भरोस्यावर्त सहा जनाची सर्कस खेचनं सुरू झालं. अरे 'संसार संसार' कायले म्हन्ते त्याचे चटके अनुभवत होतो. त्यातनी खुसीची गोठ असी का यवतमाय माह्यासाठी नवाड नोतं आन् अधाराले दोस्त होते. आमी इथ आलो तवा माही मोठी पोरगी भारती पाचव्या वर्गात, निता तिसरीत, गजू बालकमंदिर आन् लायनी कीर्ती एकदम लहान. आमाले येवून दहाक मयने झाले असतीन. का एका दिसी माहे 'वर्गमित्र' सुरेश कैपिल्यवार त्यायचा निरूप आला का दुकान बंद झाल्यावर्त भेटून जा. मी घरी जाण्याआंधी त्यायच्याकडं गेलो. ते घराच्या बैखटीत बसून होते. आलेलं पानी पिल्यावर म्या इचारलं, ''सेठ कसं काय बोलावलं होतं?'' त्याच्यावर त्यांनी सांगितलं की, ''या या ठिकाणी असं असं घर आहे ते उद्या सकाळी जाऊन पाहून घे आणि पसंत आहे का सांग.'' असं म्हणून त्यायनं किल्ली समोर धरली ती हातात घेत म्या इचारलं. ''कोणासाठी?'' त्याच्यावर ते तडकले. म्हने, ''माझ्यासाठी मला घर नाही ना म्हनू!'' आन् मंग शांत होत बोल्ले, ''स्टेजवरून बोलायला सांगा तर एकदम पुढं, बाकी ववहारात शून्य. अरे आता तू कायम इथे रहायला आल्यावर तुला घर नाही लागणार का? कसा रे बाबा तू!'' माझ्या डोयात आसूचं जमले ते त्यायले दिसू नोय म्हून तोंड फिरवलं आन् ताडताड घराकडं निंघालो.

एखांदी सुदी गोठ घडाची असनं तं त्याचे योगयी तसेच येतेत. मी राती घरी आल्यावर्त घरी बायकोले काय झालं ते सांगतलं आन् सकायी दुकान उघडायच्या आंधी ते घर पाहून या लागन म्हून सकायी रोजच्या परीस आंधी उठवाले सांगून आंग टाकलं. सकायी उठून तयारी होत आली. आंघोय करून देवाले हात जोडून कपडे घालूनंच राह्यलो तं दाठ्ठय़ात (दारात) फटफटी थांबल्याचा आवाज आला म्हनू वाकून पाह्यलतं तवा नेरले असलेले आन् माह्यासाठी रगताच्या नात्या परीस जवयचे असलेले डॉ. दादा पुरी. मनात आलं कसे देवावानी आले दादा. मले रातीपासून वाटत होतं का घर पाह्यतानी कोनीतरी घरच्या सारक पाह्यजे होतं आन् अवचित दादा हजर. मी मनातून खूप खूस झालो. म्या दादाले सारी हकीगत सांगल्यावर दादा म्हने, ''घर न पाहता तुला एक सांगू का ज्याच्या खिस्याला वजन आहे त्याच्यासाठी चॉईस असते. तुझ्यासारख्या मानसानं जन्माची सावली मिळत आहे हे समजून हो म्हनाव. असे योग पुन्हा पुन्हा येत नसतात आणि निसटलेतं पुन्हा हातात सापडत नसतात समजलं? चल बस माझ्या गाडीवर.'' ते घर गल्लीत होत जाचा रस्ता हिवायात असा तं बरसातीत कसा? असं मनाले वाटून गेलं. सडकीपासून पाच फूट खोल. इंग्रजी कवेलूचं बैठ लहान घर. उत्तर दिसेले तोंड. एका मांग एक अस्या दोन खोल्या. त्याच्या बाजुले तसं आन् त्याले लागून चिरोटीवानी लंबी खोली. आतनी काया फरस्या बाजूच्या चिरोटीत खाली माती. हरेक खोलीले समोरचे दाठ्ठे (दारं) आन् इकून तिकडे जाले अंदरूनयी दाठ्ठे. चिरोटीले लागून भाहेरून तट्टयाची न्हानी आन् सादा संडास. घर आतून पाहून पाहून मातीच्या आंगनात उभे झाल्यावर्त दादानं इचारलं, ''आता तुझं मत सांग?'' ''घर पाहाच्या आंधी तुमी जे सांगतलं तरी माहा मत इचारता? पसंत हाय.'' सुरेश सेठले माह्या खिस्याच्या वजनाची कल्पना असल्यानं पसंती सांगून पुढं बोलाले गेलो तं मले मधांत अडवून म्हणे, ''पसंत आहे ना बस बाकी मी पाहतो! दादाच्या सल्ल्यानं आन् दोस्ताच्या अधारानं माहं घर तवा झालं म्हणून झालं. ते घर सादंसुदं होतं म्हंजे साद्याभोया मानसाच्या मनासारकं पन तितलंच त्या घरानं जीव लावला आमच्यावर. पावसायात मांगच्या आन् बाजूच्या भितीले वल (ओलं) चढे पन आखरी पावतर कवा दगा नाई देल्ला. याचं घरात लेकरं लायन्याचे मोठे होत सिकले. दोन पोरीचे लगन झाले. मोठय़ा पोरीची पयली नात याचं घरातली. पन आता ते घर थकलं होतं. किती साल आसरा द्यावं त्यानं? जुन्या घरमालकापासून मोजलं तं सत्तरीले टेकलं होतं ते. बिना सिमीटच्या जुडायीच्या घरानं किती तग धरावं? त्यातनी पोरगं नवकरीले लागलं तो म्हणे, मले लोन भेटते आपन नईन घर बांधू. कागदपत्रापासून घर बांधे पावतरच्या सार्‍या कटकटी त्यानं सोसल्या आन् हे घर उभं झालं. असं हे माहं तिसरं घर. हे चित्रातल्या सारकं घर पाहून मन हरकीजलं तसा अजून या घराले मी नवाडाचं वाटत असीन. त्या दोन घराच्या कितीतरी आठोनी कायजात बसून हायेत. एकदम एकरूप नाई होता येत मानसाले नव्या घरासंग पन थायी घरांच्या आंगाखांद्यावर खेयाले उसीर नाई लागणार. तसं यायी घरानं लहान पोरीच्या लगनाच्या आठोनीनं सुरुवात केली हायेच. नशिबाचा भाग अस्ते नाई तं गाव सोडा लागन, घर सोडा लागनं असं वाटलयी नोतं. नियती फिरवते आपण फिरतो. मनात सच्चपना असनं तं कुठीजा सावली ह्याले घर भेट्टेचं.

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260
     

Monday 29 October 2012

श्रेष्ठ कोणता? ठरवून केलेला की प्रेमविवाह?


वरील प्रश्नांवर मतदान घ्यायचे ठरले तर माझी खात्री आहे, की ठरवून केलेला विवाह हाच श्रेष्ठ विवाह आहे असेच बहुमताने सिद्ध होईल. त्याचे कारण भारतीय मानसिकतेत दडलेले आहे. इथे ठरवून केलेला विवाह हाच श्रेष्ठ विवाह असतो असे मानले जाते आणि या मानसिकतेला भारतीय संस्कृतीचा ज्ञात इतिहास तीन हजार वर्षाचा असेल तर तेवढय़ा काळाचा नक्कीच पाठिंबा आहे. इंग्रज आपल्या देशात येईपर्यंत तरी हा प्रश्नच आपल्या जीवनशैलीत उद्भवलेला नव्हता. गेल्या शेदीडशे वर्षात मात्र भारतीय मानसिकतेला धक्का पोहोचला आहे. आमच्या जीवनशैलीत आजही ठरवून केलेला विवाह 90/95 टक्के होतात. अर्थात ही आकडेवारी अंदाजे दिली आहे. काही वर्षापूर्वी डॉ. इरावती कर्वे यांनी या प्रश्नावर एक सव्र्हे घेतला होता असे वाचल्याचे स्मरते. डॉ. इरावती कर्वे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मानववंशशास्त्रज्ञ आणि त्यांनी हा सव्र्हे पुणे परिसरात घेतला होता. तेव्हा त्यांना असे आढळून आले, की प्रेमविवाहाचे प्रमाणसुद्घा खूपच कमी झाले आहे. त्यांनी घेतलेला हा सर्व्हे बहुधा 1960च्या आसपास घेतला होता. आज कुणी सव्र्हे न घेता हाच प्रश्न विचारून मत अजमावयाचे ठरवले तर आपल्या असे लक्षात येईल, की विवाहेच्छुक तरुण प्रेमविवाहाला पसंती देतात. पण प्रौढ मंडळी मात्र ठरवून केलेल्या विवाहांनाच पसंती देतात. अर्थात कुणी कोणतीही उत्तरे देवोत, आपल्या देशात मात्र ठरवून केलेल्या विवाहांची संख्याच अधिक आहे हे मात्र निश्चित.

काही वर्षापूर्वी युरोपमधील विकसित देशांतील एक शिष्टमंडळ भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांची एक प्रकट मुलाखत औरंगाबादच्या रोटरी क्लबने आयोजित केली होती. मी काही रोटरियन नाही; पण माझ्या एम. डी. जहागीरदार या नावाच्या मित्राने अत्यंत आग्रहाने मला त्या कार्यक्रमास नेले होते. तिथे जी प्रश्नोत्तरे झाली त्यात विवाह कुटुंबसंस्थेसंबंधी काही प्रश्न होते. शिष्टमंडळात एक चाळिशी ओलांडलेली विदुषी होती. त्या विदुषीला भारतीय विद्वानाने युरोपातील विवाहसंस्थेबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ती हसून म्हणाली, ''आम्हांला दोन मुलं आहेत. आता ती बरीच मोठी झाली आहेत. पण अजून तरी आम्ही विवाह करावा या गोष्टीचा निर्णय घेतलेला नाही.'' संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. त्या बिचार्‍या विदुषीला मात्र हे नक्कीच कळले नसावे, की ही भारतीय माणसे का हसतात. खरेतर सगळी भारतीय माणसे का हसत होती व स्वत:ला प्रगत म्हणवणारी या देशातील माणसं विवाह न करता एकत्र राहतात. संतती निर्माण करतात. केवढी ही विसंगती? यांना नैतिकता ती कशी कळत नाही? असेच जणू त्या हसण्यातून व्यक्त होत होते. पण ती विदुषी प्रगत देशांतील म्हणून आम्हांला तिचा राग येत नव्हता. आपल्या देशात विवाहबाह्य संबंधांतून निर्माण होणार्‍या संततीला 'अनौरस संतती' मानतात आणि अशा संबंधांना अनैतिक ठरवतात. अर्थात, असे संबंध ठेवलेच जात नाहीत असे मात्र नाही. अशाच संबंधांतून जन्माला येणार्‍या संततीला उकिरडय़ावर टाकून देण्याची क्रूर चाल आपल्याकडे आढळून येते. खरेतर

महाभारतातला कर्ण हा वाहत्या पाण्यात मरण्यासाठी सोडून दिलेला कुंतीपुत्र होता. पण आमच्या महाकवी व्यासालासुद्धा कर्णाच्या पित्याचे मोठेपण नमूद करता आले नाही. व्यासाच्या प्रतिभेतली ही उणीव आपल्या युगातले महाकवी नारायण सुर्वे यांनी मात्र दूर केली. उकिरडय़ावर फेकून देणार्‍या अशा आईबद्दल आणि पित्यापेक्षाही अधिक माया लावणार्‍या पित्याबद्दल त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्ण उद्गार काढले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोडबिलाला सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी कडाडून विरोध केला. बंगालमध्ये रूढ असणार्‍या स्मृतीप्रमाणे स्त्रियांना पतीच्या संपत्तीत हक्कच नव्हता. तो हिंदू कोडबिलाप्रमाणे आपल्या देशातील सर्वच स्त्रियांना मिळाला. पण बाबासाहेबांच्या मनातला मानवतावाद किती व्यापक होता हे आणखी एका उदाहरणावरून लक्षात येईल. त्यांनी स्त्रियांना पैतृक संपतीत वारसाहक्क तर दिलाच होता; पण जी अनौरस संतती आहे, रखेलीची संतती आहे त्यांनासुद्धा हा हक्क देण्यात यावा अशी तरतूद केलेली होती. बाबासाहेब काळाच्या खूप पुढे होते. विधवांच्या अनौरस संततीसाठी आश्रम सुरू करणारे महात्मा फुले, पंढरपूरचे नवरंगे आणि बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या पुढे जाऊन माणसांच्या चुकांची नवजात आणि अश्रप बालकांना शिक्षा होऊ नये म्हणून विचार करणारे, कृती करणारे एक महापुरुष होते.

विवाहबाह्य संबंधांतून जन्माला येणार्‍या संततीला आम्ही नैतिक पाठिंबा देत नसलो तरी आपल्या देशाचे अभिमानाने 'भारत' हे नाव उच्चारताना आपण लक्षात घ्यायला हवे, की दुष्यंताचा पुत्र भरत हासुद्धा विवाहबाह्य संबंधांतूनच जन्मला होता. राजा दुष्यंताने शकुंतलेशी विवाह करून भरताला औरस ठरवले. इतकेच नाही, तर 'शकुंत' नावाच्या पक्ष्याने जिचे बालपणी लालनपालन केले ती शकुंतला मेनका आणि विश्वामित्राचे अनौरस अपत्य होती. स्त्रीपुरुष संबंध विवाहोत्तरच असायला हवेत, ही भारतीय मानसिकता आहे. कारण विवाहपूर्व शरीरसंबंधातील संतती ही 'अनैतिक' म्हणून 'अनौरस' ही आमची मनोधारणा आहे.

पण ज्याचा आपला कधीच पूर्वपरिचय नाही अशा पुरुषाला भारतीय स्त्री आपले शरीर दान म्हणून द्यायला तयार होतेच कशी? हे जर्मन विदुषींना प्रचंड कोडे वाटते. त्यांना भारतीय विवाहपद्धती ही मागास व क्रूरपणाची वाटते. विवाह आणि शरीरसंबंध या दोन्ही गोष्टी प्रेमोत्तरच असायला हव्यात असे प्रगत देशांतील लोकांना वाटते.

आता या परस्परविरोधी गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आपल्या लक्षात येते ती गोष्ट अशी, की आजच्या आधुनिक आणि प्रगत देशांतील लोकांना विवाह परस्पर परिचयानंतर आणि एकमेकांच्या आवडीनिवडी कळल्यानंतरच व्हायला हवा असे वाटते तर भारतीय मानसिकता मात्र ही आधुनिकता अजूनही मनाने स्वीकारायला तयार नाही. त्याची दोन कारणे आहेत. नियोजित विवाह करताना मनाला मानसिक समाधान देणारी जात टिकवून ठेवता येते हे पहिले कारण आणि नियोजित विवाह पतिपत्नीला घटस्फोटापर्यंत जाऊ न देता वृद्धापकाळापर्यंत एकत्रित ठेवतो. खरेतर ही दोन्ही कारणे आता पुरेशी समर्थनीय उरली नाहीत. आपले जात टाकून देण्याचे धैर्य होवो अगर न होवो, जात ही काही आपले संरक्षण करणारी आणि वंश शुद्धपणे टिकवून ठेवणारी संस्था आहे हे आज आपण खात्रीने मानत नाही आणि नियोजित विवाह टिकून राहतात हेही खरे नव्हे. कारण नियोजित विवाहानंतरही घटस्फोट होतच आहेत. त्यामुळे जात टिकणे आणि विवाह टिकून राहणे याआधारे कोणता विवाह श्रेष्ठ आणि कोणता विवाह कनिष्ठ ठरवणे हेच मुळात चूक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्या प्रकारच्या विवाहात स्त्रीपुरुषांचे निर्णयस्वातंर्त्य अबाधित राहते, असा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे आणि व्यक्तीच्या निर्णयस्वातंर्त्याची बूज राखतो तोच विवाह अधिक चांगला हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असा विवाह मोडतो की नाही? उत्तर 'होय' असेच आहे. पण इथे जबाबदारी विवाह ठरविणार्‍यांची नसते, तर विवाहाचा निर्णय घेणार्‍यांची असते. 'स्वातंर्त्य' ही गोष्ट अतिशय जबाबदारीने स्वीकारावयाचे मूल्य आहे. स्वातंर्त्य हवे, पण माझी सुरक्षितताही धोक्यात येऊ नये असे जे म्हणतात त्यांना स्वातंर्त्य हे मूल्य आहे हेच नीट समजलेले नसते. स्वातंर्त्यचळवळीत जे फासावर लटकले ते फासावर जाताना पश्चात्तापाने रडले नाहीत, तर हसतमुखाने फासावर गेले. स्वातंर्त्याचे हे मोल सार्वजनिक चळवळीपुरते नसते, तर व्यक्तिगत पातळीवरही असते हे आपण कधीतरी लक्षात घ्यायला हवे. हे जर लक्षात आले तर वधूवरांना निर्णय घेण्याचे स्वातंर्त्य असलेला विवाह की वधूवरांचे निर्णयस्वातंर्त्य नाकारणारा विवाह यापैकी कोणता विवाह तुम्ही पसंत कराल, असा प्रश्न आपण विचारायला हवा. भारतीय माणूस कोणत्याही बदलाचे एकदम स्वागत करीत नाही. तो बदलातले धोके आणि सनातनी अवस्थेतला कोंडमारा या दोन्हींचा समन्वय करीतच वाटचाल करतो. आम्ही आज विवाहालाच मान्यता देत असलो तरी वधूवरांच्या अनुरूपतेचा कटाक्षाने विचार करीत आहोत हे इथे लक्षात घेतले पाहिजे. टप्प्याटप्प्याने का होईना आपण आज बालविवाह पद्धत टाकून देण्यासाठी अनुकूल झालो आहोत. कारण तिथे वधूवरांच्या अनुरूपतेचा विचार फारच गौण असतो. आता आम्ही वधूवरांचे शिक्षण, आरोग्य, अव्यंगत्व, अर्थोत्पादनक्षमता याही घटकांचा विचार करीत आहोत. यात हळूहळू आवडीनिवडींचाही समावेश होत आहे आणि त्या एकमेकांना सांगता याव्यात अशीही संधी देऊ लागलो आहोत. 'स्वयंवरात' स्त्रीच्या निर्णयक्षमतेचा विचार केलेला नव्हता. 'गांधर्व' विवाहात शरीरसंबंधापलीकडे असणार्‍या सहजीवनाचा विचार केलेला नव्हता. म्हणून विवाह कोणता श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा तो वधूवरांना संमत व अनुरूप कसा होईल याचाच विचार करणे अधिक शहाणपणाचे ठरणार आहे. कारण या विवाहात व्यक्तीच्या स्वातंर्त्याला अवकाश आहे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी-9881230084

रिकामा भपका


'' काय पाहून राह्यले उत्तमभाऊ''

''आदिवासी चॅनल पाहून राह्यलो गळय़ा. टीव्हीत आदिवासी बाया दाखून राह्यले''

'' ते आदिवासी नाहीत''

'' मंग कोन हायेत?''

'' ते फॅशन चॅनल व्हय''

'' घ्या दाबून! हे अलगच चित्रण हाय लेका.. डोकशाले

टिकली नाही.. कमरीत करदोळा नाही.''

'' फॉरेनच्या बाया अशाच असतात''

'' कापूस पिकत नाही काय त्या देशात? पाह्यनं त्याहिचे कपडे. असं वाटते कपडे शिवनारा टेलर अध्र्यातच बिमार पडला.''

''फॅशन शो व्हाय तो''

''अन् ह्या बाया येरझारा काहून घालून राह्यल्या?''

'' त्याचेच पैसे भेटतात त्याहिले''

'' आपल्या इकडची बाई खाली मान घालून चालते, डोकशावर पदर घेते अन् ह्या पाहा घुबळा.. थयथय मटकून राह्यल्या.. कमाल आहे लेका बबन्या.. ह्या बाया बाहीर अशा राह्यतात तं घरात कशा राह्यत असतीन? ''इंग्लंड, अमेरिकेत म्हातार्‍या बुढय़ा फराक घालतात''

'' त्या इंग्लडवाल्याइनं तं लाजच सोडली, तिकडे लग्नकार्यात इव्हाई इनचा मुका घेते''

'' कमाल आहे राज्या.. आपल्याइकडे इव्हाई दिसला की इन दाराआडी लपते.''

''दुसरं चॅनल लावा''

'' हे कोन्यातरी पिच्चरचं गानं सुरू हाय.''

'' काय ढंग आहे बे या गान्यात? दहापंधरा पोरी इकून नाचतात.. दहापंधरा तिकून नाचतात.. मंधात हिरो नाचते.. काहीच सरम नाही.. नाही तर जुन्या

जमान्यातले पिच्चर पाहा. तो मनोजकुमार गानं म्हनताखेपी हिरोइनच्या आंगाले हात ना लावे.. अन् आता पाहा.. घोडी कित्तीकी सारखे दडादड उडून राह्यले''

''आजकाल असेच गाने हिट होतात उत्तमभाऊ''

'' काय नेसली ते नटी?''

''हापकट पॅंट अन् टॉप घातला''

'' काही ढंग नाही.. जुन्या पिच्चरची हिरोइन खांद्यावरचा पदर ना पडू दे..आता पदर गायबच झाला..असं वाटते जावं अन् तिच्या आंगावर चादर टाकावं''

''तुम्ही हेच पाह्यता का दिवसभर?''

'' अरे हूत.. मी बातम्या पाह्यतो अन् तुही वैनी हिंदी सिरीयला पाह्यते.''

''कोनत्या सिरीयला पाह्यते?''

''तूच इचार तिले''

''कोनत्या सिरीयल पाह्यता वैनी तुमी?''

'' ये रिश्ता काय कहना..''

'' माह्या घरची लाफ्टर चॅलेंज पाह्यते, तिले सातवा मयना सुरू हाये, पह्यल्या मयन्यापासून लाफ्टर चॅलेंज पाहून राह्यली.. अर्चना पुरनसिंगसारखी हासत राह्यते, मले तं वाटते नऊ मयन्यानं लेकरू हासत हासतच बाहीर येईन''

'' सार्‍याच बाया पाह्यतात सिरीयला'' ''ते रेखावैनी डान्स इंडिया डान्स पाह्यते, पुढच्या मयन्यात तिची डिलिव्हरी आहे, माह्या मतानं तिचं पोरंग नाचत नाचतच जन्माले येईन''

'' असं कुठं होत असते काय?''

'' मले सांगा.. ह्या सिरीयला पाहून लेकराचा बुद्ध्यांक वाढते काय? त्याच्यात जनरल नॉलेज काहीच नसते.. प्यार का दर्द है.. साथ निभाना साथीया.. इस प्यार को क्या नाम दू.. म्हणजे सार्‍या सिरीयला प्यारवरच भर देतात, पोट्टे जन्माले आल्यावर म्हनतीन.. मम्मी. मै तुझसे प्यार करता हूं''

'' तुम्ही तं काही बोलता''

''या सिरीयलात मोठेमोठे बंगले दाखोतात.. महागडे फर्निचर.. भारीभारी साडय़ा.. नकली दागिने.. कोन्याकोन्या सिरीयलमध्ये सासू अन् सून वयखू येत नाहीत''

'' काहून?''

'' सासू सुनीपेक्षा जवान दाखोतात, ते सुनीपेक्षा काटेबाज दिसते, असं वाटते सहा मन्याच्या आगुदरच हिचं लगन झालं, ते घरात ओठपालीस लावून चहा घेते.. अशा सिरीयला पाह्यल्यावर आपल्या घरी पोट्ट जन्माले येते, डोये उघडल्यावर ते मातीचं घर पाह्यते, बाजीवरच्या वाकया पाह्यते, लुगडय़ावाल्या बुढय़ा पाह्यते.. ढोरंवासरं पाह्यते. आपली झिपरी झापरी माय पाह्यते.. हे पाह्यल्यावर त्याले वाटते की, आपून नक्कीच परग्रहावर जन्माले आलो''

''तुम्ही न्याराच तर्क काढता भाऊजी.. उलशाक लेकराले काय समजते?''

'' मी माह्या मनातली कल्पना सांगून राह्यलो, बर तुम्ही सिरीयला पाह्यता.. तुमच्यासोबत दोन लेकरं पाह्यतात.. टीव्हीतलं नवराबायकोचं भांडण पाहून त्याहिले काय भेटते? सिरीयलात कोनी पोरगा अभ्यास करून राह्यला असं पाह्यलं काय?''

''नाही''

''मंग काय संस्कार होतीन लेकरावर? त्याहिचे प्रश्न कोणते? आपले कोनते. आपल्या इकडे लोडशेडिंग असते.. सिलेंडर भेटत नाही.. शेतमालाले भाव नाही.. असं कधी टीव्ही सिरीयलात दाखोतात काय?''

''ते कायले दाखोतीन? ''

'' त्याहिच्या घरची कहानी दाखोतात''

'' आपलं काय हाय त्याच्यात? त्याहिचे लफडे पाहून आपल्याले काय भेटते? त्याहिच्या घरात सुटाबुटातले नवरे दाखोतात.. कोटावाला सासरा दाखोतात.. पोत्यावर बसलेला सासरा पाह्यला काय टीव्हीत? त्या सिरीयलात सारा भपका असते वैनी.. दिवसभर आपल्याले गुंतून ठेवतात.. आपले कामधंदे राह्यतात.. लेकराचा अभ्यास बुडते.. त्या सिरीयला आपल्या काहीच कामाच्या नाहीत.. फक्त भरमाचा भोपया अन् हिंगाचा वास!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी-9561226572

अनुकरणीय व्यक्तिमत्त्व : कृष्णाजी हावरे


कथा किंवा कादंबरी लेखन करीत असताना लेखक आपल्या अवतीभोवतीच्या घटना, घडामोडी, प्रसंग यांचे अतिशय सूक्ष्म पातळीवर निरीक्षण करीत असतो. वास्तववादी लेखन करताना तर मनाचेही डोळे उघडून पहावं लागतं. भोवती घडलेल्या घटना, घडामोडी आणि प्रसंग लेखकाला लिहितं करीत असतात आणि या सर्व बाबींच्या केंद्रस्थानी असतात व्यक्तिरेखा. त्यांच्या विशिष्ट वर्तन व्यवस्थेमधून ठळकपणे अधोरेखित होत असतात. प्रत्येक व्यक्तीची जशी वैशिष्टय़पूर्ण अशी शारीरिक ओळख असते तशीच त्याच्या वर्तनाचीसद्धा एक अंगभूत ओळख असते. नुकताच ना. धों. महानोर यांच्या कथेवर आधारित अजिंठा सिनेमा पाहण्यात आला. त्यात एक महत्त्वाचं वाक्य आहे.''ईश्वराला आम्ही जगातलं दु:ख नष्ट कर, असं म्हणणार नाही. त्या दु:खाला पेलण्याचं बळ आम्हाला दे, अशी ईश्वराकडे मागणी करू.'' त्यात महत्त्वाचं मानलं आहे.

समाजात सरसकट दु:ख नसतं. तशीच सरसकट एका प्रवृत्तीची माणसंसुद्धा नसतात. मात्र समाजातील काही माणसं समाजाला उपद्रव देण्याचं काम करतात, तर काही माणसं समाजाची उपद्रव मूल्यापासून, दु:खापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाच 'समाजसेवक' असं म्हटलं जातं. 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' असं म्हणूनच म्हटलं जातं. अशा माणसांची दु:खाच्या वेळी सगळय़ांना आठवण होते किंवा अशी व्यक्ती दुसर्‍याच्या दु:खात धावून जाते. दुसर्‍याच्या तोरणादारी आणि मरणादारी जी व्यक्ती आपले वैयक्तिक व्यापताप सोडून धावून जाते, अशी व्यक्ती समाजात आपोआपच आदराच्या केंद्रस्थानी येते, समाजमान्य ठरते. विशेष म्हणजे प्रत्येक गावखेडय़ात अशा काही व्यक्ती असतात त्यांचा समाजाला आधार वाटत असतो. जानेफळ येथील कन्या विद्यालयात शिक्षकाची नोकरी करणारे कृष्णाजी नारायणराव हावरे हे व्यक्तिमत्त्वसुद्धा उपरोक्त गुणवैशिष्टय़ाने परिपूर्ण आहे. आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, आळशी आहे, असे सगळीकडे ऐकायला मिळते. काही प्रमाणात त्या गोष्टीमध्ये सत्यांशसुद्धा असतो किंवा असू शकतो. पण अशा तरुण पिढीपुढे जर संपन्न जगण्याचे, अस्मितेचे पर्याय उपलब्ध करून दिले तर त्यातून स्वराज्य निर्माण करणारी मावळय़ांची पिढी घडू शकते, यात शंका नाही. दिवसभर आपली नोकरी सांभाळून संध्याकाळी कृष्णा हावरे जानेफळ येथे 'वीर हेल्थ क्लब' चालवतात. तरुणांनी सकाळ-संध्याकाळ या हेल्थ क्लबमध्ये यावं आणि आपलं आरोग्य घडवावं. यासाठी त्यांनी गावातील तरुण हेरून त्यांना आवाहन केलं आणि पाहता पाहता गावाचं चित्र बदललं. रिकाम्या वेळी गावगप्पा मारणारे, दुकानाच्या, पाराच्या ओटय़ावर पाय हलवत वेळ घालविणारे पोरं हेल्थ क्लबमध्ये येऊ लागले आणि स्वत:च्या आरोग्याप्रमाणेच समाजाच्या आरोग्याचीसुद्धा काळजी वाटू लागली. विधायक सामाजिक कामे करण्याच्या नशेने धुंद झाले.

या वीर हेल्थ क्लबच्या निर्मितीसाठी कृष्णा हावरे यांनी स्वत:जवळची दीड लाख रुपयांची पुंजी गुंतवली. ती केवळ समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेनेच. म्हणूनच तरुणांची जशी संख्या वाढू लागली तशीच उपकरणाचीसुद्धा संख्या वाढविण्याची गरज भासू लागली; पण त्यासाठी त्यांची तयारी आहे. स्वत: व्यायाम करून जसे निकोप व सुदृढ शरीर आणि प्रसन्न, उमदे मन त्यांना घडवता आले, तसेच इतर तरुणांनी घडावे यासाठी त्यांचा आटापिटा आहे.

सतत समाजात संपर्क राखून असल्यामुळे त्यांच्या शब्दांना आपोआपच महत्त्व आले. त्यातूनच गावपातळीवर शांतता कमिटी स्थापन केली गेली. तिचे अध्यक्षपद कृष्णा हावरे यांच्याकडे आले. गावपातळीवरील तंटामुक्ती अभियानाचे खरे काम या कमिटीने केले आहे. कारण राज्यपातळीवर तंटामुक्त गावाची संकल्पना येण्याच्या पूर्वीपासूनच म्हणजे गेल्या 15 वर्षापासून या कमिटीने गावातील अत्यंत गंभीर स्वरूपाचे वाद गावातच मिटविले आहेत. मानसिक शांती ही आध्यात्मिक शांतीतून निर्माण होते. याची जाणीव त्यांना झाल्यामुळे वेळप्रसंगी सण, उत्सवाच्या माध्यमातून गावकर्‍यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रम राबवून त्या माध्यमातून त्यांना अभिव्यक्तीची वाट उपलब्ध करून देण्याचे कार्य कृष्णा हावरे यांनी केले आहे.

जानेफळ या गावी 'हावरे सर' म्हणून प्रसिद्ध असलेली ही व्यक्तिरेखा खरोखर एखाद्या कादंबरीचा नायक ठरावी अशीच आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन केल्यानंतर वाटत राहते. आपल्या वर्तनातून अनुकरणीय आणि विधायक कार्य करणारी व्यक्तीच गावाच्या आकर्षणाच्या, आस्थेच्या आणि आदराच्या केंद्रस्थानी येत असते. हावरे सरांनी आजपर्यंत केलेल्या अनेक लक्षवेधी सामाजिक कार्यामुळे तसे ठामपणे म्हणता येईल. कारण आपल्या जीवाची पर्वा न करता आजवर त्यांनी अनेकांचे जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून माझी व कृष्णा हावरेंची ओळख तो ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असताना झाली. घरची अत्यंत अभावग्रस्त परिस्थिती, आईचा मृत्यू झाल्यामुळे पोरकेपण वाटय़ाला आलेले. अशा अवस्थेत परिश्रमपूर्वक अभ्यासक्रम पूर्ण करून कला शाखेत बारावीला भरघोस गुण कृष्णा हावरेने मिळविले. केवळ तीन गुणांनी गुणवत्ता यादीत नाव येऊ शकले नाही. त्याची खंत मनाशी बाळगून पुढील आयुष्यात शिक्षक होऊन समाजाचे ऋण फेडायचे असा चंग बांधला व आपले शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेपासूनच त्यांच्यातील सर्वागीण गुणवत्ता गावाने हेरली होती. त्यामुळेच सरस्वती शिक्षण समितीच्या गुणग्राहक संचालक मंडळाने त्यांना सरस्वती कन्या विद्यालय येथे शिक्षक म्हणून रुजू करून घेतले व त्यामुळेच त्यांचे समाजसेवेचे काम उत्तरोत्तर शिखरावर गेले.

त्यांच्या पहिल्या सामाजिक कार्याची ओळख झाली ती बुरुजाशी उभी असणारी गाय पावसाळी दिवसात बुरुज अंगावर कोसळून पूर्ण दबली असताना, वरच्या ढासळत्या गढीची पर्वा न करता त्यांनी गायीचे प्राण वाचविले. त्यानंतर गावातील सर्वात खोल असलेल्या आणि तुडुंब भरलेल्या विहिरीच्या तळातून हरीश छापरवाला या मुलाला तळाशी बराच वेळ शोध घेऊन बाहेर काढले. विद्युत तारेला चिकटलेल्या तुळशीदास नाके यांच्या मुलाला 20 फुटांवरून खाली आणून तत्काळ दवाखान्यात नेऊन जीव वाचविला. बसस्थानकावरील बूट हाऊसला अवेळी आग लागली तेव्हा ती विझविण्यासाठी पुढाकार घेऊन पुढचा अनर्थ टाळला. गावात कोणत्याही घरी कितीही मोठा नाग निघाला तरी पहिल्यांदा मोबाईलवर कळविले जाते ते हावरे सरांना. अशा कितीतरी अडचणीत सापडलेल्यांना त्यांनी शारीरिक मदत तर केलीच; पण रूढी, परंपरेला बदलण्याचे काही आदर्शसुद्धा स्वत:च्या वर्तनातून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी घालून दिले. जसे की, अंबिकानगरमधील गरीब कुटुंबाची झोपडी जळाल्यानंतर मित्राच्या मदतीने गावात मदतफेरी काढून त्या कुटुंबाला तीस हजार रुपयांची मदत केली. त्याचप्रमाणे समाजाचा आणि भावकीचा विरोध असूनही आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची तेरवी न करता त्या पैशातून गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांचा सत्कार घडवून आणला.

त्यांना लाभलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांच्या हातून ही सामाजिक कार्ये होतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अभिनयकौशल्य; वक्तृत्व गुण वाढीला लागावे म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते अग्रेसर असतात. असे कितीतरी वक्ते घडविण्याचे त्यांचे कार्य सुरू असते. त्यासाठी सर्जनशील पातळीवरचे लेखन करताना कथा, कविता, हास्यकविता लिहून त्यांचे सादरीकरण करण्याचे काम ते ग्रामोत्सवातून करीत असतात.

या सर्व घटनांमध्ये सर्वात चित्तथरारक आणि वेदनादायक प्रसंग जानेफळ येथील जर्मन डॅमवर अनुभवल्याचे त्यांचे मित्र सांगतात. 27 एपिल्र 2009 रोजी विष्णू गवई यांचा मुलगा किशोर हा दहावीची परीक्षा देऊन सुटय़ा घालविण्यासाठी काकांकडे आला होता. मित्रासोबत तो जर्मन डॅमवर पोहायला गेला; परंतु त्याला पक्के पोहणे येत नसल्यामुळे तो धरणाच्या पाण्यात बुडाला. त्याचे सर्व मित्र घाबरून पळून गेले. किशोरला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. तीन-चार तास शोध घेतल्यानंतरही त्याचा थांगपत्ता लागला नाही. कृष्णा हावरे यांना बातमी समजताच त्यांनी धरणात उडी घेतली. पाणी शांत झाले. बराच वेळ झाला तरी लोकांचे आवडते हावरे सर वर न आल्याने अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले; पण ते वर आले तो किशोरचा मृतदेह सोबत घेऊनच. जेव्हा किशोरचा अंत्यविधी करण्याची वेळ आली तेव्हा किशोरची आई रंजना यांनी जोपर्यंत हावरे सरांचा सत्कार होत नाही तोपर्यंत अंत्यविधी होऊ देणार नाही, असा आग्रह धरला. पण त्यांनी नम्रपणे सत्कार नाकारला. तसाच शेतावर मृत्यू पावलेल्या रोकडे यांचा मृतदेहसुद्धा त्यांनी रात्री एक वाजता खांद्यावरून आणला होता.

सहारा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामसफाईपासून अनेक विधायक कामे करणार्‍या, आतापर्यंत 20 वेळा रक्तदान करणार्‍या हावरे सरांनी आज जानेफळ परिसरातील तरुणांसाठी वेगळा आदर्श घालून दिला आहे. म्हणूनच अशा आदर्शभूत व्यक्तिरेखेचा परिचय चारीमेरा होऊन त्यांचे अनुकरण करण्याची प्रेरणा अनेकांना मिळावी म्हणूनच आजचा हा लेखनप्रपंच!

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून

'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता. मेहकर जि.बुलडाणा

मुख्यमंर्त्यांचा गणपती दूध प्यायला, त्याची गोष्ट !


तिकडे जिल्हा वाशीम 'फुलउमरी'जवळच्या 'श्याम की माता' देवीच्या डोळय़ांतून अश्रू येताना 2-4 लोकांना दिसलं. वार्‍यासारखी वार्ता पसरली. आधुनिक तंत्रज्ञानानं मोबाईलनं ही वार्ता वायुवेगापेक्षाही अधिक वेगानं पसरली. बंजारा समाजाचे तांडेच्या तांडे घराबाहेर आले. 'रात्रभर झोपायचं नाही. जो झोपेल तो उठणार नाही.' रात्री 'घरात थांबू नका, भूकंप येणार आहे.' विदर्भ-मराठवाडय़ातले अनेक जिल्हे, सुशिक्षित, अडाणी सारेच रात्रभर घराबाहेर जागत बसले.

मी मुंबईत. रात्रभर कुणाचा न् कुणाचा फोन येत होता. सर्वदूर मृत्यूचं, भूकंपाचं भय पसरलं. धर्म-जात-पंथ ओलांडून पसरलं. इकडे सप्तशृंगीच्या गडावरच्या देवीच्या डोळय़ांतूनही अश्रू यायला लागले. प्रचंड गर्दी उसळली. विदर्भात पोहरा देवी अतिशय प्रसिद्ध. भारतभरातील बंजारा समाज तिच्या दर्शनासाठी येतो. पण थोडय़ाच अंतरावरच्या 'श्याम की माता' कडे मात्र लोकांचं फारसं लक्ष नाही. यानिमित्तानं 'श्याम की माता' दर्शनासाठी दिवसभरात 25 हजारांपेक्षा जास्त लोक येऊन गेलेत. 'श्याम की माता' प्रसिद्ध झाली.

अशा अफवा का पसरतात? आसामात मुस्लिमांचं शिरकाण होतं. अफवा पसरवली जाते. मुंबईमध्ये तास-दीड तास नंगानाच चालतो. पोलिसांना नेम धरून मारलं जातं आणि काही दिवसांत इकडे देवीच्या डोळय़ातून वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच वेळी अश्रू येतात. कधी कधी चर्चमधील मेरी मातेच्या डोळय़ातून अश्रू येतात आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट वापरणारा माणूसही या चमत्कारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडतो. अफवा पसरविण्याच्या प्रक्रियेचा सक्रिय भाग बनतो. भारतीय वातावरणात वाढलेल्या कोणत्याही धर्माचा माणूस असो, त्याला दैवी चमत्काराचं प्रचंड आकर्षण वाटतं. लहानपणापासून संस्कारातूनच हे बाळकडू त्याच्या मनात ठसलं असतं. हे चमत्कार प्रत्यक्षात घडत नाहीत. म्हणून ते घडावेत असं त्याला मनोमन वाटत असतं. त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ती गरज असते. म्हणून कोणत्याही प्रकारचा चमत्कार ऐकला रे ऐकला की त्याची मुळीच शहानिशा न करता 'आपणच तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला' अशा थाटात तो सांगत सुटतो. मोबाईल, एसएमएस ही आधुनिक साधनं त्याच्या सांगण्याचा वेग वायुवेगापेक्षाही अधिक वाढवतात. निव्वळ चमत्कारापेक्षाही भयासोबत जुळलेला चमत्कार अधिक वेगानं पसरतो. तसं भारतीय समाजमन भित्रं आहे. संस्कारानं ते तसं बनलं आहे. एखादा राजा शिवाजी, महात्मा गांधी हे भय दूर करून काही काळ समाजमन निर्भय बनवून टाकतात. एरवी ते भय-प्रोन असतं. जेव्हा जेव्हा काहीतरी अरिष्ट येईल, आपण मरू या पद्धतीची भीती या चमत्कारासोबत जुळली असेल तेव्हा अफवा पसरवणारं हे मन जास्तच सक्रिय बनतं. 'भीती' ही भावना माणसाच्या मनाचा तत्काळ ताबा घेते. या भीतीच्या आहारी गेलेल्या माणसाला त्या अवस्थेत जे सांगितले जातं, जे तो ऐकतो वा त्याच्या मनात येतं ते एखाद्या प्रभावी सजेशनसारखं काम करतं. त्याला ते खरंच वाटायला लागतं आणि मग इतरांनी या आपत्तीला बळी पडू नये म्हणून तो सक्रियपणे ही भीती इतरांपर्यंत तत्परतेनं पोहोचवतो. 'रात्रभर झोपू नका, लहान मुलांनाही झोपू देऊ नका. शेजार्‍यांनाही झोपू देऊ नका. जो झोपेल तो उठणारच नाही,' हे सांगण्यामध्ये आपण इतरांचे जीव वाचवतो आहोत अशी त्याची प्रामाणिक भावना असते. अफवा पसरवणे, इतरांना घाबरवणे हा त्याचा उद्देशही नसतो आणि आपण असं काही करतो आहे याची त्याला कल्पनाही नसते. ज्या क्षणी भीती मनाचा ताबा घेते, त्या क्षणी 'लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट' घडून येतो आणि वातावरणातील अफवा त्याच्यासाठी 'सत्य घटना' बनते. तो सामान्य माणूस या काळात 'हायली सजेस्टिबल' असतो. जर कुणी नकारात्मक सजेशन्स पेरलं, 'ते तुमचा जीव घेणार आहेत, त्यांनी तुमचा, तुमच्या मुलाबाळांचा जीव घेण्याआधीच त्यांना संपवा' तर हा सामान्य माणूस त्या विशिष्ट लोकांचा जीव घ्यायला, त्याचं घर जाळायला, खून करायला पुढे सरसावतो. याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो. पण ही फिअर सायकॉलॉजी असते. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एरवी मुंगीही न मारणारा हा माणूस इतरांचे जीव घेऊन मोकळा होतो. ज्यांना हे मानसशास्त्र कळतं ते त्याचा उपयोग करून घेतात. दंगली घडवून आणतात. माणसांमधली माणुसकी उद्ध्वस्त करून टाकतात. शेजारी शेजार्‍याचा खून करतो. शेजारी शेजारील बाईवर बलात्कार करतो. माणसाचा जनावर बनतो. माणुसकीचा खून पाडतो म्हणून या अफवांकडं निरुपद्रवी अफवा म्हणून पाहू नये. त्यांना वेळीच सक्रियपणे अटकाव केलाच पाहिजे. 'श्याम की माता' प्रकरणातील अफवा आम्हाला आमच्या कार्यकत्र्यांना झपाटय़ानं आटोक्यात आणता आली. कारण त्या परिसरात आमचं सक्रिय काम आहे. पण सामान्य, भयग्रस्त माणूस अहेतूक अफवा पसरवीत असला तरी सुरुवातीस विशिष्ट हेतूनं अफवा पसरवणारा, एक स्वार्थी हेतू राखणारा हितसंबंधी वर्ग असतोच. हा जाणीवपूर्वक, फायद्यासाठी अफवा पसरवीत असतो. त्यामुळे दरवेळी पोलीस खात्यानं काळजीपूर्वक सखोल चौकशी करून अशी अफवा पसरवणार्‍यांना शोधून काढून गजाआड केलंच पाहिजे. तरच अशा अफवा पसरवणार्‍यांना खर्‍या अर्थाने अटकाव बसेल, जरब बसेल. पण या ठिकाणी आपलं पोलीस खातं फारच टची असतं. असल्या धार्मिक ठिकाणी ते बिलकूल पोलिसी डोकं वापरायला तयार नसतात. उलट अफवेपोटी उसळलेल्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी मात्र त्यांना खूप मेहनत, वेळ खर्ची घालावा लागतो. कळत नकळत बदमाशांना साथ द्यावी लागते. काही वेळेस मुद्दाम चमत्कार घडवून आणले जातात. मुंबईतील गोष्ट. एका जैन मंदिरात मूर्तीवरचं चांदीचं छत आरतीच्या वेळी हलू लागलं. प्रचंड गर्दी, प्रचंड पैसा, देणग्या ओघ सुरू झाला. संबंधित पोलीस स्टेशनची मदत मागितली. त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेतली. मी, काही पत्रकार (त्यात म.टा.चे पत्रकार सुरेश वैद्यही होते) हा चमत्कार तपासण्यास गेलो. अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा चमत्कार निर्माण केला होता. मी जयंत नारळीकरांच्या माध्यमातून त्यांनी सुचवलेल्या श्री. शर्मा नावाच्या 'अप्लाईड फिजिक्स'च्या एका शास्त्रज्ञाकडे गेलो. त्यांच्या मदतीनं आम्हाला चमत्कार कळला. आता फक्त एक छुपा जनरेटर पकडण्याची गरज होती. ते आम्हाला शक्य नव्हतं. पोलीस मदत करणार नाही हे कळत होतं. शेवटी संबंधितांना कसा चमत्कार घडवला ते जाहीर करण्याची धमकी द्यावी लागली. चमत्कार तत्काळ थांबला. पुन्हा हा चमत्कार घडवला तर रंगेहाथ पकडू अशी जाहीर धमकी दिली. गेल्या 20 वर्षांत पुन्हा असा चमत्कार घडला नाही. पण चमत्कार घडवणारे मात्र मोकळे सुटले. पण त्या मंदिराचं रिनोवेशन दिमाखात पार पडलं. यात ट्रस्टी, साधू सारेच गुंतले होते. पोलिसांनी मनात आणलं तर अशा अफवांना तत्काळ पायबंद घालण्याचं काम पोलीस खातं किती अप्रतिमरीत्या करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते फारसं कुणाला माहीत नाही. म्हणून मुद्दाम सांगतो. गणपती दूध प्यायला लागले. तो दिवस आठवत असेल. रात्रभर प्रवास करून नागपूरहून मुंबईला नॉनस्टॉप पहाटे कारने पोहोचलो. झोपलो. सकाळी 6 वाजता फोन खणखणला. दिल्लीच्या टीव्हीच्या प्रतिनिधीचा फोन. 'तुम्हाला 7 च्या विमानानं दिल्लीत यायचं आहे. दिल्लीत रात्रभर ठिकठिकाणच्या मंदिरातील देवांच्या मूर्ती दूध पीत आहेत ते तपासायचं आहे.' कसंबसं, थोडय़ा वेळात संपर्क साधतो असं सांगून झोपलो. खूप थकलो होतो. पण थोडय़ा वेळानंतर सारखा फोन खणखणू लागला. झोपूच देईना म्हणून उचलला. एकदम करडा आवाज, 'एवढा वेळ फोन वाजतो. तासभर झाला. उचलत का नाही? बोला.. कमिश्नर साहेबांना बोलायचे आहे.' मुंबईचे अँडिशनल कमिश्नर पी.के.बी. चक्रवर्ती बोलू लागले, 'काय मानव साहेब तुम्ही झोपता आहात.' मुंबईत सगळय़ा मंदिरात रांगा लागल्या आहेत. आम्हाला भीती वाटते.. कुणी तरी मुद्दाम अफवा पसरवतो आहे. मंदिरात गर्दी गोळा करायची आणि बॉम्बस्फोट घडवायचे असं प्लॅनिंग असावं म्हणून रेड अँलर्ट घोषित केला आहे. गणपती दूध पितो हे प्रकरण तपासायचं आहे. माझ्या अधिकार्‍याकडे देतो त्यांना मदत करा.'

प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. खडबडून जागा झालो. फोनवरच आमचं काम सुरू झालं. मी विचारलं मूर्ती बदलवल्या का?' ' नाही. जुन्याच मूर्ती आहेत. बहुदा सार्‍या संगमरमरी.' पोलीस अधिकार्‍याने माहिती दिली. माझं काम सोपं झालं. मी सूचना दिली, 'पुजार्‍याच्या हातून मूर्ती पुसून घ्या. निर्माल्य वगैरे काढून टाका. देव्हारा कोरडा करा. मूर्तीजवळ लेडीज कॉन्स्टेबल उभ्या करा. रांगेतील लोकांना दूध पाजताना चमचा वाकडा करू देऊ नका. थोडा वेळ तरी लोक वाकडा करतील. त्याशिवाय दूध ओघळणार नाही. 25-50 लोकांनी दूध पाजलं की खाली गाभार्‍यातील दूध स्पंजने गोळा करा. बादलीमध्ये सगळय़ा भक्तांसमोर स्पंज पिळा. बादलीत दूध गोळा होईल.' खरं म्हणजे माझं म्हणणं त्या पोलीस अधिकार्‍याला पटलं नाही. त्याच्या बायकोच्या हातानेही गणपती दूध प्यायला होता. प्रत्यक्ष डोळय़ानं पाहिलं होतं. त्यानं तसं बोलूनही दाखवलं. पण साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी माझी सूचना अमलात आणायची ठरवली. नाईलाजास्तव. तासभरातच या अधिकार्‍यानं खूप उत्साही आवाजात फोन केला, ''मानव साहेब, दहा-एक मंदिरात प्रयोग केला. बादलीत दूध गोळा होतंय. खरंच गणपती दूध पीत नाही.'' असे बोर्ड लावता येईल का याची आम्ही चर्चा केली. 12 नंतर अनेक ठिकाणी बोर्ड लागले. मंदिरामंदिरात पोलीस स्पंजने दूध गोळा करत होते. किमान 15-20 लाख लोकांना मंदिरात ओढून आणणार्‍या अफवेला पोलिसांनी अथक परिश्रमाने, सक्रियतेने अवघ्या 8-10 तासात थिजवलं होतं. थांबवलं होतं. संध्याकाळच्या बातम्यात प्रसिद्ध झालं- ''मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरचा गणपती दूध प्यायला.'' पोलिसांचा पुन्हा फोन, ''मानव साहेब, गणपती दूध पीत नाही, असं तुमच्या संघटनेच्या वतीने स्टेटमेंट काढा.'' ''मी म्हणालो, 'हा चमत्कार पोलिसांनी थांबवला आहे. पोलीस कमिश्नरने वा गृहमंर्त्याने स्टेटमेंट काढलं पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करा. नाहीतर मी गृहमंर्त्यांशी बोलतो. पोलिसांना स्टेटमेंट काढणं योग्य वाटत नव्हतं. कारण मुख्यमंत्री स्वत: या चमत्काराचं समर्थन करत होते. तसं वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या टीव्हीवरून केलं होतं. पण हे स्टेटमेंट काऊंटर करणं आवश्यक होतं. उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथजी मुंडे हे गृहमंत्री असल्यामुळे मुंबईत रेड अँलर्ट घोषित झाल्यामुळं सार्‍या प्रकारावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची नीट कल्पना असायला हवी होती. पण मित्रपक्षाच्या मुख्यमंर्त्यांचं स्टेटमेंट काऊंटर करण्याची रिस्क उपमुख्यमंत्री घेतील का? अशी शंका पोलीस अधिकार्‍यांना आणि मलाही वाटत होती. त्यांच्याशी त्यावेळी माझी वैयक्तिक ओळख नव्हती. जयप्रकाश आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेले प्रमोद महाजन यांची मदत मिळू शकली असती. पण.. त्याची गरज पडली नाही. काही तासातच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांचं स्टेटमेंट टीव्हीवरून प्रसारित झालं. 'पोलिसांनी ठिकठिकाणी मंदिरात दूध गोळा केलं. दूध गाभार्‍यात जमा होत होतं, गणपती दूध पीत नाही.'

आम्हा सार्‍यांचा जीव भांडय़ात पडला. पोलिसांच्या अथक परिश्रमाचं चीज झालं होतं. आजही मूर्ती दूध पिते आहे. डोळय़ातून अश्रू येताहेत अशा अफवा अधूनमधून पसरतात. पोलिसांनी ठरवलं तर ते किती प्रभावीपणे अशा दैवी वलय असणार्‍या अफवांनाही अटकाव करू शकतात याचा हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता. पण मुंबई पोलिसांचाही तारीफ के काबील कामगिरी त्यावेळी फारशी जनतेला कळू शकली नव्हती, हेही सत्य आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी 9371014832

'महाड सत्याग्रह' : राजकीय की सामाजिक?


महाडच्या चवदार तळय़ाचा सत्याग्रह हा सामाजिक होता, असेच आपण आजपर्यंत मानत आलो आहोत, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरी हा प्रश्न? अंगवळणी पडलेल्या आणि श्रद्धेय गोष्टींची चिकित्सा करणे जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही व्यक्तीला मुळीच आवडत नसते. जोपर्यंत एखादी अंगवळणी पडलेली गोष्ट आचरणात आणताना त्याची सुरक्षितता धोक्यात येत नाही अथवा श्रद्धेय गोष्टी पाळताना त्याला धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत तो अशी चिकित्सा करायला कधीच तयार नसतो.

60 प्रवासी घेऊन वाहतूक करणार्‍या कंडक्टर-ड्रायव्हरच्या हाती गाडीचे ब्रेक असतात. त्यामुळे तो प्रवाशांच्या इच्छेने नाही तर स्वत:च्या मर्जीप्रमाणे आपली बस कुठेही थांबवू शकतो. स्वातंर्त्य मिळाल्यानंतरही निजामी प्रदेशात, विदर्भात बसची खाजगी वाहतूक होती. एकदा मी माझ्या कुटुंबासह उनकेश्वर ते माहूर असा प्रवास करीत होतो. रस्त्यात वाईबाजार नावाचे गाव लागते. वेळ सायंकाळी साडेपाचसहाची होती. माहूर तिथून फार तर तासाभराच्या अंतरावर होते. बस वाईबाजार या गावात आली. सर्व प्रवासी उतरले. न उतरणार्‍यांपैकी मी आणि माझे कुटुंबीय तेवढे होतो. मला वाटले बहुधा वाईची माणसे उतरून गेली. आता माहूरची माणसे चढतील. पंधरा मिनिटे गेली, अर्धा तास गेला; पण बस एकाच जागी उभी. मी बसखाली उतरून ड्रायव्हर , कंडक्टरचा शोध घेऊ लागलो तर तेही कुठे दिसेनात. दीड तास झाला तरी बस एकाच जागी उभी. अखेर चौकशी केल्यावर कळले की, आज बाजारचा दिवस असल्यामुळे कंडक्टर ड्रायव्हर सिनेमा पाहायला गेले आहेत. आता रागवायचं तरी कुणावर आणि भांडायचं तरी कुणाशी? अखेर सिनेमा संपल्यावर कंडक्टर ड्रायव्हर आले आणि एकदाची बस मार्गी लागली. आज जर कंडक्टर ड्रायव्हर असं वागतो म्हणाले तर? त्यांना माहितंय त्यांची नोकरी जाईल. म्हणून हवी तेव्हा आणि वाटेल तिथे बस थांबवण्याचा हक्क अंगवळणी पडलेले कंडक्टर ड्रायव्हर आपली नोकरी जाईल, ही भीती निर्माण होताच, हा हक्क योग्य आहे की नाही याची चर्चा करायला तयार होतात. ही झाली अंगवळणी पडलेली गोष्ट. रस्त्यात हवे तिथे थुंकणे, रस्त्यावर खड्डे करून मंडप टाकणे, स्लीपर क्लासमध्ये झोपेची वेळ असली तरी अन्य प्रवाशांचा विचार न करता जोरजोरात गप्पा मारणे अशा अनेक गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की, आपला तो जणू हक्क आहे,असे समजूनच आपण वागत असतो.

हेच आपण श्रद्धेच्या बाबतही बोलू शकतो. अस्पृश्यांना मंदिरात येऊ न देणे, सार्वजनिक पाणवठय़ावर पाणी भरू न देणे ही धार्मिक बाब आहे, अशी आपली समजूत होती. त्यामुळे या श्रद्धेवर कुणी आघात केला तर आपण त्याला देहदंड देत असू. मुलामुलींची लग्ने कोणत्या वयात करावीत, याचा अधिकार संपूर्णपणे त्यात्या जातीसमूहाला होता. त्यामुळे त्यात कुणी हस्तक्षेप केला तर आम्हाला मुळीच खपत नसे. आजचा 'ऑनर किलिंग'चा मुद्दा असाच श्रद्धेचा मुद्दा आहे.

जोपर्यंत अंगवळणी पडलेल्या गोष्टींना अथवा श्रद्धेय गोष्टींना समूहाच्या अथवा राजकीय सत्तेचे संरक्षण असते,तोपर्यंत अशा गोष्टींची चिकित्सा करणे, अशा गोष्टी योग्य आहेत किंवा नाही हे ठरवणे, चर्चा करणे याची कुणालाच आवश्यकता वाटत नसते. निजामीच्या काळात गणपतीची मिरवणूक नेताना रस्त्यात मशीद लागली तर आवाज करायचा नाही. हा कायदा नव्हता;पण ही अंगवळणी पडलेली समजूत होती. त्यामुळे हिंदूंची संख्या या प्रदेशात 85 टक्के असली तरी मिरवणूक मशिदीजवळ आली की घोषणा, बॅण्डबाजे यांचे आवाज शांत होत असत.

नांदेड शहरात गुरू गोविंदसिंघांची समाधी आहे. या देवस्थानाला गुरुद्वारा म्हणतात. या गुरुद्वारा रस्त्यावर कुणीही तंबाखू खात नाही की सिगारेट ओढत नाही. कारण शीख धर्मात तंबाखू खाणे अथवा सिगारेट ओढणे या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. एक प्रसंग मला आठवतो. एक गृहस्थ या रस्त्यावरून सिगारेट ओढत चालला होता. बहुधा त्याला गुरुद्वारा पाहायचा होता; पण त्याला तो स्थानिक नियम माहीत नव्हता. त्याचं ते सिगारेट ओढत रस्त्यानं जाणं पाहून एका सरदारजीचा माथा खवळला. त्यानं मागून जाऊन त्याच्या पेकाटात एवढय़ा जोरात लाथ घातली की, तो आडवातिडवा होऊन रस्त्यावर खाली कोसळला; पण त्याला अशी लाथ का घातली हे विचारण्याची हिंमत मात्र कुणी दाखवली नाही. खरे तर तो रस्ता नगरपालिकेच्या मालकीचा होता; पण वर्दळ मात्र समाधीदर्शन घेणारांची असल्यामुळे त्या रस्त्यावर सिगारेट न ओढणे हीच सर्वाची श्रद्धा होती. रेल्वेत, बसमध्ये, प्लॅटफार्मवर सिगारेट ओढण्याला मज्जाव नसल्यामुळे अथवा त्या आड कुठलीही धार्मिक भावना अडसर ठरत नसल्यामुळे तिथे आपण बिनदिक्कतपणे सिगारेट ओढण्याचा आपला हक्क बजावू शकतो.

जोपर्यंत आपल्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी अथवा श्रद्धेय गोष्टी पाळताना आपली सुरक्षितता धोक्यात येत नाही. तोपर्यंत आपण बिनदिक्कतपणे त्या गोष्टी अमलात आणतो; पण जेव्हा श्रद्धा अथवा अंगवळणी पडलेल्या गोष्टी इतरांना अडचण निर्माण करू लागतात, तेव्हा समूह चिकित्सा करायला अथवा काय बरेवाईट आहे, याची चर्चा करायला तयार होतो आणि आपले हक्क जपण्यासाठी सत्तेचा वापर करू लागतो. कार्यालयीन वेळ असली तरी नमाज पडायला जाण्यावर बंदी नव्हती, अशा त्या काळात मुस्लिम नागरिक साहेबांना न विचारता निघून जात. तो त्यांचा हक्क होता; पण परिस्थिती बदलली. आता असे जाता येत नाही. जेव्हा रूढी अथवा श्रद्धा इतरांच्या हक्कांची पायमल्ली करू लागतात आणि दोन्ही गट तुल्यबळ असतात तेव्हा तह करणे, वाटाघाटी करणे याशिवाय अन्य पर्यायच उरत नाही.

हिंदू म्हणवून घेणार्‍या प्रत्येकालाच मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. श्रद्धेच्या अथवा रूढीच्या नावाखाली तुम्ही तो डावलू शकत नाही, अशी भूमिका घेत दोन तुल्यबळ गट जेव्हा परस्परविरोधी उभे राहिले तेव्हा भांडण मिटवायचे कसे? काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाच वर्षे चालला. तर पंढरपूर मंदिराच्या प्रवेशासाठी गांधींनी मध्यस्थी केल्यानंतरही साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण सोडण्यास विनम्र नकार दिला. कायदा पाळावा तर धर्म बुडतो आणि धर्म राखावा तर हिंदू म्हणवून घेणार्‍या एका फार मोठय़ा समुदायाला मंदिर प्रवेशाचा हक्क नाकारावा लागतो. अशा संघर्षातून मग काही वाटाघाटी होतात, तह होतात आणि भांडण मिटवले जाते. आज तुम्ही कुठल्याही मंदिरात जा. प्रत्यक्ष मूर्तीपासून काही अंतरावर दानपेटींच्या अलीकडे गजांचा कठडा आढळून येईल. त्यामुळे सर्वाना दर्शन घेण्याची सोय झाली आणि धर्माचे पाविर्त्यही राखले गेले. कोणे एकेकाळी प्रसिद्ध अभ्यासक सोनोपंत दांडेकरांचा दांडा असेच या कठडय़ाबद्दल म्हटले जाई. एवढे अंतर राखून दर्शन घ्यावे ही सूचना सोनोपंत दांडेकरांची होती आणि आज जवळपास सर्वच मंदिरांत याच दांडा पद्धतीचे अनुकरण केले जाते.

खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा परस्परविरोधी श्रद्धा अथवा रूढी पाळणारे एकाच प्रदेशातले जाणीव जागृती झालेले लोक एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात तेव्हा काय करावे? अशा पळवाटा काढून तडजोडी कराव्यात की अन्य एखाद्या मार्गाचा अवलंब करावा? इ.स. 1789 मध्ये फ्रान्समध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली. एका प्रचंड सभेत फ्रान्समधल्या जनतेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यात जी कलमे होती, त्यातले एक कलम होते : 'सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाची राहतील.' 'दुसरे कलम होते वरील जन्मसिद्ध हक्क कायम राहावेत हाच राजकारणाचा अंतिम हेतू असला पाहिजे,' 'अखिल प्रजा ही सर्वाधिकारांची मायभूमी आहे. म्हणून धर्म अथवा राजकारणाच्या आधारावर हे व्यक्तीचे अथवा समुदायाचे अधिकार कुणालाही नाकारता येणार नाहीत, हे तिसरे कलम होते.' यासाठी कायदा हवा, तो तयार करण्याचा अधिकार जनतेला अथवा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीला हवा आणि या कायद्याचा पाया समता असायला हवी, ही त्यापुढची कलमे होती. याच जाहीरनाम्याच्या आधारे पुढे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. फ्रान्सचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून युरोपातली अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली.

हे सर्व सांगण्याचा हेतू एकच आहे. 1927 च्या महाडच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच कलमांचा उच्चार करीत 'मनुस्मृतिदहन' केले.मग ही घटना राजकीय क्रांतीचा आरंभ नसून, ती केवळ समाजसुधारणेची बाब आहे, असे सगळेच का म्हणतात?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी

विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

Sunday 21 October 2012

मेडिटेशन, माईंड पॉवरच्या नावे होते फसवणूक


''सर, गेले अनेक दिवस मी संमोहनात सूचना देते आहे, पण मला अजून रिझल्टस् मिळतच नाहीत.'' एका मुलीचा फोनवरून आवाज आला.

''किती दिवस झालेत? केव्हा कार्यशाळा केली?'' मी. ''सर, 15 दिवसांपूर्वी सातार्‍यात मी तुमची कार्यशाळा केली. 15 दिवस सूचना देते आहे,'' मुलगी.

''पण मी महिनाभर कंपलसरी सीडीवर संमोहन-सराव करायला सांगितला होता ना? नंतरच टार्गेट निवडून सूचना द्यायच्या होत्या नां?'' मी.

''हो पण, मला इमर्जन्सी होती म्हणून मी त्वरित स्वतंत्र सूचना द्यायला सुरुवात केली,'' मुलगी.

''बरं ठीक आहे, पण 15 दिवसांतच तुला अपेक्षित रिझल्टस् मिळतील असं तुला कुणी सांगितलं? मी तर तसं सांगितलं नव्हतं नां? बरं काय सूचना देते आहेस?'' मी.

''सर, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे, पण तो माझ्याकडे लक्षच देत नाही. गेले 15 दिवस संमोहनात सूचना देते आहे.. माझ्याकडे पाहा, लक्ष दे, माझ्यावर प्रेम कर, खूप खूप प्रेम कर... पण सर तो साधं वळूनसुद्धा पाहत नाही.,'' मुलगी.

मी उडालोच. माझा विश्वासच बसेना? माझ्या कार्यशाळेत शिकलेली एखादी विद्यार्थिनी असा प्रश्न विचारू शकते? असा विचार करू शकते?

मला राहावलं नाही, मी विचारलंच, ''का गं नक्की तू माझ्याच कार्यशाळेत शिकलीस नां? पाचही दिवस पूर्ण वेळ उपस्थित होती नां?''

''हो सर, पाचही दिवस, पूर्ण वेळ, तुमच्यासमोरच पहिल्या रांगेत बसली होती.''

''या पाच दिवसांत कधीतरी, असं दुसर्‍याचं नाव घेऊन अथवा त्याची प्रतिमा पाहून दुसर्‍याला अशा सूचना देऊन काही परिणाम साधता येतो असं मी शिकवलं का? सांगितलं का?''

''नाही सर, तुम्ही नाही सांगितलं. उलट असं काही करता येत नाही असंच तुम्ही सांगितलं, पण मला माहीत आहे नां! संमोहनात जाऊन अशा सूचना दिल्या की परिणाम मिळतो,'' मुलगी.

''तुला कसं माहीत?'' मी.

''तुमच्या आधी सातार्‍यात एक संमोहनतज्ज्ञ आले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं व्याख्यान झालं. मी गेले होते व्याख्यानाला. त्यांनी काही संमोहनाचे प्रयोगही करून दाखवले होते. त्या वेळी त्यांनी सांगितलं होतं. आपण संमोहनात जशा सूचना देऊ तसा दुसर्‍यांवर परिणाम होतो. आपल्या इच्छेनुसार घडतं.''

''मग तू त्यांची शाळा न करता माझ्या कार्यशाळेत कशी आलीस?'' मी.

''त्यांचं व्याख्यान मला प्रभावी वाटलं नाही. तुमचं जास्त प्रभावी वाटलं. म्हणून मी तुमच्या कार्यशाळेला आले होते.''

''तू जे ऐकलंस वा तुला जे वाटतं तो तुझा गैरसमज आहे. आपण स्वत: संमोहनात जाऊन स्वत:ला सूचना देतो, वारंवार सूचना देतो. त्या आपल्या मेंदूत ठसतात, इंप्रिंट होतात. त्यानुसार आपली नवी सवय निर्माण होऊ शकते. आपला स्वभाव बदलू शकतो. आपली वर्तणूक बदलू शकते. आपल्यात बदल होऊ शकतो. पण आपण संमोहनात जाऊन दुसर्‍याची प्रतिमा डोळ्यांपुढे ठेवून कितीही सूचना दिल्या. हजारो-लाखो वेळा सूचना दिल्या तरी त्याचा त्या दुसर्‍या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही, होणं शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, गैरसमजूत आहे.''

दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट. पण तेव्हापासून सातत्यानं या प्रकारच्या प्रश्नांना, अंधश्रद्धांना मला तोंड द्यावं लागत आहे.

1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा' मुंबईतून सुरू केल्या तेव्हाही मला सातत्यानं या प्रकारच्या अंधश्रद्धांशी, समजुतींशी सारखी लढाई करावी लागली.

संमोहन म्हणजे दुसर्‍याला वश करण्याचं, मोहित करण्याचं तंत्र अशीच समजूत होती. त्यामुळं सुरुवातीला काही वर्षे मोठय़ा संख्येनं पुरुष शिकण्यास येत असत, पण स्त्रियांची संख्या मात्र नगण्य, अल्प असे. माझे अनेक विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी म्हणत असत- ''सर, तुम्ही संमोहन न म्हणता या विषयाला मेडिटेशन म्हणा! जर दोन्ही अवस्था एकच आहेत, अल्फा रिदमच् आहेत, तर मेडिटेशन म्हणायला काय हरकत आहे? त्यामुळं सहभागींची संख्या वाढेल. मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळेल. स्त्रियाही मोठय़ा संख्येनं येऊ शकतील. एक चांगला, महत्त्वाचा विषय सगळ्यांना नीट आत्मसात करता येईल.''

मला कळत होतं. मेडिटेशन म्हटलं तर माझं काम जास्त सोपं होणार आहे. पण हा खोटेपणा झाला असता. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे मी शिकवतो ते मेडिटेशन नव्हतं. कारण भारतीय परंपरागत मेडिटेशनमध्ये, अल्फा रिद्मच्या अवस्थेत म्हणजे मेडिटेशनच्या अवस्थेत सूचना द्यायच्या नसतात. उलट आतलं सगळं मूळ आत्मास्वरूप बाहेर येऊ द्यावं अशी अपेक्षा असते. दुसरं मेडिटेशन हे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात वापरलं जात असल्यामुळं त्यासोबत त्या त्या कल्टसंबंधीच्या अनेक अंधश्रद्धा जुळल्या आहेत. त्यांचीही सफाई मला करत बसावी लागली असती. शिवाय मी कुणी श्री श्री, बाबा, महाराज नसल्यामुळं आणि तसं दुरान्वयानंही बनायचं नसल्यामुळं मेडिटेशन शब्द न वापरताच संमोहन शब्द वापरूनच कार्यशाळा चालवायचं ठरवलं. त्यासाठी महाराष्ट्रभर हजारो विनामूल्य व्याख्यानं आयोजित करून लाखो लोकांच्या मनातील 'संमोहन' या विषयासंबंधीचे गैरसमज दूर केले, भीती, अंधश्रद्धा दूर केल्यात.

माझ्या आधी फक्त एक-दोघं जण संमोहनाचे स्टेज प्रोग्राम्स घेत असत. संमोहनात टाकून सूचना देत असत. त्यांनीही पुढे कार्यशाळा सुरू केल्या. त्या कार्यशाळेतही ते संमोहनात टाकून सूचना देणं आणि संमोहन प्रयोग करणं एवढंच करायचे. त्याचा 'व्यक्तिमत्त्व विकास' वगैरेशी फारसा संबंध नसे. त्यांच्या कामातूनही संमोहनासंबंधी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसारित होत असत. पण मी ठरवलं होतं उगाच टीका करत बसण्यापेक्षा आपण या विषयासंबंधी विधायक प्रबोधन करत जायचं आणि तेच इतकी वर्षे करत आलो.

मोठय़ा प्रमाणावर मेडिटेशनच्या नावाखाली संमोहनाचा वापर अलीकडच्या काळात केला जाऊ लागला आहे, पण त्याची सुरुवात बर्‍याच वर्षापूर्वी सुरू झाली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक कल्टने डायरेक्ट संमोहनाचा वापर मेडिटेशनच्या नावाखाली करायला फार पूर्वीच सुरुवात केली. त्यामुळं ही कल्ट खूप वाढली. संमोहनासारखं प्रभावी हत्यार वापरून ही कल्ट त्यांच्या साधकांचं पार ब्रेनवॉशिंग करून टाकतं.

दुसरं उदाहरण निर्मला माताचं. त्यांनीही सक्रियपणे संमोहनाचा वापर 'सहजयोगाच्या', मेडिटेशनच्या नावाखाली केला आहे.

या दोन्ही कल्टबद्दल, त्यांच्या ब्रेनवॉशिंगबद्दल पुढच्या लेखांमध्ये आपण विस्तारानं पाहू.

पण सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली चालणार्‍या ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून संमोहन वा मेडिटेशनच्या नावाखाली चालणार्‍या बदमाशीविरुद्ध लक्ष केंद्रित करू.

आपण आपली 'माईंड पॉवर' वापरून काहीही करू शकतो, असा दावा अनेक ट्रेनर करतात. त्यासाठी सुरुवातीला आपल्या विनामूल्य कार्यक्रमात अनेक सक्सेस स्टोरी दाखवतात. एखाद्या अपंगाचं यश, पाय नसलेला माणूस जिद्दीनं उभा कसा राहिला, सचिन तेंडुलकर, अंबानी, अमिताभ बच्चनपासून अनेक लोक कसे यशस्वी झाले. या सक्सेस स्टोरी सांगताना त्यांच्या 'माईंड पॉवर'मुळं ते यशस्वी झालेत असा आभास निर्माण केला जातो आणि मग आमच्या कार्यशाळेत या, आपली 'माईंड पॉवर' वापरा आणि सहजतेनं यशस्वी व्हा! असा उघड संदेश दिला जातो.

'माईंड पॉवर'चं स्पष्टीकरण देताना काय सांगतात? आपण एखादी प्रबळ इच्छा केली, विल पॉवर वापरली, पुन्हापुन्हा हे घडावं अशी इच्छा धरली की, ती इच्छा फलद्रूप होते, प्रत्यक्षात येते.

संमोहनात, मेडिटेशनमध्ये जाऊन एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा केली, तसं घडताना चलचित्र पाहिलं, व्हिज्युअलाईज केलं की तसं खरंच घडतं, असं सांगितलं जातं.

थोडक्यात एखाद्यानं संमोहनात वा मेडिटेशनमध्ये जाऊन स्वत:ला सांगितलं, पाहिलं, ''मोठ्ठा इंडस्ट्रियालिस्ट झालो. मोठ्ठा कारखानदार झालो. (वा होतो आहे).''

असं रोज करत गेलं तर तो एक दिवस अंबानी सारखा इंडस्ट्रियालिस्ट बनेल.

एखाद्यानं ''मी मोठा नट बनतो आहे. अमिताभसारखा यशस्वी नट, हिरो बनतो आहे.,'' अशी प्रबळ इच्छा धरली, वारंवार इच्छा धरली तर तो खरंच मोठा, यशस्वी नट बनेल.

एखाद्यानं प्रबळ विल पॉवर वापरली तर त्याला बंगला, कारसुद्धा माईंड पॉवरमुळं प्राप्त होईल.

हे असले 'माईंड पॉवर'चे दावे करणारे खूप भोंदू निर्माण झाले आहेत. अहमदाबादचा 'माईंड पॉवर ट्रेनर' स्नेह देसाई आणि महाराष्ट्रातला देसाईची काळी डुप्लिकेट म्हणजे 'कार्बन कॉपी' दत्ता घोडे यांच्याविषयी आधी लिहिलंच आहे. हे दोघेही महाठग आहेत. त्यांच्या 'थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपथी' या दाव्यांना आपण जाहीर आव्हान टाकलंच आहे. त्यांनी पळ काढला म्हणून नागपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार गुदरलीच आहे.

पण इतरही सगळ्या खोटे दावे करणार्‍या 'माईंड पॉवर'वाल्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं भांडाफोड करणारच आहोत.

माझा साधा प्रश्न आहे. भारतातल्या किमान पाच कोटी तरुणांना कॅटरिना कैफ वा करिना कपूर हवी आहे. अडीच, अडीच कोटी तरुणांनी जर यापैकी एकीला प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेतला, मन एकाग्र केलं, व्हिज्युअलाईज केलं तर अडीच कोटी लोकांना करिना आणि इतर अडीच कोटींना कॅटरिना प्राप्त होईल का? करिना-कॅटरिनाची हाडं तरी पुरतील का? अडीच कोटी तरुणांना हे शक्य आहे? मग माईंड पॉवर काय आहे?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

Thursday 18 October 2012

जोडधंदा सांगणारा गोरखधंदा


कष्ट करणार्‍यांनाच सांगितले जाते 'आराम हराम है.' आराम करणार्‍या हराम्यांसाठी हा संदेश नसते. आयुष्यभर श्रम करणार्‍यांसाठीच सांगितल्या जाते 'श्रमदान' कर. आयुष्यभर श्रम करणार्‍यांच्या श्रमात अधिक भर, पण ज्याने श्रम केले नाही त्याला 'श्रमदान' कर असे कोणी सांगत नाही. तो आयुष्यभर संपत्तीचे दान करत नाही आणि श्रमदानही करत नाही. किंवा 'श्रमदान' कर असे त्याला कोणी म्हणतही नाही आणि तशी कोणाची हिंमतही नाही. गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचेही तसेच. सर्व घाण खेडय़ातच आहे. ती त्यांनी केली असल्यामुळे त्यांनीच साफ केली पाहिजे. त्यासाठी मग स्वच्छता अभियान. खेडय़ातली घाण खेडय़ातली माणसं करतात म्हणून ती त्यांनीच साफ केली पाहिजे. मग शहरातली घाण कोण करतं? शहरातलेच निवासी की अनिवासी? आणि शहरातलेच निवासी ती घाण करीत असतील तर ती घाण त्यांनीच साफ करावी. यासाठी एखादे अभियान का सुरू होत नाही? खेडय़ातली घाण साफ करण्यासाठी कष्टाने पार पिचून गेलेल्या माणसानेच हातात झाडू घ्यावा ही अपेक्षा. पण शहरातल्या माणसांची घाण मात्र त्याने साफ न करता नगरपालिका वा महानगर पालिकेने साफ करावी. शहरातल्या माणसाला स्वच्छतेचा नेट लागता कामा नये. पण तोच माणूस खेडय़ातला असेल तर त्याने त्याचे कष्ट तर करावे, पण त्याच्या कष्टात अधिक भर म्हणून त्यानेच केलेली घाण त्यानेच साफ करावी. त्यासाठी गाडगेबाबा स्वच्छता अभियान. गाडगेबाबांचा 'झाडू' द्यायचा खेडय़ांच्या हातात, पण शहरामध्ये हाच झाडू द्यायचा नगरपालिका किंवा महानगर पालिकांच्या हातात. यात काही गडबड तर नाही? यात काही आपण भेदनीती वापरतो, ही बाब समानतेच्या मूल्यांना धरून नाही असे न्याय, समता, बंधुता या मूल्यांचा जप करणार्‍यांना तरी वाटते का? आणि वाटत नसेल तर का वाटत नाही?

खेडय़ातील माणसांसाठीच 'आराम हराम है.' हराम्यांसाठी नाही. श्रम करणार्‍यांसाठी अतिरिक्त श्रमदानाचा मंत्र, पण श्रम न करणार्‍यांसाठी यातूनही सूट. त्याचे शरीर वा कपडे घामाने भिजता कामा नये. घाम गाळणार्‍यांनी तो अधिक गाळावा, पण कामचोरांसाठी श्रमदान नाही. कष्ट करणार्‍यांनी त्यांची स्वच्छता त्यांनीच ठेवावी त्यासाठी गाडगेबाबांच्या नावाचा वापर करून 'ग्राम स्वच्छता' अभियान राबवावे, पण शहरातील स्वच्छतेचा भार शहरवासीयांवर न टाकता तो भार मात्र नगरपालिका किंवा महानगर पालिकांनी उचलावा असे का? जॉर्ज ऑरवेलच्या पुस्तकात डुकरांनी स्थापन केलेल्या लोकशाहीत प्रथम 'ऑल आर इक्वल' म्हणून संविधानात लिहिले जाते, पण नंतर संविधानात घटना दुरुस्ती करून 'ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वील' असे सांगितले जाते. अशातला तर हा प्रकार नाही?

यातच भर म्हणून की काय जेव्हा कर्मचारी, कामगार पगारात वाढ मागतो तेव्हा एकतर ती दिली जाते किंवा नाकारल्या जाते. आमच्या पगारात आमचे भागत नाही म्हणून वेतनवाढ मागितल्या जाते. त्यासाठी संप, मोर्चे, निदर्शने होतात. ती बहुतांश यशस्वी तर कधी क्वचित अपयशी ठरतात. पण कधीही केव्हाही आणि कोणीही त्यांना असे म्हटल्याचे ऐकिवात आहे का? तुम्हाला तुमचे वेतन परवडत नसेल, तुमच्या पगारात तुमचे भागत नसेल, तर यापुढे तुम्हाला वेतनवाढ मिळणार नाही. वाटल्यास तुम्ही जोडधंदे करा.

पहिल्या वेतन आयोगानंतर असे म्हटल्या गेले नाही. स्वातंर्त्याच्या 64 वर्षात सहा वेतन आयोग आले. पाचव्या वेतन आयोगाच्या पगार वाढीनंतर तर शासनाचे कंबरडे मोडायला आले होते. तेव्हाही कोणी यापुढे तुमचे वेतन वाढणार नाही, तुमचे तुमच्या पगारात भागत नसेल तर 'जोडधंदे' करा, असा सल्ला देत यापुढे सहावे वेतन आयोग येणार नाही. आले तरी तुमची पगारवाढ होणार नाही. पगारवाढ सुचविल्या गेली तरी सहाव्या वेतन आयोगाची आम्ही अंमलबजावणी करणार नाही, असे ठणकावून सांगणारा कोणी 'मायचा लाल' अजून पैदा झाला नाही. यापुढे वेतनवाढ नाही. पगार अपुराच पडत असेल तर 'जोडधंदे' करा असे सांगणारा 'जाणता राजा'ही पैदा झाला नाही. पण हीच गोष्ट शेतकर्‍यांनी म्हटली. तुम्ही देता ते शेतीमालाचे भाव आम्हाला परवडत नाही. त्या भावामधून आम्ही केलेला खर्चही भरून निघत नाही. तेव्हा शेतीमालाचे भाव वाढवून द्या. असे म्हणताच 'तुम्हाला शेतीमालाचे भाव परवडत नसेल तर भाव वाढवून मागण्यापेक्षा तुम्ही 'जोडधंदे' करा' असे म्हणणार्‍या जाणत्या राज्यांची पैदास मात्र डुकरांच्या पिलासारखीच बुचुबुचु आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा ते लोकसभा येथे ही पिलावळ तयार होऊन शेतकर्‍यांना 'जोडधंदे' करा असा शहाजोगी सल्ला देत असतात.

परत येथेही शेतीमधले आधीच कष्ट अधिक, परत त्यात 'जोडधंद्या'चा अतिरिक्त भार टाकल्या जातो. हा भार थोडाबहुत कर्मचार्‍यांवर ढकलावा. त्यांनाही म्हणावे, यापुढे पगारात भागत नसेल तर पगारवाढ मिळणार नाही. महागाईने होरपळून निघत असाल तरीही महागाई भत्त्यात वाढ नाही, बोनस नाही, भरपगारी सुट्टय़ा नाही. आहे त्याच पगारात भागवा आणि भागतच नसेल तर 'जोडधंदे' करा. बकर्‍या, काेंबडय़ा, गाई, म्हशी, पांढरे ससे, करडे ससे, डुक्कर (त्यातही काळे अथवा पांढरे हे 'ऑप्शन' त्यांच्यासाठी राहू द्या) नाहीच काही तर त्यांना मधुमख्खी पालन करायला सांगा. आता यात एक अडचण येऊ शकते. कोणी म्हणेल त्यांना 'जोडधंदे' करण्यासाठी शहरात, महानगरात जागा कशी मिळेल? यावरही तोडगा निघू शकतो. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, आमदार, खासदार, आमदार निवास, राज्यपाल भवन, राष्ट्रपती भवन, कृषी विद्यापीठांच्या पडीत जमिनी, बर्‍याच ठिकाणी एमआयडीसीच्या नावाचे फक्त फलक आहेत पण त्या सर्व जागा रिकाम्या आहेत अशा रिकाम्या जागांवर कर्मचार्‍यांच्या गुराढोरांचे वास्तव्य होऊ शकते. जिल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान थोडेबहुत कर्मचार्‍यांच्या गुराढोरांच्या निवासस्थानासाठी उपयोगात आले तर बिघडले कोठे? शेतकर्‍यांनी भाव मागितला, त्यांना थोडीबहुत कर्ज दिल्या गेली तर देशाच्या तिजोरीचे काय होणार? ती अशाच प्रकारे लुटल्या जाणार का? शेतकर्‍यांना भाव वाढवून दिले तर चलनवाढ होणार नाही का? मुद्रास्फिती, भाववाढ होणार नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. पण पाचव्या वेतन आयोगानेच कंबरडे मोडलेल्या शासनाने न कुरकुरता सहावे वेतन आयोग लागू केले.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अजूनही 70 टक्के लोक शेतीवरच जगतात. शेती उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी. जय जवान जय किसान, शेतकरी राजा, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, असली 'फोकनाड'बाजी या देशात 64 वर्षे सुरू आहे. 64 वर्षात कर्मचार्‍यांसाठी सहा वेतन आयोग. पण शेतकर्‍यांसाठी. तो आता मरतोच आहे, आत्महत्याच करतो आहे म्हणून साठ वर्षात पहिल्यांदाच 'राष्ट्रीय शेतकरी आयोग' स्थापन केल्या जातो. सहाव्या वेतन आयोगाचा अहवाल आणि राष्ट्रीय वेतन आयोगाचा अहवाल जवळपास एकाच वेळी स्वीकारल्या जातो. पण सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरूही होते, पण राष्ट्रीय शेतकरी आयोगाची 'अंमलबजावणी' मात्र पडते धूळखात कचर्‍याच्या पेटीत. फक्त एकच गोष्ट केली जाते, राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल जरी धूळखात पडला असला तरीही राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अध्यक्षानी (डॉ.एम.एस.स्वामीनाथन) तोंड बंद ठेवावे यासाठी त्यांच्या तोंडात तत्काळ 'खासदार'कीचे लॉलीपॉप काेंबल्या जाते आणि मग पुनश्च राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी काय आहेत? आयोगाने उपाययोजना काय सुचविल्या आहेत ही चर्चा बंद होऊन 'शेतकर्‍यांनी जोडधंदा करावा' अशी मंत्रमाळ देशभर जपल्या जाते. कर्मचार्‍यांसमोर 'जोडधंद्यांचा' मंत्र जपला तर कर्मचारी जोडय़ाने मारतील ही खात्री असल्यामुळे तो मंत्र केवळ शेतकर्‍यांसाठी 'राखीव' आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यांच्याही वेतनात भरमसाट वाढ होत आहे. त्यांनाही कोणी तुमच्या मानधनात तुम्हाला मिळणार्‍या भत्त्यात भागत नसेल तर 'जोडधंदे' करा असं म्हणत नाही. अर्थात जोडधंदे न करताही वरकमाई कशी करावी हे त्यांना सांगण्याची गरज नाही. आता राहता राहिला तो शेतकरी. त्याने शेती परवडत नसेल तर जोडधंदे करावे.

शेतकर्‍यांनी अन्नधान्य पिकवून, स्वत: उपाशी राहून जगाला खाऊ घालावे. शेतकर्‍यांनी गाई, म्हशी, बकर्‍या, डुकरांच्या शेणा-मुतात जगावे, पण जगाला दूध व मांस द्यावे. त्याने मधुमख्खी पालन करावे. मधमाश्यांचा दंश त्याने खावा आणि त्यातून येणारे मध इतरांनी चाखावे.

शेणा-मुताचा वास न घेता दूध, त्यावरची मलई, मलिदा व मध चाटायचे व चाखायचे असेल तर शेतकर्‍यांना जोडधंदे करा हे सांगणारा 'गोरखधंदा' करणे 'मस्ट' आहे. या गोरखधंद्याचा संबंध ना शेतकर्‍यांच्या कळवळ्याशी आहे ना त्याच्या हिताशी. तो मरो वा जगो याच्याशीही या गोरखधंद्याचा संबंध नाही. तुम्ही जगा अथवा मरा आमचे पोट मात्र भरत राहा. शक्यतो फुकटात शक्यच नसेल तर स्वस्तात शेतकर्‍यांना जोडधंदे सांगणारा गोरखधंदा केवळ यासाठीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

हे लाघवी खुलासे आले तुझे थव्याने..!


जेनेहमी आपल्या भोवती असतात.. दिसतात.. घुटमळतात त्या प्रत्येकाशी आपलं नातं असतंच असं नाही; पण तरीही त्या नात्यांना आपण व्यवहार म्हणून सांभाळत असतो. पाळता पाळता टाळत असतो.. टाळता टाळत पाळत असतो.

व्यवहार नेहमीच खोटा असतो का? उपचाराला काहीच ओलावा नसतो का? तसं असतं तर आपण उपचारादाखल का होईना पण का हसलो असतो कुणाकडं पाहून? का बोललो असतो क्षणभर थांबून? पाणपोई आपली पर्मनंट तहान नाही भागवू शकत.. पण म्हणून तिचं काहीच महत्त्व नाही का?

तहान म्हटलं की नदी आली, विहीर आली, नळ आले, माठही आलेत आणि झरेही आलेत. हल्लीचा काळ नळांचा! फ्रीजमधल्या पाण्याचा! बॉटलमधल्या पाण्याचा! विहीर खोदत बसायला इथे वेळतरी कुणाकडे आहे.

विहीर खोदायची म्हटलं की आधी आपल्या मनातली जागा तिला द्यावी लागते.

नदीसाठी चार पावलं दूर चालून जावं लागतं.

आणि झर्‍यासाठी तर जंगल, पहाड, दर्‍याखोरे तुडवावी लागतात..! तरीही झरा सापडेलच असं नाही.

..मात्र काही झर्‍यांचं पाणी आपल्या ओंजळीत येत नसलं.. तरी जमिनीखालून वाहतानाची त्याची झुळझुळ आपल्याला कायम ऐकू येत असते. जागेपणी, झोपेतही! हे असं का? हे कोणतं नातं? नेमकं विचारायचं तरी कुणाला? आणि उत्तर तरी कोण देणार?

..किंवा आपल्याला जशी त्याची झुळझुळ ऐकायला येते तसे त्यालाही आपले हुंकार ऐकू येत असतील का? तोही आतल्या आत उसळी मारत असेल का आपल्यासाठी? तोही तापत असेल का? तोही सळसळत असेल का आपल्या आठवणीनं? बहुधा नसावा. कारण तसं असेल तर मग कधीतरी उसळी मारून वर का येत नाही? त्याच्या काही लाटा आपल्या ओंजळीत का देत नाही?

..की त्याची काही मजबुरी आहे?

..बहुधा तसंच काही असणार!

बोलणे वेगळे, वायदे वेगळे

या झर्‍याचे तसे कायदे वेगळे

वाहता वाहता गोठतो का असा..

त्रास होतो तरी. फायदे वेगळे!

खरं तर आपल्या अवतीभवती असंख्य झरे असतात. दिसत नसले तरी खरे असतात. आपणही त्यांचा शोध घेत नाही. कारण आपल्याला नळांचीच सवय झालेली असते. आणि झरे कधी कुणाच्या बाथरूममधून वाहत नसतात.

पण एखाद्याला झर्‍यांचंच वेड असतं. एक झरा.. दुसरा झरा.. झर्‍यानंतर झरा! आतही झरे.. बाहेरही झरे! झर्‍यांचं हे वेड बंद नाही. झरे फुटायला लागलेत की सांभाळणं कठीण होते. तनामनातून सळाळणार्‍या झर्‍यांचा गुंता व्हायला वेळ लागत नाही. सोडवता आला पाहिजे. नाही जमलं तर गळ्य़ालाही फास आणि नाकातोंडातही पाणी!

ज्याला हे सांभाळणं जमलं, त्याचा ज्ञानेश्वर होतो.. तुकाराम होतो.. त्याचाच कृष्ण होतो. त्याच्या अवतीभवतीचा सारा परिसरच गोकुळ होऊन जातो!

पण काहीही असलं तरी ज्याचा त्याचा अनुभव वेगळा! जगणंही वेगळं! मग जगण्याचे अर्थही वेगळे! प्रश्नही वेगळे अन् खुलासेही वेगळे!

हे लाघवी खुलासे आले तुझे थव्याने

देतेस का कबुली पुन्हा अशी नव्याने!

घडले असेल काही.. अंधार जाणतो ना..

दाऊ नये हुशारी बेकार काजव्याने!

हंगाम पेरण्याचा होता कुठे परंतु..

आधीच चिंच खावी का गे तुझ्या मनाने?

साधेच बोलतो ती त्याचाच 'वेद' होतो

समजेल ना तुलाही सारे क्रमाक्रमाने!

आहे तसे असू दे.. होते तसे घडू दे

हा श्वास चालतो का तुझिया मनाप्रमाणे!

आपण आपली स्वत:ची वेगळी डिक्शनरी घेऊनच जगाशी बोलत असतो. प्रत्येकाचीच डिक्शनरी वेगळी-आपापल्या सोयीप्रमाणे आणि त्यामुळेच मग गैरसमज होतात! नको तसे घोटाळे होतात. बहरलेली मैफल ऐनवेळी विस्कटते! सार्‍यांचाच रसभंग होतो! आपण शब्दांच्या मागं जास्त लागतो.. त्यांचे हुंकार समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत कधी. गणितं बिघडायला इथूनच सुरुवात होते.

हेच चाले पहा शेवटी

तेच झाले पहा शेवटी!

सभ्य मी, संत मी, चांगला

लोक 'साले' पहा शेवटी!

शब्दकोषात नाही मजा

हे कळाले पहा शेवटी!

ज्या घरासाठी भांडायचो

ते जळाले पहा शेवटी!

मी मला पेरले कैकदा..

पीक आले पहा शेवटी!

पीक येणार हे नक्की. टाईमटेबल बदलू शकतो पण पीक येणार! शेवटी तर नक्कीच येणार! म्हणूनच आपण नेमकं काय पेरायचं हे आधीच ठरवलं पाहिजे.

फुलांची पेरणी केली व पाकळय़ा मातीत मिसळल्या तरीही सुगंध येणार! दगड पेरून फुलांची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

निसर्गाचा शब्दकोष ठरलेला आहे. त्याची हिशेबाची पद्धतही ठरलेली आहे. बेरीज वजाबाकीची सूत्रंही ठरली आहे.

तेव्हा..

चुकीची सूत्रं वापरून बरोबर उत्तरं येण्याची आशा करण्यात काय मतलब?

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

'आत्मभान' हे मानवाला मिळालेले विशेष वरदान


जड पदार्थापासून मानवापर्यंत जी पृथ्वीवर उत्क्रांती झाली तिचे स्थूल निरीक्षण करता असे म्हणता येईल, की सुरुवातीस अचेतन, अबोध, निरानंद असलेला निसर्ग सजीव रूप घेऊन अधिकाधिक सचेतन, अधिकाधिक संवेदनशील, ज्ञानी आणि अधिकाधिक आनंदी होत गेला. यापैकी 'आनंद' या शब्दाला अनेकांचा आक्षेप असू शकतो. कारण सजीवांच्या जीवनात धडपड, कष्ट, वेदना व दु:ख कदाचित आनंदापेक्षा अधिक आहेत. परंतु स्वाभाविक प्रेरणा तपासली असता ती आनंदप्राप्तीचीच आहे, असे म्हणावे लागेल. जगण्यात आनंद नसता किंवा अधिकाधिक आनंदप्राप्तीसाठी जगणे नसते, तर जगणे ही मूलभूत प्रेरणा म्हणून टिकू शकली नसती. आधुनिक मानवीमनाने बरीच विकृत वळणे घेऊन जगण्यातला नैसर्गिक आनंद गढूळ करून टाकला ही बाब वेगळी. परंतु आहार, निद्रा, मैथुनासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याबरोबर जो भाव पशुपक्षी व निसर्गापासून अद्याप फार दूर न गेलेल्या मानवातही उमटतो तो आनंदाचाच असतो. इतकेच काय, लहान बालकेसुद्धा खूप भूक लागली नसेल, झोपेला आले नसतील व शारीरिक व्यथा/वेदना नसेल तर सर्वकाळ आनंदीच असतात.

विविध इंद्रियांकरवी स्वत:चे विविध पैलू जाणणे, स्वत:चाच विविध प्रकारे उपभोग घेणे हेही उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत राहिला. स्वत:चे रूप न्याहाळण्यासाठी त्याने सजीवांच्या रूपात दृष्टी विकसित केली. नाद ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, गंधासाठी नाक, चवीसाठी जीभ व आत स्रवणार्‍या ग्रंथी असे स्वत:चाच आस्वाद अनेक अंगांनी घेण्यासाठी निसर्ग सजीवसृष्टीच्या माध्यमातून उमलत गेला. विकसित होत गेला. स्वत:च स्वत:चा भक्षक रूपाने उपभोग घेत राहिला व स्वत:च स्वत:चे भक्षही झाला. सजीवांमध्ये उत्क्रांतिक्रमात विकसित होत गेलेल्या प्रत्येक इंद्रियाला आनंदाचीच ओढ असते. जे अन्न आनंद देत नाही ते जिभेला नकोसे वाटते. जो नाद आनंद देत नाही तो कानांना कर्कश वाटतो. जो स्पर्श पुलकीत करत नाही तो त्वचेला असह्य वाटतो. जे दृश्य आनंददायी नसते ते डोळ्यांना बघवत नाही.

असे म्हणतात, की सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते जाणण्याच्या साधनांचा विकासच उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत आहे. इंद्रियांच्या विकासापाठोपाठ किंवा सोबतच मनही उगवले व विकसित झाले. उत्क्रांतीच्या वरच्या पातळीवरील मनुष्येतर प्राण्यांमध्ये भावभावना व विचार करण्याची क्षमता कमीअधिक प्रमाणात निश्चितच आढळून येते. परंतु मानवी पातळीवर उत्क्रांतीने झेप घेतली. त्यातून मनाचा भव्य व विविधांगी विस्तार जो झाला त्याने फारच वरचा टप्पा गाठला. आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) हा मानवात असलेला व मानवेतर पशूंमध्ये अभावाने आढळणारा विशेष गुण आहे.

मनुष्येतर प्राणी बहुधा त्यांच्या नैसर्गिक उपजत प्रेरणांनी संचालित असे जीवन जगतात. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला मात्र उपजत प्रेरणा कमी व बुद्धी म्हणजेच शिक्षणकौशल्य व विचारक्षमता अधिक मिळाली. इतर प्राण्यांची पिले जन्मत:च किंवा जन्मल्यावर लवकरच स्वत:चे अन्न मिळविण्यास सक्षम होतात. इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मानवाचे मूल मात्र सर्वाधिक काळ परावलंबी असते. परंतु त्यांचा मेंदू इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मानवाच्या या परावलंबी बालकांच्या रक्षण-पोषणासाठी मानवाला सामूहिक जीवनपद्धतीचा अंगीकार करावा लागला. समूहाला भाषेची गरज असते. कारण भाषेशिवाय समूहातील व्यक्ती एकमेकांशी निगडित कसे राहणार? आधी इशार्‍यांच्या स्वरूपात असलेली भाषा हळूहळू ध्वनी, शब्द व वाक्यरूपात विकसित होत गेली. भाषेच्या विकासासोबतच विचारक्षमताही आपोआप विकसित होत गेली किंवा विचारक्षमतेमुळे भाषा विकसित होत गेली, असेही म्हणता येईल.

मानवेतर प्राण्यांना भोवतालच्या सृष्टीचे भान असते. परंतु स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे व स्वत:मधील वासना-भावना-इच्छा-विचार यांचे वेगळे भान त्यांना नसते. असे आत्मभान हे मानवाला मिळालेले विशेष वरदान म्हणता येईल. अर्थात, आधुनिक साहित्यात आत्मभान हा शाप मानणारा एक प्रवाह आहे. परंतु मनाने निरोगी असणार्‍या कोणत्याही मानवाला आत्मभान हे वरदानस्वरूपच वाटावे. आपणच आपल्याला आतूनबाहेरून पाहता येणे व आपण तसे पाहत आहोत किंवा पाहू शकतो याचीही स्वतंत्रपणे जाणीव असणे म्हणजे आत्मभान! स्वत:ला पाहणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा, वासना, विचार, भावना वगैरे न्याहाळता येणे व समजता येणे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे तर एखादी वासना देहात/मनात उत्पन्न होणे ही एक बाब व अशी वासना माझ्यात उत्पन्न झाली आहे हे समजणे व मी हे समजतो आहे याचेही भान असणे ही दुसरी बाब. पहिला प्रकार सर्व प्राण्यांत आढळेल. दुसरा प्रकार मात्र फक्त मानवांतच दिसून येतो.

भोवतालच्या सृष्टीला समजून घेण्यासाठी, अन्न मिळविण्यासाठी व प्रतिकूल निसर्गावर मात करण्यासाठी मानवाला उपजत प्रेरणांपेक्षा विचारशक्तीचा उपयोग अधिक करावा लागला. इतर प्राण्यांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो, की या गोष्टींसाठी प्राण्यांना निसर्गानेच उपजत प्रेरणा (इन्स्टिक्ट) बहाल केल्या आहेत किंवा उत्क्रांतीच्या ओघात प्रत्येक प्राणिजातीच्या सामुदायिक प्रकृतीमध्ये त्या उपजत प्रेरणा विकसित होत गेल्या असाव्यात. मानवी मुलाला मात्र उपजत प्रेरणांच्या अभावी शिक्षणावर अधिक भर द्यावा लागतो. अगदी खाद्यपदार्थापासून हे शिक्षण सुरू होते. आपल्या देहाला पोषक खाद्य कोणते व घातक कोणते, याबाबत मानवेतर प्राणी जन्मत: अधिक समंजस असतात. मानवाचे मूल मात्र दिसेल ती वस्तू तोंडात टाकू पाहते. परंतु निरीक्षण, अनुभव-विश्लेषण, निष्कर्ष इ. पद्धतींनी मानवी बुद्धी विकसित होत गेली. निरीक्षण-विश्लेषण-तर्कसंगती-निष्कर्ष हे बुद्धीचे गुण आहेत. पूर्वग्रहरहित, अनाग्रही, शुद्ध विवेकशील विचार ( ठशरीेप) ही निसर्गाने मनाच्या स्वरूपात गाठलेली उत्क्रांतीमधील सर्वोच्च अवस्था आहे. परंतु ती अवस्था जरी निसर्गाला मानवी देहात गाठता येत असली तरी फारच तुरळक प्रमाणात ती मानवजातीत आढळते. याचे महत्त्वाचे एक कारण बहुधा असे असावे, की मानवाला उत्क्रांतीच्या आधीच्या टप्प्यांचेही ओझे वाहावे लागते. म्हणजे त्याची विवेकीबुद्धी त्याला काहीही सांगत असली तरी त्याचा पदार्थमय देह, त्या देहाच्या मर्यादा, त्या देहातील जगण्याची व पुनरुत्पादित होण्याची धडपड करत असलेला प्राण, त्या अनुषंगाने येणारे इच्छांचे, वासनांचे आवेग, नैसर्गिक उपजत प्रेरणेपासून काहीसे दुरावल्यामुळे दोलायमान असलेले, विकृतीकडे सहज झुकणारे व आत्मभानामुळे 'अहं'चा परिपोष करू पाहणारे मन हे इतर तत्त्व त्याला अन्यान्य दिशांनी ओढू पाहतात व या सर्वापासून तटस्थ होऊन जगता येणे दुष्कर वाटते. अनेक महामानवांनी मनाची अत्यंत विवेकशील बुद्धीचे वैभव प्रकट करणारी अवस्था निश्चितच गाठली आहे. मात्र देहाच्या प्राणिक वासना व भावभावनांच्या आणि मनबुद्धीच्या वेगवेगळ्या मागण्यांमध्ये संतुलन कसे साधावे, हा यक्षप्रश्न मानवजातीकडून अद्यापही उत्तराची अपेक्षा बाळगून आहे.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
     

नेट : परीक्षा पाठांतराची की अध्यापन तंत्राची?


शाळेतील शिक्षकाला शिक्षकाची नोकरी करायची असेल तर बी.एड. व्हावे लागते. तसेच महाविद्यालयात शिक्षक व्हायचे तर 'नेट' नावाची परीक्षा पास होणे आवश्यक असते. नेट म्हणजे 'नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट.' ही परीक्षा आम्ही पास नसलो तरी आम्ही पास आहोत असे समजा आणि आम्हांला त्या पात्रतेचा पगार द्या या मागणीसाठी नुकताच एक खूप मोठा संप झाला. त्यामुळं काही विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर पडले. समाजातले नागरिक अथवा विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या/ प्राध्यापकांच्या मागणीबद्दल फारसे अनुकूल नव्हते. एक तर ते तटस्थ होते किंवा प्रतिकूल तरी होते. वरवर पाहता नागरिकांची बाजूच अधिक बरोबर आहे असेच वाटते. एक तर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार समाजाला न रुचण्याइतपत जास्त झाले आहेत आणि ते नको तितक्या सुटय़ा घेतात हे काही समाजाला आवडत नाही.

ही राष्ट्रीय चाचणी परीक्षेची अट लागू झाली त्या वेळी माझी सेवा वीस वर्षाची होऊन गेली होती. त्यामुळे या परीक्षेतून माझ्यासारख्याला वगळण्यात आले. सुरुवातीला या परीक्षेची प्रश्नपत्रिकाच पाहायला मिळत नसे. कारण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित बांधीव रूपात

असल्यामुळे ती परीक्षेच्या हॉलमध्ये संबंधिताला देऊनच परत घ्यावे लागे. आजही हीच पद्धत आहे. पण आज मात्र अशा प्रश्नपत्रिका काढणार्‍या काही अनुभवी परीक्षकांनी पुस्तके लिहिली आहेत. बाजारात ती उपलब्ध आहेत. अतिशय हुशार विद्यार्थीसुद्धा नापास होतात.म्हणून महिला कॉलेजमध्ये माझ्या सहकार्‍यांच्या मदतीने आम्ही नेट परीक्षेच्या पूर्वतयारीचे वर्ग घेतले. त्याचा थोडाबहुत उपयोगही झाला. मी स्वत: ती परीक्षा पास नसलो तरी अनुभवाच्या आधारावर मला परीक्षक म्हणून संधीही मिळाली आणि आज मी तुम्हांला खात्रीने सांगतो, की मी वीस वर्षापूर्वी ती परीक्षा दिली असती तर नक्कीच नापास झालो असतो आणि आजही मी ती परीक्षा दिली तरी पास होईल असा मला आत्मविश्वास नाही. माझी ही मर्यादा मी जशी तुम्हांला सांगितली तशी आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी माझे सामर्थ्यही सांगतो. माझ्या महाविद्यालयातला अथवा विद्यापीठातला मी एक चांगला शिक्षक होतो,असेच माझे अनेक विद्यार्थी माझ्या अनुपस्थितीतही सांगतात. हे सगळं मी माझे मोठेपण कळावं यासाठी लिहीत नाही, तर ही 'नेट' नावाची परीक्षा काय असते आणि तिचे स्वरूप नेमके काय असते याची फारशी माहितीच समाजाला नसल्यामुळे पात्रतेची परीक्षा पास व्हायला नको. पण पगार मात्र पात्र शिक्षकाचा हवा आहेअसे प्राध्यापक म्हणूच कसे शकतात? असे समाज म्हणतो. नेटबाबतची ही प्रतिक्रिया खूप जुनी आहे. त्यामुळे सुमारे वीस वर्षापूर्वीही मी याविषयी एक लेख लिहिला होता आणि वेळ वाया घालवला होता. आजही माझे म्हणणे कुणी ऐकून घेईल असे मला वाटत नाही. त्याचे कारण एकदा एखादी व्यवस्था अंगवळणी पडली, की माणसे त्या व्यवस्थेच्या संदर्भातच विचार करू लागतात.

ज्यांनी 'नेट' परीक्षेची पुस्तके वाचली असतील त्यांना एक गोष्ट पक्की कळली आहे ती म्हणजे ही परीक्षा पाठांतराची चाचणी घेणारी परीक्षा आहे. मुळात आपल्या देशात पाठांतरात जो पक्का असतो त्याला विद्वान समजण्याचा प्रघात आहे. त्यामुळे त्याला एक सुसंगत अशी रूढी निर्माण झाली. ती अशी, की पाठांतराचा हक्कच जन्माशी निगडित करून अनेकांना विद्वान होण्यापासून वंचित ठेवण्यात आले. आपल्याकडे 'दशग्रंथी ब्राह्मणाला' विद्वत्तेचा सर्वश्रेष्ठ किताब देण्याची पद्धत आहे. दोन हजार वर्षे या पाठांतरपद्धतीला श्रेष्ठ मानणारी मंडळीच जर इतरांची विद्वत्ता/पात्रता शोधू लागली तर परीक्षापद्धती पाठांतराची असणार नाही तर अन्य कोणती असणार? अशा पाठांतर परीक्षेत उत्तीर्ण होणारे उत्तम शिक्षक होऊ शकतात हे त्यातही दुसरे गृहीत. शिक्षणपद्धतीत पाठांतराला महत्त्व असतेच. पण 'पाठांतर' केंद्रस्थानी असू शकत नाही. पाठ न झालेले मुद्दे कागदावर उतरवून तो कागद समोर ठेवता आला नाही तरीएखादा शिक्षक उत्तम शिकवू शकतो. विषय कोणताही असो, तो उत्तम पद्धतीने शिकवला जातो किंवा नाही? याची खरी कसोटी कोणती? वर्गातला प्राध्यापक जो कोणता टॉपिक शिकवतो तो विद्यार्थ्यांच्या आकलनसीमेत पोचतो की नाही याची दक्षता घेतो. यानंतरचा दुसरा टप्पा या आकलनानंतर हा विद्यार्थी स्वत:च्या विचाराला चालना देऊन आपले आकलन स्वत:च्या भाषेत मांडू शकतो की नाही हा आहे आणि या आकलन प्रांतात जे जे साठवते त्यातल्या त्रुटी जाणवून त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी संशोधनात्मक दिशा तो स्वीकारतो की नाही हा तिसरा टप्पा आहे. नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर या तिन्ही गोष्टींचा अभाव असलेल्या असतात हे कुण्याही विचारी माणसास कळू शकते.

काही दिवसांपूर्वी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन डॉक्टरांची प्रांजळ कबुली मी वृत्तपत्रात वाचली. इंटर्नशिप सुरू होईपर्यंत पेशंटला इंजेक्शन कसे द्यावे याचा आत्मविश्वासच त्यांना नव्हता; पण ते एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होते आणि रोग्यांवर इलाज करायची सनद मात्र त्यांना प्राप्त झाली होती. याचेही पुन्हा कारण तेच आहे. पाठांतर केले, की उत्तीर्ण होता येते ही रूढी आपल्या देशातले सीईटी परीक्षा पास होणारे उत्तम पाठांतरे असतात असे त्यांचे पालकच सांगतात.

नागपूरच्या मेयोचे डीन डॉ. पी. टी. वाकोडे यांच्याशी गप्पा मारीत बसलो होतो. बोलण्याच्या ओघात त्यांनी सहज म्हणून एक आठवण सांगितली. ते शिक्षक असताना त्यांच्या डिनने एक प्रश्न त्यांना विचारला, ''तुम्ही आठवडय़ाला किती लेक्चर्स देता?'' आणि त्यांनी चक्क सांगितले, ''नाही, मी लेक्चर्स देतच नाही.'' पण त्यानंतर वर्गात ते ज्या पद्धतीने शिकवतात ती पद्धत त्यांनी सांगितली. कुठल्याही नेटच्या कसोटीत न बसणारी ती पद्धत होती. विद्यार्थ्यांना आपला ईएनटी (कान, नाक, घसा) हा विषय कळावा म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिले आणि त्यांचा पुढचा अनुभव असा, की ते ज्या मागास देशात 'व्हिजिटिंग फेलो' म्हणून गेले त्या प्रत्येक देशातले अनेक विद्यार्थी त्यांना त्यांच्या पुस्तकामुळे ओळखत होते. गाईड लिहिणं कमीपणाचं मानलं जात होतं. त्या काळात माझे शिक्षक डॉ. स. रा. गाडगीळ यांनी अनेक कथा, कादंबर्‍यांचे विवेचन करणारे गाईड्स लिहिले. कोल्हापूरहून हे गाईड्स प्रसिद्ध होत असत. मी हे गाईड्स वाचून बी.ए.ची परीक्षा बहिस्थपद्धतीने नुसता पास झालो नाही, तर सर्व तृतीयही आलो. कुरुंदकर सरांनी गाडगीळ सरांच्या एका पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना म्हटले आहे, की डॉ. गाडगिळांनी नको तिथे खूप काही चांगले लिहून ठेवले आहे. त्यास आमच्या अध्यापन क्षेत्रात 'टिचिंग मेथडॉलॉजीची साधनसामग्री' म्हणतात. नेट परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना टिचिंग मेथडॉलॉजी विकसित करावी. टिचिंग टेक्निकल आत्मसात कराव्यात असे या नेट परीक्षेत काहीच नसते. म्हणून मी त्याही वेळी लेखात म्हटले होते, 'खरे तर महाविद्यालयीन प्राध्यापकांनी परीक्षापद्धतीचे स्वरूप बदला, तिचे स्वरूप प्रशिक्षणाचे असावे अशी तरतूद करा, अशी मागणी करायला हवी. पण पाठांतराचे यश म्हणजे पात्रता आणि परिणामकारक वक्तव्य करण्याचे कीर्तनतंत्र म्हणजे अध्यापन या दोन दोषांतून आपल्याला अध्यापन क्षेत्राला मुक्त करता येईल का? माझ्यासारख्या एका लहानशा डबक्यात तीसपस्तीस वर्षे इमानेइतबारे शिकवून, दर महिन्याचा पगार उचलून सेवानिवृत्त झालेल्या साध्या शिक्षकाला थेट देशाच्या नियोजनावर बोलण्याचा अधिकारच काय? असे समजून आपण दुर्लक्ष करायला मोकळे आहात.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

खिचडी खा अन् झोपा घ्या''

 बस्स झालं ना उबारे हो.. हानू काय रट्टा.. ओ संज्या. चाल उठ इथून. तो लाडू ठेव कोपरात . हे लाडू तुमच्यासाठी नाहीत. चला बाहीर खा''

'' आई, एक लाडू घेतो ना ''

'' एक देइन थुतरीत. या लायन्या गंजातले लाडू कुठं गेले?''

'' बाबा खाऊन राह्यले कोठय़ात''

''सत्यानास झाला. बाप असा अन् लेकरं तसे. पुरा गंजच घेऊन गेला त्याचा बाप. आता काय डोकं घेऊ मी?''

'' काय झालं ऐश्वर्या वैनी? काहून डोकं घेऊन राह्यल्या?''

'' काय सांगू भाऊजी. या बापलेकाइनं मले मॅट केलं''

'' कसं काय?''

'' म्या बालवाडीच्या लेकरासाठी बेसनाचे लाडू केले, त्यातले वीस-पंचवीस लाडू बापलेकाइनं खाल्ले''

'' घरचं वावर असलं की, कोणीही खाते''

'' असं रोज खाल्लं तर पुरीन काय मले?''

'' कुठं न्या लागतात इतके लाडू?''

'' म्या बचतगटातर्फे मयनाभर बालवाडीचा ठेका घेतला, पन्नास पोराइले रोज सकाळी फराळ करून द्या लागते, कोन्या रोजी पोहे. कोन्या रोजी शेंगदाण्याची वडी. सिरा. अन् बारा वाजता खिचडी''

'' याचा पैसा कोन देते?''

''मयनाभर जवळचा पैसा लावा लागते, मयना झाल्यावर त्याचं बिल निघते, कसेही मयना भरला की हजार दीड हजार उरतात. पण याच्यात असे घरीच लाडू खाल्ल्यावर काय करीन धतुरा?''

''भाऊ कुठं गेले?''

''माह्या चोरून कोठय़ात लाडू खाऊन राह्यले, निरा अयदी झाले तुमचे भाऊ. रोज सकाळी संड फराळ करतात. दुपारून खिचडी खातात अन् मी वावरात कामाले गेली की दाने भाजून खातात, तुम्हीच सांगा एकटय़ा बाईनं काय करावं? शाळेत गेल्यावर मले लाडवाचा वाटप करा लागते, खायासाठी लेकरं कावरल्यासारखे करतात, नयतुरन्या पोरी एकमेकीले लोटतात''

'' म्हणजे जवान पोरीले लाडू भेटतात काय?''

'' सरकार म्हनते गावातल्या सार्‍या जवान पोरीले लाडू खाऊ घाला''

'' काहून?''

''नयनतुरन्या पोरी सुधरल्या पाह्यजात, खापर्‍या तोंडाच्या पोरीले कोनी लवकरच पसन करत नाही म्हणून त्याहीच्या तोंडावर रौनक आली पाह्यजे''

''बरोबर आहे. सरकारले वाटते की त्याहीच्या पोटी खलीसारखे पोरं जन्माले आले पाह्यजात.''

'' त्या पोरी पाहून गावातले म्हातारे बुढे उसयले''

''कसे काय?''

'' ते म्हंतात आमालेबी निराधार योजनेतून लाडू द्या''

''मंग?''

'' लांडगे मास्तरीन म्हणे तहसीलवर मोर्चा न्या''

''पुढे चालून तसं होईन. अमेरिकेनं भारताले कर्ज देलं की सरकार म्हातार्‍या मानसाले दोन टाइम फुकट जेवन देईन. त्याहीच्यासाठी पेशल बिअर बार उघडीन. म्हतार्‍याले चिकन. बिर्यानी. दात नसले तरी हड्डय़ा फोडा लेकहो''

''आता सार्‍याइले लाडू भेटल्यावर कोन राह्यलं?''

''जवान पोट्टे राह्यले''

''तेही पोरीच्यानं बालवाडीभोवती रुंगयतात''

''खूप लोड झाला तुमच्याभोवती वैनी''

'' मले घडीभर फुरसद नाही भाऊजी. लाडू झाले की बारा वाजता खिचडी शिजवा लागते. लेकरं संड खातात अन् जागीच लुंडकतात'

''म्हणजे?''

''जेवले की भीतीपाशी सरकतात अन् जागीच आंग टाकतात''

''लांडगे मास्तरीन काय करते?''

'' ते दिवसभर हिसोब ठेवते, लाडू किती वाटले? लेकरं किती आले? खिचडी कोणं खाल्ली, कोणं उष्टी टकाली? याचा सारा हिशेब वहीत मांडते''

'' मंग शिकोते कधी?''

''शिकवा कायले लागते? तिचा सारा टाईम हिसोबातच जाते, तसंही सरकार म्हनते आठवीलोक सारे पास करा. म्हणून मास्तरीन शिकोयाच्या नांदी लागत नाही. दिवसभर हिसोब करते अन् लाडू खात राह्यते, दोन मयन्यात मास्तरीन संड पडली.''

'' हे आठवीलोक परीक्षा नसल्यानं सगळे पोट्टे चालढकल करून राह्यले, पोराले स्पर्धा म्हणजे काय ते समजतच नाही, त्याहीच्या मेंदूतून स्पर्धा नावाची गोष्टच उडून टाकली. खिचडी खाय अन् झोपून राह्य''

'' हे शिक्षण पटलं नाही भाऊजी मले''

'' त्यात गुरुजीची काही चूक नाही, वरतूनच तसे आदेश आहेत की, सर्वकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. आकारीक चाचण्या घ्या''

'' म्हणजे?''

''पोराचा आकार उकार पाहा. त्याचं वजन करा. तो जाडा झाला की बारीक झाला ते पाहा. बारीक काहून झाला त्याची कारणे द्या''

'' म्हणजे आता लेखी परीक्षा होतच नाही काय?''

ते फक्त नावालेच होते''

'' हे पद्धत कोणं काढली डोकशातून?''

'' दोन-चार शायने सरकारच्या डोकशावर बसेल असतात ते सरकारले अक्कल शिकवतात.. हे फक्त हेल्पर तयार कर्‍याची योजना आहे''

'' म्हणजे?''

'' साधारण पोरगा आठवीलोक पास होते, दहावीत कॉपीमुक्त अभियान असते, पोट्टा कसातरी दहावीत निघते, मग बारावीत गोता खाते, एकखेप गोता खाल्ला की तो कोन्याच कामाचा राह्यत नाही''

'' मग काय करतीन आपले पोट्टे?''

'' ते घमिले उचलतीन! आता परराष्ट्रीय कंपन्या भारतात घुसून राह्यल्या, त्याहीले घमिले उचलणारे हेल्पर पाह्यजात, आपले बारावी नापास पोट्टे हेल्पर म्हणून लागतीन.. अशी आहे हे चालबाजी!

'' मंग काय फायदा. रात झोपीत जाते अन् दिवस खिचडी खायात जाते.. मोठे झाल्यावर हे पोट्टे फक्त खायाच्याच कामाचे होतीन., काय म्हणावं या शिक्षणाले? भावी पिढीचा सत्यानाश!

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

गोठय़ातलं पशुधन


मृग नक्षत्राच्या पावसानंतर आता शेताशिवारात मागच्या बाजूने पेरणीच्या पेटय़ा असणारे ट्रॅक्टरच दिसतात सगळीकडे. जिथं दिवसचे दिवस पेरणी चालायची ते शेत आता काही तासातच पेरून होते आणि ट्रॅक्टर पुन्हा नवीन शेतकर्‍याच्या शेतात पेरणी करण्यासाठी उधळत, उडय़ा मारत जातो.

जशी शेताशिवारात तिफण दिसत नाही तसंच तिफणकर्‍यालाही आता महत्त्व उरलं नाही. पूर्वी गावागावांतून असे नावाजलेले नामांकित तिफणकरी असायचे. ते कसं दोरी टाकल्यासारखं सरकंतीर तास काढायचे. जसा तिफणकरी तसाच पेरकरीही. ज्याची चाडय़ावरची मूठ फणाच्या काकरात टोपल्यासारखी दाणे टाकायची आणि त्या तासातून हाताने अंतर मापून टोपणी केल्यासारखे कोमटे उगवायचे; त्याची आता गरज उरली नाही. कारण पेरणीयंत्राच्या पेटीतली पट्टी बरोबर विशिष्ट आकडय़ावर ठेवली की एकच हातोळी घेऊन दाणे पडत जातात आणि पेरणी सुबक होते.

माणसाच्या मनातली, हातातली कलात्मकता आणि सुबक कलात्मकता अशी यंत्राने हिरावून घेतली आणि शेताशिवारातल्या प्रत्येक कामात आता कसा एक अपरिहार्य असा कोरडेपणा आला. सर्जन संपलं आणि कोरडीठाक अशी यांत्रिकता आली. शेताशिवारात हजारो वर्षांपासून रूढ असणारे पारंपरिक औतं फाटे अशा कितीतरी वस्तू आता अडगळीत जाऊन पडल्या. मोडीत निघाल्या.

दरवर्षी ज्या तिफणीने आपण पेरणी करायचो ती तिफण कुठे उरली आता? त्या तिथं जांभळीच्या खोडाशी एक फणकट मोडलेलं. दुसरं घराच्या छपरावर. घरच्या वापरात अडचण येते म्हणून इथली उचलली तिकडे फेकली. तिकडची उचलली पुन्हा फेक फाक, अशी सारखी हेळसांड. उचला-खाचलीत तिची दांडी चघळ झाली, खडबड झाली. पण आता तिच्या नशिबात सुताराच्या कामठय़ावर नेऊन भरून घेणं नाही. जाडीत, जुपण्या-एठणात अडकून कधीच शेतावर पेरणी करणं नशिबात नाही. ज्यांनी कधी काळी तिचा शोध लावून पेरण्याचं नवं टेक्निक कृषी संस्कृतीत आणलं, तेही आता मोडीत निघालं. त्यांच्या नावासकट !

म्हणजे माणसाची सारखी प्रगल्भ होणारी बुद्धिमत्ता बदलत्या काळानुसार जुन्या बुद्धिमत्तेला मोडीत काढते. तसेच नवे साधनं जुन्या साधनांना. गेल्या 35 वर्षांच्या शेतीच्या अनुभवात मला जी कृषी औजारांची आणि विधी उपचारांची नावं माहीत झाली होती त्यातली कितीतरी आता मी विसरून जाणार. नव्याची माहिती होणार आणि माझ्या पुढच्या पिढीत तर नातवंडाच्या पुढे अशा काही नावांचा उल्लेख केला तर त्यांना काहीच नाही कळणार. खळय़ात उफणणी करण्यासाठी तिवा ठेवलेला असायचा. दिवसेंदिवस खळं केलं जायचं. असं मी बोललो तर त्यांना काहीच नाही कळणार.

कोणकोणत्या जिनसा असतील त्या? की अजून दहा वर्षानी त्यांना अस्तित्वच राहणार नाही. मी थोडावेळ डोळे लावून घेतले. तसतशी एक-एक वस्तू माझ्या डोळय़ासमोर तिच्या जन्मापासून, तिच्या कार्यकारण भावासह येत राहिली. मी मनाच्या हाताने त्या वस्तूंना घोळवत राहिलो.

जसे औतंफाटे किंवा कृषिसाधनं बहुतांशी लाकडांपासून निर्माण होत होते. तसेच त्याच्या गोठय़ातील पशुधनसुद्धा त्यांना अनेक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी उपयोगी येत असायचं. गोठय़ातले बैल उन्हाळय़ात नांगर-वखर ओढायचे. पावसाळय़ात तिफण आणि हंगामात वहीत वाही करायले डवरे-ताशे. गोठय़ातील गाय त्याला घरासाठी दूध दुभतं द्यायची. गोर्‍हे पुढच्या कुणबिकीत बैल व्हायचे. हे झालं त्यांच्या जिवंत असतांनाचं शेतकरी कुटुंबासाठीचं योगदान. मात्र मेल्यावरही त्यांचे अनेक अवयव शेतकर्‍यांच्या कुणबिकीत उपयोगी येत रहायचे. त्यामुळेच आदिम अवस्थेपासून विकसित होत होता. माणसाने आपल्या भोवतालची जी जनावरे माणसाळवली त्यात गायी-बैलांचा क्रमांक अत्यंत वरचा आहे. त्यांच्यावाचून शेती केलीच जाऊ शकली नसती. म्हणून कृषी संस्कृतीच्या विकासाचे सर्व श्रेय शेतकर्‍यांच्या गोठय़ात त्याच्या दाराशी असणार्‍या गायी-बैलांना दिले जाते. असा हा बैल शेतकर्‍यापेक्षाही अधिक श्रम करून त्याचे घर धनधान्याने भरून ठेवतो. नांगर, वखर, बैलगाडी, किन्ही, फर्राट, तिफण, डवरे, गाडी अशा कितीतरी औताफाटय़ाच्या आणि इतर कामासाठी बैलाचा उपयोग केला जातो. आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे खळय़ातल्या कणसाची किंवा ओंब्याची मळणी.

खुरवतीसाठी बैलाचाच उपयोग. बैलांच्या गळय़ात दोर बांधून तयार केलेली माळची माळ मेढीभोवती खळय़ात वतरुळाकार फिरवली जायची. तेही तोंडाला मुसके बांधून. बैलाच्या पायखुरांचा स्पर्श ज्वारी, गहू इ. धान्याला झाल्यामुळे त्या धान्यात आपोआपच औषधी गुणधर्म येतो. धान्य टिकवून ठेवावे लागते. त्यात कीड, आळी होत नाही असा समज शेतकरी कुटुंबात असायचा.

जन्मभर घरधन्यासाठी राबणार्‍या या बैलांच्या शेपटीच्या केसांपासून औताफाटय़ासाठी दोरखंड तयार केले जाते. त्यातील एक महत्त्वाचे दोरखंड म्हणजे केसाळी. बैलाच्या शेपटीच्या टोकाला सतत लांबच लांब केस फुटत राहतात. पावसाळय़ाच्या दिवसात त्याला झिंझोल्डे लागतात. म्हणून शेतकरी बैलाच्या शेपटय़ांचे हे केस कात्रीने कापून घेतो. त्या केसांना शेपाळी असे शेतकर्‍याच्या खास शैलीत म्हटले जाते. शेपाळीचे कापलेले केस शेतकरी कुटुंब वाया जाऊ देत नाही किंवा फेकून देत नाही, तर त्या केसाच्या लडय़ा करून त्या घमेल्यातल्या पाण्यात भिजत घालतो. लडय़ांना मऊपणा यावा म्हणून एकावर एक थर घालण्यापूर्वी त्या थरावर गोडे तेल टाकतो. त्यामुळे या केसांना मऊपणा येतो. घमेल्यात तयार झालेल्या या शेपाळय़ांच्या लगद्याला नंतर तो काडीभोवती गुंडाळून त्याचे सूम तयार करतो.

झडीच्या दिवसात फुरसतीच्या वेळी या सुमाला आट घालून, पीळ देऊन, काडीभोवती गुंडाळून त्याची गुंडाळी तयार केली जाते. या सुमापासून मग केसाळी नावाचे खास दोरखंड चोपट तयार केले जाते. पेरणीच्या चाडय़ाला या केसाळीपासून तयार केलेलीच दोरी असावी असा संकेत होता. कारण पेरणी सुरू असताना पाऊस पडला तर तागाची दोरी आवळून येते आणि तिफणीवर बांधलेल्या चाडय़ाचा तोल ढळतो असे त्यामागचे मुळात कारण असावे.

शेतकर्‍यांच्या गोठय़ातील गाय किंवा बैल म्हातारपणात गळून मेला तर त्याचा मृतदेह गावातल्या चांभाराला दिला जातो. मात्र त्या मृत जनावराच्या बदल्यात वादी मागितली जाते. वादी म्हणजे गुराच्या चामडय़ापासून तयार केलेला बहुउपयोगी असा दोरच असतो. त्याचा उपयोग ऐठण तयार करण्यासाठी केला जातो.

शेतावर वखर, तिफण किंवा डवरे सुरू असतात त्यावेळी औताची दांडी आणि दोन्ही बैलांच्या गळय़ात अडकवलेली जाडी यांचा समन्वय साधण्यासाठी जुंपणे जुंपावे लागते. दांडीवरून जाडीवर किंवा जाडीवरून दांडीवर जो दोर बांधला जातो तो साधा ताग बटीपासून बनवलेला दोर असेल तर काचून-काचून तुटून जातो. मात्र या वादीचे ऐठण असेल तर खापकाचणी पडत नाही.

तसाच बैलाच्या चामडीपासूनच तयार केलेल्या या वादीचा उपयोग बैलगाडीच्या धुर्‍यावर जो 'जू' बांधला जातो त्याच्यासाठीसुद्धा केला जातो. धुर्‍याच्या टोकावर बांधलेल्या जुवाला हालू डोलू न देण्याचे काम ही वादी करत असते. वादीवरून कृषी संस्कृतीत एक म्हणसुद्धा प्रचलित आहे. 'वादीसाठी गाय मारू नाही' म्हणजे छोटय़ा गोष्टीच्या फायद्यासाठी मोठय़ा गोष्टीचा नाश करू नये.

आपल्या गोठय़ातील बैलाचा मृत्यू होणे हे शेतकर्‍याला घरातल्या माणसाच्या मृत्यूएवढेच दु:ख देते. मात्र त्या बैलांची शिंगे कापून घ्यायला तो विसरत नाही. या शिंगाच्या पोकळ वाळल्या टोकापासूनच मग पेरणीसाठी चाडय़ाखाली ज्या नळय़ा वापरल्या जातात त्या नळय़ाच्या टोकाशी आणि फणाच्या वर जो सांधा साधला जातो ते साधण्याचे काम हे शिंगट करते.

असं हे शेतकर्‍यांच्या घरचं पशुधन. जिवंतपणी जसं त्याच्या उपयोगी येत होतं तसंच मेल्यावरही त्याच्या अवयवापासून शेतकर्‍याला साधन बनवायला उपयोगी येत होतं. मात्र आता हळूहळू खेडय़ातील पशुधन कमी होत आलं आहे. ज्या कुणबिकीत सहा-सहा बैलं असायचे त्याच्या दावणीला आता एकही बैल नाही. शेतात ट्रॅक्टरच्या रूपाने आलेल्या यांत्रिकीकरणामुळे पशुधनासंबंधीचा ओलावाच कमी झाला आहे.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', ' तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता. मेहकर, जि.बुलडाणा