Tuesday 21 August 2012

आर्केस्ट्रा..!

मी जवा भाग्योदय कला मंडयाच्या शिवरंजन आर्केस्ट्रात जाले लागलो ते गोठ 1967-68 सालची. हे मी याच्यासाठी सांगून राह्यलो का तवा यवतमाय इतकं मोठं नव्हतं हे एक, आन् त्यावक्ती यवतमायसारख्या लहान शयरात आर्केस्ट्रा? लोकायले हे पटतचं नव्हतं का आपल्या गावातले पोरं असं काई करू शकतीन. तवा आर्केस्ट्रा म्हनलं का मुंबईचा दांडेकर आर्केस्ट्रा, म्हात्रेचा आर्केस्ट्रा यायचंच नाव चाले. लोकायचं शंभर टक्के चुकत होतं असयी नाई. या आर्केस्ट्राच्या आफिसात मी यातला गायक महेश शिरे याच्या आग्रवान पह्यल्यांदा आलो तं यायची तालीम सुरू होती. एक पेटी, तबला, ढोलकी, झांज अन् नईन वाद्य म्हंजे बोंगो. दोन पायात पकडून वाजवाचा बस. हो इसरलो होतो व्हायलिन, बासरी आन् गिटार आता झालं. कोंगो नाई, अँकारडियन नाई, कार्यकरमाच्या वक्ती आमचे जे अध्यक्ष गजापुरे त्यायनं एक लोखंडाचा पेटी बसनं आन् उभं राहून वाजोता इन असा स्टॅंड बनवून आनला होता. त्याच्यावर पेटी ठेवून सुधाकर कदम ते वाजवे.

त्यावक्ती गनपतीत, दुर्गादेवीत कार्यकरमचं राहत म्हून मोठे जे मंडय असत त्यायच्या गनपतीच्या मूर्तीच्या बाजूले स्टेज तयारचं राहे, पन आमी फुकट कार्यकरम करतो म्हनल्या वरयी कोनी स्टेज द्याले तयार नोते. आखरीले गांधी चौकातल्या मंडयान होकार देल्ला. तेयी ओखयीच्यानं स्टेज देल्ला हेचं तं लय झालं. मले अजूनयी ते आठोलं का हासू येते का आमी सारे कलाकार भजनवाल्यासारके खाली गोलाकार बसून आन् डफये तवा बोंगो वाजवे त्यायच्यासाठी आमीचं फोल्डिंगची खुर्ची मांगून आनली होती तिच्यावर बसून पायात बोंगो घेऊन ते वाजवे. पन जसी यवतमायच्या लोकायले खातरी पटाले लागली तसे कार्यकरम भेटाले लागले. या शयराचा सभाव असा हाय पह्यले पारखते मंग पाठीवर शाबासकीची थाप देते आन् आखरीले कायजात बसवते. आपल्या मानसाची कदर करून त्याच्यावर जीव लावनं दुसर्‍या शयरानं आमच्या यवतमायकून सिकाव.

आमच्या मंडयात मानधन परकार नोता. सारे छंद म्हून येत होते. तवा कार्यकरमाचे पयसे असे भेटे किती म्हनानं? दोन-तीन वर्साच्या कमाईतून मुंबईवून सेकंड हॅंड अँकर्राडयन आन् कोंगो आनल्या गेला. अँकारडियनच्यानं आर्केस्ट्राची जरा शान वाढली. सुधाकर कदम आपल्या मनानचं ते वाजवन सिकला. थोडं थोडं नाव व्हाले लागल्यावर्त कार्यकरम वाढाले लागले आन् नावयी. आमचे अध्यक्ष गजापुरे कलेक्टर आफिसात होते आन् आमच्या परीस वयानं मोठे होते. पन असं काई पोरायनं आपल्या यवतमायच्या पोरायनं करावं यासाठी त्यायची सारी धडपड होती. त्यासाठी त्यायनं जयहिंद चौकापासी असलेल्या गुप्तेच्या मकानात खोली भाडय़ानं घेऊन घरची मोठी सतरंजी आनून तिथं आथरली आन् आमाले बसवलं. त्यायले तबला वाजवता येत होता, पन स्टेजवर्त ते कवा बसले नाई. त्यायले पुढं पुढं कराची आदत नोती, पन आपण मांग राहून सारं सांभाळून आमो पुढं कराचा त्यायचा सभाव होता. आमी सारे जवान पोरं, पन त्यायचा आमच्यावर कन्ट्रोल होता. तवा नईन गानं बसवाचं असलं म्हंजे गायक आन् वादकाची कसी सरकस होये हे आताच्या नईन पिढीतल्या जवान पोरापोरील समजनारचं नाई. एकतं तवा सेनीमाच गान आयकाचं म्हंजे एच.एम.व्ही. कंपनीचा गान्याचा जो तावा राहे तो रेकाड प्लेअरवर लावून आयकने. पन तसी सोय नसल्याच्यानं तो उपाव बाद. हे आयकाची सोय याच्यासाठी पाह्यजे होती का गान्याच्या पहल्या दोन ओयी आन् कडव्याच्या मंधात जे संगीत राहे ते बसवासाठी. त्यासाठी मग सुधाकर आन् हे गायक मंडयी विविध भारतीवर फरमाईसीत ते गानं वाजन्याची वाट पाहून वाजलं का ते कान देऊन आयकून ते पीस ध्यानात ठेवून मंग बसवाचं. होती का नाई कसरत?

आमच्या आर्केस्ट्रात सुधाकर कदम अँकारडियन, विष्णू वाढई व्हायलिन, दीपक देशपांडे, ढोलकी, तबला, डफळे, योगेश मारू कोंगो आन् मुकेवार महम्मद रफी, महेश शिरे मुकेश, शरद नानवटकर किशोर कुमार तं अविनाश जोशी 'वंडरबॉय' म्हून फेमस होता. त्यायचे चाहते त्यायचा आवाज आयकाले हजरी लावाले लागले. 'जहॉं डाल डाल पे-सोनेकी चिडीया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' या गान्यानं आमच्या कार्यकरमाची सुरवात मुकेवारच्या आवाजानं व्हाची आन् ते चुकू नये म्हून त्याचे चाहते आंधीपासून हजर राहाचे. तवा एखांद्या संगीतकाराचे एक-दोन सेनिमे हिट झाले का तेच गाने बसवा लागे. काऊन का, लोकायची फरमाईस चाले. एका सिझनले ओ. पी. नय्यरच्या गान्याचं मार्केट होतं आन् त्यातल्या काई गान्यात त्यानं सिक्सोफोनचे पिसेस वापरले होते. आता पंचाईत असी का आमच्यात ते कोनाले वाजोता ना ये. त्याच्यावर्त गजापुरे म्हनेत का, तुम्ही काळजी करू नका मी प्रयत्न करतो, त्यायनं काय केलं का एका बॅंड पार्टीतला त्यायच्या ओयखीचा गुनी कलाकार होता. त्याले इचारलं तं तो तयार झाला आन् अडचन सुटली. 

मी कार्यकरमाच्या दिसीचं बोरीवून संध्याकाळी येवो. त्या वर्सी आल्यावर माह्या ध्यानात आलं का एक कलाकार वाढला हाये. स्टेजवर्त घोडय़ाची जे नाल असते त्या आकाराची कलाकाराची बसायची वेवस्था राहे. समोरच्या भागाच्या एका कोन्टय़ात सुधाकर अँकारडियन लटकवून उभा राहे. मंधात गायकासाठी दोन माईक राहे. ज्याचं नाव घेतलं का थो गायक मागून येऊन माईक समोर उभा आन् त्याच्या थोडं मांग मी उभा आन् माह्या मांग थो नईन कलाकार गयात सिक्सोफोन घेऊन उभा. मी पुढच्या माईकवर जाऊन नाव सांगून मांगच्या कलाकारात थोड अंतर ठेवून पुढं तोंड करून उभा राहो. त्यानं गान्यात जवा त्याचा पीस वाजवला त्या सिक्सोफोनचं तोंड माह्या कमरीपासी टेकलं. मी थोडासा दचकलो आन् मले नवलयी वाटलं का इतकी कमी अंतर आमच्या दोघात नसूनयी ते तोंड आपल्या कमरीले भिडलं कसं? त्यायची माही ओयख नसल्यानं म्या त्यायले कायी म्हनलं नाई. मंग मी बराबर अंतर ठेवून उभा राह्यलो. पुढच्या गान्यात जसं त्याच पीस आलं ते तोंड माह्या कमरीले टेकलं. सगया कार्यकरमात असं पाच-सात खेपा झालं. म्या तयाले काई म्हनलं नाई पन अंतर ठेवूनयी असं काऊन होते हे माही तिकडं पाठ असल्यानं मले कायी दिसे नाई. 

म्या कार्यकरम झाल्यावर अध्यक्षाले ते सांगतलं. ते म्हने मी पाहतो दुसर्‍या दिसी कार्यकरमासाठी बोरीवून मी मंडयाच्या आफिसात आलो तं मले गजापुरे सायेब जरा एकीकडं घेऊन गेले आन् सांगाले लागले, ''बाबा, त्याची अडचन काय हाय का एक पाय पुढं टाकल्यासिवाय त्याच्या तोंडून फुकचं निंघत नाई आन् त्यानं एक पाय पुढं टाकला का त्या सिक्सोफोनचं तोंड तुह्या कमरीले टेकते.'' म्हणलं टेकू द्या काई हरकत नाई. शंका फिटली. माहा एक दोस्त एस.टी.त कन्डक्टर हाय. त्याले आपल्या सारकं सुदं बसून लेयताचं येत नाई. खालचा कागद हालल्यासिवाय त्याचे अक्षरचं उमटत नाई. आदतसे मजबूर अखीन काय? हे थोडीसी गंमत झाली पन मले खरं तं त्यावक्तीची त्यायची मेहनत तुमच्या ध्यानात आनून द्याची होती. आता सारं सोपं झालं. सिंथेसायझर या वाद्यातून अनेक वाद्यायचे गिटार, बासरी असे आवाज काढता येते तवा लहान-लहान गोठीसाठी अडून बसा लागे म्हून त्या कलाकारायच्या जिद्दीची कमाल वाट्टे. त्या कलाकाराले सलाम ! एक सांगू, ज्याचा आवाज त्याच्यातूनच निंघाला का सुदं वाट्टे!

(लेखक शंकर बडे   हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment