Monday 6 August 2012

बदलता समाज

A A << Back to Headlines     
स्थलांतर करणं, दैनंदिन जगण्यात पोटासाठी घर सोडून दुसरीकडे जाणं, हा प्रत्येक जीवमात्राचा नैसर्गिक गुणधर्म आहे. खरं म्हणजे ती गरजही आहे. एकाच ठिकाणी कोणाची प्रगती होत नाही. नदीचं वाहतं पाणीसुद्धा एकाच ठिकाणी तुंबून राहिलं तर ते मचाळतं, शेवाळतं, दूषित होतं. माणसाचा बौद्धिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हायचा असेल तर त्यालासुद्धा सारखं नव्या दिशेच्या शोधात राहावं लागतं तेव्हाच नव्या वाटा गवसू शकतात.

ज्यांनी आपला मूळचा प्रदेश सोडून दुसरीकडे स्थलांतर केलं त्यांचाच विकास नव्या भूमीवर झपाटय़ाने झाला. हे इतिहासातील अनेक उदाहरणांवरून कळून येते. यवनांच्या स्वार्‍या, इंग्रजांचं आगमन यामुळे भारतात झालेलं परिवर्तन आपल्याला माहीत आहेच. परकीय भूमीत जायचं तर तिथे स्थिर होण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करावा लागतो. एक तर नम्रपणे स्थानिक लोकांची सेवा करून त्यांची मने जिंकून घेऊन तिथं बस्तान बसवायचं किंवा पराकोटीचं क्रूर होऊन आक्रमण करून तिथल्या लोकांत दहशत पसरवायची. मूळच्या लोकांना हाकलून लावायचं. याच पद्धतीने भारतात आलेल्या आक्रमकांनी आपली पाळेमुळे या भूमीत रोवलेली दिसून येतात.

प्रत्येक काळात भ्रमंतीचे आणि नव्या भूमीत स्थलांतरित होण्याचे संदर्भ वेगवेगळे असतात. जसे अर्थसत्तेसाठी आक्रमक लोक नव्या भूमीचा शोध घेतात त्याचप्रमाणे नव्या भूमीत आपल्या धर्मसत्तेचा प्रभाव पाडण्यासाठी धर्मप्रसारक जात असतात. अर्थात, हा दुसरा मार्ग अहिंसेचा आणि मनमिळवणीचा असतो. बौद्ध धर्म, जैन धर्म जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचला तो वाक्चातुर्य असणार्‍या धर्मप्रसारकामुळे. महानुभाव पंथाची मुहूर्तमेढ रोवून त्या धर्माचा प्रसार करण्यासाठी चक्रधर स्वामींनी आयुष्यभर भ्रमंती केली. ज्या गावखेडय़ात ते गेले तिथे त्यांनी आपल्या आचारविचाराने लोकांना प्रभावित केले. स्वरूपदर्शन विद्या आणि वयस्तंभिणी विद्या ह्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अद्भुत गुणदर्शनामुळे त्यांना दैवत्व प्राप्त झाले.

परक्या भूमीत जाण्यासाठी माणसाने पाळीव प्राण्यांचा फार चातुर्याने उपयोग करून घेतला. प्राचीन काळात व मध्ययुगीन काळात घोडा, उंट, बैल, हत्ती, गाढव, खेचर अशा जनावरांच्या माध्यमातून माणसाने केवळ प्रवासच केला असे नाही तर युद्धभूमीतही यश संपादन केले. याचाच अर्थ असा की, माणसाच्या भ्रमंतीच्या काळात त्याच्या प्रगतीला त्याचे बुद्धिचातुर्य कारणीभूत ठरले आहे. 'बळी तो कानपिळी' अशा बलशक्तीच्या काळात त्याच्या मनगटातील बळ त्याला यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरले. पण जागतिक पातळीवर पसरलेल्या औद्योगिक क्रांतीच्या काळात सत्तासंपादनासाठी बळशक्तीचा वापर हे सिद्ध निकष बदलले.'बळा'ऐवजी त्याची बुद्धी प्रभावी ठरू लागली.

बुद्धीच्या बळावर दळणवळणाच्या क्षेत्रात त्याने अपूर्व असे स्तिमित करणारे वाहनांचे शोध लावले. जमिनीवरूनच नव्हे, तर पाण्यातून आणि आभाळातून म्हणजे जलमार्गे आणि हवाईमार्गे तो नव्या भूमीकडे झेपावू लागला. नवनवीन यंत्रांच्या माध्यमातून भौतिक जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल अशा गोष्टी सिद्ध झाल्या. औद्योगिकीकरणात शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. वेगवेगळय़ा क्षेत्रातील ज्ञान संपादन करून उपजीविका तर करता येतेच, पण आपले जीवनसुद्धा समृद्ध आणि सुखी बनवता येते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरीसाठी आपली भूमी सोडून जाणार्‍यांची संख्या वाढली. नवा धर्म, नवा समाज, नव्या भूमीत स्थलांतरित झाला तरी तो आपला धर्म, आपली जात, आपले रीतिरिवाज यांच्याशी घट्टपणे बांधलेला होता. त्यामुळे विवाह जुळविण्यासाठी नवे गणगोत्र निर्माण करण्यासाठी त्याला पुन्हा आपल्या प्रदेशाकडेच वळावे लागत होते. रोटी व्यवहाराप्रमाणेच समाजव्यवस्थेचा अविभाज्य घटक असणारा बेटी व्यवहार करण्यासाठी माणसाला चारीमेरा फिरून आपली कुटुंबसंस्था अबाधित राखावी लागत होती.

जसजशी दळणवळणाची गरज वाढू लागली तसतसे नवीन साधने आलीत. मोटार, कार, सायकल, बाईक ह्या वाहनांची रस्त्यावर महामूर गर्दी वाढली. डिझेल, पेट्रोल हे जीवनाचे अविभाज्य घटक बनले. वाहतुकीचा सगळय़ात मोठा परिणाम असा झाला की, गावे शहरांना जोडली गेली. खेडी गावांना जोडली गेली. त्यातून पक्के रस्ते तयार होत गेले. सर्जनशील भुईच्या पोटात पाणी, गिट्टी, सिमेंट, डांबर या माध्यमातून कायमचे पक्के वळ उमटवले गेले. त्यावरून ग्रामीण माणूस शहराकडे आकर्षित होण्याचे प्रमाण वाढले. इथला झगमगाट, इथली भौतिक साधने, इथला चंगळवाद माणसाला भुरळ घालू लागला.

स्वातंर्त्योत्तर काळात दूरवर पसरलेला, केवळ शेतीवर अवलंबून असणारा माणूस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून, राजकीय निवडणुकीच्या माध्यमातून शहरांशी जोडला गेला. जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या बाबी त्याच्या जगण्याच्या भाग बनल्या. कोर्टकचेर्‍या, सिनेमागृह, हॉटेल्स, शाळा, कॉलेज, दवाखाने इत्यादी बाबींमुळे मानवीजीवन अधिक गतिमान झालं. मूळची जागा सोडून दैनंदिन कामासाठी इतरत्र जाणं, हा त्याच्या जीवनाचा अपरिहार्य भाग बनला.

जसा हा बदल इतर क्षेत्रात घडून आला तसाच तो शेतीच्या व्यवसायाच्या संदर्भातसुद्धा घडून आला. पूर्वीची शेती ही स्वावलंबी आणि ग्रामकेंद्रित होती. देशी बियाणे गावातच शेतकर्‍यांच्या घरात उपलब्ध असायचे. हंगामाच्या वेळी निवडक शेतकरी कणसे, शेंगा, ओंब्या, घाटे वेगळे काढून त्यातलं दळदार बियाणं, कडूनिंबाचा पाला आणि राख टाकून कणग्यांना पेंड घालून टिकवून ठेवलं जायचं. रोहिणी नक्षत्रात आभाळ आंडे गाळायला लागलं की, शेतकर्‍याच्या घरातल्या स्त्रिया त्या बियाण्यांची साफसफाई, पाखडपुखड करताना घराघरांच्या अंगणात दिसून यायच्या. शेतकरी औताफाटय़ांची दुरुस्ती करण्यासाठी सुतारा-लोहाराच्या कामठय़ावर जाता-येताना दिसून यायचा. हाराकीचं युग येण्यापूर्वीची शेती म्हणजे हायब्रिड, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा शेता-रानात अजिबातच वापर केला जात नव्हता. त्या काळातील शेतकरी पेरणीच्या काळात गाव सोडून अजिबात कुठे जात नव्हता. बेभरवशाच्या शेतीच्या धंद्याला ईश्वरी आशीर्वाद मिळावा म्हणून संयुक्त कुटुंबातील बाप, भाऊ, पोरगा असे आलटूनपालटून दिंडय़ामधून पंढरीला जात तेवढाच एक अपवाद. मात्र त्यामागची भावना ही निखळ आध्यात्मिक असायची. हौसेमौजेचा त्यात भाग नसायचा. कष्टकर्‍यांचा देव विठ्ठल, त्याचे आशीर्वाद घेऊन आलो नाही तर कुणबिकीला बरकत येणार नाही. अशी पिढय़ान्पिढय़ांपासून घरात पोसली गेलेली मानसिकता त्याला कारणीभूत असायची.

आजच्या पेरणीच्या दिवसाकडे पाहिले तर मात्र ग्रामीण समाजजीवनातून त्या सगळय़ा बाबी हद्दपार झाल्याचे दिसून येते. आज बांधावरच्या झाडातला पाऊस भिजला, मोहरून आलेल्या पावशा पक्षी 'पेर्ते व्हा' म्हणत असतो आणि गावशिवारातला शेतकरी, बॅंकेमधून कर्जासाठी, बियाण्यांसाठी, खतांसाठी कृषिकेंद्राभोवती चकरा मारत असतो. घर सोडून अंगण पारखं करीत असतो. मानवीजीवनातील भ्रमंतीचे, स्थलांतरांचे संदर्भ असे नित्य बदलत असतात. भूमी तीच असते. माणसाचे वर्तन, त्याच्या वर्तनाचे कार्यकारणभाव नेहमीच बदलत असतात. असेच बदलत्या समाजरचनेनुसार बदलत राहणार असतात.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान'

या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment