Wednesday 29 August 2012

फिकीर कराची नाई!


कार्यक रमाले तवा जुनी गाडी घेऊन आमी बाहेरगावी जावो. थे जुनाट झालेली गाडी तिच्या तब्यतीच्या हिसोबानं चाले. आखरीले सुरूडुरू करत ते गाडी त्या गावाले थांबली. ते गाव म्हंजे स्टॅँडवर्त दोन लहान हटेल आन् गाव थोडसं आतनी. आमच्या कलाकारायले वाटलं का उसीर झाला म्हून लोकं आपली वाट पाह्यत असनं म्हून त्या तोर्‍यात जवा हे खाली उतरले तं खाली एकयी मानूस वाट पाहत नोता. यायची हवाचं निघून गेली. मी सुधाकर संग त्या हटेल पावतर गेलो तं भट्टीपासी बसलेल्या मानसानं मुंडकं हालवून 'या' म्हनलं. म्या मनात म्हनलं हा मुंडकंच हालवते हातनयी या म्हनत नाई? मंग वाटलं हा त्या मंडयाचा होय का नाई आपल्याले का मालूम. थो मुंडकं हालवते हेच खूप झालं. म्या तिथं गेल्यावर इचारलं, ''भाऊ, त्या नवदुर्गा मंडयाचं इथं कोणी हाय का?'' त्याच्यावर्त ते म्हने,''मंग म्या उगीचं मुंडकं हालवलं का? ''आमी आलो हे सांगाले आलो.'' ''मी तुमच्याचंसाठी आलो,'' असं म्हनत तो उभा झाला. डावा हात खांद्यावर ठेवत आन् उजव्या हाताचा पंजा माह्या तोंडासमोरून फिरवत तो म्हने, ''हे पाहा सायेब, मी तुमाले सांगतो फिकीर कराची नाई.'' म्या म्हणलं, ''मी कायले फिकीर करू?'' तो म्हने,''सांगून राह्यलो, मी हावो ना! च्या पेता का?'' म्या म्हनलं, ''आता च्याचा टाईम हाय का?'' तो म्हने, ''इचारून राह्यलो, म्हनानं पुसलयी नाई, चाला.'' म्या हटकलं, ''हे वाद्य ठुवा लागन ना.'' ''त्याच्यावर्त थो, हडट राज्याहो म्या तुमाले सांगतलं ना फिकीर कराची नाई, चाला.''

तो पुढं त्याच्या मांग आमी बारा- तेरा कलाकार असा ताफा निंघाला. गाव लागल्यावर तो आमाले या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून पुढच्या गल्लीत असा फिरवून राह्यला. म्या सुधाकरले म्हनलं, ''कारे, हा आपल्याले असा फिरवून पांदनीतून बाहेर तं नाई काढून दिन?'' ''इचारू का?'' सुधाकर म्हने. राहू दे तो आणखी म्हणल,''फिकीर कराची नाई.'' तितल्यात एका घरासमोर कायी मंडयी दिसली तवा माह्या जीवात जीव आला. ते त्या मंडयाच्या अध्यक्षाचं घर होतं. समोर दोन बकेटात पानी, बाजूले पाटं, पाटापासी साबना असा इंतजाम पाह्याल्यावर म्या सुधाकरले म्हनलं, ''हे तं सोयरीकीच्या पावन्यासारकी सोय दिसून राह्यली. यानं चुकीनं तं आपल्याले नाई आनलं? इचारू का? ''त्याच्यावर तो म्हने, ''मुकाटय़ानं बस.'' आमी बैखटीत पाह्यतो तं गादीले गादी लावून वरतं पांढर्‍याभक चादरी भितीकून कुठी तकिया, कुठी लोड. लोड कमी पडला तिथं गादी गोल गोल गुंडायून त्याचा लोड. उरोटय़ाले पुरोटा कसा लावावं ते खेडय़ातल्या मानसालेचं समजते.

आमी बैखटीत गाद्यायवर जाऊन बसतं नाई का एक कार्यकर्ता सार्‍यायले पानी पाजून गेला आन् बैखटीत आमचे आमीचं फकस्त. आतनी बोलल्याचा आवाज ये. बैखट आन् घर याच्या मंधात जे दाठ्ठा (दार) होता त्याले पडदा लटकून म्हून अंदरचं काई दिसे नाई. तो पडद्याचा कपडा काटनचा असल्याच्यानं धुतल्यावर आकसला असनं म्हून खालून हित हित आखूड झाला होता. त्याच्याच्यानं अंदरच्या मानसायचे फकस्त पायाचे पंजे दिसत बस्स. आमी बसून बसून कटायल्यावर्त जसे पडद्याखालून मले दोन पाय दिसले तं मले नाई राहवलं. म्या देल्ला आवाज, ''ओ भाऊ'' तसा पडदा बाजूले सरकला आन् डावा हात कमरीवर आन् उजव्या हाताचा पंजा फिरवत, ''हट राजे हो, तुमाले भेटल्यापासून सांगून राह्यलो ना! फिकीर करायची नाई. बसा.'' आन् तो अंदर.

अंदूरन वारा वाहाले लागला का असा सुवास नाकाले फोडनी दे का, काई इचारू नोका. त्याच्याच्यानं भूक अनखीनचं भुकीजल्यावानी झाली. उपासी मानूस आकातल्यावानी हटेलातल्या तयून ठुलेल्या आलूबोंडय़ाकडं पाह्यते तसे आमी मंधा मंधात त्या पडदा लावलेल्या मंधातल्या दाठ्ठय़ाकडं पाहो. आखरीले पडदा हालला आन् चाला जेवाले म्हनल्याबराबर आमी शाया सुटल्यावर पोट्टे जसे भरभर घराकडं पयते तसे आमी आतनी. आतनी गेल्यावर्त पाह्यतो तं काय पाह्यतचं राहावं असा इंतजाम. दोनी भितीकून चांगल्यावाल्या पट्टय़ा आथरून सामोर पाटं. पाटावर ताट मांडून. रांगोया काढून मंधा मंधात वल्या मातीचा घट गोया करून त्याच्यातनी दोन-दोन मस्ताना उदबत्त्या खोसून. ते सारं पाहून आमी सारे खूस झालो. माह्या उजव्या बाजूले सुधाकर आन् डाव्या बाजूले महेश शिरे जो मुकेसचे गाने म्हने तो गायक बसला होता. ताटात पाह्यतो काय तं चुलीवर्त शिजलेलं वाफा निंघनारं सादं वरन. एका वाटीत आलू-वांग्याची रस्याची भाजी, मिठाच्या बाजूले तियाची चटनी, फुरका माराले आमसुलची कढी, भजे, नरमलच पोया आन् गोड म्हून बुंदीचे लाडू. याले म्हंते पाहुनचार मनापासून केलेला. घ्या कवा म्हन्ते म्हून आमी वाट पाहत असतानी कोन्टय़ात उभ्या असलेल्या त्या मंडयाच्या कार्यकर्त्यानं श्लोक सुरू केला, ''वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे.. श्लोक झाल्याबराबर 'पंढरीनाथ महाराजकी जय..' सार्‍यायनं एका सुरात म्हनल्याबराबर काई तं घ्या म्हनाच्या आंधीच सुरू झाले. आता तुमाले एक सांगू का? सांगू नोका कोनाले. आपली आपल्यातचं ठेव जा. म्यातं श्लोक चालू असतानी ताटातले भजे पाहून राहवलं नाई म्हून एक भजा गुपचूप देल्लाच तोंडात टाकून.

आता खरं तं आमी सारे वयानं पोट्टेसोट्टेच आन् इतकं सुंदर जेवाले भेटल्यावर कोनी ढकलं करते का? त्यातनी वाढनार्‍यायचा आग्रव नातलगासारका. घ्यानं इतल्यान काय होते. नाई म्हणाले गेलं तं, ''इतला एक लाडू जादा होते का?'' असं चालू असतानी एकजन आला 'भजे, भजे' करत. माह्या डाव्या हाताले शिरे बसून तो गायक म्हून तो म्हने, ''भाऊ, मला भजे नका वाढू.'' वाढनारा म्हने, ''चार भज्यानं काय होते.'' म्या इचार केला, ''तयलेले भजे खाल्ल्यानं गयाले तरास झाला तं काय करता? म्हून म्या खालच्या मुंडक्यानं सांगतलं,''ओ भाऊ, त्याले भजे वाढू नोका.'' तसा मले ते भज्याचं टोपलं खाली ठुल्याचा ठप्कन आवाज आला म्हून म्या वरतं पाह्यलतं त्याचा डावा हात कमरीवर आन् उजव्या हाताचा पंजा माह्या तोंडासमोर फिरवत म्हने, ''हट राजे हो, मी सांगून राह्यलो ना फिकीर कराची नाई!'' म्यायी त्यायले पाह्यल्यावर म्हनलं, ''मले काय माईत तुमी हाय म्हून. वाढा लेकाले वाढा पाह्यल्या जाईन बिलकूल ढकल करू नोका.''

इतकं ठासून जेवन झालं होतं का त्या आडव्या गाद्या उभ्या करावं आन् द्यावं तानून इतकं पोटभर झालं होतं, पन इलाज नोता. बैखटीत पानदानयी इतकं अपटूडेट का अस्मानतार्‍यापासून इलायची पावतर. थोडासा आराम करून आन् तार वाद्य सुरात लावाले टाईम लागते म्हून आमी स्टेजकडे निंघालो. स्टेजवर चढलो आन् लाऊडस्पिकरवाल्याले माईक मांगतला तं त्यानं एक चपटा माईक पावरफुल जर्मनचा होय म्हून माह्या हातात देल्ला. सामोर पाच-सा बाया, सात-आठ मानसं बसून होते. सार्‍या तयारीत पंदराईस मिन्ट गेले. साडेअकरा वाजाले आले तरी कोनाचाच पत्ता नाई. झोपले का म्हनलं मंडयवाले. म्या लाऊडस्पिकरवाल्याले इचारलं चालू कराचं का? थो म्हने तुमच्या मनानं. जसी आमची टायटल टय़ुन चालू झाली तसे आठ-दहा जन बंद करा, बंद करा असे बोंबलत धावत आले. आर्केस्ट्रा बंद झाला तसे ते पोचल्याबराबर म्हनाले लागले, ''आमचे भांडन लावता का तुमी? ''म्या म्हनलं, ''आमी कसे काय भांडन लावनार?'' मंग त्याच्यातला एकजन म्हने, ''अवो आमच्या गावात दोनचं मंडय हाय आन् आमचं आपसात असं ठरलं हाय का एक दिवस आमचा आन् एक दिवस त्यायचा पह्याले कार्यकरम मंग दुसर्‍या मंडयाचा. आज त्या मंडयाचा पह्यला नंबर हाय तिथचं किरतन सरलं का लोकं इथ येतीन. मंग आपला कार्यक्रम सुरू होईन, समजलं? तवा मांगून येनार्‍यानं याले बाजूले सारत पुढं आला तं डावा हात कमरीवर आन् उजव्या हाताचा पंजा फिरवत तो म्हने, मी मंघापासून तुमाले सांगून राह्यलो का फिकीर कराची नाई. आपल्याले टाईम हाय.'' म्या म्हनलं, ''टाईम हाय हे कवा सांगान?'' तो म्हने, ''मले काय मालूम तुमी घाई करान म्हून. जाऊ द्या आता. थोडं थांबा आन् भाऊ फिकीर कराची नाई!

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment