Wednesday 28 November 2012

चंद्र वाटे तिला 'चायना'चा खरा!


दिल्लीत तिकडे संसदेचे अधिवेशन सुरू झाले. महाराष्ट्रातही विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. अधिवेशन म्हणजे तरी काय? नुसता गोंधळच! विरोधासाठी विरोध करणे. कामकाज बंद पाडणे, गोंधळ घालणे आणि एकमेकांवर वाटेल तसे आरोप-प्रत्यारोप करणे! जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा! प्रश्न किती सोडवले जातात हा संशोधनाचाच विषय आहे.

पुन्हा विदेशी गुंतवणुकीचा विषय संसदेमध्ये गोंधळ घालतोय. मागच्या अधिवेशनात 'लोकपाल'च्या नावाने धिंगाणा सुरू होता. खरंतर अण्णा हजारे म्हणतात तसा लोकपाल कॉंग्रेसलाही नको आहे, भाजपलाही नको आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहे. पण चोरांच्या उलटय़ा बोंबा म्हणतात तसा हा प्रकार. सारे पक्ष आपला-आपला धंदा करण्यात गुंतलेले आहेत. विश्वास कुणावर ठेवायचा हाही प्रश्नच आहे.

आपली आपण। खात जावी पोळी।

आपलीच टाळी। वाजवावी।

कुणासाठी उगा। सोसू नये ताप।

आपलाही बाप। बाप नोहे।

जगाच्या भल्याची। वाहुनिया चिंता।

आपुलीच चिता। रचू नये।

अंधारात मेला। जरी गाव सारा।

आपुला निखारा। देऊ नये।

देऊ नये काही। घेऊ नये काही।

शुद्धीवर नाही। जग बापा।

अवतीभवतीची सारी परिस्थितीच पार नासून गेलीय! म्हणूनच माणसं पूर्वी संन्यास घेऊन रानावनात निघून जात असावीत बहुधा! आता रानावनात जात नाहीत कुणी. पण समोरच्याचा कायमचा काटाच काढून टाकतात. उजळ माथ्यानं समाजात मिरवतातही! समाजही सलाम ठोकतो अशा लोकांना! सज्जनांचा कुणी वाली नाही!

ज्याच्या हाती लागलं तोच आपले हात धुऊन घेतो. हवा तसा सूड उगवून घेतो. दिशाभूल केली जाते जनतेची. जनताही मेंढरासारखी लांडग्यांच्याच मागे लागते.

अनेक मिल बंद पडलेल्या आहेत. पगारवाढीच्या नावानं कामगारांना भडकवलं जातं. कामगार नेतेच दलाली करतात. मिल बंद पाडतात. मजूर देशोधडीला लागतात. संसार उघडय़ावर पडतात. मिल बंद झाली की त्याच जागा बिल्डरांना विकल्या जातात. मोठमोठे मॉल्स त्या ठिकाणी उभे राहतात! या कामगार नेत्यांना जाब कोण विचारणार? दलाली करणार्‍या पुढार्‍यांना हिशेब कोण मागणार? इमानदार नेत्यांनी सांगितले तर कामगारही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत!

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचं तसंच झालं. प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची बोंब झाली. न्यायालयानेही लिलाव करण्याचे आदेश दिलेत आणि प्रत्यक्ष लिलाव झाल्यावर सारेच फुगे फुटले. त्या समितीचे अध्यक्ष असलेले लोक आता स्वत:चे तोंड लपवत फिरत आहेत. एकदुसर्‍यावर जबाबदारी ढकलत आहेत. पण एकाही नेत्याने आपली चूक कबूल करण्याचा मर्दपणा दाखवला नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वत:चा राजीनामा देण्याची हिंमत दाखवली नाही.

महाराष्ट्रात एन्रॉनच्या बाबतीतही तसाच प्रकार झाला होता. माझा हिस्सा किती? एवढय़ाचसाठी सारे तमाशे सुरू असतात! एफडीआयच्या बाबतीतही तेच चाललंय!

काळ नाही बरा, छंद नाही बरा

चंद्र वाटे तिला 'चायना'चा खरा!

आपले चांदणे शुभ्र नाही म्हणे

रे! दलाली करा, माल त्यांचा भरा!

ह्या विदेशी नद्या केवढय़ा चांगल्या

मेघ का जाहला कावरा बावरा?

आग ठेवायला फ्रीज देतात ते

आगही वापरा..बर्फही वापरा!

खेकडय़ांच्या पहा चालल्या बैठका

या तळय़ाची म्हणे वाटणीही करा!

खेळण्यासारखी थांबली माणसे..

यार! कोणीतरी एक चाबी भरा!

माणसंही आता थिजून गेलीत. विझून गेलीत! देशाचं काय वाटोळं झालं तरी कुणाला काही देणंघेणं नाही. आम्ही आपल्या बायकापोरांमध्येच खूश आहोत.

पुन्हा या अधिवेशनाच्या निमित्ताने मोर्चे काढले जातील. पुन्हा झिंदाबाद-मुर्दाबादचे नारे लावले जातील. पण सामान्य माणसांचे प्रश्न मात्र तसेच राहतील.

प्रामाणिक नेत्यांच्या तोंडाला पाने पुसली जातील. विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चातील नेते स्वत:चे फोटो काढून बातम्या आल्या की खूश होतील. पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या पराक्रमाचे रंगवून रंगवून वर्णन करतील. कुणाची पदं पक्की होतील. कुणाची पुढच्या निवडणुकीसाठी तिकिटं पक्की होतील. मोर्चात सामील होणार्‍या कार्यकत्र्यांच्या हातात काहीच पडणार नाही.

तशी वेळच आली तर त्यालाच लाठय़ा खाव्या लागतील. गोळ्याही खाव्या लागतील. अशा वेळी नेते मात्र नेमके सहीसलामत राहतील. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

तुमचे मोर्चे, तुमचे गाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

तुम्ही पुढारी भले शहाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

मार खायचा आम्ही, आणिक नाजूक वेळी-

हळूच तुमचे पळून जाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

काय सांगायचं? काय बोलायचं?

शेवटी लोकांनाही 'चायना मार्केट'चाच माल आवडतो!

आम्ही लोकशाहीसाठी खरंच लायक नाही आहोत का? हाच प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावतो!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

Tuesday 27 November 2012

ये फेविकाल का जोड है..


शंकर बडेमाही आजी आमी सारे जन तिच्या भवताली बसून गोठी आयकत असलो आन् गोठीतून गोठ निंघत गेली आन् नावातनी काय अस्ते असा इसय निंघाला का ते म्हने, 'पाहा घरात लेकरू जल्माले आलं का सगयाले हरीक होते. मंग त्याचं नाव काय ठुवाचं म्हून हरेक जन आपल्याले आवडनारं नाव सांगते. त्याची काकू म्हन्ते, नारायन ठुवा. देवाचं नाव हाय. त्या मिसानं आपल्या तोंडात अनायसे देवाचं नाव येते. तं त्याच वक्ती दुदासाठी आलेली सेजीची धुरपती म्हन्ते, काय बापा आता, आपल्या वक्ती माह्य धुरपती काय, तुमचं सरोसती काय, पन आता वानावानाचे नाव सापडतेत. त्यातून ठुवा एखांदं नईन नाव. मंग म्या म्हनलं, अवो किती सुदं नाव निवडून ठुवा. पन त्याच्या नावाचा सातबारा दुसर्‍याचं नावानं निंघते. म्हंजे कसं? पाहा आपन मोठय़ा हौसीनं नाव ठुतो. सुधाकर पन या नावानं त्याले कोनी हाका मारते का? हे कवतुकानं ठेवलेलं नाव राह्यते बाजुले आन् त्याचा होते पिंटय़ा, बंडय़ा होतेकानी? आपन बारस्याले एक नाव ठुतो आन् मंग जलमभर त्याले नावंच ठुत राह्यतो.'

आमच्या खेडय़ाचं एक गनित असं हाय का नावाचं किती इचकाइंदन करता ईन. त्याच्या बाबतीत आमी कोनाले आमच्या पुढं नाई जाऊ देत. काई नावं तं इतके मोडूनतोडून ठुतो का याचं असली नाव काय होतं हे माईत करून घ्याचं असनं तं शायेतच जाऊन पाहा लागते. असा ईल्या म्हनल्यावर्त येते अंदाज त्याच्या ओरिजीनल नावाचा? नाई ना, पन तुमी बोरीत जर सामोरच्याले इचारलं, 'कारे ईल्या दिसला का?' तं सामोरचा इचारते, कोन्ता? म्हंजे पावडय़ाचा, कावरेचा का काकडेचा? काऊ न का ईल्या एकचं थोडी राह्यते. मी तुमाले सांगतो ना, जवा राजकपूरचा जमाना होता ना आन् त्याचं ते गानं 'मेरा नाम राजू' इतलं फेमस झालं होतं का घरात लेकरू झालं का त्याचं नाव राजू. या नावाचं इतकं बंबाट मार्केट होतं का काई काई घरात दोन दोन राजू. पाहा असं होते. सांगाचं काय होतं आन् सांगत काय बसलो.

जसा ईलास (विलास)चा ईल्या होते तसा बयवंता (बळवंता)चा बल्या हे झालं. नावाची तोडमोड मंग अखीन एक दुसरा परकार. त्याले नावाचं काई देनघेनं नस्ते. जसं डंगर्‍या, चिलूट, पोटय़ा, डोम्या असे परकार कवा रंगावून, कवा सभावावून असे नाव पडते. कवा कवा हे नाव इतले चिपकून जाये का इचारू नोका. काई काई टोपननाव. नुस्त नाव तेयी इतक्या मोठय़ा मानसाचं कसं घ्यावं म्हून मंग भाऊ, अन्ना, सायेब याचा वापर आपन करतो.

या टोपननावावून माहंच मले आठोलं का माय असतानी सांगे का, ' तुह्या बारस्याच्या दिसी काय झालं, का सांजीले दहापंदरा नावं ठुवासाठी जमल्या. तवा साथरीवर्त तू रडाले लागला. तं मायीनं मामीले वाटलं बायायच्या आवाजानं याची झोपमोड झाली असंन म्हून हा रडत असंन म्हून गाईù गाईù म्हनतं ते थोपटाले लागली. पन पोट्टं रडनं काई थांबत नोतं. तरी तुले नईन आंगडंटोपरं घालून सजवलेल्या पायन्यात टाकून त्यायचं चालू झालं. कोनी गोईंद घ्या, कोनी गोपाय घ्या, मंग ठरलं होतं का तोहं नाव शंकर ठुवाचं म्हून. पारबता मामीनं तुह्या कानापासी तोंड नेत शंकर कुर्र करत पायन्यात टाकलं. पन तू अखीनचं जोर्‍यानं रडाले लागला. पायन्यात मुंगी तं नाई डसली म्हणून खालची तालगी झटकली आन् मंग तुले निजवलं आन् झोके देनं चालू केलं. पन तू काई चूप बसाचं नाव ना घे. मंग कोनीतरी म्हने, दीठ काढा लागते. तं इठा मावसी म्हने, दीठ तं काढाचं, पन मले सगून पाहू द्या. काई दिसा आंधी तुहे आबा गेले आन् तुहा जलम झाला. म्हून

मावसीले वाटे का आजा मेलान् नातू झाला. आता मावसीच्या आंगोठय़ाच्या घामानं त्या उलटय़ा उभा केलेल्या परातीले तो तांब्याचा ढब्बू पयसा चिपकला असनं पन चिपकलेला पयसा पाह्यल्याबराबर सार्‍याजनी म्हने, पाहा मामजीचं आले बाईच्या पोटात आन् तोहं दुसरं नाव ठुल्या गेलं 'बाबा'. घरातले सारे त्या नावानं हाका माराले लागले. मंग दोस्तयी 'बाबा' म्हनाले लागले.

मी गाव आन् घर सोडून यवतमायले 1982 साली सारा बारदाना घेऊन आलो. तवा मोठी पोरगी भारती पाचव्या वर्गात, नितू तिसरीत, गजू पह्यलीत आन् कीर्ती त्यापरीस लहान. आमचे चारयी सख्खे पोरं मले 'काका' आन् बायकोले 'काकू' म्हनत. त्याले कारन असं होतं आमी बोरीले मोठय़ा भावासंग राहो. त्यायचे पोरंपोरी आमाले काका-काकू म्हनत. त्याच्याच्यानं आमचे पोरयी आमाले काका-काकू म्हनाले लागले. त्याले आमी बदलावाच्या भानगडीत काई पडलो नाई. आमी पेशवे प्लाटमधे घर घेऊन राहाले आलो तं शेजार्‍यायले, नईन नईन नवल वाटे, का भावाच्या पोरायले किती पिरमानं वागोतेत. मंग काई दिसानं ओयख झाल्यावर्त त्यायले माईत झालं. पोरायचं काका-काकू त्यायच्या पावतरचं राह्यलं. नाईतं आमचे तीनयी जवाई काका-काकूचं म्हन्तेत. हे असं जरी झालं तरी आखरीले ते आमच्या घरा पावतरचं राह्यलं. बाकी जगासमोर शंकर बडे या नावानंच ओयख झाली आन् कायम हाये. हे माह्य झालं. पन काई लोकायले लोकायनं देल्लेलं नाव असली नावावर असं चिपकते का ओरिजीनल नाव नुसतं कागदोपत्री आन् सहीपुरतचं शिल्लक राह्यते. कसं, ते सांगतो.

तुमी यवतमायले आले आन् अख्खं गाव हे इचारत फिरले का चंपालाल बन्सीलाल पंडित कुठं राह्यते? तं मले नाई वाटत का त्यायच्या दुकानाचा पत्ता तुमाले कोनी सांगनं. पन तुमी जर हे इचारलं, का मामाचं दुकान कुठी हाय? तं लहानसी पोरगी तुमाले बराबरं सांगनं. काऊन का, तेचं मामाचं गिर्‍हाईक होय. सन 1979 पासून मामाचं गोया-बिस्कूटचं दुकानं महिला शायेच्या सामोर हाय. त्याच्या आंधी पंचवीस वर्स ते देवयीतून इथं मोठय़ा बयनीकडं आले जवायाचं दुकान संभायाले आन् तवापासून जे जे गिर्‍हाईकाचे मामा झाले ते अजूनही. काई अडचनीनं 'आशा जनरल' नावानं असलेलं दुकान बंद झालं आन् मंग सोताचं लहानसं दुकान शाये म्होर सुरू केलं. सामोरची शाया पोरीयची असल्यानं त्या चिमन्यायनं 'मामा' हे नाव अखीन अभायभर करून टाकलं.

सुरवातीले मामानं दुकानं टाकलं. पन पयस्याची अडचन. मंग त्याच्यावर्त उपाय म्हून उकयलेले बोरं इकाचं त्यायनं ठरोलं. त्याची एक पद्घत अस्ते. ते चुलीवरचं शिजवा लागते आन् त्यासाठी जर्रमलचाच मोठा गंज लागते. भट्टी लावली का बराबर ध्यान द्या लागते. त्याच्यात मसाला जे अस्ते थे मामा सोता तयार करे. त्याची चव भलीकाई जमल्यानं पोरी गर्दी करेत. मामाची उमर आता बहात्तरची झाली तरी मामा या वयातयी एकटे दुकान सांभायतेत. कवा चिडचीड नाई. लहान पोरीयचं कमी अस्ते का, हे नाई ते द्या, मंग ते द्याले लागल्यावर्त नाई नाई हेच द्या. आता वयाच्या हिसोबानं उकयलेले बोरं जरी बंद केले तरी गोयावून पोरी आता चाकलेटवर आल्या. कुरकुरे, चिप्सचे पाऊच आल्यानं नड्डे कमी झाले.

दिवायी आन् उन्हायाच्या सुट्टीत पाखरायचा थवा उडून गेल्यानं झाडं जसं उदास वाट्टे तसं मामाच्या दुकानाचं होतं. माह्या पोरी सामोरच्याच शायेत सिकल्या म्हून मामा त्यायचे मामा. माही बायको महादेवाच्या देवयातून येतानी आठोनीनं संर्त्याच्या गोया आनते. इचारावं तं म्हन्ते मामाच्या दुकानातून आनल्या. म्हंजे तिचायी मामा आन् आता पोरगी माहेरी येते तवा तिची पोरगीयी मामाले मामाचं हन्ते. अस्या तीन पिढय़ायचे मामा व्हाचं भाग्य मामाले भेटलं. लहान्यापासून मोठय़ापावतर सार्‍यायचे मामा झाल्यानं मी त्यायले 'जगत्मामा' म्हन्तो. परवा माह्यासामोर एक लगन होऊन गेलेली पोरगी आपल्या पोरीले घेऊन पेसल मामाले भेटाले आली. आन् जवयच्या गनगोतासंग बोलावं असं सुखादु:खाचं मामासंग बोलाले लागली. मनात आलं कोन होय मामा तिचा? सख्खा नाई, पन सख्यापरीस जवयचा. म्हून तं आपलं मन मोकयं करून राह्यली ते. गोड चाकलेटसंग नात्याची, आपलेपनाची गोडाई कवा चिपके हे ना खानार्‍याले समजे, ना देनार्‍याले. या दुकानात मामाले खूप पयसे नाई कमावता आले. रोजी रोटी बस. पन माहेरपनाले आलेली कोनाची तरी पोरगी मामासंग सुखादु:खाचं बोलाले येते ते कमाई किती कोटीत मोजावं?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.

'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

भ्रामकशक्तीवरील विश्वासामुळे माणूस हतबल होतो


याविश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? या प्रश्नांचा वेध विज्ञान घेत नाही. हे विश्व कसे निर्माण झाले व त्यातील पदार्थाच्या किंवा ऊर्जेच्या विशिष्ट स्थिती व हालचालींमागे कोणते नियम किंवा सूत्र दडले असतात, हे शोधण्याचे कार्य विज्ञान करते. प्रत्येक शास्त्राने स्वत:भोवती एक मर्यादा आखून घेतली असते आणि त्या मर्यादेमुळेच संशोधनात शिस्त बाळगून नेमक्या दिशेने वाटचाल करता येते. असे असले तरी आपापल्या विषयातील काही गूढ समस्यांची उकल होण्यासाठी इतर विषयांच्या साहाय्याने संशोधन करणे भाग पडते. जसे पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांना एकमेकांच्या व गणिताच्याही मदतीची गरज भासते. त्याचप्रमाणे जीवशास्त्राला (बायोलॉजी) देखील पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) मदत घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. सृष्टीचे अधिक गुंतागुंतीचे व्यवहार शोधण्यासाठी नवनव्या विज्ञानशाखादेखील उघडण्यात आल्या आहेत.

विश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? आमच्या जीवनाचे प्रयोजन काय? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या शास्त्राला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक विचारांचा जो शिरकाव आहे, त्याला तूर्त बाजूला ठेवून आपण या विश्वाच्या व जीवनाच्या प्रयोजनाबाबत केवळ दोन परस्परविरुद्ध प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न करू.जे दोन मतप्रवाह भौतिकवाद व अध्यात्मवाद या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही विचारसरणींना पुन्हा अनेकानेक शाखाही फुटलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या बुद्धीला व अंत:करणाला काही अंशी समाधान प्राप्त करून देणार्‍या शाखांमधील उत्तम व उन्नत अंश एकत्रित करून आपण प्रथम भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा विचार करू.

भौतिकवाद असे मानतो की, या सृष्टीच्या मुळाशी कोणतीही चैतन्यमय, ज्ञानयुक्त शक्ती नसून केवळ जडपदार्थ किंवा ऊर्जा आहे. प्राण, मन, बुद्धी हे तत्त्व जडातूनच विकसित झाले असून पदार्थमय भौतिक देहाच्या बाहेर त्यांचे वेगळे अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीत ईश्वर अथवा आत्म्याचे तर मुळीच अस्तित्व नाही. मृत्यूनंतर सर्व प्राण्यांचे अस्तित्व संपते. पुनर्जन्माच्या कल्पनेला कोणताही आधार नाही. सृष्टीचे संचालन तिच्या पदार्थाच्या अंगभूत गतितत्त्वांनी व नियमांनी होत असते. बाहेरून सृष्टीचे नियमन वा विकास करणारी शक्ती कोणतीही नाही. जडपदार्थातून पृथ्वीवर जीवन उगवले, ते पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे व येथील वातावरणामुळे. तसेच प्रतिकूल पर्यावरणाशी झुंजत इथे प्राण्यांचे अनेकानेक प्रकारचे देह घडत गेले व स्वाभाविकपणे त्यापैकी काही प्राणीजातींमध्ये मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला. मनाशी व बुद्धीशी संबंधित प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असतात. मानवाचा मेंदू सर्वात मोठा असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत भावभावना, कल्पकता व बुद्धी अधिक आहे.

मनुष्येतर प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान नसते. त्यांच्या सर्व प्रेरणा उपजत व नैसर्गिक असतात. त्यामुळे ते सर्व प्राणी निसर्गाचाच एक अभिन्न भाग असल्यासारखे जगतात. त्यांच्यात व बाह्य सृष्टीत आंतरिक एकत्व असते. परंतु मानवामध्ये मन-बुद्धीच्या विकासाने एक वेगळाच टप्पा गाठला. मी व बाह्य जग या वेगवेगळ्या वस्तू आहेत, असे भान मानवाला त्याच्या आदिम अवस्थेपासून प्रकर्षाने आले. बाह्य जग सुंदर, कृपाळू आहे तसेच ते प्रसंगी हिंस्र व क्रूरही वागत असल्याचा नित्य अनुभव मानवाला येतो. आईच्या गर्भात एकत्वाची अनुभूती घेत पहुडलेले बालक जसे बाहेर येताच असुरक्षित वाटून भयभीत होतो तसेच काहीसे निसर्गापासून तुटल्याच्या जाणिवेने मानवाचे झाले. त्याला हे वेगळेपण नकोसे वाटते. त्यामुळे ते एका विश्वव्यापी ईश्वराची कल्पना करून त्याच्याशी तादात्म्य साधू पाहतो. आपल्या एकाकीपणावर व दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्या काल्पनिक विश्वेश्वराची भक्ती हा चांगला उपाय त्याला वाटतो.

शिवाय वादळवारे, अतिवृष्टी, वणवे, भूकंप, ज्वालामुखींचे स्फोट, पूर यांसारखे निसर्गाचे रौद्ररूप आणि इंद्रियांना सुखावणारे लोभस रूप अशी दोन्ही रूपे न्याहाळताना प्रत्येक प्राकृतिक शक्तींचे नियंत्रण करणारी एखादी देवता असावी व त्या देवतेचा रोष झाल्याने नैसर्गिक संकटे येत असावी, अशीही

आदिमानवाची समजूत झाली. त्यामुळे मरुत, वरुण, सूर्य, इंद्र अशा देवता विविध नैसर्गिक शक्तींच्या कारक असल्याचे कल्पून यज्ञासारख्या विधीने त्या देवतांना आवाहन करणे व आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंची आहुती देऊन त्या देवतांना प्रसन्न करून घेणे, अशासारखे उपाय मनुष्य करू लागला.

ईश्वराचे अथवा देवतांचे अस्तित्व कल्पून त्यांची पूजा करणे, भक्ती करणे ही मानवी मनाची वरील कारणांमुळे गरज होती. प्रतिकूल सृष्टीत जिवंत राहण्यासाठी या कल्पनेने त्याला भक्कम आधार दिला. या सृष्टीत शाश्वत असे काही असेल तर ती केवळ भौतिक पदार्थमय ऊर्जा होय. जीवन अशाश्वत असते. जीवनापूर्वी व मृत्यूनंतर प्राण्यांचे कोणतेही अस्तित्व नसते. आत्मा-परमात्मा नावाची कोणतीही वस्तू व शक्ती नाही. सृष्टीचा कोणी निर्माता नाही. असा कोणी निर्माता असता तर ब्रह्मंडात व पृथ्वीवरसुद्धा जी अतिशय उधळमाधळ आढळून येते, तशी ती राहिली नसती. उत्क्रांती ही एक सरळ रेषेत व्यवस्थितपणे आखीव स्वरूपात झाली असती. पृथ्वीवरची निसर्गाची एकूण उत्क्रांती ही झोकांडय़ा खात, चाचपडत, धडपडत, चुकतमाकत, आंधळ्याने वाट शोधावी तशी झालेली दिसते. ईश्वराला जीवनाचा विकास जर सृष्टीत करावयाचा होता, तर हे करोडो-करोडो ग्रह-तारे, बहुतांश जीवरहितच दिसतात. आपल्या सूर्यमालेत तर फक्त पृथ्वीवरच जीवन उमलल्याचे दिसते. शिवाय जीवन कष्टमय, यातनादायी आहे. भोवतालचे पर्यावरण हे जीवनास पोषक कमी व मारकच जास्त आहे. शिवाय क्रौर्य, हिंसा, दुष्टावा, मत्सर, दारिद्रय़, शोषण या बाबी ईश्वराने का निर्माण कराव्या? तो परपीडनात आनंद घेणारा (सॅडीस्ट) आहे काय?

ईश्वर, आत्मा, परमात्मा, देवदेवता यांच्या असण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भ्रामकशक्तींवर विश्वास ठेवून मनुष्य हतबल व परावलंबी होतो. जी शक्ती अस्तित्वातच नाही ती आपले साहाय्य कशी करणार? कोणत्याही अतिभौतिक शक्तीच्या असण्यावर विश्वास ठेवणे व आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा शक्तीच्या साहाय्याची याचना करणे म्हणजे अंधश्रद्धेपायी आत्मवंचना करून स्वसामर्थ्य गमावून बसणे होय.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

सुख-दु:ख, यश-अपयशाची निर्मिती मेंदूत होते!


आनंदी राहा आणि इतरांना आनंदी करा, 'बी हॅपी! अँण्ड मेक अदर्स हॅपी' हा निसर्गमंत्र जीवनात अमलात आणणं एवढं कठीण आहे? अशक्य आहे?

आजूबाजूला केवढी दु:खं आहेत? जीवनात केवढय़ा समस्या आहेत? सारं जीवनच वेगवेगळ्या दु:खांनी भरलेलं आहे. 'एक धागा सुखाचा.., तर शंभर धागे दु:खाचे' अशी जीवघेणी वस्तुस्थिती आहे. म्हणूनच दु:ख असह्य झाल्यावर अनेक लोक आत्महत्या करतात. प्रेमाचं, विरहाचं, प्रेमभंगाचं दु:ख असह्य झाल्यानं प्रेमी हे जग सोडून जातात. कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेला शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. पत्नीनं बदफैलीपणा केला म्हणून पती इहलोक सोडून जातो. पतीनं दुसरा घरठाव केला म्हणून पत्नी संसार अध्र्यावर सोडून निघून जाते. काही माणसं जगतात, पण मरणप्राय यातना, दु:ख भोगत जगत असतात. असल्या जगण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांना वाटत असतं. हे जग असं आहे. यातील खरं काय आहे?

दु:खाचा संबंध आपल्या मनाशी आहे. मनावर होणार्‍या परिणामांबद्दल दोन विचारधारा आहेत. एक आध्यात्मिक, पारलौकिक विचारधारा. मन प्रचंड सामर्थ्यशाली असतं. त्याची शक्ती एवढी वाढवता येते की त्याचा परिणाम आजूबाजूच्या वस्तूंवर, परिस्थितीवर, माणसांवर निसर्गावरसुद्धा होऊ शकतो. त्याची क्षमता एवढी वाढवू शकतो की मन:सामर्थ्यानं वस्तूसुद्धा हलू शकते, वाकू शकते. परिस्थिती हवी तशी बदलू शकते. प्रकाशापेक्षाही अधिक वेगाने मन प्रवास करू शकतं. 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' करू शकतं.

पण या विचारधारेनुसार मानलेलं मन:सामर्थ्य आजवर सिद्ध होऊ शकलं नाही. किमान वैज्ञानिक कसोटय़ांवर ते कुणालाही सिद्ध करता आलं नाही. जगभर संशोधनं झालीत; पण असं काही आजवर सिद्ध झालं नाही. उद्याही सिद्ध होण्याची शक्यता नाही.

दुसरी विचारधारा मार्क्‍सवादी, जडवादी, भौतिक विचारधारा. मन हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतं. माईंड इज ए रिझल्टंट ऑफ मॅटर (अँटमॉस्पिअर). थोडक्यात ते आजूबाजूच्या परिस्थितीचं गुलाम असतं. स्वतंत्र नसतं. परिस्थितीला वातावरणाचा परिणाम ते टाळू शकत नाही. दु:खी परिस्थितीनं ते दु:खीच होणार?

वरपांगी पाहताना आपल्याला हे मत, ही विचारधारा खरी वाटू शकते, वाटते. कारण आपल्यापैकी बहुतेकांवर भोवतालच्या परिस्थितीचा, वातावरणाचा असा गडद प्रभाव पडतो. त्यानुसार आपलं मन दु:खी बनतं वा आनंदी बनतं.

पण सत्य मात्र वेगळचं आहे. हिप्पोक्रेटस, औषधशास्त्राचा जनक साडेबावीसशे वर्षापूर्वी म्हणून गेला, 'माणसाचं सुख आणि दु:ख', 'यश आणि अपयश' त्याच्या मेंदूतून निर्माण होतं आणि मगच जीवनात ते प्रत्यक्ष अमलात येतं.

स्पिनोझा नावाचा एक महान तत्त्वज्ञ म्हणून गेला, 'हॅप्पिनेस इज द अल्टिमेट व्हच्र्यू' (आनंदी असणं हा मानवी जीवनातील सर्वात मोठा सद्गुण आहे.) अथवा विसाव्या शतकातील एक महान वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ बट्रॉंड रसेल यानं 'सुखी माणसाचा सदरा' (पुस्तक लिहून) मानवजातीला घातला आहे. सुखी कसं राहता येतं ते शिकवलं आहे.

हे खरं आहे की, माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्याशिवाय त्याला आनंदानं जगता येणार नाही. अन्न, वस्त्र व निवारा मिळालाच पाहिजे. त्याच्या नैसर्गिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे. अर्थात, या गरजा पूर्ण करण्यासाठी गरीब माणसांना प्रचंड धडपड करावी लागते, काबाडकष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते.

समजा रडत, भेकत, कुथत, दु:खीकष्टी होत एखादी 'अ' व्यक्ती कष्ट करते. आठ-दहा तास काबाडकष्ट केल्यावर त्याच्या हातावर त्या दिवसाची मजुरी पडते. या पैशातून तो रात्रीसाठीचा शिधा घेतो. पुन्हा रडत, कुथत, नशिबाला दोष देत, ''माझ्याच वाटय़ाला कां हे भोग? इतर कसे आनंदात जगताहेत?'' असा विचार करत शिधा रांधतो. जेवतो, पोटभर जेवतो., तृप्त होतो. जेवल्यावर हा माणूस आनंदी होईल कां? नाही. कदाचित त्याचं शरीर अन्न ग्रहण केल्यावर तृप्त होईल; पण मन मात्र आनंदी होणार नाही. उलट ''आजतर कसंबसं जेवलो, पण उद्या काम मिळेल कां? जेवायला मिळेल की उपाशी राहावे लागेल?'' याच विवंचनेत, तळमळून तो रात्र काढेल. कदाचित त्याला धड झोपही लागणार नाही. तो सारखा अस्वस्थ, चिंताग्रस्त असेल.

समजा दुसरा 'ब' माणूस,''चला छान काम करू या, आनंदानं काबाडकष्ट करू या'' अशा मनोवृत्तीनं कामावर भिडला. पहिल्या 'अ' इतकीच त्यानं मेहनत घेतली. मिळालेल्या मजुरीतून शिधा घेतली. आनंदानं स्वयंपाक केला, जेवला. तर शरीरही तृप्त होईल आणि मनंही आनंदानं तृप्त होईल. ''आजचं तर छान झालं. उद्याचं उद्या पाहू. काहीतरी काम मिळेलच. नाही मिळालं तर ठीक आहे. काहीतरी मार्ग शोधूच.''

हा आशावादी, आनंदी माणूस शांतपणे झोपी जाईल. तुमच्यापुढे ठेवलेली दोन्ही उदाहरणं काल्पनिक नाहीत. आपल्या देशात शेकडय़ानं अशी (दोन्ही) उदाहरणं पाहायला मिळतात. कष्ट करताना शरीराला तोषीस पडू शकते, कॅलरीज जळू शकतात; पण त्यानं दु:खच होतं असं नाही. तर कितीही कष्टाचं काम करताना ते आनंदानं करता येण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. प्रचंड काबाडकष्ट उपसताना, अर्धपोटी राहतानासुद्धा आनंदानं, हसतमुखानं जगणारी कितीतरी माणसं मी याच देशात खेडय़ापाडय़ात पाहिली आहेत.

ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यामध्येही अनंत अडचणी येतात, अशीही माणसं जर आनंदानं जगू शकतात, तर ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात, त्यांना दु:खी असण्याचं कारण काय? किमान मध्यमवर्गीय माणसांनी तरी आनंदी राहायला नको कां? कारण दृष्टिकोन! 'अँटिटय़ूड'! आपला आपल्याकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर सारं अवलंबून असतं. तुम्ही जर 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे'वाले असाल तरतुम्ही नेहमी दु:खीच राहणार! एकुलता एक सुखाचा धागासुद्धा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. ''काय उपयोग? हे सुख थोडचं टिकणार आहे? आपल्या वाटय़ाला तर नेहमी दु:खच दु:ख! आपलं नशीबच असं..'' समोर असलेल्या सुखावर, आनंदावरसुद्धा तुम्ही पार बोळा फिरविणार. सुखाच्या आताच्या वर्तमान क्षणांवर भविष्यातील काल्पनिक दु:खांचे डोंगर चढवून सुखी क्षणही तुम्ही चिरडून टाकणार! हेही आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. मनानं, मन:सामर्थ्यानं तुम्ही कदाचित समोरची, भोवतालची परिस्थिती बदलवू शकत नाही; पण समोरच्या कोणत्याही, कशाही परिस्थितीचा मनावर किती आणि कसा परिणाम होऊ द्यायचा हे ठरविण्याचं सामर्थ्य मात्र निश्चितपणे आपल्या मनात आहे आणि हे मनाचं सामर्थ्य समर्थपणे वापरणं हेच खरं अध्यात्म आहे. आजच्या परिभाषेत याला आपण मानसशास्त्र म्हणतो. मनाचं शास्त्र म्हणतो.

आज आपण जागतिकीकरणाच्या खुल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अजस्र विळख्यात जगत आहोत. त्यालाच आधुनिकीकरण, प्रगती समजतो आहोत. या भांडवलशाही अर्थरचनेनं काही आभासी मूल्य तुमच्या-माझ्यावर लादली आहेत. मूठभर कार्पोरेटस् आणि मोजक्या भांडवलदारांचा धनसंचय अमाप वाढायचा असेल तर अशी 'आभासी मूल्य' समाजात रुजणं नितांत गरजेचं आहे. सगळ्या माध्यमांमधून ही मूल्य खोलवर रुजवली जातात. आपल्या नकळत मनात खोलवर ती रुजतात.

त्यातील आजचं एक मूल्य आहे. 'सक्सेस, सक्सेस, सक्सेस' 'नथिंग सक्सिडस् लाईक सक्सेस', यशासारखी यशस्वी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. यशस्वी व्हा!

यशस्वी होणं म्हणजे काय? हेही आपल्याला सांगितलं जातं, आपल्या मनात खोलवर कोरलं जातं. ''भरपूर पैसे कमवा, उच्चपदावर विराजमान व्हा, आणखी पैसे कमवा, कार, साधी नाही बी.एमड.ब्ल्यू. कार, मोठा फ्लॅट, बंगला बाळगा, सुटाबुटात वावरा, मस्त पाटर्य़ा करा, छान दारू एन्जॉय करा, पुन्हा कष्ट करा, सारखे धडपडा, आणखी आणखी उच्चपदावर जा, अधिकाधिक पैसे कमवा. अधिक पाटर्य़ा-दारू एन्जॉय करा, अधिकाधिक सक्सेस व्हा.''

खरं म्हणजे गेली 21-22 वर्षे मी मानवी विकासाच्या, व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात व्यावसायिक पद्धतीनं कार्यशाळा चालवतो आहे. लोकांना यशस्वी, आनंदी, सुखी कसं व्हावं ते शिकवतो आहे. मानसशास्त्राचा, भारतीय अध्यात्माचा गाढा अभ्यास केल्यानंतर आधीची 20-22 वर्षे सार्वजनिक क्षेत्रात काम केल्यानंतर मी या मानवी विकास (ह्युमन डेव्हलपमेंट) क्षेत्रात काम करतो आहे. त्यामुळं माणसांना रेसमध्ये धावणारी घोडी न बनता माणूस बनता बनता यशस्वी व्हा, अशी संतुलित शिकवणूक देणं मला शक्य होतं.

पण मी जेव्हा या क्षेत्रातले इतर ट्रेनर पाहतो तेव्हा 'मी जिंकणारच, मीच जिंकणारच, मी जिंकणारच', 'मी यशस्वी होणारच, यशस्वी होणारच, यशस्वी होणारच' असे जोरजोरानं खिंकाळणारे घोडेच जिकडेतिकडे दिसतात आणि ते आपल्या कार्यशाळांना आलेल्या माणसांनासुद्धा असंच जोरजोरानं खिंकाळायला लावून रेसचे घोडे बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात आणि यालाच ते 'व्यक्तिमत्त्व विकास' असं म्हणतात. त्या बिच्चार्‍यांना माहीतच नसतं की खुल्या भांडवलशाहीच्या हातात असणार्‍या लगामाच्या तालावर नाचणारे घोडे आपण आहोत म्हणून.

रात्रंदिवस धावा, आमच्यासाठी राबराब राबा, पाहिजे तेवढे ताजेताजे हरभरे खाऊ घालतो, धष्टपुष्ट बनवतो, आरामदायक एसी तबेल्यांमध्ये ठेवतो. उत्तम धावला. फायदा करून दिला, तर चकचकीत सुंदर, आकर्षक नवं खोगीर घालतो. म्हणजे वरचा हुद्दा देतो. नाही, तर पेकाटात लाथ घालून तबेल्याच्या बाहेर घालवतो. हा एसी तबेल्याची, ताज्या हरभर्‍याची सवय झालेला धष्टपुष्ट घोडा अपयशाच्या भीतीनं ऊर फुटेस्तोवर धाव धाव धावतो अन् एक दिवस धावता धावताच ब्लडप्रेशर हाय झाल्यानं हार्टफेल होऊन मरतो. नाही तर 'ब्रेन हॅमरेज' होऊन हॉस्पिटलात भरती होतो अथवा वेगानं धावता आलं नाही म्हणून तबेल्याबाहेर घालवलं गेल्यामुळं, अयशस्वितेचा शिक्का बसल्यामुळं, गलितगात्र बनून निराशेच्या गर्तेत स्वत:ला बुडवून घेतो. अशा माणसांना कार्पोरेट, मॅनेजर्स, उद्योजक, आयटी इंजिनिअर्स वगैरे वगैरे म्हटलं जातं.

हे खरं आहे की, यश माणसाच्या मेंदूतूनच निर्माण होतं. वारंवार त्याच्या मेंदूत यश प्रोग्राम केलं तर माणसाचा मेंदू त्या दिशेनं वेगानं वाटचाल करेल; पण आपल्या मेंदूत यश म्हणजे नेमकं काय प्रोग्राम करायचं ते आपण ठरवायला नको कां?

मद्यसम्राट हौसेनं नागडी कॅलेंडर्स निर्माण करणारा विजय माल्या हाही आजच्या आधुनिक जगातला यशस्वी माणूस आहे. राखी सावंतही यशस्वी आहे. सनी लिओनी ही महेश भटची नटी. पोर्नोग्राफिक स्टारही यशस्वी आहे. असं आजचं यशाला पुजणारं जग मानतं.

खरंतर या तिघांच्याही यशाची जातकुळी एकच आहे. महात्मा गांधीजीही एक यशस्वी माणूस होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरही यशस्वी माणूस होते. गांधी आणि आंबेडकर यशस्वी झाले नसते तर लाखो, कदाचित कोटय़वधी माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला नसता; पण आजच्या आधुनिक समाजाच्या यशाच्या व्याख्येनुसार गांधी- आंबेडकर यशस्वी होते कां? पण माल्या, राखी, सनी मात्र यशस्वी आहेत. भरपूर पैसे, समृद्धी, प्रसिद्धी सारं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं आपण आपली यशाची व्याख्या ठरवणं गरजेचं आहे. रेसमध्ये धावणारे, धष्टपुष्ट, उंची खोगीर घातलेले, एसी तबेल्यात राहणारे घोडे बनायचं आणि यशस्वी व्हायचं की स्वत: आनंदानं जगणारी, दुसर्‍याच्या जीवनात आनंदाचा, सुगंधाचा दरवळ पसरविणारी माणुसकीपूर्ण माणसं बनायचं आणि यशस्वी व्हायचं.

एकदा तुम्ही तुमची यशस्वी व्हायची व्याख्या ठरवली की, त्या दिशेनं स्वत:ला वारंवार सांगून प्रोग्राम करता येतं. त्यासाठी म्हणजे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते; पण ही मेहनत घेतानाच, आनंदानं मेहनत घ्यायचं ठरवलं, प्रचंड कष्ट हसत खेळत, एन्जॉय करत घ्यायचे ठरविले तर यशापर्यंत पोहोचण्याचा मार्गच खूप आनंद देतो. सारी कष्टप्रद वाटचालच आनंदमय होऊन जाते आणि या वाटचालीत इतर वाटसरूंचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर सारी वाटच आनंदानं भरून ओसंडून वाहते. मग यशाच्या शिखरावर पोहोचलं तर अधिकच आनंद! आणि अपयश वाटय़ाला आलं तर? नो चिंता, नवी वाट चोखाळण्याचा नवा आनंद पुन्हा घेऊ या! आनंदी माणसाचा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. अपयशसुद्धा.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

कालाय तस्मै नम:


दिवाळीच्या दिवसातच उसाचे आंदोलन तीव्र झाले. या आंदोलनात दोन शेतकर्‍यांचा गोळीबारात बळी गेला. तर विदर्भातील दोन शेतकर्‍यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्या. एकीकडे आत्महत्या तर दुसरीकडे शासनाने सरळसरळ बंदूक रोखून शेतकर्‍यांची केलेली हत्या. दिवाळीत बळीप्रतिपदा साजरी केली जाते. एकंदरीत शासनाच्या धोरणामुळे आत्महत्या करायला लावून अथवा शेतकर्‍यांची हत्या करून, शेतकर्‍यांचा 'बळी' घेऊन एकप्रकारे बळीप्रतिपदा साजरी झाली.

तसाही बळीप्रतिपदा म्हणजे बळीराजाला पाताळात गाडल्याचा दिवस. एका अर्थाने शेतकर्‍यांच्या पराभवाचा दिवस. दिवाळी इतरांसाठी आनंदाची असेल, पण ती शेतकर्‍यांसाठी आनंदाची कशी असू शकेल? एका बाजूला बळीराजा चांगला होता, दानशूर होता असेही म्हणायचे, पण ह्याच चांगल्या बळीराजाला प्रत्यक्ष परमेश्वराने (विष्णू) वामनाचा अवतार घेऊन पाताळात गाडायचे. कारण काय तर बळीराजाच्या चांगुलपणामुळे इंद्राचे आसन डळमळीत झालं होतं म्हणे. इंद्राचा दरबार म्हणजे 'चंगळवादी' व्यवस्थेचच प्रतीक. तेथे कायम सोमरसपान व अप्सरांच्या नृत्यांचे वर्णन भरभरून आपण ऐकत आलो आहोत. बळीराजामुळे इंद्राच्या 'चंगळवादी' व्यवस्थेला धक्का बसत होता म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर जर बळीराजाला पाताळात गाडत असेल तर शेतकर्‍यांचं काही खरं नाही. एका बाजूला आपण 'इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थनाही करायची आणि त्या बळीराजाला पाताळात गाडणार्‍या देवाचीही पूजा करायची. असा हा एकूणच परस्परविरोधी मामला दिसतो.

ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सर्वच संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. खा. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटलांची संघटना एवढेच नव्हे तर शरद जोशींची संघटनाही ऊस दरवाढीच्या मागणीसाठी मैदानात उतरली आहे. एकाच संघटनेचे ही तीन शकल. कधी वेगवेगळे राहून तर कधी एकत्र येऊन उसाला भाव द्या म्हणून मागणी करताहेत.

1980 मध्ये शरद जोशींच्या नेतृत्वातील शेतकरी संघटनेने 'शेतीमालाला रास्त भाव' या एककलमी कार्यक्रमाने खळबळ उडवून दिली. 1980 ते 1990 हे दशक शेतकरी संघटनेचे होते. शरद जोशींच्या म्हणण्याप्रमाणे.

शेतीमालाला रास्त भाव हे एकच कलम. तेच शेतकर्‍यांचे परब्रम्ह. तेच देशाचे सर्वस्व. असे शेतकरी संघटनेचे धोरण राहिले आहे. सत्तावीस नक्षत्रातील फक्त नऊ पावसाची. म्हणून 27 उणे 9 बरोबर शून्य. याप्रमाणेच शेतीमालाचा भाव हे कलम नसेल तर बाकी भारांभर कलमांचा काही उपयोग नाही.

(शरद जोशी. प्रचलित अर्थव्यवस्थेवरील नवा प्रकाश पान. नं. 171. 15 मार्च 1985)

परंतु 1990 नंतर शरद जोशींनी शेतीमालाचा भाव हा मुद्दा 'खुल्या अर्थव्यवस्थेत' अप्रस्तुत झाला आहे असे म्हणत. ते कलमच शेतकरी संघटनेमधून हद्दपार केले. मुक्त अर्थव्यवस्थेत बाजारात जो भाव मिळेल तो 'रास्त' असणार आहे असे म्हणत 'रास्त भावाचा' मुद्दाच बाद ठरविला. 6 मे 2010 च्या शेतकरी संघटकमध्ये शरद जोशी म्हणतात, 'शेतीमालाला भाव हा विषय 25 वर्षांपूर्वी सुसंबद्ध होता. आता तो तसा मुळीच राहिलेला नाही.' शरद जोशींच्याच म्हणण्याप्रमाणे 'सगळे निर्णय बाजारात होतात. आणि न्याय्य आणि योग्य असतात. म्हणूनच बाजार हा एक चमत्कार आहे. शंकराचार्य आले आणि गेले, बुद्ध आले आणि गेले, पण विजय मात्र बाजाराचाच झाला ' (2003 मध्ये नर्मदा परिक्रमेत बोलताना शरद जोशी)

शेतीमालाचा भाव आता सुसंबद्ध राहिला नाही. आणि बाजारातच मिळणारा भाव न्याय्य आणि योग्य भाव असतो असे जर शरद जोशींना वाटत असेल तर ते आज परत 'उसाला भाव द्या' म्हणत ऊस आंदोलनात सहभागी कसे काय होतात?

शेतकरी संघटनेच्या पहिल्या अवस्थेत शेतीमालाला भाव हेच 'परब्रम्ह'. तेच सर्वस्व. त्यानंतर शेतीमालाचा भाव हा विषयच 'असंबद्ध'. बाजारातच न्याय्य व योग्य भाव मिळतो असेही म्हणायचे आणि उसाला भाव मागत आंदोलनात सहभागी व्हायचे.

1990 नंतर शरद जोशींनी 'शेतीमालाचा भाव' हे कलमच रद्द केले, एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनेमधून हद्दपार केले. त्याचप्रमाणे आंदोलनाचे शस्त्रही 'म्यान' केले. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे 'रास्तारोको हे समाजवादाच्या काळातले हत्यार आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत 'व्यापारी' हत्यार असतील.' (2000 मध्ये श्रीरामपूर येथील कार्यकारिणीत बोलताना शरद जोशी)

समाजवादी व्यवस्थेचा अंत झाला आहे. मुक्त अर्थव्यवस्था आली आहे. डंकेलने स्वातंर्त्य दिले आहे. त्यासाठी 'धन्यवाद डंकेल तू आम्हाला स्वातंर्त्य दिले' अशी घोषणा. आता शेतीमालाच्या भावाची गरजच नाही. तो बाजारातच मिळेल. आता आंदोलनासाठी रास्तारोकोचीही गरज नाही. शेतकर्‍यांनी सडकेवरही येण्याची गरज नाही. त्यांनी 'व्यापारी' हत्यारांचा उपयोग करावा. त्यासाठी शरद जोशींनी 1991 च्या शेगाव मेळाव्यात सीता शेती, माजघर शेती, आयात शेती, निर्यात शेती असे चार 'व्यापारी' हत्यारंही दिली होती. शेतकर्‍यांना 'कंपन्या' काढण्याचेही 'व्यापारी' आवाहन त्यांनी केले होते. स्वत:ही 'शिवार' कंपनी काढायला निघाले होते. पण हे सर्व 'व्यापारी' मंत्र फुसके निघाले म्हणून की काय त्यांनी परत 2008 च्या औरंगाबाद अधिवेशनात 'पुन्हा एकदा उत्तम शेती'चा नारा देत नवीन 'व्यापारी' हत्यारं शेतकर्‍यांना दिली होती. शेतकर्‍यांनी जगायचे असेल तर शेतकर्‍यांनी एटी - बिना मातीची शेती, इटी - इथेनॉल तंत्रज्ञान, बीटी - जैविक तंत्रज्ञान आणि आयटी- माहिती तंत्रज्ञान या मंत्रांचा अवलंब करावा. एटी, इटी, बीटी आणि आयटी या मंत्राने शेतकर्‍यांच्या घरात लक्ष्मी येणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या घरात लक्ष्मी आलीच आहे असे गृहीत धरून 'लक्ष्मी पूजनाचे' कामही औरंगाबाद अधिवेशनात उरकून घेतले होते. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय 'यापुढे आकाशाखालील शेती नाही तर मांडवाखालील शेती करा म्हणजे तुम्हाला शेतीमालाला भाव मिळेल असेही शरद जोशींनी सांगितले होते. डंकेलने शेतकर्‍यांना 'स्वातंर्त्य' दिले. शरद जोशींनी त्याला धन्यवादही दिले. पण हे 'स्वातंर्त्य' शेतकर्‍यांना मानवले नसावे. त्याने गळफास वा विष घेऊन आत्महत्या करण्याचे स्वातंर्त्य घेणे सुरू केले. एटी, इटी, बीटी आणि आयटीने तर शेतकर्‍यांच्या घरात इतकी बदाबदा 'लक्ष्मी' येऊ लागली की त्या लक्ष्मीच्याच दहशतीने त्याला जीव नकोसा झाला व तो आत्महत्या करू लागला?

शरद जोशींची शेतकरी संघटना आता परत उसाच्या दरवाढीसाठी होणार्‍या आंदोलनात सहभागी झाली आहे. रास्तारोकोसारख्या 'हत्यारां'चे समर्थन करीत आहे. याचा अर्थ काय समजावा? शेतीमालाच्या भावाचा मुद्दा जो शरद जोशींसाठी 'सुसंबद्ध' राहिला नव्हता तो आता परत सुसंबद्ध झाला आहे? समाजवादी व्यवस्थेत रास्तारोकोसारखी वापरली जाणारी 'हत्यारं' परत वापरल्या जात आहे. त्याचा अर्थ खुली अर्थव्यवस्था जाऊन आता परत समाजवादी अर्थव्यवस्था आली आहे? त्यांनी मधल्या काळात सांगितलेले 'व्यापारी' हत्यार आता परत 'म्यान' करायचे? मांडवाखालील शेती सोडून आता परत आकाशाखालील शेती करायची? आणि मग डंकेलनी दिलेल्या स्वातंर्त्याचं काय?

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा प्रथम नारा होता. 'भीक नको, हवे घामाचे दाम'. नंतर मुक्त अर्थव्यवस्था आल्या आल्या नारा बदलला. आता 'हवे'च्या ऐवजी 'घेऊ' असा शब्द आला. 'भीक नको, घेऊ घामाचे दाम' तेही कसे तर आंदोलनाचे तंत्र वापरून नव्हे तर 'व्यापारी' मंत्राचा वापर करून. कारण मुक्त अर्थव्यवस्थेत 'बाजार' शेतकर्‍यांसाठी इतका न्याय्यी, दयाळू, कनवाळू रहाणार होता की आंदोलनासारखे कठोर तंत्र वापरण्याचीच गरज राहिली नाही.

आता परत शरद जोशींना 'रास्तारोको'सारख्या कठोर तंत्राचा वापर करावासा वाटतो.

बाजारा! इतका कसा रे तू कठोर झालास? आणि डंकेल तुझे स्वातंर्त्यही इतके कसे तकलादू की शरद जोशींना परत 'उसाला भाव द्या' म्हणत आंदोलनात पडावे लागते. आणि तेही त्यांच्याच अनुयायांच्या बरोबरीने. रघुनाथदादा पाटील, राजू शेट्टी हे तर शरद जोशींचे अनुयायी. शेतकरी संघटना सोडून त्यांनी स्वतंत्र संघटना उभारल्या. त्याच संघटनांसोबत शरद जोशींची एक संघटना या न्यायाने ह्या तिन्ही संघटना उसाचं आंदोलन करताहेत. कालाय तस्मै नम:! दुसरं काय?

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

एक झंझावात होता..!


.. आणि
बाळासाहेब ठाकरे या नावाचं एक वादळ शांत झालं..

जाताना आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेवून गेलं! काळाच्या छातीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवून गेलं! या एका वादळानं अनेक परंपरागत गट उद्ध्वस्त करून टाकले. या वादळाचा चमतकारच असा होता की त्यानं हात लावलेल्या वाळूचेही पहाड झालेत. रस्त्यावर पडलेल्या धुळीचेही बुलंद किल्ले झालेत. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. समाजकारण ढवळून निघालं! ज्याला इतर पक्षांनी साधं सरपंचही केलं नसतं, अशी माणसं आमदार, खासदार, मंत्री झालीत.

पुण्याच्या अधिवेशनात 1988 ला माझी शिवसेनेचा नागपूर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते हे आपले संपर्कप्रमुख झाले. माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे गडचिरोलीचे संपर्कप्रमुख झाले. त्या अधिवेशनाला शिवसेनेची महाराष्ट्रात बांधणी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले. अनंतराव गीते हे शांत, समंजस आणि नारायणराव राणे हे आक्रमक. पण दोघांशीही माझा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. दोघेही त्यावेळी मुंबईचे नगरसेवक होते.

पुण्याच्या अधिवेशनात मला मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांनी एका चर्चासत्राची सुरुवात करण्याची ऐनवेळी जबाबदारी सोपविली. मी विदर्भातील शिवसेनेच्या एकंदरीत परिस्थितीबाबत बोलताना बोललो की, 'विदर्भातील शिवसेनेकडे मुंबईतले नेते फारसे लक्ष देत नाहीत, याची खंत शिवसैनिकांच्या मनात आहे. आपण पोरके आहोत, अशी भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यानंतर त्वरित उपाययोजना झाली नाही तर ही 'पोरके'पणाची भावना 'परके'पणामध्ये बदलायला वेळ लागणार नाही. दुसर्‍या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये माझे भाषण ठळकपणे छापून आले. बाळासाहेबांनीही ते वाचले. मला स्टेजवर बोलावले. म्हणाले, काल तुम्ही भाषणात काय बोललात? मी सरळ सरळ सांगून मोकळा झालो. मनोहर जोशी, छगन भुजबळ माझ्या तोंडाकडेच पाहत राहिले. प्रत्यक्ष बाळासाहेबांच्या समोर असं बेधडक बोलणारा शिवसैनिक त्यांनी पहिल्यांदाच पाहिला असेल ना?

बाळासाहेब जरा थांबलेत! म्हणाले, वाकुडकर तुम्ही बोललात ते खरं बोललात, पण मीडियासमोर असताना असं बोलायचं नसते. यापुढे जरा काळजी घेत चला. आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मंद हसलेत. गंमत म्हणजे पेपरमध्ये नेमकं काय छापून आलं होतं, हे मला माहीतही नव्हतं! पण बाळासाहेबांची आणि माझी जिल्हाप्रमुख या नात्यानं पहिली सलामी अशी झाली.

बाळासाहेबांचं कामच रोखठोक होतं. बेधडक, पारदर्शी. आत एक बाहेर एक असं काही नाही. मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हे त्यांचे तेव्हाचे उजवे हात. छगन भुजबळांची माझं छान जमायचं. बाळासाहेबानंतर सेना वाढण्यामध्ये जर कुणाची मेहनत असेल तर ती छगन भुजबळ यांचीच! मनोहर जोशी मात्र गोटय़ा फिट करण्यात वस्ताद! तर बाळासाहेब शिवसेनेचंही सर्वस्व! शिवसैनिकांचाही जीव की प्राण!

तू वेगळा सेनापती अन् आमचे सरकार तू

तू ढाल अन् तलवार तू, सैनिक तू सरदार तू

योगी तसा सम्राट तू, साधा तसा भन्नाट तू

तू मोकळ्य़ा माळापरी, रानापरी घनदाट तू!

तू पौर्णिमा, तू चांदणे, ठिणगीही तू, ज्वालाही तू

तू वेदना, संवेदना, तु कुंचल, भालाही तू

तू गर्जना, हळूवार तू, तू बासरी रणशिंग तू

फेसाळती मैफिल तू, जगण्यातली अन् झिंग तू !

शब्दात तू, रेषात तू, रागात तू, त्वेषात तू

इन्कार तू, स्वीकार तू, स्नेहात तू, द्वेषात तू

आभाळ तू, आधार तू, रक्तातला विश्वास तू

कधी भासला सर्वस्व तू, कधी भासला आभास तू !

पहाडात तू, रानात तू, अन् आमच्या प्राणात तू

स्वप्नात तू, श्वासात तू, मंत्रापरी कानात तू

तू पेरला पुरुषार्थ अन् आभाळही केले खुले

तुझियाविना बापा कुठे जातील ही वेडी मुले?

बाळासाहेबांची ही सारी रूपं मी जवळून पाहिलीत, अनुभवली, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

व्ही.पी. सिंग यांनी मंडळ आयोग लागू करण्याची घोषणा केली. मी मंडळ आयोगाचा समर्थक होतो. मी त्यांचे समर्थन केले. बाळासाहेबांचा विरोध होता. छगन भुजबळांनीही आधी समर्थन केले आणि दोन-तीन दिवसातच मागे घेतले. मी मात्र मंडल आयोगाचे समर्थन करतच राहिलो. सभा घेत राहिलो. मंडळ आयोगाच्या विषयावर शिवसेना सोडण्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा बाळासाहेबांनी मला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत त्यावेळी बाळापूरचे कवी उल्हास मनोहर होते. बाळासाहेबांनी माझ्यातल्या एका एका खुबीचे केलेले वर्णन बघून मी स्वत:च चॅट पडलो. आणि शेवटी बाळासाहेब म्हणाले. 'वाकुडकर मी तुमचं एवढं कौतुक करतो. तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. आणि तुम्ही मात्र व्ही.पी. सिंग यांच्या नावाचा जप करता. व्ही.पी. सिंग तुम्हाला ओळखतसुद्धा नसेल.' एखाद्या मोठय़ा बुलंद पहाडाच्या छातीतून वाहणारा मायेचा झरा मला जाणवला. कसलाही अहं नाही. परकेपणा नाही. मुखवटा नाही. समुद्रानं आपल्यातल्या एखाद्या थेंबाला म्हणावं, की तू मला हवा आहेस सोडून जाऊ नकोस' असाच हा प्रसंग. पण माझ्यावरचं मंडळ आयोगाचं भूत जास्त प्रभावी झालं!

मला जिल्हाप्रमुखपद न मागता मिळालं. विधानसभेचं तिकीटही न मागता मिळालं. माझी प्रचंड हवा निर्माण झाली. निवडून येण्याची शक्यता निर्माण होताच ज्यांच्यासाठी मी लोकसभेच्या निवडणुकीत अक्षरश: जीवाचं रान केलं त्यांच्याबद्दल लोकांनी विरोधी उमेदवारासोबत हातमिळवणी केली. निवडणुकीनंतर मी एका वृत्तपत्रातून जाहीरपणे आरोप केलेत. भाजपाने माझी बाळासाहेबांकडे तक्रार केली. त्यांनी मला मुंबईला बोलावून घेतलं. आणि रोखठोक सवाल केला.

'वाकुडकर, भाजपावर तुम्ही जाहीरपणे टीका करत आहात, हे खरं आहे का?'

'होय साहेब'

'ते आपले सहकारी आहेत'

'पण त्यांनी निवडणुकीत धोका दिला साहेब'' आपल्या सोबत

'तुमच्याकडे काही पुरावा आहे का?'

मी बाळासाहेबांना फक्त दोन उदाहरणं दिलीत. आणि बाळासाहेब लगेच म्हणालेत, 'बेधडक चालू द्या.. आरोप मागे घेण्याची गरज नाही.'

त्या क्षणी मला किती हत्तीचं बळ आलं असेल? हा सेनापती होताच तसा!

ही शब्दांची तलवार, लढवैय्यांचा सरदार

दीनदुबळ्यांचा हुंकार, हे जगणे धुवांधार

दरी-खोर्‍यातून दुमदुमणारा शिवशाहीचा नाद..

सेनापती जिंदाबाद!

ही शौर्याची ललकारी, ही कर्तृत्वाची गाथा

ही बुलंद निधडी छाती, हा सदैव उन्नत माथा

हे त्यागाचे यज्ञकुंड अन् भक्तीचा उन्माद

सेनापती जिंदाबाद!

हा डोंगर खडतर तरीही, मायेचा रस्ता सोपा

अन् भेदरल्या चिमण्यांचा, हक्काचा अंतिम खोपा

उपेक्षितांच्या भरारण्याला, ही संजीवन साद

सेनापती जिंदाबाद!

माझा देशातल्या मोठय़ा मोठय़ा नेत्यांशी अगदी जवळून संबंध आला. व्ही.पी. सिंग, लालूप्रसाद यादव, शरद यादव, एस.आर. बोम्मई, कांती सिंह, रंजन यादव, मधू दंडवते आदी मान्यवरांना जवळून पाहिलं. चर्चा केली. जनता दलाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना धोरणात्मक बाबीतही माझा नेहमीचा सहभाग राहिला. पण बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच!

शिवसेना दोन्ही वेळा तुटली तेव्ही मी होतो. छगन भुजबळांच्याही सोबत होते. आणि नारायण राणे यांच्याही सोबत होतो. तो एक वेगळाच इतिहास आहे.

एखाद्या कोपर्‍यातून आत शिरलेला प्रकाशाचा कवडसा बघून सूर्याची कल्पना नाही करता येत. एखाढय़ाशा शब्दांत बाळासाहेबांबद्दल काय बोलणार? पण बाळासाहेबांचा मात्र माझ्या जीवनावर खोलवर प्रभाव आहे. तो कधीही पुसला जाणार नाही.

माझ्याच काय महाराष्ट्राच्या जीवनातून तरी तो पुसला जाऊ शकतो का? बाळासाहेबांना भेटणं कठीण. बोलणं कठीण, समजून घेणं कठीण. ओळखणं तर अतिशय कठीण. सार्‍या व्याख्यांच्या पलीकडे असलेलं हे आगळं, वेगळं, दुर्मिळ एकमेवाद्वितीय वादळ..

एक झंझावात होता

गीत वेडे गात होता!

शब्द होता, शस्त्र होता

पाठीवरचा हात होता!

चंद्र होता, सूर्य होता

पौर्णिमेची रात होता?

तोडली सामंतशाही

हा खरा आघात होता!

क्षितिजही त्याचे दिवाणे

क्या कहे- 'क्या बात' होता!

पत्थरांना फूल यावे

तो अशी बरसात होता!

जयभवानी, जय शिवाजी

मंत्र त्याच्या आत होता!

काळ आला, काळ गेला.

तो सदा जोरात होता!

काळ येईलही.. काळ जाईलही.

हा झंझावात मात्र घोंगावत राहणार..

सदैव.. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून

तनातून-मनातून. दर्‍याखोर्‍यातून..

त्या वादळाला मानाचा मुजरा..

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

आली दिवायी गेली दिवायी


शंकर बडेहा लेख तुमच्या हाती ये पावतर दिवायीचे भाऊबीजेपावतरचे सारे दिसं अटपून झाले असतीन. मले हरेक दिवायीले लहानपनच्या दिवायीची आठोनं आल्याबिगर राहत नाई. आता झगमगाट वाढला, दिखावा वाढला पन त्या वक्तीचा ओलावा वायला. मले आठोते आमी लहान असतानी दोन गोठीसाठी आमी भाऊबईन दिवायीची वाट पाहाचो. तवा दिवायीले नईन कपडे भेटाचे. त्यातनी आतासारका रेडिमेडचा जमाना नोता. बजारात (हप्त्याच्या) कपडय़ाच्या दुकानात लहान लेकरायचे आंगडे टोपरे, मोठय़ा मानसायच्या कपडय़ाच्या बणेना. आता जसे पोरायचे, पोरीयचे वानावानाचे ड्रेस भेट्टे तसं तवा नोते. त्यावक्ती आता जसे पोरायपासी जसी फैसन तसे कपडे असते तसं आमच्या वक्ती होतं का? दोन खाकी हापपँट आन् दोन पांढरे हाप बाह्याचे कुडते. तेच शायेत आन् तेच भाहेर. मी जवा आठवी पास झालो आन् पुढची शाया गावात नसल्यानं तालुक्याले हायस्कूलात नाव टाकलं तवा चौदा मैल सायकलनं जानं येनं करा लागन म्हून चप्पल घेऊन भेटली. आता किती मजा हाय पोरासोराची. कवा कवा वाट्टे उगीचं घाई केली आपन जन्माले याची. उगा आपलं मनाले समजवापुरतं. ते का आपल्या हातात अस्ते का?

या चपलीवून आठोलं मागच्या हप्त्यात माहय़ा पुतन्याचा दोस्त सुरेश त्याच्या बायकोले घेऊन यवतमायले खरेदीले आला तं घरी आमाले भेटाले आला. सुद वाटलं. त्याच्या कडीवर त्याचं चार-पाच मयन्याचं पोरगं. आमी बोलत होतो पिकाबद्दल पन माहा ध्यान राहून राहून त्याच्या पोराच्या पायात असलेल्या बुटाकडंच जाये. नाई राहवलं मले. म्या त्याले इचारलं सुरेश काय नाव हाय रे याचं? तो म्हने 'परीघ.' मले पह्यले वाटलं याले 'पराग' म्हनाचं असनं म्हून अखीन इचारलं 'पराग' का? थो म्हने नाई काका 'परीघ.' असं असं परीघ सुद नाव हाय. सुरेश चालते कारे हा? 'नाई काका चालत नाई.' 'नाई त्याच्या पायात बूट दिसले म्हून इचारलं.' त्याच्यावर्त तो म्हणे, 'आता एकुलता एक हाय तं घेऊनच टाकले बूट. कुठी चालाची वाट पाहाची.' म्या म्हनलं, 'नाई मले त्याच्याबद्दल काई म्हनाचं नाई पन तो चालाले लागनं तवा त्याच्या उघडय़ा पायाले माती लागू देजो नाईतं या मातीचं आपन काई देनं लागतो हे त्याले समजनारच नाई!'

पाहा हे असं होते सांगन्या सांगन्यात इसय बाजूले पडते पन येतो मी चाकोरीवर याले तुमी दिवायीचा फराय समजून घेजा. जवा आमच्या गावाले इजचं आली नोती तवाची दिवायी. तवा राती गॅसबत्तीचा उजिड किती मोठा वाटे. आता न्यार्‍या लखलख करनार्‍या लडा आल्या, बंद चालू होणारे चक्कर आले, नईन नईन लाईट आले त्यानं नजर फाकते पन दिपून नाई जात. त्यायचा हा लखलखाट त्यायच्या सिरीमंतीचा देखावा अस्ते. गावात ईज आली तवा दिवायीच्या दिसी दुपारी गुनामामा कोठय़ातून चार बल्ल्या आन् आठ दहा सनकाडय़ायचं कांडक घेऊन ये. घरातून सब्बल आन् नारयाच्या दोर्‍या आने मंग आंगनात हिंदानानं बल्ल्या गाडासाठी दर (खड्डा) करनं चालू करे. हितकभर दर झाला का बल्ली त्याच्यात धरून, दरातून निंघालेली माती त्याच्यात ढकलून, लहान लहान गोटे टाकून सब्बलीनं सिनारे. दोनी बल्ल्या उभ्या झाल्या का राह्यलेल्या दोनी बल्ल्या एकेक करून आनलेल्या नारयाच्या दोरीनं आडव्या याले बांधाच्या. आडवी बल्ली बांधतानी मामा एकला असल्याच्यानं जानार्‍याले आवाज दे, 'किस्ना जरा हात देजो बरं.' तवा हात द्याचा जमाना होता आता हात सोडाचा. मंग त्या आडव्या बल्ल्यावर्त अंतरानं शेनाचा गोया ठेऊन त्याले अरामानं थापे राती दिवनाल्या ठुवासाठी. सांज व्हाले आली का पह्यलेचं धुवून सुकवून ठुलेल्या दिवनाल्या परातीत चुन्याचं बोट लावून मांडून राहे. बाजूले बुदल्यात तेल. दिवनालीत तेल वतलं का मायनं नईन कापसाच्या केलेल्या वाती तेलात भिजवाच्या. मंग सनकाडी पेटवली का तिनं पेटवलेल्या दिवनाल्या पह्यली तुयसीपासी, समोरच्या दाठ्ठय़ाच्या (दार) दोनी कोन्यावर्त, न्हानीतं तवरीक गोईंदान बल्ल्यावर्त दिवनाल्या ठुल्या राहे.

देवीची पूजा होये पावतर कोनाले फटाके ना भेटे. एकडाव पूजा झाली का मंग फटाके जे आपल्या वाटनीवर्त ये ते बाजूले आडोस्याले ठेऊन मंग एक एक आनून बाजूले फोडाचे. फटाके भेटे कितीक सुरसुर्‍याचे (फुलझडी) दोन परकार एक सादी आन् एक तडतडी त्यायचा एकेक डबा, टिकल्याच्या डबीचा दहाचा पुडा, लहान मिरची फटाके, सिंगाडा फटाके आन् सर्पाची डबी झाले फटाके.मोठे भाऊ अँटमबम, सुतली बम आन् इमान नावाचा फटाका जो इमानावानी झुंग आवाज करत वर्त जाये. गुना मामा, दगडू मामासारके वयस्कर गडीमानसं फटय़ाक्याले हात ना लावे पन गोईंदासारके जवान गडी गजगोटे फोडत.तसा मले मी मोठा झाल्यापासून फटाक्याचा राग याले लागला आन् एका घडलेल्या घटनेपासून खरं सांगाचं तं माह्या मनात जे भेव धसलं ते अजून माह्या मनातून जाले काई तयार नाई.

झालं असं का मी दहावीत असतानी जे दिवायी आली होती त्या दिवायीची गोठ. असीच पूजा अटपली का नाना म्हन्जे बावाजी वसरीत दाठय़ाच्या बाजूले लाकडी खुर्ची राहे त्याच्यावर्त बसून. त्या दरवाज्याच्या आतनी बैखट. बैखटीले तिकून एक भित आन् त्या भितीले लाकडी दरवाजा. मंग एक लंबी खोली. तिच्या उजव्या आंगाले न्हानी आन् डाव्या आंगाले माडीवर्त जाले मातीच्या पायर्‍या आन् पायर्‍यापासी तिकडच्या भितीले दाठ्ठा आन् पलीकडं जे खोली त्यातनी कापूस राहे. हे सारं यासाठी सांगून राह्यलो की माह्या मनात फटाक्याचं भेव ज्या घटनेनं धसलं ते तुमाले समजावं. नाना खुर्चीवर्त बसून आन् मोठय़ा भावानं आंगनात इमान सिलगवलं म्हंजे त्याच्या वातीले पेटलेली सनकाडी लावल्याबराबर वात फुरफुरली आन् इमान वर्त जावं तं ते जे झुùù करत वर्त ना जाता नानाच्या बाजूनं आतनी जाऊन लंब्या खोलीच्या भितीले धडकून खाली पडलं आन् अखीन चेव आल्यावानी त्या भितीच्या दाठ्ठय़ातून कापसाच्या खोलीत घुसलं पन नसीब सुदं म्हून कापसाच्या गंजीच्या अलीकडं त्याच्यातली बारूद सरल्याच्यानं खाली पडलं. बरं झालं कापसाच्या गंजीत नाई घुसलं. सारे त्याच्या मांग धावत आले होते. जसं ते गंजीच्या अलीकडं पडलं तं दगडू मामानं अखीन तं उडनार नाई या भेवानं त्याले पायानं दाबलं तवा त्याच्या हे ध्यानातचं नाई आलं का ते गरम असनं.

तवापासून कायजात बसलेलं भेव आन् डोयानं पाह्यल्याच्यानं आपल्या चुकीनं आपलीच राखरांगोयी झाली असती याच्याच्यानं तवापासून फटाक्याले म्या हात नाई लावला. खरं तं एक परकारचा तिटकारा मनात भरून गेला. मले दिवायीची खरी मजा याले लागली जवा लगन झालेल्या बयनी घरी दिवायीले याले लागल्या. तवा इतकी थंडी राहे तरी दोन दिवस सकायीचं आंघोयीसाठी उठा लागे. तवा उटने लावून आन् चांगल्या साबनीनं त्या चोयून चोयून आंघोय घालत. आंघोय जरी गरम पाण्यानं राहे पन आंघोय झाली का थंडीनं आंग हाले. मंग सेकासाठी चुली म्होर बसाचो. सुवासिक तेल तवा दिवायीलेच भेटे. दोयपारी आठोन आली का केसावून हात फिरवून नाकासामोर धराचा. सासातून जानारा सुवास आंगभर पेरून घ्याचा. हे अटपलं का मंग फराय भेटे. चकल्या, सेव, चिवडा, करंज्या, बेसनाचे लाडू आन् माय तिय भाजून गुयाच्या पाकातले लाडू बनवे. त्यावक्ती पोरीबाईनं माहेरी याच्या दोनच वक्ता एकडाव दिवायीले आन् उन्हायात रसाईले. तवा वर्‍हाडात पूरमगन गावरानी आंबे राहे. आता जे थोडे थोडके झाडं शिल्लक हायेत ते वायले का मंग हे आंबे निरे आठोनीतच आठवा लागन.

आता बयनी त्यायच्या रामरगाडय़ात गुंतल्या. माय राह्यली नाई. जलमगाव सुटलं.पोरीयचे लगनं झाले. ते येतेत दिवायीसाठी पन कोनाच्या पोरीचा क्लास चालू होनार म्हून तिची निंघाची घाई असते. चकली आता वर्षभर भेट्टे म्हून तिचं अप्रूप नसते. नातू कुरकुरे, कॅडबरी मांगते. सकायी आंघोयीसाठी आजी नातवाले उठवाले जाते तं पोरगी म्हन्ते, 'नको आई तो नऊशिवाय उठत नाही.' तरी आजीले नातू नव पावतर झोपते याचं कवतूक. हे बदल होने असते तरी दोन दिसासाठी का होयेना सारे एकत्र येतेतं तेच खरी दिवायी. हे आपापल्या घरी निघून गेले का घर सुनं सुनं होते. घर खाले उठते. टाईम जाता जातं नाई मंग मन म्हन्ते गेली दिवायी.

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

Monday 19 November 2012

100 कोटी रुपयांचे कर्मकांड


1977 पर्यंत मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळत असे. पण हा विद्यार्थी पदवी प्रथम परीक्षेसाठी पात्र मानला जात नसे. त्यासाठी त्याला 'पीयूसी' नावाची पदवीपूर्व पात्रतेची परीक्षा द्यावी लागत असे. आज त्याऐवजी 11 वी, 12 वी अशी दोन वर्षाची कनिष्ठ महाविद्यालयांची योजना सुरू झाली आहे. 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी

महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पीयूसीसारख्या अभ्यासक्रमाची आवश्यकता रद्द झाली. विद्यापीठे स्वायत्त असल्यामुळे या पीयूसी परीक्षेचे अभ्यासक्रम कोणते असावेत, कसे असावेत हे ठरविण्याचा त्या त्या विद्यापीठांना अधिकार होता. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठाचे अभ्यासक्रम हे वेगवेगळे असत. या वर्गात उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात आणि एकूण गुण किती असावेत यातही फरक असे. त्यामुळे एका विद्यापीठातून दुसर्‍या विद्यापीठात विद्यार्थी दाखल झाला तर तो आपापल्या विद्यापीठात दाखल होण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्याचे काम विद्यापीठाला करावे लागत असे. यासाठी प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र विभाग असे. या विभागाचे नाव 'इलिजिबिलिटी' असे होते. हा विभाग सर्वच विद्यापीठांत आजही अस्तित्वात असून जोपर्यंत भारतीय विद्यापीठांची स्वायत्तता कायम राहणार आहे तोपर्यंत हा विभाग चालू राहणेही तेवढेच गरजेचे आहे.

आज 11-12 वी वर्गाचे अभ्यासक्रम राज्याचा शिक्षण विभाग तयार करीत आहे. पूर्वीच्या सेकंडरी स्कूल बोर्डामार्फत हे कार्य चालू आहे. हेच मंडळ 12 वीची परीक्षा घेतल्यानंतर 'हायर सेकंडरी सर्टिफिकेट' (एचएससी) विद्यार्थ्यांना प्रदान करते. हे मंडळ 12 वीचा अभ्यासक्रम तयार करते. त्याचप्रमाणे 12 वीची परीक्षाही घेत असते. त्यामुळे या मंडळाची गुणदान पद्धतीही सर्वत्र सारखीच आहे. म्हणजे असे, की औरंगाबाद बोर्डाच्या विद्यार्थ्याला 12 वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इंग्रजी विषयात किमान 35 टक्के गुण घ्यावे लागत असतील तर मुंबईच्या विद्यार्थ्याला 40 टक्के गुण घ्यावे लागतात असे नाही. जर एकूण गुण सरासरी 40 टक्के मिळाले तरच उत्तीर्ण होईल अशी अट सांगलीच्या विद्यार्थ्याला असेल तर जालन्याच्या विद्यार्थ्याला यापैकी कमी गुण घेऊन उत्तीर्ण होता येत नाही. याचा अर्थच असा, की आज महाराष्ट्रातून 12 वीची परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम आणि गुणदानपद्धतीच्या समान अटी लागू आहेत. म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे, की अशा परिस्थितीत हा विद्यार्थी पदवी प्रथम परीक्षा देण्यासाठी पात्र आहे की नाही हे ठरविण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या वेगवेगळ्य़ा अशा कोणत्या कसोटय़ा आहेत? माझ्या माहितीप्रमाणे आता पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे केवळ कर्मकांड उरले आहे. अलीकडे तर काही विद्यापीठे इलिजिबिलिटीचे फॉर्म्स

महाविद्यालयांनाच भरायला लवतात आणि ते तपासण्याची जबाबदारीही त्या त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांवरच टाकली जाते असे कळते. म्हणजे मग शिल्लक काय उरते, तर प्राचार्यांनी विद्यापीठांना प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाठविणे आणि विद्यापीठ कार्यालय काय कार्य करते, तर आलेल्या यादीवर इलिजिबिलिटीचा क्रमांक टाकते. इतकेच नाही, तर अशा फॉर्मची रद्दी साठवायला जागा नसल्यामुळे हे फॉर्म्ससुद्धा आता महाविद्यालयानेच जपून ठेवावेत असेही सांगितले जाते. मी म्हणूनच या पात्रता प्रमाणपत्राला 'कर्मकांड' असे म्हणालो. जी गोष्ट पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेण्याबाबत अगदी तीच गोष्ट पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या वर्गात प्रवेश घेण्याबाबतही लागू आहे. तिथे तर याहीपेक्षा वेगळाच विनोद घडतो. म्हणजे असे, की समजा अमरावती विद्यापीठातून पदवी (कला) परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी विद्यापीठातून पदव्युत्तर प्रथम वर्षात प्रवेश घेतो म्हणाला तर तो विद्यार्थी पात्र की अपात्र हे ठरविण्याचे काम हेच इलिजिबिलिटी सेक्शन करते. आता पदवीचा अभ्यासक्रम ज्या विद्यापीठाने ठरवला, ज्या विद्यापीठाने पदवीची परीक्षा घेतली आणि ज्या कोणत्या गुणदानपद्धतीने विद्यापीठाला उत्तीर्ण केले आता पुन्हा तोच विद्यार्थी त्या विद्यापीठात पदव्युत्तर वर्षात प्रवेश घ्यायला पात्र आहे की नाही हे त्याच विद्यापीठाचे इलिजिबिलिटी सेक्शन ठरवणार. आता इथे तर हे केवळ कर्मकांड नाही, तर विनोदी कर्मकांड ठरते असे जर कुणी म्हणाल तर त्यात चूक काय?

उच्चशिक्षणाच्या विस्तारीकरणामुळे आता तालुकापातळीपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुविधा झाली आहे. कित्येक परीक्षकांना आपल्या पाल्यांना बाहेरगावी शिकायला पाठविणे परवडत नाही. त्यात मराठवाडय़ात तर कनिष्ठ महाविद्यालयेही पदवी महाविद्यालयांना जोडली गेलेली आहेत. त्यामुळे किनवटसारख्या कोपर्‍यावरच्या गावातल्या विद्यार्थ्याने 12 वीनंतर एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतला व तिथे एम.ए.ची सोय उपलब्ध असली, की तो सतत सात वर्षे एकाच महाविद्यालयात राहून आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. पण या सात वर्षात तो पुढच्या वर्गात शिक्षण घ्यायला पात्र आहे की नाही यासाठी दोन वेळेला त्याला फॉर्म भरावा लागतो. अशा गोष्टीला कर्मकांड म्हणू नये तर काय म्हणावे? मला हे मान्य आहे, की महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांतील मुले कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त महाराष्ट्रात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी ठरविणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्राबाहेरून येणार्‍या अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण किती? मी ही माहिती मिळवली नाही हे खरे असले तरी हे प्रमाण 1 टक्क्याहूनही कमी असण्याचीच शक्यता आहे. मग या 1 टक्के विद्यार्थ्यांसाठी उरलेल्या 99 टक्के विद्यार्थ्यांनी इलिजिबिलिटी फॉर्म भरण्याचे कर्मकांड का पूर्ण करावे?

खरेतर केवळ कर्मकांड म्हणून या मुद्याकडे मी दुर्लक्षही केले असते. पण या कर्मकांडात जी आर्थिक उलाढाल होते ती दुर्लक्ष करण्यासारखी आहे का?

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून थोडी माहिती उपलब्ध करून घेतली आहे. पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्षात या विद्यापीठात आजमितीस दीड लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका फॉर्मची किंमत 10 रुपये आणि प्रमाणपत्र देण्याचे शुल्क 50 रुपये असा हिशोब केला तर हे विद्यापीठ पालकांकडून सुमारे 9 कोटी रुपये या कामासाठी वसूल करीत असावे असा माझा तर्क आहे. महाराष्ट्रात आजमितीस 20 विद्यापीठे आहेत आणि या सर्व विद्यापीठात प्रथम वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सारखी नसेल असे गृहीत धरले तरी पात्रता प्रमाणपत्रापोटी किमान 100 कोटी रुपयांचा महसूल विद्यापीठांकडे जमा होत असावा असा तर्क करता येतो. ही एवढी मोठी रक्कम पालकांच्या डोक्यावर भुर्दड नव्हे काय? शिवाय हे काम करण्यासाठी वाया जाणारे मनुष्यबळ किती आणि रद्द म्हणून वाया जाणारी स्टेशनरी किती? मी आता सेवानिवृत्त होऊन आठ वर्षे होत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त माणसाला अशा प्रशासकीय बाबीवर बोलण्याचा अधिकार आहे की नाही हे मला माहिती नाही. पण माझ्या प्राचार्यपदाच्या काळातही मी या विषयावर लेखन केले होते; पण ते दुर्लक्षितच राहिले. आज पुन्हा या विषयावर लिहिताना पालकांना होणारा भुर्दड, कर्मचारीवर्गाचा वाया जाणारा वेळ आणि स्टेशनरीचा अपव्यय या गोष्टींचा पुनर्विचार व्हायला काय हरकत आहे? ब्रिटिशांनी सुरू केलेले कायदे कालबाह्य कसे झाले आहेत हे जर आम्ही इतरांना सांगत असू तर आपल्याही भूमीतील ब्रिटिशकालीन नियमांचा पुनर्विचार आपण करायला काय हरकत आहे?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

आनंदी राहा, सोबतच्या माणसांनाही आनंदी करा!

A A << Back to Headlines     
'हॅपी दिवाली', दिवाळी आनंदाची जावो, अशा शुभेच्छांचा आपण वर्षाव करतो. उत्तम गोष्ट आहे. पण केवळ दिवाळीच का? प्रत्येकच दिवस का नाही? माणूस दीर्घकाळ सुखाचा शोध घेत आला आहे. आनंदी राहण्याचं रहस्य शोधतो आहे. कदाचित धर्मानी सगळ्यात जास्त सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही हा शोध सुरू आहे.

भूक शमवण्यातलं सुख, प्रणयातलं सुख, बाकी सारी सुखं क्षणभंगुर आहेत. काही काळातच ती ओसरतात. म्हणून चिरकाल, अनंतकाळ टिकणारं सुख शोधण्याचा प्रयत्न धर्मानी केला. भारतीय धर्माना त्यातून मोक्ष ही कल्पना सुचली. मोक्ष म्हणजे सगळ्या सुख-दु:खांपासून सुटका. जन्म-मरणाच्या फेर्‍यामधून सुटका. चिरंतन आनंदाची अवस्था. आता ही केवळ कल्पना आहे की वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. कारण मोक्ष मरणानंतर प्राप्त होतो आणि मेल्यानंतर माणूस आपली अनुभूती, अनुभव जिवंत माणसांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळं त्या वादात, त्या क्षेत्रात आपण न शिरलेलेच बरं. शिवाय मोक्षाचा एवढा आग्रह असणार्‍या भारतातील धार्मिक वातावरणात शूद्र-अतिशूद्रांना ढोरापेक्षाही निकृष्टपणे जगण्यास, तब्बल दोन-अडीच हजार वर्षे तरी, प्रवृत्त करणारी चातुर्वण्र्याची कल्पना अमानुषपणे राबवली जाऊ शकतेच कशी? याचाच अर्थ चिरंतन आनंद अवस्था गाठण्यास आसुसलेल्या आध्यात्मिक माणसांचं या जीवनातील दु:खाशी व आनंदाशी काही देणंघेणं नव्हतं. माणुसकीशीही काही देणंघेणं नव्हतं, असं मानायचं काय? असे अनेक अमानुष प्रश्न निर्माण होतात. म्हणून आपण या पृथ्वीवरच्या, इहलोकातील सुखाच्या शोधाविषयी बोलू, विचार करू, समजून घेऊ.

गेल्या 10 लाख वर्षापासून आपण दोन पायांचा प्राणी, पृथ्वीवर वावरतो आहे. आजच्या सारखा 'माणूस' म्हणवला जाणारा प्राणी किमान दोन लाख वर्षापासून पृथ्वीवर जगतो आहे. प्रत्येकच प्राण्याकडून निसर्गाच्या किमान दोन अपेक्षा आहेत.

एक तीव्रतेनं जगण्याची, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी आटोकाट प्रयत्न करून, संघर्ष करून मारकाट करून जिवंत राहण्याची धडपड करण्याची प्रवृत्ती. जन्म घेण्याच्या प्रक्रियेसोबतच, एक नॅचरल इन्स्टिंक्टचा, जैविक प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून जगण्याची दुर्दम्य इच्छा प्रत्येक माणसाला, प्राणिमात्राला प्राप्त होत असते. म्हणूनच अगदी टाटा-बिर्ला अंबानी असो की तुमच्या माझ्यासारखा प्राथमिक गरजा पूर्ण करू शकणारा मध्यमवर्गीय माणूस असो की, आज रात्री खायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसणारा एखादा भिकारी असो, प्रत्येक जणचं धडपडत जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जगण्याची, जिवंत राहण्याची दुर्दम्य इच्छा ही प्राणिमात्राला निसर्गानं दिलेली देणगी आहे, निसर्गाची ती अपरिहार्य गरज आहे.

दुसरं, प्राणिमात्रानं आपली जात जिवंत ठेवण्यासाठी स्वत:सारखेच प्राणी जन्माला घातले पाहिजे, त्यासाठीसुद्धा वाट्टेल तेवढा प्रयत्न केला पाहिजे, प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, पण नवी पिढी जन्माला घातली पाहिजे. ही निसर्गाची दुसरी आवश्यकता.

माणूस हा उत्क्रांत प्राणी असला तरी सस्तन प्राण्याचे सारे नियम त्याला लागू होतात. मूल जन्माला यायचं असेल तर नर-मादीनं जवळ आलं पाहिजे, त्यांनी मैथुन केलं पाहिजे. तरच नवी पिढी जन्माला येणार. म्हणून नर-मादीमध्ये परस्परांविषयी जबरदस्त ओढ वाटेल, आकर्षण वाटेल अशी यंत्रणा निसर्गानं निर्माण केली. एवढंच नव्हे, तर हे एकत्र येणं कष्टप्रद, त्रासदायक न होता आनंददायक बनेल अशी योजना केली. अगदी नर-मादी एकत्र येताना प्रणयातही आनंद मिळेल, तो वाढत जाईल. एवढा आनंद वाढत जाईल की तो मधेच थांबवता येणं शक्य होणार नाही, त्याचं रूपांतर मैथुनात होईल आणि मैथुनात हा आनंद उत्तरोत्तर वाटत जाईल व त्याची परिणती 'परमोच्च आनंदात' होईल, लैंगिक तृप्तीत होईल. मगच ही प्रक्रिया थांबेल. अशीही योजना निसर्गानं आखली. कारण नर तृप्तीच्या वेळी शुक्राणू सोडले जातात, अपत्य राहण्याची शक्यता वाढते.

निसर्गानं हा सारा खेळच आनंदमय करून टाकला. बक्षीस म्हणून परमोच्च आनंद बहाल केला. कारण प्राणी आनंदासाठी धडपडायला, कष्ट घ्यायला तयार आहे म्हणून.

प्रणयाराधनातून मनुष्यप्राण्याला जो परमोच्च आनंद मिळतो तेवढा आनंद दुसर्‍या कोणत्याही माध्यमातून त्याला मिळत नाही, ही वस्तुस्थिती निसर्गानं निर्माण करून ठेवली. कारण नवी पिढी निर्मिती ही निसर्गाची गरज होती.

पण हा आनंद क्षणिक असतो, काही सेकंद-मिनिटांचा असतो, त्याऐवजी चिरंतन आनंद प्राप्त करण्यासाठी माणसानं धर्म-अध्यात्म या माध्यमातून प्रयत्न केले. दीर्घकाळ, किमान अडीच-तीन हजार वर्षे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश मिळालं की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे.

मधल्या काळात, प्रामुख्यानं धर्माच्या या प्रणयाराधनामधल्या निसर्गनिर्मित आनंदावर मर्यादा आणण्याचे खूप प्रयत्न झाले. प्रणय-मैथुन (आधुनिक भाषेत सेक्स) ही प्रक्रिया वाईट ठरली गेली, पाप ठरवली गेली. प्रणय-मैथुन हे आध्यात्मिक प्रगतीच्या, मोक्षाच्या मार्गातले अडथळे आहेत असं मानलं गेलं. ब्रह्मचर्याला प्रचंड महत्त्व दिलं गेलं, प्रतिष्ठित केलं गेलं. जवळपास, मुस्लिम वगळता, सगळ्याच धर्मानी हे ब्रह्मचर्याचे प्रयोग दीर्घकाळ राबवले. शक्य होईल तिथे प्रणय-मैथुनाला थांबवण्याचा, शक्य असेल तिथे बंदी घालण्याचा प्रयत्न केला. पण खरं म्हणजे ही लढाई निसर्गाच्या प्राथमिक नियमांच्या विरुद्धची लढाई होती. निसर्गाचं प्रॉडक्ट, निर्मिती असणार्‍या माणसानं ती आपल्या निर्मात्याविरुद्ध उभारलेली लढाई होती. ती जिंकणं शक्य होतं का? शक्यच नव्हतं. त्यामुळं हे सारे ब्रह्मचर्य प्रयोग दारुणरीत्या असफल झाले. ब्रह्मचर्याची वस्तीस्थानं विकृतीचे अड्डे बनले. ºिश्चन धर्मामधील कॅथॉलिक पंथीय विचारसरणीत 'प्रणय-मैथुन'ला स्थानच द्यायची तयारी नव्हती. अगदी नवरा-बायकोनंसुद्धा यापासून दूर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा होती. अपवाद फक्त मूल जन्माला घालण्यापुरता. तेवढय़ाचसाठी आपद्धर्म म्हणून पती-पत्नीनं एकत्र यावं अशी अपेक्षा होती. कॅथॉलिक पंथीय धर्मोपदेशकांनी ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे असा आग्रह होता. पण विसावं शतक संपता संपता धर्मोपदेशकांनासुद्धा लग्न करण्याची परवानगी देणारा फतवा व्हॅटिकन सिटीला काढावा लागला. ही चांगली गोष्ट आहे. हा निर्णय कौतुकास्पद, माणुसकीपूर्ण आहे.

निसर्गाचं अपत्य असणारा माणूस कधीच निसर्गाच्या विरुद्धची लढाई जिंकू शकत नाही. जास्तीतजास्त तो निसर्गनियमांचाच वापर करून काही निसर्गनियमांमधून थोडीशी सवलत प्राप्त करू शकतो, काही नियमांना थोडीशी मुरड घालू शकतो. निसर्गनियम समजून घेऊन काही नियमांपासून, थोडसं कंपल्शन बाजूला सारून, काहीसं स्वातंर्त्य पदरात पाडून घेऊ शकतो. ही आपली, माणसाची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. कारण शेवटी आपण या निसर्गाचे घटक आहोत, मालक नाहीत.

निसर्गानं प्राणिमात्राला आणखी एक तिसरी इन्स्टिंक्ट, जैविक प्रेरणा बहाल केली. सुखानं जगण्याची, सुखासाठी आनंदासाठी धडपडण्याची. आपल्या मेंदूत उत्क्रांतीच्या दुसर्‍या टप्प्यात लिंबिक सिस्टिम प्राप्त झाली आहे. यात एक रिवॉर्ड फंक्शन असतं तर दुसरं पनिशमेंट फंक्शन असतं. ज्या ज्या वेळी आपण एखादी कृती करतो, अनुभव घेतो, वर्तणूक करतो त्या त्या वेळी रिवॉर्ड वा पनिशमेंट फंक्शन जागृत होतं. जर रिवॉर्ड फंक्शन जागृत झालं तर आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतं. मग ती कृती पुन्हापुन्हा करावीशी वाटते; तो अनुभव, ती वर्तणूक पुन्हा पुन्हा रिपिट करावीशी वाटते. कारण सातत्यानं सुख मिळावं, आनंद मिळावा यासाठी धडपडत जगावं हाही नैसर्गिक प्रेरणेचा एक भाग आहे.

जर आपलं पनिशमेंट फंक्शन जागृत झालं तर आपल्याला वेदना होते, दु:ख होतं. मग ती कृती, वर्तणूक, तो अनुभव पुन्हा रिपिट करावासा वाटत नाही. कारण आपल्याला वेदना, दु:ख नको असतं.

निसर्गाचा पहिला नियम, जो जो जन्माला आला त्यानं वाट्टेल त्या परिस्थितीत धडपडत जगावं. पण कसं जगावं? सातत्यानं रिवॉर्ड फंक्शन जागृत होत जाईल, आनंद मिळेल, सुख मिळेल. (आणि पनिशमेंट फंक्शन जागृत होणार नाही, दु:ख आणि वेदनांपासून दूर राहता येईल.) या पद्धतीनं माणसानं जगावं, असा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो. निसर्गाचीच तशी योजना आहे.

त्यामुळं तुमच्या-माझ्या जीवनाचा खराखुरा उद्देशच आनंद मिळवणं, सुख मिळवणं हा आहे.

जर प्रत्येक माणूस सुख मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत गेला तर माणूस स्वार्थी बनणार नाही का? अमानुष बनणार नाही का? स्वत:च्या सुखासाठी स्वार्थासाठी तो दुसर्‍यांचे मुडदे पाडणार नाही का? या प्रश्नांचं उत्तर दीर्घकाळापासून माणूस शोधत आला आहे आणि कदाचित या भीतीपोटीच इहलोकातील, प्रत्यक्ष जीवनातील सुखाला किंमत देऊ नये, त्यापेक्षा परलोकातील, स्वर्गातील सुखाला, मोक्षाला किंमत दिल्यामुळं माणूस अधिक परोपकारानं वागेल, अधिक माणुसकीपूर्ण वागेल अशी अपेक्षा केली असावी. त्या दिशेनं आपण गेली दोन-अडीच हजार वर्षे प्रवास करून पाहिला. पण त्यातून असं काही साध्य होताना दिसत नाही.

तसं असतं तर किमान आपली सारी धार्मिक स्थळं माणुसकीची, प्रामाणिकपणाची, परोपकाराची स्थळं ठरली असती. देवळांमध्ये भरमसाट काळा पैसा दानपेटय़ांमध्ये जमा झाला नसता आणि कोटय़वधी रुपये दानपेटय़ांत जमा होणार्‍या देवळांच्या बाहेर भिकार्‍यांच्या रांगा लागल्या नसत्या. देवळांनीच भिकार्‍यांचं भिकारीपण संपवलं असतं.

माणसं देवधर्म मानतात म्हणून प्रामाणिकपणे वागतात, अशी एकेकाळी माझीही, इतर धार्मिक माणसांप्रमाणेच समजूत होती.

27 जून 1975 साली (25 जूनला रात्री 12 वा. आणीबाणी घोषित झाली) आणीबाणीला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली. पुढे 10 महिने वध्र्याच्या जेलमध्ये राहावं लागलं. त्या वेळी मी खरं म्हणजे देव मानणारा होतो. पण पूजाअर्चा सुटली होती. मी, माझे सहकारी चंद्रकांत वानखडे, सुभाष इथापे तिघं जण या कारणांसाठी (आणीबाणीला विरोध) जेलमध्ये आलो होतो. आम्ही तिघेही देवपूजा करत नव्हतो. बाकी सारे वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक झालेले आणि जिल्ह्यातील सारे हिस्ट्रीशिटर गुन्हेगार, सुमारे 900 लोक, जेलमध्ये होते. ते सारेच्या सारे नियमितपणे देवाची पूजा करत असत. एवढंच नव्हे, तर दरोडा घालतानाही देवाला साकडं घालत असत आणि देव त्यांना याही कामात मदत करतो, अशी त्यांची श्रद्धा होती.

तेव्हा कळलं देव मानणारी माणसं प्रामाणिक नसतात. जी प्रामाणिक माणसं देव मानतात तीच देव मानणारी माणसं प्रामाणिक असतात.

पण माणसाला एकटय़ाला जगता येत नाही. मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शिक्षा ही एकांतवासाची शिक्षा आहे. दीर्घकाळ माणूस एकटा राहिला तर पागल होतो, नाहीतर आत्महत्या करून आयुष्य संपवतो.

आपल्याला जर आनंदानं जगायचं असेल तर इतर माणसांसोबत जगलंच पाहिजे. बरं इतरांना आपण दु:खी करत गेलो तर आपण आनंदी होतो का? नाही. उलट आपल्याला रुखरुख वाटते. अपराधीपणाची टोचणी लागते. त्यामुळं आनंदानं जगायचं असेल तर आपल्यासोबतच्या माणसांच्या जीवनातील आनंद वाढवण्याचा प्रयत्न करत गेलो तरच आपल्याला आनंदानं जगता येतं.

त्यामुळं या जीवनात जगत असताना 'आनंदी राहा आणि सोबतच्या माणसांना आनंदी करा' हा तुमच्या-माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा मंत्र ठरला पाहिजे, प्रार्थना ठरली पाहिजे. ही निसर्गाची गरज आहे, निसर्गाची शिकवण आहे. हेच खरं अध्यात्म आहे ना? धर्म आहे ना? माणुसकीपूर्ण माणूस बनणं आहे ना? मी आनंदी होण्यासाठी इतरांना आनंदी करत जाणं हाच खरा परोपकार आहे ना?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

उजवं मन सर्जनशील, तर डावं विश्लेषण करणारं


मानवी मेंदूच्या निओ कॉर्टेक्स नावाच्या वरच्या आवरणातील डावे व उजवे अर्धगोल कशा प्रकारे काम करतात हे डॉ. जिल टेलर या प्रसिद्ध अमेरिकन मेंदूरचना शास्त्रज्ञाने तिला स्वत:ला तरुण वयात जेव्हा पॅरालिसीसचा झटका आला त्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले व तिच्या अनुभवांचे कथन चित्रा बेडेकर यांनी 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सामान्य वाचकांना समजणार्‍या पद्धतीने केले आहे. वैज्ञानिकांसाठी असा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत दुर्मिळ असतो. मेंदूतील असंख्य मज्जातंतूच्या जाळ्याची रचना समजून घेणे व बाहेरून ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या माहितीवर प्रक्रिया होत असताना मेंदूतील हे मज्जातंतूंचे वेगवेगळे सर्किटस् कशा प्रकारे उद्दीपित होतात याचे निरीक्षण व परीक्षण दुसर्‍या व्यक्तींवर प्रयोग करून शास्त्रज्ञांकडून केले जाते; परंतु मेंदूच्या एका भागात बिघाड झाल्यावर दुसरा भाग कार्यरत असताना नेमका कसा अनुभव येतो, हे डॉ. जिल टेलर यांना स्वत:च्या आजारपणात अनुभवता आले व आपल्या शास्त्रीय माहितीच्या प्रत्यक्ष अनुभवासोबत पडताळा घेऊन त्यांनी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांची कार्यपद्धती जगाला विशद केली. त्या अगदी भिन्नभिन्न कार्यपद्धती चित्रा बेडेकर यांच्याच शब्दात मागील लेखांकापासून आपण वाचत आहोत. कोणत्याही घटनेचे डावा अर्धगोल सुटय़ासुटय़ा तुकडय़ांद्वारे भूतकाळाशी त्या घटनेला जोडून विश्लेषण करतो व याउलट उजवा अर्धगोल मात्र समग्रपणे केवळ वर्तमानात व सर्व विश्वाची जुळवून ती घटना समजून घेतो असा मूलभूत फरक आपण पाहिला. त्यासंदर्भात चित्रा बेडेकर पुढे लिहितात : दोन अर्धगोलांमध्ये दडलेल्या आपल्या

व्यक्तिमत्त्वातल्या दोन भिन्न प्रवृत्ती कोणत्याही गोष्टींचा भिन्न प्रकारे विचार करतात. भावनांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्करण करतात आणि आपल्या शरीरावरसुद्धा वेगळ्या प्रकारचे परिणाम घडवून आणतात. डाव्या आणि उजव्या अर्धगोलांमुळे दिसून येणार्‍या प्रवृत्तींचा ढोबळमानाने आढावा घेतला तरी त्यांच्यातला फरक प्रकर्षाने जाणवतो.

आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाला जगाची पर्वा नसते. तो फक्त वर्तमान क्षणाचाच विचार करतो. म्हणून उजव्या मनाची प्रवृत्ती आनंदी, उत्साही, स्नेहमय असते. उजवं मन कृतज्ञतेने भरलेलं असतं. ते मन समाधानी, दयाळू, संवर्धन जोपासणारं आणि चिरंतन आशावादी असतं. तुलना करणं, न्यायनिवाडा करणं ही त्याची प्रवृत्ती नसते. उजव्या मनासाठी सर्व काही सलग, अखंड, एकमेकांपासून वेगळं न करता येण्याजोगं असतं. त्यामुळे उजवं मन सर्व काही, सर्व जण यांना समान लेखतं.

उजव्या मनाची प्रवृत्ती धाडसी, समृद्धीची स्तुती करणारी, सामाजिकरीत्या जुळवून घेणारी असते. ते मन शब्दांपलीकडच्या संवादाला अतिशय संवेदनशील असतं. सहानुभाव बाळगणारं असतं. दुसर्‍यांच्या भावना बिनचूक ओळखणारं असतं. आपण ज्याला दैवी शक्ती, अंत:प्रेरणा किंवा सर्वोच्च जाणीव म्हणतो त्याचं अधिष्ठान आपल्या उजव्या मनात असतं.

नेहमीच्या चौकटीच्या आणि बंधनांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची उजव्या मनाची प्रवृत्ती असते. त्यामुळे वर्तमान क्षणातल्या सर्व शक्यता पडताळून नवा दृष्टिकोन बाळगण्याची त्या मनाची वृत्ती असते. उजवं मन अतिशय सर्जनशील असतं आणि गोंधळ ही सर्जनशीलतेची पहिली पायरी असते याचा ते मन स्वीकार करतं. ते अतिशय चपळ, चंचल असतं. शरीरातल्या पेशींकडून येणार्‍या सूक्ष्म संदेशांना, सूक्ष्मातिसूक्ष्म सूचनांना उजवं मन अतिशय संवेदनशील असतं. अनुभवातून आणि स्पर्शातून ते मन सतत काहीतरी शिकत असतं.

उजव्या मनाला भूतकाळाचं ओझं बाळगण्याची गरज नसते आणि भविष्यात काय घडेल याची चिंता नसते. त्यामुळे वर्तमान क्षणातलं स्वातंर्त्य ते मन साजरं करतं. आपल्या केवळ शरीराचंच नव्हे, तर मनाचंसुद्धा स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी उजव्या मनावर सोपवलेली असते. उजवं मन सृष्टीतल्या सर्व गोष्टीत, प्राणिमात्रात समानता शोधत असतं. माणुसकीला ते मन सर्वाधिक मौल्यवान मानतं.

या तुलनेत डाव्या अर्धगोलाच्या प्रवृत्तीत खूपच फरक असतो. आपलं डावं मन बारीकसारीक तपशिलांनी ओतप्रोत भरलेलं असतं आणि आयुष्याला घडय़ाळाच्या काटय़ावर चालवणारं असतं. माणसाच्या एकूण प्रवृत्तीची गंभीर बाजू या डाव्या मनाकडे सोपवलेली असते. भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमान क्षणात निर्णय घेणारं ते मन असतं. वेगळेपणाच्या, भिन्नतेच्या काटेकोर मर्यादा सदैव लक्षात घेत चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक यासंदर्भात निवाडा करत असतं. वर्तमान क्षणाची उजव्या मनाने जमवलेली सर्व माहिती आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन डावं मन त्या माहितीला व्यवस्थित हाताळण्याजोग्या पद्धतीने रचून ठेवतं. भाषा हे डाव्या मनाचं विचार करण्याचं माध्यम असतं आणि खुद्द डावं मन हे माणसाचं बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचं माध्यम असतं. सतत चालणार्‍या आत्मसंवादातून आपण इतर जगापेक्षा अलग आहोत याचं भान आपल्यामध्ये डावं मन सदैव जागृत ठेवत असतं. आपल्याकडे येत राहणार्‍या माहितीचं उत्तम व्यवस्थापन करण्याची आणि चिकित्सकपणे त्या माहितीचं काटेकोर विश्लेषण करण्याची प्रचंड क्षमता डाव्या मनाकडे असते. ते मन पूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) असतं. एकाच वेळी अनेक कामं करण्याची विलक्षण हातोटी डाव्या मनाकडे असते. क्रमवारीने विचार करण्यात वाकबगार असल्यामुळे प्रत्यक्ष जबाबदार्‍या हाताळण्याचं त्या मनाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असतं. वेगवेगळी न्यूरोसर्किट्स ओळखण्याची निसर्गदत्त देणगी डाव्या मनाला लाभलेली असते. अशा न्यूरोसर्किट्सच्या मदतीने प्रचंड माहितीचा क्षणार्धात फडशा पाडण्याचं कसब त्या मनाकडे असतं.

डाव्या मनाकडे आणखी एक अजब गुण असतो. बाहेरच्या जगाकडून अव्याहत येत असलेल्या माहितीचा अर्थ लावण्यासाठी त्या माहितीला सूत्ररूपात गुंफण्याचं किंवा त्यातून कथासूत्र रचण्याचं चातुर्य त्या मनाकडे असतं. पण प्रत्यक्ष मिळणार्‍या माहितीत जर कुठे त्रुटी असतील तर स्वत:च त्या त्रुटी भरून काढण्याची चलाखी डाव्या मनाकडे असते. बेमालूम कथानक रचून तेच सत्य म्हणून पुढे रेटण्याची विलक्षण हातोटी या मनाकडे असते. त्यामुळे आपल्याला खरं किती ठाऊक आहे आणि 'आपल्याला ठाऊक आहे' असं आपल्याला किती वाटतंय या दोन्हीत प्रचंड तफावत असू शकते.

या पचेंद्रियांच्या पलीकडे असणारं एक सहावं इंद्रिय म्हणजे आपल्या मेंदूचा उजवा अर्धगोल. त्याचा पुरेपूर अनुभव जिलने स्ट्रोकनंतर सात-साडेसात वर्षे घेतल्यामुळे ऊर्जेचं गतिशास्त्र (एनर्जी डायनॅमिक्स) आणि अंत:स्फूर्ती याविषयी ती स्वानुभव सांगते. जिलच्या म्हणण्यानुसार आपण सर्व जण ऊर्जायुक्त सजीव आहोत. विश्वातल्या ऊर्जेचं आकलन करून तिचं न्यूरॉन्सच्या सांकेतिक लिपीत रूपांतर करण्यासाठी आपल्या मेंदूची रचना झाली आहे. आपल्या पचेंद्रियांमार्फत ऊर्जेचं आकलन करून घेण्याच्या कामात डाव्या अर्धगोलाची मर्यादा आडवी येते; परंतु अंत:स्फूर्तीने सूक्ष्मातल्या सूक्ष्म ऊर्जेचं गतिशास्त्र आकलन करून घेण्यासाठी उजव्या अर्धगोलाची रचना झाली आहे. स्ट्रोकच्या अनुभवानंतर आपल्या अंत:प्रेरणेचा पुरेपूर वापर जिल करीत असते.

डॉ. जिल टेलर यांच्या मते, दुसर्‍याच्या जखमेवर हात ठेवून आपण ध्यानधारणा करून ती जखम बरी व्हायला मदत करू शकतो. रेकी, फेंगशूईसारख्या पद्धतींमध्ये ऊर्जेच्या गतिशास्त्राचं विज्ञान दडलं असावं, असं त्याचं मत दिसते. अंत:प्रेरणेने ऊर्जेच्या गतिशास्त्राचं कसं आकलन आणि उपयोग करायचा याची आपल्या उजव्या मनाला संपूर्ण स्पष्टता असते, असा डॉ. जिल टेलर यांचा ठाम विश्वास आहे; परंतु वैज्ञानिकदृष्टय़ा हे पचनी पडणं कठीण आहे. अशी स्वत:ची वेगळी टीप चित्रा बेडेकर यांनी पुस्तकाच्या अखेरच्या भागात जोडली आहे.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

बिमार पडाची मजा असते


शंकर बडेतुमी असं म्हनानं का बिमार पडण्याची काय मजा असते? असते! तुमी इचार करून पाहा नाईतं मी तं तुमाले सांगनारचं हावो. मंग तुमाले वाटन का हो लेक हेतं खरं हाय. आपन जवा लहान असतो आन् एखांद्या दिसी शायेत जाचं जीवावर येते तवा कसं आपलं पोट दुखाले लागते. आठोलं? मले तसं शायेत जाले मनापासून आवडे आन् आमच्या बेसिक शायेची शिस्त एवढी कडक काऊन का तवा थेटे गुरुजीचा जमाना होता, पन हे जरी खरं असलं तरी एखांद्या दिसी चाट नाई मारलीतं मंग लहानपनची मजाचं काय? हे पोट दुखाची दुप्पलं सदाई मारता थोडीचं येते. एखांद्या वक्ती आनं आपलं दुखनं खरखुरं वाटावं म्हून एकदोन खेपा टमरेट उलचून खारी (गावाला लागून असलेलं शेत) जवय करावं. पाहा माहा असं होते. माह्या एकल्याचचं असं होते का आपल्या खेडय़ातल्या मानसाले याच्यावून ते आनं त्याच्यावून हे आठवाची खोडचं असते कानी?

मी कालेजमंदी शिकत असतानाचा एक किस्सा टमरेलच्यानं आठोला. झालं काय मी कालेजात होतो तवा आर्केस्टात असल्यानं आजूबाजूच्या गावचे जवान पोरं आयखे. त्यायच्या मनात असं आलं का व्याख्यानमाला का शयरातचं झाल्या पायजे, का आपल्या गावात घेऊन पाहू म्हून तवा यवतमाले माह्या खोलीवर आले. त्यावक्ती एकदोन ठिकानी व्याख्यानमाला राहे. तिथं तपास करूनं त्यायले म्या वक्ते भेटून देल्ले. तवा त्या रोडनं दोनतीन वक्ता एसटी जाये. त्या गावाचा फाटा होता तिथून गाव दोन-अडीच किलोमीटर. आता तं गाव तिथं अँटो झाले हाय. पह्यला वक्ता नागपूरवून येनार होता. पावन्याले दोयपारी बोरीवून छकडय़ानं न्याले एक जन आला. पावन्याले हा नईनचं अनुभव असनं. सकायी वापेस जाले फाटय़ावून हल्टिंग एसटी असते. हे पावन्यानं इचारून ठुलं होतं. राती भासन झालं. सकायी हल्टिंग गाडी चुकू नोय म्हून लगबग तयारी करून एका कार्यकर्त्याच्या सायकलवर्त पावना फाटय़ावर पोचला. फाटय़ावर्त याचं गावातल्या देवीदासची टपरी होती. आल्या आल्या इचारल्यावर देवीदासनं सांगतलं का तुमी रामभाऊच्या वाडी (मळा) पासी असानं तवा हल्टिंग गेली. आता पाऊन घंटा गाडी नाई म्हनल्यावर सकायी पावन्याची फेरी काई जमली नोती म्हून त्यायनं देवीदासनं उचारलं, ''भाऊ डबा आहे का?'' त्याच्यावर्त हा म्हने, ''हाये ना पावनेबुवा, थ्या राजनापासी टमरेल ठेवून हाय.'' जसा पावना राजनापासी वाकला देवीदासनं इचारलं, ''पावनेबुवा तुमाले टाईम किती लागते?'' पावन्यानं हे आयकल्या बराबर हातातलं टमरेल खाली ठुलं आन् सरय उभा झाला. त्या पावन्याचा रातीचा बोलाचा इसय होता. 'वेळेचे महत्त्व अर्थात टाईम इज मनी' त्याले वाटलं काय आपल्या कार्यक्रमाचा इफेक्ट आहे. आपण रात्री वेळेचं महत्त्व आपल्या व्याख्यानात सांगितलं आणि हा लगेच तुम्हाला किती टाईम लागेल विचारते. कोण म्हणतो व्याख्यानाचा परिणाम होत नाही. त्यायनं मोठय़ा खुसीनं हरकीजूनं देवीदासले इचारलं, ''रात्री तुम्ही माझ्या व्याख्यानाला होता काय?'' हा म्हने, ''नाई बा मी हटेल बंद करून आलो तं तुमचं अटपलं होतं.'' तरी पावन्यानं जिद्द सोडली नाई. त्यायनं अखीन इचारलं, ''तुम्ही किती टाईम लागेल असं विचारता म्हणून विचारतो.'' थे आयकल्यावर्त हासतं देवीदास म्हने, ''टायमाचं म्हन्ता का ते याच्यासाठी इचारलं का टमरेलले लहान भोकं (छिद्र) हाय पानी लय टाईम ठयरत नाई.''

एक सांगू का आंगभर होईन असं दुखनं मले लहानपनापासून भोगा नाई लागलं, पन मी दहावी झाल्यावर्त दोनतीन खेपा टायफाईड झाल्याबिगर राह्यला नाई. तवा टायफाईड आता सारकं टेस्टिंग करून मंग नाई सांगत आमचे डॉक्टर. आजकालतं डाक्टरकडं गेलं का तपासनं कमी आन् 'ब्लड टेस्ट करून प्रथम कन्फर्म' करून घेऊ म्हंतेत असं म्हनून खर्चाच्या गड्डय़ात लोटते. त्यावक्ती बगर टेस्टिंगनचं डाक्टर सांगत का टायफाईड हाय. त्यायचं हिंदान कवा चुके नाई. आतातं रगत तपासल्यावर्त एखांद्या खेपी हिंदान चुकते यायचं. टायफाईड म्हनलं का त्याची इतकी वज का इचारू नोका. जेवन बंद. मंग पेशंटसाठी यवतमायहून सफरचंद. तवा टायफाईड झाल्याबिगर सेफ तोंडाले लागे नाई आन् त्यातनी बावाजी म्हंजे नाना त्यायल्या पेटीतून दोनतीन खेपा जरदायू हातावर टाके. त्याचं पह्यले वरचं मगज खाचं आन् मंग बियाच्या आतनी जे बदामापरीस लहान बी असते ते फोडून खाचं. या लालचीपोटी असं वाटे का टायफाईड झाला पाह्यजे लेक. म्या आगुदर सांगतल्या परमानं घरचे कायजीत पडतीन इतक्या मोठय़ा मानगीनं बिमार पडलो नाई आन् आपल्याले दवाखान्यात भेटाले याचे कोनाले झटके देल्ले नाई. बिमारं मानसाले आन् तेयी दवाखान्यात भर्ती असलेल्या पेशंटले भेटाले जाचा शौकच असते. तुमी म्हनानं शौक हो शौकचं अस्ते काई जनाले. सव्र्यात पह्यले मी भेटाले आलो, मले किती कायजी हाय आन् तुमचा सख्खा असून तो भाऊतं अजून भेटाले आला नाई याच्यावर्त शिक्का माराचा अस्ते, पन इनडायरेक्ट पद्धतीनं. आल्यावर्त पेशंटपासच्या स्टूलवर बसल्या बसल्या इचारन्याची सरबती चालू होते. कसं झालं, कवा झालं, काऊन झालं, पह्यले कवा तकलीब झाली नव्हती का? सांगतलयी नाई? आता पेशंट जवा सांगते पह्यले कवाचं नाई हे पह्यल्यांदाच तरी हा म्हन्तो सांगतयी नाई? मंग अरामानचं फटाक्याची बत्ती सिलगवाचं काम असं करते. मोठय़ाचं सोयाबीन काढनं चालू हाय वाट्टे? आता हाथी त्याचं गावात राह्यते असं नाई का हा नांदेडले थो नागपूरले अस्ते पन खिपली कसी काढाची ते यायच्याकडून सिकावं. हा झाकासाठी म्हंते दादाले मालून नसनं पडलं तं हा उघडं करते असं कसं मालूम नसनं पडलं, पन एक डाव निख्ख निख्ख (वेगळे) झालं का कोनी कोनाचं नस्ते रामभाऊ निघतो आता कायजी घ्या असं म्हनतं उभा होते. काई काई पेशंटले भेटनारे असे असतेतं ते येऊन बसले का पयला प्रश्न, ''काय सांगतलं डॉक्टरनं?'' यानं काई सांगायचं अस्ते का त्याच्या आंधी हेच सांगते, ''हे तपासून आता थे तपासून आता याची लिस्ट देल्ली असनं? आपलातं भरोसाचं नाई ठरला आजकालच्या डॉक्टरवर मांग बयीराम सरकारी दवाखान्यात तुह्यावानी भर्ती होता तवा डाक्टर म्हने मलेरिया झाला आन् हा मेला निमोनियानं. मरणार्‍या मानसाले हेही समजतं नाई आपनं कायनं मेलो? पह्यलेचं तं बिमार मानूस मोठय़ा दवाखान्यात आनलं म्हून धास्तावला अस्ते. आता भेटाले येनार्‍यानं बिमाराले हिंमत द्यावं का त्याची दाय पतली करावं? हा माहा नाई सार्वजनिक अनुभव हाय. अगास पायन्यात बसनार्‍या सार्‍याचा म्हून हा लेख माहा नाई आपल्या सर्वाचा हाय असं मी मानतो. दहा वर्सा पह्यले मी माह्या गावी गेलो आन् शिवतिवारी म्हून माहा जे दोस्त हाय त्यानं तुले गावात चारपाच जागी जाचं हाय म्हून त्याची हिरो पूक नावाची गाडी घेऊन जाले लावली. मी त्या गाडीनं वसंता बांडेले मांग बसवून ठेसन रोडनं चाल्लो असतानी बाजूच्या झोपडपट्टीतून एक बोकडय़ा आडवा धावत येतानी दिसला म्हून स्पीड कमी केली, पन तो आंधीच निसटला आन् त्याच्या मांग टकरीसाठी लागलेल्या बोकडय़ानं अचानक पुढच्या चाकाले धडक देल्यानं माह्या हातातलं गाडीचं हँडल निसटलं आन् मी जमिनीवर दनकलो. उजव्या हातावर पडल्यानं हात आन् टोंगयाले (गुडघा) दोन गिट्टडय़ा चांगल्याच घासटल्या. त्यावक्ती बोरीच्या सरकारी दवाखान्यात डॉ. दादा पुरी दुसर्‍यांदा बदलून आले होते. त्यायनं सिस्टरले सांगून टोंगयाची जखम सफा करून लटकवून मले घेऊन यवतमायले निघाले. त्या दिसी मंगयवार बजारचा दिस. बजारात आन् गावात अराअरामानं गाडीचा एक्सिडेंट बाबाचा हात तुटला हे सुरसुरी फुरफुरत फयलत गेली. दुसर्‍या दिसी गावातून घरी भेटाले येणारे सुरू ले सुरू. आल्यापुटं येनारा कसं झालं? माहा सांगनं असं असं. पोरी म्हने कॅसेट करून कसं कसं झालं याची मंग कोनी आल्या बराबरं बटन दाबाचं. हाय ना मजा. आता दोन वर्सा पह्यले वर्धेचा कार्यक्रम करून राती टॅक्सीनं येतानी इंडिकाचा जोरदार अँक्सिडंट झाला. नसिबाले जोर म्हून वाचलो आन् त्या मानानं लागलं नाई. दुसर्‍या दिसी सांजीले कोनी तरी माहे कालेजपासूनचे जे दोस्त हाय सुरेश कैपिल्यावर त्यायले हे सांगतलं ते दिलीप सराफ आन् ईश्वर रायले घेऊन घरी आले आन् 'इतकं होऊनयी निरोप पाठवला नाही' म्हून असे खिजरी आले ना! मले त्यायचं रागावनं नाई अंतरातला कयवया जानवतं होता. ''किती दिवस राहिले आपले?'' या वाक्यानं अवघ्यायच्या डोयात पानी तरयलं. म्या निरूप ना देण्याचं त्यायच्या इतलं जिव्हारी लागलं होतं की त्याच्याच्यानं तपल्यानं ते लडीतल्या फटाक्यावानी तडं तडं बोलत होते. आन् मी वात निंघालेल्या फटाक्या सारका गुपचूप आयकून घेत होतो. चुकलंच होतं ना माहं! तरी एक सांगू जीवाले झोंबल्यानं ते जे जीवातलं बोल्ले ते आयकून असं वाटलं लेक काई म्हना हे आयकाले भेटाले इंडिका उलटून खांद्याची हड्डी मोडली, पन अस्या बिमार पडन्यातयी मजा अस्ते कानी?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

एका निबंधाचा शतक महोत्सव घेता येईल?


2013 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले ह्या घटनेस एक शतक पूर्ण होईल. बी.ए. होईपर्यंत बाबासाहेब आपल्या पुढील आयुष्यात असे कुणी महापुरुष म्हणून विख्यात होतील हे त्यांच्या कुठल्याही शिक्षकाला वाटले नव्हते. फार काय 1947 साली 'नवयुग'ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी स्वत:बद्दल हेच म्हटले आहे. असा चमत्कार अवघ्या एक दोन वर्षात घडून कसा आला? याचे उत्तर देणे हेच चरित्रकारांसमोर फार मोठे आव्हान असते.

खरे तर मानववंशशास्त्र हा काही बाबासाहेबांचा अभ्यासाचा मुख्य विषय नव्हता. ते अमेरिकेला गेले ते अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि त्याच विषयात त्यांनी तिथे एम.ए. आणि पीएच.डी. ह्या दोन्ही पदव्या मिळविल्या. पण आज जसे विषयांचे स्पेशलायझेशन अतिशय महत्त्वाचे मानले जाते, तसा तो काळ नव्हता. त्यामुळे त्या काळातले विद्यार्थी आपल्या एम.ए.च्या विषयाशिवाय अन्य विषयांचेही वाचन करीत असत. त्यात त्यांना एखाद्या विषयात गती मिळत असे आणि पदवी अभ्यासाचा विषय नसलेल्या क्षेत्रातही ते खूप मोठा लौकिक मिळवू शकत असत. अगदी अलीकडचे एक उदाहरण वाचकांसाठी मी नोंदवू शकतो. गंगाधर गाडगीळ हे कथा, समीक्षाशास्त्र ह्या दोन्ही विषयात इतिहासाने नोंदवून ठेवलेले अतिशय महत्त्वाचे नाव आहे. पण त्यांचा पदवी, पदव्युत्तर अभ्यास अर्थशास्त्र या विषयातला होता आणि त्याच विषयाशी संबंधित अशा क्षेत्रात त्यांनी नोकरी केली. सारांश ज्या विषयात पदवी मिळवायची त्या विषयाबाहेर जाऊन काहीच वाचायचे नाही, असे त्या काळात मानले जात नव्हते. त्याउलट अनेक विषयांवरचे प्रभुत्व हीच त्या काळातली विद्वत्तेची कसोटी होती. अशा त्या काळात बाबासाहेबांनी निबंध लिहिला. त्या निबंधाचे नाव 'कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, अेनिलिस अँन्ड डेव्हलपमेंट' असे होते. याचा अर्थ निबंधाचा विषय समाजशास्त्राचा होता. समाजशास्त्र ही ज्ञान शाखा नुकतीच सुरू झालेली होती. 'मानववंशशास्त्र' आणि 'समाजशास्त्र' ह्या वेगवेगळ्य़ा ज्ञानशाखा आहेत, असे अजून मानले जात नव्हते. जागतिक पातळीवरच्या विद्वानांचे चर्चासत्र कोलंबिया विद्यापीठात आयोजित करण्यात आलेले होते. त्याच चर्चासत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा निबंध वाचला.

जगातल्या सर्वच देशात समाज आहे आणि समाजाची धारणा निकोप व्हावी म्हणून अनेक संस्था उदयाला आलेल्या आहेत. पण समाज एकसंघपणे बांधून दोन हजार वर्षे विघटित होऊन देणारी 'जात' नावाची संस्था मात्र जगातल्या एकाही देशात नाही. ती फक्त भारतात आहे. ही संस्था मानवी विकासाला अडथळा निर्माण करणारी आहे, हे जोपर्यंत भारतीय समाजाला वाटले नव्हते तोपर्यंत ही संस्था निर्माण कशी झाली, तिचा विकास कसा झाला आणि तिचा नेमका उदय केव्हा आणि कसा झाला याचा विचार करण्याची कुणालाच आवश्यकता वाटली नव्हती. उलट 19 व्या शतकाच्या अखेरपर्यंत ही संस्था दृढ व्हावी अशाच अनेक दंतकथा, स्मृतिवचने आणि पुराणकथातील संदेश चालू होते.

भारतातल्या समाजावर सत्ता गाजविणार्‍या मुस्लिम राज्यकत्र्यांनी समाजव्यवस्थेत हस्तक्षेप न करता येथील अर्थाेत्पादनाची साधने आपल्या मालकीची कशी होतील, एवढाच विचार केला. त्यामुळे राज्यकर्ते अहिंदू असले तरी ह्या संस्थेला धक्का पोहोचला नाही. ब्रिटिश राजवटीत मात्र विपरीत घडले. त्यांच्या ध्येयधोरणामुळे त्यांना येथील अर्थाेत्पादनाची साधने तर आपल्या हाती हवीच होती; पण त्याशिवाय व्यापारी वर्चस्व निर्माण करावयाचे असल्यामुळे ग्राहक म्हणून त्यांचा इथल्या सर्वच जातीजमातीशी संबंध येऊ लागले होते. 'जात' नावाची संस्था समजून घेणे त्यांना गरजेचे वाटू लागले. त्याचवेळी जागतिक पातळीवर सर्वच मानवी समूहांचे 'वांशिक'अभ्यास सुरू झाले. 'वांशिक' संघर्षातून अमेरिकेला स्वत:चे स्थान निर्माण करता आले. या वांशिक संघर्षाचा परिचय थेट महात्मा

फुलेंनाही झाला होता. म्हणूनच त्यांनी 1873 साली प्रसिद्ध केलेल्या 'गुलामगिरी' या ग्रंथात वंशभेदाविरुद्ध लढणार्‍या अमेरिकन जनतेचा गौरवाने उल्लेख केला.

बाबासाहेब अमेरिकेत शिक्षणासाठी गेले, त्यावेळी वंशभेदाच्या आधारे कुणाचाही छळ होता कामा नये, याबाबत अमेरिकन जनता पुरेशी स्वागतशील झालेली होती. अशाच स्वरूपाच्या छळाचा भीषण अनुभव बाबासाहेबांच्या मनात धगधगत होता. बडोदे संस्थानात एक अस्पृश्य म्हणून जी वागणूक त्यांना मिळाली त्यामुळे तिथे ते 11 ते 14 दिवस राहू शकले होते. त्यावेळी ते पदवीधर होते. वडील एका स्कूलचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले होते. शिक्षण, राहणीमान आणि आर्थिक स्थिती ह्या तिन्ही बाबतीत त्यांना कुणीही मध्यमवर्गीय स्तरातले आहेत असे म्हणावे, अशी स्थिती होती.

ज्या पाश्र्वभूमीवर बाबासाहेबांनी हा पहिला निबंध लिहिला ती पाश्र्वभूमी मी सांगितली. हा निबंध लिहिला त्यावेळी ते अजून एम.ए.सुद्धा झालेले नव्हते. ज्यांच्या समोर त्यांनी तो वाचला त्यात अनेकजण जागतिक कीर्तीचे मानववंशशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांना तो दखल घेण्याजोगा नव्हे तर त्या सेमिनारमध्ये अतिशय महत्त्वाचे निबंध म्हणून ज्यांची प्रसिद्धी मे 1917 साली प्रसिद्ध झालेल्या 'इंडियन अँंटिक्वेटी' नियतकालिकात देण्यात आली त्यातही या निबंधाचा समावेश होता.

जागतिक पातळीवर 'जात' या विषयावर ज्यांची मते ग्राह्य मानून चर्चा झाली असे सेनार्ट, नेसफिल्ड, रिस्ले आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर बाबासाहेबांसमोर होते. विटाळ कल्पनेमुळे जातीचे वेगळेपण ओळखायला येते असे फ्रेंच अभ्यासक सेनार्ट यांना वाटते. रोटीबंदमुळे जातीचे वेगळेपण ठरते हे नेसफिल्ड मानतात. रिस्ले हे वेगळेपण व्यवसायांमुळे ओळखता येते असे मानतो तर केतकरांनी जातीअंतर्गत विवाह हे वेगवेगळ्य़ा जाती ओळखण्याचे महत्त्वाचे लक्षण मानले आहे. पण यांच्यापैकी कुणीही मुळात जाती का निर्माण कराव्यात असे भारतीय समाजाला वाटते? त्या निर्माण व्हाव्यात म्हणून कुणी पुढाकार घेतला? त्यांचे कुणी कुणी व का अनुकरण केले आणि ही 'जात' नावाची संस्था टिकावी यासाठी समाजात विटाळाशिवाय अन्य कोणकोणत्या चालीरीती विकसित केल्या? हे प्रश्न यापैकी कोण्याही विचारवंताच्या मनात उद्भवले नव्हते. जातींच्या संदर्भात हे एवढे प्रश्न उपस्थित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले अभ्यासक होते. (तरी पण ते अभ्यासक आहेत हे ओळखून त्यांच्या लेखनाचा 'समाजशास्त्र' या विषयात अभ्यास व्हायला हवा हे मात्र भारतीय विद्यापीठातील प्राध्यापकांना 1980 पर्यंत वाटत नव्हते.)

मुळात कोणत्याही ज्ञानशाखेत प्रश्न उपस्थित करणे यालाच फार महत्त्व असते. कविता सुंदर वाटणे, पुरणपोळी सुंदर झाली आणि मुलगी सुंदर आहे, या तीन वाक्यात 'सुंदर' हा शब्द एकाच अर्थाने वापरला जात असेल तर कविता 'सुंदर' आहे असे म्हणताना 'सुंदर' या पदाचा सर्वमान्य अर्थ कोणता असा प्रश्न सत्तर-ऐंशी वर्षापूर्वी मर्ढेकर नावाच्या कवीने विचारला आणि मराठी भाषेत 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचा अभ्यास नेमकेपणाने विकसित झाला. एखाद्या ज्ञानशाखेचा अभ्यास असे मौलिक प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सुरू होत असतो. दोन हजार वर्षापूर्वी भरतमुनी नावाच्या अभ्यासकाने नाटकाच्या संदर्भात असेच मौलिक प्रश्न विचारले. ते प्रश्न समजून घेणे आणि काही एक उत्तर देणे यात आमची हजार वर्षे गेली आणि या अभ्यासातून भरतमुनीचे 'नाटय़शास्त्र' नावारूपाला आले. अर्थात केवळ प्रश्न उपस्थित करून भागत नसते. त्याला काही संभाव्य उत्तरे द्यावी लागतात. ती उत्तरे बरोबर आहेत की चूक या दिशेने पुढची वाटचाल सुरू होते. जात कुणी निर्माण केली? ती टिकावी म्हणून कोणकोणत्या चालीरीती रूढ झाल्या? ज्यांनी कुणी जात निर्माण केली त्या समूहाला ती मुळात निर्माण का करावीशी वाटली? त्या समूहाचे अनुकरण कुणी कुणी केले, याची संभाव्य उत्तरे बाबासाहेबांनी या अवघ्या वीस पृष्ठांच्या निबंधात दिली असून महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या खंडात हा निबंध 1982 साली प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी दिलेली संभाव्य उत्तरे अशी आहेत. 'जात' या नावाची संस्था प्रथम 'ब्राह्मण' या नावाने ओळखल्या जाणार्‍या वर्गाने निर्माण केली. आपली ओळख स्थिर व्हावी म्हणून जातीअंतर्गत विवाह, सतीप्रथा, बालविवाह इत्यादी चालीरीती रूढ करण्यात आल्या. या गोष्टींना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्याला धर्माचे अधिष्ठान देण्यात आले. पापपुण्यांच्या दंतकथांनी ही संस्था अतिशय बळकट केली. ही संस्था दृढ करण्याचे काम स्मृतींनी केले. मनू हा काही जातींचा निर्माणकर्ता नव्हे तो जातींना सुप्रतिष्ठा देणारा ग्रंथकार आहे. डॉ. बाबासाहेबांचे आणखी एक महत्त्वाचे मत सांगून मी हे संपवतो. 'जात' ही कधीही एकटी असत नाही. अनेक जातींच्या समूहातच तिचा आढळ होतो. हा तो मुद्दा.

बाबासाहेबांनी तार्किक विचार कोणते मांडले याची आपल्याकडे कधीच चर्चा होत नाही. आपली सर्व शक्ती त्यांच्या सक्रिय राजकारणाची चर्चा करण्यावरच केंद्रित होते आणि त्यात वावगे असे काहीच नाही. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे आणि ती म्हणजे त्यांच्या सर्वच राजकीय मुत्सद्दीपणाच्या तळाशी त्यांची विद्वत्ता होती. ब्रिटिश सत्ताधारी, हिंदू विरोधक आणि त्यांच्याशी सहमत असणारे सर्वच विद्वान यांना पुरतेपणाने हे कळत होते, म्हणूनच भारतासारख्या देशात रक्तविरहित क्रांती घडवून आणणारे अग्रदूत म्हणून सर्वानाच ते वंदनीय वाटतात. पण त्यांच्या विद्वत्तापूर्ण लेखनाला आता शंभर वर्षे होत असल्याने याही अंगाने त्यांची चर्चा व्हायला हवी, असे मला वाटते.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी-9881230084

झाडं किती सोशिक असतात


यावेळी गावी आल्यावर जरा जास्तच उदास वाटत आहे असं जाणवू लागलं. पावसाळा कमी झाला. त्यामुळे शिवारात रब्बीची पिकं नाहीत. गावखोरचे जे शेतमळे गहू, हरभर्‍याच्या लसलस हिरव्या अस्तित्वाने दरवर्षी हिरवेगार दिसतात ते नुसतेच काळे. नांगरून, वखरून टाकलेली जमीन भुरकटलेली. वार्‍याच्या सुताने हेलकावणारा पालापाचोळा अंगावर घेतलेली.

फाटय़ावर उतरून घराकडे जाताना ओळखीचे चेहरे, ओळखीचे हसत होते. पण त्या हसण्यातही शिवारातल्या मोकळय़ा शेतासारखी उजाड उदासी स्पष्टपणे जाणवणारी.

गणपतीच्या मंदिराजवळच्या वळणावरून मी घराशी येणार्‍या रस्त्यावर वळलो. मग एकदम धक्काच बसला मला. घराजवळचं गढीजवळचं मैदान एकदम मोकळं-मोकळं भुंडं भुंडं झालं होतं. रिकामं आकाश कसंतरीच वाटत होतं. त्या मैदानातलं मी लहानपणापासून पाहत आलो ते उंबराचं महाकाय झाड नाहीसं झालं होतं. एरवी फाटय़ावर उतरून घराकडे येताना त्या उंबराच्या झाडाचं मोहतुंबी अस्तित्व कसं मला आभाळभर जाणवत राहायचं. आजच ते जाणवत नव्हतं म्हणताना आतल्या आत एखादी डोकं नसलेली धडाची उजाड आकृती उजागर होत होती. मी उभा राहून पाहत राहिलो. दुपारची रखरख मला आठवत राहिली. माझं सगळं बालपण या झाडाशी गुंडाळलेलं होतं. नंतरच्या तरुणपणातल्या मित्रासोबतच्या नव्हाळी-गव्हाळीच्या मधागळ गप्पाही या झाडाशी बसूनच चालायच्या. गल्लीतलं ते महाकाय उंबराचं झाड म्हणजे ऋषीचं एक रूप. आध्यात्मिक पाविर्त्य असलेलं. म्हणताना कोणी त्याचं पानंही तोडायचं नाही. आजूबाजूचे लोक, बाया-माणसं दत्त जयंतीला त्या झाडाच्या खोडाशी पूजा करायचे. खोडापासून वरच्या अंगाने सगळय़ा हिरव्या दोडय़ा लागायच्या. भाजीसाठी ते उंबर घराघरांतून नेले जायचे. पिकल्यावर लालचुटूक फळांवर पाखरं ताव मारायचे अन् झाडातल्या, खोडा-फांदीतल्या तेलकटपणावर तरतरत चालत राहणार्‍या हजारो मुंगळय़ांची गुजराण व्हायची. आखाडतोंडी खोडावरच्या मुंगळय़ांना विशिष्ट रंगाचे पंख फुटायचे किंवा पंख फुटलेले वेगळय़ा प्रजातीचे मुंगळे या झाडावर वस्तीसाठी यायचे. त्यांच्या रंगावरून किंवा हालचालीवरून जुने-जाणते माणसं पाऊसपाण्याचा अंदाज बांधायचे. वेगवेगळय़ा आवाजाची, न दिसणार्‍या पाखरांची रात्रंदिवस या झाडाच्या घनदाट फांद्यात वस्ती असायची. तर दररोज संध्याकाळी दूरवरून पाहिलं की, झाडाच्या शेंडय़ावर शिवारातून परतून आलेल्या बगळय़ांची शुभ्र रंगाची फळं लगडून यायची.

असं आपल्या अस्तित्वाने साकार झालेलं एक विश्व. आता कसं काय नष्ट झालं? मग दिवसभर मी गल्लीतल्या प्रत्येक माणसाला, रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍याला त्याच औदुंबराच्या उद्ध्वस्त झालेल्या विश्वाबद्दल विचारत राहिलो. कोणी उत्तरं दिली, कोणी नाही दिली. कोणी खुळय़ात काढलं. काहींना तर काहीच वाटत नव्हतं. नंतर तुकडय़ातुकडय़ात टप्प्याटप्प्यानं समजलं. भावकीतल्या तंटय़ापायी त्या उंबराच्या झाडाचा बळी गेला होता. कुणीतरी एक फांदी गोठय़ात रोवायच्या खुंटय़ासाठी तोडली. कुणीतरी त्याला अडवलं. झाडावर आपल्या हद्दीची मालकी सांगितली. माणसाच्या झाडावरच्या हक्कदारीच्या भानगडी सुरू झाल्या आणि बिचार्‍या निष्पाप झाडाचा बळी गेला. माणसांनी झाड तोडलं. तोडलेल्या लाकडाच्या वाटण्या झाल्या. लाकडं हक्कदाराच्या अंगणात सरपणाच्या थप्पीवर लावली गेली आणि मालकी हक्काचं युद्ध जिंकलेली भावकीतली माणसं मग दाताचं पाणी गिळत बसली.

यात झाडाचं काय नुकसान झालं? ते तर बिचारं तोडून टाकल्यावरही माणसांच्याच कामी आलं. पुढे चालून त्याची मोठी खोडं ते ऋषीचं एक रूप आहे. याचा विसर पडून कदाचित तोडणाराच्या सरणासाठीही उपयोगी येतील. असाही एक विचित्र विचार मनात येऊन गेला. झाडाच्या मालकी हक्कावरून भावकीतल्या काहींचा विजय झाला. काहींनी दातओठ खात शिव्याशाप देत आपला पराजय मान्य केला. पण पुढं काय? पुढं सगळा शुकशुकाट. भकास अवकळा. आता गल्लीत सावलीचा थारा नाही. पाखरांचा वारा नाही. काळजाला चैतन्य देणारी पाखराची धून नाही. टेकून बसायला आसरा नाही. मला झाडाची ती रिकामी जागा पाहून मनोहर जाधव यांच्या 'कधी-कधी' या कवितासंग्रहातील एक कविता पुन्हापुन्हा आठवत राहिली-

झाडं किती सोशिक असतात

मोसम पाहून

रंग बदलतात..

एकोप्याने राहत असली तरी

एकेकटय़ाने झुंजत राहतात

तरीही झाडं -

आत्महत्या करीत नसतात!

झाडांच्या सोशिकतेचा गुणधर्म माणसं का अवगत करून घेत नाहीत? माणसांनी कोसळून पडावं खुशाल, पण सृजनशील भुईने पोसवलेल्या झाडांवर त्याने का म्हणून असा अत्याचार करावा? का म्हणून त्याचं वैभवशाली चैतन्यकळा देणारं जगणं हिरावून घ्यावं? त्यांना त्याचा काय अधिकार?

मागच्या वर्षीच्या कडकीच्या दुष्काळातही शिवारातल्या बर्‍याच झाडांचा असा बळी गेला होता. शेती तोटय़ाची ठरली म्हणून शेतकर्‍यांनी बांधावरची झाडं विकून आपल्या गरजा पूर्ण केल्या होत्या. आताशा असंच होतं. पैशाची चणचण जाणवली की, शेतकरी शेतातली किंवा बांधावरची उभी झाडं लाकूड कसायाला विकून टाकतात. भरल्या शेतातली अमृतफळं म्हणून ओळखली जाणारी आंब्याची झाडंही अशीच माणसांच्या गरजेपायी आडवी होतात. गावागावांत, बांधबंधार्‍यांनी वेढलेल्या शेतशिवारात भावबंदकी आणि भावनेचा खून करणारी भावकी असते. गावात घराच्या तशा शिवारात शेताच्या चिरोटय़ा होतात. शेतावरच्या विहिरीत आणि आंब्याच्या झाडात सोळा आणे केंद्रस्थानी कल्पून आण्यानी वाटण्या करण्याची पद्धत आहे. कुणाचा आठ आणे वाटा असतो. कुणाचा एक आणा अशा पद्धतीने एकेका घटकावर दहा-दहा लोकांचा मालकी हक्क असतो. आंब्याच्या झाडातील हिस्से तर दुसर्‍यांनाही विकले जातात. मग त्यातलेच अर्धा आणा, पावआणा असे ते हिस्से कमीकमी होत जातात आणि एका झाडाच्या फळांवर आंबे उतरण्याच्या म्हणजे तोडाईच्या वेळी वीस-वीस माणसं हक्क सांगतात. त्यातूनच कधी भांडणंही उभी राहतात. भांडणारे माणसं कुर्‍हाडीने खापला-खापली करतात. आधी झाडांची मग आपसात आपली.

या वर्षी अख्खा पावसाळा अध्र्या वाटेवरूनच माघारी परतून गेला. पाणीटंचाईचा आणि बेकारीचा कहर झाला. मी भोवताली पाहतो तेव्हा शिवारात दूरदूर झाडंच दिसत नाहीत. सगळं भुंडं भंडं ! एकदम उजाड. एकदम भकास !

त्यामुळेच पावसाळय़ाच्या तोंडी आभाळात ढगांचे थवेच्या थवे पाखरासारखे कोणत्या तरी दिशांनी झेपावत झेपावत येतात. पण पळणार्‍या ढगांना थांबवून धरण्यासाठी शिवारात आपल्या झाडवनच नाही. म्हणून ते मेघथवे मिनिटभरासाठीही शिवाराच्या डोक्यावर थांबत नाहीत. दम धरून भुईवर कोसळत नाहीत. भुईची तहान भागत नाही. तिच्या अंगावर वळासारख्या पसरलेल्या ओढय़ा-नाल्यातून पाणीच पुढं सरकत नाही. भेगाळली भुई तोंड वासून रडत राहते. बादलीभर; हंडाभर पाण्यासाठी माणसं-बायका सैरावैरा होतात. पण आभाळाला दया येत नाही. कशी येणार ? कारण ढगांचे मेघात रूपांतर होते ते केवळ झाडवनाच्या स्नेहल सहवासाने. दगडाचं, डोंगराचं आणि भेगाळल्या मातीचं त्यांना देणंघेणं? त्यांची मैत्री असते ती केवळ लसलसत्या हिरव्या झाडांशी. माणसातल्या दगडाबद्दल आणि दगडी मनाच्या माणसाबद्दल तर त्यांना अजिबातच प्रेम नसतं. माणसाच्या या झाडतोडीची शिक्षा मात्र भुईला, पोशिंद्या काळय़ा आईलाही भोगावी लागते.

झाडं सोशिक असतात; पण त्यांनी दिलेला तळतळाट मात्र भलताच जहाल असतो. तो मानवी जगण्यातलं चैतन्यच हिरावून घेतो. त्यांच्या भाळी अशी उदास अवकळा पसरून देतो. आज माझ्या भोवतीच्या गावाचं, शिवाराचं चैतन्य हरवलेलं आहे. ते केव्हा परत येणार? या नभाने या भुईला दान द्यावे, असं बिनधास्तपणे केवळ झाडंच म्हणू शकतात. पण झाडंच नाहीत तर मग कसलं दान?

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ ता. मेहकर, जि. बुलडाणा