Friday 9 November 2012

चला फिराले


''झाला काय सैपाक?''
''करते ना.. रोजच्या रोज तेच हाय.. खा अन् ढोबर करा..

माहा जीव कटायला या संसाराले''

''काहून?''

''सकाऊन उठली की सडा टाका.. पानी भरा.. सैपाक करा.. टोपलंभर भांडे घासा.. असं वाटते आठपंधरा दिवस कुठंतरी चाललं जाव''

''कुठं जातं?''

''लोकं मस्त दिवाईच्या सुट्टीत फिराले जातात.. तुळजापूर, पंढरपूर करून येतात, मले कधी नेता तुम्ही फिराले?''

''काय करतं फिरून? घरीच देव हाये''

''कोनता देव हाय घरी?''

''मीच आहो महादेव''

''महादेव रोजचाच हाये.. मले मस्त फिराव वाटते..

हाटेलात खाव वाटते''

''हाटेलात खायाले पुरते काय? प्लेटभर भाजीचे साठ सत्तर रुपये घेतात''

''लग्नापासून तुम्ही कधी मले हाटेलात जेऊ घातलं काय?''

''हाटेलात काय खाव वाटते तुले?''

''मले डोसा खाव वाटते.. उतप्पा खाव वाटते''

''एक डोसा चाळीस रुपायाचा हाय.. माह्यासारखा मानूस एका टाइमले दहाबारा डोसे खाते.. चारशे रुपायाचे डोसे मी एकटाच खातो.. मंग काय पुरते हाटेलचा डोसा? त्याच्यापेक्षा घरीच पिठाचे आयते कर.. धिरडे कर''

''मले घरी डोसा करता येत नाही''

''मंग कोनाजोळून शिकून घे''

''तरी मले हाटेलसारखा येत नाही''

''मंग काय येते तुले? फक्त फोळनीचं ताक येते''

''परवाच्या रोजी केले होते गुलाबजामून''

''तुहा भाऊ आला म्हनून केले.. कोन्या रोजी माह्यासाठी प्रेमानं केले काय?''

''रिकाम्या गोष्टी करू नका.. मले फिराले नेता की नाही सांगा?''

''आगुदर वजन कमी कर''

''कायले?''

''माह्यासोबत तू शोभली पाह्ये.. मी झालो फोतर अन् तू झाली संतर! एवढी जाडी बायको पाहून लोकं हासतात''

''फिरलं की आपोआप वजन कमी होते.. माही फिकर करू नका.. तुमचंच वजन वाढवा.. बाया म्हंतात तुहा नवरा फुकीनं उडते.. मानूस कसा धडधाकट पाह्यजे.. खाया पियासाठी पैसा खर्च करत जा.. त्यासाठी म्हनते फिराले चला.. मले राजवाडे दाखवा.. बागबगिचे दाखवा''

''आपल्या वावरातच झेंडूचे फुलं आहेत''

''वावर रोजचंच हाये.. नवीन जागा दाखवा.. ताजमहाल दाखवा.. एखांदा किल्ला दाखवा''

''ताजमहाल जवळ आहे का? दहा हजार खिशात पाह्यजात तवा ताजमहाल पहाले भेटते''

''मंग वेरूळची लेनी पाहाले चला''

''म्या पाह्यली''

''मले कधी दाखोसान? घरीच तोंडाले पानी सोडता काय?''

''लेणीवर लय चढा उतरा लागते.. मानूस थकून जाते.. तुह्याकून वरते चढता येते काय? तुले दम लागते''

''मंग गंगासागर हरिद्वार दाखवा''

''गंगासागरले म्हतारे मानसं जातात''

''जवान जात नाहीत काय?''

''जातात पण म्हतारपनी आपल्याले तेच काम हाये.. लेकरं मोठे झाल्यावर सारा भारत फिरून येऊ''

''राहू द्या.. मी एकटीच जाते''

''एकटी कशी जाशीन?''

''गंगासागराले लग्झरी चालली.. नऊ हजारात सारं दाखून आनतात.. आपल्या गावातल्या चार-पाच बाया चालल्या''

''त्याच्यात लय येले होतात.. लग्झरीत पाय अकडतात, झोप होत नाही.. आपून पेशल रेल्वेनं जाऊ''

''कधी?''

''आताच कायची घाई आहे? आजून लय आयुष्य राह्यलं''

''म्हतारपनी जाऊन काय फायदा? टोंगये दुखतात, चालनं होत नाही.. त्याच्यापेक्षा आताच जाऊ.. घरातल्या घरात माहा जीव कावला.. रोजच्या रोज तेच हाय.. बुढय़ाचं धोतर धुवा.. बुढीचं लुगडं धुवा.. माह्या जिवाले चैन नाही''

''सद्या एवढे पैसे नाहीत आपल्याजवळ''

''मंग जवळपास चला''

''जवळपास कुठी?''

''मुंबइले जाऊन येऊ''

''मुंबई टीव्हीतच दिसते''

''टीव्हीत पाहून पोट भरते काय? मले डोयानं दाखून द्या''

''मुंबईले कोन हाय तुह्या वयखचं?''

''मुंबइले गेल्यावर वयख निंगते.. आपल्याले कोनी दोन दिवस झोपू देणार नाही काय?''

''मुंबईत कोनी कोनाचं नाही.. मायले लेकरू भारी आहे, एका खोलीत सात आठ लोकं राह्यतात''

''नंदया असते मुंबइले''

''कोनता नंदया?''

''सीमाचा भासा''

''तोच त फुटपाथवर झोपते''

''आपून त्याच्या वरते झोपू''

''घ्या दाबून..! फुटपाथ म्हनजे समजते काय तुले? एवढय़ा मोठय़ा मुंबईत तू भुलली मनजे तुले पाह्यातच अर्ध आयुष्य जाईन.. त्याच्यापेक्षा सासरवाडीले वरात काढू.. दोन चार दिवस राहू.. लेकराले कपडे भेटतात.. तुले साडी भेटते.. मले खारा पावनचार होते.. अन् तुहा भाऊ भाडय़ाले पैसे देते.. येलाले दुख ना बायकाले दुख!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी-9561226572

No comments:

Post a Comment