Friday 9 November 2012

धर्मातराच्या चक्रव्यूहातील निकाह


फ-करिनाचा निकाह झाला. मधुचंद्रही आटोपला. मात्र स्वत:ला कट्टर मुस्लिम मानणार्‍यांनी सैफ-करिनाचा निकाह इस्लामला मान्य नाही असे फर्मानच काढले. कां? तर म्हणे तिने इस्लाम स्वीकारलेला नाही. इस्लाम स्वीकारणे म्हणजे नेमकं काय? ला इलालालाहो मोहम्मदे रसुल ऊल्फाहाùùù हा कलम पढणे, इस्लामवर इमान (श्रद्धा) असणे किंवा फार तर करिनाचे कौसर वगैरे मुस्लिम नाव ठेवणे यापलीकडे फारसे काहीच नाही. करिनाने नाव बदलविणे तर दूरच, नवर्‍याकडे 'खान' नावदेखील लावणार नाही म्हणे. यातून फार मोठे

इस्लामचे नुकसान झालेले आहे, असेही नाही. प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंर्त्याचा तो भाग आहे. घटना किंवा कायदा अभिव्यक्ती स्वातंर्त्यावर गदा आणत नाही.

लग्नानंतर त्यांनी कोणत्या नावाने जगावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. इस्लामचा एवढा बागुलबुवा करणारे हेच कट्टरपंथी, जर सैफ अगदी मुस्लिम रीतीरिवाजानुसार वागला नाही तर त्याला कोणती सजा देणार? सगळे कायदे महिलांकरिताच कां? प्रश्न फक्त करिना कपूरचाच नाही. आज जगभरात आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातल्या त्यात रूढी-परंपरावादी भारतात तर हे प्रमाण जास्त आहे. कारण प्रेम, जातधर्म बघतच नाही. ''मिय्या-बिवी राजी, तो क्या करेंगा काजी.?'' इस्लाममध्ये पाच कर्तव्ये आहेत. रोजा, नमाज, हज, जकात, इबादत. करिना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली. इच्छा असूनही ती हे सगळं करू शकणार नाही. उद्या हेच लोक म्हणतील नाव बदलवून काय होणार? मुस्लिम होते, ती नमाज पढत नाही, पडदा करीत नाही. आणखी बरंच काही..

धर्माचा आड घेऊन, धर्मातराची जबरदस्ती करणार्‍यांना आम्ही आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रश्न विचारतो. जायनमाजवर आम्हाला नमाज पढताना बघून आपणास खूप आनंद होईल. मात्र आम्ही गायत्री मंत्र म्हणत आहोत की कलमा? हे फक्त आम्हालाच माहिती. मग दुसरा प्रश्न कदाचित धर्माचे ठेकेदार हा करेल, जो खर्‍या अर्थाने इस्लाम इमान आणतो, तो असं काफिर वर्तन करूच शकत नाही. काफिर म्हणजे इस्लामविरुद्ध. एकीकडे आम्ही म्हणतो इस्लाम पूर्णत: इमानवर टिकलेला आहे. इमान आणणे एवढे सोपे काम नाही. इमान इतवारा बाजारात किंवा मेडिकलमध्ये विकत मिळत नाही. एका रात्रीत, एका महिन्यात ते शक्यच नाही. त्याला एक-दोन दशकंही लागू शकतात. मग एवढी आदळआपट कशाला?

इस्लाम धर्मात जन्मलेलेदेखील अलीकडे इस्लामनुसार वागत नाही. उगीचंच

मुसलमानासोबत प्रेमविवाह करणार्‍या प्रेयसीच्या मागे लागण्यापेक्षा अगोदर जे इस्लामशी गद्दारी करतात, त्यांच्या शुद्धीकरणाची आज वेळ आलेली आहे. कारण या सगळ्या चक्रव्यूहातून तीस वर्षापूर्वी मीदेखील गेलेली आहे. मी या सर्व कश्मकश अवस्थेची एक साक्षीदार आहे. अर्थात, मी काही करिनाएवढी प्रसिद्ध नव्हते. मात्र तीस वर्षात

कट्टरपंथीयांमध्ये कोठेही बदल झालेला नाही. उलट अशा विवाहाचे प्रमाण वाढले. समाज फार काही आडकाठी आणत नाही. पूर्वीएवढा विरोधही राहिलेला नाही. एक हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याची, सामाजिक अभिसरण करणारी एका पिढीची निर्मिती यातून होत आहे. एकीकडे हिंदू मुलींनी मुसलमानाशी विवाह केला, तर ते जन्नतचे हकदार बनतात म्हणे. निकाह करणारा, करणारी आणि निकाह लावणारा थेट मृत्यूनंतर स्वर्गात जाते म्हणे. जन्नतचा प्रवास इतका सोपा आहे? जन्नत इतकी स्वस्त कधी झाली? अर्थात, ही सर्व वैचारिक अंधश्रद्धा आहे. सैफ-करिनाच्या निकाहाला विरोध करणारे धर्मगुरू असे म्हणतात की, मुस्लिमाने मुस्लिम जोडीदाराशीच विवाह करावा. थोडा वेळ अज्ञान बुद्धीने आपण हेदेखील मान्य करू. मात्र एखादी पत्नी किंवा पती निकाहानंतर एकनिष्ठ राहत नसेल, एखाद्या हिंदू स्त्री-पुरुषांचे त्यांच्या विवाहानंतर सूत जमले तर हेच धर्माच्या नावावर विरोध दर्शविणारे त्या पुरुषांना कोणती सजा देणार आहेत? त्यांच्या शुद्धीकरणाकरिता यांच्याकडे कोणता फॉम्यरुला आहे?

छोटा नवाब सैफ यांचा निकाह नंतर झाला. अगोदर ते वांद्रेतील फॉच्र्यून हाईट्स येथे रजिस्टर्ड पद्धतीने विवाहबंधनात आले. नंतर ते सगळे धार्मिक विधी. पाच वर्षे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर आता उरलंच काय? सगळंच झालेलं. मीही तीस वर्षापूर्वी एकाच दिवशी, एकाच नवर्‍यासोबत तीन पद्धतीने लग्न केले केवळ लोकांच्या मर्जीकरिता. सकाळी नऊ वाजता 'देव' पद्धतीने कोंडेश्वर मंदिरात, अकरा वाजता कोर्ट पद्धतीने आणि संध्याकाळी सात वाजता इस्लामी पद्धतीने 'कबूल है कबूल है, कबूल है।' तेव्हा कॅसेटचा जमाना होता. ती कॅसेट आजही जपून ठेवली आहे. मंदिरातील फोटो नि न्यायालयातील कागदं. सगळं सगळं काही. नातं टिकतं फक्त प्रेम आणि विश्वासावर. आज मी आजी झाली. नवर्‍याच्या सहवासात आयुष्य जगताना आनंद वाटतो. धर्मगुरूंनीच इस्लामचा जांगडबुत्ता करून टाकला. अर्थात, प्रेम स्त्रीचे पुरुषांशी किंवा पुरुषाचे स्त्रीशी होते. नाते ते प्रियकर-प्रेयसीचे. आम्ही शौहर म्हणून त्याला पसंत करतो. कबूल करतो. इथे धर्म आलाच कुठून? इस्लाम कबूल करणे नि इस्लामवर इमान आणणे म्हणजे आईबाईचं टाकरखेडं नव्हे. एका रात्रीत ते शक्यच नाही. जोर जबरदस्तीने तर बिलकूलच शक्य नाही. मात्र यांना कोण समजून सांगणार? कधी कधी आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीत काढले जाणारे फतवे, बयान वाचून असे वाटते की, जगभरातील सर्व मुस्लिमांचे प्रश्न संपले की काय?

बरं, थोडा वेळ तेही मान्य करू. मात्र नवरा कोणत्याही जातिधर्माचा केला तरी संसार करायशी मतलब. यात कोणतेही वेगळेपण राहत नाही. संसाराकरिता लागणारी लैंगिकतेची सर्व समीकरणं सारखीच. फार तर मुली झाल्या तर मुस्लिम पद्धतीने ठेवणार, मुलगा झाला तर खतना करणार. इथेही आम्ही पर्यायी व्यवस्था शोधून काढतो. बरीच नावे हिंदू-मुस्लिम संस्कृतीत सारखीच आहे. किरण, आशा, बेबी, सीमा, समीर अजून बरीच काही. ऊठसूट बिनाकामाचे फतवे काढल्यामुळे त्या विचाराचे गांभीर्य कमी झाले. तुम्ही असेच बिनकामाचे बोंबलत राहा. इथे प्रेमविवाह हिंदू-मुस्लिमांचे होतच राहणार. कारण आम्ही असे मानणार्‍यांची जात आहोत.

''हजार आमुचे धर्म

नि लाखों आमुच्या जाती

शेवटी जिच्यात मिसळायचं

ती एकच आमुची माती''

(लेखिका नामवंत सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

भ्रमणध्वनी -9527399866

No comments:

Post a Comment