Monday 19 November 2012

उजवं मन सर्जनशील, तर डावं विश्लेषण करणारं


मानवी मेंदूच्या निओ कॉर्टेक्स नावाच्या वरच्या आवरणातील डावे व उजवे अर्धगोल कशा प्रकारे काम करतात हे डॉ. जिल टेलर या प्रसिद्ध अमेरिकन मेंदूरचना शास्त्रज्ञाने तिला स्वत:ला तरुण वयात जेव्हा पॅरालिसीसचा झटका आला त्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले व तिच्या अनुभवांचे कथन चित्रा बेडेकर यांनी 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सामान्य वाचकांना समजणार्‍या पद्धतीने केले आहे. वैज्ञानिकांसाठी असा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत दुर्मिळ असतो. मेंदूतील असंख्य मज्जातंतूच्या जाळ्याची रचना समजून घेणे व बाहेरून ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या माहितीवर प्रक्रिया होत असताना मेंदूतील हे मज्जातंतूंचे वेगवेगळे सर्किटस् कशा प्रकारे उद्दीपित होतात याचे निरीक्षण व परीक्षण दुसर्‍या व्यक्तींवर प्रयोग करून शास्त्रज्ञांकडून केले जाते; परंतु मेंदूच्या एका भागात बिघाड झाल्यावर दुसरा भाग कार्यरत असताना नेमका कसा अनुभव येतो, हे डॉ. जिल टेलर यांना स्वत:च्या आजारपणात अनुभवता आले व आपल्या शास्त्रीय माहितीच्या प्रत्यक्ष अनुभवासोबत पडताळा घेऊन त्यांनी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांची कार्यपद्धती जगाला विशद केली. त्या अगदी भिन्नभिन्न कार्यपद्धती चित्रा बेडेकर यांच्याच शब्दात मागील लेखांकापासून आपण वाचत आहोत. कोणत्याही घटनेचे डावा अर्धगोल सुटय़ासुटय़ा तुकडय़ांद्वारे भूतकाळाशी त्या घटनेला जोडून विश्लेषण करतो व याउलट उजवा अर्धगोल मात्र समग्रपणे केवळ वर्तमानात व सर्व विश्वाची जुळवून ती घटना समजून घेतो असा मूलभूत फरक आपण पाहिला. त्यासंदर्भात चित्रा बेडेकर पुढे लिहितात : दोन अर्धगोलांमध्ये दडलेल्या आपल्या

व्यक्तिमत्त्वातल्या दोन भिन्न प्रवृत्ती कोणत्याही गोष्टींचा भिन्न प्रकारे विचार करतात. भावनांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्करण करतात आणि आपल्या शरीरावरसुद्धा वेगळ्या प्रकारचे परिणाम घडवून आणतात. डाव्या आणि उजव्या अर्धगोलांमुळे दिसून येणार्‍या प्रवृत्तींचा ढोबळमानाने आढावा घेतला तरी त्यांच्यातला फरक प्रकर्षाने जाणवतो.

आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाला जगाची पर्वा नसते. तो फक्त वर्तमान क्षणाचाच विचार करतो. म्हणून उजव्या मनाची प्रवृत्ती आनंदी, उत्साही, स्नेहमय असते. उजवं मन कृतज्ञतेने भरलेलं असतं. ते मन समाधानी, दयाळू, संवर्धन जोपासणारं आणि चिरंतन आशावादी असतं. तुलना करणं, न्यायनिवाडा करणं ही त्याची प्रवृत्ती नसते. उजव्या मनासाठी सर्व काही सलग, अखंड, एकमेकांपासून वेगळं न करता येण्याजोगं असतं. त्यामुळे उजवं मन सर्व काही, सर्व जण यांना समान लेखतं.

उजव्या मनाची प्रवृत्ती धाडसी, समृद्धीची स्तुती करणारी, सामाजिकरीत्या जुळवून घेणारी असते. ते मन शब्दांपलीकडच्या संवादाला अतिशय संवेदनशील असतं. सहानुभाव बाळगणारं असतं. दुसर्‍यांच्या भावना बिनचूक ओळखणारं असतं. आपण ज्याला दैवी शक्ती, अंत:प्रेरणा किंवा सर्वोच्च जाणीव म्हणतो त्याचं अधिष्ठान आपल्या उजव्या मनात असतं.

नेहमीच्या चौकटीच्या आणि बंधनांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची उजव्या मनाची प्रवृत्ती असते. त्यामुळे वर्तमान क्षणातल्या सर्व शक्यता पडताळून नवा दृष्टिकोन बाळगण्याची त्या मनाची वृत्ती असते. उजवं मन अतिशय सर्जनशील असतं आणि गोंधळ ही सर्जनशीलतेची पहिली पायरी असते याचा ते मन स्वीकार करतं. ते अतिशय चपळ, चंचल असतं. शरीरातल्या पेशींकडून येणार्‍या सूक्ष्म संदेशांना, सूक्ष्मातिसूक्ष्म सूचनांना उजवं मन अतिशय संवेदनशील असतं. अनुभवातून आणि स्पर्शातून ते मन सतत काहीतरी शिकत असतं.

उजव्या मनाला भूतकाळाचं ओझं बाळगण्याची गरज नसते आणि भविष्यात काय घडेल याची चिंता नसते. त्यामुळे वर्तमान क्षणातलं स्वातंर्त्य ते मन साजरं करतं. आपल्या केवळ शरीराचंच नव्हे, तर मनाचंसुद्धा स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी उजव्या मनावर सोपवलेली असते. उजवं मन सृष्टीतल्या सर्व गोष्टीत, प्राणिमात्रात समानता शोधत असतं. माणुसकीला ते मन सर्वाधिक मौल्यवान मानतं.

या तुलनेत डाव्या अर्धगोलाच्या प्रवृत्तीत खूपच फरक असतो. आपलं डावं मन बारीकसारीक तपशिलांनी ओतप्रोत भरलेलं असतं आणि आयुष्याला घडय़ाळाच्या काटय़ावर चालवणारं असतं. माणसाच्या एकूण प्रवृत्तीची गंभीर बाजू या डाव्या मनाकडे सोपवलेली असते. भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमान क्षणात निर्णय घेणारं ते मन असतं. वेगळेपणाच्या, भिन्नतेच्या काटेकोर मर्यादा सदैव लक्षात घेत चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक यासंदर्भात निवाडा करत असतं. वर्तमान क्षणाची उजव्या मनाने जमवलेली सर्व माहिती आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन डावं मन त्या माहितीला व्यवस्थित हाताळण्याजोग्या पद्धतीने रचून ठेवतं. भाषा हे डाव्या मनाचं विचार करण्याचं माध्यम असतं आणि खुद्द डावं मन हे माणसाचं बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचं माध्यम असतं. सतत चालणार्‍या आत्मसंवादातून आपण इतर जगापेक्षा अलग आहोत याचं भान आपल्यामध्ये डावं मन सदैव जागृत ठेवत असतं. आपल्याकडे येत राहणार्‍या माहितीचं उत्तम व्यवस्थापन करण्याची आणि चिकित्सकपणे त्या माहितीचं काटेकोर विश्लेषण करण्याची प्रचंड क्षमता डाव्या मनाकडे असते. ते मन पूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) असतं. एकाच वेळी अनेक कामं करण्याची विलक्षण हातोटी डाव्या मनाकडे असते. क्रमवारीने विचार करण्यात वाकबगार असल्यामुळे प्रत्यक्ष जबाबदार्‍या हाताळण्याचं त्या मनाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असतं. वेगवेगळी न्यूरोसर्किट्स ओळखण्याची निसर्गदत्त देणगी डाव्या मनाला लाभलेली असते. अशा न्यूरोसर्किट्सच्या मदतीने प्रचंड माहितीचा क्षणार्धात फडशा पाडण्याचं कसब त्या मनाकडे असतं.

डाव्या मनाकडे आणखी एक अजब गुण असतो. बाहेरच्या जगाकडून अव्याहत येत असलेल्या माहितीचा अर्थ लावण्यासाठी त्या माहितीला सूत्ररूपात गुंफण्याचं किंवा त्यातून कथासूत्र रचण्याचं चातुर्य त्या मनाकडे असतं. पण प्रत्यक्ष मिळणार्‍या माहितीत जर कुठे त्रुटी असतील तर स्वत:च त्या त्रुटी भरून काढण्याची चलाखी डाव्या मनाकडे असते. बेमालूम कथानक रचून तेच सत्य म्हणून पुढे रेटण्याची विलक्षण हातोटी या मनाकडे असते. त्यामुळे आपल्याला खरं किती ठाऊक आहे आणि 'आपल्याला ठाऊक आहे' असं आपल्याला किती वाटतंय या दोन्हीत प्रचंड तफावत असू शकते.

या पचेंद्रियांच्या पलीकडे असणारं एक सहावं इंद्रिय म्हणजे आपल्या मेंदूचा उजवा अर्धगोल. त्याचा पुरेपूर अनुभव जिलने स्ट्रोकनंतर सात-साडेसात वर्षे घेतल्यामुळे ऊर्जेचं गतिशास्त्र (एनर्जी डायनॅमिक्स) आणि अंत:स्फूर्ती याविषयी ती स्वानुभव सांगते. जिलच्या म्हणण्यानुसार आपण सर्व जण ऊर्जायुक्त सजीव आहोत. विश्वातल्या ऊर्जेचं आकलन करून तिचं न्यूरॉन्सच्या सांकेतिक लिपीत रूपांतर करण्यासाठी आपल्या मेंदूची रचना झाली आहे. आपल्या पचेंद्रियांमार्फत ऊर्जेचं आकलन करून घेण्याच्या कामात डाव्या अर्धगोलाची मर्यादा आडवी येते; परंतु अंत:स्फूर्तीने सूक्ष्मातल्या सूक्ष्म ऊर्जेचं गतिशास्त्र आकलन करून घेण्यासाठी उजव्या अर्धगोलाची रचना झाली आहे. स्ट्रोकच्या अनुभवानंतर आपल्या अंत:प्रेरणेचा पुरेपूर वापर जिल करीत असते.

डॉ. जिल टेलर यांच्या मते, दुसर्‍याच्या जखमेवर हात ठेवून आपण ध्यानधारणा करून ती जखम बरी व्हायला मदत करू शकतो. रेकी, फेंगशूईसारख्या पद्धतींमध्ये ऊर्जेच्या गतिशास्त्राचं विज्ञान दडलं असावं, असं त्याचं मत दिसते. अंत:प्रेरणेने ऊर्जेच्या गतिशास्त्राचं कसं आकलन आणि उपयोग करायचा याची आपल्या उजव्या मनाला संपूर्ण स्पष्टता असते, असा डॉ. जिल टेलर यांचा ठाम विश्वास आहे; परंतु वैज्ञानिकदृष्टय़ा हे पचनी पडणं कठीण आहे. अशी स्वत:ची वेगळी टीप चित्रा बेडेकर यांनी पुस्तकाच्या अखेरच्या भागात जोडली आहे.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

No comments:

Post a Comment