Wednesday 28 November 2012

चंद्र वाटे तिला 'चायना'चा खरा!


दिल्लीत तिकडे संसदेचे अधिवेशन सुरू झाले. महाराष्ट्रातही विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. अधिवेशन म्हणजे तरी काय? नुसता गोंधळच! विरोधासाठी विरोध करणे. कामकाज बंद पाडणे, गोंधळ घालणे आणि एकमेकांवर वाटेल तसे आरोप-प्रत्यारोप करणे! जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा! प्रश्न किती सोडवले जातात हा संशोधनाचाच विषय आहे.

पुन्हा विदेशी गुंतवणुकीचा विषय संसदेमध्ये गोंधळ घालतोय. मागच्या अधिवेशनात 'लोकपाल'च्या नावाने धिंगाणा सुरू होता. खरंतर अण्णा हजारे म्हणतात तसा लोकपाल कॉंग्रेसलाही नको आहे, भाजपलाही नको आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहे. पण चोरांच्या उलटय़ा बोंबा म्हणतात तसा हा प्रकार. सारे पक्ष आपला-आपला धंदा करण्यात गुंतलेले आहेत. विश्वास कुणावर ठेवायचा हाही प्रश्नच आहे.

आपली आपण। खात जावी पोळी।

आपलीच टाळी। वाजवावी।

कुणासाठी उगा। सोसू नये ताप।

आपलाही बाप। बाप नोहे।

जगाच्या भल्याची। वाहुनिया चिंता।

आपुलीच चिता। रचू नये।

अंधारात मेला। जरी गाव सारा।

आपुला निखारा। देऊ नये।

देऊ नये काही। घेऊ नये काही।

शुद्धीवर नाही। जग बापा।

अवतीभवतीची सारी परिस्थितीच पार नासून गेलीय! म्हणूनच माणसं पूर्वी संन्यास घेऊन रानावनात निघून जात असावीत बहुधा! आता रानावनात जात नाहीत कुणी. पण समोरच्याचा कायमचा काटाच काढून टाकतात. उजळ माथ्यानं समाजात मिरवतातही! समाजही सलाम ठोकतो अशा लोकांना! सज्जनांचा कुणी वाली नाही!

ज्याच्या हाती लागलं तोच आपले हात धुऊन घेतो. हवा तसा सूड उगवून घेतो. दिशाभूल केली जाते जनतेची. जनताही मेंढरासारखी लांडग्यांच्याच मागे लागते.

अनेक मिल बंद पडलेल्या आहेत. पगारवाढीच्या नावानं कामगारांना भडकवलं जातं. कामगार नेतेच दलाली करतात. मिल बंद पाडतात. मजूर देशोधडीला लागतात. संसार उघडय़ावर पडतात. मिल बंद झाली की त्याच जागा बिल्डरांना विकल्या जातात. मोठमोठे मॉल्स त्या ठिकाणी उभे राहतात! या कामगार नेत्यांना जाब कोण विचारणार? दलाली करणार्‍या पुढार्‍यांना हिशेब कोण मागणार? इमानदार नेत्यांनी सांगितले तर कामगारही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत!

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचं तसंच झालं. प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची बोंब झाली. न्यायालयानेही लिलाव करण्याचे आदेश दिलेत आणि प्रत्यक्ष लिलाव झाल्यावर सारेच फुगे फुटले. त्या समितीचे अध्यक्ष असलेले लोक आता स्वत:चे तोंड लपवत फिरत आहेत. एकदुसर्‍यावर जबाबदारी ढकलत आहेत. पण एकाही नेत्याने आपली चूक कबूल करण्याचा मर्दपणा दाखवला नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वत:चा राजीनामा देण्याची हिंमत दाखवली नाही.

महाराष्ट्रात एन्रॉनच्या बाबतीतही तसाच प्रकार झाला होता. माझा हिस्सा किती? एवढय़ाचसाठी सारे तमाशे सुरू असतात! एफडीआयच्या बाबतीतही तेच चाललंय!

काळ नाही बरा, छंद नाही बरा

चंद्र वाटे तिला 'चायना'चा खरा!

आपले चांदणे शुभ्र नाही म्हणे

रे! दलाली करा, माल त्यांचा भरा!

ह्या विदेशी नद्या केवढय़ा चांगल्या

मेघ का जाहला कावरा बावरा?

आग ठेवायला फ्रीज देतात ते

आगही वापरा..बर्फही वापरा!

खेकडय़ांच्या पहा चालल्या बैठका

या तळय़ाची म्हणे वाटणीही करा!

खेळण्यासारखी थांबली माणसे..

यार! कोणीतरी एक चाबी भरा!

माणसंही आता थिजून गेलीत. विझून गेलीत! देशाचं काय वाटोळं झालं तरी कुणाला काही देणंघेणं नाही. आम्ही आपल्या बायकापोरांमध्येच खूश आहोत.

पुन्हा या अधिवेशनाच्या निमित्ताने मोर्चे काढले जातील. पुन्हा झिंदाबाद-मुर्दाबादचे नारे लावले जातील. पण सामान्य माणसांचे प्रश्न मात्र तसेच राहतील.

प्रामाणिक नेत्यांच्या तोंडाला पाने पुसली जातील. विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चातील नेते स्वत:चे फोटो काढून बातम्या आल्या की खूश होतील. पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या पराक्रमाचे रंगवून रंगवून वर्णन करतील. कुणाची पदं पक्की होतील. कुणाची पुढच्या निवडणुकीसाठी तिकिटं पक्की होतील. मोर्चात सामील होणार्‍या कार्यकत्र्यांच्या हातात काहीच पडणार नाही.

तशी वेळच आली तर त्यालाच लाठय़ा खाव्या लागतील. गोळ्याही खाव्या लागतील. अशा वेळी नेते मात्र नेमके सहीसलामत राहतील. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

तुमचे मोर्चे, तुमचे गाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

तुम्ही पुढारी भले शहाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

मार खायचा आम्ही, आणिक नाजूक वेळी-

हळूच तुमचे पळून जाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

काय सांगायचं? काय बोलायचं?

शेवटी लोकांनाही 'चायना मार्केट'चाच माल आवडतो!

आम्ही लोकशाहीसाठी खरंच लायक नाही आहोत का? हाच प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावतो!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment