Tuesday 27 November 2012

भ्रामकशक्तीवरील विश्वासामुळे माणूस हतबल होतो


याविश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? या प्रश्नांचा वेध विज्ञान घेत नाही. हे विश्व कसे निर्माण झाले व त्यातील पदार्थाच्या किंवा ऊर्जेच्या विशिष्ट स्थिती व हालचालींमागे कोणते नियम किंवा सूत्र दडले असतात, हे शोधण्याचे कार्य विज्ञान करते. प्रत्येक शास्त्राने स्वत:भोवती एक मर्यादा आखून घेतली असते आणि त्या मर्यादेमुळेच संशोधनात शिस्त बाळगून नेमक्या दिशेने वाटचाल करता येते. असे असले तरी आपापल्या विषयातील काही गूढ समस्यांची उकल होण्यासाठी इतर विषयांच्या साहाय्याने संशोधन करणे भाग पडते. जसे पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांना एकमेकांच्या व गणिताच्याही मदतीची गरज भासते. त्याचप्रमाणे जीवशास्त्राला (बायोलॉजी) देखील पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) मदत घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. सृष्टीचे अधिक गुंतागुंतीचे व्यवहार शोधण्यासाठी नवनव्या विज्ञानशाखादेखील उघडण्यात आल्या आहेत.

विश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? आमच्या जीवनाचे प्रयोजन काय? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या शास्त्राला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक विचारांचा जो शिरकाव आहे, त्याला तूर्त बाजूला ठेवून आपण या विश्वाच्या व जीवनाच्या प्रयोजनाबाबत केवळ दोन परस्परविरुद्ध प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न करू.जे दोन मतप्रवाह भौतिकवाद व अध्यात्मवाद या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही विचारसरणींना पुन्हा अनेकानेक शाखाही फुटलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या बुद्धीला व अंत:करणाला काही अंशी समाधान प्राप्त करून देणार्‍या शाखांमधील उत्तम व उन्नत अंश एकत्रित करून आपण प्रथम भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा विचार करू.

भौतिकवाद असे मानतो की, या सृष्टीच्या मुळाशी कोणतीही चैतन्यमय, ज्ञानयुक्त शक्ती नसून केवळ जडपदार्थ किंवा ऊर्जा आहे. प्राण, मन, बुद्धी हे तत्त्व जडातूनच विकसित झाले असून पदार्थमय भौतिक देहाच्या बाहेर त्यांचे वेगळे अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीत ईश्वर अथवा आत्म्याचे तर मुळीच अस्तित्व नाही. मृत्यूनंतर सर्व प्राण्यांचे अस्तित्व संपते. पुनर्जन्माच्या कल्पनेला कोणताही आधार नाही. सृष्टीचे संचालन तिच्या पदार्थाच्या अंगभूत गतितत्त्वांनी व नियमांनी होत असते. बाहेरून सृष्टीचे नियमन वा विकास करणारी शक्ती कोणतीही नाही. जडपदार्थातून पृथ्वीवर जीवन उगवले, ते पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे व येथील वातावरणामुळे. तसेच प्रतिकूल पर्यावरणाशी झुंजत इथे प्राण्यांचे अनेकानेक प्रकारचे देह घडत गेले व स्वाभाविकपणे त्यापैकी काही प्राणीजातींमध्ये मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला. मनाशी व बुद्धीशी संबंधित प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असतात. मानवाचा मेंदू सर्वात मोठा असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत भावभावना, कल्पकता व बुद्धी अधिक आहे.

मनुष्येतर प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान नसते. त्यांच्या सर्व प्रेरणा उपजत व नैसर्गिक असतात. त्यामुळे ते सर्व प्राणी निसर्गाचाच एक अभिन्न भाग असल्यासारखे जगतात. त्यांच्यात व बाह्य सृष्टीत आंतरिक एकत्व असते. परंतु मानवामध्ये मन-बुद्धीच्या विकासाने एक वेगळाच टप्पा गाठला. मी व बाह्य जग या वेगवेगळ्या वस्तू आहेत, असे भान मानवाला त्याच्या आदिम अवस्थेपासून प्रकर्षाने आले. बाह्य जग सुंदर, कृपाळू आहे तसेच ते प्रसंगी हिंस्र व क्रूरही वागत असल्याचा नित्य अनुभव मानवाला येतो. आईच्या गर्भात एकत्वाची अनुभूती घेत पहुडलेले बालक जसे बाहेर येताच असुरक्षित वाटून भयभीत होतो तसेच काहीसे निसर्गापासून तुटल्याच्या जाणिवेने मानवाचे झाले. त्याला हे वेगळेपण नकोसे वाटते. त्यामुळे ते एका विश्वव्यापी ईश्वराची कल्पना करून त्याच्याशी तादात्म्य साधू पाहतो. आपल्या एकाकीपणावर व दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्या काल्पनिक विश्वेश्वराची भक्ती हा चांगला उपाय त्याला वाटतो.

शिवाय वादळवारे, अतिवृष्टी, वणवे, भूकंप, ज्वालामुखींचे स्फोट, पूर यांसारखे निसर्गाचे रौद्ररूप आणि इंद्रियांना सुखावणारे लोभस रूप अशी दोन्ही रूपे न्याहाळताना प्रत्येक प्राकृतिक शक्तींचे नियंत्रण करणारी एखादी देवता असावी व त्या देवतेचा रोष झाल्याने नैसर्गिक संकटे येत असावी, अशीही

आदिमानवाची समजूत झाली. त्यामुळे मरुत, वरुण, सूर्य, इंद्र अशा देवता विविध नैसर्गिक शक्तींच्या कारक असल्याचे कल्पून यज्ञासारख्या विधीने त्या देवतांना आवाहन करणे व आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंची आहुती देऊन त्या देवतांना प्रसन्न करून घेणे, अशासारखे उपाय मनुष्य करू लागला.

ईश्वराचे अथवा देवतांचे अस्तित्व कल्पून त्यांची पूजा करणे, भक्ती करणे ही मानवी मनाची वरील कारणांमुळे गरज होती. प्रतिकूल सृष्टीत जिवंत राहण्यासाठी या कल्पनेने त्याला भक्कम आधार दिला. या सृष्टीत शाश्वत असे काही असेल तर ती केवळ भौतिक पदार्थमय ऊर्जा होय. जीवन अशाश्वत असते. जीवनापूर्वी व मृत्यूनंतर प्राण्यांचे कोणतेही अस्तित्व नसते. आत्मा-परमात्मा नावाची कोणतीही वस्तू व शक्ती नाही. सृष्टीचा कोणी निर्माता नाही. असा कोणी निर्माता असता तर ब्रह्मंडात व पृथ्वीवरसुद्धा जी अतिशय उधळमाधळ आढळून येते, तशी ती राहिली नसती. उत्क्रांती ही एक सरळ रेषेत व्यवस्थितपणे आखीव स्वरूपात झाली असती. पृथ्वीवरची निसर्गाची एकूण उत्क्रांती ही झोकांडय़ा खात, चाचपडत, धडपडत, चुकतमाकत, आंधळ्याने वाट शोधावी तशी झालेली दिसते. ईश्वराला जीवनाचा विकास जर सृष्टीत करावयाचा होता, तर हे करोडो-करोडो ग्रह-तारे, बहुतांश जीवरहितच दिसतात. आपल्या सूर्यमालेत तर फक्त पृथ्वीवरच जीवन उमलल्याचे दिसते. शिवाय जीवन कष्टमय, यातनादायी आहे. भोवतालचे पर्यावरण हे जीवनास पोषक कमी व मारकच जास्त आहे. शिवाय क्रौर्य, हिंसा, दुष्टावा, मत्सर, दारिद्रय़, शोषण या बाबी ईश्वराने का निर्माण कराव्या? तो परपीडनात आनंद घेणारा (सॅडीस्ट) आहे काय?

ईश्वर, आत्मा, परमात्मा, देवदेवता यांच्या असण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भ्रामकशक्तींवर विश्वास ठेवून मनुष्य हतबल व परावलंबी होतो. जी शक्ती अस्तित्वातच नाही ती आपले साहाय्य कशी करणार? कोणत्याही अतिभौतिक शक्तीच्या असण्यावर विश्वास ठेवणे व आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा शक्तीच्या साहाय्याची याचना करणे म्हणजे अंधश्रद्धेपायी आत्मवंचना करून स्वसामर्थ्य गमावून बसणे होय.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

No comments:

Post a Comment