Tuesday 27 November 2012

एक झंझावात होता..!


.. आणि
बाळासाहेब ठाकरे या नावाचं एक वादळ शांत झालं..

जाताना आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेवून गेलं! काळाच्या छातीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवून गेलं! या एका वादळानं अनेक परंपरागत गट उद्ध्वस्त करून टाकले. या वादळाचा चमतकारच असा होता की त्यानं हात लावलेल्या वाळूचेही पहाड झालेत. रस्त्यावर पडलेल्या धुळीचेही बुलंद किल्ले झालेत. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. समाजकारण ढवळून निघालं! ज्याला इतर पक्षांनी साधं सरपंचही केलं नसतं, अशी माणसं आमदार, खासदार, मंत्री झालीत.

पुण्याच्या अधिवेशनात 1988 ला माझी शिवसेनेचा नागपूर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते हे आपले संपर्कप्रमुख झाले. माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे गडचिरोलीचे संपर्कप्रमुख झाले. त्या अधिवेशनाला शिवसेनेची महाराष्ट्रात बांधणी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले. अनंतराव गीते हे शांत, समंजस आणि नारायणराव राणे हे आक्रमक. पण दोघांशीही माझा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. दोघेही त्यावेळी मुंबईचे नगरसेवक होते.

पुण्याच्या अधिवेशनात मला मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांनी एका चर्चासत्राची सुरुवात करण्याची ऐनवेळी जबाबदारी सोपविली. मी विदर्भातील शिवसेनेच्या एकंदरीत परिस्थितीबाबत बोलताना बोललो की, 'विदर्भातील शिवसेनेकडे मुंबईतले नेते फारसे लक्ष देत नाहीत, याची खंत शिवसैनिकांच्या मनात आहे. आपण पोरके आहोत, अशी भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यानंतर त्वरित उपाययोजना झाली नाही तर ही 'पोरके'पणाची भावना 'परके'पणामध्ये बदलायला वेळ लागणार नाही. दुसर्‍या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये माझे भाषण ठळकपणे छापून आले. बाळासाहेबांनीही ते वाचले. मला स्टेजवर बोलावले. म्हणाले, काल तुम्ही भाषणात काय बोललात? मी सरळ सरळ सांगून मोकळा झालो. मनोहर जोशी, छगन भुजबळ माझ्या तोंडाकडेच पाहत राहिले. प्रत्यक्ष बाळासाहेबांच्या समोर असं बेधडक बोलणारा शिवसैनिक त्यांनी पहिल्यांदाच पाहिला असेल ना?

बाळासाहेब जरा थांबलेत! म्हणाले, वाकुडकर तुम्ही बोललात ते खरं बोललात, पण मीडियासमोर असताना असं बोलायचं नसते. यापुढे जरा काळजी घेत चला. आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मंद हसलेत. गंमत म्हणजे पेपरमध्ये नेमकं काय छापून आलं होतं, हे मला माहीतही नव्हतं! पण बाळासाहेबांची आणि माझी जिल्हाप्रमुख या नात्यानं पहिली सलामी अशी झाली.

बाळासाहेबांचं कामच रोखठोक होतं. बेधडक, पारदर्शी. आत एक बाहेर एक असं काही नाही. मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हे त्यांचे तेव्हाचे उजवे हात. छगन भुजबळांची माझं छान जमायचं. बाळासाहेबानंतर सेना वाढण्यामध्ये जर कुणाची मेहनत असेल तर ती छगन भुजबळ यांचीच! मनोहर जोशी मात्र गोटय़ा फिट करण्यात वस्ताद! तर बाळासाहेब शिवसेनेचंही सर्वस्व! शिवसैनिकांचाही जीव की प्राण!

तू वेगळा सेनापती अन् आमचे सरकार तू

तू ढाल अन् तलवार तू, सैनिक तू सरदार तू

योगी तसा सम्राट तू, साधा तसा भन्नाट तू

तू मोकळ्य़ा माळापरी, रानापरी घनदाट तू!

तू पौर्णिमा, तू चांदणे, ठिणगीही तू, ज्वालाही तू

तू वेदना, संवेदना, तु कुंचल, भालाही तू

तू गर्जना, हळूवार तू, तू बासरी रणशिंग तू

फेसाळती मैफिल तू, जगण्यातली अन् झिंग तू !

शब्दात तू, रेषात तू, रागात तू, त्वेषात तू

इन्कार तू, स्वीकार तू, स्नेहात तू, द्वेषात तू

आभाळ तू, आधार तू, रक्तातला विश्वास तू

कधी भासला सर्वस्व तू, कधी भासला आभास तू !

पहाडात तू, रानात तू, अन् आमच्या प्राणात तू

स्वप्नात तू, श्वासात तू, मंत्रापरी कानात तू

तू पेरला पुरुषार्थ अन् आभाळही केले खुले

तुझियाविना बापा कुठे जातील ही वेडी मुले?

बाळासाहेबांची ही सारी रूपं मी जवळून पाहिलीत, अनुभवली, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

व्ही.पी. सिंग यांनी मंडळ आयोग लागू करण्याची घोषणा केली. मी मंडळ आयोगाचा समर्थक होतो. मी त्यांचे समर्थन केले. बाळासाहेबांचा विरोध होता. छगन भुजबळांनीही आधी समर्थन केले आणि दोन-तीन दिवसातच मागे घेतले. मी मात्र मंडल आयोगाचे समर्थन करतच राहिलो. सभा घेत राहिलो. मंडळ आयोगाच्या विषयावर शिवसेना सोडण्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा बाळासाहेबांनी मला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत त्यावेळी बाळापूरचे कवी उल्हास मनोहर होते. बाळासाहेबांनी माझ्यातल्या एका एका खुबीचे केलेले वर्णन बघून मी स्वत:च चॅट पडलो. आणि शेवटी बाळासाहेब म्हणाले. 'वाकुडकर मी तुमचं एवढं कौतुक करतो. तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. आणि तुम्ही मात्र व्ही.पी. सिंग यांच्या नावाचा जप करता. व्ही.पी. सिंग तुम्हाला ओळखतसुद्धा नसेल.' एखाद्या मोठय़ा बुलंद पहाडाच्या छातीतून वाहणारा मायेचा झरा मला जाणवला. कसलाही अहं नाही. परकेपणा नाही. मुखवटा नाही. समुद्रानं आपल्यातल्या एखाद्या थेंबाला म्हणावं, की तू मला हवा आहेस सोडून जाऊ नकोस' असाच हा प्रसंग. पण माझ्यावरचं मंडळ आयोगाचं भूत जास्त प्रभावी झालं!

मला जिल्हाप्रमुखपद न मागता मिळालं. विधानसभेचं तिकीटही न मागता मिळालं. माझी प्रचंड हवा निर्माण झाली. निवडून येण्याची शक्यता निर्माण होताच ज्यांच्यासाठी मी लोकसभेच्या निवडणुकीत अक्षरश: जीवाचं रान केलं त्यांच्याबद्दल लोकांनी विरोधी उमेदवारासोबत हातमिळवणी केली. निवडणुकीनंतर मी एका वृत्तपत्रातून जाहीरपणे आरोप केलेत. भाजपाने माझी बाळासाहेबांकडे तक्रार केली. त्यांनी मला मुंबईला बोलावून घेतलं. आणि रोखठोक सवाल केला.

'वाकुडकर, भाजपावर तुम्ही जाहीरपणे टीका करत आहात, हे खरं आहे का?'

'होय साहेब'

'ते आपले सहकारी आहेत'

'पण त्यांनी निवडणुकीत धोका दिला साहेब'' आपल्या सोबत

'तुमच्याकडे काही पुरावा आहे का?'

मी बाळासाहेबांना फक्त दोन उदाहरणं दिलीत. आणि बाळासाहेब लगेच म्हणालेत, 'बेधडक चालू द्या.. आरोप मागे घेण्याची गरज नाही.'

त्या क्षणी मला किती हत्तीचं बळ आलं असेल? हा सेनापती होताच तसा!

ही शब्दांची तलवार, लढवैय्यांचा सरदार

दीनदुबळ्यांचा हुंकार, हे जगणे धुवांधार

दरी-खोर्‍यातून दुमदुमणारा शिवशाहीचा नाद..

सेनापती जिंदाबाद!

ही शौर्याची ललकारी, ही कर्तृत्वाची गाथा

ही बुलंद निधडी छाती, हा सदैव उन्नत माथा

हे त्यागाचे यज्ञकुंड अन् भक्तीचा उन्माद

सेनापती जिंदाबाद!

हा डोंगर खडतर तरीही, मायेचा रस्ता सोपा

अन् भेदरल्या चिमण्यांचा, हक्काचा अंतिम खोपा

उपेक्षितांच्या भरारण्याला, ही संजीवन साद

सेनापती जिंदाबाद!

माझा देशातल्या मोठय़ा मोठय़ा नेत्यांशी अगदी जवळून संबंध आला. व्ही.पी. सिंग, लालूप्रसाद यादव, शरद यादव, एस.आर. बोम्मई, कांती सिंह, रंजन यादव, मधू दंडवते आदी मान्यवरांना जवळून पाहिलं. चर्चा केली. जनता दलाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना धोरणात्मक बाबीतही माझा नेहमीचा सहभाग राहिला. पण बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच!

शिवसेना दोन्ही वेळा तुटली तेव्ही मी होतो. छगन भुजबळांच्याही सोबत होते. आणि नारायण राणे यांच्याही सोबत होतो. तो एक वेगळाच इतिहास आहे.

एखाद्या कोपर्‍यातून आत शिरलेला प्रकाशाचा कवडसा बघून सूर्याची कल्पना नाही करता येत. एखाढय़ाशा शब्दांत बाळासाहेबांबद्दल काय बोलणार? पण बाळासाहेबांचा मात्र माझ्या जीवनावर खोलवर प्रभाव आहे. तो कधीही पुसला जाणार नाही.

माझ्याच काय महाराष्ट्राच्या जीवनातून तरी तो पुसला जाऊ शकतो का? बाळासाहेबांना भेटणं कठीण. बोलणं कठीण, समजून घेणं कठीण. ओळखणं तर अतिशय कठीण. सार्‍या व्याख्यांच्या पलीकडे असलेलं हे आगळं, वेगळं, दुर्मिळ एकमेवाद्वितीय वादळ..

एक झंझावात होता

गीत वेडे गात होता!

शब्द होता, शस्त्र होता

पाठीवरचा हात होता!

चंद्र होता, सूर्य होता

पौर्णिमेची रात होता?

तोडली सामंतशाही

हा खरा आघात होता!

क्षितिजही त्याचे दिवाणे

क्या कहे- 'क्या बात' होता!

पत्थरांना फूल यावे

तो अशी बरसात होता!

जयभवानी, जय शिवाजी

मंत्र त्याच्या आत होता!

काळ आला, काळ गेला.

तो सदा जोरात होता!

काळ येईलही.. काळ जाईलही.

हा झंझावात मात्र घोंगावत राहणार..

सदैव.. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून

तनातून-मनातून. दर्‍याखोर्‍यातून..

त्या वादळाला मानाचा मुजरा..

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment