Monday 19 November 2012

बिमार पडाची मजा असते


शंकर बडेतुमी असं म्हनानं का बिमार पडण्याची काय मजा असते? असते! तुमी इचार करून पाहा नाईतं मी तं तुमाले सांगनारचं हावो. मंग तुमाले वाटन का हो लेक हेतं खरं हाय. आपन जवा लहान असतो आन् एखांद्या दिसी शायेत जाचं जीवावर येते तवा कसं आपलं पोट दुखाले लागते. आठोलं? मले तसं शायेत जाले मनापासून आवडे आन् आमच्या बेसिक शायेची शिस्त एवढी कडक काऊन का तवा थेटे गुरुजीचा जमाना होता, पन हे जरी खरं असलं तरी एखांद्या दिसी चाट नाई मारलीतं मंग लहानपनची मजाचं काय? हे पोट दुखाची दुप्पलं सदाई मारता थोडीचं येते. एखांद्या वक्ती आनं आपलं दुखनं खरखुरं वाटावं म्हून एकदोन खेपा टमरेट उलचून खारी (गावाला लागून असलेलं शेत) जवय करावं. पाहा माहा असं होते. माह्या एकल्याचचं असं होते का आपल्या खेडय़ातल्या मानसाले याच्यावून ते आनं त्याच्यावून हे आठवाची खोडचं असते कानी?

मी कालेजमंदी शिकत असतानाचा एक किस्सा टमरेलच्यानं आठोला. झालं काय मी कालेजात होतो तवा आर्केस्टात असल्यानं आजूबाजूच्या गावचे जवान पोरं आयखे. त्यायच्या मनात असं आलं का व्याख्यानमाला का शयरातचं झाल्या पायजे, का आपल्या गावात घेऊन पाहू म्हून तवा यवतमाले माह्या खोलीवर आले. त्यावक्ती एकदोन ठिकानी व्याख्यानमाला राहे. तिथं तपास करूनं त्यायले म्या वक्ते भेटून देल्ले. तवा त्या रोडनं दोनतीन वक्ता एसटी जाये. त्या गावाचा फाटा होता तिथून गाव दोन-अडीच किलोमीटर. आता तं गाव तिथं अँटो झाले हाय. पह्यला वक्ता नागपूरवून येनार होता. पावन्याले दोयपारी बोरीवून छकडय़ानं न्याले एक जन आला. पावन्याले हा नईनचं अनुभव असनं. सकायी वापेस जाले फाटय़ावून हल्टिंग एसटी असते. हे पावन्यानं इचारून ठुलं होतं. राती भासन झालं. सकायी हल्टिंग गाडी चुकू नोय म्हून लगबग तयारी करून एका कार्यकर्त्याच्या सायकलवर्त पावना फाटय़ावर पोचला. फाटय़ावर्त याचं गावातल्या देवीदासची टपरी होती. आल्या आल्या इचारल्यावर देवीदासनं सांगतलं का तुमी रामभाऊच्या वाडी (मळा) पासी असानं तवा हल्टिंग गेली. आता पाऊन घंटा गाडी नाई म्हनल्यावर सकायी पावन्याची फेरी काई जमली नोती म्हून त्यायनं देवीदासनं उचारलं, ''भाऊ डबा आहे का?'' त्याच्यावर्त हा म्हने, ''हाये ना पावनेबुवा, थ्या राजनापासी टमरेल ठेवून हाय.'' जसा पावना राजनापासी वाकला देवीदासनं इचारलं, ''पावनेबुवा तुमाले टाईम किती लागते?'' पावन्यानं हे आयकल्या बराबर हातातलं टमरेल खाली ठुलं आन् सरय उभा झाला. त्या पावन्याचा रातीचा बोलाचा इसय होता. 'वेळेचे महत्त्व अर्थात टाईम इज मनी' त्याले वाटलं काय आपल्या कार्यक्रमाचा इफेक्ट आहे. आपण रात्री वेळेचं महत्त्व आपल्या व्याख्यानात सांगितलं आणि हा लगेच तुम्हाला किती टाईम लागेल विचारते. कोण म्हणतो व्याख्यानाचा परिणाम होत नाही. त्यायनं मोठय़ा खुसीनं हरकीजूनं देवीदासले इचारलं, ''रात्री तुम्ही माझ्या व्याख्यानाला होता काय?'' हा म्हने, ''नाई बा मी हटेल बंद करून आलो तं तुमचं अटपलं होतं.'' तरी पावन्यानं जिद्द सोडली नाई. त्यायनं अखीन इचारलं, ''तुम्ही किती टाईम लागेल असं विचारता म्हणून विचारतो.'' थे आयकल्यावर्त हासतं देवीदास म्हने, ''टायमाचं म्हन्ता का ते याच्यासाठी इचारलं का टमरेलले लहान भोकं (छिद्र) हाय पानी लय टाईम ठयरत नाई.''

एक सांगू का आंगभर होईन असं दुखनं मले लहानपनापासून भोगा नाई लागलं, पन मी दहावी झाल्यावर्त दोनतीन खेपा टायफाईड झाल्याबिगर राह्यला नाई. तवा टायफाईड आता सारकं टेस्टिंग करून मंग नाई सांगत आमचे डॉक्टर. आजकालतं डाक्टरकडं गेलं का तपासनं कमी आन् 'ब्लड टेस्ट करून प्रथम कन्फर्म' करून घेऊ म्हंतेत असं म्हनून खर्चाच्या गड्डय़ात लोटते. त्यावक्ती बगर टेस्टिंगनचं डाक्टर सांगत का टायफाईड हाय. त्यायचं हिंदान कवा चुके नाई. आतातं रगत तपासल्यावर्त एखांद्या खेपी हिंदान चुकते यायचं. टायफाईड म्हनलं का त्याची इतकी वज का इचारू नोका. जेवन बंद. मंग पेशंटसाठी यवतमायहून सफरचंद. तवा टायफाईड झाल्याबिगर सेफ तोंडाले लागे नाई आन् त्यातनी बावाजी म्हंजे नाना त्यायल्या पेटीतून दोनतीन खेपा जरदायू हातावर टाके. त्याचं पह्यले वरचं मगज खाचं आन् मंग बियाच्या आतनी जे बदामापरीस लहान बी असते ते फोडून खाचं. या लालचीपोटी असं वाटे का टायफाईड झाला पाह्यजे लेक. म्या आगुदर सांगतल्या परमानं घरचे कायजीत पडतीन इतक्या मोठय़ा मानगीनं बिमार पडलो नाई आन् आपल्याले दवाखान्यात भेटाले याचे कोनाले झटके देल्ले नाई. बिमारं मानसाले आन् तेयी दवाखान्यात भर्ती असलेल्या पेशंटले भेटाले जाचा शौकच असते. तुमी म्हनानं शौक हो शौकचं अस्ते काई जनाले. सव्र्यात पह्यले मी भेटाले आलो, मले किती कायजी हाय आन् तुमचा सख्खा असून तो भाऊतं अजून भेटाले आला नाई याच्यावर्त शिक्का माराचा अस्ते, पन इनडायरेक्ट पद्धतीनं. आल्यावर्त पेशंटपासच्या स्टूलवर बसल्या बसल्या इचारन्याची सरबती चालू होते. कसं झालं, कवा झालं, काऊन झालं, पह्यले कवा तकलीब झाली नव्हती का? सांगतलयी नाई? आता पेशंट जवा सांगते पह्यले कवाचं नाई हे पह्यल्यांदाच तरी हा म्हन्तो सांगतयी नाई? मंग अरामानचं फटाक्याची बत्ती सिलगवाचं काम असं करते. मोठय़ाचं सोयाबीन काढनं चालू हाय वाट्टे? आता हाथी त्याचं गावात राह्यते असं नाई का हा नांदेडले थो नागपूरले अस्ते पन खिपली कसी काढाची ते यायच्याकडून सिकावं. हा झाकासाठी म्हंते दादाले मालून नसनं पडलं तं हा उघडं करते असं कसं मालूम नसनं पडलं, पन एक डाव निख्ख निख्ख (वेगळे) झालं का कोनी कोनाचं नस्ते रामभाऊ निघतो आता कायजी घ्या असं म्हनतं उभा होते. काई काई पेशंटले भेटनारे असे असतेतं ते येऊन बसले का पयला प्रश्न, ''काय सांगतलं डॉक्टरनं?'' यानं काई सांगायचं अस्ते का त्याच्या आंधी हेच सांगते, ''हे तपासून आता थे तपासून आता याची लिस्ट देल्ली असनं? आपलातं भरोसाचं नाई ठरला आजकालच्या डॉक्टरवर मांग बयीराम सरकारी दवाखान्यात तुह्यावानी भर्ती होता तवा डाक्टर म्हने मलेरिया झाला आन् हा मेला निमोनियानं. मरणार्‍या मानसाले हेही समजतं नाई आपनं कायनं मेलो? पह्यलेचं तं बिमार मानूस मोठय़ा दवाखान्यात आनलं म्हून धास्तावला अस्ते. आता भेटाले येनार्‍यानं बिमाराले हिंमत द्यावं का त्याची दाय पतली करावं? हा माहा नाई सार्वजनिक अनुभव हाय. अगास पायन्यात बसनार्‍या सार्‍याचा म्हून हा लेख माहा नाई आपल्या सर्वाचा हाय असं मी मानतो. दहा वर्सा पह्यले मी माह्या गावी गेलो आन् शिवतिवारी म्हून माहा जे दोस्त हाय त्यानं तुले गावात चारपाच जागी जाचं हाय म्हून त्याची हिरो पूक नावाची गाडी घेऊन जाले लावली. मी त्या गाडीनं वसंता बांडेले मांग बसवून ठेसन रोडनं चाल्लो असतानी बाजूच्या झोपडपट्टीतून एक बोकडय़ा आडवा धावत येतानी दिसला म्हून स्पीड कमी केली, पन तो आंधीच निसटला आन् त्याच्या मांग टकरीसाठी लागलेल्या बोकडय़ानं अचानक पुढच्या चाकाले धडक देल्यानं माह्या हातातलं गाडीचं हँडल निसटलं आन् मी जमिनीवर दनकलो. उजव्या हातावर पडल्यानं हात आन् टोंगयाले (गुडघा) दोन गिट्टडय़ा चांगल्याच घासटल्या. त्यावक्ती बोरीच्या सरकारी दवाखान्यात डॉ. दादा पुरी दुसर्‍यांदा बदलून आले होते. त्यायनं सिस्टरले सांगून टोंगयाची जखम सफा करून लटकवून मले घेऊन यवतमायले निघाले. त्या दिसी मंगयवार बजारचा दिस. बजारात आन् गावात अराअरामानं गाडीचा एक्सिडेंट बाबाचा हात तुटला हे सुरसुरी फुरफुरत फयलत गेली. दुसर्‍या दिसी गावातून घरी भेटाले येणारे सुरू ले सुरू. आल्यापुटं येनारा कसं झालं? माहा सांगनं असं असं. पोरी म्हने कॅसेट करून कसं कसं झालं याची मंग कोनी आल्या बराबरं बटन दाबाचं. हाय ना मजा. आता दोन वर्सा पह्यले वर्धेचा कार्यक्रम करून राती टॅक्सीनं येतानी इंडिकाचा जोरदार अँक्सिडंट झाला. नसिबाले जोर म्हून वाचलो आन् त्या मानानं लागलं नाई. दुसर्‍या दिसी सांजीले कोनी तरी माहे कालेजपासूनचे जे दोस्त हाय सुरेश कैपिल्यावर त्यायले हे सांगतलं ते दिलीप सराफ आन् ईश्वर रायले घेऊन घरी आले आन् 'इतकं होऊनयी निरोप पाठवला नाही' म्हून असे खिजरी आले ना! मले त्यायचं रागावनं नाई अंतरातला कयवया जानवतं होता. ''किती दिवस राहिले आपले?'' या वाक्यानं अवघ्यायच्या डोयात पानी तरयलं. म्या निरूप ना देण्याचं त्यायच्या इतलं जिव्हारी लागलं होतं की त्याच्याच्यानं तपल्यानं ते लडीतल्या फटाक्यावानी तडं तडं बोलत होते. आन् मी वात निंघालेल्या फटाक्या सारका गुपचूप आयकून घेत होतो. चुकलंच होतं ना माहं! तरी एक सांगू जीवाले झोंबल्यानं ते जे जीवातलं बोल्ले ते आयकून असं वाटलं लेक काई म्हना हे आयकाले भेटाले इंडिका उलटून खांद्याची हड्डी मोडली, पन अस्या बिमार पडन्यातयी मजा अस्ते कानी?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment