Saturday 29 September 2012

ज्योतिष्यांचं भविष्यशास्त्र भंकस आणि हास्यास्पद


आपल्या कुंडलीतील परंपरागत 9 ग्रहांपैकी सोम (चंद्र), रवि (सूर्य) हे ग्रहच नाहीत आणि राहू, केतू हे अस्तित्वातच नाहीत. म्हणजे 9 पैकी 4 ग्रह नाहीत. तरी आजही, 2012 सालातही ज्योतिषी हे ग्रह आपल्या कुंडलीत नाचवीत असतात हे आपण गेल्या लेखात पाहिलं.

आता उरले मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि हे पाच ग्रह. हे ग्रह अस्तित्वात आहेत; पण यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? ग्रह-गोल-तार्‍यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र (ईंीेपेा) ही जगातील पहिली विज्ञान शाखा आहे. या विषयाचं मानवजातीचं ज्ञान अतिशय अचूक आहे. पुढे 5 लाख वर्षानंतर कोणत्या दिवशी केव्हा सूर्योदय-सूर्यास्त होईल, ग्रहण लागेल हे आज अचूक सांगता येते. म्हणूनच मानवजातीनं पाठवलेला माणूस चंद्रावर अचूक उतरला, परत आला. अनेक यानं मंगळावर जाऊन परत आली. एवढं या विषयाचं गणित अचूक आहे.

खगोलशास्त्रज्ञ सांगतात की, मानवीजीवनावर ग्रहांचे परिणाम तीन प्रकारे होऊ शकतात. एक-गुरुत्वाकर्षणाचा, दोन-चुंबकाचा, तिसरा-किरणांचा. या तिन्हींचा मानवीजीवनावर होणारा परिणाम निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. कारण पृथ्वी, सूर्य, चंद्र यांचं गुरुत्वाकर्षण एवढं परिणाम करतं की, बाकी ग्रहांचं गुरुत्वाकर्षण नगण्य परिणाम करतं. ज्याची दखलही घेण्याची गरज नाही, एवढा तो परिणाम नगण्य असतो. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात, ''ग्रहमालेतील सगळ्यात मोठा व ताकदवान ग्रह 'गुरु'. या गुरुच्या गुरुत्वाकर्षणाचा माणसावर किती परिणाम होतो? आपण बसलो असताना खुर्चीवरून उठून उभे राहतो, तेवढा. म्हणजे नगण्य. आपल्याला जाणवतही नाही.'' ग्रहांच्या किरणांचा काहीच परिणाम होत नाही आणि पृथ्वीचं चुंबक इतकं ताकदवान आहे की, त्या तुलनेत हजारो-लाखो किलोमीटर दूर असणारे ग्रह काहीच परिणाम करू शकत नाहीत.

थोडक्यात, उरलेल्या 5 ग्रहांचा तुमच्या-माझ्यावर काहीच परिणाम होत नाही हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालं असतानाही हे ज्योतिषी तुमच्या-माझ्या जीवनात या ग्रहांचा धुडगूस सुरू असतो असं धादांत खोटं सांगतात. तुमच्या- माझ्यावर लहानपणापासून झालेल्या धार्मिक श्रद्धांचा फायदा घेऊन स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी, पोट ओसंडून वाहील एवढं भरण्यासाठी, तुमच्या माझ्या कुंडल्या मांडून आपल्याला लुबाडत असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

म्हणूनच 1975 साली जगातील 186 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं आहे. त्यावर 19 नोबेल प्राईज विजेत्या शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. त्यातील एक भारतीय नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. चंद्रशेखर आहेत. सारे शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रांतील मोठे वैज्ञानिक आहेत. ते म्हणतात, ''आम्ही लोकांना सावध करू इच्छितो. ज्योतिषशास्त्रातील गृहीतकांना कोणताही पाया नाही, आधार नाही. दूर अंतरावरील आकाशस्थ ग्रहगोल ही विशिष्ट प्रकारची कृती करण्याकरिता काही दिवसांना किंवा काही कालावधीला शुभ वा अशुभ बनवितात किंवा एखादी व्यक्ती ज्या राशीत जन्माला येते ती राशी त्या माणसाची योग्यता किंवा अयोग्यता निर्धारित करते, हे मुळीच सत्य नाही. भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं; ग्रह, तार्‍यांवर नव्हे.

आज केल्या जाणार्‍या भविष्यकथनांवर, कुंडल्यांवर त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं प्रसिद्धी देतात. यामुळे आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत. या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तीनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे.''

ग्रह गोलांच्या क्षेत्रातील विद्वान वैज्ञानिक म्हणतात, ज्योतिषी ठगांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ज्या फलज्योतिषाच्या (ईंीेश्रेस) शाखेमधून खगोलशास्त्र निर्माण झाले आहे, त्याच शाखेतील वैज्ञानिक ज्योतिष्यांना 'ठग' म्हणतात. हे आपण समजून घेणार आहोत का?

जन्मवेळ आणि जन्मस्थान हे दोन महत्त्वाचे मुद्दे. या आधारावरच तुमच्या-माझ्या संपूर्ण आयुष्याचं भविष्य सांगणारी कुंडली बनवली जाते. जन्मवेळ अचूक कशी पकडायची?

1985 सालची गोष्ट. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं होतं. ऐनवेळी कळल्यामुळं मी घाईघाईत या संमेलनासाठी पुण्यात पोहोचलो. तोवर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची तीन वर्षे उलटली होती. अनेक मोठमोठय़ा बाबांचा, मांत्रिकांचा त्यांच्या गुहेत शिरून भंडाफोड केला होता. अनेक ज्योतिष्यांनाही गजाआड केलं होतं. तरीपण बहुतांश पांढरपेशे असणारे ज्योतिषी सभ्य असावेत अशी समजूत माझ्या मनात कायम होती. त्यामुळं या संमेलनासमोर उभं राहून आम्ही तीघचं कार्यकत्र्यांची फौज सोबत न घेता पत्रक वाटत होतो. मी, एक जामनेरची प्राध्यापक कुळकर्णी, यवतमाळचा आयुर्वेद कॉलेजचा विद्यार्थी विजय पोटफोड.े हे दोघंही वेगळ्याच कामानिमित्त वेगवेगळे पुण्यात आले होते. बातम्या वाचून मला भेटायला आले. त्यांनाही कामाला जुंपलं.

''20 कुंडल्यांच्या आधारे माणूस जिवंत आहे, की मृत आहे हे 95 टक्के अचूक सांगा आणि 1 लाखाचं पारितोषिक जिंका.'' या पद्धतीच्या आव्हानाच्या प्रती आत जाणार्‍या प्रत्येक ज्योतिष्याच्या हाती आम्ही देत होतो. त्यामुळं प्रचंड खळबळ माजली होती. वातावरण तापत होतं. तरी मी प्रत्येक सेशनला जमेल तसं आत जाऊन बसत होतो.

जन्मवेळेवरच्या परिसंवादाला सुरुवात झाली. सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बी. एन. पुरंदरे त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते. अनेक ज्योतिषी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे खास करून माझ्या नावानं शंख करतच बोलत होते.

''आजकाल हे ु ु ु ु ु लोक ज्योतिषशास्त्राबद्दल आक्षेप घेतात. त्यामुळं आपण जन्मवेळ अचूक पकडली पाहिजे. कधी कधी 1 मिनिटाची जरी चूक झाली तरी जन्मराशी बदलू शकते. त्यामुळं पत्रिका आणि सारं भविष्यच चुकू शकतं. माझं म्हणणं असं आहे की, ''जन्मणार्‍या बाळाचं मुंडकं बाहेर येताच, ती जन्मवेळ पकडावी. ही जन्मवेळ अचूक असेल,'' एका ज्योतिष्यानं आपलं मत मांडलं.

दुसर्‍यानं ते खोडलं, ''सामान्य बाळांसाठी हे ठीक आहे, पण काही बाळं पायाळू जन्मतात. त्यांचं मुंडकं शेवटी बाहेर येतं. मग कसं? म्हणून माझं म्हणणं असं आहे की, अख्खं मूल बाहेर आल्यानंतरच जन्मवेळ पकडावी, पण ती अचूक असावी.''

परिसंवाद सुरू राहिला. या दोन मुद्यांभोवती चर्चा फिरत राहिली. शेवटी अध्यक्ष डॉ. बी. एन. पुरंदरे बोलू लागले, ''या विषयावर बोलण्याचा मला सगळ्यात जास्त अधिकार आहे. कारण आजवर मी हजारो मुलांना जन्माला घातलं आहे. कधी कधी मूल जन्माला आल्यानंतर ते काहीच हालचाल करत नाही. मृत आहे की जिवंत आहे, शंका येते. मग आम्ही त्याला मसाज करतो, वेगवेगळे उपाय करतो. कधी कधी ते अनेक मिनिटांनंतर रडायला लागतं. तेव्हा खात्री पटते. ते जिवंत आहे. रडणं ही जिवंतपणाची खूण आहे. त्यामुळं मूल जन्माला आल्यानंतर जेव्हा रडतं तेव्हाची वेळ ही अचूक जन्मवेळ मानावी.''

माझी मात्र हसून हसून पुरेवाट होत होती. ती डॉक्टर, नर्स, सुईन मुलाला जन्म घालण्यात मश्गूल असताना सेकंदासेकंदानुसार अचूक वेळ पकडूच कशी शकेल? आणि हे तर म्हणतात की, मिनिटाची चूकसुद्धा चुकीची जन्म रास ठरवू शकते.

वध्र्याला एक शहाडेशास्त्री होता. त्याची मुलाखत घ्यायला मी गेलो. तो व्यवसायानं इंजिनिअर. तो सांगू लागला, ''अहो, पत्रकार साहेब (त्या वेळी त्याला मी माझं नाव सांगितलं नव्हतं) आमचे बाकी ज्योतिषी मूर्ख असतात. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसतो. आमच्या 'होराशास्त्रा' नुसार (हा ज्योतिष्याचा मूळ ग्रंथ) जन्मवेळ म्हणजे गर्भाधानाची वेळ पकडायची असते. मी गर्भाधानाची वेळ पकडतो.''

मी आश्चर्यानं स्तंभित झालो. 'गर्भाधान' म्हणजे 'मूल राहण्याची, बीज फलनाची वेळ.' नवरा-बायकोलाही गर्भाधानाची वेळ सांगता येणं शक्य नाही. कारण कोणत्या प्रणयप्रसंगी गर्भाधान झालं, ते कसं कळणार? महिन्यानंतरच गर्भ राहिला, ते कळतं ना?

''काहो, तुम्ही नवरा-बायकोवर पहारे बसवता का? गर्भाधान झालं ते कसं ओळखता?

छे! छे! सोप्पं आहे. पहारे बसविण्याची काय गरज? मूल जन्माला येतं त्या क्षणापासून मी बरोबर 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मिनिटं मागे जातो आणि ती वेळ अचूकपणे गर्भाधानाची वेळ पकडतो.''

मला हसावं की रडावं ते कळे ना? मुलांचा जन्म 8 व्या महिन्यापासून ते 10 व्या महिन्यापर्यंत केव्हाही होऊ शकतो आणि हे महोदय 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मि. घेऊन बसले आहेत.

ज्यांना अजून धड जन्मवेळ म्हणजे नेमकं काय ते ठरविता येत नाही, अशा ज्योतिष्यांच्या भाकितांवर आपण विश्वास ठेवायचा?

दर अठरा वर्षानंतर सिरॉस सायकलप्रमाणे मुहूर्त रिपीट होतो. याचा अर्थ प्रत्येकाच्या जन्मवेळेचा मुहूर्त केव्हा ना केव्हा रिपीट होणारचं.

किती सोप्पं काम. बायको प्रेग्नंट राहिली. गायनॅक डॉक्टरने संभाव्य डेट दिली की, सर्वप्रथम ज्योतिष्याला भेटून त्या डेटच्या आसपासचे महत्त्वाचे मुहूर्त शोधायचे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयींचा, दुपारी 4 वाजता नेहमी मंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांचा, रात्री 9 वाजता सदी का महानायक अमिताभचा. रात्री 12 वाजता सचिनचा.

झालं, डॉक्टराला रात्री 9 वाजताच्या मुहूर्तावर आतापासून बुक करायचं. बरोबर सिझेरियन करून त्या मुहूर्तावर मूल जन्माला घालायचं. झाला घरात सदी का महानायक अमिताभ बच्चनचा जन्म. हमखास नशीब असणारं मूल सचिन ते पंतप्रधान, केंद्रीय मंत्री जन्माला घालता येईल. आहे की नाही आयडिया? काय भंकस कल्पना आहे. हास्यास्पद वाटतं ना हे सारं?

मग जन्मवेळेनुसार आणि स्थानानुसार आपलं सारं आयुष्य ठरतं हे गृहीत पकडून सांगणारं ज्योतिष्यांचं भविष्यशास्त्रही एवढंच भंकस आणि हास्यास्पद आहे ना?

सिझेरियन नाही नॅचरल जन्मवेळ खरी, असा दावा काही ज्योतिषी करतात. आज शहरी जीवनात 30 ते 40 टक्के मुलं सिझेरियन करूनच जन्माला येतात. हे ज्योतिषी त्यांच्या कुंडल्या मांडत नाही? मांडतात ना? पोटापोण्यासाठी काहीही?

खरं म्हणजे फलज्योतिष हा विषय खूप मोठा. तुमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. या विषयावर अतिशय विस्तारानं एक पुस्तक लिहिलं आहे.''ज्योतिषशास्त्र-नशीब, किती खरं किती खोटं?'' मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक वा मानवी विकास प्रकाशनं प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तिका वाचा. सगळ्या शंका फिटून जातील.

स्वामी विवेकानंदांनीही ज्योतिष्याला कडाडून विरोध केला. राजाला भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्याचं मुंडकं पंतप्रधानानं उडविल्याची कथा ते आवर्जून सांगत असत.

95 टक्के अचूक भविष्य सांगा आणि 15 लाख घेऊन जा, हे आपलं आव्हान आजही कायम आहे.

माझ्यावर अजूनही विश्वास बसत नसेल तर अपघातात मेलेल्या एखाद्या तरुण मुलामुलीची पत्रिका ज्योतिष्याकडे घेऊन जा आणि हे स्थळ सांगून आलंय असं सांगा. त्या मेलेल्या व्यक्तीचं भविष्य ज्योतिषी कसं सांगतात ते अनुभवा. करून पाहणार?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक,संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

खरे लोकप्रतिनिधी मिळणार केव्हा?

  A A << Back to Headlines     
आमच्या देशातील निवडणूक पद्धतीतील कळीचा मुद्दा 'खर्‍या' लोकप्रतिनिधित्वाचा आहे. मतविभाजनामुळे अल्पमत घेणारा उमेदवार निवडला जातो, हा या पद्धतीतील मोठा दोष आहे. विद्यमान पद्धतीत जो सर्वात जास्त मते घेईल त्याला विजयी घोषित केले जाते. एका निवडणुकीत पाच उमेदवार उभे राहिले. चौघांनी 19-19 मते घेतली व एकाला 20 मते पडली. चार मते बाद झाली. अशा स्थितीत 74 टक्के लोकांनी ज्या उमेदवाराला मते दिली नाहीत व ज्याला केवळ 20 टक्के मते पडली तो निवडून आला असे घोषित केले जाते. त्याच्या हातात सगळा कारभार सोपविला जातो. अशी विचित्र स्थिती आज आहे. अल्पमतातील लोकांच्या हातात सत्ता देणे हे लोकशाहीला अपेक्षित नाही. गेल्या साठ वर्षात सत्ताधारी पक्षाने 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते कधीच घेतली नाहीत. याचा अर्थ असा की, आपल्या देशातील कारभार बहुमताने चालत नसून तो सर्वाधिक मताने चालतो. सर्वाधिक मतशाही म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही म्हणजे बहुमतशाही.

यावर उपाय नाही का? निश्चितच आहे. मतदानाची प्राधान्यक्रम

(प्रेफेन्शियल) पद्धत तुलनेने चांगली आहे. त्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येतो. प्रचलित सदोष पद्धत आपल्या देशात स्वीकारली गेली तेव्हाही अनेक देशांत यावर उपाय काढलेला होता व प्राधान्यक्रम

(प्रेफेन्शियल) पद्धत वापरली जात होती. आपल्या देशात या पद्धतीकडे काणाडोळा केला गेला. देश मोठा आहे, निरक्षरांची संख्या जास्त आहे. ही ठरलेली कारणे सांगण्यात आली. ही दोन्ही कारणे तकलादू आहेत. देशाचे स्वातंर्त्य लांबणीवर टाकण्यासाठीदेखील हीच कारणे सांगितली जात होती, तेव्हा म. गांधी म्हणाले होते, ''तुम्ही आमच्या पाठीवरून उतरा. पुढे कसे चालायचे ते आमचे आम्ही पाहू.'' निवडणुकीची पद्धत बदला. लोक आपोआप सरावतील. लोकांवर ठपका ठेवू नका. वर्तमान सदोष पद्धत तुमच्या फायद्याची आहे म्हणून ती तुम्ही लादली आहे असे स्पष्ट सांगा.

नोकरदारांची सोय बघूनच आपल्याकडे सर्व पद्धती ठरतात. निवडणूक पद्धतही त्याला अपवाद नाही. वर्तमान पद्धतीत मतदारांची सोय बघण्यात आलेली नाही. उदाहरणार्थ एकाच दिवसात मतदान उरकले पाहिजे, असा कार्यक्रम बनविला जातो. म्हणायला आम्ही मतदार राजे. मतदानाला या आणि रांगेत उभे राहा! या राजांचे नोकर कर्मचारी मात्र आरामात खुर्चीत बसून राहणार. मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असेल तर सरकारी कर्मचार्‍यांचा पगार चालू राहतो. बिगर सरकारी लोकांनी मात्र 'खाडा' करून रांगेत उभे राहायचे. रोजगार बुडवून मतदान करायचे. कामाचा खोळंबा करून घ्यायचा. एका दिवसाचे मतदान असल्यामुळे 'हवा' निर्माण करता येते. भावनेच्या प्रश्नांवर मतदान करून घेता येते. एक दिवस मतदानाऐवजी आठवडाभर मतदान ठेवले तर काय बिघडते? कर्मचार्‍यांना बसावे लागेल. ठीक आहे. त्याचा त्यांना पगार मिळतो. मतदार आपल्या सोयीने आठवडाभरात केव्हाही येऊन मतदान करून जातील. मतदाराला ताण पडणार नाही. मतदानाचे प्रमाण वाढेल. आठ दिवस 'हवा' टिकून राहणार नाही. मतदार शांतपणे विचार करून मतदान करतील. लोकशाही बळकट होईल. जगातील अनेक देशांत अनेक दिवस मतदान प्रक्रिया चालविली जाते. आपल्याकडेच का नाही? 'मतदान आठवडा' केला तर कमी मतदान केंद्रांवर काम भागू शकेल. कमी कर्मचारी म्हणजे कमी खर्चात निवडणुका पार पाडता येतील. मतदानाचा आठवडा केला तर प्राधान्यक्रम मतदान पद्धत कार्यान्वित करायला अजिबात अडचण येणार नाही. मतपेटय़ांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला जातो. ही मतदान केंद्रे सरकारी, निमसरकारी कचेर्‍या, ग्रामपंचायत, सोसायटीची कार्यालये येथे ठेवता येतील. ती इंटरनेटने जोडता येतील. तुम्ही कचेरीत तिजोरी ठेवताच ना. त्याची सुरक्षितता होऊ शकते तर मतपेटीची का होणार नाही. मुद्दा एवढाच आहे की, मतदारांच्या सोयी बघणार की पुढार्‍यांच्या आणि नोकरदारांच्या?

मतदारसंघांच्या बाबतीत केलेल्या गफलतीची मोठी किंमत देश मोजीत आहे, ही बाब कोणत्याही लोकसभेच्या कामकाजाचा तपशील वाचला की, आपल्या सहज लक्षात येते. इंग्लंडच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'च्या पद्धतीची मतदारसंघांची रचना आपण स्वीकारली. खरेतर, देश स्वतंत्र होताच आपण सगळे संस्थानिक खालसा केले. 'लॉर्ड्स'चा विषय संपला होता. दुर्दैवाने देशाची धोरणे ठरविणार्‍यांवर इंग्रजांचा एवढा पगडा होता की, त्यांची पद्धतच आमच्या नेत्यांनी आदर्श मानली व मतदारसंघ तयार केले. आपला मतदारसंघ हेच आपले क्षेत्र. देशात अन्यत्र काय व्हायचे तो होवो, माझा मतदारसंघ माझ्यासाठी साबित राहिला पाहिजे. ही भूमिका जन्माला आली. मतदारसंघातून निवडून येणार्‍याला देशात 'पोटा' कायदा असावा की नसावा? रिटेलच्या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक असावी की नसावी? नागालँडचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणता कायदा करायला हवा? अशा प्रश्नांशी काही देणे-घेणे राहिले नाही. मतदारसंघाच्या वर्तमानपद्धतीमुळे राष्ट्रीय वा राज्यस्तरीय प्रश्नांचे आकलन ठेवण्याची गरज उरली नाही. या प्रश्नांवर पक्षाचा आदेश प्रमाण मानावा, आपले मत देऊ नये, असा साळसूद संकेत तयार झाला.

संसद किंवा विधानसभेत कायदे तयार केले जातात. तेथे जाणार्‍या प्रतिनिधींचे आकलन राष्ट्रीय व राज्यस्तरीय असले पाहिजे. वर्तमान मतदारसंघाच्या रचनेमुळे असे प्रतिनिधी निवडून येणे वा विकसित होणे दुरपास्त आहे. देशाचा वा राज्याचा एक मतदारसंघ करून त्यातून तेवढे प्रतिनिधी निवडण्याची पद्धत आपण स्वीकारू शकतो का? याचाही विचार केला पाहिजे. देशाची सर्वोच्च सत्ता व्यापक आकलनाच्या दृष्टीने थिटी पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

चौथी सुधारणा 'राईट टू रिकॉल'ची करावी लागेल. 1975 साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील 'संपूर्ण क्रांती' आंदोलनातून 'राईट टू रिकॉल'ची मागणी पुढे आली. तिचा अण्णा हजारेंनी पुनरुच्चार केला व 'राईट टू रिजेक्ट'च्या मागणीवर भर दिला. मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी 'राईट टू रिकॉल'ची मागणी फेटाळताना 'देशाच्या सुरक्षेला घातक असल्यामुळे स्वीकारता येणार नाही' असे म्हटले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेदेखील 'राईट टू रिकॉल'ला अनुकूल नाहीत. त्यांनी कुरेशींच्या सुरात सूर मिसळला.

एखादा लोकप्रतिनिधी जनविरोधी वागत असेल तर त्याला परत खाली खेचण्याचा अधिकार जनतेला असला पाहिजे. आपल्या देशातील काही राज्यांमध्ये पंचायत राजमध्ये तो लागू करण्यात आला आहे. परंतु लोकसभा व विधानसभेसाठी तो जास्त गरजेचा असल्यामुळे तेथे लागू केला पाहिजे.

'खरे' लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी, इंग्लंडच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'च्या पद्धतीची मतदारसंघांची रचना बदलून, प्राधान्यक्रमानुसार मतदानपद्धती आणणे व मतदानप्रक्रियेचा कालावधी वाढविणे निकडीचे आहे. त्याचबरोबर 'राईट टू रिकॉल' चा अधिकार मतदारांना दिला पाहिजे. वरवरची मलमपट्टी करून आपल्या लोकशाहीचे दुखणे बरे होणार नाही हे यांना कधी कळेल?

(लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 94223931986

'बारोमास'च्या निमित्ताने


गेल्या आठवडय़ात सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' कादंबरीवरील हिंदी सिनेमाचा प्रीमियर शो नागपुरात झाला. या शोला लेखक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मंत्री, नेते, सामाजिक कार्यकत्र्यांची आवर्जून उपस्थिती होती. सदानंद देशमुख यांची 'बारोमास' ही कादंबरी शेतकरी जीवनाचे वास्तव मांडणारी व शेतकरी निखळपणे नायक असलेली मराठीतील पहिली कादंबरी. एरवी या देशातील कोणत्याही भाषेच्या साहित्यामध्ये शेतकरी हा नायक आढळत नाही. असलाच तर तो खलनायक असतो किंवा विनोदी पात्र बनून साहित्यात अवतरतो. गाव, शेती, शेतकरी यांचं साहित्यातील चित्रण व वास्तवता यांचा अर्थाअर्थी कधीच संबंध राहिला नाही. एकतर गावाचं नितांत सुंदर चित्रण साहित्यात रंगविलेले आहे. गाव कसं सुंदर. गावात झुळझुळ वाहणारी नदी. गावात गुण्यागोविंदाने राहणारी माणसं. गावाचा वारा किती सुंदर. गावची कांदा-भाकर वा.. वा किती गोड. गावातली झोपडी, त्यातून डायरेक्ट येणारा सूर्यप्रकाश वा चंद्रप्रकाश. गावचा गुराखी, त्याच्या हातातील बासरी म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचाच अवतार. आणि गाव तर जणू गोकुळच. सर्वत्र आबादी-आबाद किंवा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे गावाचे चित्रण. गावच्या गरिबीचे, दारिद्रय़ाचे, तिथल्या अभावाचेही उदात्तीकरण. कांदा, भाकर एक दिवस चवपालट म्हणून गोड असेल पण आयुष्यभर तीच खायची तर त्यात गोडी कशी असणार? हा प्रश्नही तथाकथित उच्चभ्रू, उच्चवर्णीय साहित्यिकाला पडला नाही. म्हणून त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडले नाही. दुसर्‍या प्रकारच्या साहित्यात गाव म्हणजे 'एक गाव बारा भानगडी.' ज्या काही भानगडी असतील त्या सर्व गावात. गावचा पाटील म्हणजे तर एक नंबरचा हलकट, अन्यायी, अत्याचारी, जुगारी, दारूडय़ा, स्त्रीलंपट. दिसेल त्या स्त्रीची अब्रू लुटणारा, काहीही कामधंदा नसलेला, मग्रूर, उद्धट, मुजोर, भांडखोर. असा गावचा पाटील तर आता आतापर्यंत मराठी साहित्यात व मराठी सिनेमाच्या पडद्यावर दाखविला जात होता. असा हा पाटील शहरी प्रेक्षक साहित्यात चवीने वाचत होता तर पडद्यावर मिटक्या मारत पहात होता. गावच्या माणसांचे असे हे विकृत चित्रणच साहित्यामध्ये भरभरून होते आणि आजही आहे. गावचा पाटील असो वा सरपंच हे तर हलकटच; पण गावच्या इतर माणसांना अक्कल कोठे? एकूण काय तर गावच्या गरिबीचे उदात्तीकरण करीत गाव किती सुंदर याचे चित्रण किंवा दुसर्‍या टोकाला जाऊन गाव, त्यातील माणसं कशी हलकट याचं चित्रण. या दोन्ही चित्रणामध्ये गाव, गावची शेती, शेतकरी, गावचे बारा बलुतेदार, त्यांची गरिबी, दैन्य-दारिद्रय़ यांचे वास्तव चित्रण अनेक वर्षे साहित्यामधून हद्दपारच होते. ते तसे हद्दपार का झाले किंवा का केले गेले हा खरंतर गंभीर चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे; पण कृषिप्रधान देशात त्यावर चिंताही नाही अथवा चिंतनही नाही हेच दुर्दैव आहे.

'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती'च्या गदारोळात शेतकर्‍यांचे दु:ख झाकून टाकल्या गेले. ज्या देशातल्या जमिनीत केवळ सोने, हिरे, मोतीच पिकतात, त्या देशातला जमिनीचा मालक असलेला शेतकरी श्रीमंतच असणार. त्याला ददात ती कशाची? मराठी कवितेत ज्वारीच्या कणसाला मोत्याचेच पीक येत असेल किंवा कणसाला चांदणेच लगडून येत असेल तर त्या शेतकर्‍यांना दु:ख कोणते असणार? त्यामुळे शेतकर्‍यांचे दु:ख कधी मांडल्याच गेले नाही. उलट 'मेरे देश की धरती सोना उगले उगेल हिरे मोती'च्या आवरणाखाली झाकल्या गेले किंवा ज्वारीला मोती लावून मारल्या गेले किंवा लगडलेल्या चांदण्यात लपविल्या गेले.

आदिवासी, शेतमजूर, भूमिहीन यांच्यावरील अन्याय-अत्याचाराचे चित्रण साहित्यात व सिनेमातही पडलेले दिसते. पण याबाबतीत साहित्यात व सिनेमात शेतकरीच कसा विस्मरणात गेला हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. 'दो बिघा जमिनी'चा मालक असेपर्यंत शेतकरी साहित्यासाठी 'नायक' ठरत नाही. पण हाच 'दो बिघा जमिनी'चा मालक शहरात येऊन रिक्षा चालवतो तेव्हा साहित्य आणि सिनेमात नायक बनतो असे का व्हावे? साहित्यात भूमिहीन, शेतमजूर, आदिवासी नायक आहे किंवा शेतकरी जमिनीवरून उखडून फेकल्या गेला, विस्थापित झाला. शहरात कामगार, हमाल, रिक्षाचालक बनला. खेडय़ातून शहरात झोपडपट्टीत आला तर तोच खेडय़ातून विस्थापित झालेला शेतकरी मात्र नायक बनतो. असे का झाले आणि का व्हावे?

सदानंद देशमुख लिखित 'बारोमास' ही कादंबरी मात्र याला अपवाद आहे. या कादंबरीत प्रथमच शेतकरी नायक म्हणून येतो. कादंबरीचा नायक एकनाथ, त्याचा आजा नानू आजा आणि वडील सुभानराव असा तीन पिढय़ांच्या पडझडीचा पट ही कादंबरी उलगडून दाखवते. हायब्रीड पीक येण्याआधीचा म्हणजेच हरितक्रांतीपूर्वीचा शेतकरी नायक एकनाथचा आजा आणि हरितक्रांतीनंतर शेती करणारे एकनाथचे वडील सुभानराव या दोन्हींचा साक्षीदार एकनाथ आहे.

'बारोमास' या कादंबरीतील नानू आज्याचा प्रश्न 'हे हाब्रीड तुमचंभी हाब्रीड करल एक दिवस. आरे पीक होते म्हंता बदबद. पण तो नुस्ता भपका. दिसायले देखावा. सम्द उत्पन्न खर्चातच आटून जाते. न तुमचं.दांडातलं पाणी दांडातच आटून जाते. वाफा कोल्डा फटांग. हे बर्कतीचं आस्त तं पैसा जाते कुठी तुमचा?'

हरितक्रांतीनंतर 'उत्पादन' वाढलं पण शेतकर्‍यांचं 'उत्पन्न' कमी झाल.ं यावर नेमका लेखक नानू आज्याच्या निमित्ताने बोट ठेवतो.

एका ठिकाणी एकनाथ म्हणतो, 'पण शेती पिकली तर भाव नसतात अन् भाव असतात तेव्हा शेतीच पिकत नाही.'

शेतकर्‍यांच्या वास्तव जगण्याचं इतकं जिवंत चित्रण 'बारोमास'मध्ये आलेलं आहे की त्याला तोड नाही. गाव, शेती, शेतकरी यावर लिहिले गेलेच नाही असेही नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणे एकतर ते, 'उगले हिरे मोती'च्या धर्तीवर तरी होतं किंवा ज्वारीचे कणीस मोत्याने व चांदण्याने लगडलेल्या प्रकारात मोडणारं साहित्य होतं. वास्तवापासून कोसो दूर असलेला साहित्यातला शेतकरी 'बारोमास'मध्ये वास्तवाच्या जवळ येतो हेच 'बारोमास'चे व बारोमासकार सदानंद देशमुख यांचे वेगळेपण.

गावातल्या शेतकर्‍याच्या दु:खाला गावातलाच कोणीतरी जबाबदार अशाप्रकारचंही चित्रण साहित्यात आढळतं. नायक समजा शेतकरी असलाच तर खलनायक सावकार, सरपंच, पाटील किंवा जमीनदार. भूमिहीन, आदिवासी, शेतमजूर नायक असला तर खलनायक शेतकरी. म्हणजे गावातल्या दु:ख, दैन्य, दारिद्रय़ाला जबाबदार जर कोणी असेल तर गावातलाच. पण 'बारोमास'मध्ये शेतकरी नायक असला तरी खलनायक म्हणून 'परिस्थिती' प्रामुख्याने समोर येते. इथे माणसं दुष्टाव्याने वागत असली तरीही ती परिस्थितीच्या अगतिक व असहाय्यतेतून ती तशी वागतात, हे स्पष्ट होते आणि हळूहळू शेतकरी, त्याची दुरवस्था, त्याच्या संसाराचे तानेबाणे, सरकारी धोरणांशी निगडित शेतकरी शोषणाचे धागेदोरे हळूवारपणे 'बारोमास'मध्ये उलगडत जातात.

निखळ शेतकरी नायक असलेली 'बारोमास' कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा वर्षभरात त्याच्या केवळ बावीस प्रतीच खपल्या. परिस्थिती अशीच राहिली असती तर 'बारोमास'मध्ये आत्महत्या करणारे एकनाथचे वडील सुभानराव यांच्यासारखीच पाळी लेखक व प्रकाशकांवर आली असती. पण नशीब शेतकर्‍याचे की तो नायक असलेल्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि ही कादंबरी प्रकाशझोतात आली. पुढे तर या कादंबरीने इतिहासच घडवला. शेतकरी जीवनावरचे इतके दाहक, वास्तववादी चित्रण साहित्यात अन्यत्र आढळत नाही ही कबुली नंतर नाक मुरडत का होईना अनेकांनी दिली. सदानंद देशमुखांनी 'बारोमास' या कादंबरीत नायक म्हणून रंगविलेला 'शेतकरी' आता प्रत्यक्ष सिनेमाच्या पडद्यावर 'नायक' म्हणून वावरणार आहे. साहित्यात नायक म्हणून आलेला शेतकरी, सिनेमाच्या पडद्यावर नायक म्हणून वावरणारा शेतकरी प्रत्यक्ष समाजजीवनात नायक म्हणून कधी व केव्हा स्वीकारल्या जाईल? स्वीकारल्या जाईल अथवा नाही? हाच प्रश्न 'बारोमास' सिनेमाच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने माझ्या मनात वारंवार उसळी मारतो आहे हेही तेवढंच खर.ं

(लेखक चंद्रकांत वानखडे शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

..जरा हसा रे देवांनो!


कायदे का केले जातात? माणसाला शिस्त लावावी म्हणून!

निसर्गाचे कायदे वेगळे. माणसाचे कायदे वेगळे. निसर्गाचे नियम अनिवार्य असतात. ते तोडले की, त्याचे परिणाम आज ना उद्या आपल्याला भोगावेच लागतात. पण माणसानं तयार केलेल्या नियमांचं मात्र तसं नाही. माणसाचा कायदा तोडणार्‍या प्रत्येकाला सारखीच सजा होईल याची काही गॅरंटी नाही. कित्येकदा सजा होईल की नाही, याबाबतही काही सांगता येत नाही! आणि म्हणूनच मानवनिर्मित कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. माणूस पाहून कायद्याचा अर्थही बदलतो. मोठी माणसं मग कायदा वेठीस धरतात. सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास हळूहळू उडत जातो.

मुक्या माणसाचा कुणी शोक केला

बिचाराच होता, बिचाराच मेला!

पुन्हा मुंबईला निघाला 'सुदामा'

पुन्हा 'रेंज' बाहेर 'श्रीकृष्ण' गेला!

दुधासाठी त्याला हवी गाय होती

दिला 'रुक्मिणी'ने सुदामास हेला!

सामान्य माणसं बोलत नाहीत, त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. पण सज्जन असलेली मोठी माणसंही बोलत नाही. आणि जो बोलत नाही, त्याचा माल खपत नाही. त्याचं कुणी ऐकतही नाही.

द्रोणाचार्य कौरवांचे गुरू होते. पांडवांचेही गुरू होते. पण राजगुरू असूनही त्यांच्या मुलाला प्यायला दूधसुद्धा मिळत नव्हतं. त्यांची बायको कणकेचं पाणी करून मुलाला पाजायची. राजसत्तेला हे कळत नव्हतं का? त्यांनी आपल्या गुरूंचीही का म्हणून अवहेलना करावी? त्यांच्या घरी काय चाललंय, मुलाबाळांची काय अवस्था आहे, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, असा साधा विचारही त्यांच्या मनात का येऊ नये? जिथं गुरूंचीच अशी अवस्था तिथं सामान्य जनतेची काळजी करायला राजसत्तेला वेळचं कुठं असणार?

गुरू कधी मागत नसतात आणि खुर्चीवर बसलेले चेले कधीही त्यांचा विचार करीत नसतात. पूर्वीही तसंच होतं. आताही तसंच आहे. पण मग असंच असेल, गुरू खरंच नि:स्वार्थ, निरपेक्ष असतील तर मग त्यांनी एकलव्याला मात्र उजव्या हाताचा अंगठा कापून मागावा, याचं काय कारण?

तर राजकीय सत्तेचा दबाव! सर्वसामान्यानं पुढं जाऊ नये.. म्हणून राजसत्तेचा दबाव द्रोणाचार्यांवर होता. त्या ठिकाणी 'गुरू' म्हणून जो 'करारीपणा' त्यांनी दाखवायला हवा होता तो त्यांना दाखविता आला नाही. तेही शेवटी राजसत्तेलाच अप्रत्यक्षपणे शरण गेलेत. त्यांनीही लाचारी पत्करली. म्हणूनच एकलव्याचा अंगठा गेला. कौरवांच्या बाजूने माना खाली घालून द्रोणाचार्य-भीष्माचार्य लाचारीने लढले. लढत राहिले.

भीष्माचार्य म्हणो काही

कधी असे घडू नये

कौरवांच्या राज्यासाठी

अजरुनाने लढू नये!

हल्ली मात्र सर्वत्र सेटिंग चालते. कोण कुणाचा विरोधक हेच कळत नाही. वरवर सार्‍या मारामार्‍या चाललेल्या असतात. आतून मात्र सारं मॅचफिक्सिंग! प्रत्येकाचं आपलं वेगवेगळं गणित. जो तो आपला 'गेम' जगण्याच्या संधीसाठी टपून बसलेला.

एकदा,

एका माणसानं

चुकून दगडाला सलाम केला

दगडानं तेवढीच संधी घेतली.

आपण दगडाचा देव झाला

आणि..

माणसाला कायमचा गुलाम केला!

ही आमची गुलामी अजूनही संपलेली नाही. संपण्याची चिन्हही दिसत नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढतानाच दिसते. देवाधर्माच्या नावाचा वापर करीत मोठमोठी युद्ध-महायुद्धे लादली गेली आहेत. आजही तेच प्रकार सुरू आहेत.

या इकडे अन् माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो!

ही धर्माची लफडी सोडा, जरा हसा रे देवांनो!

मंदिर-मस्जीद करता करता, माणूस पागल झाला

हृदयी त्याच्या तुम्ही एकदा, जरा धसा रे देवांनो!

कुणी ओढतो रेष मधे अन् देश वेगळा होतो

त्या रेषेचे धाय मनातून जरा पुसा रे देवांनो!

इथला सैनिक, तिथला दुश्मन, अर्थ बदलतो सारा

रंगासोबत न्याय बदलतो, असा कसा रे देवांनो!

'तो' येण्याची पुन्हा नव्याने, बोंब कशाला मारू

सांगून सांगून थकला माझा, खुळा घसा रे देवांनो!

माणूस इतका इब्लिस कैसा, मला कळेना देवा..

काय घेतला तुमच्या पासून खरा वसा रे देवांनो!

ज्याचा त्याचा देव त्याच्या त्याच्या मनाप्रमाणे. इच्छेप्रमाणे असतो. देवांची निर्मिती हीच मुळी माणसाच्या डोक्यातून झालेली. त्यामुळे लोकांनी सोयीचे देव तयार केलेत. नंतरच्या पिढय़ांनी त्यातले आपापल्या सोयीने स्वीकारले. त्यांचे पोवाडे गाणे सुरू झाले. आरत्या झाल्या आणि माणसाने निर्माण केलेला देव त्याच्याच उरावर बसला!

पण माणूसही वस्ताद. दगडातला देवही वस्ताद.

हा आपला हेका सोडत नाही. देव आपली जागा सोडत नाही. साध्याभोळ्य़ा लोकांचं यात विनाकारणच मरण होतंय.

पत्थरांच्या देवतांचे हे थवे कोठून आले

आधीचे तेहेतीस कोटी, हे नवे कोठून आले!

आता माणूस तर सुधारत नाही, देवांनाच काही सांगायला हवं..!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

घरानं या म्हनावं !


जेघर घर्र घर्र करते त्याच्या इतकं दुख नाई आन् जे घर कवटय़ात घेते त्याच्या इतकं सुख नाई, असं आमचा रघू म्हन्ते. त्याचे डायलाग असेचं अस्ते. म्या त्याले म्हनलं,''तू का मुंबईले गेला आन् टीव्ही सीरियलसाठी डायलाग लेयले तं तुले कमाई होईन आन् नावयी.'' त्याच्यावर तो म्हने,''बाबा, फुरसद कुठी हाय?'' म्या म्हनलं,''तुले कामचं काय हाय?'' त्याच्यावर तो म्हने,''कामं नसनं हेयी एक कामचं असते ना बाबा?'' खरं तं त्याच्या तोंडाले लागाले पुरत नाई, पन तो माह्यासाठी कामाचा यासाठी हाय का बोलता बोलता तो आपल्याले असा इसय देऊन टाकते. आपलं घर, नातेवाईकाचे घरं आन् दोस्तायचे घर हे सारं आपन अनुभवत असतो कानी? एकडाव वध्रेच्या दाते स्मृती व्याख्यानमालेत नाटककार सतीस पावडेनं माही मुलाकात घेतानी इचारलं होत का,''या कवितेनं तुम्हाला काय दिलं?'' तवा म्या सांगतलं होतं का,''जर या कविता मला महाराष्ट्रातील अशी अनेक घरं देत असेल की, ज्या घरी मी माझ्या घरासारखा जाऊ शकतो तर यापेक्षा कवितेने मला काय द्यावे?''

गेल्या चायीस वर्सात बस्स मी हाच अनुभव घेत हातो. एकचं घर भेटता भेटत नसतानी इतके घरं बलावतं असतीनं तं यापरीस काय पाह्यजे? नातेवाइकाच्या घरी आपन नात्याच्या हिसोबानं जात असतो, पन कवितेच्यानं झालेल्या दोस्तायच्या घराचे दाठ्ठे जवा आपली वाट पाह्यते तवा आपन करोडपती झाल्याची खुसी होते. अहमदनगरच्या अ.भा. साहित्य संमेलनात वालचंदनगरचे कथाकार बा. ग. केसकर यायची ओयख झाली. मंग त्यायनं मले त्यायच्या शयरात कार्यकरमाले बलावलं, तवा फोनवर असं सांगतलं का,''आमच्या कारखान्याचे गेस्टहाऊस आहेच, पण मित्र म्हणून तुम्ही घरी उतरल्यास आम्हा उभयतास आनंद होईल.'' मी घरीच गेलो आन् एक नवीन घर भेटल्याची खुसी झाली. त्या बास्ता मी सातेक खेपा तिथं गेलो, पन मुक्काम त्यायच्याकडं. आलेल्या पावन्यावर्त जीव कसा लावावा हे सिकावं तं त्यायच्याकून. इतकुसायी परकेपना वाटनार नाई, असं त्यायचं एकजीव होनं. जाखल्याचे आप्पासायेब खोत परसिद्द कथाकार. त्यायच्या काई कथा अभ्यासक्रमात हायेत. त्यायनं तिकडं माहे चार-पाच कार्यकरम लागोपाठ ठुले आन् आखरीचा कार्यकरम त्यायच्या कालेजवर ठेवून मंग घरी घेऊन गेले. सार्‍यायच्या चेयर्‍यावरची खुसी आन् वागनं पाहून असं वाटतचं नोतं का मी पह्यल्यांदा आलो हावो म्हून. मंगयवेढय़ाचे प्रा. सुरेश शिंदे यायनं मले तिथच्या बँकेच्या व्याख्यानमालेत पह्यल्यांदा बलावलं तवा दुसर्‍या दिसी जवा घरी घेऊन गेले तं मले सुखद धक्का बसला का, मी त्यायच्या घरी जाच्या आंधीचं माही 'सगून' कविता त्यायच्या घरी पोचली होती. ते सोता चांगले कवी हायेत, पन दोस्ताच्या कवितेवरती ते किती पिरेम करतात हे मले तवा ध्यानात आलं. आटपाडी जि. सांगली इथं तवा कालेजवर्त डॉ. प्रा. सयाजीराजे मोकाशी होते. त्यायनं त्यायच्या कालेजवर मले कार्यकरमासाठी बलावलं म्हून पंढरपूरले मुक्काम करून मी तिथं पोचलो. सकायी दहाचा कार्यकरम बारा पावतर अटपला. मंग दोयपारचं जेवन अटपल्यावर्त वापेस निघता आलं अस्त, पन ते म्हनले,''सर, आईबाबांना भेटायला गावी जाऊ आणि उद्या सकाळी तुम्हाला रवाना करतो, आज मुक्कामी घरी.'' ते मले शेटफळे या त्यायच्या गावी घेऊन गेले. राती चुलीवरच्या सयपाकाचं जेवन मले पार लहानपनात घेऊन गेलं. घरच्या म्हसीच्या दुधाले गरम करून केलेल्या सेवया तोंडात टाकतानी मले माय आठोली. तिच्या हातच्या सेवया बस्स अस्याचं लागे. राती झपासाठी आथरलेल्या गादीवर आंग टाकलं, पन झप तं जसी गावाले गेली त्या चवीच्यानं. अखीन माय आठोली. म्हनलं,''माय तुही चव इथ पावतर? का हरेक मायच्या हातच्या सेवयाले सारखीचं मायची चव असते! शेटफयले राह्यलो थोडाचं निरा रातभर, पन खूप काई घेऊन आलो.''

या आठोनीनं वालचंदनगरची जुनी आठोन आठोली. एक डाव केसकरासंग त्यायनं बलावलेल्या गाडीनं आमी दोघ नातेपुतेच्या कविसंमेलनासाठी गेलो. वापेस येतानी नारायन सुमंत हा कविमित्र दुसर्‍या दिसी वालचंदनगरच्या पलीकडं कविसंमेलन हाय म्हून आमच्या संग आला. त्या गोठी आयकून वयनीले वाटलं, मी उद्या त्यायच्या संग जानार हावो. पन मी तिथं जानार नोतो तं यवतमायले वापेस येनार होतो म्हून मी सकायी उठून तयारीले लागलो. त्या घराचा भूगोल मले पाठ असल्यानं कोनाले काई इचारा ना लागे. माही तयारी झाल्यावर सयपाक घरात च्या करत असलेल्या वयनीले मी निंघनार हावो हे सांगाले गेलो तं त्या म्हने,''तुम्ही कविसंमेलनासाठी थांबणार आहा ना?'' म्हनलं,''नाही वहिनी, मी यवतमाळसाठी निघत आहे.'' हे आयकल्यावर्त त्यायचा चेयरा असा पडला जसं त्यायचचं काई चुकलं हाय. त्या म्हने,''मला कल्पना तं द्यायची. इतक्या लांबचा प्रवास आणि तुम्ही असे जाणार कसं वाटतं?'' माही पंदरा ईस मिन्टानं गाडी होती. मी कुर्सीवर येऊन बसतं नाई तं त्यायनं झालेला च्या कपभर आन् खारीची पिलेट आनून ठुली. त्यायचं चित थार्‍यावर नाई हे लपत नोतं. काई करन्या इतका टाईम नोता आन् तसं जाऊ द्याले त्यायचं मन तयार नोतं. त्यायले राहावलं नाई म्हून इचारलं, ''एक विचारू? घरच्या सारखे आहात म्हणून विचारते. रात्रीची भाकर आहे ती बांधून दिली तर चालेल?'' म्या म्हनलं,''राहू द्याना वहिनी.'' त्याच्यावर त्या,''कसं राहू द्यायचं? लातूरपर्यंत जेवायची वेळ होईल. सोबत डबा असला तर आधार असतो. कसं घरून निघाल्या सारखं वाटतं. देऊ?'' म्हनलं,''द्या.''

लातूरले दोयपारी पोचत नाईतं स्टँडच्या बाजूच्या हटेलात गेलो. सामोरच्या टेबलावर्त आनलेली शिदोरी सोडली. भाकरीच्यावर्त तेलात मिसयून चोपडलेली चटनी तिच्या वासानं भूक अखीनचं चेतली. संग देल्लीली प्लॅस्टिकची डब्बी उघडून पाह्यलीतं त्याच्यात आंब्याचं रायतं. राहावलं नाई म्हून त्या डबीत बोट घालून चाटलं तं त्या घरी केलेल्या रायत्याची चव पोटभर पसरली. ते भाकर खातानी आखीन माय आठोली. म्हनलं, मायच्यावानी पिरेम करनार्‍या या सार्‍यायच्या हाताले सारकीचं चव असते का लेक ? उठतानी आठोलं का आल्याबराबर सांगतलेली दालफ्राय तसीचं थंडी झाली होती.

काई घरं इतके पॉश असतेत का बाहेरून लय सुदे दिसतेत, पन आतनी जाव तं जीव गुदमरते. असं वाट्टे कवा बाहेर जाले भेट्टे आन् काई घरं इतके सादेसुदे असतेतं, पन इतकी ऊर्जा अस्ते त्या घरात का काई इचारू नोका. पह्यल्यांदा येऊनयी असं वाट्टे आपन लय डाव इथं येऊन गेलो. तस्या घरात काय जादू असते काय मालूम. तुमी मनानं सारे दोस्ताचे घरं तिकडचेचं सांगतले, वर्‍हाडात कोनी नाईत का? इथं इतके घरं हायेत का लेयतो म्हनलं तर अख्खी 'पुण्य नगरी' नाई पुरनार! तरी तुमचा मान राखासाठी माहे ज्येष्ठ मित्र जे मुयचे वाशीमचे, पन आता पुन्याला राह्यतेतं ते सुभासभाऊ राठी वाशीम अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष. वाशीमले कार्यकरमात भेट झाल्यावर म्हनेत,''तिकडे कधी आले तर कळवा.'' कवीले एवढं आवतन भेटल्यावर्त तो सोडते का?'' दोन मयन्यानं सांगली जिल्ह्यातल्या बोरगावले कार्यकरम ठरला म्हून यायले फोन लावला ते म्हनेत, ''बोरगावची तारीख कोणती?'' म्हनलं,''दोन'' तं ते म्हने,''एक ' आम्हाला द्या आन् घरी या.'' एक तारकेले फोन करून सकायी 5 वाजता खालीवर होनार्‍या झोक्यानं वरतं गेलो तं हे दोघे दाठ्ठय़ात उभे स्वागताले. मी थंडागार. माही राहाची येवस्था त्यायच्या घरी आन् घराले हॉल एवढा मोठा का कार्यकरम तिथचं. मले समजे नाई का आपन पुन्याले हावो का वासिमले. सुभासभाऊच्या कल्पकतेले सलाम करा लागला. त्यायनं वर्‍हाडातून येऊन तिथं स्थायिक झालेले जे जिवलग त्या सार्‍यायले एवढचं आवतन का, ''ना विसरता सायंकाळी सात वाजता जोडप्यानं घरी या, एक सरप्राईस आहे.'' वर्‍हाडातले सत्तरअश्शी जोडपे आले आन् एक अनोखा कार्यकरम झाला. हासता हासता ते आपपल्या गावाले कवा पोचले त्यायले समजलं नाई. सदाई आठोनीत राईन असा अनुभव. कार्यकरमाच्या बिछायतीपासून सारी येवस्था लावून घेन आन् पावन्याच्या पोटाची सोय पाह्यनं त्यासाठी सारी धावपय वयनीची. पावन्याच्या हिमतीले त्या कस्या कमी पडतीनं. त्यायचं माहेर वर्‍हाडातलं ना! सारे निघून गेल्यावर्त आमी तिघं बसलो. म्या म्हनलं, ''तुम्हाला खूप दगदग झाली.'' त्याच्यावर ते म्हनेत,''आपली मानसं आनंद घेऊन गेले, यापुढे दगदग ती काय? तुम्ही भाऊच्या शब्दावर आला हा आमचा आनंद.'' दुसर्‍या दिसी सकायी त्यायच्याकून निघताना वयनी बोलल्या,''आता कधी पुण्यात आला तर हे आपलं घर आहे हे विसरू नका.'' त्याच्यावर्त म्या म्हनलं, ''वयनी, तुमी म्हनलं हे दुधात साखरं, पन तुमचं घरचं जानार्‍या पावन्याले 'ये' म्हन्ते.''

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

'विश्वनिर्मिती'बाबतचे दोन्ही प्रवाह जाणणे आवश्यक


याविश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली, या प्रश्नांचा वेध विज्ञान घेत नाही. हे विश्व कसे निर्माण झाले व त्यातील पदार्थाच्या/ऊर्जेच्या विशिष्ट स्थिती व हालचालींमागे कोणते नियम/सूत्र दडले असतात हे शोधण्याचे कार्य विज्ञान करते. प्रत्येक शास्त्राने स्वत:भोवती एक मर्यादा आखून घेतली असते आणि त्या मर्यादेमुळेच संशोधनात शिस्त बाळगून नेमक्या दिशेने वाटचाल करता येते. असे असले तरी आपापल्या विषयातील काही गूढ समस्यांची उकल होण्यासाठी इतर विषयांच्या साहाय्याने संशोधन करणे भाग पडते. जसे- पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांना एकमेकांच्या व गणिताच्या मदतीची गरज नित्य भासते. त्याचप्रमाणे जीवशास्त्राला (इळेश्रेस)देखील पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) मदत घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. सृष्टीचे अधिक गुंतागुंतीचे व्यवहार शोधण्यासाठी नवनव्या विज्ञानशाखादेखील उघडण्यात आल्या आहेत.. विश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? आमच्या जीवनाचे प्रयोजन काय? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या शास्त्राला 'तत्त्वज्ञान' म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक विचारांचा जो शिरकाव आहे त्याला तूर्त बाजूला ठेवून आपण या विश्वाच्या व जीवनाच्या प्रयोजनाबाबत केवळ दोन परस्पर विरुद्ध प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ते दोन मतप्रवाह 'भौतिकवाद' व 'अध्यात्मवाद' या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही विचारसरणींना पुन्हा अनेकानेक शाखाही फुटलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या बुद्धीला व अंत:करणाला बर्‍याचअंशी समाधान प्राप्त करून देणार्‍या शाखांमधील उत्तम व उन्नत अंश एकत्रित करून आपण प्रथम भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा विचार करू. भौतिकवाद असे मानतो, की या सृष्टीच्या मुळाशी कोणतीही चैतन्यमय, ज्ञानयुक्त शक्ती नसून केवळ जडपदार्थ/ऊर्जा आहे. प्राण, मन, बुद्धी हे तत्त्व जडातूनच विकसित झाले असून पदार्थमय भौतिक देहाच्या बाहेर त्यांचे वेगळे अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीत ईश्वर अथवा आत्म्याचे तर मुळीच अस्तित्व नाही. मृत्यूनंतर सर्व प्राण्यांचे अस्तित्व संपते. पुनर्जन्माच्या कल्पनेला कोणताही आधार नाही. सृष्टीचे संचालन तिच्या पदार्थाच्या अंगभूत गतितत्त्वांनी व नियमांनी होते. बाहेरून सृष्टीचे नियमन वा विकास करणारी शक्ती कोणतीही नाही. जडपदार्थातून पृथ्वीवर जीवन उगवले ते पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे व येथील वातावरणामुळे. तसेच प्रतिकूल पर्यावरणाशी झुंजत झुंजत इथे प्राण्यांचे अनेकानेक प्रकारचे देह घडत गेले व स्वाभाविकपणे त्यापैकी काही प्राणिजातींमध्ये मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला. मनाशी व बुद्धीशी संबंधित प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असतात. मानवाचा मेंदू सर्वांत मोठा असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत भावभावना, कल्पकता व बुद्धी अधिक आहे.

मनुष्येतर प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान नसते. त्यांच्या सर्व प्रेरणा उपजत व नैसर्गिक असतात. त्यामुळे ते सर्व प्राणी निसर्गाचाच एक अभिन्न भाग असल्यासारखे जगतात. त्यांच्यात व बाह्य सृष्टीत आंतरिक एकत्व असते. परंतु मानवामध्ये मन, बुद्धीच्या विकासाने एक वेगळाच टप्पा गाठला. मी व बाह्य जग या वेगवेगळ्या वस्तू आहेत असे भान मानवाला त्याच्या आदिम अवस्थेपासून प्रकर्षाने आले. बाह्य जग सुंदर, कृपाळू आहे. तसेच ते प्रसंगी हिंस्र व क्रूरही वागत असल्याचा नित्य अनुभव मानवाला येतो. आईच्या गर्भात एकत्वाची अनुभूती घेत पहुडलेले बालक जसे बाहेर येताच असुरक्षित वाटून भयभीत होते असे काहीसे निसर्गापासून तुटल्याच्या जाणिवेने मानवाचे झाले. त्याला हे वेगळेपण नकोसे वाटते. त्यामुळे तो एका विश्वव्यापी ईश्वराची कल्पना करून त्याच्याशी तादात्म्य साधू पाहतो. आपल्या एकाकीपणावर व दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्या काल्पनिक विश्वेश्वराची भक्ती हा चांगला उपाय त्याला वाटतो.. शिवाय वादळवारे, अतिवृष्टी, वणवा, भूकंप, ज्वालामुखींचे स्फोट, पूर यांसारखे निसर्गाचे रौद्ररूप आणि इंद्रियांना सुखावणारे लोभस रूप अशी दोन्ही रूपे न्याहाळताना प्रत्येक प्राकृतिक शक्तीचे नियंत्रण करणारी एखादी देवता असावी व त्या देवतेचा रोष झाल्याने नैसर्गिक संकटे येत असावी अशीही आदिमानवाची समजूत झाली. त्यामुळे 'मरुत', 'वरुण', 'सूर्य', 'अग्नी', 'इंद्र' अशा देवता विविध नैसर्गिक शक्तींच्या कारक असल्याचे कल्पून यज्ञासारख्या विधीने त्या देवतांना आवाहन करणे व आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंची आहुती देऊन त्या देवतांना प्रसन्न करून घेणे अशासारखे उपाय मनुष्य करू लागला. ईश्वराचे अथवा देवतांचे अस्तित्व कल्पून त्यांची पूजा करणे, भक्ती करणे ही मानवीमनाची वरील कारणांमुळे गरज होती. प्रतिकूल सृष्टीत जिवंत राहण्यासाठी या कल्पनेने त्याला भक्कम आधार दिला. या सृष्टीत शाश्वत असे काही असेल, तर ती केवळ भौतिक पदार्थमय ऊर्जा होय. जीवन अशाश्वत असते. जीवनापूर्वी व मृत्यूनंतर प्राण्यांचे कोणतेही अस्तित्व नसते. 'आत्मा-परमात्मा' नावाची कोणतीही वस्तू व शक्ती नाही. सृष्टीचा कोणी निर्माता नाही. असा कोणी निर्माता असता, तर ब्रह्मंडात व पृथ्वीवरसुद्धा जी अतिशय उधळमाधळ आढळून येते तशी ती राहिली नसती. 'उत्क्रांती' ही एका सरळरेषेत व्यवस्थितपणे आखीव स्वरूपात झाली असती. पृथ्वीवरची निसर्गाची एकूण उत्क्रांती ही झोकांडय़ा खात, चाचपडत, धडपडत, चुकतमाकत, आंधळ्याने वाट शोधावी तशी झालेली दिसते. ईश्वराला जीवनाचा विकास जर सृष्टीत करावयाचा होता, तर हे कोटय़वधी ग्रहतारे बहुतांश जीवरहितच दिसतात. आपल्या सूर्यमालेत तर फक्त पृथ्वीवरच जीवन उमलल्याचे दिसते. शिवाय जीवन कष्टमय, यातनादायी आहे. भोवतालचे पर्यावरण हे जीवनास पोषक कमी व मारकच जास्त आहे. शिवाय क्रौर्य, हिंसा, दुष्टावा, मत्सर, दारिद्रय़, शोषण या बाबी ईश्वराने का निर्माण कराव्यात? तो परपीडनात आनंद घेणारा ीरवळीं आहे काय?

ईश्वर, आत्मा, परमात्मा, देवदेवता यांच्या असण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भ्रामक शक्तींवर विश्वास ठेवून मनुष्य हतबल व परावलंबी होतो. जी शक्ती अस्तित्वातच नाही ती आपले साहाय्य कशी करणार? कोणत्याही अतिभौतिक शक्तीच्या असण्यावर विश्वास ठेवणे व आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा शक्तीच्या साहाय्याची याचना करणे म्हणजे अंधश्रद्धेपायी आत्मवंचना करून स्वसामर्थ्य गमावून बसणे होय.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

विवाहसोहळे साधेपणाने का होत नाहीत?


एका प्रसिद्ध शहरातल्या बायपास रोडवर सध्या मी राहतो. मला तिथे ना कुरिअरचे पत्र मिळते ना भारत सरकारचे टपाल. एकापरीने माझे वास्तव्य सध्या गावकुसाबाहेरच्या वस्तीत आहे, असेच म्हणता येईल. त्यामुळे जगाशी संपर्क साधण्याचे माझे एकमेव साधन म्हणजे माझा सेलफोन. सुमारे 67 वर्षापूर्वी मी हे घर स्वत:हून घेतले. मनात हेतू एवढाच होता, की लिहिण्यावाचण्यासाठी शांत वातावरण मिळावे. पण हा हेतू अवघ्या पाचसहा वर्षात पार विफल झाला.

हा बायपास म्हणजे सुमारे 80 फुटांचा आणि गावाशेजारून सरळ 5 ते 6 किलोमीटर जाणारा. त्यामुळे 56 वर्षात या रस्त्यावर 25 ते 30 मंगल कार्यालये झाली. त्यातलं कुठलंही मंगल कार्यालय किमान 25 ते 30 हजार रुपये भाडय़ापेक्षा कमी भाडे असणारे नाही. शिवाय 80 फुटी रस्ता म्हणजे हक्काची बिनभाडय़ाची पार्किगची जागा. त्यामुळे या रस्त्यावर आता 3-4 महिने शांततेचे सोडून दिले तर लग्नकार्याची भरपूर वर्दळ असते. ऐन लग्नाच्या मोसमात डीजेची धूम, रस्त्यातल्या वराती, वाहनांची वर्दळ, लग्नानंतरचे दारूकाम आणि बायपासवरून वेगाने धावणार्‍या ट्रक्सचे आवाज यांमुळे आमचा हा भाग खूपच गजबजून गेला आहे. ध्वनिप्रदूषण म्हणजे काय त्याचा मी रोजच नव्याने अनुभव घेतो आहे. हे सर्व माझ्याच शहरात आहे असे नाही. ज्या ज्या शहरात असे बायपास निर्माण झाले त्या प्रत्येक शहराची हीच अवस्था आहे.

काही दिवसांपूर्वी मात्र मला एक अतिशय सुखद अनुभव आला. माझी मुलगी या रस्त्यापासून बर्‍याच अंतरावर असलेल्या एका वस्तीत राहते. तिथे मजुरांचीही घरे अतिशय विरळ आहेत. त्यातल्याच एका मजुराच्या घरी लग्न होतं. 11 वाजेपर्यंत तिथे काही मंगलकार्य आहे याची खूणही नव्हती. पण 11 वाजता एक लहानसा मंडप तिथे आला. बारा वाजेपर्यंत 50-60 वर्‍हाडी जमा झाले. टाळ्य़ांच्या गजरात वधूवरांवर पुष्पवृष्टी झाली आणि पाच वाजेपर्यंत तिथे लग्न होते याची एकही खूण शिल्लक राहिली नाही. मी माझ्याच कुटुंबातले असेच एक अत्यंत आटोपशीर लग्न केले होते याची मला आठवण झाली. पण मी माझ्या मुलीच्या लग्नात मात्र इतका साधेपणा पाळू शकलो नाही. माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे मीही थोडा गाजावाजा करीत आणि थाटामाटानेच लग्न केले. लग्न आपापल्या कुवतीनुसार थाटामाटातच करावे असे भारतीय माणसाला का वाटते?

खरेतर भारतीय व्यवस्थेत लग्न हा संस्कार आहे. इथे संस्कार म्हणजे असा विधी ज्या विधीनंतर आपल्या मनाच्या निर्णयशक्तीत आमूलाग्र बदल होतो. हा बदल आपण स्वेच्छेने पत्करतो. एकदोन दिवसांपूर्वी परस्परांना ज्यांनी कधीच पाहिले नाही असे तरुणतरुणी या विधीनंतर परस्परांना शारीरिक संबंधांसाठी अतिशय उत्सुकतेने आणि पवित्र भावनेने स्वीकार करण्यासाठी मनानेही तयार होतात.

सुमारे शंभर वर्षापूर्वी लग्न इतक्या लहान वयात होत असे, की त्यामुळे मानसिक आकर्षणासाठी वेगळे काही करावेच लागत नसे. पतिपत्नी विवाहसंबंधाआधी 8-10 वर्षे एकाच छताखाली राहत असत. या सहवासातून परस्परांना थोडेबहुत का होईना समजून घेणे शक्य व्हायचे. आई, तू मला माझ्या लग्नाला नेशील का, असा प्रश्न जोतिबा फुलेंनी आपल्या आईलाच विचारला होता. अशा या जोतिबांच्या पत्नी नंतरच्या काळात त्यांच्या समाजकार्यात किती समरस झाल्या होत्या हे आता उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

एकूण काय, तर विवाह आपल्याकडे संस्कार आहे. तो करार नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांत मात्र विवाह हा करार आहे. विवाहाशिवाय शरीरसंबंध होणे तिथे अनैतिक मानले जात नाही. इतकेच नाही, तर विवाहाशिवाय होणार्‍या संततीलाही तिथे आईबाप म्हणून नाव लावण्यास संमती मिळते. तेव्हा मुलेबाळे झाल्यानंतर उभयतांची संमती असेल तर स्त्रीपुरुष तिथे लग्न करतात आणि इथे मुळीच परिचय नसणारे स्त्रीपुरुष विवाह कसे करतात, एवढेच नाही, तर परस्परांच्या शरीरसंबंधासही परवानगी देतात.

ही अतिशय मागासलेपणाची रूढी आहे असेच त्यांना वाटते. आता आपल्या विवाहसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अभ्यास पाश्चात्त्य मंडळी गंभीरपणे करू लागली आहेत. काही पाश्चात्त्य अभ्यासक महिला महाराष्ट्रात येऊन अभ्यास करता करता इथेच स्थायिक झाल्या आणि त्यांना आपली विवाहपद्धत अधिक सुरक्षितता देणारी वाटली असे मी कुठेतरी वाचले आहे. कोणती विवाहपद्धती चांगली आणि कोणती वाईट हे सांगणे हा काही माझ्या या लेखाचा हेतू नव्हे. मला एवढेच सांगायचे आहे, की विवाह हा भारतीयांच्या समाजव्यवस्थेतला एक संस्कार आहे. आपल्या संस्कृतीने चार पुरुषार्थ सांगितले असून आपल्या निरामय कामजीवनासाठी आणि स्थैर्यासाठी विवाह आणि कौटुंबिक कर्तव्य यांना पुरुषार्थाचा दर्जा दिला आहे. भारताबाहेरून आलेले अन्य धर्म, पंथ अथवा भारतात निर्माण झालेले अन्य धर्म, पंथसुद्धा विवाहाला करार न मानता संस्कारच मानतात. विवाहविधीनंतर मुस्लिम अथवा बौद्धांमध्ये अनुक्रमे 'कबूल' अथवा 'प्रतिज्ञांचा' उच्चार होत असला तरी इथेही या मंडळींच्या जीवनशैलीत विवाह हा संस्कारच मानला जातो. संस्कार ही मानसिक धारणा निर्माण करणारी जीवनशैली खोलवर रुजलेली एक आचारपद्धती असते. म्हणूनच या संस्काराचे महत्त्व रुजवणारे काव्य-नाटकादी ग्रंथ निर्माण होतात. संत एकनाथांच्या 'रुक्मिणी स्वयंवर' या आख्यानात 77 दिवस चालणार्‍या विवाहसोहळ्य़ाचे वर्णन आलेले आहे. मध्य युगात सगळ्य़ात जास्त आख्यानकाव्ये याच विषयावर निर्माण झाली आहेत. सातशे वर्षापूर्वीच्या महदंबा या महानुभाव कवयित्रीला श्रीकृष्णवर्णन करण्यासाठी विवाहाची घटनाच महत्त्वाची वाटली आणि त्यांनी धवळे लिहिले. कालिदास यांनाही विवाहपूर्व झालेल्या संततीला नैतिक स्वरूप देण्यासाठी 'शाकुंतल' आख्यान लिहावेसे वाटले आणि सगळे 'रामायण' घडले तेही 'सीतास्वयंवरातून'च. सीतेला पळवून नेणार्‍या वाल्मीकीच्या दुष्ट रावणाने सीतेवर बलात्कार केला नाही. तिने आपल्याशी विवाह करावा, अशीच विनंती तो करीत राहिला.

मराठी नाटकाची सुरुवात ज्या नाटकापासून होते त्या नाटकाचे अथवा 'खेळाचे' नावही 'सीतास्वयंवर' असेच आहे. मराठी आणि कानडी संस्कृतीचे परस्परसंबंध अतिशय खोलवर रुजलेले आहेत. आपले अनेक खाद्यपदार्थ आणि नातीदर्शक सामान्यनामे अण्णा, अक्का इत्यादी कानडीच आहेत. कन्नड भाषेत 'विवाह' या शब्दाचा पर्यायी शब्द 'कल्याण' असा आहे. अठराव्या शतकातले तंजावर येथे सापडलेले आपले मराठी भाषेतले पहिले नाटक 'लक्ष्मीनारायण कल्याण' हीसुद्धा विवाहकथाच आहे. तत्त्वज्ञानाचे निरूपण करण्यासाठी कर्नाटकातल्या देवळातल्या ज्या भागाचा वापर करतात त्याला 'अनुभवमंडप' म्हणतात, तर पूर्वी सगळे विवाहच देवळात व्हायचे. त्याला 'कल्याण मंडप' म्हणतात.

महात्मा फुले यांनी 'सत्यशोधक धर्मा'ची स्थापना केल्यानंतर आणि 'आर्य समाजा'ने पूजाअर्चेचे नियम सांगतानाही 'विवाह' अतिशय साधेपणाने कसे पार पाडता येतील याबद्दल लिहून ठेवले असून या पंथातील मंडळी अतिशय साधेपणाने हा विधी पार पाडतात. एवढेच नाही, तर बौद्ध धम्माच्या स्वीकारानंतर बाबासाहेब आंबेडकरांनाही या विधीचे महत्त्व लक्षात घ्यावे लागले आणि त्यांनी आपल्या एका अनुयायाला हा विधी अतिशय साधेपणाने कसा करावा याची माहिती कळवली. दापोली (पुणे) येथील संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत ही माहिती उपलब्ध असल्याचे मला कळले आहे.

माझ्यासमोरचा प्रश्न एवढाच आहे, की जर हा विवाहविधी एक संस्कार असून तो अतिशय साधेपणाने करावा असे वारंवार सांगितले गेले असेल तर भारतीय माणसे विवाह एवढय़ा धूमधडाक्यात व थाटामाटात का साजरा करतात?

स्वातंर्त्यपूर्व काळात 'विवाह' ही साधेपणाने साजरी करावयाची घटना असून ती वैयक्तिक बाब आहे अशी मानसिक धारणा रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. तिथेच मुळी चूक झाली. विवाह हा संस्कार आहे म्हणून तो साधेपणानेच करायला हवा. पण ती वैयक्तिक बाब नसून समूहाची ओळख दृढ करणारी बाब आहे याकडे आपण दुर्लक्ष केले. हजारो वर्षापासून अंगवळणी पडलेले आपले मानस नीट समजून न घेता अगदी वेगळेच वैचारिक अधिष्ठान देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हांला बदल घडवून आणता आला नाही. पण भारतीय राज्यघटनेने मात्र हे मानस ओळखले. भारतीय राज्यघटनेने कालानुरूप एक लहानसा बदल केला तो म्हणजे प्रत्येक विवाहाची नोंद व्हायला हवी. नोंद न झालेले विवाह अनैतिक अथवा बेकायदेशीर ठरवण्याचा उद्योग भारतीय राज्यघटनेने केलेला नाही. समाजमान्यतेशिवाय विवाहाला मंगलस्वरूप प्राप्त होत नाही ही भारतीय मनाची धारणा ओळखून विवाह साधेपणाने कसे होतील याचे वळण लागावे म्हणूनच 'सामूहिक विवाह' पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण

सरकारतर्फे अवलंबिले जात आहे. पण ती लग्ने फक्त गरिबांचीच असतात. या मनोगंडामुळे सामूहिक विवाहांना मात्र प्रतिष्ठा मिळत नाहीय. शेतकरी कर्जबाजारी होऊन विवाह थाटामाटात करतो असे वर्णन म. फुले यांनी लिहून ठेवले आहे. म्हणूनच त्यांनी सत्यशोधकी विवाह रूढ करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठात एका विभागाच्या प्रमुखपदी असणार्‍या माझ्या प्राध्यापक मित्राने इतका साधेपणाने विवाह केला याचा मला खूप आनंद झाला.

(लेखक हे नामवंत विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

Sunday 23 September 2012

बाप तसा लेक


''काहून मारून राह्यले पोराले?''

''लय मज्जावलं ते''

''मारू नका.. काय झालं ते सांगा?''

''नवी चप्पल हारोली भडव्यानं.. पैशाची कदरच नाही''

''जाऊ द्या.. लेकरू हाय''

''लहान आहे काय? आठवीत गेला घोडा.. नवी चप्पल पंधरा दिवसात हारोली''

''कुठी हारोली रे?''

''अबे सांगनं.. तोंड शिवलं काय तुव्ह?''

''त्याचं ध्यान नाई''

''झोपीत असते काय रातदिवस? आतापर्यंत त्यानं चारपाच चपला हारोल्या, चप्पल सस्ती आहे काय? एकशे साठ रुपयाची होती..

मागच्या मयन्यात म्या सार्‍याइले चप्पल आणल्या.. या खेटराखेटरात माहे हजार रुपये बसले''

'' जाऊ द्या.. लेकराले आठोन राह्यत नाही''

''खायाची कशी आठोन राह्यते? वीस रुपयाचं टरबूज एकटा खाते''

''तुमाले कुठीच चुकला नाई तो.. बाप तसा लेक''

'' म्हनजे?''

''तुम्हीच काय कमी खाता? एका टाइमले शर्यत लाऊन किलोभर घुगर्‍या खाता''

''माणसानं खाल्लंच पाह्यजे''

''ह्या तुमच्यासारखाच आहे.. शाळेतून आल्याबरोबर खायाले पाह्यजे''

''शाळेत खिचडी भेटत नाही काय त्याले?''

''तो म्हनते रोजच्या रोज खिचडी खाव वाटत नाही''

''मंग काय तुपाचे रोडगे देतीन काय गुरुजी?''

''शाळेतून आल्याबरोबर कुरकुर्‍याले पैसे मागते, रोजच्या रोज कुठून देऊ पैसे?''

''भात खाऊ घालत जाय त्याले''

''शाळेत खिचडी अन् घरी भात? निरा तांदुयच खाऊ घालता काय त्याले?''

''मंग काय पाह्यजे?''

''माजू करी पाह्यजे त्याले''

''काजू करी? त्याचा बाप हैद्राबादचा नबाब आहे काय? माह्या डोकशावर केस ठेवता की नाही? खायाले माल पाह्यजे त्याले.. दर मयन्याले नवा ड्रेस पाह्यजे.. आमाले शाळेत एकच हापपॅंड राहे.. तोच धूधू घाला लागे, तुह्यासारखं अडीचशे रुपयाचं दप्तर ना भेटे.. महाबीजच्या थैलीचं दप्तर शिवा लागे. दोन मैल शाळेत पैदल जा लागे. पायात चप्पल नसे.. काटे खुडत.. चटके लागत.. तरी मी मॅट्रिक फस्ट क्लास पास झालो, स्टेट लेव्हलच्या 'वेटलिफ्टिंग स्पर्धेत पह्यला आलो होतो''

''काही सांगू नका.. आता पान्याचा गुंड उचलत नाही तुमाले'' ''तवाचा अन् आताचा फरक आहे.. त्या टाईमले आपल्या घरी म्हैस होती, मी रोज दोन लीटर दूध पेत जाव''

''पोराले कधी दोन लीटर दूध पाजसान? फक्त गोष्टीच करून राह्यले?''

''हे पोट्ट दूध पेत नाही ना! खाल्लं तरच आंगात भरीन, पन या पोटय़ाले काही खाऊ घातलं तरी लोळच हाये..

पाह्यनं कटिंग कशी वाढोली आसोलासारखी''

''त्याले मी आठ दिवसापासून सांगून राह्यलो की, कटिंग कर्‍याले जाय.. पन कटिंग म्हटली की जसा काही त्याले इचू डसते''

''सकायपासून दोन येन्या घालत जाय त्याच्या.. वारे वा लेकरू.. त्याले मंगापासून विचारून राह्यलो का चप्पल कुठी हारोली? अबे कुठी हारोली चप्पल? तुले बोलाले तोंड नाही काय?''

''आता विचारू नका.. तुम्ही लयखेप काहीकाही हारोता''

''म्या काय हारोलं?''

''बॅग हारोली.. छत्री हारोली.. एकखेप लायन्या पोरीले बजारात ठेऊन घरी आले होते.''

''जुन्या गोष्टी काढू नको''

''मंग कायले तोंड वासून राह्यले?''

'' त्यानं नवी चप्पल हारोली म्हणून बोललो.. मानसानं स्वत:च्या वस्तूवर ध्यान ठेवाव बाबू.. मी कसा ध्यान ठेवतो तुह्या मम्मीवर''

''माह्यावर ध्यान ठेवाचं काम नाही.. तुमचंच तुम्ही पाहा''

''ध्यानाचा विषय निंगाला म्हनून बोललो.. या पोराचं कायच्यातच ध्यान नाही.. अभ्यासात अजिबात नाही..

टीव्ही झाला की क्रिकेट अनं क्रिकेट खेयला की टीव्ही..

कसा पास होइन?''

''यंदा पासच आहे तो''

''कशावरून?'' ''आठवी लोक सारे पासच होतात, कितीकई ढ पोरगा असला तरी ढकलपास होते''

''आठवीत पास होइन पण दहावीत काय?''

''दोन वर्षात दहावी लोक ढकलपासचा नियम येते''

''तरी हा दहावीत गोता खाते''

''कशावरून?''

''ह्या पोट्टा तुले कधी अभ्यास करतावेळी दिसला काय?

दिवसभर पिंकीच्या खोडय़ा करत राह्यते.. तिचे केसं ओढते, चिमकोले घेते.. तिले डेबरी म्हणते, अभ्यासाच्या नावानं बोंब! आठवीत गेला तरी त्याले तुह्या नावाचं स्पेलिंग येत नाही''

''सांग बाबू.. सुवर्णाचं स्पेलिंग काय?''

''तो काय सांगीन? त्याले सरनेम इंग्रजीत लिहिता येत नाही.. निरानाम ठस आहे. ससरीचा''

''बाप तसा लेक''

''काय म्हटलं?''

''काई नाई''

''हा पोट्टा एक दिवस मायबापाचं नाव गमावते''

''कशावरून?''

''आता आपल्या घरी नवा टीव्ही आहे किनी? आपल्या घरी कलर टीव्ही असल्यावर हे पोट्ट शेजारच्या घरी जाते''

''जाऊ द्या.. लेकरू हाये''

''जायेना.. मी त्याबद्दल म्हनत नाही पन हे पोट्ट त्याच्या खिडकीतून पाह्यते''

''तेवढय़ासाठी तपा लागते काय? तो शेजारच्या घरात घुसला काय?''

''नाही''

''खिडकीतूनच पाह्यलं किन?''

''हाव''

''मंग पाहेना.. तुमचं काय जाते?''

''अवं आता काय सांगू तुले.. त्याच्या घरी टीव्हीच नाई ना!''

''मंग काय पाह्यते लेकाचा?''

''इचार त्याले''

''जाऊ द्या. तुमाले बी दुसर्‍याच्या घरात तोंड घालाची सवय आहे. काय लेकरापुढे बोलाले लावता? बाप तसा लेक अनं मसाला एक!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी -9561226572

Saturday 22 September 2012

'ज्योतिष' हा प्रकार थोतांडच!


'पुण्य नगरी'चा वाचक खूपच जागरूक आहे. सक्रिय आहे. जवळपास 17 वर्षे वेगवेगळ्या दैनिकांमधून आणि

साप्ताहिकांमधून मी लिहीत आलो. आता बर्‍याच वर्षाच्या अंतरानंतर दै. 'पुण्य नगरी'त लिहितो आहे. पण असा सक्रिय प्रतिसाद पूर्वी अनुभवला नव्हता. अर्थात, पूर्वी आजसारखी आधुनिक साधनं नव्हती. विशेषत: मोबाईल नव्हता. शनिवारी लेख प्रसिद्ध होतो. दिवसभर सारखा फोन खणखणत असतो. अभिनंदनही इतकं भरभरून असतं, की विचारू नका. त्यातून बळ मिळतं पुन्हा ताकदीनं लिखाण करण्याचं. खूप सूचना असतात. हे लिहा, ते लिहा, अमुक विषय हाताळा, तमुक विषयाबद्दल तुमचं मत काय, अशी प्रश्नांची सरबत्तीही असते आणि दुखावले गेले तर नाराजी, शिव्याही असतात, 'ईश्वर तुम्हांला सद्बुद्धी देवो.. इथपासून तर तुम्ही मरणार' असे आशीर्वादही असतात.

त्यामुळं कोणत्या विषयावर लिहावं, असा प्रश्न पडतो. पण खेळ मनाचा एक सुसंगत धागा ठरवणं गरजेचं आहे. सगळ्याच विषयांना योग्य न्याय देता येणं नितांत गरजेचं आहे. कारण माझं काम प्रबोधनाचं आहे. त्यामुळे वाचकांच्या मागणीनुसार विषयांची हाताळणी करतानाच प्रत्येक विषय व्यवस्थितरीत्या मांडला जाईल याची काळजी मला घ्यावी लागते हे आपण कृपया लक्षात घ्या. फलज्योतिषाविषयी खूप प्रश्न आलेत. तो आपल्या सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य झालेला विषय असल्यामुळं ते स्वाभाविकही आहे.

मागच्या लेखांमध्ये आपण पाहिलं, की पंचांगाचे दोन भाग असतात. अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त हा सारा खगोलशास्त्राचा भाग आहे. तो खरा असतो. शंभर टक्के खरा असायला हवा एवढं आपलं विज्ञान प्रगत झालं आहे.

मुहूर्त, शुभ-अशुभ आणि राशिभविष्य, हस्तसामुद्रिक,

मुद्रासामुदिक, अंक भविष्य, रमल, टॅरो कार्ड, क्रिस्टल गेझिंग, नाडी भविष्य इत्यादी भविष्यकथनाचे प्रकार फलज्योतिष अँस्ट्रॉलॉजी या विषयात मोडतात. या भविष्यप्रकारांना, ईंीेश्रेसूला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. वैज्ञानिक मान्यता नाही हे आपण विस्तारानं मागच्या लेखांमध्ये पाहिलं आहे.

या सगळ्यांमध्ये ज्योतिष्याच्या वतरुळातसुद्धा राशिभविष्य ईंीेश्रेसू हा उत्तम भविष्यकथनाचा प्रकार आहे असं मानलं जातं. त्यात अनेक शाखा, पद्धती आहेत. कृष्णमूर्ती, सायन, निर्मन वगैरे त्या तपशिलात न शिरता काही ठळक गोष्टी आपण समजून घेऊ.

पत्रिकेवरून भविष्य सांगणं हा सगळ्यात उत्तम प्रकार मानला जातो. ज्योतिष्याला जन्मवेळ आणि जन्मस्थळ मिळालं, की त्याआधारे त्याला कुंडली केीेीलेशि मांडता येते. या दोन गोष्टींशिवाय इतर कोणतीही माहिती देण्याची गरज नसते. आजकाल कॉम्प्युटरवरही कुंडली तयार करून मिळते. 12 राशींच्या 12 घरांत एकूण 9 ग्रह (परंपरेनुसार) मांडलेले आपणांस आढळतात. आजकाल ज्योतिषी आधुनिक झाल्याचं दाखविण्यासाठी युरेनस, नेपच्यूनही (काही प्लूटो) या घरात खेळवतात.

परंपरागत 9 ग्रह म्हणजे राहू, केतू आणि आपले सात वार रवि, सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीत हे ग्रह आहेत. माझ्याही कुंडलीत आहेत. लहानपणीच आईबाबांनी कुंडली बनवून घेतली होती.

राहू, केतू ग्रह आहेत? आपण शाळेमध्ये जे ग्रह शिकलोत त्यात राहू, केतू नावाचे ग्रह नाहीत. सूर्यमंडळामध्ये मुळात नसलेले हे ग्रह आलेत कुठून? हजारो वर्षाआधी केवळ डोळ्यांच्या साहाय्यानं माणसानं ग्रह शोधले. त्या वेळी आपल्यापासून या ग्रहांचं अंतर किती असावं याचा त्याला अंदाज करता येणं शक्यच नव्हतं. म्हणून ग्रहणाचा अभ्यास करताना काहीतरी चंद्र आणि सूर्याला गिळंकृत करत असावं असा त्यानं अंदाज केला. राहू, केतू, साप आहेत वा राक्षस आहेत. विशिष्ट काळात ते चंद्राला वा सूर्याला गिळतात म्हणून चंद्रग्रहण व सूर्यग्रहण लागतं असा समज रूढ झाला. आजही पुराण ग्रंथांमधून तो वाचायला मिळतो.

सारे खगोलशास्त्री पूर्वी ज्योतिषी ईंीेश्रेसशी म्हणून ओळखले जात. ग्रीक शास्त्रज्ञ 'अँरिस्टार्कस ऑफ सॅमॉस' याने तेवीसशे वर्षांपूर्वी तारे व सूर्य स्थिर असून पृथ्वी आणि ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात,' असं मत मांडलं.

भारतातील महान ज्योतिषी आर्यभट्ट याने पाचव्या शतकाच्या शेवटी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे मत गणिताच्या आधारे मांडलं. पण डोळ्यांना पृथ्वीभोवती सूर्य फिरताना दिसत असल्यामुळं या ज्योतिर्विदांची मतं नाकारण्यात आली. उलट त्यांची खिल्ली उडवण्यात आली.

ब्रुनो, कोपर्निकस व दुर्बिणीचा शोध लावून तिचा वापर करणार्‍या 16व्या शतकातील गॅलिलिओनं गणिताच्या आधारावर सिद्ध केलेलं मत जगाला स्वीकारावं लागलं. 'पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते व पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे सत्य आज सार्‍यांनी स्वीकारलं आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला तर सूर्यग्रहण लागतं आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर चंद्रग्रहण लागतं हे ज्ञान मानवजातीला झाल्यानंतर ज्योतिष्यांचे राहू, केतू म्हणजे साप व राक्षस या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्या. म्हणून हुशार ज्योतिष्यांनी त्यांना 'इन्व्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे ग्रह' ठरवलेत.

आश्चर्य म्हणजे न दिसणारे ग्रह ही कल्पना एका सत्यावर आधारित होती. युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह शास्त्रज्ञांना आधी गणितात आढळले. त्यानुसार त्यांनी शोध घेतल्यानंतर त्या स्थानांवर हे ग्रह दिसले.प्लूटो हा ग्रह गणितानुसार असावा असे वाटल्यानंतर बर्‍याच काळानंतर तो सापडला, दिसला.

स्वाभाविकच ज्योतिष्यांची न दिसणारे राहू, केतू ग्रह ही चलाखी काही काळ चालली. पण त्या स्थानांवर राहू, केतू असूच शकत नाही. या निर्णयाप्रत खगोलशास्त्रज्ञ आल्यावर मात्र ज्योतिष्यांची फारच पंचाईत झाली. मग त्यांनी राहू, केतू हे 'इंटरसेक्टिंग पॉइंट्स' आहेत, असं सांगायला सुरुवात केली.

पृथ्वीपासून सर्व ग्रहतार्‍यांचं समान अंतर कल्पून त्यांच्या भ्रमणाचा काल्पनिक नकाशा तयार केला जातो. त्यानुसार राशी, नक्षत्र मानले जातात. खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी ही कल्पना दीर्घकाळ वापरली गेली आहे. यानुसार चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणकक्षा जिथे छेद देतात त्या बिंदूंना राहू आणि केतू असं मानलं गेलं. आता हे छेदनबिंदू मुळातच काल्पनिक आहेत. कारण पृथ्वीपासून चंद्राचं अंतर एक फूट पकडलं तर पृथ्वी, सूर्य यांचं अंतर 385 फूट पकडावं लागेल. पृथ्वी मध्यबिंदूवरून 1

फुटावर फिरणार्‍या चंद्राची भ्रमणकक्षा 385 फुटांवरून फिरणार्‍या सूर्याच्या कक्षेला कधीही छेद देऊ शकणार नाही हे भूमितीच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यालाही कळतं. त्यामुळं राहू, केतू हे छेदनबिंदू आहेत ही मांडणीसुद्धा ज्योतिष्यांचं पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतराबद्दल त्यांचं अज्ञान दर्शविणारी आहे, चुकीची आहे; काल्पनिक आहे.

रवी म्हणजे सूर्य. सूर्य हा तारा आहे. तारा स्वयंप्रकाशी असतो. ग्रह परप्रकाशी असतात. ग्रह हे तार्‍याभोवती फिरतात. तरीही ज्योतिषी अजूनही रवीला म्हणजे सूर्याला ग्रह मानून तुमच्या-माझ्या पत्रिकेत पृथ्वीभोवती हिंडवत असतात. सूर्य-रवी हा तारा आहे, ग्रह नाही हे विद्वान ज्योतिषी केव्हा स्वीकारणार?

सोम म्हणजे चंद्र. चंद्र हा उपग्रह आहे. तो ग्रह नाही. 1986 साली धुळ्याला अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं होतं. त्या काळी भास्कर वाघाची धुळ्यात खूप दहशत होती. काही पत्रकारांना त्यांच्या गुंडांनी भरचौकात मारलं होतं. ज्योतिष्यांच्या अधिवेशनाला या गुंडांचं पूर्ण संरक्षण होतं. मी आणि माझे कार्यकर्ते या अधिवेशनाविरुद्ध रान उठविण्याची हिंमत करणार नाही या हेतूनेच धुळ्याला आयोजन केलं होतं.

15 दिवस आधीपासून आम्ही वातावरण तापवायला सुरुवात केली. शाळा, कॉलेजमध्ये 'ज्योतिष एक थोतांड' या विषयावरील व्याख्यानांचा धडाका उडवून दिला. त्या पाश्र्वभूमीवर ज्योतिष महामंडळाची धुळ्याला प्रेस कॉन्फरन्स झाली. ''चंद्र हा ग्रह आहे का?'' पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. ''हो! आमच्या शास्त्रानुसार चंद्र हा ग्रहच आहे,'' असे उत्तर पदाधिकार्‍यांनी दिलं. ''पण शाळांमध्ये चंद्र हा उपग्रह आहे असं शिकवलं जातं. मग आपलं ज्योतिष महामंडळ काय करणार, सरकारला असं चुकीचं पाठय़पुस्तकात शिकवतात याबद्दल जाब विचारणार कां, पाठय़पुस्तकातील हा भाग बदलविण्यास भाग पाडणार का,'' अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

''आम्ही या अधिवेशनात निर्णय घेऊ. चंद्र हा ग्रह आहे की उपग्रह ते ठरवू.'' असं उत्तर ज्योतिष्यांनी दिलं. आमच्या हाती कोलीतच मिळालं. प्रत्येक शाळेत, कॉलेजात, चौकाचौकांत आम्ही ग्रह, उपग्रहातील फरक समजावून सांगू लागलो. ग्रह हा तार्‍याच्या भोवती फिरतोआणि ग्रहाच्या भोवती फिरतो तो उपग्रह. ग्रह आणि उपग्रह हे केवळ शब्द नाहीत, तर या संकल्पना आहेत.

हजारोंच्या संख्येनं गावात ज्योतिषी यायला लागले. अधिवेशनाचा बिल्ला लटकवलेला ज्योतिषी दिसला, की शाळकरी वानरसेना विचारायची, ''ज्योतिषी काका, सोम ग्रह आहे की उपग्रह? रवी ग्रह आहे का? राहू, केतू कुठे आहेत?'' ज्योतिष्यांनी चुकीची वा अवैज्ञानिक उत्तरे दिली, की मग वानरसेना त्यांना निमंत्रण द्यायची, ''ज्योतिषी काका, आमच्या शाळेत शिकायला या. 9 पैकी 4 ग्रह तर अस्तित्वातच नाही! मग पत्रिकेला काय अर्थ?''

परिणाम असा झाला, की हजारोंच्या संख्येनं आलेले ज्योतिषी आपला बिल्ला काढून धुळ्यात वावरू लागले. त्या वेळी वातावरण एवढं तणावपूर्ण होतं, की डीआयजी अरविंद इनामदार नाशिक सोडून काही काळ धुळे मुक्कामी तळ ठोकून बसले. व्यक्तिश: त्यांचा ज्योतिषावर विश्वास होता. त्याबद्दल ते

माझ्याशी वादही घालत. पण पोलीस अधिकारी म्हणून आमच्या वादळी चौक सभांना पूर्ण संरक्षणही देत. पुढे ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झालेत. 'ज्योतिषशास्त्र आहे सिद्ध करा. एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंका अन्यथा फसवण्याचा धंदा बंद करा.' या आव्हानाच्या दबावातच धुळ्याचं ज्योतिष संमेलन पार पडलं. ज्योतिष्यांनी आव्हान स्वीकारलं का?

(लेखक हे अखिल भरतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Friday 21 September 2012

एफडीआयला विरोध म्हणजे शेतकर्‍यांना विरोध

विदेशातील कंपन्या जशा अनेक देशांत भांडवल गुंतवतात तशाच भारतातल्या अनेक कंपन्यांनीदेखील विदेशातील अनेक देशांत भांडवलाची गुंतवणूक केलेली आहे. अफ्रिका, चीन, इंग्लंडच काय, थेट अमेरिकेतही आपल्या देशातील अनेक कंपन्यांची गुंतवणूक आहे. विदेशी कंपन्यांना आपला पैसा गुंतवायचा असेल तर आपल्या सरकारची

परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी घेऊन अनेक कंपन्या यापूर्वीच भारतात आलेल्या

आहेत.

कोकाकोला असो की नोकिया, या कंपन्या विदेशी आहेत. मग हा गदारोळ काय आहे? हा गदारोळ समजावून घेण्यासाठी मल्टिब्रँड, रिटेल आणि एफडीआय हे शब्द समजावून घ्यावे लागतील. नोकिया ही एक विदेशी कंपनी आहे. त्यांचा एक ब्रँड आहे.

नोकियामध्ये विदेशी गुंतवणूक केली म्हणजे सिंगल ब्रँडमध्ये गुंतवणूक केली असे मानले जाते. एका वस्तूचे उत्पादन करा किंवा विक्री करा, त्याला आमच्या सरकारचा विरोध नाही. किराणा दुकानात मात्र अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. अन्नधान्य,

भाजीपाला, फळफळावळ, कपडालत्ता, भांडीकुंडी, बूटचपला, फळांचे रस, नाना प्रकारच्या वस्तू याला मल्टिब्रँड म्हणजे अनेक प्रकारच्या वस्तू म्हणतात. यामध्ये गुंतवणुकीला विरोध केला जात आहे. सिंगल ब्रँडपेक्षा अनेक ब्रँडच्या रिटेल क्षेत्राचा शेतीमालाशी अधिक संबंध येतो. एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. विदेशाची थेट गुंतवणूक. देशात तीन प्रकारच्या कंपन्या असतात. निखळ देशी भांडवल असलेल्या कंपन्या, देशी भांडवलासोबत विदेशी भांडवल वापरणार्‍या कंपन्या व केवळ विदेशी भांडवल असणार्‍या कंपन्या. आता ज्या

मुद्यावर वाद सुरू आहे तो देशी कंपन्यासोबत

विदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात आहे. सरकारने विदेशी कंपन्यांना निम्म्यापेक्षा अधिक गुंतवणुकीला परवानगी दिली. संयुक्त भांडवल गुंतवणुकीच्या अनेक कंपन्या

आहेत. नोकिया किंवा कोकाकोला ही थेट गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. प्रश्न एवढाच आहे, की रिटेल क्षेत्रात पन्नास टक्क्यांहून अधिक थेट गुंतवणुकीची परवानगी द्यायची का? त्यात शेतकर्‍यांचे काय हित आहे? शेतीधंद्याचे स्वरूप आणि त्याबाबतचे कायदे नीटपणे तपासले तर आपल्या असे लक्षात येईल की, मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला अनुमती देणे शेतकर्‍यांच्या हिताचे ठरेल. शेतीमालाची बाजारपेठ बंदिस्त आहे. येथे शेतकर्‍यांना आपला माल इतरत्र विकता येत नाही. तो मार्केट यार्डातच न्यावा लागतो. मार्केट यार्ड पुढार्‍यांच्या बगलबच्च्यांच्या ताब्यात आहे. ही मार्केट कमिटी ज्या खरेदीदार वा अडत्यांना लायसन्स देते तेच केवळ तेथे व्यवहार करू शकतात. हे पुढारी आपल्या बगलबच्च्यांना लायसन्स देतात. हे खरेदीदार आणि अडते सेटल करून शेतकर्‍यांची लुबाडणूक करीत राहतात. लातूरच्या मार्केट कमिटीचा आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आले, की या मार्केट कमिटीच्या आवारात शेकडो कोटींची उलाढाल होते. हा सर्व व्यवहार फक्त साठ ते सत्तर खरेदीदार करतात. मार्केट कमिटीमुळे शेतीमालाच्या बाजारातील स्पर्धाच संपुष्टात आली आहे. मूठभर लायसन्सधारक परिसरातील संपूर्ण शेतीमालाच्या व्यवहारावर काबीज झाले आहेत. शेतीमालाच्या खरेदीदारातील चुरस संपुष्टात आणण्याचे पाप मार्केट कमिटी कायद्याने केले. रिटेल क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतीमालातील खरेदीदारांमध्ये चुरस निर्माण होईल. आणखीन एक खरेदीदार बाजारात उतरणे ही विक्रेत्याची संधी असते हे साधे अर्थशास्त्र आहे. या आधारावरच थेट गुंतवणुकीचे आपण स्वागत करू शकतो. रिटेल क्षेत्रातील थेट गुंतवणुकीचा दुसरा लाभ शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल हा होऊ शकतो. आपल्या देशात उत्पादित होणार्‍या फार थोडय़ा मालावर प्रक्रिया केली जाते. बराच माल वाया जातो, सडतो. शेतीमालावर प्रक्रिया झाली तर त्याचे आयुष्य वाढते. ते जास्त दिवस टिकाऊ झाल्याने त्याचे विक्रीमूल्य वाढते. दूरच्या बाजारात जाऊ शकतो. यामुळेच त्याची मागणी वाढू शकते. मागणी वाढल्याने त्याची किंमतही वाढते. शेतीमालावर प्रक्रिया झाली तर शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळतो. प्रक्रिया उद्योगासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. रोजची निकड असताना भाज्या जास्त दिवस टिकाव्यात यासाठी कोणत्या

गावात सोय आहे? गावात सोय तर लांब राहिली, जिल्ह्यात तरी आहे का? दुधासाठी तालुक्यात एक चिलिंग प्लांट ठेवायची मारामार आहे. आमच्याकडे साधी गोदामेदेखील पुरेशा प्रमाणात नाहीत. गोदाम किंवा चिलिंग प्लांट ह्या गोष्टी शेतीमाल सुरक्षित ठेवायच्या किमान गरजा आहेत. त्यापुढे प्रक्रिया उद्योगांचा विषय सुरू होतो. आमच्याकडे प्राथमिक सुविधादेखील निर्माण होऊ शकल्या नाहीत.

शेतीमालाच्या बाजारावर सहकारी क्षेत्राचा कब्जा आहे. सहकारी क्षेत्र अकार्यक्षमता, अव्यवस्थापन, भ्रष्टाचार यासाठी कुप्रसिद्ध झाले आहे. त्याकडून मोठय़ा कामांची अपेक्षा करता येत नाही. अशा स्थितीत जर विदेशी गुंतवणूक होऊन शेतीमालावर प्रक्रिया करणार्‍या साखळ्या तयार होणार असतील तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे.

बाप मरतो आहे. त्याला वाचविण्याची पोरात क्षमता नाही. अशा परिस्थितीत शेजारच्या गल्लीतील डॉक्टर येऊन जर उपचार करणार असेल तर आपण असे कसे म्हणावे, की तू विदेशी आहेस. आम्हांला आमच्या बापावर उपचार करायचे नाहीत. हो! हा डॉक्टर त्याची फी घेणार आहे. कोणतीही कंपनी, व्यापारी, धंदेवाईक संस्था नफा मिळावा यासाठीच धंदा करीत असते. ते नफा घेणार यात वाद नाही. डॉक्टराने फी घेऊ नये आणि मरणासन्न बाप तर वाचला पाहिजे असे होऊ शकत नाही. आम्ही त्यांची वाजवी किंमत द्यायला तयार

आहोत. शेतकरी आज ज्या दुर्दशेत आहे त्यातून तो बाहेर निघाला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे. सिंगल ब्रँड गुंतवणुकीला तुमचा विरोध नाही. कारण त्याचे लाभ तुम्हांला मिळणार.

मल्टिब्रँडचा लाभ जेव्हा शेतकर्‍यांना होईल असे दिसले तेव्हा तुम्ही त्याला विरोध सुरू केला. रिटेल क्षेत्रात एफडीआयला विरोध ही काही पहिली वेळ नाही. जेव्हा केव्हा शेतकर्‍यांच्या हिताचा विषय निघाला त्या त्या वेळी त्याला विरोध झाला आहे. हा विरोध जसा भाजपाचा आहे तसा तो कम्युनिस्टांचाही आहे. एवढेच कशाला, अनेक काँग्रेसी खासदारांचाही आहे. खुद्द मनमोहन सिंग यांनाच उशिरा जाग येण्याचे कारण काय आहे? लाख लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या करून झाल्यावर हा डॉक्टर घरी आला. यावरून यांची नियत स्पष्ट होते. पाकिस्तानी कलावंतांना घेऊन होणार्‍या टीव्ही शोला मध्यंतरी एका पक्षाने विरोध केला. पूर्वी पाकिस्तानी खेळाडूंना मज्जाव करण्यासाठी खेळपट्टी उद्ध्वस्त करण्यात आली होती. एरवी पाकिस्तान म्हटले, की आव असा आणला

जातो. जशी यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काही वर्षापूर्वी कांद्याचे भाव वाढू

लागले. बोंबाबोंब सुरू झाली. कांद्याचे भाव पाडावेत म्हणून सरकारने पाकिस्तानकडून कांद्याची आयात केली. हा कांदा मुंबईच्या डाक यार्डात उतरविला गेला. मला वाटत होते, कोणीतरी डाक यार्डावर जाऊन पाकिस्तानचा कांदा भारतात येऊ देणार नाही, असे म्हणून छातीचा कोट करून उभा राहील. पाकिस्तानी कांदा येऊ दिला जाणार नाही. परंतु दुर्दैवाने तसे काहीच झाले नाही. उलट या कडव्या पकिस्तान विरोधकांनी पाकिस्तानहून आणलेला कांदा मुटुमुटु खाल्ला. मोठय़ा कंठरवाने पाकिस्तानी खेळाडू आणि कलावंतांचा विरोध करणारे कोणीच माईचे लाल पाकिस्तानी कांदा अडवायला का गेले नाही, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. भारतातील शेतकर्‍यांशी कोणालाच काही देणेघेणे राहिलेले नाही. मात्र शेतकर्‍यांचा लाभ होणार असेल तर एफडीआयला विरोध करतील. बीटी कॉटनला विरोध करतील.

(लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.), दूरध्वनी- 9422931986

शेतकर्‍यांचे गणरायाला साकडे


गणनायका कालच तुझे धूमधडाक्यात आगमन झाले. आता दहा दिवस तुझा जयघोष, तुझ्या आरत्या, तुझे स्मरण होईल. तुझी ख्याती सुखकर्ता, दु:खहर्ता, तूच विघ्नहर्ता, तूच बुद्धीचीही देवता त्यामुळे तुझ्यासमोर शेतकर्‍यांचे दु:ख मांडावे, मला पडलेले काही प्रश्न मांडावे आणि मिळाली तर तुझ्याकडून काही उत्तरे मागावी याच हेतूने तुला हे पत्र लिहितो आहे.

अनेक वर्षापूर्वी कधीतरी 'उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' असे म्हटले जायचे. आज त्याच्या उलट, 'उत्तम नोकरी, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असे म्हटले जाते. त्याचा प्रत्ययही येतो. पण गणराया 'उत्तम शेती' कधी होती का रे? कारण लहानपणापासून 'शेतकरी कर्जामध्येच जन्म घेतो. कर्जामध्येच जगतो आणि कर्जामध्येच मरतो' हेच तर आम्ही ऐकत आणि पाहत आलो आहोत. तेव्हा कर्जातच जन्मणारा, जगणारा आणि मरणारा शेतकरी उत्तम शेतीचा धनी केव्हा होता? कारण शेतकर्‍यांना कायम कर्जबाजारी ठेवणारी शेती उत्तम कशी असू शकते? पण एकमात्र खरं आहे. जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा शेतकर्‍यांना 'किंमत' होती. पैसा असूनसुद्धा अन्नधान्य मिळत नव्हते. आणि पैसा खाऊन पोट भरता येत नव्हते. जगता येत नव्हते. आजही खूप प्रगती झाली आहे असे म्हणतात. परंतु पोट भरण्यासाठी अन्नच लागते. आता पोट भरण्यासाठी अन्नच लागत असेल आणि पैसा असूनसुद्धा अन्नधान्यच उपलब्ध होत नसेल तर अशा अवस्थेत शेतीला व पर्यायाने अन्नधान्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना महत्त्व आले असल्यास नवल नाही. मला आठवते, पूर्वी शेतीला लागणार्‍या सर्व सेवा अन्नधान्याच्या मोबदल्यातच मिळायच्या. शेतीवर काम करणारा मजूर स्पष्ट म्हणायचा, 'मालक मी मजुरीला येतो पण मोबदल्यात पैसे घेणार नाही. मला धान्यच लागेल.' गावचे बाराबलुतेदारही हेच म्हणायचे, 'मालक आम्ही तुमचे काम करतो पण आम्ही पैसे घेणार नाही आम्ही फक्त धान्यच घेऊ.' एवढंच काय गावचा न्हावीसुद्धा शेतकर्‍यांची वर्षभर हजामत करायचा आणि मोबदल्यात धान्यच घ्यायचा. कारण स्पष्ट होते. पैसा असला तरीही अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे धान्य मिळायचे कोठे? तुटवडय़ामुळे अन्नधान्याला किंमत होती. पर्यायाने अन्नधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍याला 'किंमत' होती. त्याचे सर्व व्यवहार पैशाशिवाय केवळ अन्नधान्याच्या मोबदल्यात होऊन जायचे. अन्नधान्य हेच 'कॅश' चे काम करून जायचे म्हणून त्याला कॅशची गरज क्वचितच पडत असे. परंतु 'हरितक्रांती'नंतर अन्नधान्याचा तुटवडा कमी होत गेला. अन्नधान्याची मुबलकता वाढत गेली तसतशी परिस्थिती बदलत गेली. आता अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतीला लागणार्‍या सेवा पैसा देऊनच मिळू लागल्या. पूर्वी अन्नधान्याच्या मोबदल्यात मिळणारी सेवा आता केवळ पैशाच्या मोबदल्यात मिळू लागली. शेतकर्‍यांचा आता कोणताही व्यवहार पैशावाचून अडू लागला. म्हणून मग तो 'कॅश' देणार्‍या क्रॉपच्या मागे धावू लागला. आणि तो 'बाजारा'च्या जाळ्यात अडकू लागला. आज शहरातली माणसं साळसूदपणे शेतकर्‍यांनी कॅश क्रॉपच्या मागे धावू नये असा फुकटचा सल्ला देतात. तेव्हा गणराया त्यांना शेतकर्‍यांची अगतिकता तू का समजावून सांगत नाही. तू तर बुद्धीची देवता, तू तुझ्या शहरातील भक्तांना शेतकर्‍यांचे दु:ख, अडी-अडचणी, समस्या समजावून घेण्यासाठी थोडी बुद्धी का देत नाही?

1980 मध्ये मी खेडय़ात राहायला गेलो तेव्हा मजुरांची दिवसाची मजुरी होती 5 रुपये. आणि पत्रकारितेसाठी 2000 साली जेव्हा गाव सोडले तेव्हा मजुरांची मजुरी होती 50 रु. रोज. 1980 मध्ये 1 दिवसाच्या मजुरीत मजुरांना सरासरीने 3 किलो धान्य घेता येत होते. कारण साधारणत: दीड रु. किलो धान्य त्यावेळेस मिळत होते. परंतु 2000 मध्ये मात्र त्याला एका दिवसाच्या मजुरीत 25 किलो धान्य मिळत होते. 2 रु. किलोने गरिबांना धान्य मिळत एक दिवसाच्या मजुरीत 3 किलो धान्य मिळत होते तेथे आता 1 दिवसाच्या मजुरीत 25 किलो धान्य मिळत असेल तर त्यामुळे प्रामुख्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट मजूर आता केवळ पैशाच्या स्वरूपातच मोबदला शेतकर्‍यांकडून मागू लागला. दुसरी महत्त्वाची गोष्ट घडली ती अशी की मजुराला एक दिवसाच्या मोबदल्यात 25 किलो धान्य मिळायला लागल्यामुळे त्याला आता पोट भरण्यासाठी आठवडय़ातील सर्वच दिवस काम करण्याची गरजच संपुष्टात आली. त्याला आता काही दिवस काम केले आणि काही दिवस काम केले नाही तरी त्याची पोटापाण्याची गरज भागू लागली. स्वस्त व मुबलक धान्य मजुरांना उपलब्ध होऊ लागल्यामुळे मजुरांची सौदाशक्ती (बार्गेनिंग पॉवर) वाढली तर तीच शेतकर्‍यांची शक्ती कमी झाली. आज तर मजुरांच्या बाबतीतली शेतकर्‍यांची अवस्था अगतिकच नव्हे तर केविलवाणी झाली आहे. यावर शहरी लोकांचा आजही विश्वास बसत नाही. गणराया तू तरी तुझ्या शहरी भक्तांना ही परिस्थिती समजवून सांग. तुझं तरी ते ऐकतील.

गणराया, भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावरच आधारित होती आणि आजही आहे. म्हणजे एका अर्थाने भारतीय शेती 'राम'भरोसेच आहे. पाऊसपाणी चांगलं झालं तर शेती पिकणार. पावसाने दगा दिला तर शेती सुकणार अशी अवस्था. त्यातही भारतीय शेती श्रमावर किंवा मजुरांवर अवलंबून आहे. निसर्गावर आधारित शेतीला 'राम'भरोसे म्हटले तर श्रमावर आधारित शेतीला 'काम'भरोसे शेती म्हणू या. जोपर्यंत शेती 'राम'भरोसे आणि 'काम'भरोसे होती तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी जरी असला तरीही त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली नाही. निसर्गाचे तडाखे तो आजपर्यंत खंबीरपणे सोसत राहिला. परंतु जेव्हा शेतकर्‍यांना 'कॅश क्रॉप'च्या मागे धावणे भाग पडले तेव्हा शेती प्रामुख्याने भांडवलाधारीत व्हायला लागली. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हायला लागला. संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, बी.टी. बियाणे यांचा वापर शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला. तसतशी शेती खर्चिक होत गेली. भांडवलाधारीत शेतीला आपण 'दाम'भरोसे शेती म्हणू या. रामभरोसे शेतीचा फटका शेतकर्‍यांनी सहन केला. पण बाजार त्यांच्या नियंत्रणात नसल्यामुळे 'बाजाराने' त्याला भर बाजारात नंगा करून सोडला. पूर्वी घरचीच बियाणे, घरचीच खते त्यामुळे यासाठी बाजारात काही विकत घ्यायला जाण्याची गरज नव्हती. आणि शेतीला लागणार्‍या बहुतांश सर्व सेवा अन्नधान्याच्या मोबदल्यातच पूर्ण होत असल्यामुळे 'बाजारात' मालही विकायची गरज तुलनेने कमीच, म्हणजे बाजारातून शेतीसाठी लागणार्‍या वस्तू कमी विकत घ्याव्या लागायच्या व बाजारात विकायला न्यायच्याही वस्तू कमीच असायच्या. त्यामुळे बाजाराशी संबंध कमी म्हणून बाजारात होणारी शेतकर्‍यांची लूट वा शोषण कमी व्हायचे. आता मात्र तो चांगलाच बाजाराच्या कात्रीत कापल्या जात आहे. पूर्वी आणि आताही शेतकर्‍यांच्या नियंत्रणात निसर्ग किंवा 'राम' केव्हाच नव्हता पण मजूर त्यांच्या नियंत्रणात होता आता तर 'राम'ही त्याच्या नियंत्रणात नाही मजूर अर्थात 'काम'ही त्याच्या नियंत्रणाबाहेर आणि बाजार किंवा 'दाम'ही त्याच्या हाताबाहेर अशा अवस्थेत गणनायका त्याने काय करावे रे? निसर्गाने झोडपावे, बाजाराने लुबाडावे आणि आता गावच्याच मजुरांनी नाडवावे अशा अवस्थेत तो आत्महत्या करीत असेल तर देवा, गणराया, गणनायका, विघ्नहर्ता तू तरी थोडाबहुत त्याच्या मदतीला धाव. शेतकर्‍यांवर येत असलेल्या संकटांचे, विघ्नांचे हरण कर.

देवा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा अमेरिकन डुकरांना खायला घालण्यात येणारा गहू मिळविण्यासाठीसुद्धा रांग लावावी लागायची. तुझ्या मोदकांसाठीसुद्धा धान्य उपलब्ध व्हायची मारामार होती. तेव्हा देवा शेतकर्‍याला किमान किंमत होती. अन्नधान्याची टंचाई होती व देश अन्न-असुरक्षित होता. तुझा मोदक बनविणेही पैसे असूनही जिकिरीचे जायचे तेव्हा गणराया शेतकरी किमान अन्न सुरक्षित होता. पण विघ्नहर्त्या शेतकर्‍यांनी अन्नधान्याचा तुटवडा नष्ट करून देशात अन्नधान्याची सुबत्ता आणली. देशातील अन्नधान्याची गोदामे त्याने अन्नधान्याने तुडुंब भरली. देश अन्न सुरक्षित झाला. तुझ्या मोदकांसाठी अन्नधान्य सहज उपलब्ध होऊ लागले म्हणून देवा तू तरी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याची पाठराखण करायची होतीस पण गणनायका तूसुद्धा शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार आहेस का रे?

तू देव असशील, सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, गणनायक, संकटनिवारक, मंगलमूर्ती सर्व काही असशील पण देवा तुलासुद्धा पोट आहे. त्यात तुझे पोट तर थोडे मोठेच. ज्याअर्थी तुला पोट आहे त्याअर्थी तुलासुद्धा पोट भरायला अखेर अन्नाचीच गरज असेल ना रे? तुझ्यासाठीच नव्हे तर सार्‍या जगाचे पोट भरणारा हा अन्नदाताच आज उपाशापोटी आहे याची तुला अजिबातच जाणीव नाही का रे? तुझं जाऊ दे. पण तुझं वाहन तरी कोण्या पेट्रोल, डिझेल किंवा विजेवर चालतं? तुझं वाहन उंदीरही अखेर अन्नधान्यावरच पोसल्या जातो ना?

गणराया, तू तर सर्वज्ञ तरी तुला विचारतो. तुला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो माहीत आहे का रे? त्यांनी यावर्षीचा आपला अहवाल जाहीर केला. त्यात 1995 ते 2011 या 16 वर्षाच्या कालावधीत 2 लाख 90 हजार 470 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. म्हणजे गेल्या 16 वर्षात जवळपास तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असताना राज्यकर्ते, समाजकारणी, राजकारणी, वक्ते, विचारवंत कोणीच कसे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही? या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देण्याची बुद्धी तू त्यांना दे. कारण अखेर तू बुद्धीचाही नायक आहे.

विघ्नहर्त्या, गणराया, गणनायका काहीही कर पण दिवसेंदिवस शेतकर्‍यांवर येणारी विघ्न तू हरण कर यासाठी तुला मी शेतकर्‍यांच्या वतीने साकडे घालतो आहे.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

माणसं ही..


वर्षभरापूर्वी अकोला आकाशवाणीवर एक कार्यक्रम यायचा 'माणसं ही वतरुळाबाहेरची' नावाचा. चाकोरीबाहेरचं जगणं जगणार्‍या, जगलेल्या माणसांच्या कार्याचा वेध घेणारा तो कार्यक्रम होता. सहज लक्षात असणारं शीर्षकगीत असल्यामुळे येता-जाता गुणगुणायची. एकदा सहज विचार केला माणसं ही वतरुळाबाहेरचीच असतील का? कोटय़वधी माणसांनी व्यापलेलं हे जग फक्त वतरुळाआतली अन् वतरुळाबाहेरचीच असतील का? अन् मग नाना रंगांची, नाना तर्‍हांची माणसं आठवू लागली. मुळातच प्रत्येक कल्पनेला मूर्तरूप द्यायची सवय म्हणा, व्यवसाय म्हणा असल्यामुळे त्यांना प्रतिकांमध्ये शोधू लागलो. काही कशी दिसलीत, तर काही अशी दिसलीत.

काही माणसं असतात तुम्हाला मैदानात उतरवून तुमची गंमत पाहणारी, काही नुसतीच सल्ला देण्यासाठी जन्माला आलेली. काही वात पेटवून देणारी, काही तुमच्यावर हसणारी, काही तुम्हाला हसवणारी, काही प्रकाश दिसू लागल्यावर दिव्याकडे झेप घेणारी, काही मिट्टं काळोखात तुमचा हात हातात धरून तुमच्यासोबत वाट चालणारी, काही तुमच्या हृदयात कायम जिवंत असलेली तर काही जिवंत असून नसल्यासारखी, काही समजून घेणारी तर काही समज देणारी, काही फुलवणारी तर काही फुलवता-फुलवता स्वत:च फुलणारी, काही कायम गढूळलेल्या पाण्यासारखी तर काही स्फटिकासारखी नितळ, स्वच्छ झुळझुळ वाहणारी, काही वावटळीसारखी क्षणात विस्कटून टाकणारी तर काही ज्योतीच्या अंदाजानं वाहणार्‍या वार्‍यासारखी, काही निवडुंगासारखी आखीव-रेखीव पण बोचणारी तर काही काटेरीच पण बाभळीसारखी मुक्तपणे बहरलेली, बहुगुणी. काही परजीवी वेलीसारखी झाडाच्या आश्रयानं वाढणारी आणि झाडालाच गिळंकृत करणारी तर काही बांबूसारखी तुमचा बहर पेलण्यासाठी चारही बाजूंनी पाय रोवून उभी ठाकलेली. काही गिरणीसारखी डोकं उठवणारी भणभण लावणारी तर काही वेळूच्या बनासारखी प्रत्येक झुळकीसरशी नवे सूर आळवणारी, काही कीटकनाशकांसारखी संकटमोचक पण विषाचा अंश तुमच्यात सोडणारी तर काही जैविक खतांसारखी स्वत:ला विरवून तुमच्यात प्रतिकारशक्ती पेरणारी, काही मोबाईलच्या नेटवर्कसारखी रेंजमध्ये असेपर्यंत साथ देणारी तर काही तार्‍यांसारखी क्षितिजापर्यंत तुमच्यासोबत चालणारी. काही सूर्यप्रकाशासारखी चराचरात झिरपणारी तर काही नुसतेच सीएफएल दिव्यासारखी जेवढय़ाला तेवढे व्हॅट उजळणारी, काही फिनाईलच्या वासासारखी इच्छा नसताना नाकात शिरणारी तर काही पारिजातकाच्या सुगंधाप्रमाणे भरभरून घ्यावीशी वाटणारी, काही गुलाबाच्या

फुलांसारखी सुंदर, रंगीत पण टोचून अस्तित्व पटवणारी तर काही जास्वंदासारखी र्तुेबाज, रंगीत पण चरणावरती लीन होणारी, काही स्वप्नांसारखी झोप उघडल्यावर चुटपूट लावणारी तर काही टीव्हीवरच्या मालिकांसारखी रटाळ, कंटाळवाणी. काही पाण्यासारखी प्रत्येक रंगात मिसळून एकरूप होणारी तर काही मिठाच्या खडय़ासारखी जगणं नासवणारी, काही अंगणातल्या तुळशीसारखी प्रसन्न, मंगलमय वाटणारी तर काही अशोकासारखी उंचच-उंच पण कोणालाच सावली न देणारी. काही तनकटासारखी इच्छा नसताना घुसखोरी करणारी, जागा व्यापणारी तर काही आभाळासारखी अथांग, नानारंगी छटा ल्यालेली, डोळ्यात न मावणारी, काही वटवृक्षासारची जणू सावली देण्यासाठी जन्माला आलेली तर काही वेलीसारखी दुसर्‍याच्या कलाने वाढणारी, फुलांचा सडा टाकणारी, मांडवावर शोभा होऊन बहरणारी, काही झेंडूंच्या फुलांसारखी चलतीच्या काळात भाव खाणारी तर काही गुलमोहरासारखी स्वत:च्याच तोर्‍यात फुलणारी अन् इतरांनाही आनंद देणारी, काही दुर्वासारखी व्रतवैकल्यापुरतीच वापरली जाणारी एरवी दुर्लक्षित असणारी. काही भुईमुगासारखी वरवर काहीच नसणारी पण कोणाला दिसणार नाही अशाप्रकारे जमिनीच्या आत फळणारी, काही काँग्रेस गवतासारखी यत्र-तत्र-सर्वत्र उगवून हन्यास आणणारी तर काही सुबाभळीसारखी कुठल्याही ऋतूत मिळेल तिथून पाणी शोषून स्वत: हिरवीगार राहणारी पण जहरीपणे रुतणारी तर काही ढेंच्या या हिरवळीच्या खतासारखी दुसर्‍यांसाठी जमीन तयार करण्यासाठी स्वत:ला जिरवणारी, काही शहाळ्यासारखी वरून टणक पण आतून गोडवा साठवलेली, काही रस्त्यांसारखी एकमेकांना जोडून चालणारी..

माणसं, माणसं, माणसं! जाती-धर्मानं ओळखली जाणारी पण सगळे गुणदोष माणसांचेच असलेली..

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

याद येते तिची भोवर्‍यासारखी!


आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो?

'जीवन जगणे' वगैरे सारखे मोठेमोठे शब्द वापरतो. आपलं जीवन म्हणजे तरी नेमकं काय? आपापल्या परीनं जीवनाचा अर्थ शोधण्याचा, जीवनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न साहित्यिक, कवी, विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलावंत, संत, ऋषिमुनी करतच आलेत. आजही करत आहेत. उद्याही करतील. ही निरंतर चालणारी गंमत आहे.

जगतो म्हणजे काय काय करतो, याचा कधी विचार केला का आपण?

जन्माला आले की श्वास घेतो. हातपाय हालवतो. रडतो. भूक लागली की खातो-पितो, राग आला की चिडतो, आनंद झाला की हसतो, नाचतो, गातो वगैरे वगैरे.

पण हे सारेच सजीव करतात.

आपल्याला वाटते आपण फार प्रगती केली. असेलही. खूप शोध लावलेत माणसाने. स्वत:साठी खूप सोयी करून घेतल्यात. अनेक गोष्टींचे रिमोट आपल्या हातात ठेवलेत.

आपण आपली भाषा विकसित केली. संगीत शोधून काढलं. वेगळी गाणी लिहून घेतलीत. नाचण्याचे प्रकार शोधून काढलेत. त्यासाठी कोरियोग्राफरही तयार झालेत. पशुपक्ष्यांचीही स्वत:ची भाषा नसेल का? चिमण्यांच्या चिवचिवाटाला काही वेगवेगळे अर्थ नसतील का? मोराला नाच शिकवणारा कोरियोग्राफर कोण? कोकिळेचा गुरू कोण? वाघाला शिकारीचं प्रशिक्षण कुठल्या सैनिक स्कूलमधून मिळत असेल? एवढय़ा बारीक बारीक मुंग्या साखरेचा शोध अचूकपणे कशा काय घेऊ शकतात? न चुकता आपल्याच वारुळात परत कशा जातात? त्यांच्याकडेही तज्ज्ञ डॉक्टर असतील का? (.. आणि त्यांच्यापैकी काही असेच कमिशन खात असतील का?) त्यांचेही नेते असतील? त्यांच्याही पाटर्य़ा असतील? वेगवेगळे धर्म असतील? कारण नसताना एकमेकांची घरं जाळत असतील? पण त्यांच्याकडे तर आग नाही. निखारेही नाही! त्यामुळे त्यांना असले प्रश्नही पडत नसावेत. कविता लिहिण्याचीही गरजही नाही.

तुझा निखारा माझी फुंकर .. एक होऊ दे, एक होऊ दे

तुझी जिद्द अन् माझी ठोकर.. एक होऊ दे, एक होऊ दे!

असे कसे हे लोक अभागी.. आग लागली जागोजागी

तुझा 'राम' माझा 'पैगंबर'.. एक होऊ दे, एक होऊ दे!

लोक चालले 'काबा-काशी'.. एक भुकेला दुजा उपाशी

तुझी भूक अन् माझी भाकर.. एक होऊ दे, एक होऊ दे

आपण चार भिंती उभ्या करतो. आपल्याला वाटतं, आपण घर बांधलं. बंगला बांधला. छाती मोठी होते. एखादा तीस-चाळीस फुटाचा खड्डा खोदतो. त्यालाच आपण विहीर म्हणतो. त्या खड्डय़ातून बाहेर काढलेली मातीही आपली नाही. विहिरीतलं पाणीही आपलं नाही. आणि ज्यांच्याकडे विहिरी नाहीत, ते जगलेच नाहीत असंही नाही!

ज्याच्या जवळ काही नाही, त्याच्यासाठी निसर्ग आहे. त्यानं सर्वाची सोय करू ठेवली. आपण पक्क्या घराच्या भिंतीत राहात असूनही एका मर्यादेपलीकडे जगू शकत नाही. आणि तेही काही सोय नसल्यामुळे आल्या आल्या मरत नाहीत.

मग प्रगती केली म्हणजे आपण नेमकं काय केलं? हे खरं की ते खरं?

संभ्रमासारखी वा खर्‍यासारखी

याद येते तिची भोवर्‍यासारखी!

मी तिला वेगळे सांग काढू कसे?

पर्वताच्या मध्ये ती झर्‍यासारखी!

हे नद्यांनो! जरा काळजी घेत जा..

लाट येऊ नये. घाबर्‍यासारखी!

तोल गेला तरी मस्त येते मजा

ही दरी शेवटी. त्या दर्‍यासारखी!

या धुक्याच्या मुळे ती खुली वागली

एरवी वागते लाजर्‍यासारखी!

धुकं आपल्याला आवडते. अनेकदा अज्ञानातच आपण सुखी असतो. खरं तर सत्य आजपर्यंत कुणाला तरी गवसलं असेल का?

कृष्णानं लढायला शिकवलं. बुद्धानं सोडायला शिकवलं. पण हे सारं तत्त्वज्ञान माणूस नावाच्या विकृत प्राण्यासाठीच! एरवी लांडगेसुद्धा भूक भागल्यानंतर उगाचच सशांचे बळी घेत फिरत नसतात. जंगलचा राजाही आपल्या पन्नास गुहा असाव्यात असा कधीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्यांचे 'आदर्श' घोटाळेही नाहीत. तो आणि त्याची वाघीण.. आणखी दोन चार 'मैत्रिणी' असतील कदाचित.. बस्स!

एरवी पाणी नसतानाही दगडांच्या फटीतून आपली मुळं आत घुसवणारी आणि अगदी घट्ट रुतून बसलेली उंच पहाडावरची हिरवा कंच झाडं पाहिलीत की माणूस किती सामान्य आहे, याची प्रचिती येते. आपण किती केविलवाणे आहोत, याची कल्पना येते. सार्‍या भिंती तोडून आपण निसर्गाच्या सान्निध्यात थोडय़ा वेळासाठी जरी गेलो तरी जगण्याची नवी ऊर्जा भरभरून मिळते. माणसाची खरी उंचीही कळायला लागते.

खरं तर माणूस हा 'गेट्र' आहेच.. पण फक्त विकृतीमुळे मातीमोल झालाय..

लाख बहाणे केले तरीही

दूर किनारे गेले तरीही

ज्यांच्यासाठी लढलो ते ते

निघून सारे गेले तरीही..

तुझी न उरली सोबत तरीही

थांबणार मी नाही.. मन मारणारही नाही

हारणारही नाही कधी मी.. हारणारही नाही!

हे वणव्यांचे येणे जाणे

हे सलणारे बाभुळगाणे

दगडालाही फट असते ना

तिथेच माझे पेरीन दाणे!

येईल तेव्हा येईल पाऊस..

थांबणारही नाही.. मन मारणारही नही

हारणारही नाही कधी मी.. हारणारही नाही!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

साध्या मानसाचा होरपयभाज!


खेडय़ात आमच्या लहानपनी भजन, कीरतन हेच मोठय़ा मानसाचे चांगल्या गोस्ठीत टाईमपास कराचे साधन होते. तवा बाकी होतं काय खेडय़ात? गनपतीतं झाला तं एखांदा नकलीचा हरिभाऊ गाडगेचा कार्यकरम, नाईतं सरकारी कलापथक झालं. म्या सव्र्यात पह्यले लहान बोरीले इठ्ठल पाटलाच्या बैखटीत ह.भ.प. दत्तराम पाटलाचं परवचन आयकलं. ते खूप सुदं परवचन कराचे. तसे ते सातवा वर्ग सिकलेले. माह्या बोरीपरीस अंदरच्या लहानस्या सावया खेडय़ात राह्यनारे. पन त्यायची भाषेवर असलेली हुकमत आनं न्यानेसरीच्या ओयीची उकल मनाचा ठाव घेतल्याबिगर राहे नाई. माह्यासाठी अखीन एक आवडीचा इसय होता थो परवचनातले 'दृष्टांत'. तो इनोदातला असा परकार अस्ते का, निरा हासवत नाईतं, खूप काई देवून जाते. आता तं ते नाईत. पन ते होते तवा मी त्यायले इचारून घेतलं होतं, का ''मी माह्या कार्यकरमात हे लोकायले आयकवले तं जमन का?' ते म्हनत, ''माही काई हरकत नाई.''

थो किस्सा असा : एका खेडय़ातला जवान पोरगा सिकला. पन नवकरी नाई. बेकार.. चाला बोरीले जावं म्हून एकला निंघाला. तो थोडासा सामोर नाई येत तं एक घोडं चरतानं त्याले दिसलं. त्यानं इकडंतिकडं पाह्यलं. कोनीच नाई. त्याले वाटलं भटकलं वाट्टे. चाला आज बोरीचा बैलबजार हाय, जाऊ घेऊन. आज त्याचं नसिब इतकं बलवत्तर का त्याच्या गयाले दोरयी गुंडायून होता. त्यानं दोर काढला आनं निंघाला घोडं घेऊन. बजारात आल्यावर मंधात असलेल्या निंबाच्या झाडाच्या मुया भायेर निंघून अखीन जमिनीत गेल्या होत्या. त्याले त्यानं ''घोडं इकाचं हाय का?'' त्याच्यावर हा म्हने, ''हे का इचारनं झालं का भाऊ ?तसं घरचं जनावर असल्याच्यानं जीव लागते पन टाईम पडला. पयस्याची लय नुपर हाय म्हून काढलं इकाले.'' त्यानं मांगून पुढून घोडय़ाले पाह्यलं आनं याले इचारलं. ''काय किंमत ठुली?'' आता यानं बापजल्मात कवा घोडं कायले इकलं? पन त्याले आयकून माईत होतं का घोडं महाग असते आनं हे घोडं होतयी एकदम चांगलं. त्याच्याच्यानं त्यानं सांगितले, ''भाऊ, चायीस हजारांत द्याचं हाय!'' त्या आलेल्या मानसानं एक डाव घोडय़ाकडं पाह्यलं. एक डाव याच्याकडं पाह्यलं आनं येतो म्हून निंघून गेला. याच्या मनात आलं जादा सांगतली का आपन किंमत? जाऊ द्या. येईन कोनी.

थोडय़ा टायमानं एक दुसरा मानूस आला. तो म्हने, ''भाऊ घोडं इकाले आनलं का?'' त्याच्यावर्त हा म्हने, ''मंग काय त्याले हिंडवाले आनलं का? आता खरं तं असं हाय भाऊ याची आजी जे होती ना तयीपासून यायच्याच खानदानीचे घोडे आमच्या घरी हाय. एकदम खातरीचं जनावर हाय भाऊ.'' त्यानयी मांगून पुढून जनावर पाह्यल्यावर इचारलं, ''काय ठुली किंमत?'' आता यानं मनात इचार केला मंगा चायीस हजार सांगतले तो एक सब्दयी बोलला नाई. घोडं काय म्हसी परीसयी सस्त राहत असनं का लेकं?त्याले वाटलं पटकन इकलं कां झालं म्हून त्यानं तीस हजार रुपये देल्ले सांगून. त्या मानसानं एक डाव घोडय़ाकडं पाह्यलं एक डाव याच्याकडं पाह्यलं आनं चाल्ला गेला. हा पाहतच राह्यला. मनातल्या मनात सोतावरंच कातावून म्हने, आता कोनी आलं फुकट घेऊन जावं म्हनावं का इचिन. दहा, पंदरा मिन्ट झाले असनं का तिसरं गिर्‍हाईक येतानी दिसलं. यानं इचार केला हे गिर्‍हाईक जाऊच द्याचं नाई.

त्या मानसानं काई इचाराच्या आंधीच यानं चालू केलं, ''भाऊ हे शिंगरू असल्यापासून पोसलेलं जनावर हाय भाऊ. खातरीनं घेऊन जा तुमी. नाव घ्यान का काय घोडं देल्लं म्हून.'' तो म्हणे, ''पाहा कोनी आपल्या जनावराची तारीफच करनार हाय. कोनी हे सांगनार हाय का भाऊ घेऊ नका! हे घोडं डसरं हाय. असलं तरी तसं सांगनार हाय का?'' हा म्हने, ''नाई'' त्याच्यावर्त थो म्हने, ''आपलं कसं हाय घोडं कोनी दुधासाठी घेते का? नाई ना! मंग मले हे नाई पाहा लागन का हा पल्ला कसा चालते? कदम पयते का नाई? सांगा हे पाहा लागन का नाई?'' हा म्हने, ''पाहा ना भाऊ. आपली काई मनाई थोडीच हाय?'' यानं असं म्हनल्यावर्त त्यानं घोडय़ाच्या पाठीवर थाप देल्ली आनं घोडय़ावर बसून हॅक केल्यावर घोडं धावाले लागलं. तो घोडं घेऊन गेला. त्याले पंधरा मिन्ट झाले. हा वाटच पाहून राह्यला. आता ईन, मंग ईन. अर्धा घंटा झाला तरी त्याचा पत्ताच नाई. आखरीले हा वाट पाहू पाहू थकला पन तो काई आला नाई. तितल्यात पह्यल्यांदा जो मानूस घोडं पाह्यल्यावर येतो म्हनून गेला होता तो आला. घोडं तिथं दिसलं नाई म्हून त्यानं आल्या आल्या इचारलं, ''भाऊ घोडं इकलं कावो?'' हा म्हने, ''जेवढय़ाचं आनलं तेवढय़ाचंच इकलं!''

त्यायच्या परवचनातले असे 'दृष्टांत' मी जवा अठरा, ईस वर्साचा असीन तवा आयकले असले तरी ते इतके आवडले का, ना पाट करतायी निरे आयकून पाट झाले. पन त्यायच्या परवानगीनं जवा मी 'अस्सा वर्‍हाडी मानूस' हा कार्यकरम कराले लागलो तवा मंधा-मंधात सांगाले लागलो. असाच त्यायचा अखीन एक 'दृष्टांत' आठवून राह्यला. तो सांगून टाकतो. एका खेडय़ात तीन एकर वावर असलेला एक शेतकरी होता. तो आनं त्याची बायको दोघं लय मेहनती. आपल्या वावरात तं ते घाम गायेतचं; पन फुरसतीच्या दिसी दोघंयी दुसर्‍याच्या कामानं जाये. घरी एक गाय. तिले एक कार्‍होड आनं एक गोर्‍ह. तं चार बकर्‍यांच्या बारा बकर्‍या झाल्या. भरीत भर घालत घालत त्यायनं अराअरामानं दोन एकरानं जमीन वाढवली. घरच्या गाईचं गोर्‍ह मोठं व्हाले लागल्यावर त्याले जोड लावून घरची जोडी करून घेतली. त्या दोघायचा हात कवा रिकामा नाई. रोज सकायी उठनं, एकादसीच्या दिसी सकायी आंघोय करून इठ्ठल रूखमाईचं दर्शन घेतलं का कामात. एकदम साधा सभाव. कोनाच्या देन्यात नाई, तं घेन्यात नाई. मुखात हरी नाम आनं कामासी काम.

त्यानं सुताराकून वखर करून घेतल्यावर्त त्यासाठी लोखंडाची पास इकत घ्यासाठी मंगयवारी बोरीच्या बजारात आला. थोडा बजारात फिरफार झाला. एकदोन नातेवाईक भेटले. त्यायच्या संग ख्यालीखुशालीचं बोलनं झालं. दोयपारी किसनरावच्या हटेलात पोटाले अधार म्हून भजे खाल्ले. दोन तीन पासीचे दुकान होते. त्यातून पसंत पडलेली पास भावटाव करून इकत घेतली. पोरासाठी शेवचिवडय़ाचं भातकं घेऊन ते पुडी पाच हाताचा सेला, जो पटक्यावानी डोस्क्याले गुंडायला होता त्याच्यातच एका टोकाले बांधून डोक्स्याले खोसला. पास खांद्यावर मारोतीच्या गद्यावानी ठेऊन निंघाला पयदल गावाकडं. तो जमाना पयदलचाच होता. तवा का अँटो होते का? सर्रास फटफटय़ा.. हा जवा नदीपासी आला त्याले वाटलं पाणी पिऊन घ्यावं म्हून तो नदीत उतरला. धारीपासी आल्यावर्त पास रेतावर ठुली आनं हा धारीत मधांत गेला. हा वाह्यत्या पान्यावर हात

फेरून पानी पिऊनचं राह्यला का एक चतरा चोर मानूस नदीत उतरला. त्यानं इकडं तिकडं पाह्यलं, कोनाचं ध्यान हाय का? जवा त्याचा ध्यानात आलं का कोनाच ध्यान नाही यानं त्याची पास उचल्ली. त्याच्या परीस खोल धारीत गेला, वाकला आन् मांडीवर पास ठुवून पानी प्याले लागला. जसं ज्याची पास हुती त्याचं पानी पेनं झालं. त्यानं रेतीकडे पाह्यलं आन् त्याले पास न दिसल्याबराबरं तो अरे! अरे! कराले लागला. हा चोर इचारते, ''काय झालं?'' हा म्हन्ते, ''माही पास दिसत नाई राजे हो!'' ''कुठं ठुली होती?'' ''अवं इथं रेतीवरच ठुली होती ना!'' हा चोर त्याले म्हने, ''शायनाचं दिसतं रे! अरे, बजाराचा दिवस. सतरा जन येनारे-जानारे. अस्या वक्ती बेवारस ठेवत असते का? अस्या वक्ती कवायी आपला पास असी माह्यासारकी मांडीवर ठुली पाह्यजे. समजलं?''आपल्या देशात हे असंच चालू हाय. आपल्या निढयाच्या घामाच्या कमाईत घेतलेली वखराची पास असे चतरे बेइमान चोर कवा घेऊन जातेत हे बिचार्‍या साध्या मानसाच्या ध्यानातयी येत नाई. साधा मानूस पिढय़ान्पिढय़ा असा लुटल्याच गेला हाय.

(लेखक शंकर बडे    हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या'

हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

'संवेदना' हाच आपल्या जगण्याचा आधार


आम्ही अवघे 30-32 विद्यार्थी मॅट्रिकला होतो. सर्व जातिधर्माचे आणि पंथाचे. वाचनसंस्कार व्हावा म्हणून प्रत्येक वर्गाचे एक लहानसे ग्रंथालय होते. शिक्षक रजेवर असले, की आम्ही आमच्या आलमारीत ठेवलेली पुस्तके वाचत असू. प्रत्येक शनिवारी वादविवाद स्पर्धा असायची. शाळेतली सामूहिक प्रार्थना होताना आमचे पी. जी. सर पायपेटवर बसायचे. प्रार्थना म्हणजे सुमारे 15 ते 20 मिनिटांचा विविध कविता आणि गीतांचा सामुदायिक गायनाचा कार्यक्रमच असे. शाळा सुटली, की खेळासाठी स्वत: पी. जी. सर मैदानावर उतरायचे. पी. जी. सर म्हणजे पी. जी. कुलकर्णी सर. ते आमचे हेडमास्तर होते. सर्व जण त्यांना 'पी. जी. सर' म्हणत असत. शाळेतल्या विद्यार्थ्यांवर त्यांचा खूप धाक होता. त्यांचा धाक वाटावा असाच त्यांचा वेश होता. खादीचा पायजमा, खादीचाच पांढराशुभ्र नेहरू शर्ट, त्यावर जाकीट आणि डोक्यावर शिकारी हॅट. त्यांचा कपडेपणा सौम्य करणारी एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांच्या जाकिटाच्या खिशात गुलाबाचे एक टवटवीत फूल नेहमी असे. ते अतिशय उत्तम शिकवत असे. गणित, भूगोल आणि इंग्रजी याही विषयांत त्यांना सारखीच गती होती. त्यांनी शिकवलेले भूमितीतले प्रमेय आणि सोहबराव रुस्तुमची कथा मी अजूनही विसरलो नाही.

उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हाती छडी असे. क्वचित ते विद्यार्थ्यांना छडीने मारत असत. त्या वेळी त्यांचा चेहरा खूपच उग्र दिसे. शाळेतल्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना सेंडऑफ दिला जाई. तो कार्यक्रम खूपच भाऊक असे. पण आमच्या आधीच्या बॅचने सेंडऑफवर बहिष्कार घातला. नेमके काय बिनसले होते हे मला माहिती नाही. परंतु त्या बॅचमध्ये एकाहून एक हुशार विद्यार्थी होते. किशोर बंडेवार, पी. जी. भगत, जी. जी. नरवाडे हे तीन विद्यार्थी त्या वेळी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले होते. भगत आणि नरवाडे हे पुढे एक्झिकेटिव्ह इंजिनिअर झाले. हे सर्वच विद्यार्थी जन्मदलित आणि गरीब. तशी आमची शाळाच गोरगरीब आणि दलित विद्यार्थ्यांची होती. या विद्यार्थ्यांमधून सुमारे 50-60 वर्षापूर्वी विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण व्हावेत यासाठी शिक्षक किती कष्ट घेत असतील याचा आजचा विद्यार्थी तर्क करणे शक्य नाही. विद्यार्थीही तसेच कष्टाळू आणि विनम्र होते परंतु त्या वर्षी काय बिघडले होते कोणास ठाऊक! विद्यार्थ्यांनी सेंडऑफवर बहिष्कार घातला आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या बॅचपासून शाळा विद्यार्थ्यांना सेंडऑफ देणार नाही, असा निर्णय पी. जी. सरांनी घेतला. मॅट्रिकच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याआधी शाळा एक परीक्षा घेत असे. त्या परीक्षेत जे नापास व्हायचे त्यांना परीक्षेचा फॉर्म भरू दिला जात नसे. त्यामुळे ती परीक्षा आम्ही मॅट्रिकपेक्षाही जास्त महत्त्वाची मानत असू. शाळेला असा अधिकार आहे किंवा नाही असा प्रश्न त्या वेळी आमच्या मनात येत नसे. आमच्या आधीच्या बॅचच्या अशाच दोन विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरू दिला नव्हता असे कळले. कदाचित त्या वर्गाने सेंडऑफवर बहिष्कार घातला त्याचे कारण हेच असावे.

आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी बैठक घेतली आणि शाळा आपणाला सेंडऑफ देणार नसेल तर हरकत नाही. परंतु आपण शाळेला सेंडऑफ द्यायचा असा निर्णय आम्ही घेतला. आमची परीक्षा जवळ आली. त्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी पास झाले. फॉर्म भरू शकणार नाही असा एकही विद्यार्थी आमच्या वर्गात नाही याचा आम्हांला आनंद झाला. आम्ही चार चार आणे गोळा केले. शाळेला कोणती भेटवस्तू द्यायची ही जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी आम्हा एकदोन विद्यार्थ्यांवर सोपवली. अर्थात, त्यात मी एक होतोच. खादी ग्रामोद्योगमध्ये आम्हांला 56 रुपयांची एक सुंदर बुद्धमूर्ती मिळाली. ती आम्ही समारंभपूर्वक भेट दिली. पी. जी. सर खूप भारावून गेले. त्यांचे डोळे किंचित पाणावले होते. ''आज विद्यार्थ्यांनी आम्हांला शिकविले,'' असं काहिसं ते भारावून म्हणाले. यापुढे विद्यार्थ्यांना मी छडीने मारणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि खरोखरच पी. जी. सरांनी विद्यार्थ्यांना मारले नाही. पुढे कित्येक दिवस ती बुद्धमूर्ती मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच होती. विद्यार्थी नकळतपणे शिक्षकांना शिकवू शकतो असा एक संस्कार माझ्या मनावर झाला.

पुढे मी शिक्षक झालो. पाचव्या आणि सहाव्या वर्गाला मी इंग्रजी शिक वत असे. विद्यार्थ्यांनी रोज दोन ते तीन शब्द स्पेलिंगसह पाठ करावेत असा साधा नियम होता आणि जो चुकायचा त्याला मी पाच छडय़ा मारत असे. माझे शिक्षक म्हणून ते पहिलेच वर्ष होते. सूर्यकांत नावाच्या विद्यार्थ्याला मी पाच छडय़ा मारल्या. छडय़ा किती जोरात माराव्या याचा मला संयम नसावा. परंतु दुसर्‍या दिवशी सूर्यकांतने पुन्हा तीच चूक केली आणि माझा राग खूपच वाढला. रागाने मी त्याला ''हात पुढे कर,'' असं म्हणालो. परंतु हात पुढे न करता तो माझ्या डोळ्य़ांत पाहत म्हणाला., ''सर, हातावर मारू नका.'' त्याच्या डोळ्य़ांत केवळ निर्भयपणाच नव्हता, तर धैर्य एकवटून त्याने ते वाक्य उच्चारले होते. तरीसुद्धा एक छडी मी त्याच्या पाठीवर ओढली आणि तास संपल्यानंतर भेटायला सांगितले.

मधल्या सुटीत सूर्यकांत मला भेटायला आला. मान खाली घालून माझ्यासमोर उभा राहिला. खरेतर तो मेहनती विद्यार्थी होता. परंतु तो ''सर, हातावर मारू नका असे तो का म्हणाला?'' मान वर न करता सूर्यकांत बोलू लागला, सर मी दुकानात काम करतो. तिथे हातात तराजू घेऊन वस्तू मोजाव्या लागतात. पुडय़ा बांधाव्या लागतात. परवा तुम्ही हातावर मारलं. मला तराजूने तोलता येत नव्हते. दुकानदार रागावला. सूर्यकांत भरभर बोलला. मी पुरता अंतमरुख झालो. शाळेत शिकताना मीही भाजी विकली. हातपंखे विकून घरसंसाराला मदत केली होतीच. परंतु मला शाळेत अशी काही अडचण आली नव्हती. मला सूर्यकांत खूप शिकवून गेला. शिक्षक शिकवतो; पण शिकता शिकता विद्यार्थ्यांकडूनही त्याला खूपकाही शिकता येते असा माझा अनुभव होता. पी. जी. सरांचा अनुभव आता मला अधिकच अर्थपूर्ण वाटला.

कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना पँथरची चळवळ अतिशय जोमात होती. माझ्या अनेक संतापी विद्यार्थ्यांना शांत करता करता माझ्या नाकीनऊ येत असे. त्या तरुण विद्यार्थ्यांचा संताप मला कधीच खोटा वाटत नसे. त्यांची भाषा खूप आक्रमक असे. पण ग्रामीण भागात होणारे अन्याय त्याहूनही भयंकर असायचे. त्यामुळेच त्यांचा संताप मला रास्त वाटे. 'अँग्री यंग मॅन'चा प्रतिनिधी म्हणून अमिताभ बच्चनचे सिनेमे त्या वेळी खूप लोकप्रिय झाले होते. 'जंजीर'मधील अमिताभ, त्याचे खलनायकावर तुटून पडणे काळजाला भिडत असे. परंतु थिएटरच्या बाहेर आलो, की अखेर तो सिनेमा होता या जाणिवेने सगळी धुंदी ओसरत असे. परिणामाची पर्वा न करता असं

असामान्य धाडस करणारी पोरं मला खूप आवडायची. त्यांचा उतावीळपणा सोडला तर काय चूक बोलत होती ती मुलं? याच विचारातून 'वाटा-पळवाटा' नाटकातला माझा अजरुन जन्माला आला. कोल्हापूर भागातल्या प्रा. गायकवाड नावाच्या एका तरुण प्राध्यापक मित्राने मला पहिल्याच भेटीत सांगितलं, सर मी कॉलेजमध्ये असताना मुलं मला 'वाटा-पळवाटा'

मधला अजरुन म्हणायचे. माझ्या नाटकातला अजरुन माझ्या विद्यार्थ्यांच्या योगदानातून जन्मला आहे. 'वाटा-पळवाटा' या नाटकानं मला खूप कीर्ती मिळाली. अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत मला याच नाटकानं पोहोचवलं. याचं अर्थातच बरचसं श्रेय माझ्या विद्यार्थ्यांनी निर्भयपणे माझ्याशी वाद घातले यात आहे. त्यामुळे एखाद्या प्रश्नाकडे अनेक बाजूंनी पाहता येते हे कळले.

आपल्या समग्र मराठी साहित्याकडे आपण पाहू लागलो म्हणजे आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. 60-70 टक्के लेखक व्यवसायाने शिक्षक आहेत. अत्यंत लोकप्रिय आणि सकस साहित्यनिर्मिती करणार्‍या लेखकांत 90 टक्के भरणा शिक्षकांचाच आहे. शिक्षकांना लेखन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पुरेसा निवांतपणाही मिळतो हे खरं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातल्या कुठल्याही प्रश्नाकडे चौफेरपणाने पाहता येईल अशी दृष्टी मिळते. त्यामुळे शिक्षकाला आतून समृद्ध होत जाणे सुलभ होते. जे शिक्षक ही समृद्धी शब्दांत प्रकट करतात ते लेखक होतात. पण जे लेखक होत नाहीत ते सातत्याने शिकवता शिकवता स्वत:ही कायम विद्यार्थी राहतात आणि स्वत: समृद्ध होतात ही मला लाखमोलाची गोष्ट वाटते.

माझे हे पी. जी. सर फार काही लिहू शकले नाहीत; पण आतून ते केवढे मोठे झाले होते! आयुष्याच्या अखेरीला त्यांना कॅन्सर झाला. त्यांच्या मुलाने भारतदर्शन घडवून आणण्याची त्यांची इच्छा पूर्ण केली. परंतु मदुराईला जाऊनही ते मीनाक्षीच्या मंदिरात गेले नाही. कारण काय, तर त्या मंदिराच्या बाहेर पाटी होती 'येथे हिंदूंनाच प्रवेश मिळेल.'''ज्या मंदिरातली देवता हिंदू-अहिंदू असा भेदभाव मानते त्या मंदिरात मी कशाला जाऊ?'' असे ते म्हणाले. आयुष्याच्या शेवटच्या बॅचमधले विद्यार्थी मोठय़ा संख्येने नापास झाले. त्यामुळे कित्येक दिवस ग्रॅच्युइटी मिळावी यासाठी त्यांनी अर्जच केला नव्हता. परंतु या सर्वावर कडी म्हणजे त्यांची शेवटची इच्छा होय. मृत्यूनंतरचे शरीर गंगेच्या प्रवाहात बुडवून त्याला गंगास्नान घालून सरणावर ठेवण्याची रूढी आहे. पण सरांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले, मी कॅन्सर पेशंट आहे. म्हणून असे काही करून गंगेचे पाणी दूषित करू नका. मला पी. जी. सरांसारखे शिक्षक लाभले यामुळे मला धन्य झाल्यासारखे वाटते. मला त्यांच्याएवढे मोठे होता आले नाही. परंतु निदान त्यांच्याइतकी

मनाची संवेदना ताजी ठेवावी असा प्रयत्न करीत राहण्याची ओढ जडली आणि हीच संवेदनशक्ती माझ्या लेखनाचा आधार आहे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084