Saturday 29 September 2012

..जरा हसा रे देवांनो!


कायदे का केले जातात? माणसाला शिस्त लावावी म्हणून!

निसर्गाचे कायदे वेगळे. माणसाचे कायदे वेगळे. निसर्गाचे नियम अनिवार्य असतात. ते तोडले की, त्याचे परिणाम आज ना उद्या आपल्याला भोगावेच लागतात. पण माणसानं तयार केलेल्या नियमांचं मात्र तसं नाही. माणसाचा कायदा तोडणार्‍या प्रत्येकाला सारखीच सजा होईल याची काही गॅरंटी नाही. कित्येकदा सजा होईल की नाही, याबाबतही काही सांगता येत नाही! आणि म्हणूनच मानवनिर्मित कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. माणूस पाहून कायद्याचा अर्थही बदलतो. मोठी माणसं मग कायदा वेठीस धरतात. सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास हळूहळू उडत जातो.

मुक्या माणसाचा कुणी शोक केला

बिचाराच होता, बिचाराच मेला!

पुन्हा मुंबईला निघाला 'सुदामा'

पुन्हा 'रेंज' बाहेर 'श्रीकृष्ण' गेला!

दुधासाठी त्याला हवी गाय होती

दिला 'रुक्मिणी'ने सुदामास हेला!

सामान्य माणसं बोलत नाहीत, त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. पण सज्जन असलेली मोठी माणसंही बोलत नाही. आणि जो बोलत नाही, त्याचा माल खपत नाही. त्याचं कुणी ऐकतही नाही.

द्रोणाचार्य कौरवांचे गुरू होते. पांडवांचेही गुरू होते. पण राजगुरू असूनही त्यांच्या मुलाला प्यायला दूधसुद्धा मिळत नव्हतं. त्यांची बायको कणकेचं पाणी करून मुलाला पाजायची. राजसत्तेला हे कळत नव्हतं का? त्यांनी आपल्या गुरूंचीही का म्हणून अवहेलना करावी? त्यांच्या घरी काय चाललंय, मुलाबाळांची काय अवस्था आहे, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, असा साधा विचारही त्यांच्या मनात का येऊ नये? जिथं गुरूंचीच अशी अवस्था तिथं सामान्य जनतेची काळजी करायला राजसत्तेला वेळचं कुठं असणार?

गुरू कधी मागत नसतात आणि खुर्चीवर बसलेले चेले कधीही त्यांचा विचार करीत नसतात. पूर्वीही तसंच होतं. आताही तसंच आहे. पण मग असंच असेल, गुरू खरंच नि:स्वार्थ, निरपेक्ष असतील तर मग त्यांनी एकलव्याला मात्र उजव्या हाताचा अंगठा कापून मागावा, याचं काय कारण?

तर राजकीय सत्तेचा दबाव! सर्वसामान्यानं पुढं जाऊ नये.. म्हणून राजसत्तेचा दबाव द्रोणाचार्यांवर होता. त्या ठिकाणी 'गुरू' म्हणून जो 'करारीपणा' त्यांनी दाखवायला हवा होता तो त्यांना दाखविता आला नाही. तेही शेवटी राजसत्तेलाच अप्रत्यक्षपणे शरण गेलेत. त्यांनीही लाचारी पत्करली. म्हणूनच एकलव्याचा अंगठा गेला. कौरवांच्या बाजूने माना खाली घालून द्रोणाचार्य-भीष्माचार्य लाचारीने लढले. लढत राहिले.

भीष्माचार्य म्हणो काही

कधी असे घडू नये

कौरवांच्या राज्यासाठी

अजरुनाने लढू नये!

हल्ली मात्र सर्वत्र सेटिंग चालते. कोण कुणाचा विरोधक हेच कळत नाही. वरवर सार्‍या मारामार्‍या चाललेल्या असतात. आतून मात्र सारं मॅचफिक्सिंग! प्रत्येकाचं आपलं वेगवेगळं गणित. जो तो आपला 'गेम' जगण्याच्या संधीसाठी टपून बसलेला.

एकदा,

एका माणसानं

चुकून दगडाला सलाम केला

दगडानं तेवढीच संधी घेतली.

आपण दगडाचा देव झाला

आणि..

माणसाला कायमचा गुलाम केला!

ही आमची गुलामी अजूनही संपलेली नाही. संपण्याची चिन्हही दिसत नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढतानाच दिसते. देवाधर्माच्या नावाचा वापर करीत मोठमोठी युद्ध-महायुद्धे लादली गेली आहेत. आजही तेच प्रकार सुरू आहेत.

या इकडे अन् माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो!

ही धर्माची लफडी सोडा, जरा हसा रे देवांनो!

मंदिर-मस्जीद करता करता, माणूस पागल झाला

हृदयी त्याच्या तुम्ही एकदा, जरा धसा रे देवांनो!

कुणी ओढतो रेष मधे अन् देश वेगळा होतो

त्या रेषेचे धाय मनातून जरा पुसा रे देवांनो!

इथला सैनिक, तिथला दुश्मन, अर्थ बदलतो सारा

रंगासोबत न्याय बदलतो, असा कसा रे देवांनो!

'तो' येण्याची पुन्हा नव्याने, बोंब कशाला मारू

सांगून सांगून थकला माझा, खुळा घसा रे देवांनो!

माणूस इतका इब्लिस कैसा, मला कळेना देवा..

काय घेतला तुमच्या पासून खरा वसा रे देवांनो!

ज्याचा त्याचा देव त्याच्या त्याच्या मनाप्रमाणे. इच्छेप्रमाणे असतो. देवांची निर्मिती हीच मुळी माणसाच्या डोक्यातून झालेली. त्यामुळे लोकांनी सोयीचे देव तयार केलेत. नंतरच्या पिढय़ांनी त्यातले आपापल्या सोयीने स्वीकारले. त्यांचे पोवाडे गाणे सुरू झाले. आरत्या झाल्या आणि माणसाने निर्माण केलेला देव त्याच्याच उरावर बसला!

पण माणूसही वस्ताद. दगडातला देवही वस्ताद.

हा आपला हेका सोडत नाही. देव आपली जागा सोडत नाही. साध्याभोळ्य़ा लोकांचं यात विनाकारणच मरण होतंय.

पत्थरांच्या देवतांचे हे थवे कोठून आले

आधीचे तेहेतीस कोटी, हे नवे कोठून आले!

आता माणूस तर सुधारत नाही, देवांनाच काही सांगायला हवं..!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment