Friday 21 September 2012

माणसं ही..


वर्षभरापूर्वी अकोला आकाशवाणीवर एक कार्यक्रम यायचा 'माणसं ही वतरुळाबाहेरची' नावाचा. चाकोरीबाहेरचं जगणं जगणार्‍या, जगलेल्या माणसांच्या कार्याचा वेध घेणारा तो कार्यक्रम होता. सहज लक्षात असणारं शीर्षकगीत असल्यामुळे येता-जाता गुणगुणायची. एकदा सहज विचार केला माणसं ही वतरुळाबाहेरचीच असतील का? कोटय़वधी माणसांनी व्यापलेलं हे जग फक्त वतरुळाआतली अन् वतरुळाबाहेरचीच असतील का? अन् मग नाना रंगांची, नाना तर्‍हांची माणसं आठवू लागली. मुळातच प्रत्येक कल्पनेला मूर्तरूप द्यायची सवय म्हणा, व्यवसाय म्हणा असल्यामुळे त्यांना प्रतिकांमध्ये शोधू लागलो. काही कशी दिसलीत, तर काही अशी दिसलीत.

काही माणसं असतात तुम्हाला मैदानात उतरवून तुमची गंमत पाहणारी, काही नुसतीच सल्ला देण्यासाठी जन्माला आलेली. काही वात पेटवून देणारी, काही तुमच्यावर हसणारी, काही तुम्हाला हसवणारी, काही प्रकाश दिसू लागल्यावर दिव्याकडे झेप घेणारी, काही मिट्टं काळोखात तुमचा हात हातात धरून तुमच्यासोबत वाट चालणारी, काही तुमच्या हृदयात कायम जिवंत असलेली तर काही जिवंत असून नसल्यासारखी, काही समजून घेणारी तर काही समज देणारी, काही फुलवणारी तर काही फुलवता-फुलवता स्वत:च फुलणारी, काही कायम गढूळलेल्या पाण्यासारखी तर काही स्फटिकासारखी नितळ, स्वच्छ झुळझुळ वाहणारी, काही वावटळीसारखी क्षणात विस्कटून टाकणारी तर काही ज्योतीच्या अंदाजानं वाहणार्‍या वार्‍यासारखी, काही निवडुंगासारखी आखीव-रेखीव पण बोचणारी तर काही काटेरीच पण बाभळीसारखी मुक्तपणे बहरलेली, बहुगुणी. काही परजीवी वेलीसारखी झाडाच्या आश्रयानं वाढणारी आणि झाडालाच गिळंकृत करणारी तर काही बांबूसारखी तुमचा बहर पेलण्यासाठी चारही बाजूंनी पाय रोवून उभी ठाकलेली. काही गिरणीसारखी डोकं उठवणारी भणभण लावणारी तर काही वेळूच्या बनासारखी प्रत्येक झुळकीसरशी नवे सूर आळवणारी, काही कीटकनाशकांसारखी संकटमोचक पण विषाचा अंश तुमच्यात सोडणारी तर काही जैविक खतांसारखी स्वत:ला विरवून तुमच्यात प्रतिकारशक्ती पेरणारी, काही मोबाईलच्या नेटवर्कसारखी रेंजमध्ये असेपर्यंत साथ देणारी तर काही तार्‍यांसारखी क्षितिजापर्यंत तुमच्यासोबत चालणारी. काही सूर्यप्रकाशासारखी चराचरात झिरपणारी तर काही नुसतेच सीएफएल दिव्यासारखी जेवढय़ाला तेवढे व्हॅट उजळणारी, काही फिनाईलच्या वासासारखी इच्छा नसताना नाकात शिरणारी तर काही पारिजातकाच्या सुगंधाप्रमाणे भरभरून घ्यावीशी वाटणारी, काही गुलाबाच्या

फुलांसारखी सुंदर, रंगीत पण टोचून अस्तित्व पटवणारी तर काही जास्वंदासारखी र्तुेबाज, रंगीत पण चरणावरती लीन होणारी, काही स्वप्नांसारखी झोप उघडल्यावर चुटपूट लावणारी तर काही टीव्हीवरच्या मालिकांसारखी रटाळ, कंटाळवाणी. काही पाण्यासारखी प्रत्येक रंगात मिसळून एकरूप होणारी तर काही मिठाच्या खडय़ासारखी जगणं नासवणारी, काही अंगणातल्या तुळशीसारखी प्रसन्न, मंगलमय वाटणारी तर काही अशोकासारखी उंचच-उंच पण कोणालाच सावली न देणारी. काही तनकटासारखी इच्छा नसताना घुसखोरी करणारी, जागा व्यापणारी तर काही आभाळासारखी अथांग, नानारंगी छटा ल्यालेली, डोळ्यात न मावणारी, काही वटवृक्षासारची जणू सावली देण्यासाठी जन्माला आलेली तर काही वेलीसारखी दुसर्‍याच्या कलाने वाढणारी, फुलांचा सडा टाकणारी, मांडवावर शोभा होऊन बहरणारी, काही झेंडूंच्या फुलांसारखी चलतीच्या काळात भाव खाणारी तर काही गुलमोहरासारखी स्वत:च्याच तोर्‍यात फुलणारी अन् इतरांनाही आनंद देणारी, काही दुर्वासारखी व्रतवैकल्यापुरतीच वापरली जाणारी एरवी दुर्लक्षित असणारी. काही भुईमुगासारखी वरवर काहीच नसणारी पण कोणाला दिसणार नाही अशाप्रकारे जमिनीच्या आत फळणारी, काही काँग्रेस गवतासारखी यत्र-तत्र-सर्वत्र उगवून हन्यास आणणारी तर काही सुबाभळीसारखी कुठल्याही ऋतूत मिळेल तिथून पाणी शोषून स्वत: हिरवीगार राहणारी पण जहरीपणे रुतणारी तर काही ढेंच्या या हिरवळीच्या खतासारखी दुसर्‍यांसाठी जमीन तयार करण्यासाठी स्वत:ला जिरवणारी, काही शहाळ्यासारखी वरून टणक पण आतून गोडवा साठवलेली, काही रस्त्यांसारखी एकमेकांना जोडून चालणारी..

माणसं, माणसं, माणसं! जाती-धर्मानं ओळखली जाणारी पण सगळे गुणदोष माणसांचेच असलेली..

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

No comments:

Post a Comment