Saturday 15 September 2012

असी कवितेची कथा


माहा लहानपनचा जो दोस्त हाय रघू, तो कोन्तीयी गोठ सांगते ते त्याच्या स्टाईलनं. आपन आयकल्याबराबर हासतो. पन थोडं थांबून इचार केला तं वाट्टे साद्या इनोदात तो किती खरी गोठ सांगून जाते. एक दिवस आमी अस्याच गोठी करत बसलो असतानी रघू काय म्हने, ''तुमा कवी लोकायचं काय अस्ते, तुमच्या मनाले उकयी फु टली कां तवा कविता लेयल्या जाते.'' पह्यले मले थोडसं हासाले आलं. पन मंग इचार केल्यावर्त म्हनलं किती खरं बोलून गेला हा. कवा कवा मनात बर्‍याच दिसाचं साचून अस्ते. त्याले आठोनीचा सेक लागत गेला का मनात साठून असलेली घटना गदगद करतं. तिले उकयी

फुटते. तिलेचं तं आपन कविता म्हंतो कानी? ईदवान लोकायपरीस आमचं साद्या मानसाचं सांगनं असं असते भाऊ! माहे कवितेचे तीन पुस्तकं निघाले तरीपन एखांद्या दिसी मले रिकामंपन असलं का मी ते पुस्तकं नाई तं ते ज्या वहीतून उतरवले ते वही वाचासाठी घेतो. त्याच्यात एखांद्या पानावर दोन ओयी नाई तं चार ओयी लेऊन असते. त्या ओयी त्याच्या पुढं ना सरकलेल्या कवितेच्या असते. मी अस्या वक्ती त्या दोन-चार खेपा म्हनून पाह्यतो ते यासाठी का वाहे सरकते का पुढं. पन त्या इतक्या हटकोर का पुढं जाचं नावचं घेत नाई.

मंग मनात असं येते का या चार ओयीचं सार काई सांगून जात असतीन तं कायले पायजे पुढच्या ओयी. आता पाहा मानसापासी सारं असन्याचं सुख असलं का त्याले सारे पुसतेत नात्यातले, गोत्यातले, ओयखीचे पायखीचे, पन त्याची सुगी सरली का दुखात कोनीचं फिरकत नाई.

सुखाच्या वाटय़ाला

सहा भागीदार

दु:खाच्या काटय़ाला

अणीचा आधार

मानसाचं मन म्हंजे एक कोडचं अस्ते कानी? त्याचा काई थांगपत्ता लागत नाई. त्यासाठी या चार ओयी-

मानसाच्या मनातलं

नाई समजलं कोडं

त्याचं मन असं जसं

धुवारीतून दिसे थोडं

कवा कवा जुन्या कविता वाचतानी असं वाट्टे यायच्या कडय़ा जोडता आल्या तं अखीन मजा येईन लेक ! तवा कसं राहे का समज नासमजपनाच्या धुर्‍यावर वय असं राहे का हुनेर यायचं राहे आन् लगन होऊन जाये.

सासरी सुद वाटे. पन मनातलं माहेर काई सुटे नाई. तिचं मन म्हने-

मन करे येरझारा

आला माहेरचा वारा

त्याले निरूप इचारा

तिच्या मनातली घालमेल भाऊ घ्याले आला का थांबे. पन मन किती इचितर का ते माहेरी तं ये. पन इथयी तिले ना गमे. चित थार्‍यावर नसल्याचं ध्यानात आल्यानं सोबतीनी तिले चिडवासाठी इचारतेत-

सगुन पाहू का बाई वं

तुले गमत काऊन नाई वं

जवा नाव तिकडचं घेतलं

नाई सगुन जागीचं हटलं

आता समजलं सारं काई वं

तुले गमत काऊन नाई वं

चार दिसानं पावना जवा दमनी घेऊन इले न्यासाठी येते तवा तिचं हरकीजलं तोंड आन् गडबड पाहून मायच्या जागी असलेली भावजय तिले म्हन्ते-

दमनी आली दारी

बाईले झाली घाई

कायची गडबड

ठेवून घेत नाई

पोरीचं लगन झालं का माहेरच्यायले अखीन एक कायजी अस्ते का, एकडाव तिले दिवस राहून लेकरू झालं का निपटलं. त्यासाठी तिले भावजय मायच्या कायजीनं, पन आडून हे सांगते का, चोयी अडस व्हाले लागली का आमाले सांगा.

चोयीचा खन बाई

आनला जरतारी

दाटनं आंगी तवा

निरूप धाडा घरी

पोरगी सार होते. संसारात रमते. पोरीच्या जातीची कमाल असते का इतके वर्स ज्या माहेरात काढले ते सोडून आपन इकडं सासरी आल्यावर या लोकात आल्यावर्त त्यायच्यात एकजीव कवा झालो हे तिचं तिलेयी समजत नाई आन् आता माहेर आपल्यासाठी किती उरलं ते कवितेच्या चार ओयीत सांगते-

मेनाचा अधार

असते कुकाले

माहेर तितकं

जिवाच्या सुखाले

ती सासरी रमत असली तरी भावजयीन निघतानी चोयी दाटाले लागली का निरूप धाडा हे ती इसरली नस्ते आन् हे असेचं दिस जात असतानी तिच्या गडबड झाल्याचं ध्यानात येते. हे गडबड खुसीची बातमी सांगनारी अस्ते. तो जमाना कसा का दिसा नवर्‍यासंग बोलाची उजागरी नव्हती म्हून तिले वाट्टे राती आले का सांगू. राती भासर्‍यासंग जेवाले बसल्यसाच्यानं इले खुनावता नाई आलं. नवरा जेवला आन् निंघून गेला भाहेर. हे कामधाम अटपून वाट पाहून साह्यली. वाट पाहू पाहू जवा ते अगतिक झाली तवा भितीतल्या आरस्यासंग सोताचं सोतासंग बोलाले लागली. मनातली गोठ सांगाले लागली.

सांगू कसी तुले बाई, माह्या मनातली गोठ

लपू लपू म्हनल्यानं, सांगन तुले माहे होठ

त्यायच्या पसंतीचा आज, सारा साज म्याव केला

चोरून चंची मामीजीची, इडा करून ठेवला

कानी लागून त्यायच्या, मले सांगाचं हायेना

बाट झाला ना काऊचा, त्याले झाला ना महिना

तिले आपल्या नवर्‍याले हे खुसीची मनातली गोठ सांगाची तिच्या जिवाची तगमग होत होती. आपल्या घरात नईन पावना येनार हाय हे जवा तिच्या नवर्‍याले समजते तवा याले भाई खुसी होते. मंग खुसीत आपली सादीसुदी बायको त्याले अखीनचं सुदी दिसाले लागते.

खाली गवताची सेज

तुहा मखमली पाय

तुह्या कुसीत वाढते

माह्या मनाची सकाय

आता अरामानं चालं, जरा अरामानं चालं

तुहा जीव तुले भारी, नोको पानी आता वढू

चढ पांदनीची सखे, तुव आता नोको चढू

कसा सेवाच्या भारानं, होते लाल तुवा गाव

आता अरामानं चालं, जरा आरामानं चाल

तुह्या जीवातला जीव, कसी मारतेवं ढुसी

होते तकलीब तरी, त्यात न्यारीचं वं खुसी

कसी केयीच्या सालीची, निंघे अलगद साल

आता अरामानं चालं, जरा अरामानं चालं

अस्या कडय़ा जोडून होईन का साखयी नाईतं कवितेची कथा?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment