Friday 21 September 2012

शेतकर्‍यांचे गणरायाला साकडे


गणनायका कालच तुझे धूमधडाक्यात आगमन झाले. आता दहा दिवस तुझा जयघोष, तुझ्या आरत्या, तुझे स्मरण होईल. तुझी ख्याती सुखकर्ता, दु:खहर्ता, तूच विघ्नहर्ता, तूच बुद्धीचीही देवता त्यामुळे तुझ्यासमोर शेतकर्‍यांचे दु:ख मांडावे, मला पडलेले काही प्रश्न मांडावे आणि मिळाली तर तुझ्याकडून काही उत्तरे मागावी याच हेतूने तुला हे पत्र लिहितो आहे.

अनेक वर्षापूर्वी कधीतरी 'उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' असे म्हटले जायचे. आज त्याच्या उलट, 'उत्तम नोकरी, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असे म्हटले जाते. त्याचा प्रत्ययही येतो. पण गणराया 'उत्तम शेती' कधी होती का रे? कारण लहानपणापासून 'शेतकरी कर्जामध्येच जन्म घेतो. कर्जामध्येच जगतो आणि कर्जामध्येच मरतो' हेच तर आम्ही ऐकत आणि पाहत आलो आहोत. तेव्हा कर्जातच जन्मणारा, जगणारा आणि मरणारा शेतकरी उत्तम शेतीचा धनी केव्हा होता? कारण शेतकर्‍यांना कायम कर्जबाजारी ठेवणारी शेती उत्तम कशी असू शकते? पण एकमात्र खरं आहे. जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा शेतकर्‍यांना 'किंमत' होती. पैसा असूनसुद्धा अन्नधान्य मिळत नव्हते. आणि पैसा खाऊन पोट भरता येत नव्हते. जगता येत नव्हते. आजही खूप प्रगती झाली आहे असे म्हणतात. परंतु पोट भरण्यासाठी अन्नच लागते. आता पोट भरण्यासाठी अन्नच लागत असेल आणि पैसा असूनसुद्धा अन्नधान्यच उपलब्ध होत नसेल तर अशा अवस्थेत शेतीला व पर्यायाने अन्नधान्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना महत्त्व आले असल्यास नवल नाही. मला आठवते, पूर्वी शेतीला लागणार्‍या सर्व सेवा अन्नधान्याच्या मोबदल्यातच मिळायच्या. शेतीवर काम करणारा मजूर स्पष्ट म्हणायचा, 'मालक मी मजुरीला येतो पण मोबदल्यात पैसे घेणार नाही. मला धान्यच लागेल.' गावचे बाराबलुतेदारही हेच म्हणायचे, 'मालक आम्ही तुमचे काम करतो पण आम्ही पैसे घेणार नाही आम्ही फक्त धान्यच घेऊ.' एवढंच काय गावचा न्हावीसुद्धा शेतकर्‍यांची वर्षभर हजामत करायचा आणि मोबदल्यात धान्यच घ्यायचा. कारण स्पष्ट होते. पैसा असला तरीही अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे धान्य मिळायचे कोठे? तुटवडय़ामुळे अन्नधान्याला किंमत होती. पर्यायाने अन्नधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍याला 'किंमत' होती. त्याचे सर्व व्यवहार पैशाशिवाय केवळ अन्नधान्याच्या मोबदल्यात होऊन जायचे. अन्नधान्य हेच 'कॅश' चे काम करून जायचे म्हणून त्याला कॅशची गरज क्वचितच पडत असे. परंतु 'हरितक्रांती'नंतर अन्नधान्याचा तुटवडा कमी होत गेला. अन्नधान्याची मुबलकता वाढत गेली तसतशी परिस्थिती बदलत गेली. आता अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतीला लागणार्‍या सेवा पैसा देऊनच मिळू लागल्या. पूर्वी अन्नधान्याच्या मोबदल्यात मिळणारी सेवा आता केवळ पैशाच्या मोबदल्यात मिळू लागली. शेतकर्‍यांचा आता कोणताही व्यवहार पैशावाचून अडू लागला. म्हणून मग तो 'कॅश' देणार्‍या क्रॉपच्या मागे धावू लागला. आणि तो 'बाजारा'च्या जाळ्यात अडकू लागला. आज शहरातली माणसं साळसूदपणे शेतकर्‍यांनी कॅश क्रॉपच्या मागे धावू नये असा फुकटचा सल्ला देतात. तेव्हा गणराया त्यांना शेतकर्‍यांची अगतिकता तू का समजावून सांगत नाही. तू तर बुद्धीची देवता, तू तुझ्या शहरातील भक्तांना शेतकर्‍यांचे दु:ख, अडी-अडचणी, समस्या समजावून घेण्यासाठी थोडी बुद्धी का देत नाही?

1980 मध्ये मी खेडय़ात राहायला गेलो तेव्हा मजुरांची दिवसाची मजुरी होती 5 रुपये. आणि पत्रकारितेसाठी 2000 साली जेव्हा गाव सोडले तेव्हा मजुरांची मजुरी होती 50 रु. रोज. 1980 मध्ये 1 दिवसाच्या मजुरीत मजुरांना सरासरीने 3 किलो धान्य घेता येत होते. कारण साधारणत: दीड रु. किलो धान्य त्यावेळेस मिळत होते. परंतु 2000 मध्ये मात्र त्याला एका दिवसाच्या मजुरीत 25 किलो धान्य मिळत होते. 2 रु. किलोने गरिबांना धान्य मिळत एक दिवसाच्या मजुरीत 3 किलो धान्य मिळत होते तेथे आता 1 दिवसाच्या मजुरीत 25 किलो धान्य मिळत असेल तर त्यामुळे प्रामुख्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट मजूर आता केवळ पैशाच्या स्वरूपातच मोबदला शेतकर्‍यांकडून मागू लागला. दुसरी महत्त्वाची गोष्ट घडली ती अशी की मजुराला एक दिवसाच्या मोबदल्यात 25 किलो धान्य मिळायला लागल्यामुळे त्याला आता पोट भरण्यासाठी आठवडय़ातील सर्वच दिवस काम करण्याची गरजच संपुष्टात आली. त्याला आता काही दिवस काम केले आणि काही दिवस काम केले नाही तरी त्याची पोटापाण्याची गरज भागू लागली. स्वस्त व मुबलक धान्य मजुरांना उपलब्ध होऊ लागल्यामुळे मजुरांची सौदाशक्ती (बार्गेनिंग पॉवर) वाढली तर तीच शेतकर्‍यांची शक्ती कमी झाली. आज तर मजुरांच्या बाबतीतली शेतकर्‍यांची अवस्था अगतिकच नव्हे तर केविलवाणी झाली आहे. यावर शहरी लोकांचा आजही विश्वास बसत नाही. गणराया तू तरी तुझ्या शहरी भक्तांना ही परिस्थिती समजवून सांग. तुझं तरी ते ऐकतील.

गणराया, भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावरच आधारित होती आणि आजही आहे. म्हणजे एका अर्थाने भारतीय शेती 'राम'भरोसेच आहे. पाऊसपाणी चांगलं झालं तर शेती पिकणार. पावसाने दगा दिला तर शेती सुकणार अशी अवस्था. त्यातही भारतीय शेती श्रमावर किंवा मजुरांवर अवलंबून आहे. निसर्गावर आधारित शेतीला 'राम'भरोसे म्हटले तर श्रमावर आधारित शेतीला 'काम'भरोसे शेती म्हणू या. जोपर्यंत शेती 'राम'भरोसे आणि 'काम'भरोसे होती तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी जरी असला तरीही त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली नाही. निसर्गाचे तडाखे तो आजपर्यंत खंबीरपणे सोसत राहिला. परंतु जेव्हा शेतकर्‍यांना 'कॅश क्रॉप'च्या मागे धावणे भाग पडले तेव्हा शेती प्रामुख्याने भांडवलाधारीत व्हायला लागली. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हायला लागला. संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, बी.टी. बियाणे यांचा वापर शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला. तसतशी शेती खर्चिक होत गेली. भांडवलाधारीत शेतीला आपण 'दाम'भरोसे शेती म्हणू या. रामभरोसे शेतीचा फटका शेतकर्‍यांनी सहन केला. पण बाजार त्यांच्या नियंत्रणात नसल्यामुळे 'बाजाराने' त्याला भर बाजारात नंगा करून सोडला. पूर्वी घरचीच बियाणे, घरचीच खते त्यामुळे यासाठी बाजारात काही विकत घ्यायला जाण्याची गरज नव्हती. आणि शेतीला लागणार्‍या बहुतांश सर्व सेवा अन्नधान्याच्या मोबदल्यातच पूर्ण होत असल्यामुळे 'बाजारात' मालही विकायची गरज तुलनेने कमीच, म्हणजे बाजारातून शेतीसाठी लागणार्‍या वस्तू कमी विकत घ्याव्या लागायच्या व बाजारात विकायला न्यायच्याही वस्तू कमीच असायच्या. त्यामुळे बाजाराशी संबंध कमी म्हणून बाजारात होणारी शेतकर्‍यांची लूट वा शोषण कमी व्हायचे. आता मात्र तो चांगलाच बाजाराच्या कात्रीत कापल्या जात आहे. पूर्वी आणि आताही शेतकर्‍यांच्या नियंत्रणात निसर्ग किंवा 'राम' केव्हाच नव्हता पण मजूर त्यांच्या नियंत्रणात होता आता तर 'राम'ही त्याच्या नियंत्रणात नाही मजूर अर्थात 'काम'ही त्याच्या नियंत्रणाबाहेर आणि बाजार किंवा 'दाम'ही त्याच्या हाताबाहेर अशा अवस्थेत गणनायका त्याने काय करावे रे? निसर्गाने झोडपावे, बाजाराने लुबाडावे आणि आता गावच्याच मजुरांनी नाडवावे अशा अवस्थेत तो आत्महत्या करीत असेल तर देवा, गणराया, गणनायका, विघ्नहर्ता तू तरी थोडाबहुत त्याच्या मदतीला धाव. शेतकर्‍यांवर येत असलेल्या संकटांचे, विघ्नांचे हरण कर.

देवा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा अमेरिकन डुकरांना खायला घालण्यात येणारा गहू मिळविण्यासाठीसुद्धा रांग लावावी लागायची. तुझ्या मोदकांसाठीसुद्धा धान्य उपलब्ध व्हायची मारामार होती. तेव्हा देवा शेतकर्‍याला किमान किंमत होती. अन्नधान्याची टंचाई होती व देश अन्न-असुरक्षित होता. तुझा मोदक बनविणेही पैसे असूनही जिकिरीचे जायचे तेव्हा गणराया शेतकरी किमान अन्न सुरक्षित होता. पण विघ्नहर्त्या शेतकर्‍यांनी अन्नधान्याचा तुटवडा नष्ट करून देशात अन्नधान्याची सुबत्ता आणली. देशातील अन्नधान्याची गोदामे त्याने अन्नधान्याने तुडुंब भरली. देश अन्न सुरक्षित झाला. तुझ्या मोदकांसाठी अन्नधान्य सहज उपलब्ध होऊ लागले म्हणून देवा तू तरी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याची पाठराखण करायची होतीस पण गणनायका तूसुद्धा शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार आहेस का रे?

तू देव असशील, सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, गणनायक, संकटनिवारक, मंगलमूर्ती सर्व काही असशील पण देवा तुलासुद्धा पोट आहे. त्यात तुझे पोट तर थोडे मोठेच. ज्याअर्थी तुला पोट आहे त्याअर्थी तुलासुद्धा पोट भरायला अखेर अन्नाचीच गरज असेल ना रे? तुझ्यासाठीच नव्हे तर सार्‍या जगाचे पोट भरणारा हा अन्नदाताच आज उपाशापोटी आहे याची तुला अजिबातच जाणीव नाही का रे? तुझं जाऊ दे. पण तुझं वाहन तरी कोण्या पेट्रोल, डिझेल किंवा विजेवर चालतं? तुझं वाहन उंदीरही अखेर अन्नधान्यावरच पोसल्या जातो ना?

गणराया, तू तर सर्वज्ञ तरी तुला विचारतो. तुला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो माहीत आहे का रे? त्यांनी यावर्षीचा आपला अहवाल जाहीर केला. त्यात 1995 ते 2011 या 16 वर्षाच्या कालावधीत 2 लाख 90 हजार 470 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. म्हणजे गेल्या 16 वर्षात जवळपास तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असताना राज्यकर्ते, समाजकारणी, राजकारणी, वक्ते, विचारवंत कोणीच कसे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही? या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देण्याची बुद्धी तू त्यांना दे. कारण अखेर तू बुद्धीचाही नायक आहे.

विघ्नहर्त्या, गणराया, गणनायका काहीही कर पण दिवसेंदिवस शेतकर्‍यांवर येणारी विघ्न तू हरण कर यासाठी तुला मी शेतकर्‍यांच्या वतीने साकडे घालतो आहे.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment