Saturday 30 June 2012

सरपंचीन


'सरपंचीनबाई आहेत काय घरी?''

''कोन हाय?''

''मी आहो नाना.''

''काय पाह्यजे?''

''सही पाह्यजे तुमची अर्जावर.''

''त्याहिले करून मागा सही.''

''सरपंच कोन? तुम्ही की तुमचे हजबंड?''

''सरपंच मीच हावो, पन सद्या मी शेनाच्या गवर्‍या करून

राह्यली, माहे हात भरेल हायेत.''

''कुठं गेले अजाबराव?''

''ते टप्पर घेऊन गेले आखरात.''

''कमाल झाली! आपल्या गावाले हागनदारी मुक्तीचं बक्षीस भेटलं अन् तुमचे हजबंड टप्पर घेऊन गेले?''

''तसंच असते, एकखेप बक्षीस भेटल्यावर कोनी पाह्यत नसते.''

''संडास नाही काय तुमच्या घरी?''

''संडास आहे, पन संडासात त्याहीचा दम कोंडते, म्हनून ते मोकळ्या मैदानात जातात, मोकळ्या जागेत मस्त बिळी ओढता येते.''

''सही करा अर्जावर.. मले उशीर होते.''

''कायचा अर्ज व्हय?''

''नळाचा अर्ज व्हय! आमच्या पुर्‍यात पंधरा दिवसांपासून पानी नाही, सार्‍या गावात पान्याची बोंब सुरू आहे, पानी आलं तरी गढूय येते.''

''इर नाही काय तुमच्या पुर्‍यात?''

''इरीचं पानी खारं हाय.. खार्‍या पान्यानं तब्यता बिघडून राह्यल्या, जरा गावात चक्कर मारत जा..''

''हे पाहा.. मी फक्त नावाची सरपंचीन आहो,

सारा कारभार तुमचे भाऊच पाह्यतात, मले फक्त म्हशीचा धंदा येते, शेन काढता येते, चारा टाकता येते, म्हशी दोयता येतात, याच्या वरते काही समजत नाही, विधानसभा मुंबईले असते की दिल्लीले असते तेही ठाऊक नाही, पन तुमच्या भावानं कोशीश केली म्हनून मी सरपंचीन झाली.''

''मंग काय फायदा? सरपंचाले राजकारन समजलं पाह्यजे,

भाषन देता आलं पाह्यजे.''

''मले भाषन देता येत नाही.''

''भाषन देऊ नका.. आमाले पानी द्या.. आमच्या पुर्‍यातला नळ आटला.. हापसी आटली.''

''कायजी करू नका.. पुढच्या वर्षी पान्याची टाकी सुरू होइन तुमच्या पुर्‍यातली.''

''कधी होइन? पाच वर्षांपासून जलस्वराज्य योजनेतून अर्धवट पान्याची टाकी बांधून ठेवली, वरचा घुमट बांधला पन तिले पाईपच जोडले नाहीत, टाकीच्या अंदर सीडी लाऊन लोकं झोपतात, अंदर गंजीपत्ता खेयतात, तीस लाखाची टाकी बांधली, त्यातले अर्धे पैसे खाऊन साहेब फरार झाला, काम अर्धवट सोडून देलं.. यावर काय केलं तुम्ही?''

''त्या टाइमले मी सरपंचीन नव्हती.''

''मग आता काय करून राह्यल्या? नुसत्या गवर्‍याच थापता काय?''

''तुमचे भाऊ आल्यावर पान्याची सोय करतीन, सारा कारभार तेच पाह्यतात, तेच सह्या ठोकतात.''

''मग काय तुम्ही फक्त नावालेच सरपंच झाल्या?

जरा गावात चक्कर मारत जा, कुठं काय चाललं ते पाह्यत जा.. ग्रामपंचायतमध्ये पान्याच्या नावावर भ्रष्टाचार होऊन राह्यला.''

''कसा?''

''तो विहिरीवाला दादाराव पंचायतचे पैसे खाऊन राह्यला, दर मयन्याले पान्याच्या नावावर तीन हजार वसूल करते, पन पानी सोडतच नाही.''

''मग काय करते?''

''स्वत:च्या वावराले पानी देते अन् फुकटचे पैसे वसूल करते.''

''त्याहीच्या कानावर घाला.''

''काही फायदा नाही, तो दादाराव भाऊले पाटर्य़ा देते म्हनून भाऊ मुके राह्यतात, त्यात आमचं मरन होते, उद्या माह्या पुतन्याचं नानमुख हाये, त्याच्या घरात पान्याचा थेंब नाही.''

''मग मी काय करू? पुर्‍या तालुक्यातच गढूय पानी येऊन राह्यलं.. ते तुमचे भाऊ आले टप्पर घेऊन.. सांगा त्याहिले.''

''काय व्हय नाना?''

''काय राज्या अजाबराव.. अजाब काम आहे तुमचं!''

''काय झालं?''

''पंधरा दिवसापासून आमच्या पुर्‍यात पानी नाही, त्यासाठी मी सरपंचीनबाईजवळ आलो, बाई म्हनते बुवाले सांगा.''

''काय पानी पानी करून राह्यला बे? आता पावसायाच लागला.. एक जबर पानी आलं की धरनाले पानी येते.''

''उद्या लगAाले पानी कुठून आनाव ते सांगा?''

''उद्यापुरता एक टॅंकर बलाऊन घे.. फिकर करू नको.. सहा मयन्यात आपल्या गावात तीन मजली टाकी बांधून भेटते, आपल्याले तीन टक्के कमिशन भेटते, ग्रामपंचायतच्या इलेक्शनात आपले दीड लाख खर्च झाले, ते काढा लागनार नाहीत काय?''

''म्हणजे पैसे खायासाठी तुम्ही बायकोले सरपंच केलं काय?''

''दोन्ही गोष्टी होतात, गावची सेवा होते अन् पैसाही भेटते, अरे इलेक्शनच्या दिवशी म्या पाचशाच्या नोटा वाटल्या, देशीची गंगा रातदिवस सुरू होती, आगुदर आपला खर्च काढा लागते, मंग गावाच्या विकासाचा विचार करा लागते.''

''कमाल आहे तुमची!''

''पुढच्या वर्षी तिले जिल्हा परिषदले उभी करतो, अन् शंभर टक्के निवडून आनतो, लेडीज राखीव सीट असली की तुही वैनीच झेडपीची अध्यक्ष होते, पाच वर्ष अध्यक्ष राह्यली की तिले आमदारकीले उभी करतो, एकखेप आमदार झाली की तिले राज्यमंत्रीच करतो, लाल दिव्याची गाडी दारापुढे उभी करतो.. तू फक्त पाह्यत राह्य.''

''धन्य आहे तुमची! बाइले राज्यमंत्री करा अन् वार्‍यावर वरात काढा.. गावची सुधारना गेली चुलीत.. यालेच म्हंतात शायनिंग इंडिया!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत)

श्रीकृपा कॉलनी, अकोला रोड, अकोट जि.अकोला

भ्रमणध्वनी - 9561226572

स्नेह देसाईनंतर आता पोलखोल दत्ता घोडेची!


'थर्ड आय'ची जाहिरात करणारा 'निर्मल बाबा' सध्या अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस केसेस दाखल झाल्या आहेत. 'थर्ड आय' अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती दोन दिवसांच्या वर्कशॉपमधून (प्रत्येक विद्यार्थ्याची) जागृत करून दाखवतो. फक्त त्यासाठी 6900 रुपये फी भरून माझ्या कार्यशाळेत दाखल व्हा असा भंपक दावा करणारा अहमदाबादचा माईंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईनं चक्क आव्हानातून पळ काढला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याला 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं होतं. ते न स्वीकारताच पळून जाणं त्यानं पसंत केलं.

नागपुरात आता स्वत:ला डॉ. म्हणवणार्‍या एका नकली डॉ. दत्ता घोडेची कार्यशाळा होणार आहे. त्याची काही व्याख्यानं वसंतराव देशपांडे सभागृहात झालीत. तो कमी पैशात अद्भुत शक्ती प्राप्त करून देण्याचा दावा करतो. 5500 रुपये भरा माझी कार्यशाळा करा तुमचा 'सिक्स्थ सेन्स' जागृत होतो. त्यामुळं तुम्हाला तुमच्या परिचित माणसाशी तो कितीही दूर असला तरी टेलिफोनशिवाय संवाद साधता येईल, बोलता येईल. एका माणसाचं मन दुसर्‍या माणसाशी बोलू शकेल. म्हणजेच 'सिक्स्थ सेन्स' जागृत होईल. अंतराची मर्यादा नाही. परदेशातल्या माणसाशीही तुम्हाला (विदाऊट आयएसडी चार्जेस) संवाद साधता येईल, असा दावा या दत्ता घोडेनं केला. हाही माईंड पॉवर ट्रेनर. स्नेह देसाईसारखाच दुसरा एक ठग.

यालाही अ. भा. अंनिसनं 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं. हाही न स्वीकारता पळ काढणार! शनिवारी हा लेख प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी त्याची कार्यशाळा नागपुरात हिंदी मोर भवनात (सीताबर्डी, नागपूर) सुरू होणार आहे. आणि दत्ता घोडेनं आव्हान स्वीकारलं नाही तर अ. भा. अंनिस कार्यशाळेसमोर त्याच्या निषेधासाठी निदर्शनं करणार आहे.

अ. भा. अंनिस गेली 30 वर्षे बुवाबाजी, चमत्कार करणार्‍या बाबांचा, मांत्रिकांचा, देव, देवी अंगात असल्याचा दावा करणार्‍यांचा, ज्योतिष्यांचा भंडाफोड करते आहे. आजवर हजारो अशा भोंदूंचा पर्दाफाश समितीनं केला आहे.

पण अलीकडे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांच्या नावाखाली, सुटबुटटाय घालून, आधुनिकतेचं व वैज्ञानिकतेचं सोंग आणून जुनीच बुवाबाजी धुडगूस घालते आहे. लहानपणापासून मनावर झालेल्या अंधश्रद्धाळू संस्कारांचा फायदा उचलून, विविध आमिषं दाखवून सामान्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे.

भगवी कफनी घातलेल्या बाबांपेक्षा हे सुटबुटातले बाबा जास्त घातक आहेत, धोकादायक आहेत, तरुण पिढीला खड्डय़ात टाकण्याचं काम करणारे आहेत.

'व्यक्तिमत्त्व विकास' ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे आधुनिक सुटाबुटातले बाबा त्याचाच फायदा उचलून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली बेमालूमपणे अंधश्रद्धा

पेरताहेत व स्वत:ची तुंबडी भरताहेत. म्हणून यांना यांची जागा दाखवणं व यांना गजाआड करणं नितांत गरजेचं आहे.

स्नेह देसाई आणि दत्ता घोडे या दोघांचेही दावे सारखेच आहेत. एक 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' म्हणतो, दुसरा 'सिक्स्थ सेन्स' म्हणतो, एवढाच काय तो फरक. देसाई म्हणतो, तुम्ही कुठेही जाऊन सूक्ष्म देहाने पाहू शकता. दत्ता घोडे म्हणतो, तुम्ही इथे राहून कुठेही, कितीही अंतरावरच्या माणसाशी बोलू शकता. पॅरासायकॉलॉजीमध्ये 'अँस्ट्रल ट्रॅव्हल'ला 'क्लेअरोव्हायन्स' म्हणतात. दूर-संवादाला 'टेलिपॅथी' म्हणतात.

म्हणून दोघांनाही अ. भा अंनिसनं सारखं आव्हान टाकलं. आम्ही एक सत्य अन्वेषण समिती गठित करू. त्यात नागपुरातले ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते असतील. स्नेह देसाई व दत्ता घोडेनं निवडलेल्या एका माणसाला एका बंद खोलीत बसवलं जाईल. या व्यक्तीला सत्य अन्वेषण समिती काही कृती करायला वा बोलायला सांगेल. तो भाग व्हिडीओ रेकॉर्ड केला जाईल. त्याचवेळी स्नेह देसाई वा दत्ता घोडे पत्रकार संघाच्या हॉलमध्ये बसून त्यांच्या माणसानं काय कृती केली वा बोलला हे मेडिटेशनमध्ये जाऊन थर्ड आय जागृत करून वा सिक्स्थ सेन्स जागृत करून सांगावं. तेही व्हिडीओ रेकॉर्ड केलं जाईल. सत्य अन्वेषण समिती दोन्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून निर्णय देईल. जर स्नेह देसाई व दत्ता घोडेला 95 टक्के खरं सांगता आलं तर त्यांचा दावा खरा आहे असं मानलं जाईल. पुन्हा एकदा सेम प्रक्रिया रिपिट केली जाईल. दोन्हीदा 95 टक्के खरं ठरलं तर अ. भा. अंनिसचं 15 लाखांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. पहिल्यांदा त्यांना 95 टक्के खरं सांगता आलं नाही तरी दुसर्‍यांदा स्नेह देसाई वा दत्ता घोडे यांना संधी दिली जाईल.

या पद्धतीचं आव्हान स्नेह देसाईला पाठवलं. त्यानं स्वीकारण्यास नकार दिला म्हणून कोरिअरनं पाठवलं. तेही त्यानं नाकारलं म्हणून ई-मेलनं पाठवलं.

दत्ता घोडेला आव्हान प्रत द्यायला कार्यकर्ते गेले. त्याच्या माणसांनी ते घेतलं नाही. दुसर्‍यांदा गेले तेव्हा स्वीकारत नाही म्हणून त्याच्या माणसांसमोर आव्हान प्रत ठेवून आले.

एवढंच नव्हे तर विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने अ. भा. अंनिसनं आयोजिलेल्या 27 जूनच्या 'थर्ड आय किती खरं किती खोटं' या जाहीर कार्यक्रमात दत्ता घोडेलाही स्नेह देसाईसोबतच जाहीर आव्हान दिलं आहे. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. हॉलमध्ये जागा अपुरी पडल्यामुळं अनेकांना परत जावं लागलं होतं.

थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, दिव्यशक्ती, सिक्स्थ सेन्स, टेलिपॅथी या सगळय़ा प्रकारांबद्दल मी वा माझी समिती एवढं ठामपणे कसं काय बोलू शकतो? असा प्रश्न आपणास पडला असेल.

दिव्यशक्ती, अँस्ट्रल ट्रॅव्हल, क्लेअरोव्हायन्स याचा अर्थ ''व्यक्ती एका ठिकाणी असताना त्याचा देह तिथेच राहतो. पण सूक्ष्म देहानं वा अन्य शक्ती मार्गानं तो कुठेही जाऊ शकतो, पाहू शकतो. स्वत: डोळय़ानं पाहिल्यासारखं सगळं त्याला दिसतं,'' असं मानलं जातं. कुठेही याचा अर्थ क्षणात, जगात कुठेही अमेरिकेत, हिमालयात कुठेही.

टेलिपॅथीचा अर्थ कितीही अंतरावर दोन माणसं असली तरी त्यांना कोणत्याही अस्तित्वात असलेल्या माध्यमांशिवाय संवाद साधता येतो. मन मनाशी बोलू शकतं.

या दोन्ही समजुती वा कल्पना जगभर अस्तित्वात होत्या. आध्यात्मिक शक्तीमुळं काही लोकांना, योग्यांना, साधूंना या प्रकारची क्षमता वा शक्ती प्राप्त होते अशी मान्यता होती.

माझं पंचवीस वर्षांपर्यंतचं आयुष्य आध्यात्मिक वातावरणात गेलं आहे. मला स्वत:ला या सगळय़ा शक्तींविषयी प्रचंड जिज्ञासा होती. खूप अभ्यास केला. विनोबा भावेंसारखा योगी जवळून पाहिला, अनुभवला. अनेक पोहोचलेल्या (म्हणजे आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेल्या) बाबांच्या नादी लागलो. पुढे या विषयाचा जमेल तेवढा अभ्यास केला. पण काही सापडेना.

मी पुण्याच्या किलरेस्कर प्रेसमध्ये पत्रकाराची नोकरी करायला लागल्यावर 80-82 सालात विज्ञानवादी विचारांचा परिचय झाला. अभ्यासाचा परीघ वाढला आणि पुढे कळलं, आपण ज्याचा शोध घेतो आहे त्या विषयांवर शास्त्रशुद्धरीत्या संशोधन झालं आहे.

अमेरिकेमधील डय़ूक युनिव्हर्सिटीमध्ये एक पॅरासायकॉलॉजी (परामानसशास्त्र) डिपार्टमेंट होतं. डॉ. जे.बी. र्‍हाईन यांच्या नेतृत्वाखाली तिथे सगळय़ा आध्यात्मिक शक्तींबाबत संशोधन सुरू झालं. त्यांनी या सगळय़ा शक्ती तपासण्याची एक शास्त्रशुद्ध अचूक मेथड (पद्धती) वापरण्याची शिस्त निर्माण केली. डॉ. र्‍हाईन यांच्यानंतरही संशोधन सुरू राहिलं.

अशा पद्धतीची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स जगभर सुरू झाली. त्यातही संशोधन होत राहिलं. आत्मा, पुनर्जन्म, दिव्यशक्ती, टेलिपॅथी, सिक्स्थ सेन्स, क्लेअरोव्हायन्स, इन्टय़ुशन, सायकोकायनेसिस (नजरेनं चमचा वाकवण्याची क्षमता) या सगळय़ांवर दीर्घकाळ संशोधनं सुरू होतं. अमेरिकेतील डय़ूक युनिव्हर्सिटीतील संशोधनांवर हजारो कोटी खर्च झालेत. पण 75 वर्षांत एकही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. म्हणून हे पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट बंद करण्यात आलं. हळूहळू जगभरची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स बंद पडलीत. जी सुरू आहेत त्यांना वैज्ञानिक जगतात मान्यता नाही, प्रतिष्ठा नाही.

या गोष्टी खर्‍या नाहीत हे निर्विवादपणे सिद्ध झालं आहे. अमेरिकन मिल्ट्री व रशियन मिल्ट्रीनंही अशा संशोधनांवर खूप खर्च केला. पण काहीच मिळालं नाही.

एक जरी दिव्यशक्ती असणारा माणूस मिळाला असता तर 26/11 चा मुंबईवर होणारा अतिरेकी हल्ला, (किमान अतिरेकी जहाजात बसल्यावर तरी) आधीच कळला असता. आपलं सैन्य, पोलीस दल समुद्रकिनार्‍यावर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीत राहिलं असतं. काही मिनिटांत 10 अतिरेकी मारले गेले असते आणि आमचे मित्र, एटीएसचे प्रमुख पोलीस अधिकारी हेमंत करकरे मारले गेले नसते.

बिन लादेनला शोधण्यासाठी व मारण्यासाठी करोडो डॉलर्स व अनेक वर्षे वाया घालवावे लागले नसते. एक स्नेह देसाई व दत्ता घोडे.. खरंच यांच्यात अशी शक्ती असती तर पोलीस खात्याचं कामच सोपं झालं असतं.

नागपुरातील मोनिकाचे मारेकरी शोधण्यासाठी नागपूर पोलिसांना जंग जंग पछाडावं लागलं नसतं. बस्स, यांच्या दिव्यशक्तीनं, 'सिक्स्थ सेन्स'नं तत्काळ शोध लागला असता. आपण असे दिव्यशक्तीवाले स्नेह देसाई त्यांचे चेले पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस खात्यात अधिकृत नेमले असते. एकही चोरी, एकही खून केस अनसॉल्व्हड राहिली नसती. 100 टक्के केसेस सोडवण्याचा पोलीस रेकॉर्ड निर्माण करता आला असता.

पण हे शक्य आहे?

भंपक स्नेह देसाई नामक बाबा कार्यशाळेत म्हणाला, ''हे अंनिसवाले काय मला 15 लाख देतात? मीच त्यांना 15 करोड रुपये देऊ शकतो. माझ्याजवळ करोडोंची संपत्ती आहे.''

लोकांना खोटी लालूच दाखवून, लुबाडून कोटय़वधी रुपये कमावणार्‍या ठग देसाईची मस्ती, माज उतरवण्याची वेळ आली आहे.

गणेशपेठ पोलीस चौकीत स्नेह देसाईविरुद्ध दोन लोकांनी तक्रार केली आहे. नागपूरचे पोलीस कमिश्नर अंकुश धनविजय यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे. स्नेह देसाईंकडून फसवल्या गेलेल्या लोकांनी हिंमत दाखवून, तक्रार करण्यास पुढे यावं आणि नागपूरचं पोलखोल शहर नावाची प्रतिष्ठा राखण्यास मदत करावी. पुढचा नंबर दत्ता घोडेचा आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी - 9371014832

शब्दांमुळे अर्थच नाही, मानसिकताही कळते


शब्दातून मानसिकता स्पष्ट होते ही बाब सर्वप्रथम स्त्री चळवळीतील नेत्यांनी जगापुढे मांडली. त्यांनी 'मदरुमकी', 'अबला' असे अनेक शब्द दाखवून दिले, जे पुरुषप्रधान संस्कृतीचे वाहक आहेत. अशा शब्दांवर या महिलांनी आक्षेप घेतला. जगाने भाषेवरील पुरुषी प्रभाव मान्य केला व असे शब्द आक्षेपार्ह मानले.

वर्णद्वेष व्यक्त करणार्‍या शब्दांवरही आक्षेप घेण्यात आले. काळ्यांना 'निग्रो' म्हटले जायचे. त्याविरुद्ध रणकंदन माजले आणि वर्णद्वेष व्यक्त करणार्‍या शब्दांना जगाने बाद ठरविले. भारतात तर दलित चळवळीच्या रेटय़ाखाली कायदा अस्तित्वात आला. दलितांना अमुक शब्दाने संबोधन करणे हे बेकायदेशीर ठरविले गेले. त्या कायद्याखाली शेकडो गुन्हे नोंदविले गेले आणि काही प्रकरणांत अशा शब्दांचा उच्चार करणार्‍यांना शिक्षाही झाली.

शब्दांच्या मागे अर्थ असतो, तसेच त्यांचा वापर करणार्‍यांची मानसिकताही असते. शब्दांचा सर्वाधिक वापर पत्रकार, लेखक आणि वक्ते करीत असतात. हे शिकलेले, जाणकार, सुसंस्कृत, अभ्यासू, चिकित्सक इत्यादी मानले जातात. या मंडळींकडून शब्दांची गफलत होऊ नये अशी अपेक्षा असते. परंतु ही मंडळी सातत्याने काही चुका करताना दिसून येते. त्यापैकी 'शेतकर्‍यांच्या आत्महत्या', 'खाजगी शाळा', 'चोरटी वाहतूक', आणि 'बाजार मांडणे' हे काही शब्द आहेत. वरवर पाहता यात काही चूक वाटत नाही; पण जरा तपशील तपासला की, इंगित कळते.

एक शेतकरी होता. त्याला तीन अपत्ये. दोन मुली, एक मुलगा. थोरल्या मुलीचे लग्न झाले. हुंडा ठरला पन्नास हजार रुपये. पस्तीस हजार नगदी दिले. पंधरा हजार बाकी होते. सासरच्या लोकांचा तगादा लागला. दोनदा मुलगी घरी आली. दरवेळेला तिने त्या पंधरा हजारांचा विषय काढला. विषय काढणे तिला जड जायचे. जेमतेम चारपाच एकर कोरडवाहू शेती कसणार्‍या बापाची परिस्थिती तिला चांगली माहीत होती. पोरीला सासरी जाच सुरू झाला आहे. त्या जाचाला आपण कारण ठरत आहोत असे वाटून बापाचे काळीज तटतटा तुटायचे. तो पोरीला म्हणाला, ''यंदा कापूस बरा आहे. निघाला की, आधी तुझ्याकडे येऊन पैसे देईन. मगच घरी जाईन. बाई, तू काळजी करू नकोस.'' कापूस निघाला. पण भाव कोसळले. आडत्याने उचल कपात करून घेतली. काही टिकल्या हातावर टेकविल्या. पैसे आले नाही म्हणून पोरीला जाच वाढला. पोरगी सासरच्या जाचाने त्रस्त झाली. एके दिवशी तिने रॉकेलच्या बाटल्या आपल्याच हाताने उचलल्या. आपल्याच हाताने अंगावर ओतून घेतल्या. आपल्याच हाताने काडी पेटविली. स्वत:ला जाळून घेतले. पोरगी मेली. पेपरवाल्यांनी बातमी दिली 'आणखीन एक हुंडाबळी..' इकडे बापाला जेव्हा बातमी कळली तेव्हा बापाचे रक्त गोठून गेले. धाकटी मोठी झाली होती. वयात आली की, लोक बोलू लागले. आता हिला उजवून द्यावे लागेल. धाकटा पोरगा आईच्या अंगावर होता. बायको कायम आजारी. तिच्या उपचारावर खर्च होत होता. शेतीतून काही निघत नव्हते. बाप सुन्न झालेला. एक नाही, शेकडो त्सुनामी त्याच्या डोक्यात घोंगावू लागल्या. तो आपल्या आपण उठला. रानात गेला. रानातल्या लिंबाच्या झाडाच्या एका फांदीला त्याने दोर अडकवला. स्वत:ला टांगून घेतले. बातमी आली 'आणखीन एका शेतकर्‍याची आत्महत्या.'

मुलीच्या मृत्यूचे कारण सासरचा जाच होता म्हणून त्या आत्महत्येला 'हुंडाबळी' म्हटले गेले हे समजू शकते. मात्र बापाच्या मृत्यूचे कारण काय? त्याचेही कारण स्पष्ट आहे. त्याच्या कापसाला चांगला भाव

मिळाला असता तर कदाचित तो मृत्यूच्या कडेलोटावरूनदेखील मागे फिरला असता. कापसाला भाव का मिळाला नाही? कारण सरकारने बाजारात हस्तक्षेप केला. सासर कारण असल्यास आपण जसे 'हुंडाबळी' म्हणतो तसे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सरकार हे कारण असेल तर त्याला 'सरकारबळी' का म्हणू नये? 'सरकारबळी' म्हणताना जीभ चाचरत असेल तर किमान 'कर्जबळी' म्हणायला काय हरकत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे कारण ठाऊक असूनही त्याला ना 'सरकारबळी' म्हटले गेले ना 'कर्जबळी'. ना म्हटले जाईल. कारण सासरला दोष दिल्याने म्हणणार्‍याचे काही बिघडत नाही. सरकारला दोष दिला तर अनेक लाभांपासून वंचित व्हावे लागेल ही भीती असते. वर म्हटलेला लिहिताबोलता वर्ग हा सरकारी कृपेसाठी आसुसलेला असतो. तो हे धाडस कदापि करू शकणार नाही. दुसरेही एक कारण आहे. शेतकर्‍यांकडे पाहण्याचा या वर्गाचा दृष्टिकोन. शेतकरी अनाडी आहे, व्यसनाधीन आहे, मागासलेला आहे, आळशी आहे अशी लाख दूषणे दिली जातात. त्यांना शेतकर्‍याला अपमानित ठेवायचे आहे. तो नालायक आहे असा ठपका ठेवायचा असल्यामुळे तो 'आपल्या आपण मेला' असे ध्वनित करणारा शब्द 'आत्महत्या' योजला गेला असावा.

'चोरटी वाहतूक' हा शब्ददेखील शेतकर्‍यांच्या दु:श्वासातून आलेला. शेतीचे तुकडे झाले. ती परवडत नाही. काहीतरी करावे म्हणून शेतकर्‍यांच्या पोरांनी कर्ज काढून ऑटो, टमटम, सिक्स सीटर, वडाप अशा गाडय़ा घेतल्या. जीवनसंघर्षाच्या शाळेत ड्रायव्हिंग शिकले. ही वाहने लोकांची वाहतूक करू लागले की, लगेच चोरटय़ा वाहतुकीच्या नावाने ओरड सुरू झाली. ही पोरं काही चोर्‍या करीत नाहीत. खंडण्या गोळा करीत नाहीत. दिवसाढवळ्या, राजरोस रोजगार करीत आहेत. या मुलांच्या धडपडीतून एसटीच्या मक्तेदारीला धक्का बसला. अडल्या बाळंतिणी दवाखान्यात येऊ लागल्या. चुमडे-दोन चुमडे धान्य बाजारात आणले जाऊ लागले. पोरं रिक्षात बसून तालुक्याच्या गावात जाऊन शिकू लागली. शेतकर्‍यांची काहीशी सोय झालेली बघवली नाही आणि या बुद्धिजीवी वर्गाने लगेच 'चोरटी वाहतूक' म्हणून या वाहतुकीच्या विरुद्ध आरडाओरड सुरू केली. एसटीचा मक्तेदारीचा कायदा असेल तर तो काळानुसार बदलला पाहिजे. तो बदलला नाही म्हणून का ह्या मुलांची धडपड चोरटी ठरते? खाजगी वाहनांनी एका ठिकाणाहून निघायचे आणि थेट पोचायचे असे कायद्याचे कलम आहे. या कलमामुळे पोलीस अडवणूक करतात. पोलिसांचे हप्ते बांधले जातात.

शेतकरी समाजाला हिणविण्यासाठी, अडविण्यासाठी शब्दांचा कसा चलाखीने वापर केला जातो याकडे कोणी लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे.

(लेखक हे नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत. 'कलमा' व 'आवतन' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

भ्रमणध्वनी : 9422931986

Thursday 28 June 2012

आमिरचा मुल्ला नसरुद्दीन 'फंडा'


आमिरचा मुल्ला नसरुद्दीन 'फंडा'



या   रविवारचा आमिर खानचा 'सत्यमेव जयते' पाहिला आणि हत्ती आणि चार आंधळे आठवले. पण क्षणात विचार आला. आमिर खानला त्या कार्यक्रमात सहभागी वंदना शिवा व इतरांना आपण आंधळं कसं म्हणावं? ते तर सर्व डोळस, जाणते व तज्ज्ञ होते. तरीदेखील शेतीप्रश्नावरील त्यांचे आकलन इतके चुकीचे कसे? ते तर सर्व 'शहाणे'! त्यांच्या शहाणपणावरूनच मुल्ला नसरुद्दीनचा 'फंडा' आठवला.

मुल्ला नसरुद्दीनची अंगठी जंगलात हरवते. अंगठी जंगलात शोधणे गैरसोयीचे आहे म्हणून तो ती अंगठी घरासमोरील अंगणात शोधतो. कारण मुल्लासाठी ती जागा 'सोयी'ची असते. आमिर खाननेसुद्धा शेतीप्रश्नाची हरवलेली अंगठी 'सोयी'च्या जागेवर शोधण्याचा प्रयत्न या वेळेच्या 'सत्यमेव जयते'मध्ये केला. 'कीटकनाशकांमुळे खाद्यपदार्थातले विष' हा त्याचा विषय होता. याचं गांभीर्य शेतकर्‍यांनासुद्धा समजलं आहे हे सिद्ध करण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या केलेलं 'विषारी' उत्पादन तो बाजारात विकतो; पण स्वत: मात्र फवारण्या न केलेलं बिनविषारी खाद्यान्न खातो असा जावईशोधही त्याने सप्रमाण 'सत्यमेव जयते'वर दाखवला. हे 'शहाणे' शेतकरी दाखवत असताना हेच कीटकनाशक शेतकरी पितात आणि मरतात हे सांगायला, दाखवायला मात्र तो विसरला. आता या शेतकर्‍यांना ही कीटकनाशकं विषारी असतात हेच माहीत नसेल आणि थंडा मतलब कोकाकोला समजून ह्या कीटकनाशकाचीच बाटली ते तोंडाला लावत असतील आणि आपल्या 'मूर्ख'पणामुळे ते मरत असतील, तर त्याला आमिर खान तरी काय करणार? सोयीच्या जागेवर प्रश्नाचे उत्तर शोधायचे म्हटल्यावर अशा अडचणीच्या जागेकडे न पाहणे हेच श्रेयस्कर! म्हणजे 'शोधाशोध केल्याचे नाटकही होते आणि शेतकरी कळवळ्य़ाचा 'शो'ही होऊन जातो.

या देशातला शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतो आहे. स्वत: अन्नधान्याचे उत्पादन तो करतो; पण त्याच्या पोटाला मात्र अन्न नाही. दुधाचे उत्पादन तो करतो; पण त्याच्या घरात चहालासुद्धा दूध असत नाही. स्वत: कापसाचं तो उत्पादन करतो; पण त्याच्या अंगावर धड कपडे नाहीत हे ऐकत आणि पाहत होतो. पण या वेळेचा 'सत्यमेव जयते' पाहून याचे खरे कारण कळले. कीटकनाशकांच्या विषारी फवारण्या केलेल्या असल्यामुळे शेतकरी 'विषारी' अन्न जाणीवपूर्वक खात नाही. त्यामुळे तो उपाशी राहतो. आईच्या दुधात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात 'एन्डोसल्फान' निघते तर गाईच्या आणि म्हशीच्या दुधाबाबत तर विचारायचीच सोय नाही. म्हणून शेतकरी दूध घरात वापरत नाही. तो कापूस पिकवतो; पण या कापसावर विषारी कीटकनाशकांच्या फवारण्या झालेल्या आहेत हे शेतकर्‍याला माहीत असतं. म्हणूनच अशा कापसापासून तयार होणारे सूत, त्यापासून तयार होणारे कापड तो अंगावर घालत नाही. व्हेरी सिंपल आणि याच कीटकनाशकामुळं तो कर्जबाजारी आहे. आमिर खानने एका झटक्यात 'सब मर्ज की एकही दवा' या पद्धतीने उत्तर देऊन टाकले. अन् तरीही.. प्रश्न शिल्लक राहतोच.

'ऑरगॅनिक फार्मिंग' हा शब्द हरितक्रांतीपूर्वी नव्हता. पण शेतकरी त्याच पद्धतीने शेती करायचे. बियाणे, खत घरचीच. कीटकनाशकंच नव्हती. त्यामुळे त्यांच्या फवारण्या असण्याचा प्रश्नच नव्हता. तरीदेखील शेतकरी त्याही वेळेस कर्जबाजारीच होता. कां? हरितक्रांतीपूर्वीचा काळ असो की नंतरचा, या दोन्ही काळात 'या देशातला शेतकरी कर्जातच जन्म घेतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो,' असे ऐकतो आहोत. 'शेतकर्‍यांचा आसूड' या महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला तर 129 वर्षे होतात. इतके जुने हे पुस्तक. पण त्यातही शेतकर्‍यांच्या हलाखीचे, त्यांच्या कर्जबाजारीपणाचे भरभरून वर्णन आहे. 'शेतकर्‍यांचा आसूड' या पुस्तकाच्याही पूर्वी 20 जून 1878 (म्हणजे 134 वर्षांपूर्वी) गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये मुंबई प्रांतातील शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणा यासंबंधी चर्चा झाली होती. त्यात कॉकरेल नावाच्या इंग्रज अधिकार्‍याने शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणाचे दस्तऐवज दाखल केले होते.

या काळात तर शेतीसाठी रासायनिक खते व कीटकनाशक हे शब्दही जन्माला यायचे होते. तेव्हाही शेतकरी कर्जबाजारीच होता आणि तहीही आमिर खान, वंदना शिवा व त्यांचं टोळकं म्हणतं, 'शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात म्हणून कर्जबाजारी आहे.'

शेतकरी जेव्हा पारंपरिक पद्धतीने (आजच्या 'फॅशनेबल' भाषेत ऑरगॅनिक फार्मिंग) शेती करीत होता तेव्हा शेतकर्‍याला कोणी 'शहाणं' म्हटलं नाही. उलट बुरसटलेल्या विचारसरणीचा असल्यामुळे तो नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. अज्ञानी, अडाणी, मूर्ख असल्यामुळे तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो असं झाडून सर्व शहाण्यांची म्हटलं. आता तेच 'शहाणे' शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतो. कीटकनाशकांच्या फवारण्या करतो. हायब्रीड, बीटी बियाण्यांचा वापर करतो म्हणून त्याला 'मूर्ख' ठरवीत आहे. पूर्वी तो 'सेंद्रिय' शेती करतो म्हणून मूर्ख होता. आता तो सेंद्रिय शेती करीत नाही म्हणून मूर्ख आहे. एकूण काय, तर 'चीत भी तेरी और पट भी तेरी' या न्यायाने शेतकर्‍याचे हरणे व मरणे अटळ आहे.

या सर्वांमध्ये 'सत्य' काय आहे? जेव्हा शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता तेव्हा अन्नधान्याच्या तुटवडय़ामुळे दुष्काळात हजारोच्या संख्येनी माणसं मरत होती. इतिहासातील बंगालचा दुष्काळ यासाठी कुप्रसिद्ध आहे. पारतंर्त्यात हे ठीक होतं. पण स्वातंर्त्यानंतरदेखील अन्नधान्याचा तुटवडा राहायचा म्हणून भिकेचा कटोरा घेऊन देशोदेशी अन्नधान्याची भीक मागावी लागायची. अमेरिकन डुकरांसाठी असलेला 'मायलो' रांगा लावून मिळवावा लागत असे. ही परिस्थिती होती. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने आणि त्याचदरम्यान अन्नधान्याचा तुटवडा म्हणून अमेरिकेकडे भीक मागायची पाळी आलेली. अशा वेळेस पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशातील जनतेला एका बाजूला उपवासाचं आवाहन केलं तर दुसर्‍या बाजूला 'हरितक्रांती'ची तयारी सुरू केली. त्याच काळात 'जय जवान जय किसान' हा नारा दिला गेला. सीमेची सुरक्षा सैन्याने करायची तर देशातील अन्नसुरक्षा शेतकर्‍यांनी सांभाळायची हा त्या घोषणेचा अर्थ होता. हा पूर्वेतिहास आमिर खान व वंदना शिवासारखी 'शहाणी' माणसं विसरतात. ज्या देशात 1950 मध्ये 50 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन होत होतं तिथे हरितक्रांतीनंतर अन्नधान्याचं उत्पादन दुप्पट म्हणजेच 100 मिलियन टन व्हायला लागलं. आता हे उत्पादन 247 मिलियन टनांपर्यंत पोहोचलं आहे. अन्नधान्याची कोठारं भरली आहेत. विचारवंतांची पोटं भरली आहेत. भिकेचा कटोरा घेऊन आता भीक मागावी लागत नाही म्हणून आमिर खानला आज 'ऑरगॅनिक फार्मिंग'सारखे भिकेचे डोहाळे लागताहेत. भरल्यापोटी 'चवणे' सुचतात असे म्हणतात. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला म्हणून 'सेंद्रिय शेती'चे 'चवणे' विचारवंतांना सुचू लागले आहेत. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वारेमाप वापर शेतकरी करतो. त्यामुळे तो कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करतो अशी 'तर्कटलीला' करणार्‍यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. त्यांच्यासाठी खालील आकडेवारी देण्याचा मोह होतो. इतर देशांच्या तुलनेमध्ये 'छटाक'भर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करणार्‍या भारतात लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतात. परंतु 'टन'भर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करणार्‍या देशात मात्र शेतकर्‍यांची आत्महत्या नावालाही नाही. असे कां? शेवटी एक आश्चर्य अजून. जेव्हा विषारी कीटकनाशकांचा वापर होत नव्हता म्हणून खाद्यान्न, फळफळावळे, भाजीपाला 'विषमुक्त' होता. तेव्हा देशातील सरासरी आयुष्यमान कमी होते (40 ते 45 वर्षे). जेव्हा विषारी अन्नधान्य, फळफळावळे, भाजीपाला लोक खाताहेत म्हणजेच 'विषयुक्त' आहार घेताहेत तेव्हा त्यांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. (सरासरी 60 ते 65 वर्षे) विषमुक्त आहार घेत होते तेव्हा आयुष्यमान कमी आणि विषयुक्त आहार लोक घेताहेत तर आयुष्यमान वाढताहे हे आश्चर्यच म्हणायचे!

सोयीच्या जागी हरविलेली अंगठी शोधताना अंगठी सापडण्याची सुतराम शक्यता नाही. फक्त अंगठी शोधण्याचे नाटक व शेतकरी कळवळ्य़ाचा 'शो' मात्र होऊन जातो. या वेळेच्या 'सत्यमेव जयते'मध्ये आमिर खानने शेतकरी प्रश्नावर 'सोय एकमेव जयते' हे आपले ब्रीद असल्याचे सिद्ध केले. अर्थात यापूर्वीच्या 'पिपली लाईव्ह'मध्येसुद्धा 1 लाख रुपयासाठी शेतकरी आत्महत्या करतो ही थीम आमिरने घेतली होती. शेतकर्‍यांबाबतचा तोच दुष्टावा आमिरने या वेळेस पुन्हा प्रकट केला एवढेच.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी : 9822587842
      

अजब सिनेमा की गजब कहानी


अजब सिनेमा की गजब कहानी
माझा एक मित्र कुठलंही ताकदीचं काम करताना किंवा शक्तिमान स्टाईल काम करताना दात खाऊन उच्चारतो, 'या अली'. मी एके दिवशी त्याला विचारलं, बाबा रे, हे 'या अली'च का? तर तो म्हणे 'कुर्बानी'मध्ये अमजदखान म्हणतो म्हणून! अंधारलेल्या रस्त्याने चालताना किंवा रात्री उशिरा घरी येताना मी 'हनुमानकी जय! जय जय बजरंगबली की जय' म्हणतो.

म्हटलं का?

तं म्हणे मी 'नटवरलाल'मध्ये अमिताभ नाही का म्हणत, 'चला जा रहा था मै डरता हुआ, हनुमान चालिसा पढता हुआ!'

व्हेरी गुड! मला एक सांग आता तू चाळीस वर्षाचा होत चाल्लायस अन् तुझं हे वेड कमी झालं नाही कां?

अरे बाबा हे वेड नाही, हा आमचा धर्म आहे,

धर्म म्हणजे?

म्हणजे जसा कुलाचा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ºिश्चन धर्म तसा आमचा हा धर्म सिनेमा!

अच्छा तं ही भानगड आहे तर..

भानगड नाही बाबा धर्म! माझ्या पिढीचे अनेक जण याच धर्माच्या आश्रयाने वाढले. अभ्यासात जेमतेम असणारे, जगाच्या अन् घरच्यांच्या दृष्टीने कवडीचं व्यवहारज्ञान असणारे आम्ही कोणाच्या आधाराने मोठे झालो? अरे सिनेमाच्या. जेव्हा जेव्हा आम्हाला नालायक ठरविण्यात आलं तेव्हा तेव्हा आम्हाला या पांढर्‍या पडद्यानेच जवळ केलंय. या पांढर्‍या पडद्यावरच अमिताभ बोलून गेला.

'उपरवाले ने सबको दिए है दो दो हाथ और कहा चिरले जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी.'

जेव्हा की इतर म्हणायचे काय करते हे कारटं? देवच जाणे! आयुष्याच्या या वळणावर जगाच्या फुटपट्टीनुसार आम्ही फार यशस्वी नाही. अगदी भणंगही नाही, पण तरीही आम्ही त्याची काळजी करीत नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे की, 'सेठ एक दिन सिकंदर का भी आएगा.' स्मशानात बसलेला कादरखान जणू आमच्यातल्याच सिकंदरशी बोलत असतो, 'सुखपे हॅंसते हो तो दुखपे कहकहे लगाओ, अपने मुकद्दर के बादशाह बनो, मुकद्दर का सिकंदर बनो.' अरे ते तं सोडा ज्या एकात्मतेसाठी तुम्ही चर्चा, मेळावे, परिसंवाद घेता ती एकात्मता आमच्या धर्मात बघा, चित्रपट खून-पसीना, मुसलमान अस्लम कसम शिवाकी म्हणतो अन् हिंदू शिवा कसम असलम की म्हणतो. अरे, आमच्या धर्माचं मंदिरही बघा.

मंदिर?

टॉकीज रे बाबा! कुठल्याही धर्म-जाती, पंथ पाळणार्‍या लोकांना गुण्यागोविंदाने तीन तास एकत्र नांदायला लावणारं मंदिर. पडदा रडला की अख्खं थिएटर रडतं अन् पडदा हसला की अख्खं थिएटर हसतं आणि साईड बाय साईड हे सत्यही अधोरेखित होतं की, दु:खात सगळ्याच धर्माचे माणसं रडतात, वेदना सगळ्याच धर्माच्या लोकांना होतात, आनंद सगळ्याच धर्माच्या लोकांना होतो अन् सगळ्याच धर्माच्या लोकांना सारखाच होतो. बाल्कनी असो की थर्ड क्लास, प्रत्येकाचे पैसे वसूल होणारचं बरं. शतकानुशतकापासून अनेकांचं मनोरंजन करणार्‍या आमच्या पांढर्‍या पडद्याने मानवी भावभावनांचे असो वा देशभक्तीचे असो वा आणिक कुठले असो अनेक रंग पाहिलेत ती तास ते रंग त्यांनी मुरल्यागत फुलवले, पण चिटकवून कुठलाच घेतला नाही. तीन तासानंतर तो कोराचा कोराच! संसारात राहून विरक्त जगण्याचं याहून श्रेष्ठं उदाहरण तुला कुठलं हवं सांग! अरे किशोरकुमारची गाणी म्हणजे आमच्यासाठी कबीराचे दोहेच! कितीही त्रस्त असू दे, काहीही झालेलं असू दे किशोरकुमारचं एक गाणं मनातला सगळ्या गाळाचा निचरा करतं अन् उत्साहाचं कारंज मनात थुईथुई नाचू लागतं!.. अरे आमच्या अंत्ययात्रेतही लोकांनी 'रघुपती राघव राजाराम'ऐवजी 'खईके पान बनारसवाला' लावावं. एक तर आत्म्याला बरं वाटेल किंवा ते ऐकून आम्ही उठूनही बसू.

बाकी मन्या तू हुशार है बटे!

'आखिर आही गये ना औकात पे! चल छोड, आ रात को चल रहा क्या?'

'कहॉं'

'अजब प्रेम की गजब कहानी..'

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी : 9823087650

Tuesday 26 June 2012

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा?


महाराष्ट्र कुणाच्या बापाचा?
..आणि शेवटी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मंत्रालयात आग लागली! विशेष म्हणजे मंत्री मंत्रालयात नसताना आग लागली. याचाच अर्थ आगीलासुद्धा व्यवहार कळतो, हे सिद्ध झालं! खरं तर अनेक घोटाळे उघडकीस यायला लागले होते. 'आदर्श' घोटाळय़ामुळे सारा देश ढवळून निघाला होता. तेव्हाच्या आगीत काही बकरे उभ्याउभ्याच भाजले गेले होते. शेवटी 'सौ चुहे' पचवणार्‍या मांजरीला एखादा उंदीर पचवणं फार काही कठीण काम नव्हतं. पण एखाद्या उंदराची हड्डी नको तिथं फसली की जरा पंचाईत होते, हे मात्र नक्की.

आणि त्यामुळेच आदर्श घोटाळय़ातल्या महत्त्वाच्या कागदपत्रांनी गहाळ व्हायला सुरुवात केली होती. जनता अस्वस्थ होत होती. आदर्श घोटाळ्याची धग कमी होत असतानाच नवी नवी प्रकरणं बाहेर यायला सुरुवात झाली होती. खुर्चीतले असो की बाहेरचे, सारेच मावसभाऊ अस्वस्थ होत होते. सार्‍या घरात ढेकणांचीच जत्रा आहे हे जनतेच्याही लक्षात यायला लागले होते. त्यामुळे गल्लीही खदखदायला लागली होती. दिल्ली अस्वस्थ होत होती. शेवटी दोन-चार ढेकूण बाजूला आणि सारं घर स्वच्छ झाल्याची दवंडी दिल्लीवाल्यांनी पिटली. पण दोन-चार ढेकूण गेल्यानं अख्खी गादी स्वच्छ थोडीच होते?

दोन ढेकूण गेल्यानं कशी वाचणार गादी?

किती मोठय़ा मोठय़ा टोळ्या, कशी भली मोठी यादी?



किती मोठाले ढेकूण, किती मापाचे ढेकूण

रंग बदलती कसे, किती बापाचे ढेकूण?

साधु-संतांच्या घराची, कशी झाली बरबादी?



एक झाले सारे बोके, साय वाटून घेतली

हातोहात कसायांनी, गाय वाटून घेतली

सजा द्यायची कोणाला, झाले फितूर फिर्यादी?



कसे झोपले गोकूळ, कशा झोपल्या गौळणी

माकडांच्या हाती देता, कसे पुन्हा पुन्हा लोणी

अरे, वाचवा गोकुळ, गायी कापण्याच्या आधी!!

पण एवढं सारं करूनही प्रकरण काही शांत होतच नव्हतं. नव्या नव्या भानगडी रोज रोज उघडकीस यायला लागल्या होत्या.

पण तुमच्या आमच्यापेक्षा ढेकणाची जात चलाख! सारे एकत्र आले असणार ! सामूहिक विचार केला असणार ! 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' आखून सारे ढेकूण गुपचूप बाजूला झालेत आणि गादीला दिली आग लावून!

सारे ढेकूण सहीसलामत.. गादी मात्र धो धो जळतेय.!! शिवाय आपलं फायर ब्रिगेडसुद्धा केवढं मानवतावादी ? केवढं हुशार?

एकीकडे मान्सून बरोबर आला नाही. महाराष्ट्रात जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. सरकारनंच गावोगावी सुरू केलेल्या 'बिअरबार'मधील पट्टीच्या सेवकांना दारूमध्ये मिसळायला पाणी नाही. अशावेळी मंत्रालयाची आग विझवण्यासाठी पाणी वाया दवडणं, हे नालायकपणाचंच ठरलं असतं ना? म्हणून फायर ब्रिगेडनंही शक्य तेवढं पाणी वाचवण्याचा पराक्रम केला! त्यांचे खरंच जाहीर सत्कार व्हायला हवेत. पब्लिकला वाटते, मंत्रालयाचे तीन-चार मजले जळून खाक होईपर्यंत ही यंत्रणा झोपली होती का? आग एवढी पसरलीच कशी? दिवसाढवळ्या आग लागलीच कशी? जनतेला अक्कल थोडीच आहे? पाच वर्षांतून एकदा मत दिलं आणि सरकार निवडण्याची संधी मिळाली म्हणून देश काय आपल्याच बापाचा आहे, असं पब्लिकला वाटते का?

मंत्रालयात केबलचं पसरलेलं जाळं काय सांगतं? फायर ब्रिगेडचा पराक्रम, संकटकालीन सुरक्षा व्यवस्था या सार्‍या सार्‍या दिवाळखोरीत निघाल्याचं चित्र समोर आलं. कुठल्या चौकशीची गरज नाही. कुठल्या अहवालाची गरज नाही. कुठल्या पुराव्यांची गरज नाही.

पण किती अधिकार्‍यांवरती कारवाई करण्यात आली? सारेचे सारे (सत्ताधारी आणि विरोधकही) एवढे शांत का? कोणत्या मंर्त्यानं शरमेनं मान खाली घातली? आम्ही महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी खरंच लायक नाही, याची कबुली देण्याचा मर्दपणा एकानं तरी दाखवला का?

समजा शिवाजी महाराजांच्या काळात अशी घटना घडली असती, तर त्यांनी सरळ एकेकाची मुंडकी तरी छाटली असती नाहीतर हत्तीच्या पायी तरी दिलं असतं! आज भगतसिंग असता तर.. कुणाला गोळ्या घातल्या असत्या त्यानं? स्वत:लाच की..?

लालबहादूर शास्त्रींची सत्ता असती तर सार्‍या मंत्रिमंडळाला सामूहिक आत्महत्या करायला लावली असती का?

जनतेच्या मनात हे असंख्य प्रश्न आहेत. सहनशीलतेचा अंत होतोय. राजकारण्यांच्या पापाचा घडा भरतोय. असंतोषाचा सुप्त ज्वालामुखी वेगाने जागा होतोय.! सारा महाराष्ट्र - सारा देश ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. आणि आमचे कारभारी आगीशी खेळ खेळत आहेत. मस्तीमध्ये धुंद आहे. रावणालासुद्धा एवढा माज आला नसावा कदाचित?

यातून पेटलो पण हळूवार बोलतो मी

काही विशेष नाही, व्यवहार बोलतो मी

बैमान जाहलेला एकेक नाग ठेचू

येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी!

पण हा महाराष्ट्र कुणाचा-तुमचा-माझा की मूठभर राजकारणी लोकांच्या बापाचा?

..तसंच असेल तर करून टाका महाराष्ट्राचा सात-बारा त्यांच्याच नावानं!

(लेखक हे नामवंत कवी असून त्यांचा

'सखी-साजणी' हा कार्यक्रम गाजलेला आहे.)

भ्रमणध्वनी-9822278988

भेव लागलं का बाप आन् कन्हतानी माय आठोते!


भेव लागलं का बाप आन् कन्हतानी माय आठोते!
पंधरा दिसा पह्यलची गोठ हाय. मी कार्यकरमावून नागपूरवून राती टॅक्सीत वापेस येतानी समोरच्या संग बोलाले मांगच्या सीटवून उकड झालो आन् त्याच वक्ती खाली आलेल्या सडकीच्या खडय़ात गाडी दनकली. हलक्या आंगाले कमरीपासी असा झटका बसला म्हनानं का आपसूक तोंडातून निंघालं बाप रे! झटका असा झनानला म्हनानं का माहं मले मालूम. दुसर्‍या दिसी ओयखीच्या दुकानदाराकडून गोया घेतल्या, म्हनलं जमून जाईनं. तिसर्‍या दिसी माहूरले कार्यकरम. एक मन म्हने दुखन वाढन बरं, पन दुसर मन म्हने त्यायनं पत्रिका छापल्या, हॅँडबिल वाटले. आपनं सबद् देल्ला हाय गेलो पाह्यजे. गेलो पन उभ राहून कार्यकरम कराची ताकत नोती. चायीस वर्सात पह्यल्यांदा कुर्सीवर बसून कार्यकरम केला. वापेस येतानी जानवतं होत बरं का आंगभर होते पन खुसी एक होती का सब्द पडला नाई.

आलो, झोपलो पन कडयी फेरता ना ये. इतका अकडलो का सकायी पोरानं आन् पोरीनं अधार देल्ला तरी उठून बसता ना ये. थोडी हालचाल झाली का असी चमक निंघे ना ते कय सांगून समजत नाई, भोगाचं लागते. कय लागली का तोंडातून फकस्त निंघे मा. . वो. . भेव लागलं का बाप आन् कन्हतानी माय आठोते. हे दोनी अधार मानसाले अस्ते तवायी असते आन् नस्ते तवायी असते. कवा कवा असतांनी आपल्याले कदर नाई वाटत पन नसल्यावर्त ध्यानात येते.

कायी लोकं म्हनोत का जितकं मायच्यावर लेयल्या गेल मंग ते कवितेच्या रूपानं असो का कथेच्या, तितलं बापावर नाई लेयल्या गेलं. खरं हाय ते पन त्याचं कारन हेयी असू शकते का बाप सोसते पन बोलत नाई आन् माय ते आपल्या आसवाच्या रूपानं बोलून जाते. आमच्या पिढीच्या बापानं कवा लाडावलं नाई म्हूनचं वाट्टे का आमी सरके सुदे निंघालो. त्यायले पिरेम नव्हत असं नाई पन ते फनसा सारकं , वरतून काटे आन् आतून गरचं. गर म्हून समजाले उसीर लागत असनं! तसयी पाहा बरं आपनं जसं म्हनतानी मायबाप म्हंतो तसं बापमाय म्हन्तो का? वरच्यानं तिचा नंबर आंधी लावला कानी? आउन का, 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.' बापाची उब घोंगडीची तं मायची वाकयीची. मंग त्या गरमाईत आन् नरमाईत फरक पडनचं कानी?

मायची पोरायसाठी जे सर्कस चालु राह्यतेना का ते इचारू नोका. एकडाव आमी लहान असतानी मोठय़ा भावाले त्याच्या शायेतल्या दोस्तायसंग माहूरले जाचं होत. तवा माहूरले जानं आता सारकं काई सरकं सुद नोत. माय झाकटीत सकायीचं चार वाजता उठली. त्याच्या संग दसम्या द्या साठी सैपाकाले लागली. माय म्हंजे अनपुर्नाची लेक. तिच्या दसम्या का निर्‍या एकटय़ा पुरत्या राहे का? चांगल्या दोन चार जनाले पुरतीन इतक्या. त्याच्यातल्या एका पोयीले दुसरी पोयी लावून त्याच्यावर झुनक्या सारक घट चून. एका पोयीवर्त ताथी केलेली तियाची चटनी. मायच्या हातची तियाची चटनी असी चवदार होये कानी का खानारा जलमभर इसरनारचं नाई. एका पोयीवर आंब्याच्या रायत्याच्या पाच, सात फोडी. हे सारं एका मोठय़ा कागदावर्त गुंडायून पांढर्‍या भक धुतलेल्या धोतराच्या पालवात बांधलं का झाली शिदोरी तयार.

आमच्या गावापासून आमच्या तालुक्याचं गाव; दारवा सात मैल. तिथ नईन सिनीम्याची टाकीज बांधली होती, वर्षा. थो जमानायी सिनेमाच्या शौकाचा होता. पन आमचे बावाजी नाना, त्यायले काई पोरायनं सिनिमाले जान आवडे नाई. तवा राजकपूरचा कोन्ता तरी भाई

फेमस सिनिमा लागल्याच्यान बोरीचे बरेच लोकं रोज जाऊन राह्यले होते. तवा जाचं म्हंजे सायकलनं, पन घरची सायकल नेली तं नानाले मालूम पडीन म्हून मंधव्या भावानं एका दोस्ताची सायकलं मांगून ठुली होती. दोन दिसापासून मायच्या मांग लावून त्यानं मायले राजी केलं होत. सामोरून आलं तं नानाले समजते म्हून मायनं त्याले बजाराकडच्या रस्त्याकून असलेल्या दाठय़ाकून घरात घ्याचं कवूल केलं होत. अर्धी रातयी उलटून गेली तरी याचा पत्ता नाई. मायच्या डोयाले झप नाई. थोडा टाईम झाला का खिडकीतून भायेर पाहे, पन अंधारासिवाय बाकी काय दिसन? तिच्या कायजाची धडधड वाढली. जाऊ देल्ल्याचा पस्तावा वाटाले लागला. दोन दोन खेपा देवाले हात जोडे. एखांदा नवसयी कबूल करून टाकला असनं. आखरीले दाठ्ठा वाजला. तिनं दाठ्ठा उघडून आतनी घेतलं. तिले इतला राग आला होता पन जवा त्यानं कारन सांगतलं का 'वापेस येतानी सायकल भाहेर काढल्यावर दिसलं का सायकलं पंचन झाली हाय. इतक्या राती दुकान कुठचं. मंग पैदलच निंघालो.' तिनं त्यालेचं छातीसी धरलं. तिच्या डोयात टपटप आसू.

आमी लहान असतानी शायेत जाले लागलो का जे पाटी राहे ते तवा गोटय़ाची राहे मंग टपराच्या निंघाल्या. जसा जमाना तस्या पाटय़ा. आतातं मले वाट्टे पाटय़ा बंदच झाल्या का काय? त्यावक्ती ते पाटी का एखांद्यावक्ती फुटली का माह्या पोटात खड्डाच पडे, काऊन का बापाले समजलं तं झोडपल्या बिगर गती नाई. मंग त्याच्यावर्त एकच उपाव व्हाया माय. मी चवथीत असतानी एका दिसी सांजीले खेयून घरी आलो आन् थोडय़ा वक्तानं जे तापीनं फनफनलो का काई इचारू नोका. रातभर डोयाले डोया नाई, निरा कन्हत. पन रातभर कन्हतानी मावो . . . म्हनो; यावर 'ओरे बाबू' असा मायचा आवाज आला नाई असं झालं नाई.

एक वाचलेली कविता आठोते एखांदा सबद् मांग पुढ होऊ शकते.

'नवरा म्हणाला वात लहान कर मला झोप येत नाही

पोरगा म्हणाला वात मोठी कर मला वाचता येत नाही

वात वर खाली करण्यातचं मायची रात निघून गेली'

ते असीचं भरडत राह्यली तरी जीव पाखडत राह्यली. म्हून तं तिच्यावर जास्त लेयल्या गेलं असनं का लेक?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ

भ्रमणध्वनी - 9420551260
     

ब्रह्मंडाचा थक्क करणारा पसारा


ब्रह्मंडाचा थक्क करणारा पसारा
असामान्य बुद्धिमत्ता, कल्पकता व अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने विश्वाच्या जडणघडणीचे, त्याच्या स्वरूपाचे व नियमांचे जे दर्शन वैज्ञानिकांना झाले त्यापैकी आपल्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत जितकी माहिती झिरपते, त्यावरून असे निश्चितच म्हणता येते की, ब्रह्मंडाचा हा पसारा थक्क करून सोडणारा आहे. सतत जळत राहून प्रचंड ऊर्जा प्रस्फुटित करत राहणारे सूर्यासारखे अब्जावधी तारे, त्या तार्‍यांच्या भोवती एका निश्चित गतीने व निश्चित कक्षेत फिरत असलेले ग्रह, त्या ग्रहांभोवती तसेच काटेकोर कक्षेत फिरत असलेले उपग्रह, या कोटी-कोटी सूर्याची, ग्रहांची व उपग्रहांची मिळून बनलेली एक आकाशगंगा, ज्यातील सर्व

सूर्यमाला एका केंद्राभोवती फिरत आहे; अशा अनेकानेक आकाशगंगांचे समूह जे सर्व मिळून पुन्हा एका तिसर्‍याच केंद्राभोवती फेर धरतात! शिवाय हे सर्व आकाशगंगाचे समूह त्याचवेळी एकमेकांपासून विलक्षण गतीने दूर-दूर जातच आहेत. हे सर्व सूर्य अब्जावधी तारे, ग्रह, उपग्रह करोडो वर्षापासून नियमबद्ध वागत आहेत.

शिवाय या ब्रह्मंडात मध्येच कुठेतरी प्रचंड कृष्णविवरेदेखील आहेत, जे त्यांच्या विशिष्ट कक्षेच्या आत शिरणार्‍या सूर्यमालांनाच नव्हे तर अख्ख्या आकाशगंगेला गिळून टाकतात. या कृष्णविवरांना (ब्लॅकहोल्स) आकार नसतो, परंतु लक्षावधी तार्‍यांचे वस्तुमान (मास) व ऊर्जा त्या विवरातील एकाच बिंदूत सामावलेली असते. त्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी वाढलेली असते की प्रकाशकिरणदेखील त्या विवरातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच ते कृष्णविवर आम्हाला दिसू शकत नाही.

काही वैज्ञानिकांच्या मते या कृष्णविवरांमध्ये ओढल्या जाणार्‍या वस्तू (वस्तू म्हणजे महाकाय तारे व त्यांचे ग्रह, उपग्रह) आतील भयानक उष्णतेने पूर्णत: वितळून त्यांचे पदार्थरूप नष्ट होऊन निव्वळ एकाच मूलभूत ऊर्जेत रूपांतरित झाल्यावर ती ऊर्जा आम्हाला सध्या माहीत नसलेल्या वेगळ्याच कोणत्यातरी विश्वाच्या किंवा आमच्याच विश्वातील वेगळय़ा ठिकाणी नवनिर्मितीसाठी उपयोगात आणली जात असावी.

जी कथा ब्रह्मंडाची तीच अणूची. प्रत्येक पदार्थातील सर्वात सूक्ष्म घटक म्हणजे अणू. तो आकाराने इतका सूक्ष्म असतो की एका केसाच्या टोकावर पाच लक्ष अणू मावतात! इतक्या सूक्ष्म पदार्थापेक्षा आणखी सूक्ष्म ते काय असणार? वैज्ञानिकांनी त्या अणूचेही अंतरंग शोधून काढलेच. ते तर आणखी थक्क करणारे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्व आहे. सूर्याभोवती जसे पृथ्वीसारखे ग्रह फिरत राहतात व मध्ये पोकळी असते तसेच अणूच्या पोटात मध्यभागी एक अतिसूक्ष्म असे केंद्र असते व त्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन नावाचे सूक्ष्म कण प्रचंड वेगाने फिरत असतात. हे गरगर फिरणारे इलेक्ट्रॉन आणि अणूचे केंद्र यांच्यामध्ये खूप मोठी पोकळी असते. केंद्रस्थानी प्रोटॉन व न्यूट्रॉन नावाचे इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जास्त वस्तुमान असलेले सूक्ष्मकण असतात. अणूच्या आतली पोकळी किती मोठी असते? एखाद्या मोठय़ा सभागृहाच्या मध्यभागी एक माशी ठेवली तर त्या सभागृहाच्या आकाराच्या मानाने माशीचा आकार लक्षात घेऊन मधल्या पोकळीची जी कल्पना आपण करू, त्याच प्रमाणात अणूचा आकार व त्याचे केंद्र यांच्यातील पोकळी असते. म्हणजे आमच्या दृष्टीला व स्पर्शाला जे जे भरीव व ठोस भासणारे पदार्थ जाणवतात ते प्रत्यक्षात अतिशय विरविरीत व महापोकळ असतात. परंतु एखादे अनेक आरे असलेले चक्र वेगाने फिरत असले तर त्यातील आर्‍यांमधील पोकळी आपल्या नजरेस दिसत नाही. तसेच इलेक्ट्रॉन्सच्या प्रचंड गतिमान

फेर्‍यांमुळे आम्हाला पदार्थ ठोस वाटू लागतो.

अणुगर्भातील प्रोटॉन व न्यूट्रॉन हे सूक्ष्म कणदेखील अविभाज्य नसून तेसुद्धा क्वार्क नावाच्या अतिसूक्ष्म कणांपासून बनले आहेत. त्याशिवाय या अतिसूक्ष्म कणांना एकमेकांशी जोडून ठेवणारे 'फोर्स पार्टिकल्स' या जातीत मोडणारे आणखी वेगळेच अतिसूक्ष्म कण आहेत. अणूच्या आतली रचना अशाप्रकारे चक्रावून सोडणारी आहे.

एकापेक्षा अधिक अणू (अँटम) एकत्र येऊन रेणूची (मॉलिक्युल) रचना होते. जसे हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. आता या रेणूचे गुणधर्म पुन्हा त्याच्या घटक अणूंच्या गुणधर्मांपेक्षा विपरीत असू शकतात. म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू ज्वलनशील असतात, पण पाणी मात्र पेटूच शकत नाही!

सर्व सजीवांचा आधार असलेले डीएनए रेणू त्या त्या सजीव प्राण्याच्या संभाव्य विकासाचा सर्व आराखडा बाळगून असतात. आपल्या देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये हे डीएनए रेणू आहेत. ज्युरासिक पार्क या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एका डीएनए रेणूतून संपूर्ण प्राण्याची निर्मितीही करता येईल. देहाच्या प्रत्येक अवयवाचा रंग, रूप, आकार व अंतर्गत रचनेचा स्पष्ट आराखडा या अतिसूक्ष्म डीएनए

रेणूमध्ये कसा साठवला जातो? त्याच्या मदतीला धावपळ करणारे 'निरोप्ये' आरएनए नावांचे रेणू असतात. ते सुजाण असतात काय? प्रत्येक जीवपेशीतील डीएनए रेणू हे त्या त्या पेशीचे आर्किटेक्ट, इंजिनिअर, गवंडी, डॉक्टर, नर्स, आई वगैरे सर्व ऑल-इन-वन असतात.

एका जीवपेशीच्या उदरात दुसरी जीवपेशी सुखाने नांदू लागल्यावर मोठय़ा आकारांचे सजीव निर्माण झाले. कोटी-कोटी पेशी (सेल्स) एकत्र येऊन देहरचना करतात. देहाच्या प्रत्येक अवयवाची रचना वेगळी, कार्यही वेगळे. देहातील लक्षावधी पेशी दरक्षणी नष्ट होतात, त्यांची जागा नवनिर्मित पेशी घेत राहतात आणि तरीही त्या देहाचे जीवन अखंड सुरू राहते. गळून पडणार्‍या पेशींपेक्षा नवनिर्मित पेशींची संख्या कमी होत गेली की वार्धक्य व मृत्यूकडे वाटचाल सुरू होते., परंतु मृत्यूपूर्वी स्वत:सारखा दुसरा देह निर्माण करूनच सहसा प्रत्येक प्राणी-जीवनाचा अंत होतो.

ही सर्व एकाचवेळी महाविराट व अतिसूक्ष्म, गुंतागुंतीची पण नियमबद्ध रचना काय दर्शविते? आणि पृथ्वीवर सजीवांच्या उत्क्रांतीसोबत विकसित होत गेलेली ती असतेपणाची जाणीव, त्या जाणिवेला

फुटलेले वासनांचे, विकारांचे, बुद्धीचे, विचारांचे, कल्पनांचे, प्रतिभेचे धुमारे-ते कशासाठी?

(लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी-9881574954

Monday 25 June 2012

बुद्धविहार : भक्तिस्थळ की सेवा केंद्र?


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे दीक्षा घेईपर्यंत एकदोन अपवाद वगळता महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात विहार नव्हते. पण आज चित्र बदलले. महाराष्ट्रात तर अनेक गावांत आता नव्याने विहार बांधून झाले आहेत. दलितांच्या पारंपरिक देवालयांनी विहारांची जागा घेतली आहे तर ज्या ठिकाणी दलितवस्तीत पारंपरिक देवालयं नव्हती तेथे दलितांनी आता स्वत:च्या वर्गणीतून विहार बांधले आहेत. पांढर्‍याशुभ्र वस्त्रातील महिला पौर्णिमेच्या दिवशी अशा विहारांत येऊन वंदना घेताना दिसतात. आता ही विहारं केवळ प्रार्थनेसाठी जमण्याचा जागा उरलेल्या नसून सार्वजनिक कार्यक्रमाचीही महत्त्वाची ठिकाणं झाली आहेत. पण त्याच वेळी अशा विहारांमधील भन्ते अथवा श्रद्धाळू उपासक वारंवार एक खंत व्यक्त करताना दिसतात. दर गुरुवारी अथवा रविवारी किमान एक वेळ तरी उपासकांनी श्रद्धेने या विहारात जमायला हवे; पण अशी उपस्थिती मात्र तेथे नसते. ही खंत सर्वाचीच आहे. विहार बांधताना जो उत्साह असतो तो उत्साह दैनंदिन व्यवहारात मात्र दिसून येत नाही.

रविवारी भारतातले सर्व चर्च ºिश्चन अनुयायांनी फुलून जातात. मशिदीमध्ये सायंकाळी सर्व मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी मशिदीत जमतात. शुक्रवारच्या नमाजाला सर्व मशिदीत किती गर्दी असते हे आपण नेहमीच पाहतो. हिंदूंच्या मंदिरांची, देवतांची विविधता खूप. त्यामुळे तिथे प्रत्येक दिवशीच हिंदू पूजेअर्चेसाठी मंदिरात गर्दी करतात. असा हिंदू, ºिश्चन, मुस्लिम अनुयायातला उत्साह बुद्ध अनुयायांमध्ये नसतो. त्याची एक खंत अनेक भन्तेंना वाटते. श्रद्धाळू अनुयायांनाही वाटते. त्यामुळे विहारात जमण्याचे आवाहन वारंवार केले जाते. अर्थात, नागपूरच्या दीक्षाभूमीवर येण्याचे आवाहन मात्र करण्याची गरज पडत नाही. तिथे रोजच भरपूर वर्दळ असते.

ज्याचे-त्याचे आपल्या धर्मावर प्रेम असते. श्रद्धा असते. ºिश्चन, हिंदू अथवा मुस्लिम यांना अशा श्रद्धेचा हजार, दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळाविषयी श्रद्धा व्यक्त करावी अशी एक घट्ट मानसिकता त्यांच्या ठायी दिसते. बुद्ध अनुयायांबाबत मात्र असे नाही. अर्थात, हे विधान नवदिकितांपुरते सीमित आहे. मुळात धर्मातराची प्रक्रियाच एक पारंपरिक श्रद्धाभाव फेकून सुरू झाली आणि आजूबाजूच्या जवळच्या प्रदेशांत बौद्धांचे कुठलेही पारंपरिक कर्मकांड शिल्लक नाही. त्यामुळे बुद्धानुयायांना विहारात गेलेच पाहिजे अशी ओढ नाही.

मुस्लिम अथवा ºिश्चन माणसाला घरात एक देव्हारा असावा असे वाटत नाही. कारण प्रार्थनेचे ठिकाण सार्वजनिक असते ही त्यांची श्रद्धा आहे. हिंदूंचे मात्र असे असत नाही. त्यांना घरात एक देव्हारा हवा असतो. कोणतीही नवी गल्ली अस्तित्वात आली की, तिथे एक सार्वजनिक मंदिर हवे असते. श्रद्धाभाव वेगवेगळ्य़ा देवतांवर असल्यामुळे एकाच गल्लीत पुन्हा वेगवेगळ्य़ा देवांची मंदिरे हवी असतात. त्यात गावात जर पारंपरिक देवालय असतील तर तीही जतन व्हावीत ही मानसिकता व त्या प्रेमाचे श्रद्धायुक्त वर्तन असते. शिवाय अत्यंत जुनी देवालयं असतील तर त्यांचेही जीर्णोद्धार हवे असतात. कारण या देवालयाशी निगडित चरितार्थ चालेल अशी एक यंत्रणा विकसित होत असते. पूजा साहित्याच्या दुकानाला जोडून मग निवासासाठीचे हॉटेल्स असतात. प्रपंच आणि परमार्थ यांची एक सांगड घातलेली असते. हिंदू माणूस देवळात जातो. कारण त्याला मोक्ष मिळवायचा असतो. ºिश्चन माणूस प्रार्थनास्थळी जातो. कारण त्याला आपल्या चुकांची कबुली देऊन मन हलके करायचे असते, तर मुस्लिम माणूस मशिदीत जाऊन अल्लाहची जवळीक साधक असतो. या दृष्टीने आपलेही प्रार्थनास्थळ असावे असे बौद्धांना वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण आपण विहारात का जावे? याचे सर्वमान्य होईल असे एक पारंपरिक उत्तर मात्र बौद्ध धर्मात नाहीय. मुळात देवता, मंदिर ही संकल्पनाच तिथे नाही. भिक्खूंच्या निवासासाठी विहार आले. काही भिक्खूंना चैत्याऐवजी बुद्धमूर्ती हवी असे वाटले. त्यातून होनयान व महायान अशा दोन परंपरा निर्माण झाल्या. पण बौद्ध परंपरेत भिक्खूचे स्वरूप

समाजाची सेवा करणार्‍या कार्यकत्र्यांचे राहिले. भिक्खूंनी अभ्यास करावा, वैदकशास्त्र आत्मसात करावे, त्या मोबदल्यात समाजाने त्यांच्याविषयी आदर व्यक्त करावा. पण असा आदर व्यक्त न केल्यास भिक्खू शापवाणी उच्चरेल अशा कथा मात्र जन्माला आल्या नाहीत. विहार हे भक्तांना मोक्ष देण्याचे ठिकाण नसून ते एक ज्ञानोपासकांचे केंद्र अथवा आरोग्यसेवेचे ठिकाण असे विहाराचे स्वरूप जुन्या काळी होते. हा इतिहास डोळ्य़ासमोर ठेवला तर बुद्धानुयायांची मानसिकता नियमितपणे विहारात येण्याची का नसते हे समजून घेता येते. अर्थात, असे असले तरी उपासकांनी विहारात जमावे ही भन्तेची अपेक्षा चुकीची आहे असे कुणी म्हणणार नाही. पण त्यासाठी विहाराचे स्वरूप बदलायला हवे. बौद्ध तत्त्वज्ञानाशी ते सुसंगत व्हायला हवे असे मला वाटते. तसे स्वरूप झाले तर विहारात या अशी विनंती कुणाला करावी लागणार नाही.

आज महाराष्ट्रात बहुधा एकही मोठे गाव असे नसेल जिथे बौद्ध मतानुयायी डॉक्टर नसेल. तालुका, जिल्ह्याच्या गावी तर एकापेक्षाही संख्या अधिकच. डॉक्टरांनी ठरवलेच तर ते दररोज एक तास मोफत तपासणी करण्यासाठी फक्त विहाराचे ठिकाण निवडू शकतात. आज आरोग्यसेवा किती महाग झाली आहे याची आपणास कल्पना आहे. विहारात एखादी लहानशी लायब्ररी असावी आणि काही नसले तरी धार्मिक पुसतकांशी संबंधित वाचनालय चालविण्यासाठी एखाद्या शिक्षकाने आठवडय़ातले दोन तास मोफत द्यावेत म्हणजे हळूहळू गरजू विद्यार्थी तिथे जमू शकतील. स्वत:च्या मालकीचे सीडी प्लेअर आहे. सीडींचा संग्रह आहे असे बुद्धानुयायी कमी का आहेत? तर 'विहारात या!' असे कुणाला सांगण्याची गरज पडेल असे मला वाटत नाही. स्वावलंबी शिक्षणाचे वर्ग चालवणे, आरोग्यतपासणीचे केंद्र चालवणे, वृत्तपत्रे अथवा विद्यार्थ्यांना उपयुक्त होतील असे शिकवणीवर्ग चालवणे, संगीत, चित्राचे वर्ग चालवणे, बुद्ध तत्त्वज्ञानातील बहुचर्चित विषयांवरील व्याख्याने आयोजित करणे अशी कितीतरी समाजोपयोगी कामे विहारातून करता येतील. विहार हे भक्तीचे ठिकाण असावे की समाजोपयोगी शिक्षणाचे केंद्र? याचाच आधी निर्णय घ्यावा लागेल. नागपूरच्या दीक्षाभूमीस भेट देण्यामागे एक श्रद्धाभाव आहे. पण अगदी तेवढाच प्रचंड खर्च करून भव्यतेच्या बाबतीत दीक्षाभूमीशी स्पर्धा करेल असे गुलबर्गा येथील ठिकाण मी का पाहावे? एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच ना? कारण विहारात गेल्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही असा कुठलाच श्रद्धाभाव माझ्या मनात नाही. माझ्यासाठी विहार नवसासायसाचे ठिकाण नाही. किमान धर्मकांड करण्यासाठी तरी तिथे जावेच अशी कोणतीही परंपरा माझ्या श्रद्धेत नाही. अशा परिस्थितीत मी विहारात गेलेच पाहिजे. का गेलेच पाहिजे याचे एकच उत्तर माझ्या मनात शिल्लक राहते ते म्हणजे 'मी बुद्ध आहे.' एवढय़ासाठीच तिथे गेले पाहिजे. शिवाय श्रद्धाभावाच्या आवाहनाखेरीज अन्य कुठलेही आवाहन यामागे आहे का? जर नसेल तर काही गोष्टी कर्मकांड म्हणूनसुद्धा ठसवाव्या लागतात. कुठल्याही मंगलकार्यासाठी विहाराशिवाय अन्य ठिकाण निवडायचेच नाही, असा निर्णय घेऊन पाहा. एक कर्मकांडाचे ठिकाण म्हणून का होईना, विहारात गेलेच पाहिजे ही भावना उत्पन्न होऊ शकते. बौद्ध संस्काराचे एक केंद्र म्हणून जरी विहाराकडे जाणे अपरिहार्य झाले तरी विहाराचे स्वरूपही बदलू शकेल आणि विहारात येण्याचे आवाहनही संपुष्टात येऊ शकेल. पण इथे तर एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आम्हांला कार्यालये लागतात. एकदिवसीय साहित्य मेळावे किती होतात? पण त्यासाठी कधी विहाराची आम्हांला आठवण येत नाही आणि समजा आलीच, तर आमचे भन्ते आम्हांला परवानगी तरी देतील का? धर्म ही श्रद्धेने टिकवायची गोष्ट आहे, तर धम्म ही व्यक्तीव्यक्तीतल्या स्नेहसंबंधाने जतन करावयाची बाब आहे. आपण त्यापैकी कशाचा स्वीकार करायचा? हे आपणालाच ठरवावे लागेल.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084
     

Sunday 24 June 2012

विहरण

विहरण करणे, फिरणे हा माणसाचाच नव्हे, तर पशुपक्षी, प्राणी सर्वाचाच अंगभूत स्वभावधर्म आहे. म्हणूनच 'लीळाचरित्रा'त वारंवार त्यासंदर्भातली वाक्ये येत राहतात. 'एक दीस गोसावी उदीयासीचि वीहरणासि बीजे केले :' या दोन्ही शब्दांचे अर्थ परस्परावलंबी आहेत. विहरण करायचे म्हणजे कुठून तरी, कुठे तरी बीजे करावेच लागणार. मग गोसावी 'वीसैयेसि बीजे केले : गावा पूर्वे तळे असे : तेया तळेयाचीये पसिमीली पाळी तिनि देऊळ :' असे उल्लेख कॉलेजच्या अभ्यासक्रमात 'लीळाचरित्र' होते. त्यात वाचायला मिळाले आणि स्थळसंदर्भाना ऐतिहासिक, पौराणिक पाश्र्वभूमीवर किती महत्त्व असते याचे परिपक्व आकलन झाले.

हजारो वर्षापासून खरे म्हणजे आदिम काळात मानवाने जंगले जाळून, नांगरूण इथे शेतीचा शोध लावला. गुहेतून बाहेर येऊन वाडय़ावस्त्या, गावे-नगरे वसवली. तेव्हापासून या भूमीवर, या मातीवर किती किती पावले येऊन गेली असतील याचा विचार मनात येतो आणि त्याच वेळी मानवी जन्माच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता अधिक तीव्र टोकदार होऊन मनावर उदासीचा झाकोळ दाटून येतो.

किती किती पावले इथे

येतील आणि जातील निघून

हीच माती, हीच जमीन

वर्षानुवर्षे राहील टिकून..

जसजसे वय वाढत जाते तसतशी पायाखाली अधिक भूमी घेण्याची अंगभूत मनस्वी ओढ वाढत जाते. घर, गल्ली, गाव, शिवार या क्रमाने आपण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षा विस्तारत नेण्याचा प्रयत्न करतो. आधी गावाच्या चारीमेरा असणारे शिवार डोळ्य़ांच्या आणि पायांच्या कवेत जन्मभर आठवणीच्या संस्मरणीय अनुभूतीच्या पातळीवर मग आपल्या स्मृतिपटलाभोवती ते वेटाळत राहते. सहावी-सातवीत असताना मला सकाळ-संध्याकाळ गावखोरच्या शेताच्या राखणीसाठी पाठवले जाई. ज्वारीच्या कणसावर बसणार्‍या चिमण्यांना पुढे रब्बीच्या हंगामात करडी गव्हाचे पीक बेहाडे झाल्यावर गव्हाच्या ओंब्यांना झोंबणार्‍या चिमण्यांना आणि करडीच्या बोंडय़ावर पंख फडफडवत दाणे टिपणार्‍या पोपटांना चारीमेरा पळत पिटाळून लावायचे म्हणजे एक जागी स्थिर उभं राहणं शक्यच नसायचं.

आणि घरातून शेतासाठी हाकलून देतानाच दादा-मायने ताकीद दिलेली असायची. ''राखणीसाठी चाल्ला याचं भान ठेव. अन् झांबल्यासारखा एकाच ठिकाणी उभा राहू नको. एकाच ठिकाणी पाहत बसू नको. चारीमेरा लक्ष ठेवजो.'' तेव्हापासून ह्या शब्दाने काळजात गच्च गच्च, पक्क ठाण मांडलेलं. आपल्या ग्रामीण भागात बारा कोसांवर भाषा बदलते. भाषेचा लेहजा बदलतो. शब्दांचे हेलकावे बदलतात असं म्हटलं जातं. त्यात काहीच खोटं नाही. हे पुढे फिरस्तीवर असताना, समाजमन न्याहाळताना लक्षात आलं.

लहानपणी शेतकरी कुटुंबाशीच आणि शेतरानात कामं करणार्‍या स्त्री-पुरुषांशीच अधिक संबंध येत गेला. शिक्षणापेक्षा शेतकरी कुटुंबातील वयाला साजेशी बारकी बारकी कामे नित्यनेमाने करावीच लागत. कधी मारून मुटकून, कधी स्वयंप्रेरणेने म्हणजे आळं करावी लागत आणि बळं करावी लागत. कधी सुताराच्या कामठ्ठय़ावर औतं-फाटे आणण्यासाठी जावश लागे. कधी लोहाराच्या भात्यावर शेवटायला टाकलेल्या पाशी, कुर्‍हाडी, खुरपे, विळे अशी औजारं आणायला जावं लागे. कधी कटिंग करण्यासाठी न्हाव्याच्या घरी तासन्तास बसावं लागे. तो हातातली धोपटी पुढय़ात घेऊन समोरच्या माणसाला पोत्यावर बसवून आपलं बलुतेदारीचं काम करीत राही. यावेळी या गावपातळीवरच्या प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्य़ा स्वभावगुणांची माणसं बोलताना ऐकावी लागत. त्यातून प्रत्येकाच्या संवादकौशल्याचा, शब्दांच्या आणि वाक्यांच्या मांडणीचा, त्यातून व्यक्त होणारा प्रत्येकाचा भाषिक बाज आणि संवादाचा ठसका वेगळा आहे याची जाणीव होई हे सगळं विहरणामुळेच.

आणि हे असतंच. जसा एकाचा चेहरा दुसर्‍यासारखा नसतो तसाच आवाजही नसतो. स्वभावही नसतो. म्हणून तर प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्तिमत्त्व प्राप्त होत असतं. आणि या जगरहाटीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाला मग चारीमेरा विहरण करणं क्रमप्राप्त ठरतं. जसं आपल्या कुटुंबकबिल्याच्या चरितार्थासाठी शिक्षण, नोकरी या क्रमाने आपल्याला भटकंती करावी लागते तशीच मनाच्या भरणपोषणासाठी मानसिक पातळीवर काही संस्मरणीय ठेवा उपलब्ध करणे हा भ्रमंतीचा हेतू असतो.

नववी-दहावीत असताना समजलं. गावातले काही हौशी लोक श्रवणातल्या तिसर्‍या सोमवारी सप्तऋषीची वारी करतात. तिथून परतल्यावर त्या रात्रभरच्या प्रवासाच्या थरारक कथा सांगतात. त्या ऐकून एका वर्षी मलाही जाण्याची ऊर्मी आली. गावातून डोंगरवाटांनी निघून आधी वडाळीला जायचं. तिथून रात्री बारा वाजता आंघोळ करून ओल्या परदणीने मग रात्रभर नव्हे, दुसर्‍या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत अखंड पायी प्रवास करून हे सप्तऋषी पूर्ण करायचे. असा वर्षानुवर्षापासून या परिसराचा नियम आहे. 'रामायण', 'महाभारत' काळातील या सप्तऋषींनी अतिशय निर्जन अशा डोंगरी भागात आपली ठिकाणं निवडली आहेत. तशीच माणसांची मनंही विलोभनीय कथांनी समृद्घ केली आहेत.

वडाळी गावचा वसिष्ठ, देहपचा बग्दालभ्य, गोमेधरचा गौतमेश्वर किंवा गौतम, वरवंडचा वाल्मीकी, पाथर्डीचा पारेश्वर, दुर्गबोरीचा दुर्वास, इसवीचा विश्वमित्र असे हे ऋषी क्रमश: डोंगरपट्टय़ात वास्तव्य करून आहेत. कुठे कुठे दाढीमिशा असणारी त्यांची चित्र हेमाडपंती महादेवाच्या मंदिरात भिंतीवर कुणीतरी काढलेली आहेत. कुठे कुठे तीही नाहीत. मंदिरातल्या शिवलिंगाची ओळख तीच ह्या ऋषींची. म्हणजे पुराणकथेतले हे सगळे ऋषी या मंदिरातून महादेवाच्या पिंडीच्या रूपालाच स्थानापन्न झालेले दिसून येतात. तसेच भाविकांच्या मनातही.

बसक्या आकाराची ही ठेंगणी मंदिरे एरवी वर्षभर सुनसान असतात. माणसाच्या छातीइतक्या किंवा कमरेइतक्या उंचीच्या दारातून वाकून मंदिरात प्रवेश करायचं, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा डोंगरवाटा तुडवत 'हर बोला महादेव' चा जयघोष करीत पुढच्या मंदिरासाठी पळत सुटायचं. असा या प्रवासाचा रात्रक्रम आणि प्रभातक्रम असतो.

वयाच्या सोळाव्या वर्षी सहज एक थिल्र म्हणून या प्रवासात लोकांसोबत सहभागी झालो आणि पुढे सात वर्षे न चुकता दरवर्षी श्रवण महिन्यात या भटकंतीत सहभागी होत राहिलो. रात्री बारा वाजता सुरू होणार्‍या, दुसर्‍या दिवशी संपणार्‍या बारा तासांच्या या प्रवासात आपल्या कल्पनेतील निसर्गातल्या सगळ्य़ा सुंदर आणि थरारक गोष्टी पाहायला मिळतात.

श्रवण महिना असल्यामुळे सगळ्य़ा डोंगरी वनस्पती, वेली, झाडझाडोरा गर्द हिरवा आणि दाटगच्च झालेला. थेट अंगावर येणारा सरळसाठ डोंगर चढताना दमछाक होते तर उतरताना पाय घसरून कुठल्या कुठे घरंगळून जाऊ नये म्हणून अनवाणी पंजांची बोटे घट्ट निसरडय़ा ओल्या जमिनीत रुतवून उतरण उतरायची. मधेच कुठेतरी दूरवर पाऊस पडतो. आडव्या वाहणार्‍या उतावळी आणि मन नदीला पूर खंगाळत जातो. त्या पुरातून एकमेकांना आधार देत नदी पार करायची. पावसाच्या सरी पडत असतानाच काळ्य़ापांढर्‍या ढगांतून चंद्राचा प्रकाश खाली जंगलावर पसरतो. आधीच चंदेरी रंग धारण केलेला सागाचा फुलोरा त्या चंद्रप्रकाशात इतका मोहतुंबी दिसतो, की हा निसर्ग सोडून माणसांच्या वस्तीत परत जाऊच नये असे वाटत राहते. मात्र मागेपुढे अखंड माणसांचा प्रवाह टोळ्य़ा करून पुढे जात असल्यामुळे त्यांच्याच आधारे या निबिड अरण्यात विहरण करणे शक्य होते. हे खरं वास्तव असतं.

खेडय़ापाडय़ातल्या अभावग्रस्त माणसालाही भटकंतीची, प्रवासाची ओढ असते. मात्र प्रवासखर्चाची व्यवस्था नसल्यामुळे ही आपली मानसिक भूक तो भागवू शकत नाही. त्यासाठी कधी काळी कुण्या कल्पक समूहाने ही जी प्रवासाची शक्कल लढवली त्याच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. प्रवासाच्या ओढीला पुन्हा पदरी पुण्य जोडण्याचा आध्यात्मिक आधार! आधी माहीत नव्हतं. पण कॉलेजच्या अभ्यासक्रमात 'लीळाचरित्र' वाचल्यानंतर समजलं. शेवटच्या याच इसवी नावाच्या गावात याच विश्वमित्राच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या मंदिरात चक्रधर स्वामी वास्तव्य करून गेले. तेव्हा त्या विहरणाने जो आनंद दिला त्याला खरोखर तोडच ठरली नाही एवढं मात्र खरं.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

भ्रमणध्वनी - 9420564982

लाल दुपट्टेवाली

'ही पोरगी कोन व्हय रे बारक्या?'

'कोनती हो मामा?'

'ही गाडीवर मांगून बसून चालली.. तोंडाले लाल दुपट्टा..

डोयाले गॉगल.. हातात मोबाइल.. वयखू येत नाही लेकाची.'

'काय मालूम कोन व्हय'

'अन् तो पोट्टा कोन व्हय गाडी चालोनारा?'

'तोही वयखू आला नाही, त्यानंही तोंडाले दुपट्टा बांधला'

'सरकारनं या दुपटय़ावर बंदी आणली पाह्यजे'

'काहून?'

'दुपट्टा बांधला की पोरगी वयखू येत नाही, कोनाची व्हय

ते सांगता येत नाही, रंगारंगाचे दुपट्टे बांधतात, मानसाले

पेच पडते, दुपट्टा असा बांधतात की सारं तोंड झाकून

घेतात, चष्मा लावल्यावर डोये दिसत नाहीत, म्हणजे

जवान हाय की म्हतारी हाय तेही समजत नाही,

'दुपट्टा त्या पोरीनं बांधला, त्यात तुमचं काय जाते?'

'अबे तिचं तोंड दिसत नाही ना !'

'मग तुमचं काहून टेन्शन वाढून राह्यलं?'

'गाडीवरच्या पोरीचं तोंड दिसलं पाह्यजे, म्हणजे

माणसाले समजते की अमक्याची पोरगी तमक्याच्या रस्त्यानं गेली, कोनं विचारलं तर सांगता येते,

असा दुपट्टा बांधल्यावर काय सांगाव मानसानं?'

'खुशी तिची! ती दुपट्टा बांधीन नाहीतर तोंडाले

लुगडं बांधीन, तुमचं काय जातं?'

'अबे पन मानसाले समजलं पाह्यजे किनी?'

'काय?'

'गाडी चालोनारी पोरगी कोनाची व्हय? मांगून

बसनारी कोन व्हय? आता हा नवाळाच पोरगा

हिरोहोंडा घेऊन गेला अन् मागून एक पोरगी

बसून नेली, काय समजाव मानसानं?'

'मी म्हनतो गाडी त्याहिची.. दुपटा त्याहिचा अन्

तुमचाच काहून झेंडू दाटून येऊन राह्यला?'

'मले समजलं पाह्यजे ना बे'

'काय समजलं पाह्यजे?'

'पोरीचं नाव गाव समजलं पाह्यजे म्हणजे मानूस

ध्यानात ठेवते, नाहीतर मानसाची फसगत होते'

'कशी?'

'एकखेप असं झालं की एक नखरेल नार दुपट्टा

बांधून रस्त्यानं चालली होती'

'मंग?'

'मी म्हनो कोन व्हय एवढी झोकात चालली.. मी

तिच्या मागून गेलो.. तिचं लक्षच नाही.. पुढे

गेल्यावर ते हातगाडीवर फुगे खायाले गेली, मी

तिच्या जवळ गेलो, जवा तिनं फुगे खायाले दुपट्टा

सोडला तवा माहीत पडलं की, यह तो अपनेही घर का मामला है!'

'म्हणजे?'

'ते तुही मामीच निंगाली! म्हणजे कधी कधी मानसाची

अशी गलत फॅमिली होते'

'एकखेप मलेबी असचं घडलं होतं, एक जवान

पोरगी स्कुटी घेऊन चालली होती, तोंडाले दुपट्टा

होता, मी तिच्या मागून गाडी घेऊन निघालो,

जवा ते पोलीस स्टेशनमध्ये घुसली तवा समजलं

की ते पोलीसीन व्हय! मंग मी फटेतक

घरी पयालो'

'अशी लयखेप घडते मानसाले बारक्या'

'आता ते दोघं गाडी घेऊन मार्केटीत गेले,

थोडय़ावेळानं वापस येतात.. ध्यानात ठेवजा'

'आजकाल असे प्रकार लय वाढले, हे रिकामे

पोट्टे पोरीले गाडीवर बसून नेतात अन् तिकळेच

गोपायकाला करतात, हे सारे रईस बापाचे

रईस लेकरं हायेत, बाप दोन नंबरचे पैसे कमावते,

पोराले गाडी घेऊन देते, मोबाइल देते, शौकाले

पैसे देते म्हनून हे उतमात करतात,'

'शहरात हे कॉमन झालं मामा'

'अरेपन मायबापानं लक्ष ठेवलं पाह्यजे.. त्यारोजी

आमच्या घरा शेजारची पोरगी कांपुटर क्लासले जातो

म्हने, अशीच एका पोराच्या गाडीवर बसून गेली.

कांपुटर क्लास एका घंटय़ाचा होता, पन ही पोरगी सात घंटे लोडशेडिंगसारखी गायब होती, आम्ही सारे तिले पाहूपाहू थकलो, दिसल्यावर म्हने की,मी मारोतीच्या देवळात बसेल होती, ब्रह्मचार्‍याच्या.

देवळात जवान पोरीचं काय काम? विनाकारन

त्या मारोतीचं नाव बदनाम करतात'

'मायबापानं ध्यान ठेवलं पाह्यजे पोरीवर'

'आपून आपल्या पोरीले घराच्या बाहीर फटकू

देत नाही, कॉलेज झालं की सरकी घरी येते,

कोनाच्या लेन्यात नाही अन् कोनाच्या देन्यात

नाही, संस्कारच तसे आहेत आपले.. आपून

असा दुपटा बांधून पोरीले फिरू देत नाही'

'लोकं तोंडाकडे पाह्यतात म्हनून काही पोरी

दुपट्टे बांधतात'

'लोकं पाह्यत ना.. आंगाले भोकं पडतात काय?

पाहून पाहून कितीक पाह्यतीन लेकाचे ? पाह्यल्यानं

डोये थोडेच येतात?'

'ते पहा आली गाडी.. ते मघाचे दोघं वापस

आले'

'पाहूदे मले.. कोनाची व्हय पोरगी?'

'ओ मामा.. हे तुमचीच पोरगी व्हय'

'ओ? शिली व्हय काय?'

'शिलीच होती.. गाडी भर्रकन निघून गेली.. तुमचं

ध्यान कुठं होतं?'

'कशावरून शिली होती?'

आपल्याले पाहून तिनं खाली मुंडी घातली'

'आता लय झाली या पोरीची! तिले फक्त

आता घरी येऊ दे.. तिचे हातपाय बांधतो

अन् तिच्या मायचेही बांधतो.. बस झाला लाळ!'

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

श्रीकृपा कॉलनी,

अकोला रोड, अकोट, जि.अकोला

भ्रमणध्वनी - 9561226572

Friday 22 June 2012

दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा

       पुण्याची गोष्ट. काही वर्षापूर्वी माझ्या कार्यशाळेचा एक विद्यार्थी आपल्या बहिणीला घेऊन आला. काउन्सिलिंगसाठी. केस फारच विचित्र होती. बहीण सांगू लागली, की माझा नवरा एवढ्यात माझ्यावर खूप संशय घेतो. पंधरा दिवसांपूर्वी तो मला म्हणाला, ''मी तुला रंगेहाथ पकडलं. आज दुपारी तू तुझ्या प्रियकरासोबत घरात रासक्रीडा करत होतीस. तू ब्ल्यू रंगाचा गाऊन घातला होता. तुझ्या त्या प्रियकरानं लाल रंगाचा शर्ट घातला होता आणि तुम्ही माझ्या घरात माझ्या बेडवर असली थेरं करता?'' असं म्हणून तो खूप भांडू लागला. मी त्याला परोपरीनं समजावून सांगत होती, की असं काही नाही. मी एकटीच घरी होते. झोपले होते. तुम्ही केव्हा आलात? केव्हा पाहिलंत? पण या प्रश्नांचं उत्तर न देताच तो खूप भांड भांड भांडला.

पुन्हा आठ दिवसांनी याच पद्धतीचा आरोप त्यानं केला. या वेळी मी हिरवा गाऊन घातला होता अन् माझ्या प्रियकरानं पांढर्‍या रंगाचं शर्ट घातलं होतं असं सांगून आम्ही कशी रतिक्रीडा करत होतो याचं साद्यंत वर्णन करू लागला. जणू काही बेडरूममध्ये उभा राहून तो सारं पाहतो आहे.

पुन्हा कडाक्याचं भांडण.. हे सारं खोटं आहे म्हटल्यावर त्यानं माझ्या अंगावर हात टाकला. मला खूप मारलं. ती काकुळतीनं सांगत होती, ''सर, हे सारं खोटं आहे हो! मी असं काही केलं नाही. माझा कुणी प्रियकर नाही. लग्नाला दोन वर्षे झाली. आता अचानक हे असं का करतात? माझ्यावर कां खोटा आळ घेतात?'' मुलगी अगदी प्रामाणिकपणे बोलत होती. इतक्या वर्षाच्या अनुभवाच्या आधारे ती खरंच बोलते आहे हे माझ्या लक्षात येत होतं.

मी तिला समजावू लागलो. काही माणसं संशयापायी एवढी पछाडली जातात, की मनात आलेली शंका त्यांना खरीच वाटायला लागते. कधीकधी हा आजार बळावला तर त्यांना तशी दृश्येही दिसायला लागतात. आम्ही याला 'पॅरोनिया', 'संशयपिशाच' म्हणतो. तो पेशंट आहे असं समजून त्याला वागवावं लागेल. प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागेल. मी समजावून सांगितलं. बहीणभाऊ पोलिसांकडे तक्रार करणार होते. त्यापासून त्यांना परावृत्त केलं.

बहिणीने जाता जाता मला विचारलं, ''सर, मेडिटेशनमुळं असं होतं कां? माझा नवरा म्हणतो, मी प्रत्यक्ष पाहिलं. मला दिसतं. कुठलंही मी पाहू शकतो. कुणा गुजरातच्या देसाईचा मेडिटेशन कोर्स माझ्या नवर्‍यानं केला आहे.''

''मेडिटेशनमुळं असं होत नाही. असं होत नसतं.'' असं सांगून मी त्यांना पाठवलं. पण त्यांचे वाद वाढतच गेले. त्यांना वेगळं होणं भाग पडलं. माझ्या विद्यार्थ्यानं पुढे मला माहिती पुरवली त्याच्या बहिणीनं वैतागून घटस्फोट द्यायचं ठरवलं.

14 जूनला नागपूरच्या देशपांडे सभागृहात अहमदाबादच्या माइंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईचा कार्यक्रम झाला. माझे काही कार्यकर्ते ऐकायला गेले होते. त्यात देसाईनं दावा केला, ''माझा दोन दिवसांचा वर्कशॉप केल्यानंतर मेडिटेशनद्वारे 'थर्ड आय'ची शक्ती जागृत होते. ('अँस्ट्रल ट्रॅव्हल' असंही त्याला म्हटलं) त्याद्वारा तुम्ही नागपुरात असताना तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी दिल्लीत वा कुठेही असले तरी तुम्ही त्यांना पाहू शकता. ते त्या वेळी काय करताहेत, त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत वगैरे सारं तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.''

16-17 जून रोजी नागपुरात झालेल्या वर्कशॉपमध्ये स्नेह देसाईनं मेडिटेशनमध्ये सूचना दिली, ''आता तुम्ही शरीराच्या बाहेर आला आहात. स्वत:ला पाहता आहात.. तुम्हांला आता जिथे जायचं आहे तिथे जा.. पाहा'' आणि मग काही लोकांनी घरी जाऊन पाहिलं. कुणी दूरवरच्या गावी जाऊन पाहून आले. काहींनी परदेशात मित्र-नातेवाईक काय करतात तेही पाहिलं. नंतर त्यांचे अनुभव रेकॉर्डही केलेत.

काय प्रकार आहे हा? मी गेली 22 वर्षे हिप्नोथेरपी, संमोहन उपचार शिकवतो. सुरुवातीस प्रामुख्यानं मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, सोशलवर्कर्स यांना शिकवत आलो. पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर विविध प्रकारे संमोहनाचे प्रयोग करून पाहिले आहेत. सर्वसाधारणत: सुशिक्षित लोकांपैकी 60 ते 70 टक्के लोक डीप-मेडियम ट्रान्समध्ये जाऊ शकतात. त्यांना सहज व्हिज्युअलाजेशन होतं. डोळ्य़ांपुढे चित्रमालिका उभी राहते. म्हणजे या अवस्थेत जी कल्पना मनात करतात अथवा त्यांना सांगितलं जातं ते प्रत्यक्ष दिसू लागतं. अगदी स्पष्ट-स्वच्छ दिसतं. डोळे बंद असताना उघडय़ा डोळ्य़ांनी पाहिल्यासारखं सारं दिसतं. पण हे सारं काल्पनिक असतं. खरं नसतं. ही मानवी मनाबाबत सहज घडून येणारी गोष्ट आहे. या व्हिज्युअलाजेशनच्या मानवी मनाच्या, सामर्थ्याचा उपयोग संमोहन उपचारांमध्ये रोगदुरुस्तीकरिता व्यक्तिमत्त्वविकासाकरिता केला जातो.

चलाख स्नेह देसाई बुवांनी हे तेच (पुण्याला मेडिटेशन शिकविणारे ते देसाईबाबा हेच आहेत हे आता मला कळलं.) व्हिज्युअलाजेशनचं सामर्थ्य म्हणजे थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल असल्याचं सांगून तुम्ही दोन दिवसांत 'दिव्य दृष्टी' प्राप्त करू शकता असं सांगून चक्क लोकांना फसविण्याचा धंदा सुरू ठेवला आहे. ही केवळ मनाची कल्पना असते ही वस्तुस्थिती न सांगता तुम्ही सूक्ष्म देहानं कुठेही जाऊन पाहू शकता असं हा स्नेह देसाई नामक भंपक बाबा सांगतो.

भारतीय संस्कारात वाढलेला माणूस 'दिव्य दृष्टी'च्या या सिद्धान्तावर चटकन विश्वास ठेवतो अन् भरपूर पैसे भरून स्वत:ला फसवून घेतो. माझ्या विद्यार्थ्याच्या बहिणीच्या त्या नवर्‍यानं पुण्यात स्नेह देसाईची कार्यशाळा केली. त्याची थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती जागृत झाली अशी त्याची समजूत झाली. दुकानात असताना मेडिटेशनमध्ये जाऊन तो घरी बायको काय करते हे पाहू लागला. (त्याला वाटू लागलं आपण घरी जाऊन सूक्ष्म देहानं खरंच पाहतो आहे.) त्याला त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत रतिक्रीडा करताना दिसू लागली. त्याच्या मनात जशी कल्पना येईल तसं दिसेल. हा सारा मनाचा खेळ. पण त्यांच्या भंपळ बाबानं, स्नेह देसाईनं तर सांगितलं होतं, की तुम्ही सूक्ष्म देहानं प्रत्यक्ष जाऊन पाहता. मग दिसतं ते सारं खरंच असं त्याला वाटू लागलं. त्या वेळी त्या मुलीला मी पोलीस तक्रारीपासून परावृत्त केलं याचं वाईट वाटतं. मारहाणीच्या केसमध्ये तिच्या नवर्‍याच्या जबाबात देसाईच्या 'थर्ड आय'चा उल्लेख आला असता.. आणि.. पण मेडिटेशनच्या नावाखाली एवढा खोटारडेपणा करणारा स्नेह देसाईंसारखा एखादा ट्रेनर असू शकतो हे त्या वेळी मला माहीत नव्हतं. म्हणूनच आता आपण त्याला 15 लाखांचं आव्हान टाकलं आहे. 'थर्ड आय' सिद्ध करा, 15 लाख रु. जिंका! नाहीतर जनतेची माफी मागा!

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी : 9371014832

Thursday 21 June 2012

शेतीतून बाहेर पडण्याची आकांक्षा

शेतीतून बाहेर पडण्याची आकांक्षा
सीईटीच्या निकालानंतर अनेकांचे फोन आले. प्रत्येक जण आपल्या पाल्याला मिळालेले गुण मोठय़ा कौतुकाने सांगत होता. तेवढय़ात सुभाष मायेकरचा फोन आला. सुभाष हा माजलगाव तालुक्यातील एक जाणकार शेतकरी. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता. त्यामुळेच माझी ओळख झालेली. पेरणीचे दिवस आहेत. खत, बियाण्यांची वानवा आहे. मला वाटले की, त्यासाठीच त्याने फोन केला असावा. वीज कंपनीचे लोक हल्ली कनेक्शन तोडत फिरत आहेत. यानेही आकडा टाकलेला असावा. कदाचित त्यासाठी फोन केला असेल. असा विचार करीतच मी मोबाईलचे बटन दाबले. तिकडून सुभाष म्हणाला, 'अमर काका, मी आज खूप खूश आहे. आजचा दिवस माझ्यासाठी दिवाळी-दसर्‍यापेक्षाही जास्त आनंदाचा आहे. कोणाला सांगू, कोणाला नाही, असे मला झाले आहे म्हणून मी तुम्हाला फोन लावला.' नेमके काय झाले, हे मला समजेना. मी काही विचारण्याच्या आत सुभाष म्हणाला, 'पोराला सीईटीमध्ये 177 गुण मिळाले. स्टेट लिस्टमध्ये 607 वा आहे. मेडिकलच्या 2007 जागांपैकी ओपनसाठी 1030 जागा आहेत. त्याचा मेडिकलला नक्की नंबर लागतो. काका, मी सुटलो. माझ्या पुढच्या पिढीला शेतीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. त्याला शेतीचा नरकवास भोगावा लागू नये हीच माझी इच्छा होती. बस, मला एवढेच पाहिजे होते..' सुभाषला काय बोलू, काय नको असे झाले होते. आपल्या मुलाच्या यशाचे कौतुक कोण्या बापाला नसते? सगळ्यांनाच असते. पण हा आनंद वेगळा होता. एका शेतकर्‍याचा आनंद होता.. या आनंदाची जातकुळी

इतर आनंदाहून वेगळी होती. ती नव्याने समजून घ्यायला हवी.

पुढार्‍यांना वाटते, आपला मुलगा आमदार, खासदार व्हावा. किमान सोसायटीचा चेअरमनतरी व्हावा. चित्रपट कलावंतांना वाटते, आपला मुलगा हिरो व्हावा. डॉक्टरांना वाटते, आपला मुलगा डॉक्टर व्हावा. एवढेच काय, साध्या शिक्षकालाही वाटते की, आपला मुलगा नोकरदार म्हणून चिटकला जावा. मात्र शेतकर्‍याला आपला मुलगा शेतकरी व्हावा असे अजिबात वाटत नाही. असे का? पुढारी, बिल्डर, चित्रपट कलावंत, उद्योगपती किंवा नोकरदार यांना त्यांच्या क्षेत्राच्या सुखाचा अनुभव असल्यामुळे आपल्या पाल्यासाठी तेच क्षेत्र ते निवडतात. मात्र शेतकर्‍याचा अनुभव अत्यंत कडवट असतो. शेती करणे म्हणजे निखार्‍यांवर चालणे आहे, हा त्यांच्या आयुष्याचा सार असतो. मी जे भोग भोगले ते माझ्या लेकराच्या वाटय़ाला येऊ नयेत, अशी त्याची धारणा असते. म्हणूनच शेतकरी आपल्या लेकरांना शेतकरी होण्यास प्रोत्साहन देत नाही. उलट त्याने दुसरे काहीही करावे, पण शेती मात्र करू नये, यासाठी तो प्रयत्नशील असतो. सुभाषच्या आनंदाच्या तळाशी हीच वेदना होती.

हीच परिस्थिती स्त्रियांची आहे. आपल्याला मुलगी होऊ नये, अशीच बहुतेक स्त्रियांची सुप्त इच्छा असते. आपल्याला मुलगी झाली, याचा विषाद पहिल्या बाळंतिणींच्या चेहर्‍यावर अनेकदा दिसून येतो. त्याचेही कारण हेच आहे. तिने आयुष्यात जे चटके सोसले, राबराब राबावे लागले, अपमान सहन करावा लागला, सगळी स्वप्नं आपल्यादेखत जळून जाताना पाहावी लागली, वाईट नजरा, वखवखलेपण नजरेआड करावे लागले, आई-बाप, नाते-गोते, नवरा-सासू-सासरे, जाणणारे न जाणणारे यांच्याशी वागताना जशी तारेवरची कसरत करावी लागली, हे सगळे आपल्या अपत्याच्या वाटय़ाला येऊ नये, हीच तिचीही भावना असते. काही जणी हे बोलून दाखवितात. काही जणी बोलत नाहीत, एवढेच. स्त्रियांच्या बाबतीत परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मुलगी जन्मालाच येऊ नये, यासाठी भ्रूणहत्या केल्या जाऊ लागल्या आहेत. शेतकरी आपल्या मुलांचा जीव शेतीत अडकू नये याची खबरदारी घेऊ लागले आहेत.

शेतकरी आणि स्त्री यात समान संकटाचे विलक्षण साम्य आहे. आमच्या समाजात सर्वाधिक अडचणीत हेच दोन घटक आहेत. या दोघांमध्ये दुसरे एक साम्य आहे. हे दोघेही सृजनशील आहेत. शेतकरी मूठभर बियातून मणभर दाणे निर्माण करतो. एका दाण्याचे हजार दाणे करणारा तो किमयागार आहे. स्त्री नव्या जीवाला जन्म देते. आपल्या गर्भात ती नऊ महिने सांभाळते. माणसासारख्या माणसाला जन्माला घालते. त्याचे संगोपन करते. दोघेही सृजनाशी संबंधित आहेत आणि दोघेही संकटात आहेत.

स्त्री आणि शेतकर्‍याशिवाय हे जग चालू शकत नाही. ते इमारतीचा पाया आहेत. हा पाया आज खिळखिळा झाला आहे. दुबळा झाला आहे. खंगला आहे. भंगला आहे. इमारतीच्या ¨भती कितीही सजवलेल्या असल्या तरी त्यांना उभे राहण्यासाठी पाया नसेल तर त्या सुंदर भिंती एका क्षणात जमीनदोस्त होऊन जातात. शेतीबाहेर राहून गमजा करणार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, तुम्ही आता ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहात. ही परिस्थिती सर्वावर कोसळणार्‍या भीषण संकटाची पूर्वसूचना आहे.

शेती तोटय़ात ठेवल्या गेली. शेतकरी आपल्या गरजा मारून जगले. क्रयशक्तीच्या अभावामुळे त्यांच्या गरजा मागणीत रूपांतरित होऊ शकल्या नाहीत. मागणी नसल्यामुळे नव्या वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले नाही. उत्पादन नाही म्हणून रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून शेतकरी शेतीत अडकून पडले. त्यात तुम्ही सिलिंगचा कायदा आणला. कोरडवाहू असेल तर चोपन एकर, बागायत असेल तर अठरा एकर अशी मर्यादा घालण्यात आली. भाऊ वाटण्या होत गेल्या. जमिनीचे तुकडे पडत गेले. आज बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक म्हणजे पाच एकराच्या आतले आहेत. त्यांनी कोणतेही तंत्रज्ञान वापरले आणि सरकारने हमीभाव वाढवून दिले तरी त्यांना सन्मानाने जगता येईल का? याबद्दल शंका वाटते. या परिस्थितीत शेतीतून बाहेर पडण्याची आकांक्षा तयार होणे स्वाभाविक आहे. पण बाहेर पडून जाणार कोठे? बाहेरतरी कितीक रोजगार आहेत? बरे रोजगार मिळाला तरी खेडय़ातून येणार्‍या या युवकांना बाहेरचे जग सन्मानाने स्वीकारणार आहे का? सुभाषचा मुलगा शेतीतून सुटला. उद्या तो डॉक्टर होईल. कदाचित मोठा डॉक्टर होईल. तो तसा व्हावा. वडिलांचे पांग फेडावे. कोणीतरी एखादी महिला जेव्हा त्याच्याकडे उपचारासाठी येईल तेव्हा तो कसा वागेल? एकेकाळी शिकलेल्या कुणब्यांकडून जशी महात्मा फुले यांनी अपेक्षा केली होती तशीच अपेक्षा करता येईल; परंतु शिकलेल्या लोकांनी जसा म. फुलेंचा अपेक्षाभंग केला तसा तो करणार नाही, अशी अपेक्षा करू.

(लेखक हे नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत. 'कलमा', 'आवतन' या त्यांच्या गाजलेल्या

कादंबर्‍या आहेत.)

भ्रमणध्वनी - 9422931986

Wednesday 20 June 2012

शेती प्रश्नांची उपेक्षा का?

शेती प्रश्नांची उपेक्षा का?
दगडफेक होऊ शकते. तशीच कांदाफेकही होते. 14 जूनला मा. छगन भुजबळांच्या घरावर अशीच कांदाफेक झाली. छगन भुजबळ घरी नव्हते त्यामुळे आंदोलनकत्र्यांनी त्यांच्या घरावर कांदाफेक करून दुधाची तहान ताकावर भागवून घेतली. तसा या कांदाफेकीचा 'प्रसाद' केंद्रीय कृषिमंर्त्यांनीसुद्धा कधीकाळी चाखला आहे. विधानसभाही या कांदाफेकीतून सुटली नाही. कांदा जेवणाला चव आणतो हे खरं पण त्याच्यावर सुरी चालविणार्‍याच्या डोळ्यातून तो पाणीही काढू शकतो. ऊस गोड असतो पण वेळप्रसंगी उसाचं दांडक ठोकाठोकीही करू शकतं. सत्ताधार्‍यांच्या पाठीत हे दांडक 'वळ' उठविण्याची क्षमताही ठेवून आहे हेही तेवढंच खरं. पण कापूस मात्र ना कोणाला फेकून मारता येत ना तो कोणाच्या पाठीत वळ उमटवू शकत. सगळ्यांची लाज झाकायला तो आयुष्यभर कामी येतो. एवढंच नव्हे तर आयुष्याच्या शेवटीही 'कफन' बनून साथ देतो. म्हणूनच कदाचित त्याची उपेक्षा होत असावी. असो.

मा. छगन भुजबळांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदाफेक केली कारण कांद्याचे भाव गडगडले. कांद्याचे भाव गडगडले तर चर्चा होत नाही, पण हाच कांदा महाग झाला तर मात्र सर्व वृत्तपत्रांत मोठमोठे मथळे येतात, 'कांद्याने आणले डोळ्यात पाणी.' सर्व इलेक्ट्रॉनिकमाध्यमांवर 24 तास कांद्याने आणले डोळ्यात पाणीची 'रडारड' सुरू होते. दिल्लीतला जसपाल भट्टी तर त्याची माय मेल्यासारखा कांद्याच्या माळा गळ्यात घालू घालू धाय मोकलून रडतो. आर.के. लक्ष्मणसारखा व्यंगचित्रकारसुद्धा कांदा महाग झाल्यावर व्यंगचित्र काढतो. एक ग्राहक कांदा खरेदी करतो आणि पोलीस संरक्षणात कांदा घरी आणतो. सरकार लगेच जागे होते. जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली ताबडतोबीने कांद्याची निर्यात बंद केली जाते. तातडीने चीन व पाकिस्तानमधून कांद्याची आयात करून कांद्याचे भाव पाडले जातात. एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. एरवी चीन आणि पाकिस्तान आपले मित्रराष्ट्र नाहीत. पाकिस्तान तर नाहीच नाही. पाकिस्तानसोबत शांततेची बोलणी करायला अनेकांचा विरोध असतो. त्यांच्या खेळाडूंनी आपल्या भूमीवर पाय ठेवला तर आपली पवित्र भूमी अपवित्र होईल अशा थाटात पाकिस्तानी खेळाडू, पाकिस्तानी गायक, कलावंतांना याच देशात प्रखर विरोध होतो. पण त्याच शत्रुराष्ट्राकडून कांदा आयात केला जातो. येथील शेतकर्‍यांना मारण्यासाठी, त्याच्या कांद्याचा भाव पाडण्यासाठी पाकिस्तानशी असलेले शत्रुत्व विसरल्या जाते. येथील शेतकर्‍यांना मारण्यासाठी पाकिस्तानशीसुद्धा मैत्री केली जाते. एवढा याच देशातील शेतकरी याच देशाचा 'शत्रू' बनतो? पण का?

हाच कांदा स्वस्त होतो तेव्हा कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही. आणि शेतकर्‍यांच्या डोळ्यातले पाणी तर पाहायचेच नाही अशी तर सर्वानी एकजात शपथ घेतली की काय अशी शंका येते. कांद्याचे भाव वाढले तर मथळेच्या मथळे वाहिन्यांची 24 तास 'रडपड', सरकारचा त्वरित हस्तक्षेप, निर्यातबंदी, तत्काळ कांद्याची आयात. पण याच कांद्याचा भाव गडगडला तर सारेच चूप. प्रसारमाध्यमांना त्याची साधी एका ओळीची बातमी करावीशी वाटत नाही. सरकारही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडते. सरकारचा हस्तक्षेपही होत नाही. कांद्याचा भाव वाढला तर सार्‍यांच्या डोळ्यात पाणी येत असेल तर कांद्याचे भाव पडतात तेव्हा शेतकर्‍यांच्या डोळ्यातही पाणी येते त्यावर 'आगडोंब' का उसळत नाही? त्याचा खर्चही भरून निघत नसेल याविषयी कोणालाच कशी चिंता वाटत नाही?

बरं कांदा काही जीवनावश्यक गरज नाही. कांदा खायला मिळाला नाही म्हणून कोणी टाचा घासत मेला असेही होत नाही. कांदा असलाच तर जिभेला 'चव' आणणारा पदार्थ आहे. त्यांच्या जिभेची 'चव' थोडी महाग झाली तरी जीव गेल्यासारखा आरडाओरडा होतो. पण कांद्याचा भाव पडला तर शेतकर्‍याला जीव नकोसा होतो आणि वेळप्रसंगी तो जीवही देतो. पण त्याची हाकबोंब तर सोडाच पण साधी चर्चाही होत नाही.

शेतकर्‍यांच्या 'जीवा'पेक्षाही शहरी लोकांची 'चव' भारी पडते. म्हणूनच कांदा महाग झाल्यानंतर प्रसारमाध्यमे त्याला ढीगभर महत्त्व देतात, पण तोच कांदा स्वस्त झाल्यानंतर त्यांच्या लेखी त्याचे कणभरदेखील महत्त्व असत नाही.

14 जूनला मा. छगन भुजबळांच्या घरावर कांदाफेक झाली म्हणून किमान कांदा तेवढय़ापुरता का होईना बातमीचा विषय झाला. त्यातही चर्चा कांद्याचे भाव गडगडले याची कमी तर भुजबळांच्या घरावर कांदे फेकले म्हणून भुजबळांचीच चर्चा अधिक झाली.

शेती, शेतकरी त्यांचे प्रश्न, त्यांची आंदोलनं याबाबतीत सर्वाकडूनच एवढी उपेक्षा का केली जाते? शिल्पाशेट्टीचं लग्न झालं. ती गरोदर राहिली. तीला मूल झालं. आणि त्या बाळाने ट्विटरवर ट्वीट केलं असल्या बातम्यांनी प्रसारमाध्यमे दुथडी भरून वाहत असताना तीच प्रसारमाध्यमे शेती प्रश्नावर, त्यावरील आंदोलनाच्या बातम्या देताना का एकदम आटून जातात?

बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बध टाकले. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकर्‍यांना क्रॉप लोन मिळू शकणार नव्हते. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर, लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. हे आंदोलन 25 मेपासून तर कालपरवापर्यंत सुरू होते. ताला ठोको, संचालकांच्या संस्थांवर डफडे बजाव, ठिय्या आंदोलन, लाक्षणिक उपोषण, मोर्चे एवढेच नव्हे तर शेवटी आत्मदहनापर्यंत टोकाचा मार्ग या आंदोलनाने गाठला. रविकांत तुपकरला पोलिसांनी वेळीच अटक केल्यामुळे व लखन गाडेकरने अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर पेटवून घेण्याच्या आधीच त्याला पोलिसांनी प्रसंगावधान राखले म्हणून दुर्धर प्रसंग टळला. या आंदोलनाच्या बातम्या आल्याच नाही असे नाही. त्या आल्या फक्त जिल्हा पानावर. विदर्भातही इतर जिल्हय़ात या एवढय़ा मोठय़ा आंदोलनाच्या बातम्या आल्या नाही. अशा प्रकारे हे आंदोलन प्रसारमाध्यमांनी बुलडाणा जिल्हय़ातच 'बंदी' करून ठेवले. रविकांत तुपकरवर 'हद्दपारी'चे आदेश म्हणजे प्रशासन म्हणते रविकांत तुपकरने बुलडाणा जिल्हय़ात राहू नये. आणि प्रसार माध्यमे म्हणतात त्याच्या बातम्या जिल्हय़ाच्या बाहेर जाऊ नये? असे का?

31 मेपासून आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात गडचिरोली ते मुंबई अशी प्रचारयात्रा निघाली. 4 जूनपासून आमदार बच्चू कडूंनी बेमुदत उपोषणही केले. कोरडवाहू शेतकर्‍यांना एकरी दहा हजार रुपयांचे अनुदान द्या व शेतावरील शेतमजुरांचा खर्च रोजगार हमी योजनेतून किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करा अशा प्रमुख मागण्या घेऊन हे बेमुदत उपोषण होते. पण या उपोषणाची, त्यातील मागण्यांची फारशी दखल प्रसारमाध्यमांनी घेतली नाही.

मंत्रालयातील एका कर्मचार्‍याला एक झापड आमदार बच्चू कडू लगावतो. तेव्हा दिवसभर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आमदार बच्चू कडू वाजतो- गाजतो, पण तोच आमदार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर गडचिरोली ते मुंबई अशी प्रचारयात्रा काढतो, बेमुदत उपोषणावर बसतो, पण प्रसारमाध्यमे त्याची पाहिजे तशी दखल घेत नाही.

'झापड' मारल्यानेच आमदार बच्चू कडूंचे वजन वाढत असेल आणि उपोषण करून स्वत:चे 'वजन' घटत असेल व प्रसारमाध्यमांकडेही त्याचे वजन पडत नसेल तर यातून काय संदेश जातो?

डोंबिवली फास्ट या सिनेमात नायकाला अन्याय-अत्याचार सहन होत नाही. त्यावर प्रथम तो 'तोंड' वाजवतो नंतर अन्यायकत्र्यांना हातापायाने वाजवतो. त्यानेही प्रश्न सुटत नाही म्हणून हातात बॅट घेऊन अन्यायकत्र्यांना ठोकून काढतो व शेवटी हातात पिस्तूल घेतो. हिंसेचा मार्ग 'आत्मघाता'कडे नेतो. आणि अहिंसक मार्गाने जाणार्‍यांना 'आत्महत्या' करावी लागते. याच्या मध्ये कोणताच मार्ग नाही का?

हा देश कृषिप्रधान आहे. आजही बहुसंख्य लोक शेतीवरच जगतात अन् तरीही त्यांच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमे डोळ्यावर पट्टी बांधून का? बहुसंख्य लोकांना, त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना, इतके अत्यल्प 'कव्हरेज' का हा प्रश्न अस्वस्थ करून जात.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

निवडणुकीची टर्मिनॉलॉजी- चारही गावं पॅक!

भारत हा उत्सवांचा देश आहे असे म्हटले जाते. दर महिन्या-दोन महिन्यांनी कुठला ना कुठला उत्सव ठरलेलाच. पण माझ्या मते, या देशातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. खरंतर जगातला म्हणायला हवा, कारण जगात एक तर इतका मोठा लोकशाही देश नाही अन् असला तरी इतक्या 'सिस्टीमॅटिक' गोंधळाने त्यांच्या इथे निवडणुका होत नाहीत. शह-काटशह, तुफान डॉयलॉगबाजी, सस्पेन्स, टेरर, हिरो, व्हिलन, रंगीबेरंगी वातावरण, दावे-प्रतिदावे असे मनोरंजनाला लागणारं सर्व मटेरियल या उत्सवात कोंबून कोंबून भरलेलं असतं. इथे उमेदवारापेक्षा इंटरेस्ट मतदारांना येतो आणि मग अमका अमका कसा निघतो, तो कसा तिसर्‍या नंबरवर जातो, याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागतात आणि या संवादाची म्हणून एक विशिष्ट भाषा असते. सध्या आपण सर्वच जण त्याचा अनुभव घेत आहोत. यातले काही शब्द उमेदवाराचे चेलेचपाटे वापरतात तर काही तुम्ही-आम्ही.

काही वर्षापूर्वी एका आमदाराच्या निवडणुकीत मी एका कार्यकर्त्यासोबत त्या उमेदवाराचा प्रचार करायला गेलो. उमेदवाराने कार्यकर्त्याला सांगितलं, 'संजू फक्त दहीहांडा अन हिवरखेड राह्यलं, ते घे तू पाहून!' 'मी येतो ना भाऊ जाऊन!' लगेच बीगीनं आम्ही निघालो. जाताना एका ढाब्यावर मस्त जेवलो. पानबीन खाल्लं. दोन्ही गावात फेरफटका मारला, काय म्हंता? असं आहे? असं करून दुसर्‍या दिवशी दुपारी उमेदवाराला रिपोर्ट दिला, 'भाऊ दोन्ही गावं पॅक करून आलो!' गाव पॅक हा तर कार्यकत्र्यांचा खास शब्द. निवडणुकीच्या काळात दुसरा एक शब्दप्रयोग आहे 'चालवा लागते'! 'कसं आहे भाऊ सहकार लॉबी कोनाले चालोते त्याच्यावर आहे डिपेंड!' तर कधी असतं, 'अरे तीन वाजे लोकं तं लोकं मतदानालेच बाहीर नाही निंघाले अनं मंग सार्‍याईन ठरोलं हलधर चालवा लागते, तं रातच्या आठ वाजे लोग सायाचं मतदान चालूच!'

जातीचं समीकरण ही या लोकशाही उत्सवाची काळी; परंतु सर्वात इफेक्टिव्ह बाजू. एखाद्या समाजावर पकड असलेला नेता निवडणुकांमधला अविभाज्य घटक. चेहेर्‍यावरची रेषही हालू न देणारे हे नेते अनेकांचं भवितव्य आपल्या मुठीत घेऊन चालतात. मग निवडणुकीची समीकरणं मांडली जातात, 'सध्यातरी अण्णासाहेब आपल्याकडून आहेत. ते कुनीकळून बसतात हे महत्त्वाचं आहे! आपल्याइकळून बसले की ज्यमते मंग!' काही काही सामान्यांना आपली उमेदवाराशी कशी ओळख आहे हे सांगण्याचं खूप कौतुक असतं, वास्तवात त्याला कुत्राही विचारत नाही असे काही नग चेहर्‍यावर प्रचंड गांभीर्य घेऊन फिरत असतात. जोही भेटला त्याला सांगतात, 'ध्यान रखो बावा! ये शीट निकालनाही पडता,' 'निकली-निकली बोलके अंधी में रह जायेंगे अन तिसराही निकल जाएंगा,' 'अरे हव हो! मागच्या वेळेस तसंच झालं. शीट शुअर आहे असं सगळ्य़ांनाच वाटलं अन् दोघांच्या धामधुमीत तो अध्धर निघाला.'

एखादा उमेदवार जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतो तेव्हा म्हटलं जातं, 'वो भोत चल गया!' '17 हज्जार वोट खाया न उसने! लहान चाल्ला राज्या तो.' याव्यतिरिक्त दोन शब्द अधिकृत आहेत. एक म्हणजे गठ्ठा मतं अन् दुसरं म्हणजे पारंपरिक मतं! या गठ्ठा अन् पारंपरिक मतांव्यतिरिक्त जे असतं तो असतो पट्टा! 'ते चार गावं म्हणजे अमक्या समाजाचा पट्टा. तो पूर्ण आपल्या इकळूनच!' यात काही काही इंग्रजी शब्द जबरदस्त ठाण मांडून बसले आहेत. जसं, 'आपली शीट तं निघेतच, प्रश्न त्या दोघाईचा आहे, त्याईचे मत होतात डिवाईड. आपले डिवाईड होत नाहीत! आपला या भागात चांगला होल्ट आहे!' कधीही चर्चा थेट नंबरानीच सुरू होते. 'वो जाता तिसरे पे, और ये रहेंगा दुसरे पे!' म्हणजे पहिला कोण ते तुम्ही समजून घ्या! जेव्हा लोकसभा, विधानसभा एकत्र येते तेव्हांचा शब्दप्रयोग असतो वर अमूक खाली तमूक..! चलनदेव! लादलेला उमेदवार असला की मग त्याची वर चलती असते. एकदा निवडणुका आटोपल्या की मग पराभवाचं विश्लेषण 'तात्यानंच हॅण्ड दाखवला त्याले. याईचा खूप भरोसा तात्यावर!' किंवा मग मेहनत कमी पडली. अशा शब्दांनी केलं जातं. आता नेमकी कुठली मेहनत कमी पडली याचं विश्लेषण मात्र कुणाकडेच नसतं; पण असे नमुनेदार संवाद अन् शब्द या उत्सवातली रंगत वाढवत असतात हे मात्र खरं.

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जमंत' हा त्यांचा लोकप्रिय

एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

Tuesday 19 June 2012

लांडग्यांचे कळप आणि वाघीण!


लांडग्यांचे कळप आणि वाघीण!
अलीकडची काही वर्षे राजकीय आघाडीवर प्रचंड उलथापालथ घडविणारी ठरतील. जगात अनेक देशात प्रचंड घडामोडी घडल्यात. मोठमोठय़ा राजसत्ता मातीत मिसळल्या. जनतेचा उद्रेक परम सीमेवर पोहोचला. सर्वसामान्य माणूस जागा झाला की इतिहास बदलायला वेळ लागत नाही.

'आता लढाई जुंपली अन् सारे इशारे आमचे

सारी धरित्री आमची अन् सूर्य तारे आमचे

आग त्यांच्या हुकमतीला दाही दिशांनी लागली

लाटाही आता आमच्या अन् सारे किनारे आमचे!'

मागील वर्षी भारतातही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा संदल जोरात वाजायला सुरुवात झाली होती. लोकही रंगात आले होते. पब्लिक नाचायलाही लागली होती. दिवाळखोरीत निघालेले विरोधी पक्षही कंबरेचं सोडून धिंगाणा घालायला लागले होते. सत्ताधारी पक्षही स्वत:चेच कपडे फाडायला लागला होता. अलिबाबाही धोक्यात.. चाळीस चोरांची अवस्था तर पिसाळलेला कुत्रा चावल्यासारखी झाली होती. एकंदरीत संदलही टिपेला पोहोचला होता. नाचही टिपेला पोहोचला होता.. मेडियाला आनंदाच्या उकळ्य़ा फुटत होत्या आणि नेमक्या वेळी ढोल फुटला. ढोलाचं कातडंच कुजकं निघालं! संदल पार्टीवालेही एवढे बेभान झाले होते की ढोल वाजण्याऐवजी काडय़ा कुंचकण्यातच मजा घेऊ लागलेत आणि शेवटी व्हायचं तेच झालं!

हाय! या देशात आता खूप झाली माणसे

कंस आणिक रावणाचे रूप झाली माणसे

हक्क अपुले मागण्याला पेटल्या होत्या मशाली..

एक तुकडा पाहिला अन् चूप झाली माणसे!

राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राजकारणाचं पुन्हा एकदा जोरात घुसळण सुरू झालं. या घुसळण्याची सारी सूत्रं अनपेक्षितपणे बंगालच्या वाघिणीनं आपल्या हातात घेतली. घेतली म्हटल्यापेक्षा अपरिहार्यपणे ती तशी एकवटली गेली. लांडग्यांचा कळप कितीही मोठा असला तरी वाघाचा बछडाही त्यांना भारी पडू शकतो, हा निसर्गाचा नियम पुन्हा एकदा सिद्ध झाला! मागील वर्षी अण्णा हजारे या कळपांना भारी पडले होते. आता ममता बॅनर्जी भारी पडत आहेत. अण्णा हजारेंच्या अनेक मर्यादा होत्या, वैचारिक गोंधळ होता आणि शेखचिल्ली सहकारी होते, आणि पर्यायाने जे व्हायचे तेच झाले. फुगा

फुटला. हवा पार निघून गेली. पुन्हा सर्व सर्कसमधले वाघ आपापल्या ठिकाणी परत गेलेत.

आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. ममता बॅनर्जी स्वत: राजकारणातल्या फसलेल्या पैलवान आहेत. अनेकांना त्यांनी धोबीपछाड मारलेली आहे. यावेळी त्यांनी जे दंड थोपटले आहेत ते पाहता (योग्य काळजी घेतली गेली तर) देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुलायमसिंग नावाच्या महापुरुषानं यानिमित्तानं आपलं जे असली रूप दाखवलं ते कमालीचं संतापजनक आहे. खरंतर भारतीय राजकारणाचा तोच असली चेहरा आहे. मुलायमसिंग यांचं वागणं किती किळसवाणं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतीय राजकारणात अशीच माणसं थोडय़ाफार फरकाने सर्वच पक्षांत दिसतात. ही असली माणसं लोकशाहीची विटंबना आहे. हे सारे प्रकार पाहिलेत की आम्ही लोकशाहीचं पाविर्त्य पेलण्यास लायक नाही, असंच नाईलाजानं म्हणावं लागेल!

मुलायमसिंग यांनी कुणाला पाठिंबा द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्याबद्दल आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. पण ज्या पद्धतीनं त्यांनी ममता बॅनर्जींना धोका दिला, सौदेबाजीसाठी एका चार्त्यिसंपन्न आणि प्रामाणिक महिला नेत्याचा वापर करून घेतला, त्याचा निषेध करण्याएवढा थोडाच आहे. यानंतर कोण विश्वास ठेवील असल्या लोकांवर? मैत्रीचा खून, माणुसकीचा खून आणि नीतिमत्तेचा खून सारं सारं एकाचं झटक्यात करून टाकलं मुलायमसिंग यांनी! धोकेबाजीला नवा चेहरा, नवे नाव दिले मुलायमसिंग यांनी!

'न गर्दन कटेगी, ये आलम न होगा

नशा दोस्ती का कभी कम न होगा

इन्सानियत भी न रोयेगी यारो

अगर दोस्त कोई 'मुलायम' न होगा!'

राजकारणातल्या 'गटारगंगा'साफ करण्याची हीच वेळ आहे! ममता बॅनर्जींच्या रूपाने एक प्रामाणिक सेनापती मिळालेली आहे! त्यांचे समर्थन करण्यासाठी लोकशाहीवर आणि या देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मला ठामपणे वाटते. इथं पक्ष महत्त्वाचा नाही. राष्ट्रपतिपदही महत्त्वाचं नाही. आम्हाला आमचं नेतृत्व 'मुलायम' ब्रँडचं असावं की 'ममता' बँड्रचं असावं, हे याचा निर्णय करायचा आहे!

याचा अर्थ ममता बॅनर्जींच्या काहीच चुका नाहीत असं मला म्हणायचं नाही. एका क्षणात सारं चित्र पालटेल असा खुला आशावादही नाही; पण लढाईला योग्य सुरुवात होण्याची गरज आहे. ती झालेली आहे. यात सारे दलाल मिळून ममता बॅनर्जी यांचा 'गेम' करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, यातही संशय नाही. पण मुलायमसिंगांचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडला. व्ही. पी. सिंग यांचीही संधिसाधू लोकांनी अशीच घेरून शिकार केली होती. ममता त्यांना पुरून उरतील असे वाटते.

राष्ट्रपती निवडणूक हे एक निमित्त आहे. भ्रष्टाचारविरोध आणि सामाजिक नीतिमत्ता असा नवा अजेंडा यानिमित्ताने ममता बॅनर्जी यांनी देशापुढे ठेवलेला आहे. आता निर्णय जनतेला करायचा आहे. पुन्हा आम्हाला करायचा आहे? लोकशाहीची सूत्रं लांडग्यांच्याच हातात ठेवायची की वाघांच्या हातात द्यायची, हाच मूळ प्रश्न आहे!

'जसा काळ आला तसे शोधू या..

नव्या पावलांचे ठसे शोधू या

पुन्हा लांडग्यांच्या सुरू हालचाली

चला जिंकणारे ससे शोधू या?'

(लेखक हे नामवंत कवी असून त्यांचा 'सखे-साजणी' हा कार्यक्रम गाजलेला आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

आपणच आपला नासोडा करून राह्यलो


आपणच आपला नासोडा करून राह्यलो
लेके पह्यला पह्यला प्यार
भरके आँखो मे खुमार
जादू नगरीसे आया है कोई जादूगर

पह्यला पह्यला प्यार आन् पह्यला पाऊस याची नव्हाईचं काई न्यारी असते. पह्यला पाऊसयी जादू नगरीतला जादूगरचं अस्ते हे मले आठोलं परवाच्या पह्यला पावसावून पह्यला पाऊस आन् थोयी सांजीले आला तं पह्यले जे कायभोर अभाय इजायीच्या संगितीन असं डकरत येते ना का त्याची खुमारीच काई न्यारी असते आन् मंग होठातून अस्या ओयी आपसूक भाहेर पडतेत. . .

अभायाच्या रंगाले काया रंग आला गा

अभयाच्या रंडगाडले..

आला भारीवर वारा, इजायीचा जोर न्यारा

ढगायीच्या चकमकी, पानी आने तरतरा

झाड झुडपयी आता लागलेना झिंकगाडले..

प्रेयसी हा सब्द बोलीतला नसेना पन उसनवारीची काय माय मेली का? खरं तं उसनवारीतं आपली जिनगानी चाल्ली मंग प्रेयसी आन् इंग्रजीतला डार्लिग सब्द म्या उसने घेऊन टाकले. हा तं काय म्हनत होतो मी प्रेयसी आन् पह्यला पाऊस सारके.

हुरहुर लावणारे, हुरयून टाकणारे, आपल्याले आपल्यात ना ठुनारे, कवा येतो म्हून चाट मारणारे तं कवा अवचित भिजून टाकणारे. परवा अस्सा बरसला का एकल्यानं भिजून घेतलं. मले बायको म्हने, 'वय तं पाहाचं?' म्या म्हनलं, अवो भान हरपून टाकून वय इसराले लावते त्यालेचं तं पह्यला पाऊस म्हंते. आता बरसन्यावून आठोलं. परवा राती बोरीतून फोन आला म्हने, बाबा तिथयी पाऊस पडून राह्यला का? म्या त्याची फिरकी घ्यासाठी म्हनलं, अबे पाऊस म्हंजे बिंग पिलेला दारुडय़ा होय हा पडाले थोत बंब बरसून राह्यला. त्याच्यावून आठोलं. . .

पाऊस बरसतो रानात

पाऊस बरसतो मनात

रानतल्या पावसाचं बरं असतं

मनातल्या पावसाचं खरं नसतं

वर्‍हाडात उनीची काय मिजास असते राजे हो. बाहेरच्या पावन्यायची पंढरी घाबरतेना उनायात या म्हनलतं. एक डाव माही आजी सांगे असीच उनीची गोठ निंघालीत, 'बाबू आपल्या कडचं उन होय का काय अरे एकडाव हरभरे टाकले पायलीभर उनीत उनं दाखवाले. सांजीले जमा कराले गेली तं त्याचे फुटाने झाले होते ना बाबू.' आता आजीचं होय ते आपल्याले कायी म्हंता येते का तिले?

दूर डोंगर कपारी उन तपते गा भाई

कसी अगीन सुटते होते जीवाची रे लाही

असी तपते रे उन जसा चुलीवर तावा

आगी सारख्या झोंबते आता कानाले रे झावा

निंघे घामाच्यारे धारा सार्‍या आंगाआंगातून

घाम आंगाले वलवे पाहे गमतीनं उन

पावसात वलं करत करत मी तुमाले उनीत घेऊन आलो. ह्या उनं पावसाचा खेय असाचं अस्ते. उनचं तपलं नाईतं पानी कसं इन आन् पानीचं आलं नाईतं पीक कसं ईन? पन आजकाल हेयी आपली जागा सोडून राह्यले. मले एक जनं इचारे का हे आपले चार मयने कमीजादा काउन करून राह्यले? आता याचं उत्तर मी जमलं तं आखरीले दिन पन त्या आंधी मले एक गोठ आठोली ते सांगून टाकतो. आमचं खेडय़ातल्या मानसाचं कसं अस्ते आठोल ना आत मंग सांगून टाका त्यासाठी मुद्दा बाजूले राह्यला तरी चालते अखीन का मुद्यावर येता नाई येत का?

काय सांगून राह्यलो होतो मी तुमाले? पहा माहा असं होतो. सांगता सांगता इसरतो म्हून तं आठोल का मुद्दा सोडून सांगून टाकतो. एक डाव मी पंढरपूरपासी मंगयवेढा हाय कानी तिथ कालेजात कार्यकरमाले गेलो होतो. ते गाव जस संत दामाजी पंताचं तसं संत जोखोबाचंयी. मले जोखोबाचं लय अप्रुप म्हनलं चाला त्यायचे पावलं ज्या मातीले लागले असतीन ते वेसी पासची माती आपन बुक्का म्हून कपायाले लावून घेऊ. तिथच्या कार्यकरमाच्या वक्तींचा हा किस्सा होय. झालं कसं का त्यायनं रेस्ट हाऊसवर सोय लावली होती. आता सरकारी रेस्ट हाऊस काई बजारात नसते ते असते जरासे गावाच्या एका आंगाले. मले कराची होती दाढी म्हून म्या त्या कालेजच्या पोराले इचारलं, 'अरे बाबा मले दाढी कराची हाय तं सलून मंदी जाता येईल का?' तो म्हने, 'जाता येईल ना सर पन तुम्ही स्वत: नाही करत कां?' म्या म्हनलं, 'नाई इतकचं दुसर्‍याच्या भरोस्यावर्त ठुलं हाय आन् त्याले कारन हाय. मी शेतकरी हावो आन् दहा रुपयात तो एक एकलाचं वं असा हाय का निमित्त कोनतंयी असो माह्या दाढीले हात लावते बाकी आमचा तं दुसर्‍याच्या दाढीलेच हात लावण्यात जलम जाते.

पह्यले कसं हिवायात थंडी चार मयने, उनायात उन चार मयने आन् पावसायात पानी चार मयने पन आता तसं नाई राह्यलं. मांगच्या साली नवरातीपासून जे पाऊस उपकला तं उपकलाचं.

असा कसा ह्या पाऊस। येते तवा येते येते

जवा पाह्यजे जरूर। तवा उपकून जाते

पन याच्यात त्याचा कसूर हाय का? कसूरवार आपन हावो. आपन नद्यायतून कारखान्यायचं किती डेंजर सडलं पानी सोडून राह्यलो. गंगेची गटारगंगा करून टाकली. ट्रकात राकेल, अँटोत राकेल, कारखान्याच्या धुरांडय़ातून जहर वतून राह्यलो मंग त्याच्यातून का अम्रीत इन? करून सवरून आपन नाम निराये आन् निसर्ग लहरी झाला म्हनाले तयार. आपनचं आपला नासोडा करून राह्यलो असं नाई वाटत!

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260