Saturday 16 June 2012

वो कागज की कश्ती..

वो कागज की कश्ती..
काही दिवसांपूर्वी एका शाळेत कुठल्याशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. बाकी शाळांप्रमाणेच ही शाळा होती. सगळी मुलं-मुली गणवेशात, एका रांगेत बसलेली त्यातली काही हे काय चालू आहे, कशासाठी चालू आहे, कोण आलेलं आहे याच्याशी संबंध नसलेली होती. (अशी मुलं पुढे चालून आदर्श नवरे म्हणून ओळखल्या जातात. बायको म्हणते दाढी करा.. करतात, कपडे बदला.. बदलतात, आंधोळ करा.. करतात, भाजी आणा.. आणतात. हृदय अन् मेंदू असलेले यंत्रमानव होतात.)

माझ्यासोबत असलेल्या पाहुण्याने वर्ग 5 ते 7 च्या मुलांपुढे शेरो-शायरीयुक्त वैचारिक भाषण ठोकलं. कोणालाच कळलं नाही. त्यामुळे कार्यक्रमानंतर भाषण चांगलं झालं, खूपच प्रभावी वगैरे म्हणावं लागलं. मी फळ्यावर व्यंगचित्र काढत दोन-चार गमती सांगितल्या. जे जमतं ते करावं, उगाच अर्थशून्य पोकळी, अस्तित्वभान, विचारमंथन, विचारांचे अवकाश, भीषण वास्तव, समसामायिकता, गहनगूढ, साकल्याने विचार, एकसमयावच्छदेकरून वगैरे शब्द वापरून स्वत:च्या व इतरांच्या बद्धकोष्ठतेच्या त्रासात योगदान का द्यावे? त्यापेक्षा आपली व्यंगचित्र बरी!

कार्यक्रमाहून परतताना विचार केला, इतके वैचारिक अत्याचार मुलांवर कशाकरिता? आमच्या लहानपणी आमच्या शाळेत कागदाची फुलं कशी बनवावी ही पुस्तकं विकणारे, विणकामाच्या सुया विकणारे जादूगार, कांडीच्या पेनोपासून डिझाईन तयार करण्याच्या चकत्या विकणारे, गायक,नकलाकार अशी मंडळी यायची. वैचारिकतेचे इंजेक्शन देणारी मंडळी येत नसत व भविष्यातल्या सर्वकाही आशा-अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर नस.े आमच्या लहानपणी पत्ते होते, कंचे होते, डाबडुबली होती, गिल्लीदांडू होतं, लपवाछपवी होती, शितनापानी होतं. पावसाळ्यात खुप्पस होती. दिवाळीच्या सुटय़ात मित्रांना एकमेकांच्या घरी फराळाला बोलवायची पद्धत होती, रामलीला होती, भजनं होती (साध्यासुध्या महाराजांची साधी-सोपी भजनं! गुणगुणाव्याशा वाटणार्‍या चाली अन् लक्षात राहणारे शब्द होते. तेव्हा महाराजांना ग्लॅमर नव्हतं अन् भागवत सप्ताहाचं बजेट लाखो-करोडोमध्ये गेलं नव्हतं.) मुला-मुलींनी बसविलेली नाटकं होती, बाहुला-बाहुलीचं लगA होतं, तान्हा पोळा होता. साधी सायकल, रेडिओदेखील आमच्या घरी बर्‍याच उशिरा आले. नागपूर आकाशवाणीवरचा बालविहार, विविध भारतीचं फौजी भाईयों के लिए जयमाला अन् अमीन सायानीचा बिनाका गीतमाला होता. नंतर-नंतर टीव्ही आला त्यात केवळ दोनच रंग होते काळा अन् पांढरा! कुठलीही क्रिस्टल क्लिअर पिर क्वॉलिटी, सराऊंड साऊंड नसतानादेखील टीव्हीतलं सगळं दिसायचं अन् सगळं कळायचं. तो दूरदर्शनचा लोगो, बातम्याचं बॅग्राऊंड म्युझिक,ते गुरुवार-रविवारचे सिनेमे, बुधवारचा चित्रहार, हमलोग, कच्ची धूप, सतीश शाह, शफी इनामदार अन् स्वरूप संपतचं ये जो है जिंदगी, रेणुका शहाणे अन् सिद्धार्थचं सुरभी, स्पायडर मॅनची अनिमेटेड सिरियल (काही वर्षापूर्वी स्पायडर मॅनचा सिनेमा आला, स्पायडर मॅनची सिरियल पाहत मोठे झालेलो आम्ही पडद्यावर स्पायडर मॅनच्या दोरीला धरून झालेल्या एन्ट्रीबरोबर देहभान विसरून किंचाळलो. अख्खं थिएटर शिट्टय़ा अन् टाळ्यांनी दुमदुमलं) रजनी, नुक्कड, रामायण, मख्ख चेहर्‍यानी बातम्या देणारी सलमा सुलतान, 'विको टर्मेरिक, नही कॉस्मेटिक, विको टर्मेरिक आयुर्वेदिक क्रिम', निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दुध की सफेदी निरमा से आए', 'रस की रसना, रसना', 'आय एम अ कॉम्प्लॅन बॉय, आय एम अ कॉम्प्लॅन गर्ल' (तुम्हाला ते चेहरे आठवतील तर बघा ते होते शाहीद कपूर अन् आयेशा टकीया.) पुढे कॉलेजात गेल्यावर कॉलेजमधल्या एका धष्टपुष्ट मॅडमला आम्ही 'आय एम अ कॉम्प्लॅन गर्ल' हा फिशपॉंड दिला होता.

घरी लुना असणं ही त्या काळातली सर्वात मोठी ऐश होती. दहावीच्या पेपरच्या शेवटच्या दिवशी आमच्या वर्गातल्या चौधरी नावाचा मुलगा वडिलांची भगव्या रंगाची लुना घेऊन आला होता तेव्हा आम्हा सगळ्यांना कौतुक, आश्चर्य इत्यादी मिश्रीत धक्का बसला होता. काही मित्र सायकलच्या मागच्या चाकाला स्पोकला घासेल अशा पद्धतीने फुगा बांधत अन् त्याच्या फटर्र्र्र आवाजात कॉलनीभर फिरत.

हेल्मेट, नि पॅड, एल्बो पॅड हे शब्दच गेलेले नव्हते. पाणी अगदी कुठलंही चालायचं. खेडय़ात शेताला दिल्या जाणार्‍या पाण्याच्या धारेत आेंजळ धरून मनसोक्त प्यावं, पाणपोईवर प्यावं, कुठल्याही नळाला तोंड लावून प्यावं, काहीच होत नसे. बाटलीबंद पाणी (बिस्लरी) परिकथेतही वाचलं नव्हतं. पोस्टाची तिकीटं हा चांगल्या घरच्या मुलांचा तर आगपेटय़ाची कव्हरं गोळा करणे हा माझ्यासारख्या मुलांचा छंद होता. (मला चित्रकलेचीही आवड होती. मुलाला आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्या असं सांगणार्‍या कुठल्याही सेमिनारला माझे आई-वडील गेले नव्हते वा त्या काळी थ्री इडीयट्सही निघाला नव्हता तरीही मी पुढे चित्रकला महाविद्यालयात गेलो आणि छंदालाच पोटापाण्याचा व्यवसाय केला.) कुठल्याही झाडावर सरसर चढून दाखविणारा मुलगा हा ही मॅन असे अन् शेंडय़ावर चढून उडी मारणारा सुपर मॅन! बोट कापणे, टोंगळे फुटणे, ढोपर सोलणे, छिलणे, आंगठे ठेचकाळणे या दखलपात्र जखमा नव्हत्या अन् त्यासाठी म्हणून डॉक्टरकडे जाणे हे तर येडपटांचच काम होतं. दिवसभर इतरत्र हुंदडणे अन् गिळायच्या वेळेस घरी येणे याला कुणाची आडकाठी नव्हती. कुठलाही लॅण्डलाईन, मोबाईल नसताना कुठला दोस्त कुठे भेटेल हे कळत असे. केबल कनेक्शन, शंभर चॅनल्स, एमपी थ्री, एमपी फोर, आयपॉड, व्हिडीओ, गेम्स, डिव्हिडी प्लेअर, होम थिएटर, कॉम्पुटर, लॅपटॉप इंटरनेट आदी नसतानाही आमचं जगणं सहज-सोपं होतं! मुलगा नापास झाला म्हणून मुलाच्या आई-वडिलांना गिल्टी फील होत नसे व मुलाला मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकाकडे न्यायची गरज भासत नसे. स्वातंर्त्य, यश-अपशय, आशा-निराशा, जबाबदारी, मोठय़ांचा आदर सगळं आपोआप उमजत असे. जसजसे मोठे होत गेलो तसे एखाद्या भुलभुलैयात प्रवेश करतो आहोत असं वाटायला लागलं अन् तास, दिवस, महिने, वर्ष असं करता-करता आमच्या पिढीचं जगणं या भुलभुलैयाचाच एक भाग होऊन गेलं.

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे)

No comments:

Post a Comment