Thursday 28 June 2012

आमिरचा मुल्ला नसरुद्दीन 'फंडा'


आमिरचा मुल्ला नसरुद्दीन 'फंडा'



या   रविवारचा आमिर खानचा 'सत्यमेव जयते' पाहिला आणि हत्ती आणि चार आंधळे आठवले. पण क्षणात विचार आला. आमिर खानला त्या कार्यक्रमात सहभागी वंदना शिवा व इतरांना आपण आंधळं कसं म्हणावं? ते तर सर्व डोळस, जाणते व तज्ज्ञ होते. तरीदेखील शेतीप्रश्नावरील त्यांचे आकलन इतके चुकीचे कसे? ते तर सर्व 'शहाणे'! त्यांच्या शहाणपणावरूनच मुल्ला नसरुद्दीनचा 'फंडा' आठवला.

मुल्ला नसरुद्दीनची अंगठी जंगलात हरवते. अंगठी जंगलात शोधणे गैरसोयीचे आहे म्हणून तो ती अंगठी घरासमोरील अंगणात शोधतो. कारण मुल्लासाठी ती जागा 'सोयी'ची असते. आमिर खाननेसुद्धा शेतीप्रश्नाची हरवलेली अंगठी 'सोयी'च्या जागेवर शोधण्याचा प्रयत्न या वेळेच्या 'सत्यमेव जयते'मध्ये केला. 'कीटकनाशकांमुळे खाद्यपदार्थातले विष' हा त्याचा विषय होता. याचं गांभीर्य शेतकर्‍यांनासुद्धा समजलं आहे हे सिद्ध करण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या केलेलं 'विषारी' उत्पादन तो बाजारात विकतो; पण स्वत: मात्र फवारण्या न केलेलं बिनविषारी खाद्यान्न खातो असा जावईशोधही त्याने सप्रमाण 'सत्यमेव जयते'वर दाखवला. हे 'शहाणे' शेतकरी दाखवत असताना हेच कीटकनाशक शेतकरी पितात आणि मरतात हे सांगायला, दाखवायला मात्र तो विसरला. आता या शेतकर्‍यांना ही कीटकनाशकं विषारी असतात हेच माहीत नसेल आणि थंडा मतलब कोकाकोला समजून ह्या कीटकनाशकाचीच बाटली ते तोंडाला लावत असतील आणि आपल्या 'मूर्ख'पणामुळे ते मरत असतील, तर त्याला आमिर खान तरी काय करणार? सोयीच्या जागेवर प्रश्नाचे उत्तर शोधायचे म्हटल्यावर अशा अडचणीच्या जागेकडे न पाहणे हेच श्रेयस्कर! म्हणजे 'शोधाशोध केल्याचे नाटकही होते आणि शेतकरी कळवळ्य़ाचा 'शो'ही होऊन जातो.

या देशातला शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतो आहे. स्वत: अन्नधान्याचे उत्पादन तो करतो; पण त्याच्या पोटाला मात्र अन्न नाही. दुधाचे उत्पादन तो करतो; पण त्याच्या घरात चहालासुद्धा दूध असत नाही. स्वत: कापसाचं तो उत्पादन करतो; पण त्याच्या अंगावर धड कपडे नाहीत हे ऐकत आणि पाहत होतो. पण या वेळेचा 'सत्यमेव जयते' पाहून याचे खरे कारण कळले. कीटकनाशकांच्या विषारी फवारण्या केलेल्या असल्यामुळे शेतकरी 'विषारी' अन्न जाणीवपूर्वक खात नाही. त्यामुळे तो उपाशी राहतो. आईच्या दुधात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात 'एन्डोसल्फान' निघते तर गाईच्या आणि म्हशीच्या दुधाबाबत तर विचारायचीच सोय नाही. म्हणून शेतकरी दूध घरात वापरत नाही. तो कापूस पिकवतो; पण या कापसावर विषारी कीटकनाशकांच्या फवारण्या झालेल्या आहेत हे शेतकर्‍याला माहीत असतं. म्हणूनच अशा कापसापासून तयार होणारे सूत, त्यापासून तयार होणारे कापड तो अंगावर घालत नाही. व्हेरी सिंपल आणि याच कीटकनाशकामुळं तो कर्जबाजारी आहे. आमिर खानने एका झटक्यात 'सब मर्ज की एकही दवा' या पद्धतीने उत्तर देऊन टाकले. अन् तरीही.. प्रश्न शिल्लक राहतोच.

'ऑरगॅनिक फार्मिंग' हा शब्द हरितक्रांतीपूर्वी नव्हता. पण शेतकरी त्याच पद्धतीने शेती करायचे. बियाणे, खत घरचीच. कीटकनाशकंच नव्हती. त्यामुळे त्यांच्या फवारण्या असण्याचा प्रश्नच नव्हता. तरीदेखील शेतकरी त्याही वेळेस कर्जबाजारीच होता. कां? हरितक्रांतीपूर्वीचा काळ असो की नंतरचा, या दोन्ही काळात 'या देशातला शेतकरी कर्जातच जन्म घेतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो,' असे ऐकतो आहोत. 'शेतकर्‍यांचा आसूड' या महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला तर 129 वर्षे होतात. इतके जुने हे पुस्तक. पण त्यातही शेतकर्‍यांच्या हलाखीचे, त्यांच्या कर्जबाजारीपणाचे भरभरून वर्णन आहे. 'शेतकर्‍यांचा आसूड' या पुस्तकाच्याही पूर्वी 20 जून 1878 (म्हणजे 134 वर्षांपूर्वी) गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये मुंबई प्रांतातील शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणा यासंबंधी चर्चा झाली होती. त्यात कॉकरेल नावाच्या इंग्रज अधिकार्‍याने शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणाचे दस्तऐवज दाखल केले होते.

या काळात तर शेतीसाठी रासायनिक खते व कीटकनाशक हे शब्दही जन्माला यायचे होते. तेव्हाही शेतकरी कर्जबाजारीच होता आणि तहीही आमिर खान, वंदना शिवा व त्यांचं टोळकं म्हणतं, 'शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात म्हणून कर्जबाजारी आहे.'

शेतकरी जेव्हा पारंपरिक पद्धतीने (आजच्या 'फॅशनेबल' भाषेत ऑरगॅनिक फार्मिंग) शेती करीत होता तेव्हा शेतकर्‍याला कोणी 'शहाणं' म्हटलं नाही. उलट बुरसटलेल्या विचारसरणीचा असल्यामुळे तो नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. अज्ञानी, अडाणी, मूर्ख असल्यामुळे तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो असं झाडून सर्व शहाण्यांची म्हटलं. आता तेच 'शहाणे' शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतो. कीटकनाशकांच्या फवारण्या करतो. हायब्रीड, बीटी बियाण्यांचा वापर करतो म्हणून त्याला 'मूर्ख' ठरवीत आहे. पूर्वी तो 'सेंद्रिय' शेती करतो म्हणून मूर्ख होता. आता तो सेंद्रिय शेती करीत नाही म्हणून मूर्ख आहे. एकूण काय, तर 'चीत भी तेरी और पट भी तेरी' या न्यायाने शेतकर्‍याचे हरणे व मरणे अटळ आहे.

या सर्वांमध्ये 'सत्य' काय आहे? जेव्हा शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता तेव्हा अन्नधान्याच्या तुटवडय़ामुळे दुष्काळात हजारोच्या संख्येनी माणसं मरत होती. इतिहासातील बंगालचा दुष्काळ यासाठी कुप्रसिद्ध आहे. पारतंर्त्यात हे ठीक होतं. पण स्वातंर्त्यानंतरदेखील अन्नधान्याचा तुटवडा राहायचा म्हणून भिकेचा कटोरा घेऊन देशोदेशी अन्नधान्याची भीक मागावी लागायची. अमेरिकन डुकरांसाठी असलेला 'मायलो' रांगा लावून मिळवावा लागत असे. ही परिस्थिती होती. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने आणि त्याचदरम्यान अन्नधान्याचा तुटवडा म्हणून अमेरिकेकडे भीक मागायची पाळी आलेली. अशा वेळेस पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशातील जनतेला एका बाजूला उपवासाचं आवाहन केलं तर दुसर्‍या बाजूला 'हरितक्रांती'ची तयारी सुरू केली. त्याच काळात 'जय जवान जय किसान' हा नारा दिला गेला. सीमेची सुरक्षा सैन्याने करायची तर देशातील अन्नसुरक्षा शेतकर्‍यांनी सांभाळायची हा त्या घोषणेचा अर्थ होता. हा पूर्वेतिहास आमिर खान व वंदना शिवासारखी 'शहाणी' माणसं विसरतात. ज्या देशात 1950 मध्ये 50 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन होत होतं तिथे हरितक्रांतीनंतर अन्नधान्याचं उत्पादन दुप्पट म्हणजेच 100 मिलियन टन व्हायला लागलं. आता हे उत्पादन 247 मिलियन टनांपर्यंत पोहोचलं आहे. अन्नधान्याची कोठारं भरली आहेत. विचारवंतांची पोटं भरली आहेत. भिकेचा कटोरा घेऊन आता भीक मागावी लागत नाही म्हणून आमिर खानला आज 'ऑरगॅनिक फार्मिंग'सारखे भिकेचे डोहाळे लागताहेत. भरल्यापोटी 'चवणे' सुचतात असे म्हणतात. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला म्हणून 'सेंद्रिय शेती'चे 'चवणे' विचारवंतांना सुचू लागले आहेत. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वारेमाप वापर शेतकरी करतो. त्यामुळे तो कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करतो अशी 'तर्कटलीला' करणार्‍यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. त्यांच्यासाठी खालील आकडेवारी देण्याचा मोह होतो. इतर देशांच्या तुलनेमध्ये 'छटाक'भर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करणार्‍या भारतात लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतात. परंतु 'टन'भर रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करणार्‍या देशात मात्र शेतकर्‍यांची आत्महत्या नावालाही नाही. असे कां? शेवटी एक आश्चर्य अजून. जेव्हा विषारी कीटकनाशकांचा वापर होत नव्हता म्हणून खाद्यान्न, फळफळावळे, भाजीपाला 'विषमुक्त' होता. तेव्हा देशातील सरासरी आयुष्यमान कमी होते (40 ते 45 वर्षे). जेव्हा विषारी अन्नधान्य, फळफळावळे, भाजीपाला लोक खाताहेत म्हणजेच 'विषयुक्त' आहार घेताहेत तेव्हा त्यांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. (सरासरी 60 ते 65 वर्षे) विषमुक्त आहार घेत होते तेव्हा आयुष्यमान कमी आणि विषयुक्त आहार लोक घेताहेत तर आयुष्यमान वाढताहे हे आश्चर्यच म्हणायचे!

सोयीच्या जागी हरविलेली अंगठी शोधताना अंगठी सापडण्याची सुतराम शक्यता नाही. फक्त अंगठी शोधण्याचे नाटक व शेतकरी कळवळ्य़ाचा 'शो' मात्र होऊन जातो. या वेळेच्या 'सत्यमेव जयते'मध्ये आमिर खानने शेतकरी प्रश्नावर 'सोय एकमेव जयते' हे आपले ब्रीद असल्याचे सिद्ध केले. अर्थात यापूर्वीच्या 'पिपली लाईव्ह'मध्येसुद्धा 1 लाख रुपयासाठी शेतकरी आत्महत्या करतो ही थीम आमिरने घेतली होती. शेतकर्‍यांबाबतचा तोच दुष्टावा आमिरने या वेळेस पुन्हा प्रकट केला एवढेच.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी : 9822587842
      

1 comment:

  1. 'सत्यमेव जयते, चे तुम्ही जे विवेचन केले ते योग्य नाही. त्याला अनेक करणे देता येतील.
    १. हरित क्रांती पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे
    २. त्या काळात विज्ञान-तंत्रज्ञान प्रगत झाले नव्हते. तेव्हाची परंपरागत शेती आणि आत्ताची आधुनिक - परंपरागत जैविक शेती यात मूळ फरक संशोधनाने अर्जित केलेल्या आधुनिक तंत्राचा आहे.
    ३. आमिर खान आणि मंडळी हि आजच्या आधुनिक तंत्राबाबत बोलत आहेत. या तंत्राचा वापर करून निश्चितच शेतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणता येईल.
    ४. इथे तुम्ही हायब्रीड बियाण्यांना पाठींबा देता, आता मला सांगा ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत ज्या हुरडा पार्ट्या होत होत्या त्या आज कुठे गायब झाल्या? आज जर ज्वारीच्या पापड्या करायच्या असतील तर त्यासाठी गावराणी ज्वारी मिळत नाही, आणि मिळालीच तर त्यासाठी ज्यादा पैसे मोजावे लागतात.
    ५. त्या काळात देशाला दुष्काळाच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी हरितक्रांती योग्यच होती. पण आज परिस्तिथी बदलली आहे. उत्पादन वाढवण्यासाठी बेसुमार कीटकनाशकांचा वापर करून मातीची सुपीकता गमावणे आपल्याला कोणत्याही किमतीत परवडणार नाही.
    ६. इतर देशांच्या तुलनेत भारत जरी छटाक भरच रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरत असला तरी ते छटाक सामान्य शेतकऱ्याला किती टनात पडते ते एकदा जाऊन त्या शेतकऱ्याला विचारा.
    ७. तुम्ही आयुष्यामानाचा एक मुद्दा मांडला. आज आयुष्यमान वाढले आहे कारण, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने कॅन्सर, टी बी यासारख्या अनेक दुर्धर रोगांचा इलाज करणे शक्य झाले आहे. जो त्याकाळी अशक्य होता. त्यामुळे विषाची एक बाटली जरी माणसाने घशात ओतली तरी त्याचा इलाज करणे आज शक्य आहे . आणि यात काही आश्चर्य नाही.
    ८. आणि सगळ्यात शेवटचे, आमीर खान आणि मंडळींनी रासायनिक खते आणि कीटकनाशके हेच शेतकऱ्याच्या आत्महत्येमागचे एकमेव कारण आहे असे कधीच म्हटले नाही तर बाकी सगळ्या कारणांपैकी हे एक कारण आहे असे म्हटले आहे.

    ReplyDelete