Saturday 16 June 2012

होबासकी

होबासकी
''बाप्पू आहेत काय घरी?''

''कोन व्हय?''

''मी आहो सुभास.''

''कसा आला?''

''चप्पल पाह्यजे तुमची.''

''कायले रे?''

''माही चप्पल कुर्त्यानं तोडली.''

''कुठं चालला तू?''

''पस्तीस लोकं चालले.. दोन गाडय़ा सांगतल्या.''

''कुठं हाय वार्‍यावर वरात?''

''कपळा घ्याले चाललो रमशाचा.''

''वारेवा तुव्ह काम!' कपळा घ्याले चालला अन् चप्पल दुसर्‍याची?''

''आपलं कामच तसं आहे.. चप्पल

तुमची.. सदरा वामनचा.. फुलपँट सोपानचा..''

''याले म्हंतात सासूच्या लुगडय़ावर जवाई उधार!''

''दुसर्‍या ठिकानी गेल्यावर मानसाचं इंम्प्रेशन पडलं

पाह्यजे बाप्पू!''

''असं इंप्रेशन असते काय लेका? कपळ्याले चालला

अन् फुलपँट उसना घातला? कोन्या गावची

जुटली सोयरीक?''

''वांगरगावची जुटली! इतवारीच फायनल झाली.''

''किती जनं गेलते फायनलले?''

''पोरगी पाहाले पंधरा.. फायनलले तीस अन्

आता कपळ्याले पस्तीस.''

''अबे, पोरीच्या बापाचा काही विचार करत जा!

कामाचे ना धामाचे सोबत कायले नेता? त्या पोरीच्या

मायची सैपाक करू करू किती घान होते? काही

दुसर्‍याचा इचार करत जा!''

''मानासाठी न्या लागतात म्हतारे!''

''आज कुठी आहे कपळा?''

''आकोल्याले.''

''कोन कोन चाललं?''

''पोराचे चार जवाई.. पाच मामा.. चुलते-पुतने

अन् पाचसहा बाया.. वरतून बारके पोट्टे!''

''बारके पोट्टे कायले नेता उनाचे? एखांदा बिमार

पडला म्हणजे?''

''पोट्टे हरीकले.''

''रायभान बुढा येऊन राह्यला काय?''

''बुढा कालपासून तयारी करून बसला.''

''त्या बुढय़ाले कायले नेता दम्याच्या मानसाले?''

''तो पोराचा आबा व्हय! बुढय़ाले न्याच लागते.''

''अरे, पन बुढय़ाले डोयानं दिसत नाही, कानानं आयकू

येत नाही.. तरी कायले नेता विनाकारण?''

''बुढा येतोच म्हनते.''

''त्या बुढय़ाले काय समजते कपळ्यातलं? नागमनी

कपळ्याशिवाय बुढय़ाले काही समजत नाही. बुढय़ानं

बापजन्मात फुलपँट घातला नाही. बुढा काय

करते दुकानात येऊन?''

''म्हतारा मानूस पाह्यजे सोबत.''

''कायले खायाची भरती?''

''बुढय़ाले नेलं नाही की राग येते.''

''अबे, पन कपळ्याले पस्तीस लोकं असतात काय?

पुर्‍या मिलचा तागा उचलून आनतात काय?

तुम्ही पस्तीस अन् तिकडून पोरीवाले वीस पंचवीस

येतीन.. म्हनजे दुकानात जत्रा भरोता काय? कपळा

घ्याले नवरदेव नवरीले पाठवा.. एवढा चिल्लर

खुर्दा न्यायचं काहीच काम नाही.''

''आजकाल पद्घतच झाली बाप्पू.. दुकानात गर्दी दिसली

पाह्यजे.''

''एवढी गर्दी कायले करा लागते? त्या दुकानदाराले

धंदा करू देता की नाही?''

''तुमच्या लगAात कोन कोन गेलं होतं कपळ्याले?''

''अरे, कपळा दूरच राह्यला, मले बुढय़ानं पोरगी दाखोली

नाही. एकटाच बुढा पोरगी पसन करून आला. आमच्या

काळात लगन झाल्यावर दोन मयने नवरीले पाठवत नव्हते. आता त् लगन झालं की, दुसर्‍याच रोजी

नवरदेव खांद्यावर दुपटा टाकते. आपल्या

गावचं संपतरावचं पोट्ट वरातीवाल्यासोबतच

बायकोले आनाले गेलं होतं.''

''आता जमाना बदलला बाप्पू..''

''काही फायदा नाही. आता लगAात फालतूची शान वाढली. एकानं हजार रुपायाचे फटाके फोडले की,

दुसरा दोन हजारांचे फोडते. एकानं पाच हजारांचा

बॅंड सांगतला की, दुसरा दहा हजारांचा सांगते.

कर्ज काढून होबासकी करतात ससरीचे.. मंग

पेरन्याच्या टाइमले व्याजानं पैसे काढतात.. त्याच्यापेक्षा

सामूहिक लगन करा.''

''सामूहिकमधे मानसाची इज्जत जाते.''

''कायची फतराची इज्जत जाते? उलट

लोकाइचा खर्च वाचते. हे आंदन.. अहीर..

बायतिळे यानंच आपून थंडे होऊन राह्यलो,

उन्हायात दोन दोन हजारांचे अहीर करतात.. पाच पाच

हजाराचं आंदन घेतात अन् पावसायात बायकोचं

आंगावरचं सोनं मोडतात. जास्त कर्ज झालं की, रोगर

घेतात.''

''चप्पल द्या तुमची.. गाळी उभी आहे घरापाशी.''

''नवरदेवाची माय चालली वाटते?''

''चार चार बाया चालल्या.. पोराची मावशी चालली.

बरी इव्हायाची भेट होते दुकानात.''

''नवरदेवाची माय पायटपासून साळी नेसून तयार

आहे. अशी सजली की, जसं तिचंच लगन हाये!''

''सोनहरकी हाय ना!''

''द्या ना चप्पल.''

''चप्पल देतो, पन दुकानात हारवू नको.''

''जशी नेली तशीच आनून देतो. तुम्ही चालता काय

कपळ्यावर?''

''अरे, हूत लेका..! इतक्या जनाइचं काय काम आहे

दुकानात? इतके लोकं गेल्यावर दुकानदार समजते की,

आले खेळ्याचे येळे! मंग तो तुमाले गादीवर

बसवते.. अर्धा अर्धा शिंगल चहा पाजते अन्

दोनशे रुपये मीटरचा कपळा चारशाले.. पाचशाची

साडी हजाराले.. वीस रुपयाची चड्डी.. आलं काय ध्यानात?''

No comments:

Post a Comment