Monday 18 June 2012

गोष्ट सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाची

गोष्ट सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाची
तुम्हाला सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाची गोष्ट माहीत आहे? तुम्हालाच काय पण जगातल्या सगळय़ांनाच माहीत आहे. सिद्धार्थाने एके दिवशी एक वृद्ध पाहिला, काही दिवसांनंतर एक आसन्नमरण रोगी पाहिला आणि काही दिवसांनंतर एक प्रेत पाहिले. या तिन्ही ठिकाणी त्यानं साक्षात दु:ख पाहिलं. तिसर्‍या ठिकाणी तर प्रेताभोवती आक्रोश करणारा नातलगांचा समूह पाहिला. त्याच्या मनात आले हे दु:ख का आहे जगात? विचारानं भारावलेल्या सिद्धार्थानं मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गृहत्याग केला. यानंतरचाही कथाभाग आपणाला माहिती आहेच. कारण शाळेतील पाठय़पुस्तकात ही गोष्ट येऊन गेली आहे. इतकेच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे बुद्ध धर्म आहे तिथे ही गोष्ट प्रचलित आहे.

पण एके दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. किती वय होतं सिद्धार्थाचं. घर सोडून निघून जाताना? तो चांगला एकोणतीस वर्षाचा थोराड पुरुष होता. त्याला राहुल नावाचा छानसा मुलगा होता. पण एवढा मोठा होईपर्यंत सिद्धार्थानं कधी जराजर्जर माणूस पाहिलाच नसेल? आणि एखादही प्रेत त्यानं कधी पाहिलंच नसेल? कसं शक्य आहे? बाबासाहेबांच्या मनात हा प्रश्न वारंवार येऊ लागला. 'बुद्धा अँण्ड हीज धम्म' या ग्रंथाचं ते लेखन करीत होते. हा त्यांच्या आयुष्यातला त्यांनी लिहिलेला अखेरचा ग्रंथ. मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमत:ही भारतीयच आहे. ही भूमिका घेऊन जगणार्‍या वयोवृद्ध आणि प्रचंड अभ्यासू माणासाच्या मनातला तो प्रश्न होता आणि त्यांना उत्तर सापडलं. रोहिणी नदीच्या पाण्यावरून दोन्ही काठांवर राहणार्‍या शाक्य आणि कोलियात पाणी वाटपावरून नेहमी भांडणे होत. अनेक वेळेला भांडणं होऊन युद्ध पेटत असे. त्या युद्धात अनेक शाक्य आणि कोलिय मारले जात. पण प्रश्न सुटतच नव्हता. प्रश्न पाणी वाटपाचा होता पण तो सोडवावा म्हणून दोन्ही कुळे एकमेकांना ठार मारून आपण किती बलवान आहोत हेच सिद्ध करीत होते. म्हणून सिद्धार्थ अस्वस्थ झाला. तो स्वत: शाक्य होता, तर सगळे कोलिय त्यांच्या माय कुळातील होते. म्हणून त्यानं विनंती केली युद्ध थांबवा. युद्धातून कोण किती बलवान आहे हे सिद्ध होतंय. पाणी वाटपाचा प्रश्न कुठे सुटतोय? या पोरगेलशा तरुणाने आपणास अक्कल शिकवावी हे काही त्या दरबारातल्या विद्वानांना आवडते नाही. त्यांनी सिद्धार्थाच्या वडिलांचंच सदस्यत्व रद्द केलं आणि राजधानी सोडून जाण्याची शिक्षा दिली. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला- माझ्या अपराधाची शिक्षा माझ्या वडिलांना देऊ नका. मी गृहत्याग करतो. सिद्धार्थाने गृहत्याग केला. तो सारखा विचार करू लागला, काय चुकलं आपलं. माणसं पुन्हा पुन्हा एकमेकांना ठार मारण्याएवढे क्रूर का होतात ? प्रश्न तसाच राहतो आणि माणसं मात्र दु:खी होतात. या दु:खाच कारण शोधण्यासाठी सिद्धार्थ घरदार सोडून चिंतनासाठी वनात गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थाच्या गृहत्यागाची ही अशी मांडणी केली. सिद्धार्थाच्या गृहत्यागाची एक समर्पक मांडणी. एका महापुरुषाचा गृहत्याग म्हणून ही मांडणी अतिशय तर्क सुसंगत, वास्तव आणि शक्यतेच्या कोटीतली नाही असं कोण म्हणेल ?

आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. बाबासाहेबांची ही मांडणी अगदी सार्थच आहे. पण गेली दोन हजार वर्षे ती जुनी भाबडी अशी दंतकथा लोकांनी का जपली? कुणी सांगितली ही कथा पहिल्यांदा? पं. अश्वघोष यांनी गौतम बुद्धाचं पहिलं चरित्र लिहिणार्‍या या पंडितानं तथागताला यानं कधी पाहिलं नव्हतं. त्यांच्या निर्वाणानंतर तीन-चारशे वर्षानंतर त्यानं हे चरित्र लिहिलं. तो स्वत: एक बुद्धानुयायी होता. आणि त्या काळात गाजलेला पंडित होता. एवढा मोठा पंडित की जगातल्या विविध भाषा पंडितांची संगीती तक्षशीला येथे भरली तेव्हा त्या संगीतीचं अध्यक्षपद त्याला देण्यात आलं होतं. त्याला स्वत:ला पाली, संस्कृत, इराणी भाषा अवगत होत्या. गौतम बुद्धाचं त्यानं लिहिलेलं पहिलं चरित्र म्हणून सामान्य माणसांनी जपली ती कहाणी हे आपण समजू शकतो; पण पं. अश्वघोषासारख्या माणसानं ही एवढी भाबडी कथा का लिहावी? सिद्धार्थासारख्या महान पुरुषाचं अवमूल्यन करणारी कहाणी अश्वघोषानं का लिहावी? माझ्या मनात हा प्रश्न रुतून बसला होता. सामान्य आंबेडकरी अनुयायांची एक खासियत आहे. एकदा बाबासाहेबांनी एखाद्या गोष्टीला नकार दिला की त्या गोष्टीकडं पुन्हा ढुंकूनही पाहायचं नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण कुणी अन्य एखाद्या प्रश्नाच्या निमित्तानं त्या गोष्टीकडं पाहतो म्हणाला की तो आंबेडकरांचा विरोधक असतो हे समजणं मात्र केवळ भाबडेपणा असतो. या भाबडेपणातून आपण आपल्याच वैचारिक विकासाचा अडसर निर्माण करतो हेही आपण लक्षात घेत नाही. मांसाहारासाठी प्राण्यांची हिंसा करू नये हा आदेश गौतम बुद्धाने दिला. त्यामुळे हरणांची हत्या टाळता कशी येईल अशी जातककथा जन्मास आली; पण कोंबडय़ाची हत्या टाळता कशी येईल अशी जातककथा का निर्माण झाली नसावी, असा प्रश्न माझ्या मनात येतोच. आणि अशी जातककथा नसल्यामुळे मी बौद्ध असलो तरी कोंबडी खायला हरकत नाही असे मी माझे समाधान करून घ्यावे की हा दुसराही प्रश्न माझ्या मनात येतो. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून शाकाहारी आहे आणि शाकाहारी असणेच धम्माला अनुसरून वागणे आहे असे समजतो. हा माझा दुराग्रह तर नाही? असे अनेक प्रश्न मनात उगवत राहतात. असो तर या प्रश्नांचे पुढे पाहू. पण तूर्त अश्वघोषाने तरी एवढी भाबडी कथा का सांगितली असावी याचा काही खुलासा करता येतो का याकडे मी वळतो.अगदी लहानपणी 'क' कमळाचा असे मला गुरुजींनी शिकवले होते. मीही तेच लक्षात ठेवले होते. पण जसजसा मोठा होत गेलो तसे कळो आले. 'क' कमळाचा असतो तसा तो कचर्‍याचाही असतो आणि कडब्याचाही असतो. आणखी पुढे मोठा झाल्यावर कळले 'क' करमणुकीचा असतो तसा तो कपटीपणाचाही असतो. मग गुरुजींनी 'क' कपटीपणाचा असे का नाही शिकवले? आणि खरोखरंच पाच वर्षाच्या मुलाला तसे शिकवले असते तर कळले तरी असते का? कचरा कळतो, कडबाही कळतो पण कपटीपणा? तो अमूर्त व्यक्तीच्या कृतीतून परिणाम होतात त्यातून तो ओळखायचा असतो. मुळात दु:ख असतं हे तथागतानं सांगितलेलं पहिलं 'आर्यसत्य'; पण 'दु:ख' हीसुद्धा अमूर्त कल्पना. अडीच हजार वर्षापूर्वीच्या बालबुद्धी समाजाला समजावून कशी सांगायची? आणि दु:ख असतं हे समजून सांगितल्याशिवाय त्याला कारण असतं, ते दूर करता येतं ही पुढची आर्यसत्य कशी सांगणार? पं. अश्वघोषासमोर हे प्रश्न अधिक महत्त्वाचे होते. तो स्वत: विद्वान होता, पण प्राथमिक शाळेतल्या नागरिकांसाठी त्याने दाखला दिला होता.

ती कथा भाबडी कथा नाहीय. ती एक दृष्टांत कथा आहे. दृष्टांत सांगून तत्त्वज्ञान सांगायचं ही आपली जुनी शिक्षण पद्धती आहे. लोक दृष्टांत कथेलाच वास्तवकथा समजू लागतो यात अश्वघोषाचा काय दोष?

No comments:

Post a Comment