Tuesday 26 June 2012

ब्रह्मंडाचा थक्क करणारा पसारा


ब्रह्मंडाचा थक्क करणारा पसारा
असामान्य बुद्धिमत्ता, कल्पकता व अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने विश्वाच्या जडणघडणीचे, त्याच्या स्वरूपाचे व नियमांचे जे दर्शन वैज्ञानिकांना झाले त्यापैकी आपल्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत जितकी माहिती झिरपते, त्यावरून असे निश्चितच म्हणता येते की, ब्रह्मंडाचा हा पसारा थक्क करून सोडणारा आहे. सतत जळत राहून प्रचंड ऊर्जा प्रस्फुटित करत राहणारे सूर्यासारखे अब्जावधी तारे, त्या तार्‍यांच्या भोवती एका निश्चित गतीने व निश्चित कक्षेत फिरत असलेले ग्रह, त्या ग्रहांभोवती तसेच काटेकोर कक्षेत फिरत असलेले उपग्रह, या कोटी-कोटी सूर्याची, ग्रहांची व उपग्रहांची मिळून बनलेली एक आकाशगंगा, ज्यातील सर्व

सूर्यमाला एका केंद्राभोवती फिरत आहे; अशा अनेकानेक आकाशगंगांचे समूह जे सर्व मिळून पुन्हा एका तिसर्‍याच केंद्राभोवती फेर धरतात! शिवाय हे सर्व आकाशगंगाचे समूह त्याचवेळी एकमेकांपासून विलक्षण गतीने दूर-दूर जातच आहेत. हे सर्व सूर्य अब्जावधी तारे, ग्रह, उपग्रह करोडो वर्षापासून नियमबद्ध वागत आहेत.

शिवाय या ब्रह्मंडात मध्येच कुठेतरी प्रचंड कृष्णविवरेदेखील आहेत, जे त्यांच्या विशिष्ट कक्षेच्या आत शिरणार्‍या सूर्यमालांनाच नव्हे तर अख्ख्या आकाशगंगेला गिळून टाकतात. या कृष्णविवरांना (ब्लॅकहोल्स) आकार नसतो, परंतु लक्षावधी तार्‍यांचे वस्तुमान (मास) व ऊर्जा त्या विवरातील एकाच बिंदूत सामावलेली असते. त्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी वाढलेली असते की प्रकाशकिरणदेखील त्या विवरातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच ते कृष्णविवर आम्हाला दिसू शकत नाही.

काही वैज्ञानिकांच्या मते या कृष्णविवरांमध्ये ओढल्या जाणार्‍या वस्तू (वस्तू म्हणजे महाकाय तारे व त्यांचे ग्रह, उपग्रह) आतील भयानक उष्णतेने पूर्णत: वितळून त्यांचे पदार्थरूप नष्ट होऊन निव्वळ एकाच मूलभूत ऊर्जेत रूपांतरित झाल्यावर ती ऊर्जा आम्हाला सध्या माहीत नसलेल्या वेगळ्याच कोणत्यातरी विश्वाच्या किंवा आमच्याच विश्वातील वेगळय़ा ठिकाणी नवनिर्मितीसाठी उपयोगात आणली जात असावी.

जी कथा ब्रह्मंडाची तीच अणूची. प्रत्येक पदार्थातील सर्वात सूक्ष्म घटक म्हणजे अणू. तो आकाराने इतका सूक्ष्म असतो की एका केसाच्या टोकावर पाच लक्ष अणू मावतात! इतक्या सूक्ष्म पदार्थापेक्षा आणखी सूक्ष्म ते काय असणार? वैज्ञानिकांनी त्या अणूचेही अंतरंग शोधून काढलेच. ते तर आणखी थक्क करणारे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्व आहे. सूर्याभोवती जसे पृथ्वीसारखे ग्रह फिरत राहतात व मध्ये पोकळी असते तसेच अणूच्या पोटात मध्यभागी एक अतिसूक्ष्म असे केंद्र असते व त्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन नावाचे सूक्ष्म कण प्रचंड वेगाने फिरत असतात. हे गरगर फिरणारे इलेक्ट्रॉन आणि अणूचे केंद्र यांच्यामध्ये खूप मोठी पोकळी असते. केंद्रस्थानी प्रोटॉन व न्यूट्रॉन नावाचे इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जास्त वस्तुमान असलेले सूक्ष्मकण असतात. अणूच्या आतली पोकळी किती मोठी असते? एखाद्या मोठय़ा सभागृहाच्या मध्यभागी एक माशी ठेवली तर त्या सभागृहाच्या आकाराच्या मानाने माशीचा आकार लक्षात घेऊन मधल्या पोकळीची जी कल्पना आपण करू, त्याच प्रमाणात अणूचा आकार व त्याचे केंद्र यांच्यातील पोकळी असते. म्हणजे आमच्या दृष्टीला व स्पर्शाला जे जे भरीव व ठोस भासणारे पदार्थ जाणवतात ते प्रत्यक्षात अतिशय विरविरीत व महापोकळ असतात. परंतु एखादे अनेक आरे असलेले चक्र वेगाने फिरत असले तर त्यातील आर्‍यांमधील पोकळी आपल्या नजरेस दिसत नाही. तसेच इलेक्ट्रॉन्सच्या प्रचंड गतिमान

फेर्‍यांमुळे आम्हाला पदार्थ ठोस वाटू लागतो.

अणुगर्भातील प्रोटॉन व न्यूट्रॉन हे सूक्ष्म कणदेखील अविभाज्य नसून तेसुद्धा क्वार्क नावाच्या अतिसूक्ष्म कणांपासून बनले आहेत. त्याशिवाय या अतिसूक्ष्म कणांना एकमेकांशी जोडून ठेवणारे 'फोर्स पार्टिकल्स' या जातीत मोडणारे आणखी वेगळेच अतिसूक्ष्म कण आहेत. अणूच्या आतली रचना अशाप्रकारे चक्रावून सोडणारी आहे.

एकापेक्षा अधिक अणू (अँटम) एकत्र येऊन रेणूची (मॉलिक्युल) रचना होते. जसे हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. आता या रेणूचे गुणधर्म पुन्हा त्याच्या घटक अणूंच्या गुणधर्मांपेक्षा विपरीत असू शकतात. म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू ज्वलनशील असतात, पण पाणी मात्र पेटूच शकत नाही!

सर्व सजीवांचा आधार असलेले डीएनए रेणू त्या त्या सजीव प्राण्याच्या संभाव्य विकासाचा सर्व आराखडा बाळगून असतात. आपल्या देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये हे डीएनए रेणू आहेत. ज्युरासिक पार्क या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एका डीएनए रेणूतून संपूर्ण प्राण्याची निर्मितीही करता येईल. देहाच्या प्रत्येक अवयवाचा रंग, रूप, आकार व अंतर्गत रचनेचा स्पष्ट आराखडा या अतिसूक्ष्म डीएनए

रेणूमध्ये कसा साठवला जातो? त्याच्या मदतीला धावपळ करणारे 'निरोप्ये' आरएनए नावांचे रेणू असतात. ते सुजाण असतात काय? प्रत्येक जीवपेशीतील डीएनए रेणू हे त्या त्या पेशीचे आर्किटेक्ट, इंजिनिअर, गवंडी, डॉक्टर, नर्स, आई वगैरे सर्व ऑल-इन-वन असतात.

एका जीवपेशीच्या उदरात दुसरी जीवपेशी सुखाने नांदू लागल्यावर मोठय़ा आकारांचे सजीव निर्माण झाले. कोटी-कोटी पेशी (सेल्स) एकत्र येऊन देहरचना करतात. देहाच्या प्रत्येक अवयवाची रचना वेगळी, कार्यही वेगळे. देहातील लक्षावधी पेशी दरक्षणी नष्ट होतात, त्यांची जागा नवनिर्मित पेशी घेत राहतात आणि तरीही त्या देहाचे जीवन अखंड सुरू राहते. गळून पडणार्‍या पेशींपेक्षा नवनिर्मित पेशींची संख्या कमी होत गेली की वार्धक्य व मृत्यूकडे वाटचाल सुरू होते., परंतु मृत्यूपूर्वी स्वत:सारखा दुसरा देह निर्माण करूनच सहसा प्रत्येक प्राणी-जीवनाचा अंत होतो.

ही सर्व एकाचवेळी महाविराट व अतिसूक्ष्म, गुंतागुंतीची पण नियमबद्ध रचना काय दर्शविते? आणि पृथ्वीवर सजीवांच्या उत्क्रांतीसोबत विकसित होत गेलेली ती असतेपणाची जाणीव, त्या जाणिवेला

फुटलेले वासनांचे, विकारांचे, बुद्धीचे, विचारांचे, कल्पनांचे, प्रतिभेचे धुमारे-ते कशासाठी?

(लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी-9881574954

No comments:

Post a Comment