Tuesday 26 June 2012

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा?


महाराष्ट्र कुणाच्या बापाचा?
..आणि शेवटी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मंत्रालयात आग लागली! विशेष म्हणजे मंत्री मंत्रालयात नसताना आग लागली. याचाच अर्थ आगीलासुद्धा व्यवहार कळतो, हे सिद्ध झालं! खरं तर अनेक घोटाळे उघडकीस यायला लागले होते. 'आदर्श' घोटाळय़ामुळे सारा देश ढवळून निघाला होता. तेव्हाच्या आगीत काही बकरे उभ्याउभ्याच भाजले गेले होते. शेवटी 'सौ चुहे' पचवणार्‍या मांजरीला एखादा उंदीर पचवणं फार काही कठीण काम नव्हतं. पण एखाद्या उंदराची हड्डी नको तिथं फसली की जरा पंचाईत होते, हे मात्र नक्की.

आणि त्यामुळेच आदर्श घोटाळय़ातल्या महत्त्वाच्या कागदपत्रांनी गहाळ व्हायला सुरुवात केली होती. जनता अस्वस्थ होत होती. आदर्श घोटाळ्याची धग कमी होत असतानाच नवी नवी प्रकरणं बाहेर यायला सुरुवात झाली होती. खुर्चीतले असो की बाहेरचे, सारेच मावसभाऊ अस्वस्थ होत होते. सार्‍या घरात ढेकणांचीच जत्रा आहे हे जनतेच्याही लक्षात यायला लागले होते. त्यामुळे गल्लीही खदखदायला लागली होती. दिल्ली अस्वस्थ होत होती. शेवटी दोन-चार ढेकूण बाजूला आणि सारं घर स्वच्छ झाल्याची दवंडी दिल्लीवाल्यांनी पिटली. पण दोन-चार ढेकूण गेल्यानं अख्खी गादी स्वच्छ थोडीच होते?

दोन ढेकूण गेल्यानं कशी वाचणार गादी?

किती मोठय़ा मोठय़ा टोळ्या, कशी भली मोठी यादी?



किती मोठाले ढेकूण, किती मापाचे ढेकूण

रंग बदलती कसे, किती बापाचे ढेकूण?

साधु-संतांच्या घराची, कशी झाली बरबादी?



एक झाले सारे बोके, साय वाटून घेतली

हातोहात कसायांनी, गाय वाटून घेतली

सजा द्यायची कोणाला, झाले फितूर फिर्यादी?



कसे झोपले गोकूळ, कशा झोपल्या गौळणी

माकडांच्या हाती देता, कसे पुन्हा पुन्हा लोणी

अरे, वाचवा गोकुळ, गायी कापण्याच्या आधी!!

पण एवढं सारं करूनही प्रकरण काही शांत होतच नव्हतं. नव्या नव्या भानगडी रोज रोज उघडकीस यायला लागल्या होत्या.

पण तुमच्या आमच्यापेक्षा ढेकणाची जात चलाख! सारे एकत्र आले असणार ! सामूहिक विचार केला असणार ! 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' आखून सारे ढेकूण गुपचूप बाजूला झालेत आणि गादीला दिली आग लावून!

सारे ढेकूण सहीसलामत.. गादी मात्र धो धो जळतेय.!! शिवाय आपलं फायर ब्रिगेडसुद्धा केवढं मानवतावादी ? केवढं हुशार?

एकीकडे मान्सून बरोबर आला नाही. महाराष्ट्रात जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. सरकारनंच गावोगावी सुरू केलेल्या 'बिअरबार'मधील पट्टीच्या सेवकांना दारूमध्ये मिसळायला पाणी नाही. अशावेळी मंत्रालयाची आग विझवण्यासाठी पाणी वाया दवडणं, हे नालायकपणाचंच ठरलं असतं ना? म्हणून फायर ब्रिगेडनंही शक्य तेवढं पाणी वाचवण्याचा पराक्रम केला! त्यांचे खरंच जाहीर सत्कार व्हायला हवेत. पब्लिकला वाटते, मंत्रालयाचे तीन-चार मजले जळून खाक होईपर्यंत ही यंत्रणा झोपली होती का? आग एवढी पसरलीच कशी? दिवसाढवळ्या आग लागलीच कशी? जनतेला अक्कल थोडीच आहे? पाच वर्षांतून एकदा मत दिलं आणि सरकार निवडण्याची संधी मिळाली म्हणून देश काय आपल्याच बापाचा आहे, असं पब्लिकला वाटते का?

मंत्रालयात केबलचं पसरलेलं जाळं काय सांगतं? फायर ब्रिगेडचा पराक्रम, संकटकालीन सुरक्षा व्यवस्था या सार्‍या सार्‍या दिवाळखोरीत निघाल्याचं चित्र समोर आलं. कुठल्या चौकशीची गरज नाही. कुठल्या अहवालाची गरज नाही. कुठल्या पुराव्यांची गरज नाही.

पण किती अधिकार्‍यांवरती कारवाई करण्यात आली? सारेचे सारे (सत्ताधारी आणि विरोधकही) एवढे शांत का? कोणत्या मंर्त्यानं शरमेनं मान खाली घातली? आम्ही महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी खरंच लायक नाही, याची कबुली देण्याचा मर्दपणा एकानं तरी दाखवला का?

समजा शिवाजी महाराजांच्या काळात अशी घटना घडली असती, तर त्यांनी सरळ एकेकाची मुंडकी तरी छाटली असती नाहीतर हत्तीच्या पायी तरी दिलं असतं! आज भगतसिंग असता तर.. कुणाला गोळ्या घातल्या असत्या त्यानं? स्वत:लाच की..?

लालबहादूर शास्त्रींची सत्ता असती तर सार्‍या मंत्रिमंडळाला सामूहिक आत्महत्या करायला लावली असती का?

जनतेच्या मनात हे असंख्य प्रश्न आहेत. सहनशीलतेचा अंत होतोय. राजकारण्यांच्या पापाचा घडा भरतोय. असंतोषाचा सुप्त ज्वालामुखी वेगाने जागा होतोय.! सारा महाराष्ट्र - सारा देश ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. आणि आमचे कारभारी आगीशी खेळ खेळत आहेत. मस्तीमध्ये धुंद आहे. रावणालासुद्धा एवढा माज आला नसावा कदाचित?

यातून पेटलो पण हळूवार बोलतो मी

काही विशेष नाही, व्यवहार बोलतो मी

बैमान जाहलेला एकेक नाग ठेचू

येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी!

पण हा महाराष्ट्र कुणाचा-तुमचा-माझा की मूठभर राजकारणी लोकांच्या बापाचा?

..तसंच असेल तर करून टाका महाराष्ट्राचा सात-बारा त्यांच्याच नावानं!

(लेखक हे नामवंत कवी असून त्यांचा

'सखी-साजणी' हा कार्यक्रम गाजलेला आहे.)

भ्रमणध्वनी-9822278988

No comments:

Post a Comment