Saturday 16 June 2012

बस करा कुंडली !

बस करा कुंडली !

'काहो पुंडलिकराव, यंदाही जुटलं नाही काय तुमच्या मुन्नीचं?' 'नाई राज्या.. पोरगा पसन येते पन देवक जुळत नाही. आमचं देवक गाईचं शेपूट आहे, आमाले बकरीच्या शेपटावाला चालते पन कुर्त्याच्या शेपटावाला चालत नाही.' 'कुर्त्याच्या शेपटावाला एकही सापडला नाही काय?' 'एक सापडला होता, इंजिनिअर होता, सार्‍याइची पसंती झाली, पन पोराच्या बापानं मंधातच खुसपट काढलं.' 'काय म्हने?'

'पोरापोरीची कुंडली जुळत नाही म्हने.'

'काय राज्या कुंडल्या घेऊन बसले? सुधराना आता.. कांपुटरचं युग आहे. अशा जर कुंडल्या पाह्यत राह्यसान तर पोरीचं लगन आजून पाच वर्षे होनार नाही, मंग तिले पांढर्‍या केसाचा दुसरपन्या पोरगा पाहून देसान काय?'

'हे कुंडलीचं लचांड मलेबी पटत नाही, पन लोकासाठी करा लागते.'

'आता कुंडल्या गुंडून ठेवा, पोरापोरीची पसंती झाली की पटकन उरकून टाका.'

'तसाच इचार सुरू आहे, एक पोरगा माह्या ध्यानात आहे, पन कूळ मंधात येऊन राह्यलं.'

'म्हणजे?'

'आम्ही शहान्नव कुळी आहो' अन् पोरगा हलका निंगून राह्यला'

'काय हलके भारी घेऊन बसले राज्या? घराच्या आंगनातला पराटय़ाचा कुळ बदलत नाही अन् शहान्नव कुळीच्या गोष्टी करून राह्यले.'

'मले तुमचं म्हननं पटते, पन सार्‍याइले पटलं पाह्यजे.' 'तुम्ही पक्के राहा.. तुम्ही पक्के असले की सार्‍याइले पटते.'

'आता काय सांगू तुमाले नानाभाऊ . मी पोरं पाहू पाहू थकलो. तीस चाळीस हजार फिर्‍या फिर्‍यात गेले. पोरगा पसन येते, सोबत दहाबारा लोकं आनते, जिऊन खाऊन जाते अन् घरी जाऊन निरोप देतो म्हणते, आम्ही इकडे वाट पाहू पाहू थकतो तरी निरोप येत नाही.'

'हा कुटाना बंद करा. चहापान्यावर पोरगी दाखोत जा. घरच्या बायाइले किती कुटाना पुरते? ताटं जमा करा. वाटय़ा जमा करा. गिलास आना. मसाला वाटा. चारपाच भाज्या करा. चटन्या करा. ते रानबोके काला मोडूमोडू जेवतात, संड

फुगतात अन् पोरीले नापसंत करून जातात, किती जिवार येते मानसाची?'

'भयंकर जिवावर येते, पन सांगता कोणाले?'

याच्यापुढे घरी पोरगी दाखोत जा अन् हाटेलात च्या घ्याले नेत जा, जियाखायाचा लाळ बंद करा, अन् तुम्ही पोरगा पाहाले जायाचं असलं तर घरून जिऊन जात जा.

'माह्यासारखा उपाशी राह्यते, पन बाकीच्याइले भुका लागतात.'

सोयरीक पाहाले एवढा गयाठा कायले न्या लागते? मावसभाऊ.. फुईभाऊ .. चुलतभाऊ .. दुधभाऊ ..बाजीवरचे म्हातारे बुढे धरू धरू नेता, बुढय़ाले दमा असते, कानानं आयकू येत नाही, डोयानं दिसत नाही, तरी उचलून गाडीत टाकता? सतरा जनं गेले की होणारं काम होत नाही. याच्यापुढे कामाचे मानसं नेत जा,'

'पोरीले प्रश्न विचाराले म्हातारा माणूस पाह्यजे.' 'कायले पाह्यजे म्हातारा? शिकल्यासवरल्या इंजिनिअर पोरीले वखरावरचा म्हातारा माणूस काय विचारीन? त्याले काय समजते फोतर? ज्याले बायको करा लागते त्यालेच विचारू देत जा.'

'मले तुमचं पटते, पन पोरापोरीचे गुन जुळले पाह्यजात'

'किती पोरं पाह्यले तुम्ही?'

'लय पाह्यले चाळीस'

'तरी एकही पसन नाही?'

'गुन जुळत नाहीत, गुन जुळले नाहीत तर पुढे वांधा येते'

'काहीच वांधा येत नसते, निव्र्यसनी पोरगा पाहा, त्याची कमाई पाहा, बॅकग्राऊंड पाहा अन् पोरगी देऊन टाका'

'मले तिच्या लग्नाची घाईच झाली, पन आमचा बुढा कुंडली पाह्यते'

'बुढय़ाले समजावून सांगा, बुढा दोनचार वर्षात मरून जाईन.. पण पोरीची माती करता काय? तुम्ही बारीक पाहून राह्यले अन् चांगले संबंध गमावून राह्यले, मंग वार्‍यावर वरात काढसान काय?' 'नाही हो'

'आपल्या गावच्या तेजरावनं अशीच होबासकी केली. कुंडल्या पाह्यल्या अन् चांगले संबंध गमावले. पोरगी बत्तीस वर्षाची झाली, शेवटी एका जागी कुंडली जुळली, तोही दुसरपन्या निंघाला. आता तोच भयान दारू पेते, काय फायदा कुंडलीचा? कुंडली पाहून माणूस मेला की जिता हाय तेही सांगता येत नाही. मंग पुढचं भविष्य कोणं पाह्यलं?'

'बुढा म्हणते कांपुटरची कुंडली पाह्यजे'

'कांपुटरवर सार्‍या एकसारख्या कुंडल्या असतात. हा कांपुटरचा भूत कोनं घातला तुमच्या डोकशात? सार चिवत्या बनोयाचे धंदे आहेत.

'तुमची गोठ पटली मले'

'पटली ना? मंग बुढय़ाले समजाऊन सांगा.. कुंडलीची पुंगई करून चुलीत घाला, अन् ते कुर्त्याचं शेपूट.. वान्नेराचं शेपूट.. असे नाटकं बंद करा.. तुम्ही जर असेच बारीक पाह्यत राह्यसान तर पोरगी म्हातारी होइन तरी तिचं लगीन होणार नाही.'

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

No comments:

Post a Comment