Sunday 24 June 2012

विहरण

विहरण करणे, फिरणे हा माणसाचाच नव्हे, तर पशुपक्षी, प्राणी सर्वाचाच अंगभूत स्वभावधर्म आहे. म्हणूनच 'लीळाचरित्रा'त वारंवार त्यासंदर्भातली वाक्ये येत राहतात. 'एक दीस गोसावी उदीयासीचि वीहरणासि बीजे केले :' या दोन्ही शब्दांचे अर्थ परस्परावलंबी आहेत. विहरण करायचे म्हणजे कुठून तरी, कुठे तरी बीजे करावेच लागणार. मग गोसावी 'वीसैयेसि बीजे केले : गावा पूर्वे तळे असे : तेया तळेयाचीये पसिमीली पाळी तिनि देऊळ :' असे उल्लेख कॉलेजच्या अभ्यासक्रमात 'लीळाचरित्र' होते. त्यात वाचायला मिळाले आणि स्थळसंदर्भाना ऐतिहासिक, पौराणिक पाश्र्वभूमीवर किती महत्त्व असते याचे परिपक्व आकलन झाले.

हजारो वर्षापासून खरे म्हणजे आदिम काळात मानवाने जंगले जाळून, नांगरूण इथे शेतीचा शोध लावला. गुहेतून बाहेर येऊन वाडय़ावस्त्या, गावे-नगरे वसवली. तेव्हापासून या भूमीवर, या मातीवर किती किती पावले येऊन गेली असतील याचा विचार मनात येतो आणि त्याच वेळी मानवी जन्माच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता अधिक तीव्र टोकदार होऊन मनावर उदासीचा झाकोळ दाटून येतो.

किती किती पावले इथे

येतील आणि जातील निघून

हीच माती, हीच जमीन

वर्षानुवर्षे राहील टिकून..

जसजसे वय वाढत जाते तसतशी पायाखाली अधिक भूमी घेण्याची अंगभूत मनस्वी ओढ वाढत जाते. घर, गल्ली, गाव, शिवार या क्रमाने आपण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षा विस्तारत नेण्याचा प्रयत्न करतो. आधी गावाच्या चारीमेरा असणारे शिवार डोळ्य़ांच्या आणि पायांच्या कवेत जन्मभर आठवणीच्या संस्मरणीय अनुभूतीच्या पातळीवर मग आपल्या स्मृतिपटलाभोवती ते वेटाळत राहते. सहावी-सातवीत असताना मला सकाळ-संध्याकाळ गावखोरच्या शेताच्या राखणीसाठी पाठवले जाई. ज्वारीच्या कणसावर बसणार्‍या चिमण्यांना पुढे रब्बीच्या हंगामात करडी गव्हाचे पीक बेहाडे झाल्यावर गव्हाच्या ओंब्यांना झोंबणार्‍या चिमण्यांना आणि करडीच्या बोंडय़ावर पंख फडफडवत दाणे टिपणार्‍या पोपटांना चारीमेरा पळत पिटाळून लावायचे म्हणजे एक जागी स्थिर उभं राहणं शक्यच नसायचं.

आणि घरातून शेतासाठी हाकलून देतानाच दादा-मायने ताकीद दिलेली असायची. ''राखणीसाठी चाल्ला याचं भान ठेव. अन् झांबल्यासारखा एकाच ठिकाणी उभा राहू नको. एकाच ठिकाणी पाहत बसू नको. चारीमेरा लक्ष ठेवजो.'' तेव्हापासून ह्या शब्दाने काळजात गच्च गच्च, पक्क ठाण मांडलेलं. आपल्या ग्रामीण भागात बारा कोसांवर भाषा बदलते. भाषेचा लेहजा बदलतो. शब्दांचे हेलकावे बदलतात असं म्हटलं जातं. त्यात काहीच खोटं नाही. हे पुढे फिरस्तीवर असताना, समाजमन न्याहाळताना लक्षात आलं.

लहानपणी शेतकरी कुटुंबाशीच आणि शेतरानात कामं करणार्‍या स्त्री-पुरुषांशीच अधिक संबंध येत गेला. शिक्षणापेक्षा शेतकरी कुटुंबातील वयाला साजेशी बारकी बारकी कामे नित्यनेमाने करावीच लागत. कधी मारून मुटकून, कधी स्वयंप्रेरणेने म्हणजे आळं करावी लागत आणि बळं करावी लागत. कधी सुताराच्या कामठ्ठय़ावर औतं-फाटे आणण्यासाठी जावश लागे. कधी लोहाराच्या भात्यावर शेवटायला टाकलेल्या पाशी, कुर्‍हाडी, खुरपे, विळे अशी औजारं आणायला जावं लागे. कधी कटिंग करण्यासाठी न्हाव्याच्या घरी तासन्तास बसावं लागे. तो हातातली धोपटी पुढय़ात घेऊन समोरच्या माणसाला पोत्यावर बसवून आपलं बलुतेदारीचं काम करीत राही. यावेळी या गावपातळीवरच्या प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्य़ा स्वभावगुणांची माणसं बोलताना ऐकावी लागत. त्यातून प्रत्येकाच्या संवादकौशल्याचा, शब्दांच्या आणि वाक्यांच्या मांडणीचा, त्यातून व्यक्त होणारा प्रत्येकाचा भाषिक बाज आणि संवादाचा ठसका वेगळा आहे याची जाणीव होई हे सगळं विहरणामुळेच.

आणि हे असतंच. जसा एकाचा चेहरा दुसर्‍यासारखा नसतो तसाच आवाजही नसतो. स्वभावही नसतो. म्हणून तर प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्तिमत्त्व प्राप्त होत असतं. आणि या जगरहाटीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाला मग चारीमेरा विहरण करणं क्रमप्राप्त ठरतं. जसं आपल्या कुटुंबकबिल्याच्या चरितार्थासाठी शिक्षण, नोकरी या क्रमाने आपल्याला भटकंती करावी लागते तशीच मनाच्या भरणपोषणासाठी मानसिक पातळीवर काही संस्मरणीय ठेवा उपलब्ध करणे हा भ्रमंतीचा हेतू असतो.

नववी-दहावीत असताना समजलं. गावातले काही हौशी लोक श्रवणातल्या तिसर्‍या सोमवारी सप्तऋषीची वारी करतात. तिथून परतल्यावर त्या रात्रभरच्या प्रवासाच्या थरारक कथा सांगतात. त्या ऐकून एका वर्षी मलाही जाण्याची ऊर्मी आली. गावातून डोंगरवाटांनी निघून आधी वडाळीला जायचं. तिथून रात्री बारा वाजता आंघोळ करून ओल्या परदणीने मग रात्रभर नव्हे, दुसर्‍या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत अखंड पायी प्रवास करून हे सप्तऋषी पूर्ण करायचे. असा वर्षानुवर्षापासून या परिसराचा नियम आहे. 'रामायण', 'महाभारत' काळातील या सप्तऋषींनी अतिशय निर्जन अशा डोंगरी भागात आपली ठिकाणं निवडली आहेत. तशीच माणसांची मनंही विलोभनीय कथांनी समृद्घ केली आहेत.

वडाळी गावचा वसिष्ठ, देहपचा बग्दालभ्य, गोमेधरचा गौतमेश्वर किंवा गौतम, वरवंडचा वाल्मीकी, पाथर्डीचा पारेश्वर, दुर्गबोरीचा दुर्वास, इसवीचा विश्वमित्र असे हे ऋषी क्रमश: डोंगरपट्टय़ात वास्तव्य करून आहेत. कुठे कुठे दाढीमिशा असणारी त्यांची चित्र हेमाडपंती महादेवाच्या मंदिरात भिंतीवर कुणीतरी काढलेली आहेत. कुठे कुठे तीही नाहीत. मंदिरातल्या शिवलिंगाची ओळख तीच ह्या ऋषींची. म्हणजे पुराणकथेतले हे सगळे ऋषी या मंदिरातून महादेवाच्या पिंडीच्या रूपालाच स्थानापन्न झालेले दिसून येतात. तसेच भाविकांच्या मनातही.

बसक्या आकाराची ही ठेंगणी मंदिरे एरवी वर्षभर सुनसान असतात. माणसाच्या छातीइतक्या किंवा कमरेइतक्या उंचीच्या दारातून वाकून मंदिरात प्रवेश करायचं, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा डोंगरवाटा तुडवत 'हर बोला महादेव' चा जयघोष करीत पुढच्या मंदिरासाठी पळत सुटायचं. असा या प्रवासाचा रात्रक्रम आणि प्रभातक्रम असतो.

वयाच्या सोळाव्या वर्षी सहज एक थिल्र म्हणून या प्रवासात लोकांसोबत सहभागी झालो आणि पुढे सात वर्षे न चुकता दरवर्षी श्रवण महिन्यात या भटकंतीत सहभागी होत राहिलो. रात्री बारा वाजता सुरू होणार्‍या, दुसर्‍या दिवशी संपणार्‍या बारा तासांच्या या प्रवासात आपल्या कल्पनेतील निसर्गातल्या सगळ्य़ा सुंदर आणि थरारक गोष्टी पाहायला मिळतात.

श्रवण महिना असल्यामुळे सगळ्य़ा डोंगरी वनस्पती, वेली, झाडझाडोरा गर्द हिरवा आणि दाटगच्च झालेला. थेट अंगावर येणारा सरळसाठ डोंगर चढताना दमछाक होते तर उतरताना पाय घसरून कुठल्या कुठे घरंगळून जाऊ नये म्हणून अनवाणी पंजांची बोटे घट्ट निसरडय़ा ओल्या जमिनीत रुतवून उतरण उतरायची. मधेच कुठेतरी दूरवर पाऊस पडतो. आडव्या वाहणार्‍या उतावळी आणि मन नदीला पूर खंगाळत जातो. त्या पुरातून एकमेकांना आधार देत नदी पार करायची. पावसाच्या सरी पडत असतानाच काळ्य़ापांढर्‍या ढगांतून चंद्राचा प्रकाश खाली जंगलावर पसरतो. आधीच चंदेरी रंग धारण केलेला सागाचा फुलोरा त्या चंद्रप्रकाशात इतका मोहतुंबी दिसतो, की हा निसर्ग सोडून माणसांच्या वस्तीत परत जाऊच नये असे वाटत राहते. मात्र मागेपुढे अखंड माणसांचा प्रवाह टोळ्य़ा करून पुढे जात असल्यामुळे त्यांच्याच आधारे या निबिड अरण्यात विहरण करणे शक्य होते. हे खरं वास्तव असतं.

खेडय़ापाडय़ातल्या अभावग्रस्त माणसालाही भटकंतीची, प्रवासाची ओढ असते. मात्र प्रवासखर्चाची व्यवस्था नसल्यामुळे ही आपली मानसिक भूक तो भागवू शकत नाही. त्यासाठी कधी काळी कुण्या कल्पक समूहाने ही जी प्रवासाची शक्कल लढवली त्याच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. प्रवासाच्या ओढीला पुन्हा पदरी पुण्य जोडण्याचा आध्यात्मिक आधार! आधी माहीत नव्हतं. पण कॉलेजच्या अभ्यासक्रमात 'लीळाचरित्र' वाचल्यानंतर समजलं. शेवटच्या याच इसवी नावाच्या गावात याच विश्वमित्राच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या मंदिरात चक्रधर स्वामी वास्तव्य करून गेले. तेव्हा त्या विहरणाने जो आनंद दिला त्याला खरोखर तोडच ठरली नाही एवढं मात्र खरं.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

भ्रमणध्वनी - 9420564982

No comments:

Post a Comment