Saturday 30 June 2012

शब्दांमुळे अर्थच नाही, मानसिकताही कळते


शब्दातून मानसिकता स्पष्ट होते ही बाब सर्वप्रथम स्त्री चळवळीतील नेत्यांनी जगापुढे मांडली. त्यांनी 'मदरुमकी', 'अबला' असे अनेक शब्द दाखवून दिले, जे पुरुषप्रधान संस्कृतीचे वाहक आहेत. अशा शब्दांवर या महिलांनी आक्षेप घेतला. जगाने भाषेवरील पुरुषी प्रभाव मान्य केला व असे शब्द आक्षेपार्ह मानले.

वर्णद्वेष व्यक्त करणार्‍या शब्दांवरही आक्षेप घेण्यात आले. काळ्यांना 'निग्रो' म्हटले जायचे. त्याविरुद्ध रणकंदन माजले आणि वर्णद्वेष व्यक्त करणार्‍या शब्दांना जगाने बाद ठरविले. भारतात तर दलित चळवळीच्या रेटय़ाखाली कायदा अस्तित्वात आला. दलितांना अमुक शब्दाने संबोधन करणे हे बेकायदेशीर ठरविले गेले. त्या कायद्याखाली शेकडो गुन्हे नोंदविले गेले आणि काही प्रकरणांत अशा शब्दांचा उच्चार करणार्‍यांना शिक्षाही झाली.

शब्दांच्या मागे अर्थ असतो, तसेच त्यांचा वापर करणार्‍यांची मानसिकताही असते. शब्दांचा सर्वाधिक वापर पत्रकार, लेखक आणि वक्ते करीत असतात. हे शिकलेले, जाणकार, सुसंस्कृत, अभ्यासू, चिकित्सक इत्यादी मानले जातात. या मंडळींकडून शब्दांची गफलत होऊ नये अशी अपेक्षा असते. परंतु ही मंडळी सातत्याने काही चुका करताना दिसून येते. त्यापैकी 'शेतकर्‍यांच्या आत्महत्या', 'खाजगी शाळा', 'चोरटी वाहतूक', आणि 'बाजार मांडणे' हे काही शब्द आहेत. वरवर पाहता यात काही चूक वाटत नाही; पण जरा तपशील तपासला की, इंगित कळते.

एक शेतकरी होता. त्याला तीन अपत्ये. दोन मुली, एक मुलगा. थोरल्या मुलीचे लग्न झाले. हुंडा ठरला पन्नास हजार रुपये. पस्तीस हजार नगदी दिले. पंधरा हजार बाकी होते. सासरच्या लोकांचा तगादा लागला. दोनदा मुलगी घरी आली. दरवेळेला तिने त्या पंधरा हजारांचा विषय काढला. विषय काढणे तिला जड जायचे. जेमतेम चारपाच एकर कोरडवाहू शेती कसणार्‍या बापाची परिस्थिती तिला चांगली माहीत होती. पोरीला सासरी जाच सुरू झाला आहे. त्या जाचाला आपण कारण ठरत आहोत असे वाटून बापाचे काळीज तटतटा तुटायचे. तो पोरीला म्हणाला, ''यंदा कापूस बरा आहे. निघाला की, आधी तुझ्याकडे येऊन पैसे देईन. मगच घरी जाईन. बाई, तू काळजी करू नकोस.'' कापूस निघाला. पण भाव कोसळले. आडत्याने उचल कपात करून घेतली. काही टिकल्या हातावर टेकविल्या. पैसे आले नाही म्हणून पोरीला जाच वाढला. पोरगी सासरच्या जाचाने त्रस्त झाली. एके दिवशी तिने रॉकेलच्या बाटल्या आपल्याच हाताने उचलल्या. आपल्याच हाताने अंगावर ओतून घेतल्या. आपल्याच हाताने काडी पेटविली. स्वत:ला जाळून घेतले. पोरगी मेली. पेपरवाल्यांनी बातमी दिली 'आणखीन एक हुंडाबळी..' इकडे बापाला जेव्हा बातमी कळली तेव्हा बापाचे रक्त गोठून गेले. धाकटी मोठी झाली होती. वयात आली की, लोक बोलू लागले. आता हिला उजवून द्यावे लागेल. धाकटा पोरगा आईच्या अंगावर होता. बायको कायम आजारी. तिच्या उपचारावर खर्च होत होता. शेतीतून काही निघत नव्हते. बाप सुन्न झालेला. एक नाही, शेकडो त्सुनामी त्याच्या डोक्यात घोंगावू लागल्या. तो आपल्या आपण उठला. रानात गेला. रानातल्या लिंबाच्या झाडाच्या एका फांदीला त्याने दोर अडकवला. स्वत:ला टांगून घेतले. बातमी आली 'आणखीन एका शेतकर्‍याची आत्महत्या.'

मुलीच्या मृत्यूचे कारण सासरचा जाच होता म्हणून त्या आत्महत्येला 'हुंडाबळी' म्हटले गेले हे समजू शकते. मात्र बापाच्या मृत्यूचे कारण काय? त्याचेही कारण स्पष्ट आहे. त्याच्या कापसाला चांगला भाव

मिळाला असता तर कदाचित तो मृत्यूच्या कडेलोटावरूनदेखील मागे फिरला असता. कापसाला भाव का मिळाला नाही? कारण सरकारने बाजारात हस्तक्षेप केला. सासर कारण असल्यास आपण जसे 'हुंडाबळी' म्हणतो तसे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सरकार हे कारण असेल तर त्याला 'सरकारबळी' का म्हणू नये? 'सरकारबळी' म्हणताना जीभ चाचरत असेल तर किमान 'कर्जबळी' म्हणायला काय हरकत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे कारण ठाऊक असूनही त्याला ना 'सरकारबळी' म्हटले गेले ना 'कर्जबळी'. ना म्हटले जाईल. कारण सासरला दोष दिल्याने म्हणणार्‍याचे काही बिघडत नाही. सरकारला दोष दिला तर अनेक लाभांपासून वंचित व्हावे लागेल ही भीती असते. वर म्हटलेला लिहिताबोलता वर्ग हा सरकारी कृपेसाठी आसुसलेला असतो. तो हे धाडस कदापि करू शकणार नाही. दुसरेही एक कारण आहे. शेतकर्‍यांकडे पाहण्याचा या वर्गाचा दृष्टिकोन. शेतकरी अनाडी आहे, व्यसनाधीन आहे, मागासलेला आहे, आळशी आहे अशी लाख दूषणे दिली जातात. त्यांना शेतकर्‍याला अपमानित ठेवायचे आहे. तो नालायक आहे असा ठपका ठेवायचा असल्यामुळे तो 'आपल्या आपण मेला' असे ध्वनित करणारा शब्द 'आत्महत्या' योजला गेला असावा.

'चोरटी वाहतूक' हा शब्ददेखील शेतकर्‍यांच्या दु:श्वासातून आलेला. शेतीचे तुकडे झाले. ती परवडत नाही. काहीतरी करावे म्हणून शेतकर्‍यांच्या पोरांनी कर्ज काढून ऑटो, टमटम, सिक्स सीटर, वडाप अशा गाडय़ा घेतल्या. जीवनसंघर्षाच्या शाळेत ड्रायव्हिंग शिकले. ही वाहने लोकांची वाहतूक करू लागले की, लगेच चोरटय़ा वाहतुकीच्या नावाने ओरड सुरू झाली. ही पोरं काही चोर्‍या करीत नाहीत. खंडण्या गोळा करीत नाहीत. दिवसाढवळ्या, राजरोस रोजगार करीत आहेत. या मुलांच्या धडपडीतून एसटीच्या मक्तेदारीला धक्का बसला. अडल्या बाळंतिणी दवाखान्यात येऊ लागल्या. चुमडे-दोन चुमडे धान्य बाजारात आणले जाऊ लागले. पोरं रिक्षात बसून तालुक्याच्या गावात जाऊन शिकू लागली. शेतकर्‍यांची काहीशी सोय झालेली बघवली नाही आणि या बुद्धिजीवी वर्गाने लगेच 'चोरटी वाहतूक' म्हणून या वाहतुकीच्या विरुद्ध आरडाओरड सुरू केली. एसटीचा मक्तेदारीचा कायदा असेल तर तो काळानुसार बदलला पाहिजे. तो बदलला नाही म्हणून का ह्या मुलांची धडपड चोरटी ठरते? खाजगी वाहनांनी एका ठिकाणाहून निघायचे आणि थेट पोचायचे असे कायद्याचे कलम आहे. या कलमामुळे पोलीस अडवणूक करतात. पोलिसांचे हप्ते बांधले जातात.

शेतकरी समाजाला हिणविण्यासाठी, अडविण्यासाठी शब्दांचा कसा चलाखीने वापर केला जातो याकडे कोणी लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे.

(लेखक हे नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत. 'कलमा' व 'आवतन' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

भ्रमणध्वनी : 9422931986

No comments:

Post a Comment