Saturday 16 June 2012

प्रश्नांची उत्तरे शोधताना..

प्रश्नांची उत्तरे शोधताना..
सध्या आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रांत एवढा प्रचंड कोलाहल आहे की, आपण आपल्याशी बोलले तेवढेसुद्धा आपणाला ऐकायला येत नाही. त्यामुळे काही लिहावं असं धाडसही करवत नाही. पण लिहिणं थांबवलं तर मनाचा कोंडमारा थांबवायचा कसा? इतके दिवस एक बरं होतं मी अनेक सभा-संमेलनांतून बोलत होतो आणि लोक ऐकत होते. लोक आपलं ऐकताहेत या समजुतीमुळे मनाला समाधान मिळत होते. पण कसला आजार झालायकुणास ठाऊक. सध्या माझी बोलतीच बंद झालीय.

इतरांची बोलती बंद व्हावी म्हणून भाषणं देत सुटलो होतो. आता नियतीनेच माझी बोलती बंद केलीय. अशा गलबललेल्या अवस्थेत 'पुण्य नगरीत' लिहिण्यासाठी हाक दिली. मनाला तेवढंच बर वाटलं. ज्याच्यासाठी लिहायचं तो वाचक आपल्या खांद्यावर कुठल्याही धर्मपंथाचा अथवा राजकीय गटातटाचा झेंडा घेऊन उभा नाही की, त्यानं आपल्या डोक्यावर कुठल्याही एका विचारसरणीची झापडं बांधली नाहीत. अशा वाचकांसाठी लिहायचं. असा वाचक मलाही आवडतो. हा वाचक म्हणजे मागच्या रांगेत बसून नाटक पाहणार्‍या प्रेक्षकांसारखा असतो. आवडलं नाटक तर टाळ्य़ा वाजवणारा. आवडलं नाहीतर काय भिक्कार नाटक आहे म्हणून मोकळी प्रतिक्रिया देणारा. म्हणून मी लगेच निर्णय घेतला. लिहायचं. खरंतर मी भरपूर म्हणावं असं कधी लेखन केलंच नाही. मोजकं लिहिलं. पण आतून रेटा असल्याशिवाय लिहिलं नाही. लिहिण्याचा हा रेटाच मनाला ताजं ठेवतो. विचाराला चालना देतो. त्यातूनच एक समाधान मिळतं. लिहावं वाटून न लिहिलेलं असं खूप आहे. ह्या निमित्तानं ते लिहावं असं मी ठरवलं. आता पुढचा प्रश्न होता. पुन्हापुन्हा वाचकांना भेटायचं तर लिहिण्यातही कोणतं तरी सूत्र हवं आणि सूत्रही सापडलं. कळायला लागल्यापासून मी सहा दशकं जगत आलो. किनारा घडवणं आपल्या हाती नव्हतं. आपलं जगणं हे वाहत्या पाण्यासारखं होतं. वाहता वाहता भुसभुशीत जमिनीनं खोल होता येईल अशी जागा दिली. काठाला ढुशा मारताना काही ठिकाणी काठ मागे सरकले. पात्र थोडे रुंद झालं. मुळात असतो ओढा; पण तो रुंद झाला. खोली वाढली की, लोक त्याला नदी म्हणतात. पण नदीचं स्वत:चं असं काय असतं? वाहत पाणी. तुमचं-आमचं जगणंसुद्धा असंच कालौघात वाहता वाहता रुंद होणार्‍या नदी पात्रासारखं. पात्रात आलेले टणक खडक मात्र पोटात तसेच राहून जातात. उन्हाळ्य़ात पात्र कोरडे पडलं की, हे टणक खडक वर येतात. न सुटलेले अनेक प्रश्नही आपल्या आयुष्यात असेच दबा धरून बसलेले असतात. कधी वर येतात आणि पाण्याचा वाहता ओघ आला की त्यात बुडून जातात. आपल्याही आयुष्यात असेच अनेक प्रश्नांचे खडक आणि दगडगोटे असतात. काही प्रश्न असे की, इतरांना आपण तर सोडाच, पण आपण आपणालाही विचारायची हिंमत आपण करीत नाही. तर काही प्रश्न असे की, त्यांच्या उत्तरांच्या शोधात अनेक शक्यता नजरेच्या टप्प्यात येतात. तर काही प्रश्न असे की, त्यांची उत्तरे सापडूनही आपण त्या उत्तरांकडे डोळेझाक करतो म्हणून पुन्हापुन्हा ते प्रश्न मनात येत राहतात.

मुरळीच्या जन्माची एक लोककथा आहे. ती पुढेमागे मी विस्ताराने सांगेन. स्वर्गातल्या दरबारात शंभू महादेवासमोर नाचता नाचता अप्सरेला शंभू महादेवाचं आकर्षण वाटलं. शंभू कोपला. त्यानं मुरळीला शाप दिला, जा तू कृष्णाची मुरळी होशील! आता या अप्सरेनं, देवा, तू मला आवडलास एवढंही म्हटले नाहीतरी देवानं तिला शाप दिला. काय अपराध केला होता तिनं? दोन हजार वर्षे ही लोककथा जपली जातेय. पण त्या अप्सरेचा अपराध कोणता, असा प्रश्नही आपण विचारायची हिंमत कधी नाही करीत आणि कृष्णाची मुरळी होणं त्याला शाप का म्हणायचं? कृष्ण तर देव आहे ना? पण असे प्रश्न मनात आले तरी विचारायचे नसतात. तर हे असे अनेक प्रश्न. मी एक नमुना सांगितला. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता आपण विकसित झालो. समृद्ध झालो. विज्ञानाच्या प्रदेशातले सगळे प्रश्न असे दुसर्‍या गटातही असतात.

पाय पोळतात पण सूर्याला झाकता नाही येत. मग काय करायचे? पायाला झाकायचे जोडे तयार करून घ्यायचे. अशी उत्तरे आपल्या जगण्यातल्या अडचणी दूर करतात. तिसर्‍या गटातले प्रश्न फारच मजेशीर असतात. सगळ्य़ाच माणसांच्या शरीरात वाहणार्‍या रक्ताचा रंग लालच असला म्हणून काय झाले. आपण आपल्या जातीचा अभिमान प्रकट करीत इतरांचा द्वेष करतो. हे वास्तव आपल्यासमोर पुन्हापुन्हा उभे राहते. जातीबाहेरच्या मुलावर प्रेम करणार्‍या मुलीला जन्मदाता बाप तिला ठार करण्याइतका क्रूर होतो. हे आत्ताही घडतंच. का? जात हा एक भ्रम आहे. हे कळल्यावरही माणसं असे वागतात. पण का? तर असे हे प्रश्न कळतं पण वळत नाही म्हणून आपण जशाला तसे शिल्लक राहणारे प्रश्न. मनाशी विचार केला. हे असेच प्रश्न घेऊन वाचकांपर्यंत जावं. आपलं मन हलकं करावं आणि त्यांच्या सहभागानं आपणाला या प्रश्नांच्या गुंत्यातून बाहेर पडता आलं तर इतरांनाही ती वाट दाखवावी. असं एक प्रश्नायण घेऊन वाचकांना भेटावं असं मी ठरवलं आहे. माझे प्रश्न जीवन जगताना त्यातून उगवलेले प्रश्न असतील. उगाच खूप मोठं तात्त्विक प्रश्न विचारून मला वाचकांना पीडा द्यायची नाहीय.

खरेतर प्रश्नच पडत नाहीत असा मनुष्य विरळा. ज्याला आपण 'ढ' समजतो त्यालाही अनेक प्रश्न पडत असतातच. तो ते नेमकेपणानं मांडत नसतो इतकेच. गाडगेबाबांच्या मागे इतके सामान्य लोक का उभे राहिले? ते त्या माणसांच्या मनातलेच प्रश्न आपल्या शब्दांत मांडत होते. लोकांना अचंबा वाटायचा. हा तर प्रश्न आपल्याही मनात आला होता; पण विचारला नाही. बाबांच्या प्रश्नांमुळं विचाराला चालना मिळायची. लोक सुजाण व्हायचे. मनात प्रश्न उगवणार्‍या त्या 'ढ' माणसासारख नक्कीच आहोत आणि हो, आपण गाडगेबाबांएवढे महान नाहीत. आपण सुजाण व्हावे ही आपली किमान अपेक्षा आपण कशी लपवू शकतो. तेव्हा रामायणाचं पारायण श्रद्धाळू लोकांना मोक्ष देत असेल तर प्रश्नायणाचं हे रामायण तुमच्या माझ्या सारख्या सामान्य वाचकाला सुजाणतेच्या वाटेवर तर नेऊ शकेल. मी प्रश्न उपस्थित करावा, त्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि त्यातून मीच सुजाणतेकडे वाटचाल करावी एवढाच माझ्या या लेखनाचा हेतू आहे. भेटू या पुढे माझ्या या प्रश्नायणाचं बाड घेऊन.

(लेखक हे आंबेडकरी विचारवंत आणि

अ.भा.नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230083

No comments:

Post a Comment