Saturday 16 June 2012

जगण्याला आकार देणारं सांस्कृतिक संचित

जगण्याला आकार देणारं सांस्कृतिक संचित
माणसाच्या दृश्य अवयवांइतकेच त्याच्या ठायी असलेले अदृश्य अवयवसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचे मन, त्याची स्मरणशक्ती हेसुद्धा अवयवंच आहेत असं गृहीत धरून आपण बोलत असतो. 'त्याच्या 'मनात' विचार आला. त्याला 'आठवले,' अशी विधाने करीत असताना साक्षीला अव्यक्त रूपात हे अवयव असतात. जुन्या काळात घडलेल्या घटना जशाच्या तशा आठवणे म्हणजे स्मरण. स्मरण मोठे गूढ, अनाकलनीय असते. म्हणजे पूर्वी घडून गेलेली घटना, स्थळ, काळ, व्यक्ती, शब्द या माध्यमातून आपल्या स्मरणकेंद्रात सगुण साकार होते. जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणून जाणिवेच्या पातळीवर माणसाला दु:ख, आनंद देते. हीच एक अद्भुत गोष्ट घडत असते. म्हणून 'स्मरण' या शब्दाला लागून शक्ती हा शब्द येत असावा. त्यातून 'स्मरणशक्ती' हा शब्द तयार होत असावा. खरंच जाणिवे-नेणिवेच्या पातळीवर हिंदकळणारी 'स्मरणशक्ती' ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक असते.

ही स्मरणशक्ती जशी माणसाला असते. तशीच प्राणी, पशुपक्षी या सर्वानाच असते. म्हणून तर दिवसभर चारीमेरा उडणारी, दाणे जमा करणारी पाखरे संध्याकाळी बरोबर आपल्या घरटय़ाच्या झाडाशी जमा होऊन रात्रभर विसावा घेतात. म्हणून तर गायरानात चरायला सोडलेली गुरेढोरे संध्याकाळी बरोबर गावात येऊन आपल्या धन्याच्या गोठय़ात उभी राहतात. माणसाइतक्याच प्राण्यांच्या आठवणीसुद्धा तीव्र, टोकदार असतात. एखाद्या कुर्त्याच्या पेकाटात लाथ घालणार्‍या माणसाला आठव्या दिवशीही ते कुत्रे बरोबर ओळखते की, त्या दिवशी आपल्या पेकाटात लाथ घालणारा हाच तो महाभाग आहे आणि त्यानुसार मग ते त्या व्यक्तीला प्रतिक्रिया देते. एक तर त्याच्यावर गुरकावते किंवा त्याच्यापासून दूर पळते.

कृषी संस्कृतीत शेतकर्‍याचा संबंध त्याच्या जीव जित्राबाशी येत असतो. गोठय़ातील बैल, गाय, म्हैस, बकरी, दारातला कुत्रा, घरातली मांजर अशा माणसाळलेल्या प्राण्यांशी शेतकर्‍याच्या घरातले सगळे सभासद भावनिक अंगाने बांधलेले असतात. त्यांच्या प्रेमाच्या, रागाच्या आठवणीवरच हे जित्राब घरातल्या सभासदांना तशी प्रतिक्रिया देतात. एकतर जीव लावतात किंवा घाबरून दूर पळतात.

जशा व्यक्तीच्या संदर्भातील स्मरणखुणा त्यांच्या त्या-त्या वेळच्या आचरण धर्मातून आपण स्मरणाच्या पातळीवर नोंदवून ठेवत असतो. त्याला स्थळसंदर्भसुद्धा अपवाद नसतात. आपण ज्या गावी जन्माला आलो जेथे आपले संस्कारक्षम बालपण गेले त्या परिसरातील झाडे, डोंगर, नद्या, मंदिरे, तळे-सरोवरे, रस्ते या सर्व बाबी जन्मभर मग आपल्याला सोबत देत असतात. महत्त्वाचे म्हणजे जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले हे स्मरणशक्तीचे खाते अधिक समृद्ध, अधिक आशयधन होत जाते.

आज मी कुठेही असलो तरी माझ्या अमडापूर गावाच्या भोवतीचे सर्व स्थळसंदर्भ माझ्यासोबत असतात. शाळेत असताना सुट्टीच्या दिवशी, उन्हाळ्य़ाच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत आम्ही घरात थांबायचोच नाही. गावाच्या भोवताली दूरवर शिवारात, डोंगरदर्‍यात भटकून तिकडच्या अद्भुत गोष्टी पाहणे, घरी आणणे हा छंदच लागला होता. नंतर वयाने जरा टणक झाल्यावर घरची गुरेढोरे शेताच्या शिवारात दूरवर चारायला न्यावी लागायची. त्यामुळे गुरेढोरे चारण्याचे घरचे कामही व्हायचे आणि नव्या-नव्या मुलखाशी तिथल्या झाडापेडाशी, स्थळांशी परिचयसुद्धा व्हायचा. गावातल्या बायकामाणसांना जसे त्यांच्या स्वभावधर्मानुसार स्वत:चे वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्व प्राप्त झालेले असते. तसेच गावाच्या चोहोबाजूच्या शिवारातील विविध घटकांनाही आपले व्यक्तिमत्त्व आणि ओळख प्राप्त झालेली असते.

गावच्या पश्चिमेकडून म्हणजे वरतलच्या अंगाने मन नदी वाहत येते. ती बरोबर गैबन सावलीजवळ उत्तरेला वळसा घेते. आधी पूर्वाभिमुख वाहत येणारी नदी इथे उत्तराभिमुख होऊन पुढे झरीवरून वाहत जाते. या नदीच्या काठाकाठाने वरतलच्या अंगाने गेलं की, पुढे टाकरखेड हेलगा हे गाव आणि त्या गावाचा डोंगर लागतो. आणखी पुढे डोंगरशेवली नावाचे महादेवाचे पुरातन मंदिर असणारे एक डोंगरी स्थळ लागते. तिथले डोंगरदर्‍या आणि एका दरीच्या काठावर असलेले महादेवाचे हेमाडपंती मंदिर. मंदिराच्या भोवताली डोंगरदर्‍यावर घनगर्दी झाडी. समोरच्या बाजूने वडाची विस्तीर्ण झाडे. त्यांच्या खाली लोंबलेल्या शेकडो पारंब्या. विशिष्ट महिन्यात लदबदून आलेली, पिकलेली लालबुंद फळे, पारंब्याला लटकून झोके घेत असताना आश्चर्यून पाहणारी माकडे या सर्व गोष्टी संस्मरणीय पातळीवर हिंदोळत राहतात.

नदीकाठाने गावापासून थोडं पुढं गेलं की, काठावरच नाव माहीत नसलेलं, एक 'देवाचे झाड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या झाडाखाली कुणीतरी दगडी चिर्‍यांचा ओटा बांधलेला आहे. त्या ओटय़ातच सहा लहानमोठे शेंदूर माखलेले दगड सिमेंटमध्ये गच्च रोवून ठेवलेले आहेत. इथे विशेषत: पौर्णिमेच्या दिवशी आसपासच्या परिसरातील बायकामाणसे दर्शनासाठी जातात. या ठिकाणाला 'पाच पांडव' या नावाने ओळखले जाते. जे पाच लहानमोठे उभे शिळेसारखे दगड आहेत. ते पाचही पांडव आणि सहावी द्रौपदी, लहानपणी श्रवणातली पोथी, आयाबायांनी सांगितलेल्या कथा यांतून टप्प्याटप्प्याने सगळे रामायण-महाभारत आस्वादाच्या पातळीवर आकलन झालेले होते. त्यातच आपले गाव म्हणजे विराट राजाची नगरी होती आणि अज्ञातवासात असताना पाच पांडव आणि द्रौपदी याच ठिकाणी राहत होते. अशी पुष्टी गावातल्या कुण्यातरी महान कल्पकदाराने जोडल्यामुळे आपण ज्या भागात राहतो तेथेच महाभारतातले साक्षात पांडव राहायचे ही बाब म्हणजे खूपच अभिमानास्पद वाटायची. स्थळसंदर्भाचा आणि काळसंदर्भाचा सगळा गोंधळघाला असायचा. तरी गोंधळघाल्याचा तो गुंताही आस्वाद पातळीवर एका बाजूने खूपच मनोहारी वाटत राहायचा.

गावाच्या उत्तरेला नदीच्या थोडय़ा वरच्या बाजूने लाल मातीचे टेकाडं आहेत. ही चोपणाची चिक्कण माती घराच्या धाबल्यावर पावसाळ्य़ात गाडी, दोन गाडी अशी आणून टाकावी लागायची. त्यामुळे धाबे गळायचे नाही. जेव्हा पावसाळ्य़ात पन्हाळातून खाली पाण्याच्या लाल धारा पडत राहायच्या. त्या पाहताना मजा वाटायची. गावाच्या या बाजूने हे लाल टेकाडं का झालेत, असा प्रश्न बुद्रुक माणसाला विचारला की, कल्पकता स्वैर सुटलेला तो माहीतगार सांगायचा, इथे कौरव-पांडवाचं युद्ध झालं. हजारो माणसे मारली गेली. रक्तामांसाचा चिखल झाला. त्यामुळे हे टेकडे तयार झाली. पुढे त्या रक्तामांसाची माती झाली. विशेष म्हणजे त्या वेळी ह्या सगळ्य़ा कथा खर्‍या वाटायच्या. त्याचं आज नवल वाटतं. पण तरीही त्या काळात या भाकडकथांनी आपल्याला किती सुखावलं होतं. त्या आठवणीही आज सुखद वाटतात.

गावाच्या पूर्वेला याच नदीच्या काठावर सीतादेवीचं ठाणं आहे. वनवासात असताना सीतेने इथे आंघोळ केली होती. त्यामुळेच इथे 'झरी' नावाचं मोठं तळं नदीत निर्माण झालं असं सांगितलं जायचं. गावाच्या दक्षिणेला बल्लाळदेवीचं मंदिर एका उंच टेकडावर, त्या देवीच्या महिषासुर राक्षस मारल्याच्या तशाच रोमहर्षक कथा. म्हणून तिचं नाव महिषासुरमर्दिनी. मंदिराच्या समोर जी अनेक दगडी शिल्प. त्यातच एक पाचफण्या नागाचं कोरीव शिल्प आणि हा पाचफण्यांचा नाग अजून मंदिरामागच्या खोर्‍यात फिरत असतो ही सांगितली जाणारी कथा म्हणजे अद्भुतरसाचा शिगवर नमुना.

आपल्या धर्मग्रंथातील देवदेवतांचे अस्तित्व आपल्या गावाच्या चारी बाजूंनी आहे. हे सांगण्यासाठी पूर्वजांनी प्रत्येक गावाच्या भोवती जे एक गोष्टी वेल्हाळ अशा घडामोडीचं वलय तयार केलेलं असतं ते खरं म्हणजे आपल्या जगण्याला आकार देणारं आपलं सांस्कृतिक संचितच असत नाही तर काय?

(सदानंद देशमुख साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'बारोमास', 'तहान' या गाजलेल्या कादंबर्‍यांचे लेखक आहेत.)

No comments:

Post a Comment