Saturday 16 June 2012

जीवनाचा खरंच काही हेतू आहे?

जीवनाचा खरंच काही हेतू आहे?
आपण कोण आहोत? आपल्याला दिसणार्‍या, जाणवणार्‍या सृष्टीपलीकडे आणखी काही अस्तित्वात आहे का? सृष्टीच्या निर्मितीला काही प्रयोजन आहे का? या जन्मापूर्वी आपण अस्तित्वात होतो का? मृत्यूनंतर आपण पूर्णपणे संपणार की काही आपला अंश शिल्लक राहणार? सृष्टीचा कोणी निर्माता आहे की ती नुसतीच प्रयोजनशून्य अनादि-अनंत अपघातांच्या व योगायोगांच्या मालिकेतून साकारत चाललेली स्वयंभू जड ऊर्जा आहे? आपले शरीर, अंत:करण, बुद्धी, ज्ञानेंद्रिये, संवेदना, इच्छा, भय, विकार, वासना, विचार या सर्वाचा समुच्चय म्हणजे आपण आहोत, की या समुच्चयापेक्षाही वेगळे असे आपले 'स्वत्व' आहे? आपला व सृष्टीचा निर्माता जर कोणी खरंच असला, तर तो कुठे असतो? कसा दिसतो? काय करतो? त्या निर्मात्याचा निर्माता कोण? आणि निर्मितीचा उद्देश काय? या निर्मितीवर निर्मात्याचे नियंत्रण आहे, की ती केवळ भौतिक नियमांनी बांधलेली स्वयंचलित यंत्रणा आहे? जीवनाचा हेतू काय? खरंच जीवनाला काही हेतू आहे, की ही सर्व एक निर्हेतुक, उद्देश्यविहीन, प्रयोजनशून्य गतिमानता आहे?

सर्व मानवांना नव्हे, परंतु भिन्न-भिन्न संस्कृतींमधील परस्परांना सर्वस्वी अनोळखी असलेल्या व वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या असंख्य मानवांना वरील प्रकारच्या प्रश्नांनी सतत भेडसावलेले आहे.

सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याचा प्राचीन काळापासून मानवाने जो प्रयत्न चालविला, त्यातून एक गोष्ट तर निर्विवाद सिद्ध झाली आहे की, पदार्थाच्या व ऊर्जेच्या अंतरंगापर्यंत पोहोचून, जड सृष्टीतील अनेकानेक नियम जाणून घेऊन व त्या नियमांचाच वापर करीत मानवाने आपल्या भोवतालच्या सृष्टीवर बरेचसे नियंत्रण प्राप्त केले आहे. म्हणजे आज आपल्याला जे काही नैसर्गिक पदार्थ दिसतात व वीज, उजेड, चुंबक यासारख्या विविध ऊर्जा जाणवतात, त्या सर्वाची निर्मिती हेतुपूर्वक झाली असो वा योगायोगाने अनेक अपघातांच्या मालिकेतून झालेली असो, ते सर्व पदार्थ व ऊर्जेची ती विविध रूपे काही कठोर नियमांनी बांधलेली आहेत. ते नियम समजून घेतल्यास त्या पदार्थाना वा बहुरूपी ऊर्जेला काही प्रमाणात मानव आपल्या नियंत्रणात आणू शकतो.अगदी मुळाशी जाऊन पाहिले तर पदार्थ आणि ऊर्जा या दोन वेगळ्या वस्तू नसून मूलत: एकच वस्तू आहे, असेही आता विज्ञानाने शोधले आहे. प्रकाशाचे उष्णतेत, विजेत, ध्वनीत वगैरे रूपांतर तर होतेच. विद्युत-चुंबकीय बल, परमाणूमध्ये इलेक्ट्रॉन्सना धरून ठेवणारे क्षीण बल, अणुगर्भातील प्रोटॉन, न्यूट्रॉन इ. मूलकणांना धरून ठेवणारे भारी बल व गुरुत्वाकर्षण अशी चार प्रकारची ऊर्जेची रूपे वैज्ञानिकांना सध्या तरी दिसतात. या चार बलांचे एकमेकांत रूपांतर होत असते काय व होत असल्यास ती एकमेव मूळ ऊर्जा कोणती, हे बहुधा लवकरच कळेल. पदार्थाच्याही अंतरंगात शोध घेतल्यावर परमाणूच्या पोटातील मूलकणांची यादी झाली असून त्या मूलकणांची वर्तणूक कधी पदार्थासारखी तर कधी ऊर्जेसारखी असल्याचे आढळून आले आहे. एक मजेशीर बाब म्हणजे परमाणूच्या अंतरंगातील व सृष्टीतील दूरवरच्या अंतराळातील पदार्थाच्या हालचाली बहुधा कठोर नियमांनी बांधलेल्या नसून त्यात काही अनिश्चितता व गोंधळही जाणवतो (आपल्याला परिचित असलेल्या ढोबळ पदार्थाच्या तुलनेत), असेही वैज्ञानिकांना वाटते.

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाने कमालीची झेप घेतली असून सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य शोधून काढण्यासाठी आता वैज्ञानिक प्रचंड महागडे प्रयोग करत आहेत. एकीकडे परमाणूच्या अंतरंगात तर दुसरीकडे अथांग अंतराळात चाललेल्या संशोधनाने दूरसंचार क्षेत्रामध्ये घडवून आणलेल्या अभूतपूर्व क्रांतीचा लाभ सामान्य माणसाच्या पदरात मागील दोन-तीन दशकांपासून पडू लागलाय. याचे ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, अतिप्रगत रंगीत टी.व्ही. संच, संगणक, इंटरनेट या गोष्टी आता सामान्यांच्या आवाक्यात आल्या. त्यांची कल्पनादेखील 40-50 वर्षापूर्वी करणे अशक्य होते.

अचेतन सृष्टीसोबतच सचेतन सृष्टीचा म्हणजेच जीवनाचाही शोध मानव विविध पद्धतींनी घेत राहतो. अचेतन पदार्थ व सचेतन जीव यांच्या सीमारेषेवर नक्की काय घडले हे जाणून घेण्याची विज्ञानाची उत्कंठा कायम आहे. जीवनाला धारण करण्याची क्षमता असणारी एक किमान संरचना पदार्थात निर्माण झाल्यावरच त्यातून जीवन प्रस्फुटित झाले हे निश्चित! पण मग जीवनाची संभावना निर्जीवामध्ये प्रारंभापासून होती, फक्त योग्य ती रचना साकारण्यात वेळ गेला असे मानावे लागेल. नाही तर पदार्थाची धारणक्षमता तयार झाल्यानंतर त्यात प्राण एका वेगळ्या पातळीवरून अवतरला व नंतर विविध रचना व आकारांच्या माध्यमातून विकसित होत गेला, असे तरी मानावे लागेल.

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीक्रमात काही जीवांमध्येच मन व बुद्धीचा विकास होत गेला व त्या विकासाने सध्या गाठलेले शिखर म्हणजे मनुष्यप्राणी होय, असे दिसून येते; परंतु मानवाची निर्मिती हा पृथ्वीवरील उत्क्रांतीचा अंतिम टप्पा आहे काय? की आज आम्हाला अज्ञात असलेल्या चेतनेच्या उच्चतर पातळ्यांना धारण करू शकणारा अथवा स्वत:तून प्रगट करू शकणारा नवा 'प्राणी' उत्क्रांतीक्रमात जन्माला येईल, जो मानवापेक्षा अधिक विकसित जीव सिद्ध होईल? विज्ञानाच्या दृष्टीतून पाहिले असता अतिसूक्ष्म जीवाणूंपासून मानवापर्यंत जीवनाची उत्क्रांती टप्प्याटप्प्याने होत गेल्याचे समजते. आता तर जैवपूर्व (प्रि-बायोटिक) म्हणजे सजीव पेशी प्रथम निर्माण होण्यापूर्वी निर्जीव पदार्थात जी उत्क्रांतीची प्रक्रिया घडली असेल तिचाही अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्राच्या आधारे होत आहे. त्या अभ्यासात बरीच प्रगतीही झाल्याचे समजते.; परंतु प्रत्यक्षात निर्जीव पदार्थातून प्राण नेमका कसा प्रगटला व प्राणी जीवनात आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) मनुष्य पातळीवर कसे प्रगटले, या टप्प्याबाबत विज्ञान अजूनही चाचपडत असून केवळ अंदाज व्यक्त होतोय. असो. मात्र प्राण आणि बुद्धी व अंत:करण यांना देहाशिवाय वेगळे अस्तित्व नाही असे मानले व देहाच्या उत्क्रांतीतूनच ते प्रगटले असे गृहीत धरले तर आणखी एक बाब गृहीत धरणे भाग पडते. ती म्हणजे प्राण, जीवन, अंत:करण, बुद्धी, कल्पनाशक्ती, विचारक्षमता, वासना, भावभावना, प्रतिभा या सर्व बाबी निर्जीवांच्या ठायीदेखील बीजरूपाने असणारच! कारण बीजरूपाने मुळात अस्तित्वात असलेली संभावनाच उत्क्रांतीक्रमात प्रगटू शकते.

(लेखक नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

No comments:

Post a Comment