Saturday 16 June 2012

मुठीत मावते तेच खरं सुख

मुठीत मावते तेच खरं सुख
आपल्या सदराचं जे शीर्षक हाय 'अगास पायना' आज त्याच्या आठोनीनं आपन सुरवात करू. माहा जलमगाव यवतमाय जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातलं बोरी अरब गाव. तसं आजूबाजूच्या गावापरीस उजवं आन् हायवेले लागून म्हून इथं दर मंगयवारी बाजार भरे. त्या दिसी आजूबाजूच्या खेडय़ातले लोक येत. पार जवयच्या सावलीपासून तं दुरच्या शेंद्री-डोलरी पावतरचे. त्याच्यात सालभर्‍यातून एक डाव अगास पायना ये. अगास पायन्याचा खरा धंदा होये. जतरीत पण दोन जतरीतल्या मंधात जे रिकामपन राहे तवा गनीमामू असे बाजार करे.

साठ साल झाले याले पन तवापासून मनात वस्तीले आलेला हा अगास पायना इथून हालाले तयार नाही. गनीमामूपासी एक खासर ज्याले तुमी बैलबंडी म्हणता ते राहे. त्याच्यातून सारी वरसार जिथं जाये तिथं घेऊन जाये. खासरात अगास पायन्याचं खुलं करून टाकलेलं सामान वरतं झुले. त्याच्या एकात सैपाकाचे उलीसेक भांडे आन् एकात मामी दोन लेकराले घेऊन खासराले मांग चार पेंडय़ा कडब्याच्या बयलासाठी. गनीमामू संग एक त्याचा साया राहे.

बजारात खासर आलं का दरसालची त्यायची जे जागा राहे तिथं उभं करून एका कोन्यात आडोसा करून मामीच्या संयपाकाची सोय. मामी येतांनी संग काडय़ाकुडय़ा आनल्या राहे ते इंधन. पह्यले एक भरून घेतलं का जवयच्या हिरीवर जाये. तिथं पानी सेंदत असलेल्या बाईले 'हम मुसाफीर है जी थोडा पानी देना भाभीजी' म्हनत पान्याची सोय करून घे. पानी आनून हे सयपाकाले लागे तवरीत त्यायनं अगास पायना जमिनीवर आनला राहे. मंग मोजमाप घेऊन दोघं जन दर खननं सुरू करते. मामूपासी एका मोठय़ा संदुकात हातोडा, वासला, किकरा, पटास, बैठपनट्टी, तारं, खिले तं एका पोतोडय़ात सब्बल, कुश्या आन् घन राहे.

दर खोदून झाले का ज्या पाटय़ावानी बलयावर अगास पायना उभा कराचा राहे त्या पाटय़ातली एकेक पाटी त्या खडय़ात उभी करून एक जन धरून ठोये आन् एक जन दरातून निघालेली माती आन् जमा करून आनलेले लहान, लहान गोटे खडय़ात टाकत सिंनारनं चालू करे. थ्या पाटय़ा कप्प्या झाल्याची मामू दोन दोन खेपा खातरी करून घे. एक डाव पायवा पक्का झाला का मंग भिती टाकता येते तसं त्या पाटय़ायचं होत. मंग त्यायच्या मंधातल्या भोकात आकीत खासराचं चाक घालाव तसं झुल्यायच्या चौकटाबराबर फसवून मंग चारही पायने अडकवल्या जाये. मामू आन् त्याचा साया पारखून पाहासाठी चार, पाच खेपा फिरवून पाह्यलं का मंग गनीमामू त्या उभ्या पाटय़ायले डोस्क टेकवून काई तरी ताेंडानं पुटपुटे. अगास पायना लिंबाच्या झाडाच्या सावलीत राहे. आमी दहा, पंदरा पोट्टे आन् पाच-सहा पोरी खेयता खेयता हे पाहत राहो.

जवयपास अरध्या परीस थोडा जादा दिवस या कामाले लागून जाये. तितल्यात आढोस्यातून आवाज ये, 'खाना खा लो शम्मीके अब्बा' आया आया म्हणत दोघही जाऊन बसत. ताटलीवानी जरमलच्या ताटात भाकरी संग पतल्या रस्याचं कोडय़ास पसरून नोय म्हूण मामू बाजूच्या गोटय़ाचं वडगनं लावे. पोटात चार घास टाकले का मामू अगास पायन्यापासी ये. बाजूले खेयनार्‍या पोरीले आवाज दे, 'आवो मेरी अम्मावो मेरी बोहनी तुमारे बैठने से होंगी आवो.' मले थो पायना आवडे म्हणू मी घडी घडी जावो. त्याच्याच्यान माही आन् मामूची ओयख होत गेली. त्याचा बोहनी कराचा असा परकार तुमी कुठी पाह्यला असनं असं मले नाई वाटत. मंगयवारी तं बजार असल्याच्यान मामूले तं दिवसभर फुरसत ना राहे. दिसभर पायना फिरवून हात, खांदे, फासया आन पायाच्या पोटर्‍या काय म्हणत असनं हेत्यायचं त्यायले ठाऊक. मी पाचेक वाजता पायन्याक डे गेलो का मामू माह्या कानात येऊन सांगे, 'देवूजी आज श्याम को इधर नही आने का.' मले मालूम होतं का आज शिनारलेल्या अंगासाठी मामू चार घोट घेते दवाई घ्याव तसी. आन् हो मामू मले देवूजी काऊन म्हन्ते हे म्या त्याले कवा इचारलं नाही आन् त्यानयी कवा सांगतलं नाई. तो आल्या खेपी एक डाव मायले मांगून कानतुटय़ा कपात आंब्याचं मायच्या हातचं रायतं नेऊन देवो तवा तो भाई खूस होये. नासुकलं रायतं पन त्याची खुसी त्याच्या तोंडावर ना मावे. ॉआता जतरायचीच उलंगवाडी होत चाल्ली तं असे अगास पायने कुठी टिकनार? सालभर ज्या जतरीची आम्ही वाट पाहो थे जतराचं तं आता कुपोषित झाली. जतरा झुरनी पडली आन् शयरातले मिना बजारानं आंग पकडलं. जतरा झाली डंगरी आन् मिना बजारानं बांधले घुंगरू. थितचे अगास पायने किती उच्ची खरचं अभायाले टेकल्यावानी. असं वाटे वरच्या पायन्यातून हात उच्ची केला तं चान्याचं येतील हाती. या उच्ची पायन्यात सुख नाई हाव सुट्टे. एक डाव हाव सुटली का सुख पार्‍यावानी निसटते. या अगास पायन्यातलं सुख मुठीत मावे. मुठीत मावते तेच खरं सुख. आजीच्या चंचीतल्या गोडंबी सारकं.

(लेखक हे प्रसिद्ध वर्‍हाडी कवी आहेत)

No comments:

Post a Comment