Saturday 16 June 2012

दिल्लीत देश सारा लिलाव होत आहे..!
सध्या आपल्या देशाचं चक्क 'मच्छीमार्केट' झाल्यासारखं वाटतंय्! एकशेपंचवीस कोटींचा हा देश! पण राष्ट्रीय उंची असलेले नेते दिसत नाहीत! टी.व्ही.वरती चाललेल्या विविध विषयांवरच्या चर्चा पाहिल्या की डोकं तडकायला लागतं!

परवाच रामदेवबाबा आणि अण्णा हजारे यांचे 'आघाडी-आंदोलन' दिल्लीमध्ये 'आयोजित' करण्यात आले होते. एकाच वेळी एकाच स्टेजवरून केजरीवालची कव्वाली, रामदेवबाबांचा भांगडा आणि अण्णा हजारे यांचं भारुड असा तुफान संगम झाला होता. विचार करणारी जनता गोंधळात पडली असतानाच राजकीय पक्षांना मात्र हायसं वाटलं असेल. बजरंगबलीचं रूपांतर बंदरामध्ये व्हायला लागलं की आपली लंका आता सुरक्षित राहणार, याचा आनंद रावणाच्या फॅमिलीला व्हायलाच हवा ना?

टी.व्ही.वरील याच विषयावरील चर्चेत घोळताना काँग्रेसच्या नेत्या गिरिजा व्यास यांचा अवतार पाहिला आणि अक्षरश: संताप आला. त्या कुणाला बोलूच देईनात. त्यांचीच वटवट सारखी सुरू. त्यांचा पक्ष म्हणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढत आहे. जनतेनं म्हणे त्यांना साथ द्यायला हवी. केवढा हा कोडगेपणा? या लोकांना काहीच कसे वाटत नाही? जनाची ना मनाची तरी थोडी असायला नको का? आणि आम्हीही मुकाटय़ानं कसं ऐकून घेतो?

जवळजवळ सारेच राजकीय पक्ष वैचारिक आणि नैतिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभे आहेत. उद्या दाऊद इब्राहिमनं जर स्वत:चा पक्ष काढतो म्हटलं तर थेट दिल्लीपासूनच त्यांच्या पक्षाचं स्वागत करणारे नेते तयारच आहेत. अण्णा हजारेंच्या स्वच्छ चार्त्यिावरच्या प्रेमापोटी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाकडे मोठय़ा आशेनं आकृष्ट झालेल्या भोळ्याभाबडय़ा जनतेला आता त्यांच्या कोलांटउडय़ा पाहून कुणावर विश्वास ठेवावा असाच संभ्रम पडला असेल!

कळेना कशी अन् किती वाटते

मला जीवघेणी स्थिती वाटते

बघा या घरांना तडे चालले हो..

नव्या वादळाची भीती वाटते!

आत्मचिंतन करण्याची कुणाचीही तयारी नाही. जे लुटले जात आहेत त्यांचीही नाही. लुटारूंची तर नाहीच नाही!

या देशाची जनता मूर्ख आहे, असा या नेत्यांचा ठाम विश्वास आहे. आपणही यांच्या पालख्या उचलून तेच सिद्ध करत आलोय! कुशवाह हा उत्तर प्रदेशातला एक भ्रष्ट-बदनाम मंत्री 'त्याला मंत्रिमंडळातून हाकला, जेलमध्ये टाका' अशी मागणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केली जाते. लगेच त्याला मायावती डच्चू देतात. आणि प्रेस कॉन्फरन्स घेणार्‍या पक्षाचा नेताच कुशवाहच्या स्वागतासाठी गालीचे अंथरतो, याला काय म्हणायचं? लोकशाहीचा अपमान, जनतेची टवाळी की नेत्यांचा टपोरीपणा?

'मी नाही त्यातली.. कडी लावा आतली' अशी एक सुंदर म्हण मराठीत आहे. ती जवळ जवळ सर्वच पक्षांना लागू होते. लालकृष्ण अडवाणीसारख्या ज्येष्ठ नेत्यालाही या बाबतीतली आपली नाराजी लपविता आलेली नाही.

प्रत्येकालाच इथं सत्ता हवी आहे. देशाचं काय व्हायचं ते होवो, यांना देणंघेणं नाही. पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, याचं हसणं खरं नाही. रडणं खरं नाही. संसदेतली भांडणं खरी नाहीत. यांचे जाहीरनामे खरे नाहीत! सारेच मावसभाऊ आहेत! काही दिवस तू खा! काही दिवस मी खातो! पण खर्‍या मालकाच्या हातात मात्र काहीही लागायला नको- हेच यांचं धोरण! त्यासाठी तू मला शिव्या दे-मी तुला शिव्या देतो. वेळप्रसंगी फारच झालं तर दोनचार बकरे बळी दिल्याचं नाटक करायचं! लोक शांत झाले की पुन्हा हेच बकरे लांडगे बनून लुटायला तयार!

मी तुझी थोरवी काय सांगू तुला

हासता हासता तू गळा कापला?

काय मानु तुला, ही खुदाई तुझी

बेवफाई तुझी, की सफाई तुझी?

जीव गेल्यावरी हाय कळले मला।

काही झाले तरी, मी तुला मानतो

मी भला मानतो, चांगला मानतो

मानतो यार, मी अन् सखा आपला।

कापला तू गळा, छान झाले कसे

संपला खोकला, वाटते हायसे

काय देऊ पुन्हा, कापण्याला तुला?

2014 ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. सत्ताधारी काँग्रेसच्या इज्जतीचा भाजीपाला झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची अवस्था तर त्याहूनही वाईट आहे. लोकांना पर्याय हवा आहे. तिसरा पर्याय उभा राहायला हवा अशी सर्वाची इच्छा आहे. वातावरणही पोषक आहे. काँग्रेसचं शोरूम चोरांनी खाऊन टाकलं. भाजपाचं दुकान फुटपाथवर आलं.

फुटपाथवर धंदा करून 'फाईव्ह स्टार'चे रेट मिळत नसतात, हे या नेत्यांना कुणी सांगावं? लालकृष्ण अडवानींनी त्याची सुरुवात तर केलेली आहे. पण त्यांची तलवार किती दिवस म्यानाच्या बाहेर राहते, ते लवकरच कळेल.

झुंडी लुटारूच्या हय़ा केव्हा कुठून गेल्या

चौकातल्या दिव्यांच्या काचा फुटून गेल्या

दिल्लीत देश सारा लिलाव होत आहे

गल्लीतल्या मशाली कोणी लुटून नेल्या?

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment