Friday 14 December 2012

एफडीआय' आले, पुढे?'


एफडीआयचा प्रस्ताव मंजूर करून घ्यायला सरकारला मोठय़ा 'करामती' कराव्या लागल्या. लोकसभेत सपा आणि बसपा यांनी 'वॉक आऊट' केला. राज्यसभेत बसपाकडून मतदान करून घेतले. अखेर कॉंग्रेसने दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर करून घेतलाच. माझ्यासारख्या एफडीआय समर्थकांनी या निणर्याचे स्वागत केले. पण मला एक प्रश्न पडतो की, सरकारला हे करायचेच होते तर ते त्यांनी यापूर्वी का केले नाही? इतकी वर्षे का वाट पाहिली? की सरकारला करायचेच नव्हते. आता नाईलाजाने 'जुलमाचा राम राम' करावा लागला? नेमके कारण काय?

करायचेच होते तर..

1990 साली भारत सरकार दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर होते. विदेशी कर्जावर सरकारी खर्चाचा गाडा चालवावा लागत होता. कर्जाचा हप्ता देणे ही दुरापास्त झाले होते, व्याज चुकते करायलाही कर्ज काढण्याची नामुष्की आली होती. त्याच काळात रशियाचे विघटन झाले. एका महासत्तेचा अस्त झाला. अर्थात, सरकारनियंत्रित अर्थनीतीचा अस्त झाला. भारताला जुने आर्थिक धोरण सोडून नवे धोरण स्वीकारणे भाग पडले. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग आणि नरसिंगराव या जोडीने 1990 साली पहिल्यांदा भारत सरकारच्या आर्थिक धोरणांची दिशा बदलली. भारताने गेट करारावर सही केली. नेहरूप्रणीत आर्थिक धोरण बाजूला ठेवले व आर्थिक उदारीकरणाचा मार्ग धरला.

आपण नवे आर्थिक धोरण स्वीकारले. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे परवलीचे शब्द बनले. याच काळात नवे तंत्रज्ञान आले होते. सरकारी संचार यंत्रणा एका मिनिटाला 12 रुपये घेत होती. जाणार्‍या कोलला तर पैसे होतेच, पण येणार्‍या कोललाही पैसे मोजावे लागत होते. नव्या आर्थिक धोरणामुळळे अनेक कंपन्या बाजारात आल्या. त्यांच्यात स्पर्धा झाली. कोलचे दर कोसळत गेले. याचा लाभ ग्राहकांनाही झाला. सरकारी कारखाने विक्रीला काढण्यात आले. उद्योग आणि सेवा क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण झाले. मधे अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आले. त्यांनी हेच आर्थिक धोरण पुढे चालू ठेवले. 1990 साली स्वीकारलेले धोरण 2012 पर्यंत शेती क्षेत्रात मात्र आले नाही.

1942 साली देश स्वतंत्र होईल असे वातावरण तयार झाले होते. 1947 साली स्वातंर्त्य मिळाले. भारतीय जनतेला केवळ पाच वर्षे वाट पाहावी लागली. मात्र नवे आर्थिक धोरण शेती क्षेत्रात पोहोचायला 22 वर्षे लागली. अवतीभोवती विकास झाला. त्याचा ताण शेतकर्‍यांवर पडू लागले. लोकांना वाटते की, शेतकरी हे नव्या आर्थिक धोरणामुळे आत्महत्या करीत आहेत. वास्तविकता अशी आहे की, नव्या धोरणामुळे बिगर शेती क्षेत्रात जी सुबत्ता आली तिचे ताण शेतीवर पडू लागले. शेती क्षेत्रात या सुधारणा आल्या नाहीत. शेतकरी विकलांग राहिला. तो नवे ताण सोसू शकला नाही म्हणून तो आत्महत्या करू लागला. किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या? हा आकडा लाखो आहे. महायुद्धात जेवढे सैनिक मारले गेले नाहीत तेवढय़ा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. रिटेल क्षेत्रातील एफडीआयला मंजुरी ही पहिली सुरुवात आहे. शेती क्षेत्राला नव्या आर्थिक धोरणाचे किंचितसे दार उघडले जाण्याची शक्यता निर्माण झाली. शेती क्षेत्राला वगळून आर्थिक उदारीकरणाचे धोरण सरकारने राबविले. त्याची किंमत शेतकर्‍यांना चुकती करावी लागली. ही पावले सुरुवातीला उचलली असती तर एवढय़ा आत्महत्या झाल्या नसत्या व विकासही वेगाने होऊ शकला असता.

विरोधकांचा विरोध बेताल-

एफडीआयची चर्चा दूरदर्शनवर दाखविली जात होती. विरोधी पक्षांचे नेते त्याबद्दल सतर्क होते. ते सभागृहासाठी कमी आणि बाहेरच्या लोकांसाठी जास्त बोलत होते. जणू उद्याच निवडणूक आहे व आपल्याला कसेही करून लोकांची मते घ्यायची आहेत अशा आविर्भावात हे खासदार बोलत होते. त्यामुळे कोणी देश विकायला निघाले. ईस्ट इंडिया कंपनीने जसा बहारात काबीज केला होता तसेच 'वॉलमार्ट'वाले करतील, वाफिरे विधाने करण्यात आली. खास टाळीबाज विधाने अनेक वक्त्यांनी केली. मला साधा प्रश्न पडला, विदेशी गुंतवणूक काही पहिल्यांदा येते आहे असे नाही. 15-20 वर्षापूर्वीच आपण विदेशी गुंतवणुकीचा ठराव केला. त्या आधारे या देशात अनेक कंपन्या आलेल्याच आहेत. जोपर्यंत विदेशी गुंतवणूक बिगर शेतकर्‍यांना फायद्याची होती तोपर्यंत त्यांना ना ईस्ट इंडिया कंपनी आठवली ना देश विकला जाण्याची भाषा केली गेली. आज जेव्हा विदेशी गुंतवणुकीचा लाभ पहिल्यांदा शेतकर्‍यांना होण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हाच नेमके त्यांना या सगळ्या गोष्टी आठवल्या. आयटी क्षेत्रात जोपर्यंत यांच्या मुलांना नोकर्‍या मिळत होत्या तेव्हा हेच लोक शायनिंग इंडियाची भाषा करीत होते, आज जेव्हा शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगाराची शक्यता दिसू लागली तेव्हा त्यांनी गदारोळ सुरू केला.

भारतीय स्वातंर्त्यलढय़ात ज्यांनी गांधीजींना विरोध केला ते सगळे आज रिटेलमधील एफडीआयला विरोध करीत आहेत. हिंदुत्ववादी तर गांधी हत्येत सामील होते, कमुनिस्टांनीही गांधीजींना काही कमी विरोध केला नाही. आज हे दोघे हातात हात घालून रिटेल मधील एफडीआयला विरोध करीत होते. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात रिटेलमधील एफडीआयचे समर्थन केले होते. आज ते नेमकी विरोधी भूमिका घेत आहेत. यापेक्षा दांभिकतेचा दुसरा कोणता पुरावा असू शकतो?

एफडीआय पुरेसे नाही

दोन्ही सभागृहात ठराव पास झाला. रिटेलमधील एफडीआयचा मार्ग मोकळा झाला. मला वाटते, ज्या मुख्यमंर्त्यांनी याला विरोध केला, ते उद्या संमती देतील. कदाचित येत्या पाच वर्षात कोलकाता, मद्रास, भोपाल आणि अहमदाबादमध्ये मोठे मॉल उघडलेले आपल्याला दिसतील. नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात सात महिन्यांपूर्वीच वॉलमार्टने जागा विकत घेतल्याची बातमी प्रकाशित झाली आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने एवढे पुरेसे नाही. शेती क्षेत्रात उदारीकरण आणायचे असेल तर सरकारला 1. भूमी अधिग्रहण कायदा, 2. जमीन मर्यादा कायदा व 3. जीवनावश्यक वस्तूंचा कायदा या तीन कायद्यांत बदल करावा लागेल. हे तीन कायदे जोपर्यंत अस्तित्वात राहतील तोपर्यंत शेतकर्‍यांसाठी आलेल्या कोणत्याही योजनांचा खरा लाभ शेतकर्‍यांना मिळणार नाही.

शेतकर्‍यांच्या कल्याणा 'वॉलमार्ट'ची विभूती


थेट विदेशी गुंतवणूक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी हे आम्ही ऐकत होतो. वाचत होतो. त्या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक दिवसांपासून वादावादीही सुरू होती. हाच वाद लोकसभेतही झाला. थेट विदेशी गुंतवणूक 'शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच' असे ठासून सांगणारे तर थेट विदेशी गुंतवणुकीत शेतकर्‍यांचे अकल्याण आहे असेही म्हणणारे. एकूण शेतकर्‍यांच्या 'कल्याणा'बाबतच हा 'कळवळा' पाहून आमचे मन भरून येत होते. परंतु काल-परवा थेट विदेशी गुंतवणुकीसाठी 'वॉलमार्ट' कंपनीने भारतात 'लॉबिंग' करण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च केल्याची बातमी वाचली आणि आम्ही अक्षरश: गहिवरून गेलो. भारतीय शेतकर्‍यांबद्दल भारतीय नेत्यांना, समाजसेवकांना, शेतकरी नेत्यांना 'कळवळा' येणे यात नवल ते काय? पण

'बुडती हे जन देखवेना डोळा

म्हणुनी कळवळा येतसे'

हा तुकाराम महाराजांचा कळवळा वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीला येऊ शकतो. कंपनी अमेरिकन आहे म्हणून त्याला भारतीय शेतकर्‍यांचा कळवळा येत नसेल असे कसे म्हणावे? जागतिकीकरणानंतर कळवळाही जागतिक झाला नसेल कशावरून? फार तर अमेरिकन कंपनीच्या कळवळ्य़ाला अमेरिकन कळवळा म्हणा. आता अमेरिकन झाला म्हणून त्याला कळवळाच म्हणायचे नाही हे तर फारच झाले! याच कळवळ्य़ापोटी 'वॉलमार्ट' कंपनी थेट विदेशी गुंतवणूक भारतात व्हावी. त्यातून शेतकर्‍यांचा फायदा व्हावा, निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांनी गळफास घेऊ नये यासाठी 125 कोटी रुपयांची 'गळ' टाकून भारतीय नेत्यांना, शेतकरी पुढार्‍यांना लेखक, विचारवंतांना फशी पाडत असेल तर ही कळवळ्य़ाची जातच न्यारी. या कळवळ्य़ाला 'लॉबिंग'सारखा घाणेरडा शब्द वापरावा हे तर हीनतेचेच लक्षण म्हणावे लागेल. या सर्व प्रकाराने आमची अवस्था, 'कधी गहिवरलो कधी धुसफुसलो' अशी झाली आहे. वॉलमार्ट कंपनीच्या कळवळ्य़ाने कधी गहिवरून यायला होते, तर या कळवळ्य़ाला नतद्रष्ट लोक 'लॉबिंग' म्हणतात म्हणून आम्ही धुसफुसलो. लॉबिंग या शब्दालाच काहीतरी 'बिंग'फुटावे असा घाणेरडा वास आहे. 'जगाच्या कल्याणा संतांची विभूती' याची तर केव्हाच 'एक्स्पायरी' झालेली आहे. पण आता 'फ्रेश' प्रकार, 'शेतकर्‍यांच्या कल्याणा वॉलमार्टची विभूती'. या प्रकाराने तर आम्ही गदगद झालो आहोत. शेतकर्‍यांच्या 'कोट' कल्याणासाठी थेट विदेशी गुंतवणूक भारतात व्हावी यासाठी कोटी कोटी रुपये वॉलमार्ट कंपनी खर्च करीत असेल तर त्यांना कोटी कोटी दंडवतच द्यायला नको कां?

आता 'कल्याणा'च्या आड येणारीसुद्धा नाठाळ मंडळी असतातच. ही नाठाळ मंडळी स्वत:चे 'कल्याण' झाल्याशिवाय इतरांचे कल्याण होऊ देत नाही. तेव्हा अशा नाठाळ मंडळींना वठणीवर आणण्यासाठी वॉलमार्ट कंपनीने 125 कोटी रुपये खर्च केले असतील तर बोंबलण्याचे कारण काय? थेट विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात कठोर भूमिका असणार्‍यांची भूमिका 'नरम' व्हावी यासाठी काहींचा खिसा गरम करावा लागला असेल. काहीचे कोरडे ठणठणीत हात ओले करावे लागले असतील. यासाठी धो धो पैसे वॉलमार्ट कंपनीने खर्च केला असेल तर यात वॉलमार्ट कंपनीची 'कल्याणाची' तीव्र आसच दिसत नाही कां? त्यातही दान द्यायचेही, पण या हाताचे त्या हाताला, या कानाचे त्या कानालाही माहीत होऊ द्यायचे नाही, ही तर भारतीय संस्कृतीची शिकवण. पण वॉलमार्टसारखी अमेरिकन कंपनी भारतीय संस्कृतीची आब राखत हे दान भारतात कोणाकोणाला दिले? कसे कसे दिले? किती किती दिले? याची वाच्यताही करीत नाही. खरेतर या सर्व प्रकाराने संस्कृती रक्षकांचा ऊर दाटून यायला हवा होता. पण तसेही होताना दिसत नाही. दुर्दैव आपले दुसरे काय? देणारा दिल्याची वाच्यता करीत नाही म्हटल्यावर 'बिचार्‍या' घेणार्‍यांनी तरी त्याची वाच्यता कां करावी? घेणारे वॉलमार्टच्या खाल्ल्या मिठाला जागतात किंवा नाही एवढाच काय तो प्रश्न आहे. 'थेट परकीय गुंतवणूक' ही शेतकर्‍यांच्या हिताचीच व हितासाठीच आहे असे एका तालासुरात ते म्हणताहेत हे काय पुरेसे नाही? 125 कोटी रुपये 'वॉलमार्ट' खर्च करतो याला तुम्ही लॉबिंग म्हणा, पण तो त्याचा शेतकर्‍यांच्या 'कल्याणा'साठी केलेला दानधर्मच आहे. दानालाही 'दान' म्हणायची 'दानत' या देशात संपते आहे. किती दुर्दैवी बाब ही? 'देणार्‍याने देत जावे आणि घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे,' असे म्हणणार्‍याने म्हणून ठेवले असेल, पण आम्ही तर त्याच्याही पुढे जायच्या तयारीत आहोत, ''देणार्‍याने देत जावे आणि घेता घेता देशालाही विकता यावे,'' असा ध्यास आम्हाला लागून आहे. अर्थात, देश विकायला काढू तेव्हासुद्धा तो या देशातील गोरगरिबांच्या, दीनदुबळ्य़ांच्या, शेतकरी, शेतमजुरांच्या 'कल्याणासाठीच' असेल याची मात्र खात्री बाळगा. आता तुमचं 'कल्याण' करण्यासाठी थोडंफार आमचं कल्याण होत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

लोकसभेत घसा खरवडू-खरवडू माया-मुलायम थेट परकीय गुंतवणुकीच्या विरोधी बोलत होते, पण मतदानाच्या वेळेस 'थेट परकीय गुंतवणुकीच्या' बाजूने असलेल्या सरकारला मदत व्हावी यासाठी ते अनुपस्थित राहिले. त्यावेळेस असा चमत्कार कसा घडतो असे वाटून गेले. पण 125 कोटी रुपयांचा 'वॉलमार्ट' खुलासा झाला तेव्हा डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला. 125 कोटी मधले किती माया-मुलायमला गेले असतील? सत्ताधारी पक्षाचा त्यातील हिस्सा किती असेल? शेतकरी नेतेही थेट विदेशी गुंतवणुकीची तरफदारी करताना दिसताहेत त्यांचाही हिस्सा यात असेल की काय? भाजपानेसुद्धा सत्तेत असताना 'थेट परकीय गुंतवणुकीची' भलावण केली होती. पण आता ते विरोध करताहेत. वॉलमार्ट कंपनीला भाजपची 'तोडी' करण्यात अपयश आले की काय? अखेर 125 कोटी रु. खर्च वॉलमार्टने 'लॉबिंग'साठी केला. म्हणजे हा खर्च नेमका कसा, कोणावर व कशा प्रकारे झाला याचे तपशील बाहेर यायला नको? पण ते येणार नाहीत. काही दिवस आरोप-प्रत्यारोप होतील. याने घेतले. त्याने घेतले. याची कुजबुज होईल. थोडी धूळफेक होईल. धुळवड होईल आणि परत वातावरण शांत होईल. आणि नंतर दिमाखात 'थेट परकीय गुंतवणूक' भारतात शेतकर्‍यांच्या 'कल्याणासाठी' केली जाईल.

ज्या शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी 'थेट परकीय गुंतवणुकीची' उठाठेव, खटाटोप आज देशात सुरू आहे. त्याच शेतकर्‍याला याबाबत मी प्रश्न विचारला.

'एफडीआयमुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार असे बरेच लोक म्हणतात. तुला काय वाटते?' त्याने उत्तर दिले.

'फायदाच होईन ना जी. समजा गावात श्रीमंत लोकांची पंगत झाली तर त्याचे नवीन नवीन चमचमीत पदार्थ शेतकर्‍यांना पहिल्यांदाच पाहायला मिळतील. हा शेतकर्‍यांचा फायदाच नाही कां? त्या पदार्थांचा घमघमीत सुवास शेतकर्‍यांना फुकटात घेता येईल हा कितीतरी मोठा फायदा शेतकर्‍यांचा होईल. असे पदार्थ शेतकर्‍यांच्या बापजन्मी पहायला, वास घ्यायला मिळाले नसते ते त्या 'पंगती'मुळे मिळेल. आता श्रीमंतांची पंगत म्हणजे ते ताटातले पदार्थ गरिबांसारखे चाटून पुसून तर खाणार नाही. उलट जो ताटात सर्वाधिक उष्टे टाकेल तो अधिक श्रीमंत. त्यामुळे ताटात भरपूर उष्टे शिल्लक राहील. ते स्थानिक शेतकर्‍यांनाच खायला मिळेल. उष्टे कां होईना आमच्या बापजन्मी जे खायला मिळाले नसेल ते खायला मिळेल. त्यामुळे 'थेट परकीय गुंतवणुकीची 'पंगत' भारतात बसली तर शेतकर्‍यांचा फायदाच फायदा.'

तो हे गंभीरपणे बोलत होता कां उपरोधिकपणे बोलत होता हे मला समजले नाही. समजून घेण्याची आवश्यकताही वाटली नाही. 125 कोटी रुपये 'वॉलमार्ट' कंपनी थेट परकीय गुंतवणुकीसाठी 'लॉबिंग' म्हणून खर्च करीत असेल तर 'भुक्कड' शेतकर्‍यांना विचारतो कोण? अखेर 'वॉलमार्ट' कंपनीचा कळवळाच महत्त्वाचा. जेव्हा कळत नाही कोठे वळा कदाचित त्याचेच नाव 'कळवळा' असेल!

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

चैतन्याच्या अनुभूतीचे वस्तुनिष्ठ संशोधन आवश्यक


विश्वाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचारप्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वात ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवायचे आहे. ईश्वर ही एक काल्पनिक धारणा असून त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करणे निर्थक असते. ईश्वराच्या कल्पनेने, त्याच्या कोपाच्या भयाने व त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने मानवाला नैतिक वागणुकीचे वळण मिळते ही बाब काही प्रमाणात खरी असली, तरी त्यातून दांभिकताही बळावते व धार्मिक मनुष्य अधिक दांभिक असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा सत्य जाणून मनुष्याने स्वत:ची व समाजाची फसगत न करणे इष्ट ठरेल. अशा प्रकारची भौतिकवादाची थोडक्यात तात्त्विक मांडणी आहे.

भौतिकवादी मनुष्य हा जसा व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित व स्वार्थपरायण असू शकतो, तसेच तो समाजशील, मानवतावादी व अत्यंत त्यागीदेखील असू शकतो. तो मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, लोकशाही राज्यव्यवस्थेचा समर्थक, हुकूमशाही किंवा सैनिकशाहीचा पाठीराखा अथवा लोकशाही, समाजवादाचा, साम्यवादाचा वा अराजकवादाचादेखील पाईक असू शकतो. सारांश, भौतिकवादी विचारसरणीमध्ये वरील सर्व आर्थिक/राजकीय विचारांना स्थान आहे. सामाजिक बाबतीत भौतिकवादी मनुष्य समाजव्यवस्था टिकून रहावी व माणसांनी एकमेकांसोबत सलोख्याने रहावे या कारणांसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धरू शकतो. तसाच तो स्वत:ला मृत्यूनंतर अस्तित्व राहणार नसल्याच्या धारणेमुळे बेबंद, चंगळवाद व अनैतिक जीवन जगण्याचेही समर्थन करू शकतो.

वस्तुनिष्ठ (जलक्षशलींर्ळीश) व तर्कशुद्ध (ीरींळेपरश्र) विचार करण्याची शिस्त, ही भौतिकवादाने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी मानावी लागेल. तशी शिस्त नसली आणि आपल्याला

अंत:स्फूर्तीने एखाद्या वस्तूचे वा विषयाचे आकलन झाल्यासारखे वाटले तर त्या आकलनात आपले पूर्वग्रह, स्वभावाची बैठक, प्राणिक आवेग वगैरे मिसळून व्यक्तिगणिक आकलनात फरक पडू शकतो.

भौतिकवादी विचारसरणीची आमच्या मानवी समाजाला दुसरी देणगी म्हणजे विज्ञानाचा प्रसार ही होय. सर्व वैज्ञानिक भौतिकवादी विचाराचे नसतात. किंबहुना अध्र्याहून अधिक वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ हे ईश्वरावर श्रद्धा असणारेच आढळतात. परंतु मागील 3-4 शतकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भौतिकवादी विचारसरणीचे प्राबल्य पाश्चात्त्य देशांमध्ये बळावले. त्यामुळे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विचारांना मोलाचे स्थान मिळाले. ती शिस्त बाळगून सृष्टीरचनेतील नियम व त्यामागील तत्त्वे शोधून काढण्याकडे प्रगत बुद्धीच्या मानवाचा कल वाढला. त्यांनी संशोधनामध्येही अशीच शिस्त बाळगली. एखाद्या पदार्थाच्या अथवा ऊर्जेच्या विशिष्ट वर्तणुकीला जर 'नियम' म्हणायचे असेल, तर त्या पदार्थाची वा ऊर्जेची समाजन वातावरणात सर्व काळी व सर्व जागी तशीच वर्तणूक आढळून येणे आवश्यक मानण्यात आले. असे घडले तरच विज्ञानदृष्टय़ा तो नियम सिद्ध झाल्याचे मानले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करणारा वैज्ञानिक त्या निरीक्षणात स्वत:चे पूर्वग्रह, धारणा, संस्कार, इच्छा इत्यादींचे मिश्रण होऊ देत नाही. ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे वैज्ञानिक /शास्त्रज्ञदेखील याच पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टी बाळगून प्रयोग करतात व प्रयोगात आढळणार्‍या घटनांचे तर्कशुद्ध बुद्धीने विश्लेषण करतात. तसे त्यांनी केले नाही तर विज्ञान प्रगतीच करू शकणार नाही. विज्ञानाच्या घोडदौडीमुळे मानवजातीला जे अद्भुत लाभ झाले आहेत, त्यांचे श्रेय बर्‍याच अंशी भौतिकवादाला निश्चितपणे दिले पाहिजे.

परंतु काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भौतिकवाद समाधानकारक अशी देऊ शकत नाही. ही अफाट सृष्टी केवळ अपघाती योगायोगांच्या लांबलचक मालिकेतून निर्माण झाली व कार्यरत आहे, हा भौतिकवादी विचार बुद्धीचे व मनाचेदेखील सर्वागीण समाधान करू शकत नाही. सभोवतालच्या व दूरवरच्या सृष्टीचे आम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले तर ही बुद्धिहीन, आंधळय़ा जड पदार्थाची/ऊर्जेची करामत वाटत नाही. वनस्पती, कीटक, पशुपक्षी व मानवात असलेले चैतन्य जडातूनच उगवले असे मानले, तरी ते चैतन्य बीजरूपाने जडात वास करत असणारच! त्याशिवाय ते उगवणार कसे? शिवाय आमच्या ज्ञानेंद्रियांना व तार्किक बुद्धीला जे कळत नाही, ते अस्तित्वात असूच शकत नाही, असे मानणे योग्य नाही. कारण मानवाच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीलाही मर्यादा आहेत. मानवाच्या व मानवसदृश प्राण्यांच्या उत्क्रांतीक्रमातील आगमनापूर्वीचे प्राणी-जगतदेखील असे म्हणू शकले असते की, तर्क-बुद्धी नावाची गोष्ट या सृष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही! आमच्या अंतर्मनाचे व मनाच्या अवचेतन भागाचे नियमन व नियंत्रण करणारी आमच्या जागृत मनापेक्षा अधिक ज्ञानी असणारी यंत्रणा कार्यरत असते, हेदेखील आपण स्वत:चे निरीक्षण केल्यास समजू शकतो. जडाच्या आधारे चैतन्याचा अधिकाधिक विकास साधणे, अशी स्पष्ट दिशा उत्क्रांतीमध्ये आढळून येते. सृष्टीच्या मुळाशी जर फक्त अज्ञानी जड तत्त्वच असते तर त्याला ही नेमकी दिशा कशी धरता आली असती? एखाद्या आंधळय़ाने धडपडत, चाचपडत, झोकांडय़ा खात वाटचाल करावी तसे उत्क्रांतीचे स्वरूप दिसते खरे, परंतु त्या वाटचालीला एक निश्चित दिशा आहे, त्यात एक सुसंगती आहे, ती कुठून आली? शिवाय प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगण्याची व वंशवद्धीची जी उपजत, मूलभूत व बलवान प्रेरणा आढळून येते, तिच्या उगमस्थानाचा व कारणाचा समाधानकारक खुलासा भौतिकवाद करत नाही. जर सृष्टीच्या मुळाशी अचेतन, जड तत्त्वच असेल, तर ते जडभौतिक तत्त्व सजीवांच्या रूपात चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यास असा आणि इतका अट्टाहास कसा करू शकेल? जगत राहण्याची व अधिकाधिक सचेतन होत राहण्याची ही आदिम प्रेरणा भौतिक पदार्थातून उगवणे शक्य वाटत नाही.

पृथ्वीवर काही वेगवेगळय़ा जागी आजपावेतो असंख्य मानवांना जी इंद्रियातीत चैतन्याच्या अस्तित्वाची अनुभूती झाली आहे, त्या अनुभूतीचे अधिक वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, संशोधन व आकलन करणे आवश्यक आहे. तसे न करता उथळपणे 'तो त्यांचा भ्रम होता' असे झटकून टाकणे उचित नव्हे. विशेषत: तशा अनुभूती येणार्‍या व्यक्तींचे आंतरिक व बाह्य जीवन बदलते काय व कशा प्रकारचे ते बदल होतात, याबाबतदेखील अद्याप पुरेसे संशोधन वस्तुनिष्ठपणे झालेले आढळून येत नाही. अतिंद्रिय वा आध्यात्मिक अनुभूतींचे व ज्यांना त्या अनुभूती येतात, त्या व्यक्तींचे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे संशोधन करणे भौतिकवादी व्यक्तींना कठीण जाते. कारण तशा विज्ञाननिष्ठ संशोधनाकरिता 'ज्ञात भौतिक सृष्टीखेरीज वेगळे असे काहीही अस्तित्वात नाही' हा आपला पूर्वग्रहदेखील बाजूला ठेवावा लागतो.

ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थकणांचे व ऊर्जेच्या तरंगाचे सैद्धांतिक स्वरूपात का होईना, (गणिती पद्धतीने) अस्तित्व विज्ञानाला शक्य वाटत आहे, त्या सूक्ष्म कणांचे अथवा ऊर्जा-लहरींचे अस्तित्व शे-दीडशे वर्षापूर्वी वैज्ञानिकांना माहीतही नव्हते. हिग्ज-बोसॉन (गॉड पार्टिकल) या अणूतील सूक्ष्म कणाचे अस्तित्व केवळ गणितीय आधारावर शक्य मानले जात होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तर नुकताच मिळाला. सृष्टीमध्ये आम्हाला माहीत असलेल्या तत्त्वाखेरीज इतरही तत्त्व अस्तित्वात असू शकतात, ही संभावना विज्ञानाला नेहमी गृहीत धरावी लागते. भौतिक अथवा जड पदार्थाच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाचा शोध घेताना फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण ऊर्जातरंगाच्या रूपातदेखील वावरत असल्याचे विज्ञानाला आढळून आले. त्याहून अधिक सूक्ष्मात शोध घेता-घेता कदाचित भौतिक-अभौतिक असा भेददेखील वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

असी आपली इस्टेट


शंकर बडेमांगच्या एका भागात तुमाले सांगतलं होत का म्या बोलीतली पयली कविता 'पावसानं इचिन..आर्केस्ट्रात असतानी लेयली होती. त्याच्याच्यानं माही इतर कवीसंग कायी ओयख नोती. फकस्त एकामेकाले नावानं ओयखत होतो. पयल्या कवितेनंतर मंग ह्या कवितेचा झरा वाहतचं होता. एका मांग एक 'उन्हायात गेलो होतो पोरगी पाहाले', 'हाऊसफुलं द्या,' 'झाडाखाली डोस्की' असी रांग लागत गेली आन् आर्केस्ट्राचा स्टेज असल्याच्यानं हौस भागत गेली. असे सात-आठ वर्स निंघून गेले आन् मंग आर्केस्ट्रा सोडा लागला. त्याच्या दुसर्‍या साली यवतमायच्या नेहरू युवक केंद्रात आमा काई कवीले आवतनं देल्लं. त्यातनी बोरीवून मी, दाभा पहूरवून सुभाष परोपटे, दिग्रसवून सुरेश गांजरे, दया मिश्र, राजू मिश्र बाकी एक-दोन नावं इसरलो असनं तं माफी मांगतो. हे जन्मातलं पयलं कविसंमेलन खूप हरकीजलं होतो. त्यायनं बलावलं त्याच्या दोन घंटय़ा आगुदरचं मी तिथं पोचलो. मनात तिथं जाच्या आंधी हे आलंयी का लयचं होईल का हे? आता तुमाले सांगाले हरकत नाई तुमी का दुसरे कोनी नवाडे थोडीचं हा. त्या दिसी बोरीले सकायपासूनंच मनाची येरझार यवतमायले सुरू होती. असे वाटे कवा जावं नं कवा नाई.

दोयपारचं जेवन नाई होत तं म्या झोरा (पिशवी) उचलला. त्यातनी सकायीचं लुंगी आन् एक चादर ठुली होती. प्रेयसीले सांजीले भेटाले जाचं असनं तं हा असा सकायपासून चिंत हरपून बसते तं तुमी मले सांगा तिले भेटाले जानं आन् पयलं कविसंमेलन यातनी फरक काय अस्ते? बोरीवून दोयपारी दोन वाजता निंघालो तं सव्वातीन वाजता यवतमायले पोचलो. इचार केला इतक्या आंधी सुद नाई दिसनार मंग भाडय़ाची सायकल काढून दोस्ताकडं गेलो. म्हणलं त्याले सांगनयी होते आन् आपला टाईमपासयी होते. त्याच्या घरी बसलो पन चित सारं तिकडं. आखरीले साडेचार वाजता सारस्वत चौकात आलो काऊन का ते आफिस त्यायच्याच बंगल्यात होतं. मी आफिसात जाऊन काय पाह्यतो तं दिग्रसवाली कवी मंडयी माह्या पयले हजर. मनात म्हणलं चाला निरी आपल्यालेचं घाई होती असं नाई.

आमचं कविसंमेलन त्यायनं त्या राती टाऊन हालवर्त ठेवलं हाय असं आमाले सांगण्यात आलं तं आमाले लय खुसी झाली, काऊन का त्यावक्ती कोन्त्यायी सुद्या कार्यकरमाची जागा टाऊन हालचं राहे. आमाले हालवर चाला म्हनलं तवा आमी खुसीनं निंघालो का हाल आयकनार्‍यायनं खचाखचं भरला असंनं. जवा आमी हालपासी पोचलो तवा पायतो तं काय हाल उघडून द्याले आलेला नगरपालिकेचा चपरासी कुलूप उघडत होता. भाहेरच्या भितीवर पांढर्‍या कागदावर्त काया शाईनं बोरूच्या कांडीनं लेयल्यावानी कविसंमेलनाची तेवढीचं जाहिरात चिपकवून होती. असी जाहिरात आन् दुसरं म्हणजे सारे कवी नईनं मंग लोकायनं कावून याव म्हंतो मी. आमी आतनी गेलोतं मोठी सतरंजी आथरून तिच्या तिकडच्या टोकाले चार मानसाले बसता इन असा तकतपोस, त्याच्यावर एक लहान सतरंजी. आमी असं ठरोलं, का स्टेजवर जो संचालन करन फ कस्त त्यानं बसाचं, बाकीच्यायनं सामोर. काऊन का आमी सार्‍यायनं स्टेजवर बसतो म्हनलं तं आयकाले सतरंजीचं राह्यली असती. असं ठरलं का सुभाष परोपटे संचालन कराचं आन् ज्याचं नाव घेतलं त्या कवीनं स्टेजपासी उभं राहून कविता म्हनायची. सुभासनं बोलनं चालू केलं तो आवाज स्पिकरातून भाहेर गेल्यानं दोन-दोन करता सातजन झाले. श्रोते होते असंतं सांगाले मोकये झालो. किती होते कायले सांगाचं. आखरीले सुभासनं माहा नाव घेतलं. उठतानी मनात आलं म्हनलं सातजनाचे काई सतरा झाले नाई, पन म्हनलं सतरानं खतरा कायले सात शुभ आकडा हाय. हे सातची बोहनी पुढच्या कविसंमेलनात सातसे आनल्यासिवाय राह्यनार नाई.

म्या स्टेजपासी जाऊन कविता चालू केली आन् चार-पाच जनं समोरच्या दाठ्ठय़ापासूनचं व्वा व्वा करतं आले. मनात म्हनलं याले म्हन्ते पायगुन. त्यायच्या व्वा व्वा नं कार्यकरमात एकदम जीव वतला पन तवाचं ध्यानातं आलं का ते वतूनचं इथं आले हाय. म्या नुकताचं आर्केस्ट्रा सोडला होता आन् हे त्याचेच श्रोते होते. त्यायनं कविता झाल्याबराबर बम्म टाया वाजोल्या. काऊन का ते बम भोले झाले होते ना, मी आर्केस्ट्रात असतानी जस्या वर्‍हाडी कविता म्हनो तसी एक कामेडी कव्वाली म्हनो. 'एक चायके प्यालेने दिवाना बना डाला, मस्ताना बना डाला' त्यायनं त्या कव्वालीची फरमाईस केली. सुभासच्या ध्यानात आलं का हे मंडई काई आयकत नाई म्हून तो मले म्हने, बाबा होऊ न जाऊ दे आता म्या म्हनलं आलीया भोगासी तो काई राती दहाले बंदचा जमाना नोता. कार्यकरमचं नव साडेनवले चालू होये, त्याच्याच्यानं आमाले जेवाले घालूनचं त्यायनं आनलं आन् कविसंमेलन अटपल्यावर्त आफिसात नेऊन सोडलं. तिथं बाजूच्या हाल सारक्या खोलीत आमच्या गाद्या टाकून ठुल्या होत्या. याच्या आंधी माही फकस्त सुभास परोपटे संग ओयख होती. आता सार्‍यायची ओयख झाली, चर्चा झाली आन् सकायी चार पावतर कविसंमेलनानंतरच कविसंमेलन रंगत गेलं. माहा फायदा असा झाला का मले हे दोस्त भेटल्यानं माहा दिग्रसले सुरेशकडं आन् त्याचं कवा कवा बोरीले येनंजानं सुरू झालं. दया आन् राजू मिश्रची गढीपासची खोली आमच्यासाठी ऐदी हाऊस झालं. रामाच्या देवयात मंधा मंधात कविसंमेलन व्हाले लागले. त्या मिसानं होनार्‍या भेटीतून 'इरवा' हा माझा कवितासंग्रह काढाचं ठरलं. बाकी त्याचा इतिहास एका भागात म्या तुमाले सांगतलाच हाय. आता तुमाले सांगून खरं नाई वाटनारं, पन दिग्रसच्या मंडयान काढलेला 'इरवा' हा कवितासंग्रह 'ना नफा ना तोटा' या बेसवर इकाचं ठरल्यानं 1977 साली निघालेल्या त्या पुस्तकाची किंमत ठुली होती एक रुपया साठ पयसे. लहानस्या शयरात काढूनयी दोन वर्सात ते पुस्तकं आऊट ऑफ मार्केट. रगतात धंदा असताना आता पावतर पाच, सा आवृत्ता निंघाल्या तिथचं मांग राह्यलो आपन!

भाऊसाहेब पाटणकर मराठी शायरीचे जनक पन त्यायचं या मातीवर्त आन् वर्‍हाडी बोलीवर लय पिरेम. त्यायनं पयलं वर्‍हाडी साहित्य संमेलन यवतमायात भरवलं त्यावक्ती मी एकदम नवखा कवी होतो. भाऊसाहेब, पां. श्र. गोरे, प्रा. सोटे सायेब यायच्या म्होर एवढय़ा मोठय़ा स्टेजवून आन् इतक्या हजारानं असलेल्या लोकायसमोर आपल्याले कविता म्हनाले भेटनार हाय, याची भलकाई खुसी मले झाली होती. त्या संमेलनाचा दुसरा फायदा हे झाला का अनेक लेयनार्‍याय संग ओयखी झाल्या. त्यातनी आकोल्याचे तीनजन होते श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी कवठेकर अन् पुरुषोत्तम बोरकर. काई लोकायच्या ओयखी ओयखी पावतरचं राह्यल्या पन यायची ओयख दोस्तान्यात बदलनार हाय हे जसं नियतीनं ठरूनचं ठुलं असावं.

शिरीकिह्या तवा मोठे भाऊ बॅंकेत बोरगाव मंजूच्या शाखेत असल्यानं त्यायच्यापासी राहून आकोल्याच्या कालेज मंदी सिकत होता. एका दिसी मी बोरीवून सकायी निंघून पयले बोरगावले उतरलो. शिरीकिह्याच्या वयनीनं केलेला सयपाक त्याच्यासंग बसून भरपेट जेवलो. आलेल्याले परकेपना वाटू नये असा सार्‍यायचा सभाव. दोयपारी तिथून आमी दोघ आकोल्याले पुरुषोत्तमकडं आलो. तवा तो जयहिंद चौकात मायबापासंग राहत होता. त्याचे बावाजी म्हंजे सावली देनारं झाड आन् माय मायाळू होती हे निल्ख सांगाची गरज हाय का? ते तं होतीचं पन चालता बोलता वर्‍हाडी म्हनीचा खजिनाचं. पयले कविता लेयनार पुरुषोत्तम बोरकर त्याच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीनं अख्ख्या महाराष्ट्राच्या ओयखीचा झाला तं नारायण कुळकर्णी कवठेकर गं्रथालीच्या कविता दशकाची याचा एक कवी म्हणून नईन लेयनार्‍यासाठी कवितेचा सगर (रस्ता) झाला तं अभ्यासून लेयलेल्या कोरकू वरच्या आदिवासी कविता आन् गझलावर्त त्याची असलेली हुकमत अनेक संगीतकारायले चाली देन्याच्या मोहात पाडनारी ठरली हाय. एका अंकुर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला नारायणसी, वि.सा. संघाच्या वाशीम साहित्य संमेलनाचा अध्यक्ष काय, 'युगवानी'चा संपादक काय! एकावक्ती संगमंग राह्यनारे इतले उची झाले का आपलातं त्यायच्या डांगीले हात नाई पुरत. असे लेयन्यानं मोठे झालेले आपले दोस्त असनं हेही आपली इस्टेटच अस्ते कानी?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

आना कुकाची वाटी!''

''रेखे.. व रेखे.. कुठी गेली लेकाची पोट्टी?''

'' काय म्हनता बाबा?''

'' पावने पाहाले येऊन राह्यले तुले.''

''मले?''

''नाही तर काय तुह्या मायले पाहाले येतीन? वा रे वा पोरगी ! चाल.''

'' कपळे गिपळे घाल.''

'' कपळे तं माह्या आंगावरच हायेत.''

''अवं भयाने.. गाऊनवर पाव्हन्यापुढे जाशीन काय? साळीगिळी नेस.. कुठी गेली तुही माय?''

''देवळात गेली.''

'' जाय बलाव पटकन.. घरी पावने येऊन राह्यले अन् हे दिवा घेऊन फिरते..वारे वा बायको.. ओ पिंटय़ा.. इकडे ये..

कुठी गेलता?''

'' मॅच पाहाले.''

'' ससरीच्या दिवसभर क्रिकेटच पाह्यत राह्यतं काय? मी काय सांगतो ते आयकून घे.. आपल्या घरी पावने येऊन राह्यले.. पलाटात जाऊन मोठे बाले बलाव.. तिकून येता येता बाप्पूले आवाज देजो.. अन् येतायेता मोठे बाच्या घरच्या नव्या चादरा आणजो.. जाय पटकन.. लायने..तू आपली बैठक झाडून घे.. अन् ते झालं की दारापाशी रांगोईमांगोई टाकजो.''

'' बाबा, आई आली.''

'' कुठं गेलती पाखराले पानी घेऊन? घरी पावने येऊन राह्यले अन् हिंडत बसते भवानी.''

''कोनते पावने?''

'' रेखीले पाहाले येऊन राह्यले.''

'' एवढय़ा लवकर?''

'' ते म्हणत दिवाई झाली की अटपून टाकू .. ''

'' कोन्या गावचे येऊन राह्यले?''

''वांगरगावचे! आताच येऊन राह्यले अकरा वाजता..पोरगा स्वत: येऊन राह्यला.''

''काय करते पोरगा?''

'' पोराची हाटेल हाय फाटय़ावर! दोन मजली मकान हाय.. चार एकर वावर हाय.. निव्र्यसनी पोरगा हाय.. सुपारीचं खांड खात नाही..जमलं तं आजच फायनल करून टाकू.'' ''असे वक्तावर पावने येत असतात काय? आगुदर काहून सांगतलं नाई?''

'' आता फोन आला त्याहीचा.. तू लवकर सैपाकाले भीड..

झांबल झांबल करू नको.''

'' घरात सौदा नाही.. भाजीपाला नाही.''

'' आता बलावतो सौदा.. सोन्या इकडे ये.. शंकरच्या दुकानातून सौदा घेऊन ये..''

'' काय काय आनू?''

'' तुह्या मायले इचार.. कागदावर लिस्ट कर.. येता येता भाजीपाला आणजो. .आलू.. वांगे.. संभार.. जाय पटकन.. ओ पक्या.. इथं एक पाट आन पाय धुवाले.. पान्याची बकेट भरून ठेव.. नवं साबन आन.. साबनाचा कागद काढू नको.. आपच लागलं तर काढतीन ते..चला रे पोरंहो बाहीर खेळा..''

'' पावने आले बाबा..''

'' आले काय? या या.. नमस्कार.. कुर्त्याले भिऊ नका.. काही करत नाही..या आबा.. बसा गादीवर.. तढवावर कायले बसले? बाबू पंखा लाव.''

'' पंखा राहू द्या.. तशीच थंडी वाजून राह्यली.''

'' बाबू पानी आन..चहा आन.. हे मेसूरवाले पावने कोन हायेत?''

'' मी वयख करून देतो.. हे पोराचे मावसे.. हे चुलते..हा पोरगा.. अन् हे पोराचे आबा! या बुढय़ानं उशीर केला.. बुढा वक्तावरच दाढी कराले गेला.. म्हणून पह्यली एसटी हुकली.''

'' काही हरकत नाही.. तुम्ही च्या घेत ना काय? मंग दूध घ्या.. पिंटय़ा.. एक शिंगल दूध सांगजो.. अरे नरम सुपारीचं कूट आनलं नाही काय? कूट आन आबासाठी.'' '' तुमच्या घरच्या म्हशीचं दूध आहे वाटते?''

'' घरचीच म्हैस हाये.. उकळय़ाचं दूध पतलं भेटते.''

'' हो राज्या.. डेअरीवरचं दूध लय पतलं भेटते.''

'' त्याले काय चव राह्यते हो? घ्या पान.''

'' बलावा पोरीले.. उशीर कायले करता?''

'' जाय रे मंग्या .. बाइले बलाव.''

'' आपले किती घरं हायेत या गावात?''

'' दहा-बारा घरं हायेत.. सरपंचीन आमच्या घरातलीच झाली, मागच्याच मयन्यात इलेक्शन झालं.''

'' कोन झाली सरपंचीन?''

'' आमच्या पुतण्याची बायको झाली! सरपंचपद लेडीज राखीव झालं, मग यानं बायको निवडून आनली.''

'' आमच्याही गावात बाईच सरपंच आहे.. तिले काहीच येत नाही.. सारा कारभार नवराच पाह्यते..हे फक्त नावालेच सरपंचीन झाली.''

''असंच हाय जिकडे तिकडे.. सरपंच बायको होते अन् नवरा तिच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोई मारते.''

'' आली पोरगी.''

'' ये बाई.. बस पाटावर.. विचारा नावगाव.''

'' काय नाव बाई?''

'' लेखा.''

'' शिक्षण?''

'' मॅटलीक फेल.''

'' जन्मतारीख?''

'' सोला हजाल नव्वद.''

'' पोरगी जरा तोतरी बोलते काय?''

'' हो ..लहानपनापासून तोतरी बोलते.''

'' सध्या काय शिकून राह्यली?''

'' कांपुटल शिकून राह्यली.''

'' सार्‍याइच्या पाया लाग बाई अन् जाय घरात.''

'' मंग सांगा तुमची पसंती.''

'' पोरगी तशी पसन हाय पन..''

'' पन काय?''

'' जरा तोतरी बोलते.''

'' मंग?''

'' आमाले इचार करा लागीन.''

'' पोराच्या मामाले इचारा.. बोला मामा.''

'' काही इचार करू नका.. आमचा पोरगाबी जरा तोतरा हाये.. बोलताखेपी

जीप ओढते.. काही लांबन लावूनका..घ्या आटपून.''

'' पन हुंडय़ाची सोय नाही आमची.''

'' हुंडा कोनाले पाह्यजे हो? जोळय़ाले जोळा झाला.. याच्यापेक्षा काय पाह्यजे? रजिस्टर लगन करून टाकू..आना कुकाची वाटी!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी-9561226572
     

तारुण्यातील शिकवण


दोन भिन्न कुटुंबातील भिन्न संस्कार झालेल्या व्यक्ती काही कारणाने एकत्र येतात. त्या वेळी त्यांच्यातील संवाद आणि वर्तन औपचारिकतेच्या मर्यादेबाहेर गेल्यास त्यातून वेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतात. आणि त्या समस्यांच्या परिणामाने भयावह रूप धारण केले की, त्या समाजव्यवस्थेच्या पारंपरिक बाबींना हादरे देतात. घटिताने समाज गोंधळून जातो. हे घडले कसे? मानवी जीवन एवढे हिंसक असू शकते का? मानवतावाद, सहानुभूती या बाबींना काही अर्थ आहे की नाही? असे अभिप्राय मग सहजपणे व्यक्त होतात.

वास्तविक स्त्रीदेहाच्या आकर्षणातून निर्माण होणारी शोकांतिका किंवा विध्वंस आदिम आणि पुरातन आहे. स्त्रियांसाठी झालेली युद्धे जगाच्या पाठीवर सर्वश्रुत आहेत. या विध्वंसात कधी स्त्री स्वत: बळी गेली, तर कधी अनेकांना जावे लागले.

आजच्या व्यक्तिस्वातंर्त्याच्या काळात मात्र स्वत: स्त्रीने हे संदर्भ बदलणे ही काळाची गरज झाली आहे. जगातील अनेक देशात स्त्रियांनी स्वत:च्या कर्तृत्वाने आणि मानसिकतेने सन्माननीय स्थान निर्माण केले आहे. महिला राखीव धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत वाढलेला स्त्रियांचा वावर लक्षवेधी आहे. गावाचे पंचवीस वर्षापूर्वीचे चित्र डोळ्यासमोर आणले तर असे दृश्य दिसायचे की, मुली थोडय़ा मोठय़ा झाल्या म्हणजे स्त्रियांसोबत शेताशिवारात खुरपणी, कापणी अशा शेतकामासाठी जायच्या. आज मात्र मुलींचे थवे शालेय गणवेशात दिमाखाने शाळेत जाताना दिसतात.

स्त्रीशिक्षणाचा प्रसार आज खर्‍या अर्थाने शिगेवर झालेल्या अगदी दूरवरच्या खेडय़ापर्यंत झालेला दिसून येतो. परिणामी, बहुतेक भूतबाधेचे, करणी-कवटाळ इत्यादी अंधश्रद्धाळू बाबींचे प्रमाण कमी झाले आहे. आज मुलींमधील संकोच भावही मोठय़ा प्रमाणावर कमी झालेला दिसून येतो. मुले-मुली शाळा-कॉलेजमधून एकाच वर्गातून वावरू लागले. कधी कामाच्या व नोकरीच्या निमित्ताने स्त्री-पुरुष सहवास वाढू लागला. दीर्घ सहवासातूनच प्रेम आणि मिलन ह्या गोष्टी घडून येत असतात. चर्चा आणि संवाद यातून परस्परांविषयीची ओढ निर्माण होते. समान विचारधारा, आवडीनिवडी आणि गुणधर्म यातून आकर्षण निर्माण होते. आकर्षणाच्या पूर्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोयीच्या वेळा ठरवून भेटीगाठी होऊ लागतात. त्यातून आधी भावनिक आणि मग शारीरिक निकटता अपरिहार्य बनते. या निकटतेच्या ओढीलाच प्रेम असे म्हणतात. हे प्रेम निर्माण होण्याची वेळच खरी धोक्याची वेळ असते. कारण चिरकाल टिकणारे असे गुणधर्म नसले तरी त्यातूनच पुढे विसंगती आणि विकृती निर्माण होते. बर्‍याच वेळा एकतर्फी प्रेम निर्माण होण्यासही सहवासातील मूळथोंब लक्षात न येणे; ही बाब कारणीभूत ठरते. अशा एकतर्फी प्रेमातून पाशवी हत्या घडू शकतात 'लव्ह' स्टोरींचे रूपांतर 'क्राईम' स्टोरीमध्ये होऊ शकते. आजच्या उत्तान प्रसारमाध्यमातून जाहिरातींमधून मुलींच्या वेशभूषेत आणि वागण्या-बोलण्यात नको तेवढा धीटपणा आलेला असतो. टीव्हीवरील मालिका, चित्रपटांतील अर्धनग्न नायिकांप्रमाणेच आपणसुद्धा दिसले पाहिजे किंवा इतरांपेक्षा आपण भारीच स्मार्ट आहोत, आपले खूप चाहते, दिवाणे आहेत, असे संस्कार उमलत्या वयात मुलींवर प्रसारमाध्यमांतूनच केले जातात. पुरेसे बौद्धिक अथवा सामाजिक भान येण्यापूर्वीच हे संस्कार अर्धकच्च्या स्वरूपात झालेले असल्यामुळे कधी केवळ उथळ कल्पकतेतून भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते. त्यात कधी मैत्री झालेला एखादा अपरिपक्व मानसिकतेचा युवक दुखावला जातो. आपण जिच्यावर एवढे जिवापाड प्रेम करतो ती दुसर्‍याच्या प्रेमात गुंतली आहे असा संशय आला की, त्या तथाकथित एकनिष्ठ एकतर्फी प्रियकराचा जळफळाट होतो. आधी वैयक्तिक पातळीवर त्याला त्रस्त करणारा हा मानसिक उद्रेक, मग एखाद्या अवसानघातकी क्षणी हिंसेत रूपांतरित होतो.

कधी स्वत:च्या दिमाखडौल मिरवताना तर कधी भावनेच्या भरात अशा दोन्ही प्रकारात मात्र बळी तो प्रेयसीचाच. कारण कधी कधी आपणच टाकलेल्या मोहजाळात अटळपणे त्यांना गुरफटून घ्यावे लागते आणि त्यांच्या लायक नसलेल्या भर्ताड प्रियकराशी नाईलाजाने विवाह करावा लागतो. जेव्हा मनावरची भावनेची झापड दूर होते, तेव्हा आपल्या हातून फार मोठी चूक झालेली आहे हे लक्षात येते. ही जन्मगाठी जीवकाचणी कुरतडत- कुरतडत मनाला आतल्या आत खात राहते. मुळाशी लागलेल्या भुई उधळीने ओलसर खोडाचं खोडूक होऊन जाते. असे अभावग्रस्त मानसिकतेचे संसार कधीही सुखी होऊ शकत नाहीत. कारण वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक, सामाजिक स्तर खालावलेल्या अवस्थेत कुठं कोणी सुखी होत असतं का?

आईवडिलांच्या नजरेआड होणं हे आजच्या मुलामुलीचं भागधेय झालेलं आहे. शिक्षण किंवा नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या कुटुंबातील व्यक्तीशी संवाद, चर्चा करताना पुरुष सहकार्‍याच्या नजरेत तसा भाव दिसला तर त्याला योग्य वेळी योग्य ती समज देण्याची मुलीची तयारी असली पाहिजे. म्हणजे पुढचे बरेच अनर्थ यामुळे टळू शकतात. प्रेमप्रकरणातील भाबडेपण आणि अनाकलनीय दुबरेध संदिग्धता हाच खरा अडसर असतो. म्हणूनच अशा वेळी मनभावीपणाच्या व आत्मगौरवाच्या आहारी जाणे योग्य ठरत नाही. आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात भविष्याचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आणि डोळस भान आजच्या काळातही विशेषत: ग्रामीण भागात आवश्यक आहे. कारण इथे प्रत्यक्ष संबंध भोवतीच्या प्रदूषित सामाजिक पर्यावरणाशी असतो.

आजच्या कुटुंबसंस्था विघटनाच्या काळात आर्थिक मिळकत ही अपरिहार्य बाब आहे. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात कळपातळ्या प्राण्याप्रमाणे बरेच माणसंही आयुष्य फरफटत न्यायचे किंवा अबाधितपणे कौटुंबिक संस्कारातून ते नेलं जायचं. म्हणूनच जोडीदाराची निवड करताना त्याच्या आर्थिक सक्षमतेचा परस्परांनी विचार करणे आवश्यक ठरते.

उमलत्या वयात भिन्नलिंगी आकर्षण आणि ओढ निर्माण होणे ही बाब नैसर्गिक असली तरी तिला एकारलेपण येऊ नये म्हणून या वयातच लैगिंक शिक्षणाची गरज असते. बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मानवी गुप्तेंद्रियांच्या प्रयोजनासंबंधी कळत-नकळत अभ्यासक्रमातूनच माहिती मिळत जाते. याच पद्धतीने कला शाखेच्या विद्यार्थ्यांची आकलनक्षमता त्याला नेमलेल्या अभ्यासक्रमातून कथा-कवितांच्या माध्यमातून वाढवता येऊ शकते. त्याचे भान अभ्यासमंडळाला पाठय़क्रमाची निवड करताना आवश्यक असते. त्याचा अभाव जाणवतो.

प्रेमसंबंधातील छुप्या व एकतर्फी भावना कधीही घातकच असतात. त्यातूनच 'लव्ह स्टोरी'चे 'क्राईम स्टोरी'त रूपांतर झालेले समाजात अनेक वेळा दिसून येते. एकमेकांच्या वर्तनात किंवा आपल्या भोवतीच्या कुणाच्या वर्तनात अशी दग्ध संक्षिप्तता कोडे निर्माण करण्याची शक्यता निर्माण होत असल्यास वेळीच त्या कोडय़ाचा उलगडा होणे आवश्यक असते. त्यातूनच पुढच्या निखळ मैत्रीभावाची पेरणी होत असते. आकर्षणातली मोहतुबी काव्यमयता अनुभवणे काही काळ आनंददायी वाटत असले तरी त्यातून पुढे दु:खदायी कुरूपता निर्माण होत असते. पूर्वीच्या वर्ग अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात कुसुमाग्रजांची ' प्रेम म्हणजे' ही अतिशय छान कविता होती. या वयात निर्माण होणार्‍या प्रेमांकुराला कोणत्या भावनेचे खतपाणी घालावे, याचे अतिशय समर्पक दिशादर्शन या कवितेत होते. म्हणूनच त्या वयातील भावनेच्या झुल्यावर हिंदोळे होणार्‍या मनाला एकदम व्यवहाराच्या रस्त्यावर आणून उभे करण्याचे काम ही कविता करते.

पुरे झाले चंद्र, सूर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी, नाले, पुरे झाला वारा ..,

अशी भावनिक धूसरता बाजूला सारून प्रेम म्हणजे खरं काय असतं? हे या महाकवीने फारच भेदकपणे उमलत्या पिढीला समजावून सांगितले आहे. अतिरेकी, भाबडय़ा, आंधळ्या प्रेमात पडलेला तो त्याचा आणि तिचाही व्यक्तिमत्त्व विकास विसरतो आणि तिच्या नकारानंतर क्रोधाच्या मद-मोह, मत्सराच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करतो. अशा प्रेमवीरांना इशारा देताना कुसुमाग्रज म्हणतात,

''शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,

बुरुजावरती झेंडय़ासारखा फडकू नकोस ..''

आणि मग प्रेम कोणासारखं करावं याचे आदिम व पौराणिक संदर्भ ते फारच समर्पक रीतीने देतात. अभ्यासक्रमात नेमलेल्या अशा अभिजात कथा-कवितांमधून त्या विशिष्ट वयात विद्यार्थीं-विद्यार्थिंनींच्या मनावर जे संस्कार होतात ते चिरस्थायी स्वरूपाचे आणि त्यांचे भवितव्य घडवणारे असतात.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादबंर्‍या आहेत.)

मु.पो. जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

'शिका'मध्ये 'शिकवा' हे अपेक्षित नाही का?


गेल्या वर्षी जालंधर येथील बोधिसत्त्व आंबेडकर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सोहनलाल जिंढा यांचे या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त निमंत्रण होते. इंग्रजी माध्यमाची एखादी चांगली शाळा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी अनुयायांनी काढली असल्याचे मला माहीत नाही. एवढेच नाही, तर सर्वच जातिधर्माच्या लोकांना आजच्या शिक्षणसंस्थांच्या स्पर्धेत आंबेडकर अनुयायांनी सुरू केलेल्या एखाद्या शाळेत जावे आणि आपला पाल्य त्या शाळेत शिकतो आहे हे त्यांनी इतरांना अभिमानाने सांगावे अशीही एखादी मराठी माध्यमाची शाळा महाराष्ट्रात चालू असल्याची मला माहिती नाही. सर्वाना सोडून देऊन मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबद्दलच असा प्रश्न का विचारावा याचा काहींना थोडा रागही येण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण त्याचे कारणही तसेच आहे. सर्व क्रांतिकारक परिवर्तन शिक्षणाच्या माध्यमातून घडू शकते याची जाणीव 19व्या शतकातल्या सर्व महापुरुषांना झाली. म्हणूनच 19व्या शतकात महात्मा फुले यांनी शाळा सुरू करून आपल्या कार्याचा आरंभ केला. लोकमान्य टिळकांनी आणि आगरकरांनी चिपळूणकरांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व किती कळले होते याची आम्हांला माहिती आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचा केवढा मोठा वटवृक्ष झाला. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सगळे आयुष्य वेचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याच मालिकेतले

महापुरुष आहेत. म्हणूनच त्यांनी प्रचंड कार्य करीत 1945 साली 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या सर्वच महापुरुषांना शिक्षण किती महत्त्वाचे वाटत होते हे कुणी वेगळे सांगायला नको. अशा या महापुरुषांच्या शाळेत अथवा महाविद्यालयांत शिक्षण घेतलेल्या अनेकांनी त्यांच्यानंतरच्या काळात यथाशक्ति गावोगावी शिक्षणाचा प्रसार केला हेही आपल्याला माहीत आहे. उदाहरणादाखल मी काही कार्यकत्र्यांची नावे घेऊ शकेल. विदर्भातले खडसे, पंजाबराव देशमुख, सोलापूरचे जगताप, कोल्हापूरचे कॉ. पानसरे, मराठवाडय़ातील केशवराव धोंडगे, गोविंदभाई श्रफ, विनायकराव पाटील हे नंतरच्या काळातही शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करणारे कार्यकर्ते होत. या पिढीला थोडेबहुत का होईना अनुदानाचे पाठबळ मिळाले आणि शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रभर झाला. दुसर्‍या फळीतल्या शिक्षणप्रसारकांच्या शाळा-महाविद्यालयातून ध्येयवादी तरुण निर्माण झाला नसेल; पण या शाळेतल्या विद्यार्थ्यांमधून एक नवा मध्यमवर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला हे नाकारता येत नाही. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयाचे आम्ही विद्यार्थी आहोत' हे अत्यंत गर्वाने सांगणारे आंबेडकर अनुयायी आहेत तसे जन्मदलित नसणारे, पण ज्यांच्या आयुष्यात बदल घडून आला असेही असंख्य विद्यार्थी मला माहीत आहेत, जे आंबेडकर अनुयायांइतकेच अभिमानाने आपण मिलिंदचे विद्यार्थी आहोत असे सांगतात. बाबासाहेबांच्या मिलिंद हायस्कूल अथवा काँग्रेसचे अपवादात्मक उदाहरण सोडून दिले तर दुसर्‍या टप्प्यावर आणि अनुदानाच्या मदतीने का होईना शाळा, कॉलेज नेटाने चालू ठेवणारे आंबेडकर अनुयायी किती आहेत?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वकालीन अथवा समकालीन महापुरुष शिक्षणाचे महत्त्व ओळखत होते. पण त्यांच्यापैकी कुणीही आपल्या आयुष्याचे घोषवाक्य 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असे दिलेले नाही. याचा अर्थच असा, की अन्य सर्व महापुरुषांच्या तुलनेत शिक्षणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटणारे महत्त्व निश्चितच मूल्यात्मकदृष्टय़ा वेगळे होते. अशा या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या, फारसे शिक्षण नसलेल्या एका पंजाबी अनुयायाने पब्लिक स्कूल जालंधर येथे स्थापन करावे याचे मोल मला अधिक वाटते. माझी इच्छा असूनही मी जालंधरला जाऊ शकलो नाही. पण हा माणूस 56 वर्षापूर्वी दीक्षाभूमी येथे आला. तो विराट जनसागर पाहून प्रभावित झाला आणि महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातली बौद्धसंस्कार करणारी एखादी शाळा आहे का याचा शोध घेऊ लागला. या शोधात तो विदर्भातल्या पुलगावात आला. हे गाव रसायनीसाठी प्रसिद्ध आहे. लष्कराची स्वातंर्त्यपूर्व काळातली अतिशय महत्त्वाची छावणी असल्यामुळे हे गाव महाराष्ट्रातल्या अनेक मोठय़ा शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. भंडार्‍याच्या निवडणुकीत या लहानशा गावाने 1954 साली बाबासाहेबांचा सत्कार करून तीन हजार रुपयांची थैली त्यांना दिली. त्या घटनेचे स्मरण म्हणून बाबासाहेबांनी एका रिकाम्या जागेवर कुदळ मारली. तिथे आज बुद्धविहार आहे. 1954 पासून एवढेच नाही, तर तेथील बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्थापन केलेले एक सिद्धार्थ ग्रंथालय आहे. आज या ग्रंथालयाला साठ वर्षे पूर्ण झाली असून ते तालुकापातळीवरचे 'अ' दर्जाचे गं्रथालय आहे. या ग्रंथालयात बाबासाहेबांच्या अस्थींचा कलशही जपून ठेवण्यात आला आहे.

अशा या गावात सोहनलाल जिंढा आले. या गावातील ग्रंथालय सातत्याने साठ वर्षापासून चालू ठेवणार्‍या गावकर्‍यांची जिद्द त्यांनी पाहिली. अतिशय विपन्नावस्था असूनही साठ वर्षापूर्वी पै-पैसा गोळा करून बाबासाहेबांना तीन हजार रुपयांची थैली देणारे गावाचे औदार्य लक्षात घेतले आणि अस्थिकलश जपण्याची भाविकताकही अनुभवली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी इंग्रजी माध्यमाचे पब्लिक स्कूल हवे ही त्यांची महत्त्वाकांक्षा. त्यांनी थोडा शोध घेतला आणि त्यांची भेट चंद्रसेन डोंगरे व लता डोंगरे या दाम्पत्याशी झाली. चंद्रसेन बँक अधिकारी तर लता डोंगरे नाटय़कलावंत. मी त्यांचा 'रमाई'चा एकपात्री प्रयोग पाहिला आहे. ही 'रमाई' त्यांनी थेट परदेशात पोहोचवली. हे दाम्पत्य पुढे आले. आयु. जिंढांनी तीन एकर जमीन खरेदी केली. 25 हजार रुपये देणगी देणारे अकरा जण चंद्रसेन यांनी गोळा केले. ही देणगी म्हणजे संस्थापक सदस्यांची वर्गणी आणि सुरू झाली जालंदर येथील बोधिसत्त्व बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूलची शाखा. अवघ्या पाच वर्षात शाळा, परिसर आणि इमारत या सर्वच गोष्टी नजरेत भरतील अशा या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त 'पुलगावला तरी यावे' असे जिंढा यांचे जिव्हाळ्याचे निमंत्रण आले. वर्धापनदिनाचा सोहळा धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या दुसर्‍या दिवशी होता. मी माझ्या कल्चरल संस्थेच्या सर्व कार्यकारिणीसह समारंभात सहभागी झालो.

शाळेच्या चिमुरडय़ा मुलांनी नृत्य-गायनाच्या आविष्कारातून भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवले. खास जालंधरच्या शाळेच्या पंधरावीस तरुण शिक्षकांनी पंजाबचे तर पुलगावच्या शिक्षकांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवले. जिंढांनी माहिती दिली, या शाळेत 40 टक्के दलित मुले आहेत तर 60 टक्के मुलेमुली गावातली आहेत. जन्मदलित नसलेली, अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्याचा, पण अध्यापन तेच आणि उपक्रमशीलता यातून संस्कार मात्र बुद्धिप्रामाण्यवादी बौद्धपद्धतीचे. मुलांनी वापराव्यात यासाठी 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर शाळेने छापलेल्या वह्या. या वह्यांची मुखपृष्ठे त्यांच्याच शाळेच्या चित्रांची. अगदी बारीकसारीक तपशिलात आढळून येत होती ती नियोजनबद्धता. कार्यक्रमात चेन्नई येथील विजय मेश्रम, नागपूरचे बिल्डर गुणवंत देवपारे यांनी शाळेच्या मदतीसाठी नजरेत भरेल अशी देणगी दिली, तर जालना येथील दिलीप कोल्हे यांनी फारशी आर्थिक कुवत नसूनही भरीव देणगी दिली आणि तेही अगदी

उत्स्फूर्तपणे. अवघ्या चारपाच वर्षाचे हे रोपटे दहापंधरा वर्षात कसे वाढेल याचा तर्क मी करू लागलो. हवे तर 'बाणाई'च्या सदस्याने सांगावे मी खोटे बोलत आहे का? आज बाबासाहेबांच्या अनुयायांजवळ पुरेसे अर्थबळ आहे. आपण समाजासाठी काही करावे ही इच्छाशक्तीही अखेर आहे. पण सगळा समाज निवडणुकीच्या राजकारणाला जुंपलेला आणि तीर्थस्थळे बांधून संघटित होऊ पाहणारा. विहार, महाविहार बांधून कृतार्थ होणारा. विहारांचे महत्त्व मी मुळीच नाकारत नाही. पण प्राधान्य कशाला द्यावे यालाही महत्त्व द्यायला हवे की नको?

परतीच्या वाटेवर यवतमाळला संध्याकाळ झाली होती. हिवरी येथे असेच एक तीर्थस्थळ लागले. बन्सोड नावाच्या कुण्या श्रद्धाळू अधिकार्‍याने स्वबळावर 3 एकरांत 'जेतवन तीर्थस्थळ' उभे केले होते. नियोजनबद्ध विद्युतरोषणाईमुळे तथागताच्या अनेक मूर्ती त्या विस्तीर्ण प्रांगणात विलोभनीय दिसत होत्या. विहार होता आणि विहारातही अनेक बुद्धमूर्ती होत्या. नांदेडजवळ पोचलो आणि दाभडचे 25 कोटी रुपये खर्च करून उभे राहत असलेले महाविहार पाहिले. खरेतर उमरखेडजवळ मुळावा इथे उभारण्यात आलेले विहार मात्र पाहायचे राहून गेले. धम्मसेवक भन्ते यांनी ते 'तीर्थस्थळ' करण्याऐवजी 'ज्ञानकेंद्र' व्हावे हा उद्योग सुरू केला आहे. प्रतिज्ञांचा आग्रह धरणार्‍या बौद्ध उपासकांना 'तीर्थ' कसे चालले, हा प्रश्न मला अजूनही सुटलेला नाही. बाबासाहेबांच्या घोषवाक्यातील 'शिका' या पहिल्याच शब्दावर अजून आपण रेंगाळत आहोत. संपूर्ण देश 'मूलनिवासी लोकांचा आहे'. सत्ता त्यांच्या हाती केंद्रित कधी होईल? याचा आटापिटा करणार्‍या आमच्या कार्यकत्र्यांना हे कधी कळणार, की त्यासाठी बालवयापासून आपल्या पद्धतीचे शिक्षण द्यायला हवे. ज्या आर्यांना शिव्या घालायच्या त्यांच्याच केंद्रात शिक्षण घेऊन मुले निब्बर होतील याची आपणहून व्यवस्था करायची आणि त्यानंतर तुम्ही 22 प्रतिज्ञांचे पालन का नाही करीत म्हणून उपासकांना दोष द्यायचा ही आपली लोकप्रिय पद्धत. आर्य समाजाने भारतभर गुरुकुल पद्धत रूढ केली. इंग्रजविरोध रक्तात रुजावा म्हणून सनातनी लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. इतकेच काय, सत्ता हाती येताच त्या वेळच्या सत्तेतल्या उजव्या मंडळींनी इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यापैकी कुणासाठीही बाबासाहेबांचे ते घोषवाक्य नव्हते. ते होते दलित, पीडित जनतेसाठी. म्हणूनच 'शिका' या सं™ोचे आपण काय केले, हा प्रश्न इतर कुणालाही विचारण्यापेक्षा बाबासाहेबांच्या अनुयायांनाच विचारला तर त्याचा कुणी राग मानू नये असे मला वाटते. दर पाच वर्षानी नेते एकत्र का येत नाहीत म्हणून आगपाखड करीत स्वत:चा क्रमाने शक्तिपात करून घेतलेल्या जनतेला 'जिल्हा तिथे पब्लिक स्कूल' या दिशेनेही वाटचाल करायला काय हरकत आहे? हजारो मैलांवरच्या सोहनलाल जिंढांना जे सुचले ते आपणाला निदान जाणवायला तरी काय हरकत आहे?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

हिवाळी अधिवेशन येता दारी..


नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वीच हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागणे सुरू होते. नागपूर विमानतळ ते विधानसभा, आमदार निवास, रविभवन रस्ते चकाकणे सुरू होते. आमदार निवासाची रंगरंगोटीही सुरू होऊन जाते. ज्या ज्या मार्गावरून आमदार, मंत्रिमहोदयांचा वावर असेल, जेथे त्यांचे निवासस्थान असेल तो तो परिसर एखाद्या नववधूसारखा सजूधजू लागतो. एरवी खड्डय़ात रस्ता आहे, की रस्त्यात खड्डे आहे, असा प्रश्न पडावा तेही रस्ते ठाकठीक होऊन जातात. कचर्‍याच्या बाबतीतही तेच. कचर्‍यात शहर आहे, की शहरात कचरा, हा प्रश्न एरवी पडतो. पण अधिवेशनकाळापुरता कां होईना हा प्रश्न पडत नाही.

नागपूर अधिवेशनाचे फायदे-तोटे यावर वाद होऊ शकेल. या अधिवेशनाला पूर्वी 'हुरडा पार्टी' अधिवेशन म्हटले जायचे. आता गावरान ज्वारी हे पीकच राहिले नसल्यामुळे अधिवेशनाला 'हुरडा पार्टी' अधिवेशनही म्हणणे शक्य नाही. पण या अधिवेशनाच्या निमित्ताने बर्‍याच लोकांची 'पिकनिक' होऊन जाते. तसाही अधिवेशनाचा मूड हा पिकनिकचाच असतो. ती साजरी होते आणि अधिवेशन संपते. पण नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान 'विदर्भ' कल्याणाचा आव आणला जातो हे मात्र खरे आहे. याच काळात झोपलेले पुढारी जागे होतात. एरवी विदर्भातील शेतकरी जगतो कां मरतो याचे सोयरसुतक नसणारे ह्याच अधिवेशन काळात एखादे 'पॅकेज' घोषित करतात. विदर्भातील समस्यांवर कधी तोंड न उघडणारे ह्याच काळात आपली तोंडे उघडतात. विदर्भातील कापसाचं बोंड फुटण्याचा, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी व त्याचदरम्यान पुढार्‍यांना 'तोंड' फुटण्याचा कालावधी योगायोगाने सारखाच असतो. वर्षानुवर्षे हा योगायोग चालत आहे.

सरडय़ाची धाव कुपापर्यंत तशीच हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय पुढार्‍यांची धाव अधिवेशनापर्यंत असते. याच काळात मोर्चे, निदर्शने, घेराव, उपोषणे, शिष्टमंडळे यांना ऊत येतो. अर्थात, आता ही उतमातही कमी कमी होताना जाणवते आहे हेही तेवढेच खरे. पूर्वीपेक्षा अधिवेशनकाळातील 'मंडपांची' संख्या कमी होताना दिसते आहे. मोर्चाची संख्या तर रोडावत आहेच; पण मोर्चातील माणसांचीही संख्या चांगलीच रोडावत आहे. यामागील कारणमीमांसाही होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने प्रचंड ताकद खर्च करून लाख-दीड लाख लोकांचा मोर्चा नागपूर विधानसभेवर आणला होता. अर्थात, एवढय़ा मोठय़ा संख्येनी माणसं अधिवेशनावर आणायची यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागतो. गावोगावी जाऊन प्रचार करावा लागतो. मोर्चामध्ये लोकांनी सामील व्हावे यासाठी लोकांची मानसिक तयारी करावी लागते. त्यांच्यासाठी वाहनेही पाठवावी लागतात. तेव्हा कोठे त्या वर्षी लाख-दीड लाखाचा मोर्चा भारतीय जनता पक्षाला नागपूर विधानसभेवर आणता आला. ज्या दिवशी हा मोर्चा निघाला त्याच दिवशी विधानसभेत आमदार गुलाबराव गावंडे यांनी लीटर-दीड लीटर रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने काढलेला लाख-दीड लाखाचा मोर्चाही आ. गुलाबराव गावंडेंच्या लीटर-दीड लीटर रॉकेलसमोर फिका पडला. भारतीय जनता पक्षाच्या मोर्चावर एका अर्थाने गुलाबराव गावंडेंनी रॉकेलचा बोळा फिरविला. गुलाबराव गावंडेंनीच सर्व वृत्तपत्रांचे मथळे काबीज केले आणि भाजपाचा मोर्चा मात्र वृत्रपत्रांच्या पानावर अडगळीत फेकल्या गेला. मेहनत करूनसुद्धा भाजपच्या तोंडाला एका अर्थाने पानं पुसली गेली व गुलाबराव गावंडेंनी लीटर-दीड लीटर रॉकेल विधानसभेत अंगावर ओतून घेतले. ते 'हिरो' ठरले. त्यांचीच चर्चा. त्यांचाच बोलबाला. वृत्तपत्रात त्यांचेच मथळे. त्यांचेच फोटो. त्यांच्याच मुलाखती, असा काहीसा प्रकार त्या वर्षी घडला.

गुलाबराव गावंडे माझे मित्र. त्यांना मित्रत्वाच्या नात्याने अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा 'स्टंट' करण्यापेक्षा प्रश्न घेऊन लोकांमध्ये जा. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर त्यांच्यामध्ये जागृती करा, त्यांना संघटित करून त्यांचे विधानसभेवर शक्तिप्रदर्शन करा, असा मित्रत्वाचा सल्ला मी गुलाबराव गावंडेंना दिला. त्याप्रमाणे गुलाबराव गावंडेंनी प्रचंड मेहनत घेऊन पुढच्या वर्षी चार-पाच हजारांचा अकोला ते नागपूर असा 'सायकलमार्च' नागपूर विधानसभेवर आणला.

त्याच दिवशी आमदार बच्चू कडू पाण्याच्या टाकीवर चढले आणि 'मथळे' बच्चू कडूंचे झाले. गुलाबराव गावंडेंच्या मेहनतीवर पाण्याच्या टाकीतील 'पाणी'

फेरल्या गेले. मेहनतीवर पाणी फेरले जात असेल आणि एखादा 'स्टंट' केला तर त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळणार असेल तर मेहनत कोण घेणार? त्यामुळे विधानसभेच्या काळातसुद्धा सभागृहात काही करण्यापेक्षा सभागृहाबाहेरच प्रसारमाध्यमांसमोर आमदार काहीना काही करताना दिसतात. सभागृहाबाहेरच जर ह्यांना काही करायचे होते तर आमदार बनून हे सभागृहात गेलेच कशाला? असाही आजकाल प्रश्न पडतो. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असे मतदारांना आवाहन करीत विधानसभेत आलेला आमदार विधानसभेत न बसता विधानसभेच्या बाहेर निदर्शने-प्रदर्शने करण्यात वेळ खर्ची घालताना दिसतो. तेव्हा खरेतर प्रश्नचिन्ह 'विधानसभे'वरच उपस्थित होते. विधानसभेत लोकांचे प्रश्न धसास लागत नाही कां? विधानसभेत आमदारांनासुद्धा प्रश्न मांडण्याची संधी मिळत नाही कां? त्यांचीसुद्धा तेथे घुसमट होते कां? तशी घुसमट होत असेल तर त्यावर तोडगा काय? यावरसुद्धा गांभीर्याने चर्चा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, एवढे निश्चित.

बर्‍याच गोष्टी झपाटय़ाने बदलताना दिसताहेत. पूर्वी गरीब लोकप्रतिनिधी असायचे. आता 'गरीब लोकप्रतिनिधी' हा शब्द वद्तोव्याघात बनताना दिसतो आहे. एसटी बसमध्ये आजही आमदार किंवा खासदारांसाठी राखीव जागा असे लिहिलेले आपण वाचतो. तेव्हा पूर्वी कधीतरी आमदार किंवा खासदार एसटीमधून प्रवास करीत असावे अशी शंका घ्यायला जागा निर्माण होते. आमदार निवास म्हणजे जेथे अधिवेशनकाळात आमदार राहत होते ती जागा. हल्ली आमदार निवासात राहणार्‍या आमदारांची प्रजाती झपाटय़ाने कमी होताना दिसते आहे. बरेचसे आमदार उतरतात 'हॉटेल'वर. तेथे त्यांना 'प्रायव्हसी' मिळते आणि त्यांचा खर्च करणारेही भरपूर असतात. गेल्या अनेक वर्षांत मी आमदार किंवा खासदार एसटीमध्ये प्रवास करताना पाहिला नाही तसेच पुढील काळात आमदार निवासात आमदार दिसला तर 'ब्रेकिंग न्यूज' होऊ शकेल.

नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात विधानसभेत काय होते याहीपेक्षा विधानसभा 'बाह्य' कथा या काळात जोरदार ऐकू येतात. रात्रीच्या होणार्‍या पाटर्य़ा, त्यातही हॉटेलमधील पार्टय़ाऐवजी नेत्यांच्या 'फार्महाऊस'वर गाजणार्‍या पार्टय़ाची चर्चा तर अधिवेशन आटोपल्यानंतरही बराच काळ होत राहते. अधिवेशनातील चर्चेपेक्षा 'फार्महाऊस' चर्चा अधिक सुरस असतात.

नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन, त्यावर होणार खर्च, त्या खर्चाची फलनिष्पत्ती काय? असले प्रश्न पडतातआणि विरूनही जातात. महाराष्ट्रात विदर्भ राजी खुशीने सामील करून घेण्यासाठी अकोला आणि नागपूर करार झाले. नागपूर करारानुसार एक-दीड महिना कालावधीचे अधिवेशन नागपुरात घ्यावे असा करार झाला. त्या कराराचा भाग म्हणून नागपूर अधिवेशनाचे 'कर्मकांड' 'सत्यनारायणा'च्या पोथीप्रमाणे उरकले जाते. पोथी संपल्यानंतर प्रसाद वाटावा तसा 'पॅकेज'चा प्रसादही अधूनमधून वाटला जातो. बर्‍याच वेळा तर प्रसादाच्या नावावर वैदर्भीयांच्या हातावर 'भुरका'ही पडायची मारामार. नागपूर अधिवेशनाचा कालावधी तर नागपूर करारात ठरल्याप्रमाणे कधीच राहिला नाही. पण पूर्वी अधिवेशनाचा कालावधी 'करारात' ठरलेल्या कालावधीच्या जवळपास असायचा. 1960 मध्ये नागपूर अधिवेशनाचा कालावधी होता27 दिवसांचा. 1961 चे अधिवेशन होते 25 दिवसांचे. 1968 मध्ये नागपूर अधिवेशन होते 28 दिवसांचे. 1960 ते 1974 या वर्षामध्ये नागपूर अधिवेशनाचा कालावधी साधारणत: दोन आठवडय़ांच्या वरच राहिला. पण नंतर मात्र हा कालावधी कमी कमी होत गेला. 2000 सालानंतर तर अधिवेशन 10-11 दिवसांतच 'उरकल्या' गेले. क्वचित एखाद्या वर्षाने 12 वा दिवस अधिवेशनाचा पाहिला असेल. एकूणच नागपूर अधिवेशनाचा कमी कमी होणारा कालावधी.

अधिवेशनाला 'हुरडा पार्टी' अथवा 'पिकनिक' म्हटल्या जाणे, अधिवेशनाने 'गांभीर्य' हरविणे आणि एखाद्या 'कर्मकांडा'चे रूप त्याला प्राप्त होणे ही निश्चितच चिंताजनक अवस्था आहे, असं तुम्हाला नाही वाटत?

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842
     

Wednesday 5 December 2012

असे मानुसकीचे घरं


शंकर बडेवर्धेच्या एका कार्यकरमात मले नाटककार सतीश पावडे यायनं इचारचं का 'या कवितेने तुम्हांला काय दिले?' म्या त्या वक्ती त्यायले देल्लेलं उत्तर होतं का ं'ही कविता जर मला महाराष्ट्रातील अशी अनेक घरं देत असेल की, ज्या घरी मी त्यायचाच असल्यावानी जाता येत असेल तर याहून कवितेनं काय द्यावं?' खरंतं हे एकच उत्तर असनं त्या प्रश्नाचं? नाई! काऊन का या कवितायनं जे मले भटलं ते अखीन कायनंच भेटलं नाई. कविता लेयल्या गेली का मनाले होणारी खुसी, आयकनार्‍याले सुखावतानी पाह्यताना खुसीत होनारा वाढवा. परिसिद्दीच्यानं वाढत जानार्‍या ओयख्या हे इतर जनावानी माह्यायी हिस्यावर्त आलं. पन याहीपरीस बोलीतल्या या कविता जवा माह्या जगन्याचा अधार झाल्या तवा कविता माह्यासाठी सर्वेसर्वा झाली. रिकाम्या पोटाले कविता भाकर देऊ शकते हा अनुभव आयुक्श्याले पुरून उरनारा ठरला.

अंदाजे 85/86च्या साली मी 'युगवाणी' या वि. सा. संघाच्या संपादक मंडयावर्त होतो. तवा मिटिंगच्या निमतानं नागपूरले जानं होये. तवा बंधू म्हनजे बर्‍हानपुरे यायच्या ओयखीच्यानं नागपुरातल्या बर्‍याचं मोठय़ा मंडयीसंग ओयख व्हाचा योग ये. माही त्या मंडयावर्त असन्याची खुसी हे होती की, आमच्या भागातल्या सुद्या कविता लेयनार्‍यायच्या कविता तवा छापून आनता आल्या. त्यादरम्यान नागपूरच्या कवयित्री श्रद्घा पराते यायची ओयख झाली. ओयख वाढल्यावर नांदगाव पेठ, वरूड, उमरावतीच्या आझाद हिंद मंडयाच्या गनपतीच्या कविसंमेलनात बलावता आलं. पुढ काई अडचनीच्यानं ते खंडलं, पन ओयख अजूनयी कायम हाय. त्यायच्या घरातयी अनपुर्नेचा वास हाय. ह्या अनपुर्नेच्या लेकी आलेला पावना रिकाम्या पोटी कवाच जाऊ देत नाईत. मनापासून केलेल्या अन्नाले आपसुकचं चव येते त्याच्या अनुभव म्या कैकदा घेतला. चांगल्या ओयखी वाया जात नाई म्हंते. भाऊ समर्थसारक्या इतल्या मोठय़ा चित्रकाराची ओयख श्रद्घाजीच्यानं झाली. भाऊसारक्या मोठय़ा कलाकारानं माह्यासारक्या लहानस्या लेयनार्‍यावर्त जीव लावला. त्या वक्ती एकडाव भाऊच्या घरी जाचा योग आला. अस्या मोठय़ा

मानसाचा उलिसा भेटलेला सहवास आपल्या जिवाचं सोनं करून टाकते. चंदनासंग राह्यल्यानं घडीभर्‍यासाठी का होयना अपनंयी सुवासाचे धनी होऊन जातो.

मीतं म्हन्तो मानूस आपल्यापरीस मोठा असो का लहान, पन सामोरच्याच्या कायजात उलिसाक कोपरा भेटनं म्हनलतं अवघड आन् म्हनलतं खूप सोपं असते. दि. 25 जाने. 82 नागपूरले रिझर्व्ह बँकेच्या रिक्रेशन क्लबचा रंजन सभागृहात कविसंमेलनाचा कार्यक्रम होता. कलीम खान, मिर्झा बेग हेतं होतेच. पन आयोजकायनं मले इचारलं कां 'राजा धर्माधिकारी नावाचा नवोदित पण चांगला कवी आहे. तो तुमच्यासोबत असला तर चालेल कां?' मनात म्हनलं लेकं आपन मोठे झालो कां? मंग म्यायी तवा राजेशाही थाटात म्हनलं, 'चालेल' ही राजाची पहिली भेट. आता खरं सांगाले हरकत नाई. पह्यल्या भेटीत असं वाटलं हा लोकाचा लयंच चोपडा बोलते. मलेच घसरल्यावानी वाटे. तवा मी बोरीले खेडय़ात राहो. तवा इतकं सुदं आयकाची आदत नोती. मंग त्याले म्या बलावलं यवतमायच्या नगरपालिकेले शंभर वर्स झाले म्हून. जे मोठमोठे कार्यकरम होते त्यातनी वर्‍हाडी कविसंमेलन ठुलं होतं. त्यासाठी गडी भाई खुस झाला. काऊन कां कविसंमेलनंच तसं होतं ना! वध्रेचे प्रा. देवीदास सोटे, प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, सौ. मीराताई ठाकरे आन् मी तवा शिक्षणाधिकारी होते श्री. वातिले सायेब. मले म्हने, कार्यकरम ठेवाचा कुठी? दोन ठिकानं होते. त्यासाठी लहान कार्यकरमाले टाऊन हाल आन् मोठय़ाले आझाद मैदानात भल्लामोठा मांडव टाकला होता. पंचवीस हजार मानसं मावतीन इतला. म्या मनात म्हनलं झोल नाई खाची आपल्या बावाजीनं सांगतलं हाय. म्या वातिले सायबाले म्हनलं मांडवात. ते म्हनेत मांडवात? म्हनलं मी सांगतो तसी धुवाधार जाहिरात करत असानं तं मांडवात ठुवा. माहा यवतमायकराच्या रसिकतेवर इस्वास हाय. झालंयी तसंच बारा तेरा हजाराच्यावर्त माहे यवतमायचे रसिक हजरी लावाले आले होते. प्रा. इठ्ठल वाघ म्हनेत, अरे, काय साऊंड सिस्टीम हाय आणि काय लोकं आहेत! तं राजा सारका नईन गडी खुसचं नाई होनार?

आपन कोनाचं नाव सांगतो म्हंजे उपकार नसतो करत सामोरच्यावर. त्याच्यापासी काईतरी अस्ते म्हून आपल्या तोंडून नाव निंघते. बी सकस असनंतं जमिनीत पडल्यावर्त उगवनारतं हायेच. आज ना उद्या मंग द्याना हात. मले एक-दोन वाचकानं फोनवर्त म्हनलं का, तुमी जवातवा सुदंच जादा लेयता. तुमच्या संग कुदं घडतंच नाई का? आता सांगू घडतेना.. पन कोयसा उगायन्या परीस चंदन घासावं म्हंजे आपल्याले समाधान भेट्टे आन् जगालेयी सुवास देता येते. एका दिसी राजा धर्माधिकारीचा फोन आला. बाबासाहेब घरी आहा का? म्या उत्तर देल्लं. राजा, मी जेव्हा लँडलाईनवर बोलून राहलो तर मी घरी नाही, तर कलेक्टरच्या बंगल्यावून बोलणार आहो का? आपन कवी असल्याचं त्यानं एकडाव अखीन सिद्घ केलं. त्यानं सांगतल्यापरमानं तो दहा-पंदरा घरी पोचला. आमी दोघं सामोरच्या खोलीत बसून होतो. हा आला म्हून पानी आनासाठी हे उठाले लागली. तवा तिचा उठाचा तरास. मंग भितीचा अधार घेतल्यासिवाय तिचं चालता ना येनं पाह्यल्यावर्त हा हबकून गेला. तो मले म्हने, 'तुमी जो त्रास सांगितला याच्यावर बोराळ्य़ाचे वैद्य झाडपत्तीचं जालीम औषध देतात. तुम्ही परतवाडय़ापर्यंत या. मी माझ्या गाडीत तिकडे घेऊन जातो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा.' मी गाडी करूनच गेलो. परतवाडय़ावून तो आमच्या संग आला. त्याची तिथयी ओयख होती. वापेस येतानी एका खेडय़ात गाडी थांबवाले लावून एका घराचे गावरानी कवेलू फेरनं चालू होते. तिथून दोन कवेलू मांगून आनले. त्याच्यातली एक दवाई खपरेलावर गरम करून खाची होती. तो म्हने, 'तुम्ही शहरात हे गावरानी कवेलू कुठं शोधणार?' मले पह्यल्या भेटीत चोपडा बोलते वाटनार्‍या राजाचं बोलनं मलमावानी गुनकारी वाटाले लागलं.

परतवाडय़ाले आलो तं राज्याच्या रानीनं पाहुनचार तयार ठुलेला. जसे आमी तिच्या माहेरचे पावने होय. राजाच्या घरात अनपुर्नाचा वास हाय. माह्या नसिबात असेच घरं हायेत त्याले मी तरी काय करू ? या पावसातलं अखीन एक घर. तुमाले एक सांगू, वरच्यानं याचं वाटप करतानी ढकलचं नाई केली. निवडून निवडून सुदे घरं माह्या हिस्यावर देत गेला. आता इतक्या सालात सोबतीनी, मैतरीनीतं भेटल्या; पन ताई दोनच. एक सौ. मीनाताई गावंडे (मोर्शी) आन् सौ. मीराताई ठाकरे (आकोला). मीराताई माह्यातं ताई झाल्याचं, पन ईची ननंद, पोरा-पोरीची आत्या आन् ठाकरे सायेब आमचे बापू. रगताच्या नात्यापरीस उजवेपनं या नात्याले आलं. सुखदु:खाले वाटून घ्याले असं घरं नसिबानंच भेट्टे.

मांगच्या साली याच मयन्यात माह्या लहान पोरीचं कीर्तीचं लगन झालं. त्यासाठी मीराताई आन् ठाकरे सायेब दोघयी आले. राजा धर्माधिकारी, प्रा. घोंगटे, सुरेश गांजरे, प्रमिला उमरेडकर मॅडम, अकोटाचे अन्ना पारसकर फुल फॅमिलीसंग. ही मले घर देनारे मानसं पोरीच्या लगनात घरच्या मानसासारके जातीनं हजर होते. तुमाले वाटनं सरले असतीनं घरं, पन तसं नाई. टायमा-टायमानं घेऊन जाईन घरं हिंडवाले. या कोजागिरीच्या वक्ती यवतमायले बी अँड सीत माहे दोस्त हायेत मारूळकर सायेब. त्यायले माहा कार्यकरम पाह्यजे होता, पन त्या तारकीले माहा कार्यकरम पुसदले होता. म्या त्यायले सांगतलं, सायेब, मी दोन नावं सांगतो. राजा धर्माधिकारी आन् गौतम गुळधो मस्त कार्यकरम करतेतं. कवा राजा माहा नंबर माईत नसनार्‍याले नंबर सांगते. एकमेका साह्य करू.. काई असेयी हायेत कां आपलंच सावडत बसतेतं. त्यायचं त्यायच्या पासी. एकजन मले इचारे, 'काहो, दोन कवीतूनतं ईस्तू नाई जात म्हन्ते तुमीतं कवीच्या घरातयी कसे पोचता?' म्या सांगतलं, 'तसे कवी फुलटाईम कवी असोतं. मी कविता लेयत असलो, म्हनत असलो का कवी असतो. बाकी टायमाले मानूस असतो. म्हून असे मानुसकीचे घरं माह्या हिस्यावर्त येते! येवू का?'

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.

'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

कोणत्या युगात आपण सत्यवादी होतो?


अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या एका परिसंवादात मी सहभागी झालो होतो. बहुधा माझी ही आठवण 20-21 वर्षापूर्वीची असावी. सभामंडपात बर्‍यापैकी गर्दी होती. सुप्रसिद्ध सिनेनट सदाशिव अमरापूरकर एखाद्या स्वयंसेवकाप्रमाणे सभामंडपात वावरत होते. श्री. अमरापूरकर हे केवळ सिनेनट नाहीत. ते श्रेष्ठ दर्जाचे विचारकही आहेत आणि मुळातून नाटय़चळवळीतून ते सिनेमाकडे वळले आहेत. ते मूळचे अहमदनगरचे. पण आजच्या अगदीच नव्या पिढीला त्यांचा हा असा परिचय फारसा माहीत नसावा म्हणून मी ही नोंद केली. त्यांच्या पुढाकारामुळेही असेल कदाचित, पण परिसंवादाचा विषय हा नाटकातून प्रकट होणार्‍या प्रागतिक विचाराशी संबंधित होता. त्यामुळं त्या परिसंवादात बोलताना मलाही खूप आनंद झालेला होता.

आता नक्की आठवत नाही; पण विषयाच्या ओघात मी म्हणालो, 'आपण आपले धर्मग्रंथ काळजीपूर्वक वाचत नाही हे बरे आहे. कारण धर्मग्रंथ आपण काळजीपूर्वक वाचलेत तर आपल्या धर्मश्रद्धा कायम राहतील का, हा प्रश्नच पडतो'. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री जयराम रमेश शौचालयाबद्दल बोलले आणि बर्‍याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींच्या भावना दुखावल्या. मी ती बातमी वाचली आणि मला नगरचा तो प्रसंग आठवला.

माझे भाषणातले प्रतिपादन असे होते की, आपले धर्मश्रद्ध लेखक, कवी आपली श्रद्धा व्यक्त करण्याच्या भरात काय व्यक्त करतील याचा नेम नाही! उदाहरणार्थ : वेश्याव्यवसायाकडे आपला समाज आदराने पाहत नाही. जुन्या काळीसुद्धा तो आदराने पाहत नसावा. नाहीतर एक पवित्र आणि श्रेष्ठ व्यवसाय म्हणून आपण त्या व्यवसायाला मान्यताच दिली असती. असे असले तरी आमचा कवी थेट देवालाच वेश्येकडे पाठवतो. बरं तो देव तरी साधा का? देवांचा देव महादेव! हाच एका रात्रीसाठी वेश्येकडे जातो. त्या वेश्येचे नाव महानंदा आणि ही आपल्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहे त्याची हा आपला महादेव परीक्षा घेतो. महानंदेच्या घरी रात्रभर मुक्कामाला असताना ती ग्राहकाकडे इमानेइतबारे लक्ष देते, की आपल्या मालकी हक्कांच्या वस्तूची काळजी घेते त्याची परीक्षा घेण्यासाठी महादेव महानंदेच्या खुराडय़ाला आग लावतात. बिचारी कोंबडी भाजून मरते; पण महानंदा विचलित होत नाही. तिची ही निष्ठा पाहून महादेव प्रसन्न होतात आणि खुराडय़ातले सर्व पक्षी ते जिवंत करतात. आता ही कथा 'शिवलीलामृत' नावाच्या पोथीतल्या अकराव्या अध्यायात आली आहे आणि हा अकरावा अध्याय महाराष्ट्रभर दर सोमवारी घरोघरी वाचला जातो. माझ्या भाषणानंतर एक धर्मश्रद्ध गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, माझ्या मुलीला मी तो अध्याय वाचायला लावतो. अगदी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सोमवारी, अगदी दर सोमवारी. पण माझी मुलगी मला नेमका हाच प्रश्न विचारते आहे, 'ही कसली परीक्षा?' आणि असा अध्याय वाचून आम्ही कोणता संदेश घ्यावा? ना. जयराम रमेश हिंदुत्ववादी नसतीलही, पण ते हिंदू तर नक्कीच असावेत आणि मंदिर आणि देवांबद्दल कितीही राग आलेला असला तरी ते मंदिरांना.. म्हणतील असा तर्कही कुणी करू शकत नाही. फार काय, 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे मानणारे कट्टरपंथीय कम्युनिस्ट हिंदूसुद्धा असे विधान करणार नाहीत. मी काही जयराम रमेशांच्या वक्तव्यावर लेख लिहीत नाही, तर धर्मश्रद्ध मंडळी आपल्या श्रद्धेच्या भरात काय आणि कसे भयंकर लिहून जातील याविषयी लिहितो आहे. 'तुम्ही विचार करू नका. आम्ही तुम्हांला पुण्य देऊ, पण आम्ही म्हणतो तेवढय़ा आ™ोचे पालन करा', असे या देशातल्या पुरोहितवर्गाने सातत्याने सांगितले. त्यांनी सांगितले म्हणून गेली दीडशे वर्षे आपण या पुरोहितवर्गाला झोडपतो आहोतच. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण उरलेल्या सर्व धर्मश्रद्ध जनतेने खरेच आपल्या मेंदूचा मुळीच विचार न करता ते ऐकून कसे घेतले, असाही प्रश्न आपण निदान आज विचारायला नको? त्यांना हवा तर दोष देऊ नका, पण निदान 'स्वत:च्या डोळ्य़ाने विचार करा', एवढे तरी सांगण्याची आपली जबाबदारी आहे की नाही? हा माझ्या या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा आहे. नगर येथील परिसंवादानंतर जो पालक मला येऊन भेटला तो माझ्या बोलण्याने अस्वस्थ का झाला? मी माझे कुठलेही मत व्यक्त केले नव्हते. धर्मश्रद्धा टाकून द्या, असेही म्हणालो नव्हतो. ज्यांनी 'शिवलीलामृत' हा ग्रंथ लिहिला त्यांचे पांडित्यही मी नाकारले नव्हते, की त्यांच्या धर्मश्रद्ध वृत्तीलाही आव्हान दिले नव्हते. 11व्या अध्यायातली आहे तेवढी गोष्ट सांगून या इथपासून आज कोणता बोध घ्यावा, एवढाच प्रश्न मी उपस्थित केला होता. तसे तर हा अध्याय वाचल्यामुळे पुण्य मिळते, निर्धन धनिक होतो, निपुत्रिकाला संपती प्राप्त होते इत्यादी बोध अध्यायाच्या अखेरीस आलेले होते. वेश्येने वेश्येचे काम निष्ठेने करावे म्हणजे तिला सुखप्राप्ती होते. पुण्य लाभते. अशा आणखी एका बोधाकडे मी श्रोत्यांचे लक्ष वेधले होते. कारण याच अध्यायात महानंदेची निष्ठा पाहून महादेवाने तिची मेलेली कोंबडी पुन्हा जिवंत केली. ते तिच्यावर प्रसन्न झाले असेही वर्णन आलेले आहे. कर्मविपाकाचा सिद्धान्त हा दृढ व्हावा यासाठी ही कथा सांगण्यात आली आहे. सामान्यपणे धर्मश्रद्ध मंडळी असे सांगत आली आहेत, की चार युगांपैकी आजचे कलियुग तेवढे पापी माणसांचे आहे. रोजची वर्तमानपत्रे उघडली, की एकदोन घोटाळे, एकदोन बलात्कार, एकदोन दरोडे या बातम्या वाचायला मिळतातच. त्यामुळे धर्मश्रद्ध मंडळींच्या मते, 'कलियुगात पापी माणसे वाढली आहेत म्हणून असे घडत आहे'. या विधानास नाकारता येत नाही. आज मी त्यांचा हा मुद्दा नाकारूही इच्छित नाही. माझा प्रश्न वेगळा आहे. कृत, त्रेता, द्वापर यांसारख्या युगात तरी जगात पापी माणसे नव्हती असे म्हणता येते का? हा आहे.

'शकुंतला : इतिहास, पुराण आणि काव्य' या नावाचा एक दीर्घ लेख गुरुवर्य नरहर कुरुंदकरांच्या 'मागोवा' नावाच्या ग्रंथात आलेला आहे. 'शाकुंतल' हे कालिदासांचे अतिशय लोकप्रिय नाटक आहे. महाभारतातल्या आदिपर्वात आलेल्या शकुंतलेच्या कथानकावर ते आधारलेले आहे. 'महाभारत' हा ग्रंथ काही कलियुगातला नव्हे. राजा दुष्यंताने ज्या शकुंतलेचा उपभोग घेतला तीच त्याला आठवत नाही, असे तो म्हणतो. याचा अर्थच तो खोटे बोलत होता. त्याने दिलेली लग्नभेट म्हणजे अंगठी ती पाहिल्यानंतर मात्र त्यास स्मरण झाले. हे आपण खरे मानायचे? खरेतर अनेक स्त्रियांचे उपभोग घेणार्‍या एखाद्या मर्द राज्यकर्त्याने कुणाकुणाचे म्हणून स्मरण ठेवावे असाही कुणी भलताच अर्थ काढला तर काय घ्या? रावण तर दशग्रंथी ब्राह्मण होता असेही सांगितले जाते. तरी त्याने विवाहित स्त्रीला पळवून न्यावे? एखादी स्त्री सुंदर आणि देखणी तर आहे, पण मासळीचा व्यवसाय करणार्‍या घरात लहानाची मोठी झाल्यामुळे त्या मत्स्यगंधेबरोबर केवळ आवडली म्हणून समागम करायचा तरी कसा? शरीराच्या दुर्गधीचे काय करायचे? मग एखादा मुनी आपल्या योगबळावर तिला योजनगंधा करून टाकतो आणि मग तिचा उपभोग घेतो. आता एवढं पुण्य ज्याच्याजवळ नाही तो कलियुगातला पुरुष आपले काम अत्तरावर भागवतो नाही का? पण मग या दोन्ही मनोवृत्तीत नेमका फरक कुठे आहे? दिवसा उजेडी समागम करता येत नाही म्हणून एखाद्या ऋषीने स्वसामर्थ्याच्या बळावर सूर्यालाच अडसर निर्माण करून तेवढय़ापुरता अंधार निर्माण करावा हे ऋषीचे कृत्य आणि आजच्या एखाद्या खलनायकाने दार लावून, दिवे विझवून हाच उद्योग करावा अशा खलनायकाचे कृत्य ह्यात प्रवृत्तिभेद तो कोणता? देवकीपुत्र आपणाला ठार मारणार या भयाने घाबरलेल्या कंसाने देवकीच्या प्रत्येक पुत्राला ठार मारावे आणि उद्या हुंडय़ापायी आजही जगणे नकोसे होईल या भयापोटी आजच्या काळातल्या एखाद्या जन्मदात्या पित्याने मुलीला जन्मास आल्याबरोबर जिवंतपणी पुरून टाकावे यात तरी वृत्तिभेद कोणता? भीमाने पुन:पुन: दोन तुकडे केलेला जरासंध मरत नाही हे पाहून श्रीकृष्ण युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होता जरासंधाला कसे मारावे हे एका लहानशा कृतीने दाखवून देतात. आजचे काही डॉन अशाच पद्धतीने कृती करीत राजकारणात मुत्सद्दी म्हणून मिरवतात असे आता आपण वाचतो. हस्तकांच्या मार्फत ते खूनही घडवून आणतात असेही दृश्य पाहायला मिळते की नाही? माझ्या मनात कृत, त्रेता आणि द्वापर युगात जी पुण्यवान आणि आदर्श मंडळी होऊन गेली त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. ज्या कवी-कथाकारांनी त्यांच्या कथा लिहून ठेवल्या त्यांच्याबद्दल तर जास्तच आदर आहे. कारण त्यांनी जे लिहिले ते अतिशय प्रामाणिकपणे लिहून ठेवले असे मला वाटते. मी कुठल्याही युगाला दोष देत नाही. मला सांगायचे एवढेच आहे, की जसजसे आपण मागे जाऊ तसतसे जग अतिशय पुण्यवान माणसांचेच होते आणि आजचे युग तेवढे पापी माणसांचे आहे ही समजूत चुकीची आहे हे आपण समजून घेणार आहोत की नाही?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

पहा उलाला


''ओ बाप्पू.. या इकडे''
'' कायले?''
'' ग्रामपंचायतीत बसू''

''काय हाय तिथीसा?''

'' उलाला उलाला'

''म्हणजे?''

'' सरकारनं प्रत्येक ग्रामपंचायतले मोफत कांपुटर देला अन् त्याच्यात इंटरनेट देलं''

'' कायले देला कांपुटर?''

''सरकार म्हणते ग्रामपंचायतचं रेकॉर्ड मंत्रालयात समजलं पाह्यजे.. हिसोब समजला पाह्यजे.. त्यासाठी पेशल कांपुटर ऑपरेटर ठेवला, आपल्या गावच्या बारक्याले हे काम भेटलं पण तो, दिवसभर इंटरनेटवर पिच्चर पाह्यत बसते.. गाणे लोड करून सार्‍याइले फुकट दाखोते''

'' अरे मंग आपूनबी पाहू उलाला''

'' ओ बारक्या.. अरे ते उलाला उलाला लाव.. बापूले पाहू दे..घ्या पाहून बाप्पू.''

'' अरे लेक .. कोणती हिरोईन व्हय?''

'' विद्या बालन''

'' आंगात गुंडमुंड दिसते लेका.. अन् तो हिरो?''

''नासिरुद्दीन शाहा''

'' नासीर त म्हतारा झाला रे?''

'' त्याले मेकप करून जवान केलं''

'' मस्त मनोरंजन हाय गळ्या''

'' रात्रीचे तीस-चाळीस मानसं रोज येऊन बसतात अन् जे नाही ते पाह्यतात''

'' म्हणजे काय पाह्यतात?''

'' आयुष्यात जे पाह्यलं नाही ते पाह्यतात.''

'' काय काय दिसते याच्यात ?''

'' जे नाव टाइप केलं ते दिसते.. डायना टाइप केली की डायनाची कुंडली दिसते.. घ्या पाहून डायना''

'' हे मेली की जिती हाये?''

'वरते गेली''

'' एवढी चांगली कशी गेली रे? असं वाटते जिचीत हाय''

'' मार्लिन मेन्रो पाहा''

'' हे कोण व्हाय रंभा?''

'' इंग्लंडची हिरोईन''

'' हे लय भारी दिसते लेका''

'' इंटरनेटवर सारे भारीच अँटम सापडतात, आपल्या गावचे लोकं रोज नवीन नवीन रूप पाह्यतात, तेवढेच जनरल नॉलेज वाढते''

''अशा बाया पाह्यासाठी इंटरनेट असते काय?''

'' आपल्या इंडियात हेच पाह्यतात, इंटरनेटवरून अभ्यास करणारे कमी असतात अन् रिकामे धंदे करणारे जास्त असतात''

'' मस्त टाइमपास हाय गळ्या''

'' सरकार म्हणते खेडय़ातला माणूस हुशार झाला पाह्यजे, त्याले जागतिक माहिती समजली पाह्यजे- म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतले एक-एक कांपुटर देला''

'' माह्या पोराच्या मोबाईलवर इंटरनेट दिसते बाप्पू'' ''पाह्यजा लक्ष ठेवजा.. नाही तर तो अभ्यास सोडून रंभाच पाह्यत बसीन.. यानं पोट्टे लवकर बिघडतात, याच्यातून चांगलं घेतलं पाह्यजे अन् वाईट सोडून देलं पाह्यजे. तरच फायदा होईन नाहीतर उलाला..''

''आजकाल प्रत्येकाच्या घरावर छत्री अन् इंटरनेट कंपलसरी झालं. मंर्त्यांचं लगन छत्रीसाठी अडलं''

''काहून?''

'' पोरगी म्हणते पोराच्या घरावर छत्री नाही, मी त्याच्याशी लगन करत नाही, म्हणून त्यानं कालच अर्जट छत्री आणली, पोरीच्या बापाले फोन केला की छत्री बसोली.. आज डबल पाव्हने येऊन राह्यले''

'' पाह्य बरं.. छत्रीले किती महत्त्व आलं? माह्या लग्नात मले चारशे रुपयाचा बुश कंपनीचा रेडू आंदनात भेटला होता. त्याचीच फार नवाई! दिवस निंगाला की तुही बहीन रेडू घेऊन बसे.. झोपता झोपेना, गाणे सुरू ठेवे.. म्हणजे असं म्हण की रेडू लागल्याशिवाय तिले झोपच ना लागे, त्याच्या दहा वर्षानं टी.व्ही. आला, रामायण असलं की सारं गाव माह्या घरी! घर कमी पडे, शेवटी आंगनात टी.व्ही. लावा लागे.. अन् आता इंटरनेटचा जमाना आला.. अमेरिकेची रंभा आपल्या घरात घुसली''

'' कसं हाय बाप्पू मनोरंजन?''

'' याले काय पाहा लागते? दिवस कसा जाते ठाऊकच होत नाही! दिवसभर उलाला..''

'' आता हे साधूचं प्रवचन पाहा.. हा बाबा स्वर्गाच्या गोष्टी सांगून राह्यला.. जसा काही हा स्वर्गाले भेट देऊन आला''

''यानं कधी पाह्यला स्वर्ग?''

'' पलटय़ा देऊन राह्यला.. साधूनं काही सांगतलं तरी लोकाइले खरंच वाटते''

'' काय सांगते लेकाचा ?''

'' स्वर्गात मजा हाय म्हनते. रंभा उर्वशी उलालाच्या गान्यावर नाचतात''

'' मंग तू काहून स्वर्गात राह्यला नाहीस म्हना? कायले वापस आला पृथ्वीवर? सारे चिवत्या बनोयाचे धंदे''

'' आता नरकाच्या गोष्टी सांगून राह्यला''

'' तूच जाय म्हणा नरकात.. आपलं तेच लाव उलाला..''

'' उलाला लय आवडलं वाटते बाप्पूले?''

'' अरे विशेष आहे ना.. घरी असं हाये काय?''

''पुढे चालू इंटरनेट टी. फुकट होईन बाप्पू.. पुढच्या पंचवार्षिक योजनेत दारिद्रय़रेषेखाली सरकार फुकट इंटरनेट वाटीन.. तेवढाच सरकारच्या डोक्यावरचा ताण कमी होते''

'' कसा काय?''

'' इंटरनेट फुकट देलं की लोकं त्याच्यातच गुंतून राह्यतात.. कोनी कापसाचा मोर्चा काढत नाही. अमक्या विद्यापीठाले तमुक नाव द्या असं कोनी म्हनत नाही.. कोनी उपद्रव करत नाही.. सरकार म्हनते, तीन रुपये किलोचे गहू खा.. कंट्रोलचे तांदूळ खा.. उरल्या टाइमात फुकट इंटरनेट पाहा.. सारं घरीच पाहून घ्या.. अदीक काय सोय पाह्यजे तुमची?''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी-9561226575
     

आनंदानं जगायचं असेल, तर अतिशय निर्भय बना


समस्या, प्रत्येकाच्या जीवनात समस्याच समस्या असतात. काही माणसं समस्यांखाली पार पिचून जातात, गलितगात्र होतात. काही माणसं माझ्या जीवनात समस्याच समस्या आहेत अशी सारखी ओरड करीत असतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये एमिले कोया नावाचा एक मानसोपचार करणारा व्यक्ती होऊन गेला. त्याच्याकडे हजारोंच्या संख्येने लोक येत असत, उपचार घेत असत आणि रोगदुरुस्त होऊन जात असत. खरं म्हणजे ºिश्चन धर्मात 'फेथ हिलिंग' नावाची प्रक्रिया आहे. येशू ºिस्ताच्या नावावर ही प्रक्रिया चालते. रोगदुरुस्तीकरिता मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. भारतात त्याला 'चंगाई सभा' असंही म्हटलं जातं. या फॉर्मासिस्ट असणार्‍या एमिले कोयाने 'फेथ हिलिंग'चं नाव घेतलं असतं तर जगभरात मानसन्मान, पैसा, कीर्ती त्याला प्राप्त झाली असती; पण तो एवढा वैज्ञानिक मनोवृत्तीचा व प्रामाणिक गृहस्थ होता की, आलेल्या प्रत्येक रोग्याला म्हणायचा, ''तुम्ही दुरुस्त झाला आहात हे तुमच्या मनाचं सामर्थ्य आहे. मी फक्त तुम्हाला ते वापरायला शिकवलं आहे, प्रवृत्त केलं आहे.''

असंच एकदा त्याच्याकडे आलेल्या पेशंट बाईने तिच्या समस्या सांगायला सुरुवात केली. त्याने तिचं म्हणणं समजून घेतलं आणि तिला म्हणाला,''बाई, तुम्ही काय करता की तुमच्या जीवनात निर्माण झालेली एखादी छोटीशी जरी समस्या असेल तरी तुम्ही सारखा तिचाच विचार करता. विचार करून करून मुळात उंदराएवढी असलेली समस्या डोंगराएवढी करून ठेवता आणि मग त्या डोंगराएवढय़ा समस्येच्या ओझ्याखाली पार पिचून जाता. समस्या केवळ विचार करून करून कधीच सुटत नसतात. या जगात समस्या सोडविण्याचे दोनच मार्ग आहेत. एक जी समस्या तुमच्या जीवनात निर्माण झाली असेल तिचा एकदाच विचार करा. ती सोडविण्यासंबंधीच्या मार्गाचा विचार करा. निर्णय घ्या! आणि तडकाफडकी समस्या सोडवून मोकळे व्हा! योग्य, अचूक मार्गाचा वापर करा आणि त्या समस्येपासून मुक्त व्हा!

समजा ती समस्या तुम्हाला सोडवणं शक्यच नसेल. तुमच्या अधिकारक्षेत्राच्या, क्षमतेच्या, ताकदीच्या बाहेरची असेल तर ती समस्या आपल्या जीवनात नाहीच आहे, असं गृहीत धरून जगायला शिका. समस्या सोडविण्याचा हा दुसरा मार्ग आहे.''

एमिले कोयाने समस्या सोडविण्याचे हे दोन मार्ग सांगितले आहेत. तेवढेच हे दोन मार्ग या जगात आहेत. आपण सर्वसामान्य माणूस काय करतो की, समस्या सोडविण्याविषयीचा निर्णय घ्यायला घाबरतो. अनिर्णीत अवस्थेत राहिल्यामुळे प्रचंड नुकसान होतं. अनेकदा असं आपल्याला वाटतं,''मी निर्णय घेतला आणि तो चुकला तर?'' कदाचित काही काळ वाट पाहिल्यानंतर समस्या आपोआप सुटेल अथवा अधिक अचूक निर्णय घेण्याची संधी मिळेल; पण असं दरवेळी घडणं शक्य नसतं. आपला हॅम्लेट झाला असेल, द्विधा मन:स्थिती झाली असेल, तर कागदपेनाचा वापर करावा, या समस्येबाबत 'अ' निर्णय घेतला तर काय फायदे होतील, काय तोटे होतील हे लिहून काढावे. हा विचार करीत असताना मी 'अ'च निर्णय घेणार आहे, असं गृहीत धरून सखोल, सांगोपांग विचार करावा व फायदे-तोटे तपशीलवार लिहून काढावेत. थोडय़ा वेळानंतर 'ब' निर्णय घेतला तर काय फायदे-तोटे होतील हेही तपशीलवार लिहून काढावे. कदाचित या समस्येत तिसराही निर्णय घेणे शक्य असेल तर तिसरा 'क' निर्णय घेतल्यावर काय फायदे-तोटे होतील तेही विस्तारानं कागदावर नोंदवावं. ही कसरत करताना आपल्याच विचारांना दिशा मिळते. मनाचा गुंता, विचारांचा गुंता सोडवायला मदत होते. वाटल्यास तेव्हाच वा एखाद्या दिवसानंतर पुन्हा 'अ', 'ब' व 'क' नीट वाचावं आणि सर्वात जास्त योग्य वाटेल (त्या वेळी) तो निर्णय घेऊन मोकळं व्हावं. हा निर्णय घेण्याचा उत्तम व जास्तीतजास्त अचूक ठरू शकणारा मार्ग आहे. केवळ समस्येकरिताच नव्हे, तर कोणताही निर्णय घेण्याबाबत साशंक असाल त्या वेळी हा मार्ग वापरता येईल.

काही समस्या आपल्याला सोडविता येत नसतात. ही जीवनातील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी हे सत्य स्वीकारून ही समस्या अशीच राहणार आहे असं गृहीत धरून जगावं लागतं. जगायला शिकावं लागतं. आपल्या आजूबाजूला कसंही वातावरण असलं तरी त्याचा मनावर परिणाम न होऊ देण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. हे आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिलेलं आहे. यालाच ती समस्या अस्तित्वातच नाही, असं गृहीत धरून जगायला शिकणं म्हणतात.

आपल्या जीवनात आनंदानं जगायचं असेल आणि दुसर्‍यालाही आनंदानं जगू द्यायचं असेल तर काही दृष्टिकोन स्वीकारावे लागतात.

एक विधायक विचार करा! आणि विधायकच वागा! आपण नाटक पाहतो, सिनेमा पाहतो, कादंबर्‍या वाचतो. या सगळय़ांमधून 'टिट फॉर टॅट'. 'कोणी आरे म्हटलं तर त्याला कारे म्हणायचं,' असं शिकवलं जातं. त्यामुळे बदला, प्रतिशोध, दुश्मनी निभावणं यात सर्वसामान्य माणून अडकून पडतो. आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याविषयी वाईटसाईट बोलतात, टीका करतात, चिखल फेकण्याचा प्रयत्न करतात. हे ऐकलं की आपण पिसाळतो, आपण त्यांच्याबद्दल वाईटसाईट बोलतो. उत्तरं देण्याच्या प्रयत्नात चिखलफेक करतो. आपली सगळी निर्मितीक्षमता, ऊर्जा असल्या निर्थक गोष्टींत खर्च करतो. परिणामत: आपल्या आजूबाजूच्या खुज्या माणसांप्रमाणे आपणही खुजे बनत जातो आणि मग 'अवघे खुजे धरू सुपंथ' या पद्धतीने जगत जातो. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपली एनर्जी असल्या क्षुल्लक गोष्टीत खर्च न करता सगळी निर्मितीक्षमता आणि ऊर्जा चांगल्या कामात खर्च करावी. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढविण्यात खर्च करावी. स्वत: एवढं वाढत जावं की, बोलणार्‍याची टीका आपल्या कानापर्यंत पोहोचूच नये. कुणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याची थुंकी आपल्यापर्यंत पोहोचूच नये. हा खरा विधायक मार्ग आहे. मानवी जीवनात खूप विधायक पद्धतीने वागता येतं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो.

एक ऋषी महोदय सकाळच्या वेळी सूर्याला अघ्र्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभे होते. ते ओंजळीत पाणी घेऊ लागले. त्यांच्या हातात पाण्यासोबत एक विंचू आला, चावला. विंचवाला सोडायचं म्हणून त्यांनी ओंजळीतील पाण्यासोबत विंचवाला सोडून दिलं. पुन्हा ओंजळीत पाणी घेऊ लागले. पुन्हा विंचू ओंजळीत आला. फरक जाणवला. हे वारंवार घडायला लागलं. त्यांच्या बाजूला उभा असलेला त्यांचा शिष्य म्हणाला,''गुरू महोदय, हे तुम्ही काय करता आहात? (एकदा तुम्ही त्या विंचवाला जीवदान दिलं हे मी समजू शकतो; पण तो वारंवार तुमच्या ओंजळीत येतो. वारंवार चावतो तेव्हा एकदाचं ह्या विंचवाला ठेचून मारा आणि सूर्याला अघ्र्य अर्पण करण्याचं पवित्र कार्य निर्विघ्नपणे पार पाडा.'' यावर गुरू महोदय मिस्कीलपणे उद्गारले, ''मित्रा, त्याचं असं आहे की, चावणं हा कदाचित त्या विंचवाचा धर्म असेल. (संस्कृत भाषेत 'धर्म' या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वभाव'सुद्धा होतो.) प्राणिमात्रांवर दया करणं हा माझा धर्म आहे. तो त्याचा धर्म पाळतो आहे, मी माझा धर्म पाळतो आहे.'' एवढय़ा एक्सटेंटपर्यंत, या मर्यादेपर्यंत तरी माणसाला विधायक वागता येतं आणि आपण तसं वागायला हवं. किमान जोपर्यंत कुणी आपल्या जीवावरच हल्ला करीत नाही, अस्तित्वच खुंटवून टाकत नाही तोपर्यंत तरी आपल्याला विधायक विचार करता येतो आणि विधायक वागता येतं.

खूप माणसं आयुष्यात जगताना भीतभीत जगत असतात. कोण काय म्हणेल? लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? अशा प्रश्नांच्या दडपणापोटी मनापासून जे करायचं असतं तेही करीत नाही. अनेक प्रकारांची भीती बाळगतात. उद्या काय होईल? भविष्यात काय घडेल? या काल्पनिक ओझ्याखाली दडपून जातात. भूतकाळामधल्या नकारात्मक गोष्टी आठवून आठवून स्वत:चं नुकसान करून घेतात. भूतकाळातील सावली सतत त्यांचा पिच्छा पुरवीत असते.

जीवनात खरंच जगायचं असेल, आनंदानं जगायचं असेल तर सगळय़ा प्रकारची भीती मनातून काढून टाका. अतिशय निर्भय बना, जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक क्षण आणि क्षण समरसून जगा. समरसतेनं, एकाग्रतेनं जगलेला प्रत्येक क्षण आपल्याला आनंद देऊन जातो. खेळण्याच्या मैदानावर आपण दोन तास समरसून खेळतो. प्रचंड थकतो. अक्षरश: घामानं निथळतो. तरी त्या क्षणी आपल्या मनाला खूप आनंद होतो. कारण ते खेळण्याचे दोन तास आपण एकाग्रतेनं समरसून घालविलेले असतात. कितीही कष्टाचं काम असेल, मेहनतीचं, वेदनादायक काम असेल आणि ते आपण मनापासून एकाग्रतेनं करणार असू, तर त्या कामातून आपल्याला आनंदच प्राप्त होतो.

जर आपण आपल्या जीवनात प्रत्येक काम मनापासून करू लागलो, समरसून करू लागलो तर आपलं सारं जीवनच आनंदमय बनून जाईल. त्यामुळे जीवनात जे काही करायचं आहे ते मनापासून, समरसून, एकाग्रतेनं करा! वर्तमानकाळातला प्रत्येक क्षण जगताना त्यावर भूतकाळाची सावली पडू देऊ नका आणि भविष्यकाळातील काल्पनिक ओझंही पडू देऊ नका.

जीवनात जेव्हा एखाद्या गोष्टीला मनापासून 'हो' म्हणावसं वाटत असेल, तर आतून झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'हो'च म्हणावसं वाटत असेल तर 'हो'च म्हणा! कारण एकदा आलेली संधी पुन्हा येतेच असं नाही.

ज्यावेळी मनापासून, आतून सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'नाही'च म्हणावसं वाटत असेल तेव्हाही ठामपणे 'नाही'च म्हणा! फक्त समोरच्या व्यक्तीला नीट समजावून सांगून, नम्रपणे 'नाही' म्हणा! सर्वसामान्य माणूस दडपणाखाली वा प्रेमाच्या शोषणाला बळी पडून (आई म्हणते म्हणून, नवरा म्हणतो म्हणून, मुलं म्हणतात म्हणून दबावाला बळी पडतो.)'हो' म्हणतो. परिणामत: आपण सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागत नाही. आपल्या मनाचं ऐकत नाही. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास होतो आणि ज्या व्यक्तीला दडपणाखाली 'हो' म्हटलेलं असतं त्या व्यक्तीच्या कामालाही योग्य न्याय देऊ शकत नाही. दुहेरी नुकसान होतं. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावेत. ''माझी सद्सद्विवेकबुद्धी चुकली तर? या भीतीला हद्दपार करा! आपली सद्सद्विवेकबुद्धी केव्हा मॅच्युअर होणार? त्याला वयाची लिमिट काय असू शकते? याचं काहीही गणित असू शकत नाही. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवा! तिच्यावर विसंबून राहा! आयुष्यात जेव्हा 'हो' म्हणायचं असेल तेव्हा 'हो' म्हणा! 'नाही' म्हणायचं असेल तेव्हा 'नाही'च म्हणा! चूक होईल याची भीती बाळगू नका! मानवी जीवनात कितीही प्रयत्न केला तरी चुका होतातच. झालेली चूक स्वीकारा. चूक दुरुस्त करण्याची यंत्रणा स्वत:त निर्माण करा. चुकांपासून शिकत जा! आणि सातत्यानं यशाच्या दिशेनं वाटचाल करीत जा. आनंदानं जगत जगत कितीही कष्ट पडले तरी हसतमुखानं वाटचाल करीत जात हे मानवी जीवनाच्या सुखाचं, यशाचं रहस्य आहे, मर्म आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड'


28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी. अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे पहिले उद्धारक. हजारो वर्षांच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय. स्त्री-शिक्षणाचे जनक. मानवी समानतेचा पुरस्कार करून चातुर्वण्र्य आणि जातिभेदांवर कडाडून हल्ला चढविणारे पहिले लोकनेते. 'सत्यमेव जयते' या दिव्यतेजाने भारलेले पहिले सत्यशोधक. अशा या नररत्नाचा महात्मा गांधींनी 'खरा महात्मा' म्हणून गौरव करावा यात काहीच नवल नाही. महात्मा

फुलेंचा सामाजिक समतेच्या अंगाने जेवढा स्वीकार व पुरस्कार आपल्या देशात केल्या गेला, तेवढाच त्यांनी शेतकर्‍यांचा घेतलेला कैवार मात्र उपेक्षित राहिला. 1883 मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेले 'शेतकर्‍यांचा आसूड' हे पुस्तक. त्यात त्यांनी शेतकर्‍यांच्या अवस्थेचे केलेले विदारक चित्रण, त्यांच्या दुरवस्थेची केलेली कारणमीमांसा, त्यावर सुचविलेली उपाययोजना या सर्व बाबी तुलनेने उपेक्षितच राहिल्या. सामाजिक अंगाने महात्मा फुलेंचा स्वीकार करीत असतानाच शेतकर्‍यांच्या अंगाने असलेल्या महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' उपेक्षेचा धनी का बनला? महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा ऊहापोह करीत असतानाच 'शेतकर्‍यांचा आसूड'ला सोयीस्कररीत्या का बगल देण्यात आली? हाच प्रश्न सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भा. ल. भोळे यांच्या उपस्थितीत निळू

फुले यांना विचारला होता. (आज दोघेही हयात नाहीत.) या प्रश्नावर दोघेही क्षणभर गोंधळले होते; पण नंतर महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' उपेक्षित राहिला याची कबुली त्यांनी दिली.

मार्क्‍स आणि जोतिबा फुले जवळजवळ समकालीन. 1873 मध्ये मार्क्‍सचा 'भांडवल' हा ग्रंथ, तर 1883 मध्ये महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' हा ग्रंथ जवळपास 10 वर्षांच्या फरकाने प्रकाशित झाला. महाराष्ट्रात 'शेतकरी कामगार पक्षा'ची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी सैद्धांतिक आधार 'मार्क्‍स'मध्ये शोधला. शेतकरी कामगार पक्षातील 'कामगारांसाठी' मार्क्‍सचा आधार घेणे एक वेळ समजू शकते; पण मार्क्‍सप्रणीत शास्त्रात शेतकर्‍यांच्या शोषणाला काहीच स्थान नव्हते. ग्रामीण जीवनाचा 'यडपटपणा' म्हणून उल्लेख करणार्‍या, शेतकर्‍यांना 'बटाटय़ाचे पोते' म्हणून हिणवणारा मार्क्‍स शेतकरी कामगार पक्ष स्वीकारतो; पण याच देशातील महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' ग्रंथ सैद्धांतिक आधारासाठीही स्वीकारत नाही. पण का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये चुकूनसुद्धा छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक, बागाइती शेतकरी, कोरडवाहू शेतकरी असा फरक केला नाही; पण महात्मा फुलेंना मानणार्‍यांनीसुद्धा असा फरक करत आजपावेतो शेतकर्‍यांमध्ये भेदाभेद नीतीचा बिनदिक्कतपणे अवलंब केला. येथेसुद्धा महात्मा फुलेंचा 'शेतकर्‍यांचा आसूड' कचर्‍याच्या पेटीतच टाकल्या गेला.

जवळपास 129 वर्षांपूर्वी 'शेतकर्‍यांचा आसूड' मध्ये महात्मा फुले शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे बारकाईने वर्णन करतात. ते लिहितात, ''आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? बागायतात नवीन मोटा विकत घेण्याकरिता जवळ पैसा नाही. जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे. उसाचे बाळगे मोडून हुंडीचीही तीच अवस्था झाली आहे. मकाही खुरपणीवाचून वाया गेला. भूस सरून बरेच दिवस झाले आणि सरभड गवत कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबाळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नात घेतलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत. शेती खपवणारी मुले वस्त्रावाचून इतकी उघडबंब झाली आहेत की, त्यांना चारचौघांत येण्यास शरम वाटते. घरातील धान्य सरत आल्यामुळे राताळ्य़ाच्या वरूवर निर्वाह चालू आहे. घरात माझ्या जन्म देणार्‍या आईच्या मरतेवेळी तिला चांगलेचुंगले गोडधोड करून घालण्यापुरता मजजवळ पैस नाही. याला उपाय तरी मी काय करावा? बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी? आपला देश त्याग करून जर परदेशात जावे, तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही. कन्हेरीच्या मुळ्य़ा मी वाटून प्याल्यास कर्तीधर्ती मुले आपली कशीतरी पोटे भरतील. परंतु माझ्या जन्म देणार्‍या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटकुल्या लेकरांस अशा वेळी कोण सांभाळील? त्यांनी कोणाच्या दारात उभे राहावे? त्यांनी कोणापाशी आपले तोंड पसरावे?''

(महात्मा फुले : समग्र वाङ्मय (पाचवी आवृत्ती) शेतकर्‍यांचा आसूड (पान नं. 298) वरील परिच्छेदात बागायती शेतकर्‍यांचे दु:ख, दैन्य, अगतिकता, असाहाय्यता 129 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी मांडली. विष घेऊन (कन्हेरीच्या मुळ्य़ा वाटून प्याल्यास) आत्महत्येचा विचार त्याही वेळेस शेतकरी करीत होता. आता तो प्रत्यक्ष आत्महत्या करतो आहे एवढाच काय तो परिस्थितीत झालेला बदल.

महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये शेतकर्‍यांची दुरवस्था, त्याची कारणमीमांसा व आपल्या परीने त्यावरील उपाययोजनाही सुचविल्या आहेत. पण उठता बसता 'समतेचा' जप करीत महात्मा फुलेंची जपमाळ ओढणार्‍यांनीसुद्धा शेतकर्‍यांचा आसूड उपेक्षित ठेवून एक प्रकारे महात्मा फुलेंवरही सूड उगवून घेतला.

शेतकर्‍यांच्या दुरवस्थेची कारणं काय?

'शेतकर्‍यांनी लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहाण्याची मारामार पडते.'

'कधी कधी शेतकर्‍याने गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणिल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्ती-कमती वजनाने घेणारे दगेबाज दलालांचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीमध्ये अंगावर भरून, त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो.'

(पान नं. 292)

एकूण काय तर शेतीत लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा भरून निघत नाही. त्याने बाजारात नेलेल्या मालाचे पैसे तर सोडाच; पण उलट शेतकर्‍यांच्या अंगावरच 'गाडीभाडे' पडते. इ. तपशील महात्मा फुलेंनी 129 वर्षांपूर्वी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये लिहून ठेवले तरीसुद्धा आजही आम्ही निर्लज्जपणे विचारतोच, ''शेतकरी आत्महत्या का करतात?''

शेतकरी आपल्या मुलामुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करतात म्हणून ते कर्जबाजारी होतात असे म्हणणारे आजही आहेत. पण 129 वर्षांपूर्वीच महात्मा

फुलेंनी असे म्हणणार्‍यांची टर घेतली होती.

'ऐषआरामात गुंग असणार्‍या व संध्यासोंवळं यामध्ये निमग्न असणार्‍या भट सरकारी कामगारास फुरसत तरी सापडते काय? त्यातून इकडील कित्येक मोठय़ा आडनावांच्या सभांतील सरकारी चोंबडय़ा नेटिव्ह चाकरांनी, 'शेतकरी लोक लग्नकार्य निमित्ताने बेलगामी खर्च करितात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत,' अशी लटकीच पदरची कंडी उठवितात.'

(पान नं. 293)

शेती पडीत ठेवण्याइतपत अधिक जमीन शेतकर्‍यांजवळ नाही. म्हणून जमिनीस विसावा नाही. त्यामुळे जमीन नापीक होते आहे. जमिनीस पाणी देता यावे म्हणून बंधारे बांधावेत. पाणी अडवावे, जिरवावे, जेणेकरून जमिनीची सुपीकताही वाहून जाणार नाही. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करावे यासाठी महात्मा फुले 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये लिहितात, ''आमच्या सरकारी जंगलातील रानटी जनावरांपासून शूद्र शेतकर्‍यांच्या शेतांचा बच्याव करण्यापुरत्या गावंठी तोडय़ाच्या कां होईनात, जुन्या डामीस बंदुका शूद्र शेतकर्‍यांजवळ ठेवू देण्याची जर आमचे सरकारची छाती होत नाही, तर सरकारने ते काम आपल्या निर्मळ काळ्य़ा पोलीस खात्याकडे सोपवून त्या उपर शेतकर्‍यांच्या शेतांचे रानडुकरे वगैरे जनावरांनी खाऊन नुकसान केल्यास ते सर्व नुकसान पोलीस खात्याकडील वरिष्ठ अंमलदारांच्या पगारातून कापून अथवा सरकारी खजिन्यातून शेतकर्‍यांस भरून देण्याविषयी कायदा केल्याशिवाय, शेतकर्‍यांस रात्रीपोटभर झोपां मिळून त्यांस दिवसा आपल्या शेतीत भरपूर उद्योग करण्याची सवड होणे नाही. याचेच नाव 'मला होईना आणि तुझे साहिना!''

(पान. नं. 322)

वन्यप्राण्यांचा शेतीला वाढलेला त्रास व त्याबाबत 129 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी इतक्या स्पष्ट शब्दांत लिहावे त्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

''शेतकर्‍यांपैकी लक्षाधीश कुटुंबास वेळच्या वेळी पोटभर भाकर व आंगभर वस्त्र मिळण्याची मारामार पडली असून, त्यांच्या सुख संरक्षणाच्या निमित्ताने मात्र आमचे न्यायाशील सरकार लष्करी, पोलीस, न्याय, जमाबंदी वगैरे खात्यांनी चाकरीस ठेविलेल्या कामगारास मोठमोठाले जाडे पगार व पेनशनी देऊन अतोनात द्रव्य उधळते. याला म्हणावे तरी काय!!! कित्येक आमचे सरकारचे नाकाचे बाल, काळे-गोरे सरकारी कामगारांनी, हजारो रुपये दरमहा पगार खाऊन तीसपस्तीस वर्षे सरकारी हुद्दे चालविले की, त्यास आमचे सरकार दरमहाचे दरमहा शेकडो रुपये पेनशने देते.''

(महात्मा फुले : समग्र वाङ्मय आवृत्ती पाचवी, शेतकर्‍यांचा आसूड पान नं. 323)

महात्मा फुलेंनी 'शेतकर्‍यांचा आसूड'मध्ये हे लिहिले तेव्हा राज्य इंग्रजांचे होते. परिस्थितीत बदल झाला असेल तर एवढाच, गोरा इंग्रज गेला त्याऐवजी काळा इंग्रज आला. शेतकर्‍यांची परिस्थिती महात्मा फुलेंच्या काळापेक्षाही वाईट आणि कर्मचार्‍यांचे पगार तर त्याहीपेक्षा गलेलठ्ठ. नशीब महात्मा फुलेंच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या नव्हत्या. त्या जर असत्या तर त्याच वेळेस 'सहावे वेतन' आयोग लागू झाले असते तर महात्मा फुलेंनी त्याचे वर्णन कसे केले असते?

महात्मा फुलेंच्या 'शेतकर्‍यांचा आसूड'ची उपेक्षा स्वातंर्त्योत्तर काळातही का झाली, याची काही काही उत्तरं सापडू शकतात. गोर्‍या इंग्रजांसाठी जेवढा 'आसूड' गैरसोयीचा तेवढाच उलट त्याहीपेक्षा गैरसोयीचा काळ्य़ा इंग्रजांसाठी.

महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा फुलेंसह त्यांच्या 'शेतकर्‍यांचा आसूड'लाही विनम्र अभिवादन.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

Wednesday 28 November 2012

चंद्र वाटे तिला 'चायना'चा खरा!


दिल्लीत तिकडे संसदेचे अधिवेशन सुरू झाले. महाराष्ट्रातही विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. अधिवेशन म्हणजे तरी काय? नुसता गोंधळच! विरोधासाठी विरोध करणे. कामकाज बंद पाडणे, गोंधळ घालणे आणि एकमेकांवर वाटेल तसे आरोप-प्रत्यारोप करणे! जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा! प्रश्न किती सोडवले जातात हा संशोधनाचाच विषय आहे.

पुन्हा विदेशी गुंतवणुकीचा विषय संसदेमध्ये गोंधळ घालतोय. मागच्या अधिवेशनात 'लोकपाल'च्या नावाने धिंगाणा सुरू होता. खरंतर अण्णा हजारे म्हणतात तसा लोकपाल कॉंग्रेसलाही नको आहे, भाजपलाही नको आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहे. पण चोरांच्या उलटय़ा बोंबा म्हणतात तसा हा प्रकार. सारे पक्ष आपला-आपला धंदा करण्यात गुंतलेले आहेत. विश्वास कुणावर ठेवायचा हाही प्रश्नच आहे.

आपली आपण। खात जावी पोळी।

आपलीच टाळी। वाजवावी।

कुणासाठी उगा। सोसू नये ताप।

आपलाही बाप। बाप नोहे।

जगाच्या भल्याची। वाहुनिया चिंता।

आपुलीच चिता। रचू नये।

अंधारात मेला। जरी गाव सारा।

आपुला निखारा। देऊ नये।

देऊ नये काही। घेऊ नये काही।

शुद्धीवर नाही। जग बापा।

अवतीभवतीची सारी परिस्थितीच पार नासून गेलीय! म्हणूनच माणसं पूर्वी संन्यास घेऊन रानावनात निघून जात असावीत बहुधा! आता रानावनात जात नाहीत कुणी. पण समोरच्याचा कायमचा काटाच काढून टाकतात. उजळ माथ्यानं समाजात मिरवतातही! समाजही सलाम ठोकतो अशा लोकांना! सज्जनांचा कुणी वाली नाही!

ज्याच्या हाती लागलं तोच आपले हात धुऊन घेतो. हवा तसा सूड उगवून घेतो. दिशाभूल केली जाते जनतेची. जनताही मेंढरासारखी लांडग्यांच्याच मागे लागते.

अनेक मिल बंद पडलेल्या आहेत. पगारवाढीच्या नावानं कामगारांना भडकवलं जातं. कामगार नेतेच दलाली करतात. मिल बंद पाडतात. मजूर देशोधडीला लागतात. संसार उघडय़ावर पडतात. मिल बंद झाली की त्याच जागा बिल्डरांना विकल्या जातात. मोठमोठे मॉल्स त्या ठिकाणी उभे राहतात! या कामगार नेत्यांना जाब कोण विचारणार? दलाली करणार्‍या पुढार्‍यांना हिशेब कोण मागणार? इमानदार नेत्यांनी सांगितले तर कामगारही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत!

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचं तसंच झालं. प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची बोंब झाली. न्यायालयानेही लिलाव करण्याचे आदेश दिलेत आणि प्रत्यक्ष लिलाव झाल्यावर सारेच फुगे फुटले. त्या समितीचे अध्यक्ष असलेले लोक आता स्वत:चे तोंड लपवत फिरत आहेत. एकदुसर्‍यावर जबाबदारी ढकलत आहेत. पण एकाही नेत्याने आपली चूक कबूल करण्याचा मर्दपणा दाखवला नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वत:चा राजीनामा देण्याची हिंमत दाखवली नाही.

महाराष्ट्रात एन्रॉनच्या बाबतीतही तसाच प्रकार झाला होता. माझा हिस्सा किती? एवढय़ाचसाठी सारे तमाशे सुरू असतात! एफडीआयच्या बाबतीतही तेच चाललंय!

काळ नाही बरा, छंद नाही बरा

चंद्र वाटे तिला 'चायना'चा खरा!

आपले चांदणे शुभ्र नाही म्हणे

रे! दलाली करा, माल त्यांचा भरा!

ह्या विदेशी नद्या केवढय़ा चांगल्या

मेघ का जाहला कावरा बावरा?

आग ठेवायला फ्रीज देतात ते

आगही वापरा..बर्फही वापरा!

खेकडय़ांच्या पहा चालल्या बैठका

या तळय़ाची म्हणे वाटणीही करा!

खेळण्यासारखी थांबली माणसे..

यार! कोणीतरी एक चाबी भरा!

माणसंही आता थिजून गेलीत. विझून गेलीत! देशाचं काय वाटोळं झालं तरी कुणाला काही देणंघेणं नाही. आम्ही आपल्या बायकापोरांमध्येच खूश आहोत.

पुन्हा या अधिवेशनाच्या निमित्ताने मोर्चे काढले जातील. पुन्हा झिंदाबाद-मुर्दाबादचे नारे लावले जातील. पण सामान्य माणसांचे प्रश्न मात्र तसेच राहतील.

प्रामाणिक नेत्यांच्या तोंडाला पाने पुसली जातील. विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चातील नेते स्वत:चे फोटो काढून बातम्या आल्या की खूश होतील. पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या पराक्रमाचे रंगवून रंगवून वर्णन करतील. कुणाची पदं पक्की होतील. कुणाची पुढच्या निवडणुकीसाठी तिकिटं पक्की होतील. मोर्चात सामील होणार्‍या कार्यकत्र्यांच्या हातात काहीच पडणार नाही.

तशी वेळच आली तर त्यालाच लाठय़ा खाव्या लागतील. गोळ्याही खाव्या लागतील. अशा वेळी नेते मात्र नेमके सहीसलामत राहतील. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

तुमचे मोर्चे, तुमचे गाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

तुम्ही पुढारी भले शहाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

मार खायचा आम्ही, आणिक नाजूक वेळी-

हळूच तुमचे पळून जाणे, झिंदाबाद! झिंदाबाद!

काय सांगायचं? काय बोलायचं?

शेवटी लोकांनाही 'चायना मार्केट'चाच माल आवडतो!

आम्ही लोकशाहीसाठी खरंच लायक नाही आहोत का? हाच प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावतो!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988