Friday 14 December 2012

शेतकर्‍यांच्या कल्याणा 'वॉलमार्ट'ची विभूती


थेट विदेशी गुंतवणूक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी हे आम्ही ऐकत होतो. वाचत होतो. त्या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक दिवसांपासून वादावादीही सुरू होती. हाच वाद लोकसभेतही झाला. थेट विदेशी गुंतवणूक 'शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच' असे ठासून सांगणारे तर थेट विदेशी गुंतवणुकीत शेतकर्‍यांचे अकल्याण आहे असेही म्हणणारे. एकूण शेतकर्‍यांच्या 'कल्याणा'बाबतच हा 'कळवळा' पाहून आमचे मन भरून येत होते. परंतु काल-परवा थेट विदेशी गुंतवणुकीसाठी 'वॉलमार्ट' कंपनीने भारतात 'लॉबिंग' करण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च केल्याची बातमी वाचली आणि आम्ही अक्षरश: गहिवरून गेलो. भारतीय शेतकर्‍यांबद्दल भारतीय नेत्यांना, समाजसेवकांना, शेतकरी नेत्यांना 'कळवळा' येणे यात नवल ते काय? पण

'बुडती हे जन देखवेना डोळा

म्हणुनी कळवळा येतसे'

हा तुकाराम महाराजांचा कळवळा वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीला येऊ शकतो. कंपनी अमेरिकन आहे म्हणून त्याला भारतीय शेतकर्‍यांचा कळवळा येत नसेल असे कसे म्हणावे? जागतिकीकरणानंतर कळवळाही जागतिक झाला नसेल कशावरून? फार तर अमेरिकन कंपनीच्या कळवळ्य़ाला अमेरिकन कळवळा म्हणा. आता अमेरिकन झाला म्हणून त्याला कळवळाच म्हणायचे नाही हे तर फारच झाले! याच कळवळ्य़ापोटी 'वॉलमार्ट' कंपनी थेट विदेशी गुंतवणूक भारतात व्हावी. त्यातून शेतकर्‍यांचा फायदा व्हावा, निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांनी गळफास घेऊ नये यासाठी 125 कोटी रुपयांची 'गळ' टाकून भारतीय नेत्यांना, शेतकरी पुढार्‍यांना लेखक, विचारवंतांना फशी पाडत असेल तर ही कळवळ्य़ाची जातच न्यारी. या कळवळ्य़ाला 'लॉबिंग'सारखा घाणेरडा शब्द वापरावा हे तर हीनतेचेच लक्षण म्हणावे लागेल. या सर्व प्रकाराने आमची अवस्था, 'कधी गहिवरलो कधी धुसफुसलो' अशी झाली आहे. वॉलमार्ट कंपनीच्या कळवळ्य़ाने कधी गहिवरून यायला होते, तर या कळवळ्य़ाला नतद्रष्ट लोक 'लॉबिंग' म्हणतात म्हणून आम्ही धुसफुसलो. लॉबिंग या शब्दालाच काहीतरी 'बिंग'फुटावे असा घाणेरडा वास आहे. 'जगाच्या कल्याणा संतांची विभूती' याची तर केव्हाच 'एक्स्पायरी' झालेली आहे. पण आता 'फ्रेश' प्रकार, 'शेतकर्‍यांच्या कल्याणा वॉलमार्टची विभूती'. या प्रकाराने तर आम्ही गदगद झालो आहोत. शेतकर्‍यांच्या 'कोट' कल्याणासाठी थेट विदेशी गुंतवणूक भारतात व्हावी यासाठी कोटी कोटी रुपये वॉलमार्ट कंपनी खर्च करीत असेल तर त्यांना कोटी कोटी दंडवतच द्यायला नको कां?

आता 'कल्याणा'च्या आड येणारीसुद्धा नाठाळ मंडळी असतातच. ही नाठाळ मंडळी स्वत:चे 'कल्याण' झाल्याशिवाय इतरांचे कल्याण होऊ देत नाही. तेव्हा अशा नाठाळ मंडळींना वठणीवर आणण्यासाठी वॉलमार्ट कंपनीने 125 कोटी रुपये खर्च केले असतील तर बोंबलण्याचे कारण काय? थेट विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात कठोर भूमिका असणार्‍यांची भूमिका 'नरम' व्हावी यासाठी काहींचा खिसा गरम करावा लागला असेल. काहीचे कोरडे ठणठणीत हात ओले करावे लागले असतील. यासाठी धो धो पैसे वॉलमार्ट कंपनीने खर्च केला असेल तर यात वॉलमार्ट कंपनीची 'कल्याणाची' तीव्र आसच दिसत नाही कां? त्यातही दान द्यायचेही, पण या हाताचे त्या हाताला, या कानाचे त्या कानालाही माहीत होऊ द्यायचे नाही, ही तर भारतीय संस्कृतीची शिकवण. पण वॉलमार्टसारखी अमेरिकन कंपनी भारतीय संस्कृतीची आब राखत हे दान भारतात कोणाकोणाला दिले? कसे कसे दिले? किती किती दिले? याची वाच्यताही करीत नाही. खरेतर या सर्व प्रकाराने संस्कृती रक्षकांचा ऊर दाटून यायला हवा होता. पण तसेही होताना दिसत नाही. दुर्दैव आपले दुसरे काय? देणारा दिल्याची वाच्यता करीत नाही म्हटल्यावर 'बिचार्‍या' घेणार्‍यांनी तरी त्याची वाच्यता कां करावी? घेणारे वॉलमार्टच्या खाल्ल्या मिठाला जागतात किंवा नाही एवढाच काय तो प्रश्न आहे. 'थेट परकीय गुंतवणूक' ही शेतकर्‍यांच्या हिताचीच व हितासाठीच आहे असे एका तालासुरात ते म्हणताहेत हे काय पुरेसे नाही? 125 कोटी रुपये 'वॉलमार्ट' खर्च करतो याला तुम्ही लॉबिंग म्हणा, पण तो त्याचा शेतकर्‍यांच्या 'कल्याणा'साठी केलेला दानधर्मच आहे. दानालाही 'दान' म्हणायची 'दानत' या देशात संपते आहे. किती दुर्दैवी बाब ही? 'देणार्‍याने देत जावे आणि घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे,' असे म्हणणार्‍याने म्हणून ठेवले असेल, पण आम्ही तर त्याच्याही पुढे जायच्या तयारीत आहोत, ''देणार्‍याने देत जावे आणि घेता घेता देशालाही विकता यावे,'' असा ध्यास आम्हाला लागून आहे. अर्थात, देश विकायला काढू तेव्हासुद्धा तो या देशातील गोरगरिबांच्या, दीनदुबळ्य़ांच्या, शेतकरी, शेतमजुरांच्या 'कल्याणासाठीच' असेल याची मात्र खात्री बाळगा. आता तुमचं 'कल्याण' करण्यासाठी थोडंफार आमचं कल्याण होत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

लोकसभेत घसा खरवडू-खरवडू माया-मुलायम थेट परकीय गुंतवणुकीच्या विरोधी बोलत होते, पण मतदानाच्या वेळेस 'थेट परकीय गुंतवणुकीच्या' बाजूने असलेल्या सरकारला मदत व्हावी यासाठी ते अनुपस्थित राहिले. त्यावेळेस असा चमत्कार कसा घडतो असे वाटून गेले. पण 125 कोटी रुपयांचा 'वॉलमार्ट' खुलासा झाला तेव्हा डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला. 125 कोटी मधले किती माया-मुलायमला गेले असतील? सत्ताधारी पक्षाचा त्यातील हिस्सा किती असेल? शेतकरी नेतेही थेट विदेशी गुंतवणुकीची तरफदारी करताना दिसताहेत त्यांचाही हिस्सा यात असेल की काय? भाजपानेसुद्धा सत्तेत असताना 'थेट परकीय गुंतवणुकीची' भलावण केली होती. पण आता ते विरोध करताहेत. वॉलमार्ट कंपनीला भाजपची 'तोडी' करण्यात अपयश आले की काय? अखेर 125 कोटी रु. खर्च वॉलमार्टने 'लॉबिंग'साठी केला. म्हणजे हा खर्च नेमका कसा, कोणावर व कशा प्रकारे झाला याचे तपशील बाहेर यायला नको? पण ते येणार नाहीत. काही दिवस आरोप-प्रत्यारोप होतील. याने घेतले. त्याने घेतले. याची कुजबुज होईल. थोडी धूळफेक होईल. धुळवड होईल आणि परत वातावरण शांत होईल. आणि नंतर दिमाखात 'थेट परकीय गुंतवणूक' भारतात शेतकर्‍यांच्या 'कल्याणासाठी' केली जाईल.

ज्या शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी 'थेट परकीय गुंतवणुकीची' उठाठेव, खटाटोप आज देशात सुरू आहे. त्याच शेतकर्‍याला याबाबत मी प्रश्न विचारला.

'एफडीआयमुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार असे बरेच लोक म्हणतात. तुला काय वाटते?' त्याने उत्तर दिले.

'फायदाच होईन ना जी. समजा गावात श्रीमंत लोकांची पंगत झाली तर त्याचे नवीन नवीन चमचमीत पदार्थ शेतकर्‍यांना पहिल्यांदाच पाहायला मिळतील. हा शेतकर्‍यांचा फायदाच नाही कां? त्या पदार्थांचा घमघमीत सुवास शेतकर्‍यांना फुकटात घेता येईल हा कितीतरी मोठा फायदा शेतकर्‍यांचा होईल. असे पदार्थ शेतकर्‍यांच्या बापजन्मी पहायला, वास घ्यायला मिळाले नसते ते त्या 'पंगती'मुळे मिळेल. आता श्रीमंतांची पंगत म्हणजे ते ताटातले पदार्थ गरिबांसारखे चाटून पुसून तर खाणार नाही. उलट जो ताटात सर्वाधिक उष्टे टाकेल तो अधिक श्रीमंत. त्यामुळे ताटात भरपूर उष्टे शिल्लक राहील. ते स्थानिक शेतकर्‍यांनाच खायला मिळेल. उष्टे कां होईना आमच्या बापजन्मी जे खायला मिळाले नसेल ते खायला मिळेल. त्यामुळे 'थेट परकीय गुंतवणुकीची 'पंगत' भारतात बसली तर शेतकर्‍यांचा फायदाच फायदा.'

तो हे गंभीरपणे बोलत होता कां उपरोधिकपणे बोलत होता हे मला समजले नाही. समजून घेण्याची आवश्यकताही वाटली नाही. 125 कोटी रुपये 'वॉलमार्ट' कंपनी थेट परकीय गुंतवणुकीसाठी 'लॉबिंग' म्हणून खर्च करीत असेल तर 'भुक्कड' शेतकर्‍यांना विचारतो कोण? अखेर 'वॉलमार्ट' कंपनीचा कळवळाच महत्त्वाचा. जेव्हा कळत नाही कोठे वळा कदाचित त्याचेच नाव 'कळवळा' असेल!

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment