Friday 14 December 2012

तारुण्यातील शिकवण


दोन भिन्न कुटुंबातील भिन्न संस्कार झालेल्या व्यक्ती काही कारणाने एकत्र येतात. त्या वेळी त्यांच्यातील संवाद आणि वर्तन औपचारिकतेच्या मर्यादेबाहेर गेल्यास त्यातून वेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतात. आणि त्या समस्यांच्या परिणामाने भयावह रूप धारण केले की, त्या समाजव्यवस्थेच्या पारंपरिक बाबींना हादरे देतात. घटिताने समाज गोंधळून जातो. हे घडले कसे? मानवी जीवन एवढे हिंसक असू शकते का? मानवतावाद, सहानुभूती या बाबींना काही अर्थ आहे की नाही? असे अभिप्राय मग सहजपणे व्यक्त होतात.

वास्तविक स्त्रीदेहाच्या आकर्षणातून निर्माण होणारी शोकांतिका किंवा विध्वंस आदिम आणि पुरातन आहे. स्त्रियांसाठी झालेली युद्धे जगाच्या पाठीवर सर्वश्रुत आहेत. या विध्वंसात कधी स्त्री स्वत: बळी गेली, तर कधी अनेकांना जावे लागले.

आजच्या व्यक्तिस्वातंर्त्याच्या काळात मात्र स्वत: स्त्रीने हे संदर्भ बदलणे ही काळाची गरज झाली आहे. जगातील अनेक देशात स्त्रियांनी स्वत:च्या कर्तृत्वाने आणि मानसिकतेने सन्माननीय स्थान निर्माण केले आहे. महिला राखीव धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत वाढलेला स्त्रियांचा वावर लक्षवेधी आहे. गावाचे पंचवीस वर्षापूर्वीचे चित्र डोळ्यासमोर आणले तर असे दृश्य दिसायचे की, मुली थोडय़ा मोठय़ा झाल्या म्हणजे स्त्रियांसोबत शेताशिवारात खुरपणी, कापणी अशा शेतकामासाठी जायच्या. आज मात्र मुलींचे थवे शालेय गणवेशात दिमाखाने शाळेत जाताना दिसतात.

स्त्रीशिक्षणाचा प्रसार आज खर्‍या अर्थाने शिगेवर झालेल्या अगदी दूरवरच्या खेडय़ापर्यंत झालेला दिसून येतो. परिणामी, बहुतेक भूतबाधेचे, करणी-कवटाळ इत्यादी अंधश्रद्धाळू बाबींचे प्रमाण कमी झाले आहे. आज मुलींमधील संकोच भावही मोठय़ा प्रमाणावर कमी झालेला दिसून येतो. मुले-मुली शाळा-कॉलेजमधून एकाच वर्गातून वावरू लागले. कधी कामाच्या व नोकरीच्या निमित्ताने स्त्री-पुरुष सहवास वाढू लागला. दीर्घ सहवासातूनच प्रेम आणि मिलन ह्या गोष्टी घडून येत असतात. चर्चा आणि संवाद यातून परस्परांविषयीची ओढ निर्माण होते. समान विचारधारा, आवडीनिवडी आणि गुणधर्म यातून आकर्षण निर्माण होते. आकर्षणाच्या पूर्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोयीच्या वेळा ठरवून भेटीगाठी होऊ लागतात. त्यातून आधी भावनिक आणि मग शारीरिक निकटता अपरिहार्य बनते. या निकटतेच्या ओढीलाच प्रेम असे म्हणतात. हे प्रेम निर्माण होण्याची वेळच खरी धोक्याची वेळ असते. कारण चिरकाल टिकणारे असे गुणधर्म नसले तरी त्यातूनच पुढे विसंगती आणि विकृती निर्माण होते. बर्‍याच वेळा एकतर्फी प्रेम निर्माण होण्यासही सहवासातील मूळथोंब लक्षात न येणे; ही बाब कारणीभूत ठरते. अशा एकतर्फी प्रेमातून पाशवी हत्या घडू शकतात 'लव्ह' स्टोरींचे रूपांतर 'क्राईम' स्टोरीमध्ये होऊ शकते. आजच्या उत्तान प्रसारमाध्यमातून जाहिरातींमधून मुलींच्या वेशभूषेत आणि वागण्या-बोलण्यात नको तेवढा धीटपणा आलेला असतो. टीव्हीवरील मालिका, चित्रपटांतील अर्धनग्न नायिकांप्रमाणेच आपणसुद्धा दिसले पाहिजे किंवा इतरांपेक्षा आपण भारीच स्मार्ट आहोत, आपले खूप चाहते, दिवाणे आहेत, असे संस्कार उमलत्या वयात मुलींवर प्रसारमाध्यमांतूनच केले जातात. पुरेसे बौद्धिक अथवा सामाजिक भान येण्यापूर्वीच हे संस्कार अर्धकच्च्या स्वरूपात झालेले असल्यामुळे कधी केवळ उथळ कल्पकतेतून भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते. त्यात कधी मैत्री झालेला एखादा अपरिपक्व मानसिकतेचा युवक दुखावला जातो. आपण जिच्यावर एवढे जिवापाड प्रेम करतो ती दुसर्‍याच्या प्रेमात गुंतली आहे असा संशय आला की, त्या तथाकथित एकनिष्ठ एकतर्फी प्रियकराचा जळफळाट होतो. आधी वैयक्तिक पातळीवर त्याला त्रस्त करणारा हा मानसिक उद्रेक, मग एखाद्या अवसानघातकी क्षणी हिंसेत रूपांतरित होतो.

कधी स्वत:च्या दिमाखडौल मिरवताना तर कधी भावनेच्या भरात अशा दोन्ही प्रकारात मात्र बळी तो प्रेयसीचाच. कारण कधी कधी आपणच टाकलेल्या मोहजाळात अटळपणे त्यांना गुरफटून घ्यावे लागते आणि त्यांच्या लायक नसलेल्या भर्ताड प्रियकराशी नाईलाजाने विवाह करावा लागतो. जेव्हा मनावरची भावनेची झापड दूर होते, तेव्हा आपल्या हातून फार मोठी चूक झालेली आहे हे लक्षात येते. ही जन्मगाठी जीवकाचणी कुरतडत- कुरतडत मनाला आतल्या आत खात राहते. मुळाशी लागलेल्या भुई उधळीने ओलसर खोडाचं खोडूक होऊन जाते. असे अभावग्रस्त मानसिकतेचे संसार कधीही सुखी होऊ शकत नाहीत. कारण वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक, सामाजिक स्तर खालावलेल्या अवस्थेत कुठं कोणी सुखी होत असतं का?

आईवडिलांच्या नजरेआड होणं हे आजच्या मुलामुलीचं भागधेय झालेलं आहे. शिक्षण किंवा नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या कुटुंबातील व्यक्तीशी संवाद, चर्चा करताना पुरुष सहकार्‍याच्या नजरेत तसा भाव दिसला तर त्याला योग्य वेळी योग्य ती समज देण्याची मुलीची तयारी असली पाहिजे. म्हणजे पुढचे बरेच अनर्थ यामुळे टळू शकतात. प्रेमप्रकरणातील भाबडेपण आणि अनाकलनीय दुबरेध संदिग्धता हाच खरा अडसर असतो. म्हणूनच अशा वेळी मनभावीपणाच्या व आत्मगौरवाच्या आहारी जाणे योग्य ठरत नाही. आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात भविष्याचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आणि डोळस भान आजच्या काळातही विशेषत: ग्रामीण भागात आवश्यक आहे. कारण इथे प्रत्यक्ष संबंध भोवतीच्या प्रदूषित सामाजिक पर्यावरणाशी असतो.

आजच्या कुटुंबसंस्था विघटनाच्या काळात आर्थिक मिळकत ही अपरिहार्य बाब आहे. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात कळपातळ्या प्राण्याप्रमाणे बरेच माणसंही आयुष्य फरफटत न्यायचे किंवा अबाधितपणे कौटुंबिक संस्कारातून ते नेलं जायचं. म्हणूनच जोडीदाराची निवड करताना त्याच्या आर्थिक सक्षमतेचा परस्परांनी विचार करणे आवश्यक ठरते.

उमलत्या वयात भिन्नलिंगी आकर्षण आणि ओढ निर्माण होणे ही बाब नैसर्गिक असली तरी तिला एकारलेपण येऊ नये म्हणून या वयातच लैगिंक शिक्षणाची गरज असते. बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मानवी गुप्तेंद्रियांच्या प्रयोजनासंबंधी कळत-नकळत अभ्यासक्रमातूनच माहिती मिळत जाते. याच पद्धतीने कला शाखेच्या विद्यार्थ्यांची आकलनक्षमता त्याला नेमलेल्या अभ्यासक्रमातून कथा-कवितांच्या माध्यमातून वाढवता येऊ शकते. त्याचे भान अभ्यासमंडळाला पाठय़क्रमाची निवड करताना आवश्यक असते. त्याचा अभाव जाणवतो.

प्रेमसंबंधातील छुप्या व एकतर्फी भावना कधीही घातकच असतात. त्यातूनच 'लव्ह स्टोरी'चे 'क्राईम स्टोरी'त रूपांतर झालेले समाजात अनेक वेळा दिसून येते. एकमेकांच्या वर्तनात किंवा आपल्या भोवतीच्या कुणाच्या वर्तनात अशी दग्ध संक्षिप्तता कोडे निर्माण करण्याची शक्यता निर्माण होत असल्यास वेळीच त्या कोडय़ाचा उलगडा होणे आवश्यक असते. त्यातूनच पुढच्या निखळ मैत्रीभावाची पेरणी होत असते. आकर्षणातली मोहतुबी काव्यमयता अनुभवणे काही काळ आनंददायी वाटत असले तरी त्यातून पुढे दु:खदायी कुरूपता निर्माण होत असते. पूर्वीच्या वर्ग अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात कुसुमाग्रजांची ' प्रेम म्हणजे' ही अतिशय छान कविता होती. या वयात निर्माण होणार्‍या प्रेमांकुराला कोणत्या भावनेचे खतपाणी घालावे, याचे अतिशय समर्पक दिशादर्शन या कवितेत होते. म्हणूनच त्या वयातील भावनेच्या झुल्यावर हिंदोळे होणार्‍या मनाला एकदम व्यवहाराच्या रस्त्यावर आणून उभे करण्याचे काम ही कविता करते.

पुरे झाले चंद्र, सूर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी, नाले, पुरे झाला वारा ..,

अशी भावनिक धूसरता बाजूला सारून प्रेम म्हणजे खरं काय असतं? हे या महाकवीने फारच भेदकपणे उमलत्या पिढीला समजावून सांगितले आहे. अतिरेकी, भाबडय़ा, आंधळ्या प्रेमात पडलेला तो त्याचा आणि तिचाही व्यक्तिमत्त्व विकास विसरतो आणि तिच्या नकारानंतर क्रोधाच्या मद-मोह, मत्सराच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करतो. अशा प्रेमवीरांना इशारा देताना कुसुमाग्रज म्हणतात,

''शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,

बुरुजावरती झेंडय़ासारखा फडकू नकोस ..''

आणि मग प्रेम कोणासारखं करावं याचे आदिम व पौराणिक संदर्भ ते फारच समर्पक रीतीने देतात. अभ्यासक्रमात नेमलेल्या अशा अभिजात कथा-कवितांमधून त्या विशिष्ट वयात विद्यार्थीं-विद्यार्थिंनींच्या मनावर जे संस्कार होतात ते चिरस्थायी स्वरूपाचे आणि त्यांचे भवितव्य घडवणारे असतात.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादबंर्‍या आहेत.)

मु.पो. जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment