Sunday 16 September 2012

नागीण


चिखलीच्या शिवाजी कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर ग्रंथालयात बसून पुस्तके वाचण्याचा छंद जडला. तिथेच पहिल्यांदा चारुलता सागर या लेखकाची 'नागीण' कथा वाचली आणि झपाटल्यासारखीच अवस्था झाली. कथेतली अख्खी पात्र, प्रसंग, वातावरण आणि गलबलून टाकणारा शेवट मनात खोलखोल रुतून बसला. ही कथा वाचत असताना माझंच गावखोरचं पाचवा नावाचं शेत, तिथली विहीर, मोटनाडा, बांधोडय़ा, पांदण, शेतात येताना-जाताना लागणारा लहूनाला, वडाचं झाड असं सगळं वातावरण या कथेत सगुण साकार झालं होतं.

नाग मारायचा नाद असणारा बापू. त्याची सुंदर, सोज्वळ, ममताळू बायको चंद्रा, आई, भाऊ आणि बहीण अंजू असं हे शेतकरी कुटुंब. बापू आणि भाऊ शेतात कामं करणारे, अंजी शाळकरी पोर, आई पोरांना आणि सुनेला अडल्या कामात मदत करणारी आणि चंद्रा नवर्‍याची, दिराची दुपारची भाकरी शेतावर नेणारी. शेतकरी तरुण स्त्री. अजून मुलबाळं न झालेली. पोरसवदा. शेतात जाते. कधी माळव्याला पाणी देते. कोरडय़ाश्यासाठी शेंगा, भेंडय़ा आणते. कधी एकांत मिळाला तर शेतातच आंब्याखाली नवर्‍याच्या गळय़ात गळा टाकून बसते. कधी त्याचं डोकं मांडीवर घेऊन त्याच्या केसातून हात फिरवते. कधी पावसात भिजल्यावर झपरीत नवर्‍याशी प्रणय करते. भरात आलेली जोंधळय़ाची कणसं छातीशी धरते. हळदीच्या पानांवर हात फिरवते. गर्भाळल्या हळदीचं फूल हुंगताना तिच्या फुगलेल्या नाकपुडय़ा मोठय़ा आकर्षक दिसायच्या. अशा वेळी नवरा प्रणयासक्त होऊन तिला धरायला धावायचा. ती हरणीसारखी धावायची. ही चंद्रा म्हणजे साक्षात एक भूमिकन्या !

प्रसंगचित्रण; व्यक्तिदर्शन करण्यात खरोखर चारुलता सागर यांच्या शैलीला तोड नाही. अभिजात शहाणपण हे त्यांच्या भाषारूपाचे वैशिष्टय़आहे. काव्यात्म अल्पाक्षरी शैलीत ते कथा सांगतात. वाचकाच्या डोळय़ापुढे त्याच्या कुवतीप्रमाणे वातावरण निर्मिती होते. मला तर माझ्याच पाचव्या नावाच्या शेतावर ही कथा घडताना दिसत होती. कथेतल्या सारखंच माझं शेत आणि लहानमोठय़ांनी काम करणारं शेतकरी कुटुंब होतं. आणखी एक साम्य असं होतं की, माझ्या दादांनाही कथेतल्या बापूसारखंच नाग दिसला की ओढून आपटून मारायचं वेड होतं. सापाशी त्यांचं नातं म्हणजे मुंगुसा-सापासारखंच. झाडावर, पांदीत, ओढय़ानाल्यात, उघडय़ा शेतात, घरात, कुठेही साप मारणार. गावात कुठेही साप निघाला की, त्यांना बोलावू यायचं. यामुळे ही कथेतली पात्र माझ्या घरात, माझ्या शेतात मला दिसत राहायची. ग्रामीण कथेत किती शक्ती आहे या जाणिवेने मी स्तिमित व्हायचो.

पुढे मीही कथा लिहायला लागलो. बी. ए.पर्यंत माझ्या अठरा कथा वेगवेगळय़ा नियतकालिकात प्रकाशित झाल्या होत्या. सकाळचं कॉलेज करून दुपारच्या शेतकामात रात्रीपर्यंत राहावं लागायचं. त्या वेळी शेतारानात हमखास नाग-नागीण दिसायचे. त्यांचा लाग दिसायचा. दीर्घकाळपर्यंत सुरू राहणारा लाग. अशा लागावर आलेल्या नागाच्या जोडीतला नाग बापूने मारला होता. त्यामुळे नागीण एकटी झाली होती. ती वेळी, अवेळी चंद्राला दिसायची. चंद्रा धास्तावली होती. नाग मारताना तिने नवर्‍याला किती आवरलं होतं. पण तो मानला नव्हता.

नंतर ती कुठेही मळय़ात फिरू लागली की, ती घाबरून जायची. कारण अनमान धपक्या ती जोडीतली नाग मारलेली नागीण पुढे येऊन उभी ठाकायची. तिचा थरकाप व्हायचा. शेवटी एक दिवस भाजीसाठी भेंडय़ा तोडताना नागीण आपला कावा साधतेच. ती बापूला डसत नाही. चंद्राला डसते आणि मग विरहदग्ध झालेल्या बापूला प्रणयातला जोडीदार जाण्याचे, चिरदाहाचे; चिरविरही दु:ख काय असते याची काळजकाची जाणीव होते. पण तिने मला चावायचं असतं. चंद्राने तिचं काय वाईट केलं होतं ? नागाला मी मारलं होतं. मला डसायचं असतं. असं त्याचं मत असतं. म्हणून तो रात्रंदिवस नागिणीचा बदला घेण्यासाठी तिला शोधत राहतो. हातात काठी, मळय़ाचे बांध, पांदीची झुडपं, वारुळं. सगळय़ा जागा. उगवल्यापासून मावळेपर्यंत. नागीण मारण्यासाठी पिसाटासारखा तिचा शोध घेतो.

चंद्रा जाण्याचं दु:ख सगळय़ा घरालाच झालेलं. आईच्या डोळय़ात तिच्या आठवणीचे आसवं. भाऊने मुळूमुळू रडावं. धाकटय़ा अंजूनं भिंतीशी उभं राहून मुसमुसावं. असं भावतुंब, गलबलून टाकणारं वातावरण. चंद्राचं जाणं तर मला खूपच चटका लावून गेलेलं. कथेच्या आशयाला अनेक पैलू. माणूस आणि निसर्ग, माणूस आणि प्राणीविश्व यांच्या आदिम संघर्षाचं प्रतीक असणारी ही कथा. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचं सुख आणि जाण्याचं दु:ख चितारणारी अभिजात भावदग्ध कथा.. शेवटी बापू थकून आंब्याखाली बसतो तेव्हा त्याला चंद्रा येताना दिसते. वार्‍यावर स्वार होऊन हळुवार येताना दिसते. परीसारखी आणि मग तिचा चेहरा जाऊन पुढय़ात नागिणीचा फणा डोलताना दिसतो. खरंच ती त्याच्या पुढय़ात आलेली असते. फणा काढून त्याच्या डोळय़ातलं प्रिय सखी जाण्याचं दु:ख डोळा भरून पाहत असते.. बापूला कळते ती आली. तिलाच तर शोधत असतो तो. मारण्यासाठी. पण आता तो जागचा उठत नाही. जवळच्या काठीवर त्याची मूठ आवळली जात नाही. तो नुसता उसवल्या नजरेने तिच्याकडे पाहत राहतो. ती आपलं हातभर अंग काढून निश्चल उभी असते. दोघे

एकमेकांच्या डोळय़ात पाहत असतात. एकमेकांचं दु:ख. घ्यायचा असतो सूड.

एकमेकांना एकमेकावर. पण ते पाहत राहतात. एकमेकांचं दु:ख आणि सुडाचं रूपांतर होतं अपार करुणेत. सहानुभवात. भावदग्ध शहाणपणात. शब्दातीत असतात ते भाव!

विशाल मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून चारुलता सागर या लेखकाने लिहिलेली ही कथा तब्बल तीस वर्षानंतर माझ्या पाचवा नावाच्या अमडापूरच्या शेतात जशीच्या तशी सगुण साकार झाली. प्रत्यक्षात घडली. कथेतली पात्र माझ्या शेतात, बांधावर, मिरच्याच्या ताटकात वावरली. जिवंत होऊन वावरली. याचं मला खूप आश्चर्य वाटत राहतं. माणसाने कधी काळी तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर पाहिलेलं खरोखर असं साकार होतंय.

पण ते झालं होतं. निमित्त होतं दिल्लीच्या प्रसारभारतीला मराठी साहित्यातील अभिजात कथा वाङ्मयावर कथामालिका तयार करायची होती. ती जबाबदारी त्यांनी दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यावर सोपवली होती. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माझ्या 'रगडा' कथासंग्रहाचासुद्धा त्यात समावेश होता. विशेष म्हणजे मला 'रगडा' कथा ज्या गावात, ज्या शेताच्या परिसरात सुचली त्याच ठिकाणी त्यांना चित्रीकरण करायचं होतं. त्यामुळे आधी लोकेशन ठरवून नंतर अठ्ठावीस दिवसांचे शेडय़ूल ठरवून पुण्यावरून ते अमडापूरला आले. शेतमळे, पांदणवाटा, बांधबंधारे, शेतातले आंब्याचे झाड. हे सर्व पाहून मग त्यांनी 'नागीण' या कथेचे चित्रीकरणसुद्धा माझ्याच शेतावर केले आणि तीस वर्षापूर्वी कथा वाचताना कथेतील जे विश्व माझ्या शेताच्या पाश्र्वभूमीवर मी मनाशी गोंदून, कल्पून रेखाटून ठेवलं होतं. तिथेच ही कथा घडली. सगळीच्या सगळी पात्र जिवंत झाली. माझ्या शेताच्या बांधावर. शेतावरच्या शेतघरात. त्याच मनचक्षूसमोरच्या प्रत्यक्षातल्या स्थळावर!

'नागीण'मधली चंद्रा माझ्या अपेक्षेच्या बाहेर साकार केली ती देविका दफ्तरदारने, आईची भूमिका केली उत्तरा बावकर यांनी. तर बापू साकार केला सोमनाथ लिंगूरकरने. खरी अडचण आली होती नाग आणि नागिणीची. पण अकोला येथील नातलग बाबूराव देशमुख यांनी सर्पालयातून दोन प्रशिक्षकासह नाग आणि नागीण पाठवली. सुमित्रा भावे यांनी लिहिलेली सुंदर पटकथा. कथेतीलच संवाद आणि सुनील सुकथनकर यांचे दिग्दर्शन. त्यामुळे कथासंग्रहातील 'नागीण' कथा प्रत्यक्षात अमडापूरच्या शिवारात जशीच्या तशी अवतरून चालायला लागली. अर्धा तास टीव्हीवर दिसणार्‍या या कथेसाठी पाच दिवस चित्रीकरण करावे लागले. शूटिंगच्या दरम्यान तर खूप संस्मरणीय अनुभव आलेच. पण सह्याद्री वाहिनीवर 'सोनपावलं', त्यानंतर 'कथासरिता' या मालिकेतून 'रगडा' कथेसोबतच 'नागीण'चेही प्रसारण झाले. तेव्हा 'आपलं शेत, आपलं शिवार' आणि आपल्या काळजातली कथा अशा त्रिवेणी संगमाचा योग मानसिक पातळीवर जुळून आल्यामुळे मन तृप्ततृप्त झाले.

आज मी शेतावर जातो तेव्हा मला तीस वर्षापूर्वी पुस्तकात वाचलेली कथा आठवते. मग शेतातली चित्रीकरणाची कथा आठवते. मग टीव्हीच्या स्क्रीनवर पाहिलेली! अनुभूतीचा चढता आलेखच भोगलेला असतो आणि माझी पावलं पुन्हा पुन्हा त्या आंब्याखाली वळतात. तिथे देविकाने वाक्य उच्चारलेले असते.''मला बघा इथं नसल्यागत वाटतंय. ह्या ध्याईत. ह्या जमिनीवर. कुठं कुठं नसल्यागत.. !''

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास',

'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ ता.मेहकर जि.बुलडाणा

1 comment:

  1. माफ करा सर पण या कथेच्या लेखकाचे नाव चारुता सागर असे आहे.

    ReplyDelete