Monday 10 September 2012

नवरा- बायकोचं माजोन


''काय व्हय वं भयानथुतरे..''
''काय झालं?''
''माह्या आंगावर पाय देऊन राह्यली अन् अदिक इचारून राह्यली काय झालं?''

''तुम्हीच मंधात झोपले''

''तुले दिसत नाही काय? फुटकी झाली काय?''

''तुम्ही दारात कायले झोपले? कोपर्‍यात झोपावं.''

''दारापाशी हवा लागते म्हणून इकडं झोपलो.''

''दिवसा कायले झोपता?''

''झळीपाण्याचं काय करू? पाण्याचं बाहीर जाता येत नाही म्हणून माणूस जराभर आंग टाकते.''

''दरवाज्यात कोणी आंग टाकत असते काय? येता- जाता लाता लागते हे तुमालेच समजाले पाह्यजे.''

''तुह्या जाणून माह्या आंगावर पाय देला.''

''जाणून म्हणजे?''

''मुद्दामून देला.''

''मुद्दाम कोणी नवर्‍याच्या आंगावर पाय देत असते काय? कावरलं कुत्र डसलं का मले? तुम्ही मंधात होते म्हणून धक्का लागला.''

''धक्का नाई.. तू आंगावर उभी राह्यली.. माहा पाठकोळ अजून दुखून राह्यलं.''

''पाठ दाबून देऊ का?''

''राहू दे.. अदिक एखांदी हड्डी मोडशीन''

''झोपून राहा''

''आता झोप गेली.. तू जागी असली की मले झोप येत नाही.''

''काहून?''

''आता पाठीवर पाय देला.. जराभर्‍यानं छातीवर पाय देशीन.''

''मी पागल आहो काय?''

''मंग कसा पाठीवर पाय देला?''

''मी मांजर हाणाले गेली.. घाई-घाईत पाय पडला.''

''तुव्हं कोणतंही काम धसमुसयच असते. तुले बोलाचं सूत नाही अन् खायाचं सूत नाही.. जरा वजन कमी कर.. सत्तरच्या वरतं काटा गेला. वात होईन एखांद्या रोजी.. खायाले सठ पाह्यजे.. माह्या चोरून खाते उबारी.''

''कधी खाल्लं तुमच्या चोरून?''

''मी वावरात गेलो की तू तुपाचा शिरा करून खातं.''

''कोण सांगे तुमाले?''

''जनाबुढी सांगे.''

''आणा तिले माह्यापुढ.े. झिटय़ा धरतो तिच्या.''

''खोटी बोलू नको.. लेकराची शपथ घेऊन सांग.. शिरा खाल्ला का नाही?''

''खाल्ला म्हणून काय झालं? माहाच घर हाये.''

''खाल्ला का नाई? मंग खोटी कायले बोलून राह्यली? माह्या चोरून घरात भजे होतात, आलुबोंडे होतात, एकादशीच्या रोजी गंजभर उसळ होते, चार-चार टाईम उसळ खाते.. हा कोणता उपास व्हय ओ तुहा?''

''तुमच्यासाठीच धरते मी उपास.''

''माह्यासाठी कायले?''

''तुम्ही सुधरले पाह्यजात म्हणून धरते.''

''बायकोनं सठ खाऊन नवरा सुधरत नसते. अशा खायाच्या एकादसा धरू नको.. त्याच्यापेक्षा वजन कमी कर.''

''तुम्हीच वजन वाढवा.''

''काही गरज नाही.. माहा वजन बरोबर आहे!, तुलेच खायाचं सूत नाही. दिवसभर तोंडाचा खलबत्ता सुरूच असते.''

''अशा कोणत्या काजू, बदामा हाये तुमच्या घरी खायाले? उळदाची दाय अन् भाकरी असतात दोनही टाईम.. कोण्या रोजी बायकोले गुलाबजामून आणता काय? मोठे गोष्टी करून राह्यले?''

''तुह्या बापानं हुंडाच तेवढा देला.''

''माह्या बापानं त्या टायमाले दहा हजार देले तुमाले. माह्यासारखी धटधाकट बायको भेटली हेच शुकर माना.''

''लय पोरी चालून आलत्या मल.''

''पण एकीनं बी तुमाले पसन केलं नाही. मी जराशीक जाडी होती म्हणून तुमाले करा लागल.ं''

''काही सांगू नको.. मी होतो म्हणून तुव्हा लगन तरी झालं.. नाहीतर तुह्यासारखा फेतका कोण करतं होतं?''

''फेतका गितका म्हणू नोका.. मलेबी तसं बोलता येते.''

''काय बोलता येते तुले?''

''तुमच्या तं सार्‍या हड्डय़ाच दिसते. सदरा काढला का पासोयाचा पिंजरा दिसते टीबी पेशंटवानी. मले तं वाटते तुमाले काहीतरी हड्डीची बिमारी आहे.''

''मले काही बिमारी नाही.. तुलेच वात आहे. चोरून खाऊ-खाऊ वात वायला. जरा व्यायाम करत जाय.. सकाऊन रस्त्यानं फिरत जाय.''

''व्यायाम कायले करा लागते? वावरात तसाच व्यायाम होते.''

''मंग खानं कमी कर.. एका टाईमले तुले तीन-चार भाकरी लागते.''

''माही खुराकच तेवढी हाये.. बापाच्या घरी मी अशीच खात होती.'' ''तुह्या बापानं तुही सोय घेतली नाही.. तुहा बापही तसाच रावण्या आहे.''

''माहा बाप कायढू नोका.''

''काय करशीन तू?''

''तुमाले माही औकाद दाखून देईन.''

''माहा झटका दाखू काय तुले?''

''काय करता तुम्ही? या आंगावर.''

''एका थापडीत तीन जागी पाडीन तुले.''

''बस करा गप्पा.. हात उगारून पाहा.. तुमचा हातच पिरगाऊन टाकतो.. आता काहून भेले? मारून पाहानं.. निसता तोंडात जीव हाये.. वारे वा माणूस.. वार्‍यावर वरात अन् गधी घुसली घरात..! आता आंगावर घेऊन कोपर्‍यात झोपून राहा.. डबल लात लागली त बोंबलू नोका.''

(लेखक नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

No comments:

Post a Comment