Monday 3 September 2012

मै सोला बरस की..


''मन्या, आहे काय रे खोलीत?''

''तुम्ही कसे आले बाबा?''

''मी इकडे तहसीलवर आलो होतो.. जाता जाता तुह्या खोलीवर चक्कर टाकावं म्हटलं.''

''पन तुम्ही अचानक आले?''

''अचानक म्हनजे?''

''काही फोन गीन केला नाही.''

''बापाले पोराच्या भेटीसाठी फोन कायले करा लागते? पानीगिनी आन.. कसा काय चालू आहे तुहा अभ्यास?''

''चांगला सुरू आहे.''

''यंदा फायनल आहे... चांगला अभ्यास कर.. गेल्यासाली गॅप घेतला होता.. गॅपागॅपात अर्धी उमर

गमावतं काय लेका?''

''पानी घ्या''

''कुठी गेला तुहा रूम पार्टनर?''

''टिवशनले गेला.''

''अन् हे कोनाचे फोटो लावले खोलीत?''

''पार्टनरनं लावले''

''कोन व्हय हे?''

''हे इकडची कॅटरिना कॅफ अन् तिकडची मल्लिका शेरावत''

''म्हनजे दोघाइच्या दोन हायेत वाटते?''

''तसं काही नाही.''

''काय करतात ह्या बाया?''

''पिच्चरमधे काम करतात.''

''असे फोटो साजरे दिसतात काय घरात? एकीनं बांडा फराक घातला... दुसरीले झांपराचा पत्ता नाही.. हे चांगले लक्षनं आहेत काय?''

''सहज लावले ते''

''तुह्या मावशा आहेत काय त्या?''

''नाही बुवा''

''मंग कसे लावले? आपल्याले शिक्षन घ्या लागते... चांगले देवाचे फोटो लावाव...अगरबत्ती लावाव...''

''मच्छर अगरबत्ती लावत असतो.''

''ते काय कामाची? मन प्रसन्न झालं पाह्यजे... कोनंही म्हटलं पाह्यजे, की धार्मिक पोरं आहेत... ह्या अशा नटय़ा पाहून काय वाटन लोकाइले?''

''चहा पेता काय?''

''चहा सोडला म्या''

''चांगलं केलं''

''किती जनं राह्यतात या खोलीत?''

''आम्ही दोघंच राह्यतो.''

''मग हे पलंगाखालचे सिगरेटचे थोटकं कोनाचे आहेत?''

''ते पार्टनरचे... म्हनजे काल त्याचा मामा आला होता.. मामानं सिगरेटा ओढल्या.''

''आज टिवशनले गेला नाहीस काय?''

''नाही.''

''काहून?''

''सायकल पंचर झाली.''

''मग पैदल जावं.''

''पैदल दूर जा लागते. बाकीचे पोट्टे गाळ्या घेऊन येतात.''

''गाळ्या पिटालनं आपलं काम नाही बाबू... तुहा बाप कास्तकार आहे... साठ हजार पगार आहे काय मले? बाकीचे पोट्टे रईस बापाचे लेकरं आहेत.''

''जुनी फराळी गावी चालते आपल्याले.''

''पन् गाळी कायले पाह्यजे तुले? आपली सायकलच बरी हाये... पेट्रोल महाग झालं... चांगला शीक .. नोकरीवर लाग... एक चारचाकी गाळी घे... हे गाळ्या फिरोनारे पोट्टे रिकामचोट असतात.''

''कशावरून?''

''अभ्यास सोडून रिकामेच पोरीच्या मागं गाळ्या पिटालतात.. बापाच्या पैशावर मजा मारतात.''

''सायकलनं लय तकलीब होते.''

''जीवनात तकलीब भोगल्याशिवाय काही भेटत नसते बाबू.. आगुदर हाताले चटके बसतात मंग भाकर खायाले भेटते... तुहा मोबाईल वाजून राह्यला.. रिंगटोन त मस्त लावली रे... मै सोला बरस की, तू सतरा बरस का..''

''हॅला.. पिंके .. नंतर बोलतो... नाई नाई... तू येऊ नको... माहे बाबा आले रूमवर.''

''कोनाचा फोन आहे?'' ''प.. प.. पिंकीचा''

''कोन पिंकी?''

''कॉलेजमधली आहे.''

''कोनाची कोन?''

''माह्या क्लासमधे शिकते.''

''जास्त पोरीच्या लफडय़ात पडू नको... गेल्या साली पोरीच्या नादात तू

फेल झाला.''

''तुमाले कसं ठाऊक?''

''मले सारे रिपोट समजतात... बह्याळा समजला काय? अन् काय म्हनते ते पोरगी?''

''काही नाही.''

''कोन्या पोरीले रूमवर बलाऊ नको.. मानसाचं क्रेडिट जाते. असे लफडे दिसले, की घरमालक हाकलून देत असते.''

''आमचं तसं काही नाही.''

''ते पोरगी लय खेप तुह्या रूमवर येते वाटते?''

''बायचान्स येते.''

''कायले येते?''

''ग्रामर विचाराले.''

''म्हनजे तू मास्तरपेक्षा हुशार आहेस काय? तूच त लेका इंग्रजीत तीन खेपा फेल झाला.''

''मले नाही.. पार्टनरले विचारते.''

''म्हनजे ते तुले भेटाले येते अन् पार्टनरले विचारते, लय चतरी दिसते? तिच्या बापाचं नाव काय आहे?''

''बापाचं नाव ठाऊक नाही.''

''डबल भेटली, की तिच्या बापाचं नाव विचारून ये.''

''कायले?''

''मी तिच्या बापाले सांगतो, की परीक्षा झाल्यावर पोरीचं लगन उरकून टाका..लय वाया चालली तुमची पोरगी.. एकाले भेटते अन् दुसर्‍याले इचारते... म्हनजे दोन्ही तबल्यावर हात ठेवते.''

''तिचा स्वभाव साधा आहे.''

''साधा नाही.. ती तुह्यापेक्षा हुशार आहे... आता हे लफडे बंद कर... चांगला अभ्यास कर... नोकरीले लाग.. मंग अशा लय पोरी चालून येतीन..रिकामा राह्यला, की माह्यासारखे डवरे दाबा लागतीन...अन् या जमान्यात डवरे दाबनाराचं खरं नाही बाबू...आलं काय ध्यानात?''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

No comments:

Post a Comment