Friday 21 September 2012

याद येते तिची भोवर्‍यासारखी!


आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो?

'जीवन जगणे' वगैरे सारखे मोठेमोठे शब्द वापरतो. आपलं जीवन म्हणजे तरी नेमकं काय? आपापल्या परीनं जीवनाचा अर्थ शोधण्याचा, जीवनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न साहित्यिक, कवी, विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलावंत, संत, ऋषिमुनी करतच आलेत. आजही करत आहेत. उद्याही करतील. ही निरंतर चालणारी गंमत आहे.

जगतो म्हणजे काय काय करतो, याचा कधी विचार केला का आपण?

जन्माला आले की श्वास घेतो. हातपाय हालवतो. रडतो. भूक लागली की खातो-पितो, राग आला की चिडतो, आनंद झाला की हसतो, नाचतो, गातो वगैरे वगैरे.

पण हे सारेच सजीव करतात.

आपल्याला वाटते आपण फार प्रगती केली. असेलही. खूप शोध लावलेत माणसाने. स्वत:साठी खूप सोयी करून घेतल्यात. अनेक गोष्टींचे रिमोट आपल्या हातात ठेवलेत.

आपण आपली भाषा विकसित केली. संगीत शोधून काढलं. वेगळी गाणी लिहून घेतलीत. नाचण्याचे प्रकार शोधून काढलेत. त्यासाठी कोरियोग्राफरही तयार झालेत. पशुपक्ष्यांचीही स्वत:ची भाषा नसेल का? चिमण्यांच्या चिवचिवाटाला काही वेगवेगळे अर्थ नसतील का? मोराला नाच शिकवणारा कोरियोग्राफर कोण? कोकिळेचा गुरू कोण? वाघाला शिकारीचं प्रशिक्षण कुठल्या सैनिक स्कूलमधून मिळत असेल? एवढय़ा बारीक बारीक मुंग्या साखरेचा शोध अचूकपणे कशा काय घेऊ शकतात? न चुकता आपल्याच वारुळात परत कशा जातात? त्यांच्याकडेही तज्ज्ञ डॉक्टर असतील का? (.. आणि त्यांच्यापैकी काही असेच कमिशन खात असतील का?) त्यांचेही नेते असतील? त्यांच्याही पाटर्य़ा असतील? वेगवेगळे धर्म असतील? कारण नसताना एकमेकांची घरं जाळत असतील? पण त्यांच्याकडे तर आग नाही. निखारेही नाही! त्यामुळे त्यांना असले प्रश्नही पडत नसावेत. कविता लिहिण्याचीही गरजही नाही.

तुझा निखारा माझी फुंकर .. एक होऊ दे, एक होऊ दे

तुझी जिद्द अन् माझी ठोकर.. एक होऊ दे, एक होऊ दे!

असे कसे हे लोक अभागी.. आग लागली जागोजागी

तुझा 'राम' माझा 'पैगंबर'.. एक होऊ दे, एक होऊ दे!

लोक चालले 'काबा-काशी'.. एक भुकेला दुजा उपाशी

तुझी भूक अन् माझी भाकर.. एक होऊ दे, एक होऊ दे

आपण चार भिंती उभ्या करतो. आपल्याला वाटतं, आपण घर बांधलं. बंगला बांधला. छाती मोठी होते. एखादा तीस-चाळीस फुटाचा खड्डा खोदतो. त्यालाच आपण विहीर म्हणतो. त्या खड्डय़ातून बाहेर काढलेली मातीही आपली नाही. विहिरीतलं पाणीही आपलं नाही. आणि ज्यांच्याकडे विहिरी नाहीत, ते जगलेच नाहीत असंही नाही!

ज्याच्या जवळ काही नाही, त्याच्यासाठी निसर्ग आहे. त्यानं सर्वाची सोय करू ठेवली. आपण पक्क्या घराच्या भिंतीत राहात असूनही एका मर्यादेपलीकडे जगू शकत नाही. आणि तेही काही सोय नसल्यामुळे आल्या आल्या मरत नाहीत.

मग प्रगती केली म्हणजे आपण नेमकं काय केलं? हे खरं की ते खरं?

संभ्रमासारखी वा खर्‍यासारखी

याद येते तिची भोवर्‍यासारखी!

मी तिला वेगळे सांग काढू कसे?

पर्वताच्या मध्ये ती झर्‍यासारखी!

हे नद्यांनो! जरा काळजी घेत जा..

लाट येऊ नये. घाबर्‍यासारखी!

तोल गेला तरी मस्त येते मजा

ही दरी शेवटी. त्या दर्‍यासारखी!

या धुक्याच्या मुळे ती खुली वागली

एरवी वागते लाजर्‍यासारखी!

धुकं आपल्याला आवडते. अनेकदा अज्ञानातच आपण सुखी असतो. खरं तर सत्य आजपर्यंत कुणाला तरी गवसलं असेल का?

कृष्णानं लढायला शिकवलं. बुद्धानं सोडायला शिकवलं. पण हे सारं तत्त्वज्ञान माणूस नावाच्या विकृत प्राण्यासाठीच! एरवी लांडगेसुद्धा भूक भागल्यानंतर उगाचच सशांचे बळी घेत फिरत नसतात. जंगलचा राजाही आपल्या पन्नास गुहा असाव्यात असा कधीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्यांचे 'आदर्श' घोटाळेही नाहीत. तो आणि त्याची वाघीण.. आणखी दोन चार 'मैत्रिणी' असतील कदाचित.. बस्स!

एरवी पाणी नसतानाही दगडांच्या फटीतून आपली मुळं आत घुसवणारी आणि अगदी घट्ट रुतून बसलेली उंच पहाडावरची हिरवा कंच झाडं पाहिलीत की माणूस किती सामान्य आहे, याची प्रचिती येते. आपण किती केविलवाणे आहोत, याची कल्पना येते. सार्‍या भिंती तोडून आपण निसर्गाच्या सान्निध्यात थोडय़ा वेळासाठी जरी गेलो तरी जगण्याची नवी ऊर्जा भरभरून मिळते. माणसाची खरी उंचीही कळायला लागते.

खरं तर माणूस हा 'गेट्र' आहेच.. पण फक्त विकृतीमुळे मातीमोल झालाय..

लाख बहाणे केले तरीही

दूर किनारे गेले तरीही

ज्यांच्यासाठी लढलो ते ते

निघून सारे गेले तरीही..

तुझी न उरली सोबत तरीही

थांबणार मी नाही.. मन मारणारही नाही

हारणारही नाही कधी मी.. हारणारही नाही!

हे वणव्यांचे येणे जाणे

हे सलणारे बाभुळगाणे

दगडालाही फट असते ना

तिथेच माझे पेरीन दाणे!

येईल तेव्हा येईल पाऊस..

थांबणारही नाही.. मन मारणारही नही

हारणारही नाही कधी मी.. हारणारही नाही!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment