Friday 21 September 2012

साध्या मानसाचा होरपयभाज!


खेडय़ात आमच्या लहानपनी भजन, कीरतन हेच मोठय़ा मानसाचे चांगल्या गोस्ठीत टाईमपास कराचे साधन होते. तवा बाकी होतं काय खेडय़ात? गनपतीतं झाला तं एखांदा नकलीचा हरिभाऊ गाडगेचा कार्यकरम, नाईतं सरकारी कलापथक झालं. म्या सव्र्यात पह्यले लहान बोरीले इठ्ठल पाटलाच्या बैखटीत ह.भ.प. दत्तराम पाटलाचं परवचन आयकलं. ते खूप सुदं परवचन कराचे. तसे ते सातवा वर्ग सिकलेले. माह्या बोरीपरीस अंदरच्या लहानस्या सावया खेडय़ात राह्यनारे. पन त्यायची भाषेवर असलेली हुकमत आनं न्यानेसरीच्या ओयीची उकल मनाचा ठाव घेतल्याबिगर राहे नाई. माह्यासाठी अखीन एक आवडीचा इसय होता थो परवचनातले 'दृष्टांत'. तो इनोदातला असा परकार अस्ते का, निरा हासवत नाईतं, खूप काई देवून जाते. आता तं ते नाईत. पन ते होते तवा मी त्यायले इचारून घेतलं होतं, का ''मी माह्या कार्यकरमात हे लोकायले आयकवले तं जमन का?' ते म्हनत, ''माही काई हरकत नाई.''

थो किस्सा असा : एका खेडय़ातला जवान पोरगा सिकला. पन नवकरी नाई. बेकार.. चाला बोरीले जावं म्हून एकला निंघाला. तो थोडासा सामोर नाई येत तं एक घोडं चरतानं त्याले दिसलं. त्यानं इकडंतिकडं पाह्यलं. कोनीच नाई. त्याले वाटलं भटकलं वाट्टे. चाला आज बोरीचा बैलबजार हाय, जाऊ घेऊन. आज त्याचं नसिब इतकं बलवत्तर का त्याच्या गयाले दोरयी गुंडायून होता. त्यानं दोर काढला आनं निंघाला घोडं घेऊन. बजारात आल्यावर मंधात असलेल्या निंबाच्या झाडाच्या मुया भायेर निंघून अखीन जमिनीत गेल्या होत्या. त्याले त्यानं ''घोडं इकाचं हाय का?'' त्याच्यावर हा म्हने, ''हे का इचारनं झालं का भाऊ ?तसं घरचं जनावर असल्याच्यानं जीव लागते पन टाईम पडला. पयस्याची लय नुपर हाय म्हून काढलं इकाले.'' त्यानं मांगून पुढून घोडय़ाले पाह्यलं आनं याले इचारलं. ''काय किंमत ठुली?'' आता यानं बापजल्मात कवा घोडं कायले इकलं? पन त्याले आयकून माईत होतं का घोडं महाग असते आनं हे घोडं होतयी एकदम चांगलं. त्याच्याच्यानं त्यानं सांगितले, ''भाऊ, चायीस हजारांत द्याचं हाय!'' त्या आलेल्या मानसानं एक डाव घोडय़ाकडं पाह्यलं. एक डाव याच्याकडं पाह्यलं आनं येतो म्हून निंघून गेला. याच्या मनात आलं जादा सांगतली का आपन किंमत? जाऊ द्या. येईन कोनी.

थोडय़ा टायमानं एक दुसरा मानूस आला. तो म्हने, ''भाऊ घोडं इकाले आनलं का?'' त्याच्यावर्त हा म्हने, ''मंग काय त्याले हिंडवाले आनलं का? आता खरं तं असं हाय भाऊ याची आजी जे होती ना तयीपासून यायच्याच खानदानीचे घोडे आमच्या घरी हाय. एकदम खातरीचं जनावर हाय भाऊ.'' त्यानयी मांगून पुढून जनावर पाह्यल्यावर इचारलं, ''काय ठुली किंमत?'' आता यानं मनात इचार केला मंगा चायीस हजार सांगतले तो एक सब्दयी बोलला नाई. घोडं काय म्हसी परीसयी सस्त राहत असनं का लेकं?त्याले वाटलं पटकन इकलं कां झालं म्हून त्यानं तीस हजार रुपये देल्ले सांगून. त्या मानसानं एक डाव घोडय़ाकडं पाह्यलं एक डाव याच्याकडं पाह्यलं आनं चाल्ला गेला. हा पाहतच राह्यला. मनातल्या मनात सोतावरंच कातावून म्हने, आता कोनी आलं फुकट घेऊन जावं म्हनावं का इचिन. दहा, पंदरा मिन्ट झाले असनं का तिसरं गिर्‍हाईक येतानी दिसलं. यानं इचार केला हे गिर्‍हाईक जाऊच द्याचं नाई.

त्या मानसानं काई इचाराच्या आंधीच यानं चालू केलं, ''भाऊ हे शिंगरू असल्यापासून पोसलेलं जनावर हाय भाऊ. खातरीनं घेऊन जा तुमी. नाव घ्यान का काय घोडं देल्लं म्हून.'' तो म्हणे, ''पाहा कोनी आपल्या जनावराची तारीफच करनार हाय. कोनी हे सांगनार हाय का भाऊ घेऊ नका! हे घोडं डसरं हाय. असलं तरी तसं सांगनार हाय का?'' हा म्हने, ''नाई'' त्याच्यावर्त थो म्हने, ''आपलं कसं हाय घोडं कोनी दुधासाठी घेते का? नाई ना! मंग मले हे नाई पाहा लागन का हा पल्ला कसा चालते? कदम पयते का नाई? सांगा हे पाहा लागन का नाई?'' हा म्हने, ''पाहा ना भाऊ. आपली काई मनाई थोडीच हाय?'' यानं असं म्हनल्यावर्त त्यानं घोडय़ाच्या पाठीवर थाप देल्ली आनं घोडय़ावर बसून हॅक केल्यावर घोडं धावाले लागलं. तो घोडं घेऊन गेला. त्याले पंधरा मिन्ट झाले. हा वाटच पाहून राह्यला. आता ईन, मंग ईन. अर्धा घंटा झाला तरी त्याचा पत्ताच नाई. आखरीले हा वाट पाहू पाहू थकला पन तो काई आला नाई. तितल्यात पह्यल्यांदा जो मानूस घोडं पाह्यल्यावर येतो म्हनून गेला होता तो आला. घोडं तिथं दिसलं नाई म्हून त्यानं आल्या आल्या इचारलं, ''भाऊ घोडं इकलं कावो?'' हा म्हने, ''जेवढय़ाचं आनलं तेवढय़ाचंच इकलं!''

त्यायच्या परवचनातले असे 'दृष्टांत' मी जवा अठरा, ईस वर्साचा असीन तवा आयकले असले तरी ते इतके आवडले का, ना पाट करतायी निरे आयकून पाट झाले. पन त्यायच्या परवानगीनं जवा मी 'अस्सा वर्‍हाडी मानूस' हा कार्यकरम कराले लागलो तवा मंधा-मंधात सांगाले लागलो. असाच त्यायचा अखीन एक 'दृष्टांत' आठवून राह्यला. तो सांगून टाकतो. एका खेडय़ात तीन एकर वावर असलेला एक शेतकरी होता. तो आनं त्याची बायको दोघं लय मेहनती. आपल्या वावरात तं ते घाम गायेतचं; पन फुरसतीच्या दिसी दोघंयी दुसर्‍याच्या कामानं जाये. घरी एक गाय. तिले एक कार्‍होड आनं एक गोर्‍ह. तं चार बकर्‍यांच्या बारा बकर्‍या झाल्या. भरीत भर घालत घालत त्यायनं अराअरामानं दोन एकरानं जमीन वाढवली. घरच्या गाईचं गोर्‍ह मोठं व्हाले लागल्यावर त्याले जोड लावून घरची जोडी करून घेतली. त्या दोघायचा हात कवा रिकामा नाई. रोज सकायी उठनं, एकादसीच्या दिसी सकायी आंघोय करून इठ्ठल रूखमाईचं दर्शन घेतलं का कामात. एकदम साधा सभाव. कोनाच्या देन्यात नाई, तं घेन्यात नाई. मुखात हरी नाम आनं कामासी काम.

त्यानं सुताराकून वखर करून घेतल्यावर्त त्यासाठी लोखंडाची पास इकत घ्यासाठी मंगयवारी बोरीच्या बजारात आला. थोडा बजारात फिरफार झाला. एकदोन नातेवाईक भेटले. त्यायच्या संग ख्यालीखुशालीचं बोलनं झालं. दोयपारी किसनरावच्या हटेलात पोटाले अधार म्हून भजे खाल्ले. दोन तीन पासीचे दुकान होते. त्यातून पसंत पडलेली पास भावटाव करून इकत घेतली. पोरासाठी शेवचिवडय़ाचं भातकं घेऊन ते पुडी पाच हाताचा सेला, जो पटक्यावानी डोस्क्याले गुंडायला होता त्याच्यातच एका टोकाले बांधून डोक्स्याले खोसला. पास खांद्यावर मारोतीच्या गद्यावानी ठेऊन निंघाला पयदल गावाकडं. तो जमाना पयदलचाच होता. तवा का अँटो होते का? सर्रास फटफटय़ा.. हा जवा नदीपासी आला त्याले वाटलं पाणी पिऊन घ्यावं म्हून तो नदीत उतरला. धारीपासी आल्यावर्त पास रेतावर ठुली आनं हा धारीत मधांत गेला. हा वाह्यत्या पान्यावर हात

फेरून पानी पिऊनचं राह्यला का एक चतरा चोर मानूस नदीत उतरला. त्यानं इकडं तिकडं पाह्यलं, कोनाचं ध्यान हाय का? जवा त्याचा ध्यानात आलं का कोनाच ध्यान नाही यानं त्याची पास उचल्ली. त्याच्या परीस खोल धारीत गेला, वाकला आन् मांडीवर पास ठुवून पानी प्याले लागला. जसं ज्याची पास हुती त्याचं पानी पेनं झालं. त्यानं रेतीकडे पाह्यलं आन् त्याले पास न दिसल्याबराबरं तो अरे! अरे! कराले लागला. हा चोर इचारते, ''काय झालं?'' हा म्हन्ते, ''माही पास दिसत नाई राजे हो!'' ''कुठं ठुली होती?'' ''अवं इथं रेतीवरच ठुली होती ना!'' हा चोर त्याले म्हने, ''शायनाचं दिसतं रे! अरे, बजाराचा दिवस. सतरा जन येनारे-जानारे. अस्या वक्ती बेवारस ठेवत असते का? अस्या वक्ती कवायी आपला पास असी माह्यासारकी मांडीवर ठुली पाह्यजे. समजलं?''आपल्या देशात हे असंच चालू हाय. आपल्या निढयाच्या घामाच्या कमाईत घेतलेली वखराची पास असे चतरे बेइमान चोर कवा घेऊन जातेत हे बिचार्‍या साध्या मानसाच्या ध्यानातयी येत नाई. साधा मानूस पिढय़ान्पिढय़ा असा लुटल्याच गेला हाय.

(लेखक शंकर बडे    हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या'

हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment