Saturday 29 September 2012

घरानं या म्हनावं !


जेघर घर्र घर्र करते त्याच्या इतकं दुख नाई आन् जे घर कवटय़ात घेते त्याच्या इतकं सुख नाई, असं आमचा रघू म्हन्ते. त्याचे डायलाग असेचं अस्ते. म्या त्याले म्हनलं,''तू का मुंबईले गेला आन् टीव्ही सीरियलसाठी डायलाग लेयले तं तुले कमाई होईन आन् नावयी.'' त्याच्यावर तो म्हने,''बाबा, फुरसद कुठी हाय?'' म्या म्हनलं,''तुले कामचं काय हाय?'' त्याच्यावर तो म्हने,''कामं नसनं हेयी एक कामचं असते ना बाबा?'' खरं तं त्याच्या तोंडाले लागाले पुरत नाई, पन तो माह्यासाठी कामाचा यासाठी हाय का बोलता बोलता तो आपल्याले असा इसय देऊन टाकते. आपलं घर, नातेवाईकाचे घरं आन् दोस्तायचे घर हे सारं आपन अनुभवत असतो कानी? एकडाव वध्रेच्या दाते स्मृती व्याख्यानमालेत नाटककार सतीस पावडेनं माही मुलाकात घेतानी इचारलं होत का,''या कवितेनं तुम्हाला काय दिलं?'' तवा म्या सांगतलं होतं का,''जर या कविता मला महाराष्ट्रातील अशी अनेक घरं देत असेल की, ज्या घरी मी माझ्या घरासारखा जाऊ शकतो तर यापेक्षा कवितेने मला काय द्यावे?''

गेल्या चायीस वर्सात बस्स मी हाच अनुभव घेत हातो. एकचं घर भेटता भेटत नसतानी इतके घरं बलावतं असतीनं तं यापरीस काय पाह्यजे? नातेवाइकाच्या घरी आपन नात्याच्या हिसोबानं जात असतो, पन कवितेच्यानं झालेल्या दोस्तायच्या घराचे दाठ्ठे जवा आपली वाट पाह्यते तवा आपन करोडपती झाल्याची खुसी होते. अहमदनगरच्या अ.भा. साहित्य संमेलनात वालचंदनगरचे कथाकार बा. ग. केसकर यायची ओयख झाली. मंग त्यायनं मले त्यायच्या शयरात कार्यकरमाले बलावलं, तवा फोनवर असं सांगतलं का,''आमच्या कारखान्याचे गेस्टहाऊस आहेच, पण मित्र म्हणून तुम्ही घरी उतरल्यास आम्हा उभयतास आनंद होईल.'' मी घरीच गेलो आन् एक नवीन घर भेटल्याची खुसी झाली. त्या बास्ता मी सातेक खेपा तिथं गेलो, पन मुक्काम त्यायच्याकडं. आलेल्या पावन्यावर्त जीव कसा लावावा हे सिकावं तं त्यायच्याकून. इतकुसायी परकेपना वाटनार नाई, असं त्यायचं एकजीव होनं. जाखल्याचे आप्पासायेब खोत परसिद्द कथाकार. त्यायच्या काई कथा अभ्यासक्रमात हायेत. त्यायनं तिकडं माहे चार-पाच कार्यकरम लागोपाठ ठुले आन् आखरीचा कार्यकरम त्यायच्या कालेजवर ठेवून मंग घरी घेऊन गेले. सार्‍यायच्या चेयर्‍यावरची खुसी आन् वागनं पाहून असं वाटतचं नोतं का मी पह्यल्यांदा आलो हावो म्हून. मंगयवेढय़ाचे प्रा. सुरेश शिंदे यायनं मले तिथच्या बँकेच्या व्याख्यानमालेत पह्यल्यांदा बलावलं तवा दुसर्‍या दिसी जवा घरी घेऊन गेले तं मले सुखद धक्का बसला का, मी त्यायच्या घरी जाच्या आंधीचं माही 'सगून' कविता त्यायच्या घरी पोचली होती. ते सोता चांगले कवी हायेत, पन दोस्ताच्या कवितेवरती ते किती पिरेम करतात हे मले तवा ध्यानात आलं. आटपाडी जि. सांगली इथं तवा कालेजवर्त डॉ. प्रा. सयाजीराजे मोकाशी होते. त्यायनं त्यायच्या कालेजवर मले कार्यकरमासाठी बलावलं म्हून पंढरपूरले मुक्काम करून मी तिथं पोचलो. सकायी दहाचा कार्यकरम बारा पावतर अटपला. मंग दोयपारचं जेवन अटपल्यावर्त वापेस निघता आलं अस्त, पन ते म्हनले,''सर, आईबाबांना भेटायला गावी जाऊ आणि उद्या सकाळी तुम्हाला रवाना करतो, आज मुक्कामी घरी.'' ते मले शेटफळे या त्यायच्या गावी घेऊन गेले. राती चुलीवरच्या सयपाकाचं जेवन मले पार लहानपनात घेऊन गेलं. घरच्या म्हसीच्या दुधाले गरम करून केलेल्या सेवया तोंडात टाकतानी मले माय आठोली. तिच्या हातच्या सेवया बस्स अस्याचं लागे. राती झपासाठी आथरलेल्या गादीवर आंग टाकलं, पन झप तं जसी गावाले गेली त्या चवीच्यानं. अखीन माय आठोली. म्हनलं,''माय तुही चव इथ पावतर? का हरेक मायच्या हातच्या सेवयाले सारखीचं मायची चव असते! शेटफयले राह्यलो थोडाचं निरा रातभर, पन खूप काई घेऊन आलो.''

या आठोनीनं वालचंदनगरची जुनी आठोन आठोली. एक डाव केसकरासंग त्यायनं बलावलेल्या गाडीनं आमी दोघ नातेपुतेच्या कविसंमेलनासाठी गेलो. वापेस येतानी नारायन सुमंत हा कविमित्र दुसर्‍या दिसी वालचंदनगरच्या पलीकडं कविसंमेलन हाय म्हून आमच्या संग आला. त्या गोठी आयकून वयनीले वाटलं, मी उद्या त्यायच्या संग जानार हावो. पन मी तिथं जानार नोतो तं यवतमायले वापेस येनार होतो म्हून मी सकायी उठून तयारीले लागलो. त्या घराचा भूगोल मले पाठ असल्यानं कोनाले काई इचारा ना लागे. माही तयारी झाल्यावर सयपाक घरात च्या करत असलेल्या वयनीले मी निंघनार हावो हे सांगाले गेलो तं त्या म्हने,''तुम्ही कविसंमेलनासाठी थांबणार आहा ना?'' म्हनलं,''नाही वहिनी, मी यवतमाळसाठी निघत आहे.'' हे आयकल्यावर्त त्यायचा चेयरा असा पडला जसं त्यायचचं काई चुकलं हाय. त्या म्हने,''मला कल्पना तं द्यायची. इतक्या लांबचा प्रवास आणि तुम्ही असे जाणार कसं वाटतं?'' माही पंदरा ईस मिन्टानं गाडी होती. मी कुर्सीवर येऊन बसतं नाई तं त्यायनं झालेला च्या कपभर आन् खारीची पिलेट आनून ठुली. त्यायचं चित थार्‍यावर नाई हे लपत नोतं. काई करन्या इतका टाईम नोता आन् तसं जाऊ द्याले त्यायचं मन तयार नोतं. त्यायले राहावलं नाई म्हून इचारलं, ''एक विचारू? घरच्या सारखे आहात म्हणून विचारते. रात्रीची भाकर आहे ती बांधून दिली तर चालेल?'' म्या म्हनलं,''राहू द्याना वहिनी.'' त्याच्यावर त्या,''कसं राहू द्यायचं? लातूरपर्यंत जेवायची वेळ होईल. सोबत डबा असला तर आधार असतो. कसं घरून निघाल्या सारखं वाटतं. देऊ?'' म्हनलं,''द्या.''

लातूरले दोयपारी पोचत नाईतं स्टँडच्या बाजूच्या हटेलात गेलो. सामोरच्या टेबलावर्त आनलेली शिदोरी सोडली. भाकरीच्यावर्त तेलात मिसयून चोपडलेली चटनी तिच्या वासानं भूक अखीनचं चेतली. संग देल्लीली प्लॅस्टिकची डब्बी उघडून पाह्यलीतं त्याच्यात आंब्याचं रायतं. राहावलं नाई म्हून त्या डबीत बोट घालून चाटलं तं त्या घरी केलेल्या रायत्याची चव पोटभर पसरली. ते भाकर खातानी आखीन माय आठोली. म्हनलं, मायच्यावानी पिरेम करनार्‍या या सार्‍यायच्या हाताले सारकीचं चव असते का लेक ? उठतानी आठोलं का आल्याबराबर सांगतलेली दालफ्राय तसीचं थंडी झाली होती.

काई घरं इतके पॉश असतेत का बाहेरून लय सुदे दिसतेत, पन आतनी जाव तं जीव गुदमरते. असं वाट्टे कवा बाहेर जाले भेट्टे आन् काई घरं इतके सादेसुदे असतेतं, पन इतकी ऊर्जा अस्ते त्या घरात का काई इचारू नोका. पह्यल्यांदा येऊनयी असं वाट्टे आपन लय डाव इथं येऊन गेलो. तस्या घरात काय जादू असते काय मालूम. तुमी मनानं सारे दोस्ताचे घरं तिकडचेचं सांगतले, वर्‍हाडात कोनी नाईत का? इथं इतके घरं हायेत का लेयतो म्हनलं तर अख्खी 'पुण्य नगरी' नाई पुरनार! तरी तुमचा मान राखासाठी माहे ज्येष्ठ मित्र जे मुयचे वाशीमचे, पन आता पुन्याला राह्यतेतं ते सुभासभाऊ राठी वाशीम अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष. वाशीमले कार्यकरमात भेट झाल्यावर म्हनेत,''तिकडे कधी आले तर कळवा.'' कवीले एवढं आवतन भेटल्यावर्त तो सोडते का?'' दोन मयन्यानं सांगली जिल्ह्यातल्या बोरगावले कार्यकरम ठरला म्हून यायले फोन लावला ते म्हनेत, ''बोरगावची तारीख कोणती?'' म्हनलं,''दोन'' तं ते म्हने,''एक ' आम्हाला द्या आन् घरी या.'' एक तारकेले फोन करून सकायी 5 वाजता खालीवर होनार्‍या झोक्यानं वरतं गेलो तं हे दोघे दाठ्ठय़ात उभे स्वागताले. मी थंडागार. माही राहाची येवस्था त्यायच्या घरी आन् घराले हॉल एवढा मोठा का कार्यकरम तिथचं. मले समजे नाई का आपन पुन्याले हावो का वासिमले. सुभासभाऊच्या कल्पकतेले सलाम करा लागला. त्यायनं वर्‍हाडातून येऊन तिथं स्थायिक झालेले जे जिवलग त्या सार्‍यायले एवढचं आवतन का, ''ना विसरता सायंकाळी सात वाजता जोडप्यानं घरी या, एक सरप्राईस आहे.'' वर्‍हाडातले सत्तरअश्शी जोडपे आले आन् एक अनोखा कार्यकरम झाला. हासता हासता ते आपपल्या गावाले कवा पोचले त्यायले समजलं नाई. सदाई आठोनीत राईन असा अनुभव. कार्यकरमाच्या बिछायतीपासून सारी येवस्था लावून घेन आन् पावन्याच्या पोटाची सोय पाह्यनं त्यासाठी सारी धावपय वयनीची. पावन्याच्या हिमतीले त्या कस्या कमी पडतीनं. त्यायचं माहेर वर्‍हाडातलं ना! सारे निघून गेल्यावर्त आमी तिघं बसलो. म्या म्हनलं, ''तुम्हाला खूप दगदग झाली.'' त्याच्यावर ते म्हनेत,''आपली मानसं आनंद घेऊन गेले, यापुढे दगदग ती काय? तुम्ही भाऊच्या शब्दावर आला हा आमचा आनंद.'' दुसर्‍या दिसी सकायी त्यायच्याकून निघताना वयनी बोलल्या,''आता कधी पुण्यात आला तर हे आपलं घर आहे हे विसरू नका.'' त्याच्यावर्त म्या म्हनलं, ''वयनी, तुमी म्हनलं हे दुधात साखरं, पन तुमचं घरचं जानार्‍या पावन्याले 'ये' म्हन्ते.''

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment