Friday 9 November 2012

असा डोलला इरवा


मीकवी म्हून नवखा असतानी याच्यातल्या मोठय़ा हस्तींना नावाने ओयखत होतो, पन कवा भेटलो होतो. त्यावक्ती मी खेडय़ात राहत असल्याच्यानं आपसूक येणारा बुजरेपना हेच एक कारण होतं, पन आपण जाऊन आपली ओयख करून देनं मले रुचत नोतं. ही गोठ 1976 ची. तवा मी बोरीले माह्या जलमगावी राहत होतो. माही दिग्रसची जे दोस्त मंडयी होती सुरेश गांजरे, दया मिश्र, राजू मिश्र, मोहन मुंडले, मधुकर अंबरकर, पंढरीनाथ शिंदे यायनं असं ठरोल कां माहा कवितासंग्रह वर्‍हाडी साहित्य महामंडळ शाखा दिग्रसच्या वतीनं काढाचा. घरी त्यासाठी ना कोनाले हरीक ना मदत, पन दोस्तायनं तस्यात तवा त्यातले एक-दोन जन सोडले तं बाकी बेकार, पन सार्‍यायनं जोर लावला आनं प्रेमापोटी तिथच्या मीना प्रिंटर्सचे मालक श्री. एन. के. जैन यायनं नाईच्या बराबरीत नफा घेत तर त्यायचे कारागीर श्री. काशिनाथ आप्पा लाव्हरे यायनं घेतलेली घरचं काम असल्यासारकी मेहनत अजूनयी आठोनीत हाय. त्यायचं नाव घ्याले कारन हाय काऊन का आता छपाईच्या अँटोमॅटिक मसिना निंघाल्या का दोन दिसात पुस्तकं हातात देता येते तवा तसं नोतं हे छत्तीस वर्सा पह्यलेची गोठ मी तुमाले सांगत हावो तवा कसब आनं मेहनत याची जोड लागे म्हून या मिसानं त्यायले धन्यवाद द्यासाठी हे लेयलं.

आमची गंमत असी की, आमाच्यातल्या कोनालेच छपाईचा अनुभव नोता आन् माईती नोती. मुखपृष्ठ नागपूरवून छापून आना लागते एवढंच मालूम. आमच्या मंडय़ातला पंढरीनाथ शिंदे थोडासा जानकार. त्यानं नागपूरचा एक पत्ता सांगतला, तो घेऊन मी आनं सुदेश गांजरे नागपूरले पत्ता हुडकत हुडकत पत्त्यावर आलो. त्या आफिसचा दाठ्ठा (दार) काचेचा. बरं झालं त्याच्यावर 'पुश' लिहून होत नाईतं कोनी ये पावतर थांबा लागलं असतं. त्यायच्या आफिसात गेल्यावर याचं कारन सांगतलं तं त्यायनं बसाले सांगतलं. त्यायच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीत आमी पुस्तकाच्या आकाराचं माप सांगतल्यावर्त त्यायनं कागदावर गनित मांडनं चालू केलं. मंग त्यानं इंगरजीत हे इचारलं कां चित्र दोन रंगात पायजे का तीन रंगात? म्या म्हनलं आपनयी झोल खाची नाई एखांदा तरी सब्द इंगरजी बोलाचा म्हून बोललो, ''दोनीचे रेट सांगा.'' त्यायनं रेट सांगतल्यावर बराबर आमी दोघं खाडकन् उभे झालो आन् त्यायच्या ध्यानात याच्याआधी सडकीवर आन् तो हाका मारन या भेवाने जे धावत निंघालो तेतं बरं झालं तवा रानी लक्ष्मीबाईचा पुतया चौकाच्या मंधात होता म्हून तिथं अडकलो नाईतं कुठं ठावरकं गेलो असतो काय माईत?

तुमाले समजलचं नसनं का आमी असे घाईनं ना ठरवता ठरवल्यासारके कसे निंघालो आता सांगतलंच नाई तं तुमाले समजन कसं? त्याचं झालं कसं का त्यायनं जवा 'मुखपृष्ठा'चा बजेट आमाले सांगतला तितला बजेट तं अख्या पुस्तकाचायी नोता आन् हे आमा दोघालेयी माईत असल्यानं ना सांगता झटका बसल्यावानी आमी धावतच तिथून निंघालो. मंग उमरावतीले प्रमोद जोशी यायचं संदीप आफसेट होत ते कवितेच्यानं अनायसे मले ओयखत होते.

त्याच्याच्यानं त्यायले आमच्या बजेटची कल्पना देल्ल्यावर त्यायनं ते का करून देल्लं आन् इतकं चांगलं का इचारू नोका. हे झाल्यावर्त मंग प्रस्तावना कोनाची आनाची तं आमी सारेच नवोदित आन् खेडय़ातले आमची कोनाचीच कोनासंग ओयख नाई. त्यावक्ती एकमेव अधार माहे नागपूरचे दोस्त आन् गावाच्या नात्यानं जवाई योगेश बर्‍हाणपुरे. मी आन् सुरेश गांजरे दोघं त्याकामासाठी धरमपेठच्या तवाच्या त्यायच्या घरी गेलो. त्यायले यानं कारन सांगतल्यावर्त ते म्हणे, ''सधा सुरेश भट नागपुरात स्थायिक होण्याच्या दृष्टीने आले असून आज ते घरी आहेत. अनायसे त्यांचे माझे चांगले संबंध आहेत, पन माझ्या ओयखीमुळे ते हो म्हणनार नाही. त्यांचं रोकठोक असते. जर त्यांना कविता चांगल्या वाटल्या तरच ते होकार देतील. आपण जाऊन पहायचं का? बोला.'' म्या म्हनलं, ''त्यायनं हो म्हनलं तं काम झाल्याची खुसी आन् नाई म्हनलं तं एवढय़ा मोठय़ा कवीले पाह्यता आलं, या मिसानं जरासक का होयेना बोलता आलं हे कायजाच्या कुपीत जपून ठुता इन.''

मी, सुरेश गांजरे आन् बंधू (मी बर्‍हानपुरेले बंधूचं म्हनतो) रात्री त्यायच्याकडं गेलो तवा ते खुर्चीत बसून हातावर्त घोटासाठी तंबाखू वतत होते. त्यायनं या म्हून सामोर असलेल्या खुच्र्याकडं हात केला, पन त्याच्यावर्त बसाच्या आंधी बंधूनी आमची ओयख करून देल्ली. ''हे सुरेश गांजरे दिग्रसचे तरुण भारतचे वार्ताहर आणि हे शंकर बडे ते माझे सासरे लागतात.'' बंधूनं असं म्हनल्या बराबर भटसायेब म्हने, ''नाही तरी तू माझ्याकडे सासरचेच मानसं आणनार, दुसरे तुला दिसतातचं कुठं?'' त्यांची फिरकी घेत एक-दोन वाक्य ते आमच्याशी बोलले आणि बाड (कवितेचं हस्तलिखित) ठेऊन उद्या येऊन पाहा. मंग सांगतो असं आयकल्यावर्त आमी निंघालो. राती उद्या होकार भेटेल का नकार या दुचारानं म्हणावं तसी झप आली नाई. सकायी आमी त्यायच्या घरी गेलो तवा ते खुर्चीत बसून होते. तवा ते 'बहुमत' नावाचं साप्ताहिक काढाचे आन् त्यासाठी उमरावतीचे जेमिनी कडू त्यायच्याकडं आले होते असं मले आठोते. सुरेश भटांना बंधू बावाजी म्हनाचे पुढं त्यायच्या संग ओयख घट होत गेल्यावर्त मीही आदरानं बाबाजीचं म्हनो. त्यायनं आवाज देल्ल्यावर्त जेमिनी कडू पॅड घेऊन आले बावाजी सांगाले आन् जेमिनीजी लेयाले याले म्हंते योग. लहानसं ईस (वीस) कविताचं पुस्त त्याले सुरेश भटासारक्या मोठय़ा कवीची प्रस्तावना होती लहानसी, पन त्यानं कवितासंग्रहाचं वजन भलकाई वाढू गेलं.

प्रस्तावना भेटली, मुखोटा (मुखपृष्ठ) झाला, पुस्तकयी तयार होत आलं. आता बाकी होतं परकासनं आन् त्याच्यासाठी पावने. मंग अखीन एक डाव आठोले. बंधू म्हन्जे योगेश बर्‍हाणपुरे. घडी घडी नागपूरले जाचं तं खर्चाची अडचन आन् दुकानाले दांडी मारल्याने बोलनं भेटाची धास्ती. या मंडयात असलेला माहा दोस्त मोहन मुंडेल हा टेलिफोन आफिसला असल्यानं त्याच्या थ्रू बंधूसंग बोलून दोन पावने ठरवाची जबाबदारी त्यायच्यावर्त टाकली. त्यायनं त्यायचे दोस्त असलेले लेखक आन् तवा तरुण भारतात असलेले प्रभाकर पुराणिक आन् दिलीप देवधर यायले पक्कं केलं. ठिकान दिग्रस ता. 5 मे 1977. पत्रिका छापून वाटून झाल्या आन् बंधूचा फोन का, ''आपले दुसरे पाव्हणे जे आहेत दिलीप देवधर त्यांचं जमत नाही.'' मनात म्हनलं आली आफत, पन हे काई नकटीचं लगन नोतं ते ाुढे बोल्ले का, ''मी दुसर्‍या पाव्हण्यांची भेट घेतली. त्यांना पूर्ण कल्पना दिली. त्यावर ते बोलले की, जर ग्रामीण भागातील पोरं हे एका कवी मित्रासाठी करत असतील तर मी येणार आणि होकार देणारे पाव्हणे आहेत नाटककार दिनकरराव देशपांडे.'' हे आयकून आमी सारे हरकीजलो. पुस्तकाच्या कामासाठी बाहेरगावी जान्यापासून पत्रिका, ठिकान ठरवने या सार्‍या तयारीत जीव वतला. सुरेश गांजरेनं आन् पावण्यासाठी पुरनपोयीची बेत आखला सौ. गांजरे वयनीनं. जीव लावनारी मानसं आयुष्यात याले नसीब लागते काजी? दया मिश्र, मोहन मुंडेले, मधुकर अंबरकर यायच्या धावन्याले धरावं कोन?

दिट लागावं असा परकासनं सोहया झाला. बोरीवून माह्या घरचे म्हनानं तं डॉ. दादा पुरी. तवा दिग्रसले माहा कालेजचा दोस्त बाबा देशमुख स्टेट बँकेत होता. पावन्यांच्या आरामाची सोय त्यांच्याकडं. संग्रह काढन्याचे ठरलेपासून आखरी पावतरच्या बातम्या पाठवाचं काम वार्ताहर असल्याने सुरेशकडं. सार्‍या पेपराकडं आन् मोठय़ा साहित्यिकाकडं एक एक प्रत रवाना केली. दै. लोकमत, तरुण भारत, सिंहझेप यायनं संग्रहावर आलेल्या लेखाने प्रसिद्धी देल्ली तं वडोद्यावून एका वाचकाचं आंतरदेसी उप्पे खात खात दोन मयन्यानं भेटलं का या या तारकीले महाराष्ट्र टाईम्सनं दखल घेतली म्हून. मी यवतमायले येऊन इथच्या नगर वाचनालयात जाऊन त्यायले इनंती केली आन् त्यायनं तो अंक हुडकून काढून मले देल्ला. आद. पु. ल. देशपांडे, इंदिरा संत, नरहर कुरंदकर, वामनराव चोरघडे अशा मोठय़ायनं पाठीवर्त देल्लेल्या थापीनं ऊर्जा भेटली. 5 मे 1977 ले परकासित झालेला एका खेडय़ातल्या पोराच्या 'इरवा' कवितासंग्रहाले प्रस्तावनेच्या रूपानं कविश्रेष्ठ सुरेश भटांचे, मदतीच्या रूपानं बंधू योगेश बर्‍हानपुरेचे, पत्रिकेत नाव नसतानी येनार्‍या मोठय़ा मनाच्या दिनकरराव देशपांडे आन् दिग्रसच्या दोस्तायचे हात नस्ते लागले तं जमलं असतं?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.) भ्रमणध्वनी : 9420551260

No comments:

Post a Comment