Tuesday 27 November 2012

कालाय तस्मै नम:


दिवाळीच्या दिवसातच उसाचे आंदोलन तीव्र झाले. या आंदोलनात दोन शेतकर्‍यांचा गोळीबारात बळी गेला. तर विदर्भातील दोन शेतकर्‍यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्या. एकीकडे आत्महत्या तर दुसरीकडे शासनाने सरळसरळ बंदूक रोखून शेतकर्‍यांची केलेली हत्या. दिवाळीत बळीप्रतिपदा साजरी केली जाते. एकंदरीत शासनाच्या धोरणामुळे आत्महत्या करायला लावून अथवा शेतकर्‍यांची हत्या करून, शेतकर्‍यांचा 'बळी' घेऊन एकप्रकारे बळीप्रतिपदा साजरी झाली.

तसाही बळीप्रतिपदा म्हणजे बळीराजाला पाताळात गाडल्याचा दिवस. एका अर्थाने शेतकर्‍यांच्या पराभवाचा दिवस. दिवाळी इतरांसाठी आनंदाची असेल, पण ती शेतकर्‍यांसाठी आनंदाची कशी असू शकेल? एका बाजूला बळीराजा चांगला होता, दानशूर होता असेही म्हणायचे, पण ह्याच चांगल्या बळीराजाला प्रत्यक्ष परमेश्वराने (विष्णू) वामनाचा अवतार घेऊन पाताळात गाडायचे. कारण काय तर बळीराजाच्या चांगुलपणामुळे इंद्राचे आसन डळमळीत झालं होतं म्हणे. इंद्राचा दरबार म्हणजे 'चंगळवादी' व्यवस्थेचच प्रतीक. तेथे कायम सोमरसपान व अप्सरांच्या नृत्यांचे वर्णन भरभरून आपण ऐकत आलो आहोत. बळीराजामुळे इंद्राच्या 'चंगळवादी' व्यवस्थेला धक्का बसत होता म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर जर बळीराजाला पाताळात गाडत असेल तर शेतकर्‍यांचं काही खरं नाही. एका बाजूला आपण 'इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थनाही करायची आणि त्या बळीराजाला पाताळात गाडणार्‍या देवाचीही पूजा करायची. असा हा एकूणच परस्परविरोधी मामला दिसतो.

ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सर्वच संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. खा. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटलांची संघटना एवढेच नव्हे तर शरद जोशींची संघटनाही ऊस दरवाढीच्या मागणीसाठी मैदानात उतरली आहे. एकाच संघटनेचे ही तीन शकल. कधी वेगवेगळे राहून तर कधी एकत्र येऊन उसाला भाव द्या म्हणून मागणी करताहेत.

1980 मध्ये शरद जोशींच्या नेतृत्वातील शेतकरी संघटनेने 'शेतीमालाला रास्त भाव' या एककलमी कार्यक्रमाने खळबळ उडवून दिली. 1980 ते 1990 हे दशक शेतकरी संघटनेचे होते. शरद जोशींच्या म्हणण्याप्रमाणे.

शेतीमालाला रास्त भाव हे एकच कलम. तेच शेतकर्‍यांचे परब्रम्ह. तेच देशाचे सर्वस्व. असे शेतकरी संघटनेचे धोरण राहिले आहे. सत्तावीस नक्षत्रातील फक्त नऊ पावसाची. म्हणून 27 उणे 9 बरोबर शून्य. याप्रमाणेच शेतीमालाचा भाव हे कलम नसेल तर बाकी भारांभर कलमांचा काही उपयोग नाही.

(शरद जोशी. प्रचलित अर्थव्यवस्थेवरील नवा प्रकाश पान. नं. 171. 15 मार्च 1985)

परंतु 1990 नंतर शरद जोशींनी शेतीमालाचा भाव हा मुद्दा 'खुल्या अर्थव्यवस्थेत' अप्रस्तुत झाला आहे असे म्हणत. ते कलमच शेतकरी संघटनेमधून हद्दपार केले. मुक्त अर्थव्यवस्थेत बाजारात जो भाव मिळेल तो 'रास्त' असणार आहे असे म्हणत 'रास्त भावाचा' मुद्दाच बाद ठरविला. 6 मे 2010 च्या शेतकरी संघटकमध्ये शरद जोशी म्हणतात, 'शेतीमालाला भाव हा विषय 25 वर्षांपूर्वी सुसंबद्ध होता. आता तो तसा मुळीच राहिलेला नाही.' शरद जोशींच्याच म्हणण्याप्रमाणे 'सगळे निर्णय बाजारात होतात. आणि न्याय्य आणि योग्य असतात. म्हणूनच बाजार हा एक चमत्कार आहे. शंकराचार्य आले आणि गेले, बुद्ध आले आणि गेले, पण विजय मात्र बाजाराचाच झाला ' (2003 मध्ये नर्मदा परिक्रमेत बोलताना शरद जोशी)

शेतीमालाचा भाव आता सुसंबद्ध राहिला नाही. आणि बाजारातच मिळणारा भाव न्याय्य आणि योग्य भाव असतो असे जर शरद जोशींना वाटत असेल तर ते आज परत 'उसाला भाव द्या' म्हणत ऊस आंदोलनात सहभागी कसे काय होतात?

शेतकरी संघटनेच्या पहिल्या अवस्थेत शेतीमालाला भाव हेच 'परब्रम्ह'. तेच सर्वस्व. त्यानंतर शेतीमालाचा भाव हा विषयच 'असंबद्ध'. बाजारातच न्याय्य व योग्य भाव मिळतो असेही म्हणायचे आणि उसाला भाव मागत आंदोलनात सहभागी व्हायचे.

1990 नंतर शरद जोशींनी 'शेतीमालाचा भाव' हे कलमच रद्द केले, एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनेमधून हद्दपार केले. त्याचप्रमाणे आंदोलनाचे शस्त्रही 'म्यान' केले. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे 'रास्तारोको हे समाजवादाच्या काळातले हत्यार आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत 'व्यापारी' हत्यार असतील.' (2000 मध्ये श्रीरामपूर येथील कार्यकारिणीत बोलताना शरद जोशी)

समाजवादी व्यवस्थेचा अंत झाला आहे. मुक्त अर्थव्यवस्था आली आहे. डंकेलने स्वातंर्त्य दिले आहे. त्यासाठी 'धन्यवाद डंकेल तू आम्हाला स्वातंर्त्य दिले' अशी घोषणा. आता शेतीमालाच्या भावाची गरजच नाही. तो बाजारातच मिळेल. आता आंदोलनासाठी रास्तारोकोचीही गरज नाही. शेतकर्‍यांनी सडकेवरही येण्याची गरज नाही. त्यांनी 'व्यापारी' हत्यारांचा उपयोग करावा. त्यासाठी शरद जोशींनी 1991 च्या शेगाव मेळाव्यात सीता शेती, माजघर शेती, आयात शेती, निर्यात शेती असे चार 'व्यापारी' हत्यारंही दिली होती. शेतकर्‍यांना 'कंपन्या' काढण्याचेही 'व्यापारी' आवाहन त्यांनी केले होते. स्वत:ही 'शिवार' कंपनी काढायला निघाले होते. पण हे सर्व 'व्यापारी' मंत्र फुसके निघाले म्हणून की काय त्यांनी परत 2008 च्या औरंगाबाद अधिवेशनात 'पुन्हा एकदा उत्तम शेती'चा नारा देत नवीन 'व्यापारी' हत्यारं शेतकर्‍यांना दिली होती. शेतकर्‍यांनी जगायचे असेल तर शेतकर्‍यांनी एटी - बिना मातीची शेती, इटी - इथेनॉल तंत्रज्ञान, बीटी - जैविक तंत्रज्ञान आणि आयटी- माहिती तंत्रज्ञान या मंत्रांचा अवलंब करावा. एटी, इटी, बीटी आणि आयटी या मंत्राने शेतकर्‍यांच्या घरात लक्ष्मी येणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या घरात लक्ष्मी आलीच आहे असे गृहीत धरून 'लक्ष्मी पूजनाचे' कामही औरंगाबाद अधिवेशनात उरकून घेतले होते. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय 'यापुढे आकाशाखालील शेती नाही तर मांडवाखालील शेती करा म्हणजे तुम्हाला शेतीमालाला भाव मिळेल असेही शरद जोशींनी सांगितले होते. डंकेलने शेतकर्‍यांना 'स्वातंर्त्य' दिले. शरद जोशींनी त्याला धन्यवादही दिले. पण हे 'स्वातंर्त्य' शेतकर्‍यांना मानवले नसावे. त्याने गळफास वा विष घेऊन आत्महत्या करण्याचे स्वातंर्त्य घेणे सुरू केले. एटी, इटी, बीटी आणि आयटीने तर शेतकर्‍यांच्या घरात इतकी बदाबदा 'लक्ष्मी' येऊ लागली की त्या लक्ष्मीच्याच दहशतीने त्याला जीव नकोसा झाला व तो आत्महत्या करू लागला?

शरद जोशींची शेतकरी संघटना आता परत उसाच्या दरवाढीसाठी होणार्‍या आंदोलनात सहभागी झाली आहे. रास्तारोकोसारख्या 'हत्यारां'चे समर्थन करीत आहे. याचा अर्थ काय समजावा? शेतीमालाच्या भावाचा मुद्दा जो शरद जोशींसाठी 'सुसंबद्ध' राहिला नव्हता तो आता परत सुसंबद्ध झाला आहे? समाजवादी व्यवस्थेत रास्तारोकोसारखी वापरली जाणारी 'हत्यारं' परत वापरल्या जात आहे. त्याचा अर्थ खुली अर्थव्यवस्था जाऊन आता परत समाजवादी अर्थव्यवस्था आली आहे? त्यांनी मधल्या काळात सांगितलेले 'व्यापारी' हत्यार आता परत 'म्यान' करायचे? मांडवाखालील शेती सोडून आता परत आकाशाखालील शेती करायची? आणि मग डंकेलनी दिलेल्या स्वातंर्त्याचं काय?

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा प्रथम नारा होता. 'भीक नको, हवे घामाचे दाम'. नंतर मुक्त अर्थव्यवस्था आल्या आल्या नारा बदलला. आता 'हवे'च्या ऐवजी 'घेऊ' असा शब्द आला. 'भीक नको, घेऊ घामाचे दाम' तेही कसे तर आंदोलनाचे तंत्र वापरून नव्हे तर 'व्यापारी' मंत्राचा वापर करून. कारण मुक्त अर्थव्यवस्थेत 'बाजार' शेतकर्‍यांसाठी इतका न्याय्यी, दयाळू, कनवाळू रहाणार होता की आंदोलनासारखे कठोर तंत्र वापरण्याचीच गरज राहिली नाही.

आता परत शरद जोशींना 'रास्तारोको'सारख्या कठोर तंत्राचा वापर करावासा वाटतो.

बाजारा! इतका कसा रे तू कठोर झालास? आणि डंकेल तुझे स्वातंर्त्यही इतके कसे तकलादू की शरद जोशींना परत 'उसाला भाव द्या' म्हणत आंदोलनात पडावे लागते. आणि तेही त्यांच्याच अनुयायांच्या बरोबरीने. रघुनाथदादा पाटील, राजू शेट्टी हे तर शरद जोशींचे अनुयायी. शेतकरी संघटना सोडून त्यांनी स्वतंत्र संघटना उभारल्या. त्याच संघटनांसोबत शरद जोशींची एक संघटना या न्यायाने ह्या तिन्ही संघटना उसाचं आंदोलन करताहेत. कालाय तस्मै नम:! दुसरं काय?

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment