Monday 19 November 2012

झाडं किती सोशिक असतात


यावेळी गावी आल्यावर जरा जास्तच उदास वाटत आहे असं जाणवू लागलं. पावसाळा कमी झाला. त्यामुळे शिवारात रब्बीची पिकं नाहीत. गावखोरचे जे शेतमळे गहू, हरभर्‍याच्या लसलस हिरव्या अस्तित्वाने दरवर्षी हिरवेगार दिसतात ते नुसतेच काळे. नांगरून, वखरून टाकलेली जमीन भुरकटलेली. वार्‍याच्या सुताने हेलकावणारा पालापाचोळा अंगावर घेतलेली.

फाटय़ावर उतरून घराकडे जाताना ओळखीचे चेहरे, ओळखीचे हसत होते. पण त्या हसण्यातही शिवारातल्या मोकळय़ा शेतासारखी उजाड उदासी स्पष्टपणे जाणवणारी.

गणपतीच्या मंदिराजवळच्या वळणावरून मी घराशी येणार्‍या रस्त्यावर वळलो. मग एकदम धक्काच बसला मला. घराजवळचं गढीजवळचं मैदान एकदम मोकळं-मोकळं भुंडं भुंडं झालं होतं. रिकामं आकाश कसंतरीच वाटत होतं. त्या मैदानातलं मी लहानपणापासून पाहत आलो ते उंबराचं महाकाय झाड नाहीसं झालं होतं. एरवी फाटय़ावर उतरून घराकडे येताना त्या उंबराच्या झाडाचं मोहतुंबी अस्तित्व कसं मला आभाळभर जाणवत राहायचं. आजच ते जाणवत नव्हतं म्हणताना आतल्या आत एखादी डोकं नसलेली धडाची उजाड आकृती उजागर होत होती. मी उभा राहून पाहत राहिलो. दुपारची रखरख मला आठवत राहिली. माझं सगळं बालपण या झाडाशी गुंडाळलेलं होतं. नंतरच्या तरुणपणातल्या मित्रासोबतच्या नव्हाळी-गव्हाळीच्या मधागळ गप्पाही या झाडाशी बसूनच चालायच्या. गल्लीतलं ते महाकाय उंबराचं झाड म्हणजे ऋषीचं एक रूप. आध्यात्मिक पाविर्त्य असलेलं. म्हणताना कोणी त्याचं पानंही तोडायचं नाही. आजूबाजूचे लोक, बाया-माणसं दत्त जयंतीला त्या झाडाच्या खोडाशी पूजा करायचे. खोडापासून वरच्या अंगाने सगळय़ा हिरव्या दोडय़ा लागायच्या. भाजीसाठी ते उंबर घराघरांतून नेले जायचे. पिकल्यावर लालचुटूक फळांवर पाखरं ताव मारायचे अन् झाडातल्या, खोडा-फांदीतल्या तेलकटपणावर तरतरत चालत राहणार्‍या हजारो मुंगळय़ांची गुजराण व्हायची. आखाडतोंडी खोडावरच्या मुंगळय़ांना विशिष्ट रंगाचे पंख फुटायचे किंवा पंख फुटलेले वेगळय़ा प्रजातीचे मुंगळे या झाडावर वस्तीसाठी यायचे. त्यांच्या रंगावरून किंवा हालचालीवरून जुने-जाणते माणसं पाऊसपाण्याचा अंदाज बांधायचे. वेगवेगळय़ा आवाजाची, न दिसणार्‍या पाखरांची रात्रंदिवस या झाडाच्या घनदाट फांद्यात वस्ती असायची. तर दररोज संध्याकाळी दूरवरून पाहिलं की, झाडाच्या शेंडय़ावर शिवारातून परतून आलेल्या बगळय़ांची शुभ्र रंगाची फळं लगडून यायची.

असं आपल्या अस्तित्वाने साकार झालेलं एक विश्व. आता कसं काय नष्ट झालं? मग दिवसभर मी गल्लीतल्या प्रत्येक माणसाला, रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍याला त्याच औदुंबराच्या उद्ध्वस्त झालेल्या विश्वाबद्दल विचारत राहिलो. कोणी उत्तरं दिली, कोणी नाही दिली. कोणी खुळय़ात काढलं. काहींना तर काहीच वाटत नव्हतं. नंतर तुकडय़ातुकडय़ात टप्प्याटप्प्यानं समजलं. भावकीतल्या तंटय़ापायी त्या उंबराच्या झाडाचा बळी गेला होता. कुणीतरी एक फांदी गोठय़ात रोवायच्या खुंटय़ासाठी तोडली. कुणीतरी त्याला अडवलं. झाडावर आपल्या हद्दीची मालकी सांगितली. माणसाच्या झाडावरच्या हक्कदारीच्या भानगडी सुरू झाल्या आणि बिचार्‍या निष्पाप झाडाचा बळी गेला. माणसांनी झाड तोडलं. तोडलेल्या लाकडाच्या वाटण्या झाल्या. लाकडं हक्कदाराच्या अंगणात सरपणाच्या थप्पीवर लावली गेली आणि मालकी हक्काचं युद्ध जिंकलेली भावकीतली माणसं मग दाताचं पाणी गिळत बसली.

यात झाडाचं काय नुकसान झालं? ते तर बिचारं तोडून टाकल्यावरही माणसांच्याच कामी आलं. पुढे चालून त्याची मोठी खोडं ते ऋषीचं एक रूप आहे. याचा विसर पडून कदाचित तोडणाराच्या सरणासाठीही उपयोगी येतील. असाही एक विचित्र विचार मनात येऊन गेला. झाडाच्या मालकी हक्कावरून भावकीतल्या काहींचा विजय झाला. काहींनी दातओठ खात शिव्याशाप देत आपला पराजय मान्य केला. पण पुढं काय? पुढं सगळा शुकशुकाट. भकास अवकळा. आता गल्लीत सावलीचा थारा नाही. पाखरांचा वारा नाही. काळजाला चैतन्य देणारी पाखराची धून नाही. टेकून बसायला आसरा नाही. मला झाडाची ती रिकामी जागा पाहून मनोहर जाधव यांच्या 'कधी-कधी' या कवितासंग्रहातील एक कविता पुन्हापुन्हा आठवत राहिली-

झाडं किती सोशिक असतात

मोसम पाहून

रंग बदलतात..

एकोप्याने राहत असली तरी

एकेकटय़ाने झुंजत राहतात

तरीही झाडं -

आत्महत्या करीत नसतात!

झाडांच्या सोशिकतेचा गुणधर्म माणसं का अवगत करून घेत नाहीत? माणसांनी कोसळून पडावं खुशाल, पण सृजनशील भुईने पोसवलेल्या झाडांवर त्याने का म्हणून असा अत्याचार करावा? का म्हणून त्याचं वैभवशाली चैतन्यकळा देणारं जगणं हिरावून घ्यावं? त्यांना त्याचा काय अधिकार?

मागच्या वर्षीच्या कडकीच्या दुष्काळातही शिवारातल्या बर्‍याच झाडांचा असा बळी गेला होता. शेती तोटय़ाची ठरली म्हणून शेतकर्‍यांनी बांधावरची झाडं विकून आपल्या गरजा पूर्ण केल्या होत्या. आताशा असंच होतं. पैशाची चणचण जाणवली की, शेतकरी शेतातली किंवा बांधावरची उभी झाडं लाकूड कसायाला विकून टाकतात. भरल्या शेतातली अमृतफळं म्हणून ओळखली जाणारी आंब्याची झाडंही अशीच माणसांच्या गरजेपायी आडवी होतात. गावागावांत, बांधबंधार्‍यांनी वेढलेल्या शेतशिवारात भावबंदकी आणि भावनेचा खून करणारी भावकी असते. गावात घराच्या तशा शिवारात शेताच्या चिरोटय़ा होतात. शेतावरच्या विहिरीत आणि आंब्याच्या झाडात सोळा आणे केंद्रस्थानी कल्पून आण्यानी वाटण्या करण्याची पद्धत आहे. कुणाचा आठ आणे वाटा असतो. कुणाचा एक आणा अशा पद्धतीने एकेका घटकावर दहा-दहा लोकांचा मालकी हक्क असतो. आंब्याच्या झाडातील हिस्से तर दुसर्‍यांनाही विकले जातात. मग त्यातलेच अर्धा आणा, पावआणा असे ते हिस्से कमीकमी होत जातात आणि एका झाडाच्या फळांवर आंबे उतरण्याच्या म्हणजे तोडाईच्या वेळी वीस-वीस माणसं हक्क सांगतात. त्यातूनच कधी भांडणंही उभी राहतात. भांडणारे माणसं कुर्‍हाडीने खापला-खापली करतात. आधी झाडांची मग आपसात आपली.

या वर्षी अख्खा पावसाळा अध्र्या वाटेवरूनच माघारी परतून गेला. पाणीटंचाईचा आणि बेकारीचा कहर झाला. मी भोवताली पाहतो तेव्हा शिवारात दूरदूर झाडंच दिसत नाहीत. सगळं भुंडं भंडं ! एकदम उजाड. एकदम भकास !

त्यामुळेच पावसाळय़ाच्या तोंडी आभाळात ढगांचे थवेच्या थवे पाखरासारखे कोणत्या तरी दिशांनी झेपावत झेपावत येतात. पण पळणार्‍या ढगांना थांबवून धरण्यासाठी शिवारात आपल्या झाडवनच नाही. म्हणून ते मेघथवे मिनिटभरासाठीही शिवाराच्या डोक्यावर थांबत नाहीत. दम धरून भुईवर कोसळत नाहीत. भुईची तहान भागत नाही. तिच्या अंगावर वळासारख्या पसरलेल्या ओढय़ा-नाल्यातून पाणीच पुढं सरकत नाही. भेगाळली भुई तोंड वासून रडत राहते. बादलीभर; हंडाभर पाण्यासाठी माणसं-बायका सैरावैरा होतात. पण आभाळाला दया येत नाही. कशी येणार ? कारण ढगांचे मेघात रूपांतर होते ते केवळ झाडवनाच्या स्नेहल सहवासाने. दगडाचं, डोंगराचं आणि भेगाळल्या मातीचं त्यांना देणंघेणं? त्यांची मैत्री असते ती केवळ लसलसत्या हिरव्या झाडांशी. माणसातल्या दगडाबद्दल आणि दगडी मनाच्या माणसाबद्दल तर त्यांना अजिबातच प्रेम नसतं. माणसाच्या या झाडतोडीची शिक्षा मात्र भुईला, पोशिंद्या काळय़ा आईलाही भोगावी लागते.

झाडं सोशिक असतात; पण त्यांनी दिलेला तळतळाट मात्र भलताच जहाल असतो. तो मानवी जगण्यातलं चैतन्यच हिरावून घेतो. त्यांच्या भाळी अशी उदास अवकळा पसरून देतो. आज माझ्या भोवतीच्या गावाचं, शिवाराचं चैतन्य हरवलेलं आहे. ते केव्हा परत येणार? या नभाने या भुईला दान द्यावे, असं बिनधास्तपणे केवळ झाडंच म्हणू शकतात. पण झाडंच नाहीत तर मग कसलं दान?

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ ता. मेहकर, जि. बुलडाणा
     

No comments:

Post a Comment