Tuesday 27 November 2012

ये फेविकाल का जोड है..


शंकर बडेमाही आजी आमी सारे जन तिच्या भवताली बसून गोठी आयकत असलो आन् गोठीतून गोठ निंघत गेली आन् नावातनी काय अस्ते असा इसय निंघाला का ते म्हने, 'पाहा घरात लेकरू जल्माले आलं का सगयाले हरीक होते. मंग त्याचं नाव काय ठुवाचं म्हून हरेक जन आपल्याले आवडनारं नाव सांगते. त्याची काकू म्हन्ते, नारायन ठुवा. देवाचं नाव हाय. त्या मिसानं आपल्या तोंडात अनायसे देवाचं नाव येते. तं त्याच वक्ती दुदासाठी आलेली सेजीची धुरपती म्हन्ते, काय बापा आता, आपल्या वक्ती माह्य धुरपती काय, तुमचं सरोसती काय, पन आता वानावानाचे नाव सापडतेत. त्यातून ठुवा एखांदं नईन नाव. मंग म्या म्हनलं, अवो किती सुदं नाव निवडून ठुवा. पन त्याच्या नावाचा सातबारा दुसर्‍याचं नावानं निंघते. म्हंजे कसं? पाहा आपन मोठय़ा हौसीनं नाव ठुतो. सुधाकर पन या नावानं त्याले कोनी हाका मारते का? हे कवतुकानं ठेवलेलं नाव राह्यते बाजुले आन् त्याचा होते पिंटय़ा, बंडय़ा होतेकानी? आपन बारस्याले एक नाव ठुतो आन् मंग जलमभर त्याले नावंच ठुत राह्यतो.'

आमच्या खेडय़ाचं एक गनित असं हाय का नावाचं किती इचकाइंदन करता ईन. त्याच्या बाबतीत आमी कोनाले आमच्या पुढं नाई जाऊ देत. काई नावं तं इतके मोडूनतोडून ठुतो का याचं असली नाव काय होतं हे माईत करून घ्याचं असनं तं शायेतच जाऊन पाहा लागते. असा ईल्या म्हनल्यावर्त येते अंदाज त्याच्या ओरिजीनल नावाचा? नाई ना, पन तुमी बोरीत जर सामोरच्याले इचारलं, 'कारे ईल्या दिसला का?' तं सामोरचा इचारते, कोन्ता? म्हंजे पावडय़ाचा, कावरेचा का काकडेचा? काऊ न का ईल्या एकचं थोडी राह्यते. मी तुमाले सांगतो ना, जवा राजकपूरचा जमाना होता ना आन् त्याचं ते गानं 'मेरा नाम राजू' इतलं फेमस झालं होतं का घरात लेकरू झालं का त्याचं नाव राजू. या नावाचं इतकं बंबाट मार्केट होतं का काई काई घरात दोन दोन राजू. पाहा असं होते. सांगाचं काय होतं आन् सांगत काय बसलो.

जसा ईलास (विलास)चा ईल्या होते तसा बयवंता (बळवंता)चा बल्या हे झालं. नावाची तोडमोड मंग अखीन एक दुसरा परकार. त्याले नावाचं काई देनघेनं नस्ते. जसं डंगर्‍या, चिलूट, पोटय़ा, डोम्या असे परकार कवा रंगावून, कवा सभावावून असे नाव पडते. कवा कवा हे नाव इतले चिपकून जाये का इचारू नोका. काई काई टोपननाव. नुस्त नाव तेयी इतक्या मोठय़ा मानसाचं कसं घ्यावं म्हून मंग भाऊ, अन्ना, सायेब याचा वापर आपन करतो.

या टोपननावावून माहंच मले आठोलं का माय असतानी सांगे का, ' तुह्या बारस्याच्या दिसी काय झालं, का सांजीले दहापंदरा नावं ठुवासाठी जमल्या. तवा साथरीवर्त तू रडाले लागला. तं मायीनं मामीले वाटलं बायायच्या आवाजानं याची झोपमोड झाली असंन म्हून हा रडत असंन म्हून गाईù गाईù म्हनतं ते थोपटाले लागली. पन पोट्टं रडनं काई थांबत नोतं. तरी तुले नईन आंगडंटोपरं घालून सजवलेल्या पायन्यात टाकून त्यायचं चालू झालं. कोनी गोईंद घ्या, कोनी गोपाय घ्या, मंग ठरलं होतं का तोहं नाव शंकर ठुवाचं म्हून. पारबता मामीनं तुह्या कानापासी तोंड नेत शंकर कुर्र करत पायन्यात टाकलं. पन तू अखीनचं जोर्‍यानं रडाले लागला. पायन्यात मुंगी तं नाई डसली म्हणून खालची तालगी झटकली आन् मंग तुले निजवलं आन् झोके देनं चालू केलं. पन तू काई चूप बसाचं नाव ना घे. मंग कोनीतरी म्हने, दीठ काढा लागते. तं इठा मावसी म्हने, दीठ तं काढाचं, पन मले सगून पाहू द्या. काई दिसा आंधी तुहे आबा गेले आन् तुहा जलम झाला. म्हून

मावसीले वाटे का आजा मेलान् नातू झाला. आता मावसीच्या आंगोठय़ाच्या घामानं त्या उलटय़ा उभा केलेल्या परातीले तो तांब्याचा ढब्बू पयसा चिपकला असनं पन चिपकलेला पयसा पाह्यल्याबराबर सार्‍याजनी म्हने, पाहा मामजीचं आले बाईच्या पोटात आन् तोहं दुसरं नाव ठुल्या गेलं 'बाबा'. घरातले सारे त्या नावानं हाका माराले लागले. मंग दोस्तयी 'बाबा' म्हनाले लागले.

मी गाव आन् घर सोडून यवतमायले 1982 साली सारा बारदाना घेऊन आलो. तवा मोठी पोरगी भारती पाचव्या वर्गात, नितू तिसरीत, गजू पह्यलीत आन् कीर्ती त्यापरीस लहान. आमचे चारयी सख्खे पोरं मले 'काका' आन् बायकोले 'काकू' म्हनत. त्याले कारन असं होतं आमी बोरीले मोठय़ा भावासंग राहो. त्यायचे पोरंपोरी आमाले काका-काकू म्हनत. त्याच्याच्यानं आमचे पोरयी आमाले काका-काकू म्हनाले लागले. त्याले आमी बदलावाच्या भानगडीत काई पडलो नाई. आमी पेशवे प्लाटमधे घर घेऊन राहाले आलो तं शेजार्‍यायले, नईन नईन नवल वाटे, का भावाच्या पोरायले किती पिरमानं वागोतेत. मंग काई दिसानं ओयख झाल्यावर्त त्यायले माईत झालं. पोरायचं काका-काकू त्यायच्या पावतरचं राह्यलं. नाईतं आमचे तीनयी जवाई काका-काकूचं म्हन्तेत. हे असं जरी झालं तरी आखरीले ते आमच्या घरा पावतरचं राह्यलं. बाकी जगासमोर शंकर बडे या नावानंच ओयख झाली आन् कायम हाये. हे माह्य झालं. पन काई लोकायले लोकायनं देल्लेलं नाव असली नावावर असं चिपकते का ओरिजीनल नाव नुसतं कागदोपत्री आन् सहीपुरतचं शिल्लक राह्यते. कसं, ते सांगतो.

तुमी यवतमायले आले आन् अख्खं गाव हे इचारत फिरले का चंपालाल बन्सीलाल पंडित कुठं राह्यते? तं मले नाई वाटत का त्यायच्या दुकानाचा पत्ता तुमाले कोनी सांगनं. पन तुमी जर हे इचारलं, का मामाचं दुकान कुठी हाय? तं लहानसी पोरगी तुमाले बराबरं सांगनं. काऊन का, तेचं मामाचं गिर्‍हाईक होय. सन 1979 पासून मामाचं गोया-बिस्कूटचं दुकानं महिला शायेच्या सामोर हाय. त्याच्या आंधी पंचवीस वर्स ते देवयीतून इथं मोठय़ा बयनीकडं आले जवायाचं दुकान संभायाले आन् तवापासून जे जे गिर्‍हाईकाचे मामा झाले ते अजूनही. काई अडचनीनं 'आशा जनरल' नावानं असलेलं दुकान बंद झालं आन् मंग सोताचं लहानसं दुकान शाये म्होर सुरू केलं. सामोरची शाया पोरीयची असल्यानं त्या चिमन्यायनं 'मामा' हे नाव अखीन अभायभर करून टाकलं.

सुरवातीले मामानं दुकानं टाकलं. पन पयस्याची अडचन. मंग त्याच्यावर्त उपाय म्हून उकयलेले बोरं इकाचं त्यायनं ठरोलं. त्याची एक पद्घत अस्ते. ते चुलीवरचं शिजवा लागते आन् त्यासाठी जर्रमलचाच मोठा गंज लागते. भट्टी लावली का बराबर ध्यान द्या लागते. त्याच्यात मसाला जे अस्ते थे मामा सोता तयार करे. त्याची चव भलीकाई जमल्यानं पोरी गर्दी करेत. मामाची उमर आता बहात्तरची झाली तरी मामा या वयातयी एकटे दुकान सांभायतेत. कवा चिडचीड नाई. लहान पोरीयचं कमी अस्ते का, हे नाई ते द्या, मंग ते द्याले लागल्यावर्त नाई नाई हेच द्या. आता वयाच्या हिसोबानं उकयलेले बोरं जरी बंद केले तरी गोयावून पोरी आता चाकलेटवर आल्या. कुरकुरे, चिप्सचे पाऊच आल्यानं नड्डे कमी झाले.

दिवायी आन् उन्हायाच्या सुट्टीत पाखरायचा थवा उडून गेल्यानं झाडं जसं उदास वाट्टे तसं मामाच्या दुकानाचं होतं. माह्या पोरी सामोरच्याच शायेत सिकल्या म्हून मामा त्यायचे मामा. माही बायको महादेवाच्या देवयातून येतानी आठोनीनं संर्त्याच्या गोया आनते. इचारावं तं म्हन्ते मामाच्या दुकानातून आनल्या. म्हंजे तिचायी मामा आन् आता पोरगी माहेरी येते तवा तिची पोरगीयी मामाले मामाचं हन्ते. अस्या तीन पिढय़ायचे मामा व्हाचं भाग्य मामाले भेटलं. लहान्यापासून मोठय़ापावतर सार्‍यायचे मामा झाल्यानं मी त्यायले 'जगत्मामा' म्हन्तो. परवा माह्यासामोर एक लगन होऊन गेलेली पोरगी आपल्या पोरीले घेऊन पेसल मामाले भेटाले आली. आन् जवयच्या गनगोतासंग बोलावं असं सुखादु:खाचं मामासंग बोलाले लागली. मनात आलं कोन होय मामा तिचा? सख्खा नाई, पन सख्यापरीस जवयचा. म्हून तं आपलं मन मोकयं करून राह्यली ते. गोड चाकलेटसंग नात्याची, आपलेपनाची गोडाई कवा चिपके हे ना खानार्‍याले समजे, ना देनार्‍याले. या दुकानात मामाले खूप पयसे नाई कमावता आले. रोजी रोटी बस. पन माहेरपनाले आलेली कोनाची तरी पोरगी मामासंग सुखादु:खाचं बोलाले येते ते कमाई किती कोटीत मोजावं?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.

'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment