Tuesday 27 November 2012

आली दिवायी गेली दिवायी


शंकर बडेहा लेख तुमच्या हाती ये पावतर दिवायीचे भाऊबीजेपावतरचे सारे दिसं अटपून झाले असतीन. मले हरेक दिवायीले लहानपनच्या दिवायीची आठोनं आल्याबिगर राहत नाई. आता झगमगाट वाढला, दिखावा वाढला पन त्या वक्तीचा ओलावा वायला. मले आठोते आमी लहान असतानी दोन गोठीसाठी आमी भाऊबईन दिवायीची वाट पाहाचो. तवा दिवायीले नईन कपडे भेटाचे. त्यातनी आतासारका रेडिमेडचा जमाना नोता. बजारात (हप्त्याच्या) कपडय़ाच्या दुकानात लहान लेकरायचे आंगडे टोपरे, मोठय़ा मानसायच्या कपडय़ाच्या बणेना. आता जसे पोरायचे, पोरीयचे वानावानाचे ड्रेस भेट्टे तसं तवा नोते. त्यावक्ती आता जसे पोरायपासी जसी फैसन तसे कपडे असते तसं आमच्या वक्ती होतं का? दोन खाकी हापपँट आन् दोन पांढरे हाप बाह्याचे कुडते. तेच शायेत आन् तेच भाहेर. मी जवा आठवी पास झालो आन् पुढची शाया गावात नसल्यानं तालुक्याले हायस्कूलात नाव टाकलं तवा चौदा मैल सायकलनं जानं येनं करा लागन म्हून चप्पल घेऊन भेटली. आता किती मजा हाय पोरासोराची. कवा कवा वाट्टे उगीचं घाई केली आपन जन्माले याची. उगा आपलं मनाले समजवापुरतं. ते का आपल्या हातात अस्ते का?

या चपलीवून आठोलं मागच्या हप्त्यात माहय़ा पुतन्याचा दोस्त सुरेश त्याच्या बायकोले घेऊन यवतमायले खरेदीले आला तं घरी आमाले भेटाले आला. सुद वाटलं. त्याच्या कडीवर त्याचं चार-पाच मयन्याचं पोरगं. आमी बोलत होतो पिकाबद्दल पन माहा ध्यान राहून राहून त्याच्या पोराच्या पायात असलेल्या बुटाकडंच जाये. नाई राहवलं मले. म्या त्याले इचारलं सुरेश काय नाव हाय रे याचं? तो म्हने 'परीघ.' मले पह्यले वाटलं याले 'पराग' म्हनाचं असनं म्हून अखीन इचारलं 'पराग' का? थो म्हने नाई काका 'परीघ.' असं असं परीघ सुद नाव हाय. सुरेश चालते कारे हा? 'नाई काका चालत नाई.' 'नाई त्याच्या पायात बूट दिसले म्हून इचारलं.' त्याच्यावर्त तो म्हणे, 'आता एकुलता एक हाय तं घेऊनच टाकले बूट. कुठी चालाची वाट पाहाची.' म्या म्हनलं, 'नाई मले त्याच्याबद्दल काई म्हनाचं नाई पन तो चालाले लागनं तवा त्याच्या उघडय़ा पायाले माती लागू देजो नाईतं या मातीचं आपन काई देनं लागतो हे त्याले समजनारच नाई!'

पाहा हे असं होते सांगन्या सांगन्यात इसय बाजूले पडते पन येतो मी चाकोरीवर याले तुमी दिवायीचा फराय समजून घेजा. जवा आमच्या गावाले इजचं आली नोती तवाची दिवायी. तवा राती गॅसबत्तीचा उजिड किती मोठा वाटे. आता न्यार्‍या लखलख करनार्‍या लडा आल्या, बंद चालू होणारे चक्कर आले, नईन नईन लाईट आले त्यानं नजर फाकते पन दिपून नाई जात. त्यायचा हा लखलखाट त्यायच्या सिरीमंतीचा देखावा अस्ते. गावात ईज आली तवा दिवायीच्या दिसी दुपारी गुनामामा कोठय़ातून चार बल्ल्या आन् आठ दहा सनकाडय़ायचं कांडक घेऊन ये. घरातून सब्बल आन् नारयाच्या दोर्‍या आने मंग आंगनात हिंदानानं बल्ल्या गाडासाठी दर (खड्डा) करनं चालू करे. हितकभर दर झाला का बल्ली त्याच्यात धरून, दरातून निंघालेली माती त्याच्यात ढकलून, लहान लहान गोटे टाकून सब्बलीनं सिनारे. दोनी बल्ल्या उभ्या झाल्या का राह्यलेल्या दोनी बल्ल्या एकेक करून आनलेल्या नारयाच्या दोरीनं आडव्या याले बांधाच्या. आडवी बल्ली बांधतानी मामा एकला असल्याच्यानं जानार्‍याले आवाज दे, 'किस्ना जरा हात देजो बरं.' तवा हात द्याचा जमाना होता आता हात सोडाचा. मंग त्या आडव्या बल्ल्यावर्त अंतरानं शेनाचा गोया ठेऊन त्याले अरामानं थापे राती दिवनाल्या ठुवासाठी. सांज व्हाले आली का पह्यलेचं धुवून सुकवून ठुलेल्या दिवनाल्या परातीत चुन्याचं बोट लावून मांडून राहे. बाजूले बुदल्यात तेल. दिवनालीत तेल वतलं का मायनं नईन कापसाच्या केलेल्या वाती तेलात भिजवाच्या. मंग सनकाडी पेटवली का तिनं पेटवलेल्या दिवनाल्या पह्यली तुयसीपासी, समोरच्या दाठ्ठय़ाच्या (दार) दोनी कोन्यावर्त, न्हानीतं तवरीक गोईंदान बल्ल्यावर्त दिवनाल्या ठुल्या राहे.

देवीची पूजा होये पावतर कोनाले फटाके ना भेटे. एकडाव पूजा झाली का मंग फटाके जे आपल्या वाटनीवर्त ये ते बाजूले आडोस्याले ठेऊन मंग एक एक आनून बाजूले फोडाचे. फटाके भेटे कितीक सुरसुर्‍याचे (फुलझडी) दोन परकार एक सादी आन् एक तडतडी त्यायचा एकेक डबा, टिकल्याच्या डबीचा दहाचा पुडा, लहान मिरची फटाके, सिंगाडा फटाके आन् सर्पाची डबी झाले फटाके.मोठे भाऊ अँटमबम, सुतली बम आन् इमान नावाचा फटाका जो इमानावानी झुंग आवाज करत वर्त जाये. गुना मामा, दगडू मामासारके वयस्कर गडीमानसं फटय़ाक्याले हात ना लावे पन गोईंदासारके जवान गडी गजगोटे फोडत.तसा मले मी मोठा झाल्यापासून फटाक्याचा राग याले लागला आन् एका घडलेल्या घटनेपासून खरं सांगाचं तं माह्या मनात जे भेव धसलं ते अजून माह्या मनातून जाले काई तयार नाई.

झालं असं का मी दहावीत असतानी जे दिवायी आली होती त्या दिवायीची गोठ. असीच पूजा अटपली का नाना म्हन्जे बावाजी वसरीत दाठय़ाच्या बाजूले लाकडी खुर्ची राहे त्याच्यावर्त बसून. त्या दरवाज्याच्या आतनी बैखट. बैखटीले तिकून एक भित आन् त्या भितीले लाकडी दरवाजा. मंग एक लंबी खोली. तिच्या उजव्या आंगाले न्हानी आन् डाव्या आंगाले माडीवर्त जाले मातीच्या पायर्‍या आन् पायर्‍यापासी तिकडच्या भितीले दाठ्ठा आन् पलीकडं जे खोली त्यातनी कापूस राहे. हे सारं यासाठी सांगून राह्यलो की माह्या मनात फटाक्याचं भेव ज्या घटनेनं धसलं ते तुमाले समजावं. नाना खुर्चीवर्त बसून आन् मोठय़ा भावानं आंगनात इमान सिलगवलं म्हंजे त्याच्या वातीले पेटलेली सनकाडी लावल्याबराबर वात फुरफुरली आन् इमान वर्त जावं तं ते जे झुùù करत वर्त ना जाता नानाच्या बाजूनं आतनी जाऊन लंब्या खोलीच्या भितीले धडकून खाली पडलं आन् अखीन चेव आल्यावानी त्या भितीच्या दाठ्ठय़ातून कापसाच्या खोलीत घुसलं पन नसीब सुदं म्हून कापसाच्या गंजीच्या अलीकडं त्याच्यातली बारूद सरल्याच्यानं खाली पडलं. बरं झालं कापसाच्या गंजीत नाई घुसलं. सारे त्याच्या मांग धावत आले होते. जसं ते गंजीच्या अलीकडं पडलं तं दगडू मामानं अखीन तं उडनार नाई या भेवानं त्याले पायानं दाबलं तवा त्याच्या हे ध्यानातचं नाई आलं का ते गरम असनं.

तवापासून कायजात बसलेलं भेव आन् डोयानं पाह्यल्याच्यानं आपल्या चुकीनं आपलीच राखरांगोयी झाली असती याच्याच्यानं तवापासून फटाक्याले म्या हात नाई लावला. खरं तं एक परकारचा तिटकारा मनात भरून गेला. मले दिवायीची खरी मजा याले लागली जवा लगन झालेल्या बयनी घरी दिवायीले याले लागल्या. तवा इतकी थंडी राहे तरी दोन दिवस सकायीचं आंघोयीसाठी उठा लागे. तवा उटने लावून आन् चांगल्या साबनीनं त्या चोयून चोयून आंघोय घालत. आंघोय जरी गरम पाण्यानं राहे पन आंघोय झाली का थंडीनं आंग हाले. मंग सेकासाठी चुली म्होर बसाचो. सुवासिक तेल तवा दिवायीलेच भेटे. दोयपारी आठोन आली का केसावून हात फिरवून नाकासामोर धराचा. सासातून जानारा सुवास आंगभर पेरून घ्याचा. हे अटपलं का मंग फराय भेटे. चकल्या, सेव, चिवडा, करंज्या, बेसनाचे लाडू आन् माय तिय भाजून गुयाच्या पाकातले लाडू बनवे. त्यावक्ती पोरीबाईनं माहेरी याच्या दोनच वक्ता एकडाव दिवायीले आन् उन्हायात रसाईले. तवा वर्‍हाडात पूरमगन गावरानी आंबे राहे. आता जे थोडे थोडके झाडं शिल्लक हायेत ते वायले का मंग हे आंबे निरे आठोनीतच आठवा लागन.

आता बयनी त्यायच्या रामरगाडय़ात गुंतल्या. माय राह्यली नाई. जलमगाव सुटलं.पोरीयचे लगनं झाले. ते येतेत दिवायीसाठी पन कोनाच्या पोरीचा क्लास चालू होनार म्हून तिची निंघाची घाई असते. चकली आता वर्षभर भेट्टे म्हून तिचं अप्रूप नसते. नातू कुरकुरे, कॅडबरी मांगते. सकायी आंघोयीसाठी आजी नातवाले उठवाले जाते तं पोरगी म्हन्ते, 'नको आई तो नऊशिवाय उठत नाही.' तरी आजीले नातू नव पावतर झोपते याचं कवतूक. हे बदल होने असते तरी दोन दिसासाठी का होयेना सारे एकत्र येतेतं तेच खरी दिवायी. हे आपापल्या घरी निघून गेले का घर सुनं सुनं होते. घर खाले उठते. टाईम जाता जातं नाई मंग मन म्हन्ते गेली दिवायी.

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment