Friday 9 November 2012

हे लाघवी खुलासे आले तुझे थव्याने..


जेनेहमी आपल्या भोवती असतात.. दिसतात.. घुटमळतात त्या प्रत्येकाशी आपलं नातं असतंच असं नाही. पण तरीही त्या नात्यांना आपण व्यवहार म्हणून सांभाळत असतो. पाळता पाळता टाळत असतो. टाळता टाळत पाळत असतो.

व्यवहार नेहमीच खोटा असतो का? उपचाराला काहीच ओलावा नसतो का? तसं असतं तर आपण उपचारादाखल का होईना पण का हसलो असतो कुणाकडं पाहून? का बोललो असतो क्षणभर थांबून? पाणपोई आपली पर्मनंट तहान नाही भागवू शकत.. पण म्हणून तिचं काहीच महत्त्व नाही का?

तहान म्हटलं की नदी आली, विहीर आली, नळ आले, माठही आलेत आणि झरेही आलेत. हल्लीचा काळ नळांचा! फ्रीजमधल्या पाण्याचा! बॉटलमधल्या पाण्याचा! विहिरी खोदत बसायला इथे वेळतरी कुणाकडे आहे.

विहीर खोदायची म्हटलं की आधी आपल्या मनातली जागा तिला द्यावी लागते. नदीसाठी चार पावलं दूर चालून जावं लागतं.

आणि झर्‍यासाठीतर जंगल, पहाड, दर्‍याखोरे तुडवावी लागतात.. ! तरीही झरा सापडेलच असं नाही.

मात्र काही झर्‍यांचं पाणी आपल्या ओंजळीत येत नसलं तरी जमिनीखालून वाहतानाची त्याची झुळझुळ आपल्याला कायम ऐकू येत असते. जागेपणी, झोपेतही! हे असं का? हे कोणतं नातं? नेमकं विचारायचं तरी कुणाला? आणि उत्तर तरी कोण देणार? किंवा आपल्याला जशी त्याची झुळझुळ ऐकायला येते तसे त्यालाही आपले हुंकार ऐकू येत असतील का? तोही आतल्या आत उसळी मारत असेल का आपल्यासाठी? तो ही तापत असेल का? तो ही सळसळत असेल का आपल्या आठवणीनं? बहुधा नसावा. कारण तसं असेल तर मग कधीतरी उसळी मारून वर का येत नाही? त्याच्या काही लाटा आपल्या ओंजळीत का देत नाही?

..की त्याची काही मजबुरी आहे?

..बहुधा तसंच काही असणार!

बोलणे वेगळे, वायदे वेगळे

या झर्‍याचे तसे कायदे वेगळे

वाहता वाहता गोठतो का असा..

त्रास होतो तरी फायदे वेगळे!

खरं तर आपल्या अवतीभवती असंख्य झरे असतात. दिसत नसले तरी खरे असतात. आपणही त्यांचा शोध घेत नाही. कारण आपल्याला नळांचीच सवय झालेली असते. आणि झरे कधी कुणाच्या बाथरूममधून वाहत नसतात.

पण एखाद्याला झर्‍यांचच वेड असतं. एक झरा.. दुसरा झरा.. झर्‍यानंतर झरा! आतही झरे.. बाहेरही झरे! झर्‍यांचं हे वेड बरं नाही. झरे फुटायला लागलेत की साभाळणं कठीण होते. तनामनातून सळाळणार्‍या झर्‍यांचा गुंता व्हायला वेळ लागत नाही. सोडवता आला पाहिजे. नाही जमलं तर गळ्यालाही फास आणि नाकातोंडातही पाणी!

ज्याला हे सांभाळणं जमलं, त्याचा ज्ञानेश्वर होतो.. तुकाराम होतो..त्याचाच कृष्ण होतो. त्याच्या अवतीभवतीचा सारा परिसरच गोकूळ होऊन जातो!

पण काहीही असलं तरी ज्याचा त्याचा अनुभव वेगळा! जगणंही वेगळं! मग जगण्याचे अर्थही वेगळे! प्रश्नही वेगळे अन् खुलासेही वेगळे!

हे लाघवी खुलासे आले तुझे थव्याने

देतेस का कबुली पुन्हा अशी नव्याने!

घडले असेल काही.. अंधार जाणतो ना..

दाऊ नये हुशारी बेकार काजव्याने!

हंगाम पेरण्याचा होता कुठे परंतु..

आधीच चिंच खावी का गे तुझ्या मनाने?

साधेच बोलतो मी त्याचाच 'वेद' होतो

समजेल ना तुलाही सारे क्रमाक्रमाने!

आहे तसे असू दे.. होते तसे घडू दे

हा श्वास चालतो का तुझीया मनाप्रमाणे!

आपण आपली स्वत:ची वेगळी डिक्शनरी घेऊनच जगाशी बोलत असतो. प्रत्येकाचीच डिक्शनरी वेगळी आपापल्या सोयीप्रमाणे! आणि त्यामुळेच मग गैरसमज होतात! नको तसे घोटाळे होतात. बहरलेली मैफल ऐनवेळी विस्कटते! सार्‍यांचाच रसभंग होतो! आपण शब्दांच्या मागं जास्त लागतो.. त्यांचे हुंकार समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत कधी. गणितं बिघडायला इथूनच सुरुवात होते.

हेच चाले पहा शेवटी

तेच झाले पहा शेवटी!

सभ्य मी, संत मी, चांगला

लोक 'साले' पहा शेवटी!

शब्दकोशात नाही मजा

हे कळाले पहा शेवटी!

ज्या घरासाठी भांडायचो

ते जळाले पहा शेवटी!

मी मला पेरले कैकदा..

पीक आले पहा शेवटी!

पीक येणार हे नक्की. टाईमटेबल बदलू शकतो पण पीक येणार! शेवटी तर नक्कीच येणार! म्हणूनच आपण नेमकं काय पेरायचं हे आधीच ठरवलं पाहिजे. फुलांची पेरणी केली तर पाकळ्या मातीत मिसळल्या तरीही सुगंध येणार. दगड पेरून

फुलांची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. निसर्गाचा शब्दकोश ठरलेला आहे. त्याची हिशेबाची पद्धतही ठरलेली आहे. बेरीज वजाबाकीची सूत्रंही ठरली आहे.

तेव्हा..

चुकीची सूत्रं वापरून बरोबर उत्तर येण्याची आशा करण्यात काय मतलब?

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment