Monday 19 November 2012

एका निबंधाचा शतक महोत्सव घेता येईल?


2013 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले ह्या घटनेस एक शतक पूर्ण होईल. बी.ए. होईपर्यंत बाबासाहेब आपल्या पुढील आयुष्यात असे कुणी महापुरुष म्हणून विख्यात होतील हे त्यांच्या कुठल्याही शिक्षकाला वाटले नव्हते. फार काय 1947 साली 'नवयुग'ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी स्वत:बद्दल हेच म्हटले आहे. असा चमत्कार अवघ्या एक दोन वर्षात घडून कसा आला? याचे उत्तर देणे हेच चरित्रकारांसमोर फार मोठे आव्हान असते.

खरे तर मानववंशशास्त्र हा काही बाबासाहेबांचा अभ्यासाचा मुख्य विषय नव्हता. ते अमेरिकेला गेले ते अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि त्याच विषयात त्यांनी तिथे एम.ए. आणि पीएच.डी. ह्या दोन्ही पदव्या मिळविल्या. पण आज जसे विषयांचे स्पेशलायझेशन अतिशय महत्त्वाचे मानले जाते, तसा तो काळ नव्हता. त्यामुळे त्या काळातले विद्यार्थी आपल्या एम.ए.च्या विषयाशिवाय अन्य विषयांचेही वाचन करीत असत. त्यात त्यांना एखाद्या विषयात गती मिळत असे आणि पदवी अभ्यासाचा विषय नसलेल्या क्षेत्रातही ते खूप मोठा लौकिक मिळवू शकत असत. अगदी अलीकडचे एक उदाहरण वाचकांसाठी मी नोंदवू शकतो. गंगाधर गाडगीळ हे कथा, समीक्षाशास्त्र ह्या दोन्ही विषयात इतिहासाने नोंदवून ठेवलेले अतिशय महत्त्वाचे नाव आहे. पण त्यांचा पदवी, पदव्युत्तर अभ्यास अर्थशास्त्र या विषयातला होता आणि त्याच विषयाशी संबंधित अशा क्षेत्रात त्यांनी नोकरी केली. सारांश ज्या विषयात पदवी मिळवायची त्या विषयाबाहेर जाऊन काहीच वाचायचे नाही, असे त्या काळात मानले जात नव्हते. त्याउलट अनेक विषयांवरचे प्रभुत्व हीच त्या काळातली विद्वत्तेची कसोटी होती. अशा त्या काळात बाबासाहेबांनी निबंध लिहिला. त्या निबंधाचे नाव 'कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, अेनिलिस अँन्ड डेव्हलपमेंट' असे होते. याचा अर्थ निबंधाचा विषय समाजशास्त्राचा होता. समाजशास्त्र ही ज्ञान शाखा नुकतीच सुरू झालेली होती. 'मानववंशशास्त्र' आणि 'समाजशास्त्र' ह्या वेगवेगळ्य़ा ज्ञानशाखा आहेत, असे अजून मानले जात नव्हते. जागतिक पातळीवरच्या विद्वानांचे चर्चासत्र कोलंबिया विद्यापीठात आयोजित करण्यात आलेले होते. त्याच चर्चासत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा निबंध वाचला.

जगातल्या सर्वच देशात समाज आहे आणि समाजाची धारणा निकोप व्हावी म्हणून अनेक संस्था उदयाला आलेल्या आहेत. पण समाज एकसंघपणे बांधून दोन हजार वर्षे विघटित होऊन देणारी 'जात' नावाची संस्था मात्र जगातल्या एकाही देशात नाही. ती फक्त भारतात आहे. ही संस्था मानवी विकासाला अडथळा निर्माण करणारी आहे, हे जोपर्यंत भारतीय समाजाला वाटले नव्हते तोपर्यंत ही संस्था निर्माण कशी झाली, तिचा विकास कसा झाला आणि तिचा नेमका उदय केव्हा आणि कसा झाला याचा विचार करण्याची कुणालाच आवश्यकता वाटली नव्हती. उलट 19 व्या शतकाच्या अखेरपर्यंत ही संस्था दृढ व्हावी अशाच अनेक दंतकथा, स्मृतिवचने आणि पुराणकथातील संदेश चालू होते.

भारतातल्या समाजावर सत्ता गाजविणार्‍या मुस्लिम राज्यकत्र्यांनी समाजव्यवस्थेत हस्तक्षेप न करता येथील अर्थाेत्पादनाची साधने आपल्या मालकीची कशी होतील, एवढाच विचार केला. त्यामुळे राज्यकर्ते अहिंदू असले तरी ह्या संस्थेला धक्का पोहोचला नाही. ब्रिटिश राजवटीत मात्र विपरीत घडले. त्यांच्या ध्येयधोरणामुळे त्यांना येथील अर्थाेत्पादनाची साधने तर आपल्या हाती हवीच होती; पण त्याशिवाय व्यापारी वर्चस्व निर्माण करावयाचे असल्यामुळे ग्राहक म्हणून त्यांचा इथल्या सर्वच जातीजमातीशी संबंध येऊ लागले होते. 'जात' नावाची संस्था समजून घेणे त्यांना गरजेचे वाटू लागले. त्याचवेळी जागतिक पातळीवर सर्वच मानवी समूहांचे 'वांशिक'अभ्यास सुरू झाले. 'वांशिक' संघर्षातून अमेरिकेला स्वत:चे स्थान निर्माण करता आले. या वांशिक संघर्षाचा परिचय थेट महात्मा

फुलेंनाही झाला होता. म्हणूनच त्यांनी 1873 साली प्रसिद्ध केलेल्या 'गुलामगिरी' या ग्रंथात वंशभेदाविरुद्ध लढणार्‍या अमेरिकन जनतेचा गौरवाने उल्लेख केला.

बाबासाहेब अमेरिकेत शिक्षणासाठी गेले, त्यावेळी वंशभेदाच्या आधारे कुणाचाही छळ होता कामा नये, याबाबत अमेरिकन जनता पुरेशी स्वागतशील झालेली होती. अशाच स्वरूपाच्या छळाचा भीषण अनुभव बाबासाहेबांच्या मनात धगधगत होता. बडोदे संस्थानात एक अस्पृश्य म्हणून जी वागणूक त्यांना मिळाली त्यामुळे तिथे ते 11 ते 14 दिवस राहू शकले होते. त्यावेळी ते पदवीधर होते. वडील एका स्कूलचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले होते. शिक्षण, राहणीमान आणि आर्थिक स्थिती ह्या तिन्ही बाबतीत त्यांना कुणीही मध्यमवर्गीय स्तरातले आहेत असे म्हणावे, अशी स्थिती होती.

ज्या पाश्र्वभूमीवर बाबासाहेबांनी हा पहिला निबंध लिहिला ती पाश्र्वभूमी मी सांगितली. हा निबंध लिहिला त्यावेळी ते अजून एम.ए.सुद्धा झालेले नव्हते. ज्यांच्या समोर त्यांनी तो वाचला त्यात अनेकजण जागतिक कीर्तीचे मानववंशशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांना तो दखल घेण्याजोगा नव्हे तर त्या सेमिनारमध्ये अतिशय महत्त्वाचे निबंध म्हणून ज्यांची प्रसिद्धी मे 1917 साली प्रसिद्ध झालेल्या 'इंडियन अँंटिक्वेटी' नियतकालिकात देण्यात आली त्यातही या निबंधाचा समावेश होता.

जागतिक पातळीवर 'जात' या विषयावर ज्यांची मते ग्राह्य मानून चर्चा झाली असे सेनार्ट, नेसफिल्ड, रिस्ले आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर बाबासाहेबांसमोर होते. विटाळ कल्पनेमुळे जातीचे वेगळेपण ओळखायला येते असे फ्रेंच अभ्यासक सेनार्ट यांना वाटते. रोटीबंदमुळे जातीचे वेगळेपण ठरते हे नेसफिल्ड मानतात. रिस्ले हे वेगळेपण व्यवसायांमुळे ओळखता येते असे मानतो तर केतकरांनी जातीअंतर्गत विवाह हे वेगवेगळ्य़ा जाती ओळखण्याचे महत्त्वाचे लक्षण मानले आहे. पण यांच्यापैकी कुणीही मुळात जाती का निर्माण कराव्यात असे भारतीय समाजाला वाटते? त्या निर्माण व्हाव्यात म्हणून कुणी पुढाकार घेतला? त्यांचे कुणी कुणी व का अनुकरण केले आणि ही 'जात' नावाची संस्था टिकावी यासाठी समाजात विटाळाशिवाय अन्य कोणकोणत्या चालीरीती विकसित केल्या? हे प्रश्न यापैकी कोण्याही विचारवंताच्या मनात उद्भवले नव्हते. जातींच्या संदर्भात हे एवढे प्रश्न उपस्थित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले अभ्यासक होते. (तरी पण ते अभ्यासक आहेत हे ओळखून त्यांच्या लेखनाचा 'समाजशास्त्र' या विषयात अभ्यास व्हायला हवा हे मात्र भारतीय विद्यापीठातील प्राध्यापकांना 1980 पर्यंत वाटत नव्हते.)

मुळात कोणत्याही ज्ञानशाखेत प्रश्न उपस्थित करणे यालाच फार महत्त्व असते. कविता सुंदर वाटणे, पुरणपोळी सुंदर झाली आणि मुलगी सुंदर आहे, या तीन वाक्यात 'सुंदर' हा शब्द एकाच अर्थाने वापरला जात असेल तर कविता 'सुंदर' आहे असे म्हणताना 'सुंदर' या पदाचा सर्वमान्य अर्थ कोणता असा प्रश्न सत्तर-ऐंशी वर्षापूर्वी मर्ढेकर नावाच्या कवीने विचारला आणि मराठी भाषेत 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचा अभ्यास नेमकेपणाने विकसित झाला. एखाद्या ज्ञानशाखेचा अभ्यास असे मौलिक प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सुरू होत असतो. दोन हजार वर्षापूर्वी भरतमुनी नावाच्या अभ्यासकाने नाटकाच्या संदर्भात असेच मौलिक प्रश्न विचारले. ते प्रश्न समजून घेणे आणि काही एक उत्तर देणे यात आमची हजार वर्षे गेली आणि या अभ्यासातून भरतमुनीचे 'नाटय़शास्त्र' नावारूपाला आले. अर्थात केवळ प्रश्न उपस्थित करून भागत नसते. त्याला काही संभाव्य उत्तरे द्यावी लागतात. ती उत्तरे बरोबर आहेत की चूक या दिशेने पुढची वाटचाल सुरू होते. जात कुणी निर्माण केली? ती टिकावी म्हणून कोणकोणत्या चालीरीती रूढ झाल्या? ज्यांनी कुणी जात निर्माण केली त्या समूहाला ती मुळात निर्माण का करावीशी वाटली? त्या समूहाचे अनुकरण कुणी कुणी केले, याची संभाव्य उत्तरे बाबासाहेबांनी या अवघ्या वीस पृष्ठांच्या निबंधात दिली असून महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या खंडात हा निबंध 1982 साली प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी दिलेली संभाव्य उत्तरे अशी आहेत. 'जात' या नावाची संस्था प्रथम 'ब्राह्मण' या नावाने ओळखल्या जाणार्‍या वर्गाने निर्माण केली. आपली ओळख स्थिर व्हावी म्हणून जातीअंतर्गत विवाह, सतीप्रथा, बालविवाह इत्यादी चालीरीती रूढ करण्यात आल्या. या गोष्टींना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्याला धर्माचे अधिष्ठान देण्यात आले. पापपुण्यांच्या दंतकथांनी ही संस्था अतिशय बळकट केली. ही संस्था दृढ करण्याचे काम स्मृतींनी केले. मनू हा काही जातींचा निर्माणकर्ता नव्हे तो जातींना सुप्रतिष्ठा देणारा ग्रंथकार आहे. डॉ. बाबासाहेबांचे आणखी एक महत्त्वाचे मत सांगून मी हे संपवतो. 'जात' ही कधीही एकटी असत नाही. अनेक जातींच्या समूहातच तिचा आढळ होतो. हा तो मुद्दा.

बाबासाहेबांनी तार्किक विचार कोणते मांडले याची आपल्याकडे कधीच चर्चा होत नाही. आपली सर्व शक्ती त्यांच्या सक्रिय राजकारणाची चर्चा करण्यावरच केंद्रित होते आणि त्यात वावगे असे काहीच नाही. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे आणि ती म्हणजे त्यांच्या सर्वच राजकीय मुत्सद्दीपणाच्या तळाशी त्यांची विद्वत्ता होती. ब्रिटिश सत्ताधारी, हिंदू विरोधक आणि त्यांच्याशी सहमत असणारे सर्वच विद्वान यांना पुरतेपणाने हे कळत होते, म्हणूनच भारतासारख्या देशात रक्तविरहित क्रांती घडवून आणणारे अग्रदूत म्हणून सर्वानाच ते वंदनीय वाटतात. पण त्यांच्या विद्वत्तापूर्ण लेखनाला आता शंभर वर्षे होत असल्याने याही अंगाने त्यांची चर्चा व्हायला हवी, असे मला वाटते.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी-9881230084

No comments:

Post a Comment