Monday 13 August 2012

कथा : एका संवेदनशील चोराची


आज पन्नास वर्षे झाली आहेत या घटनेला. वयाच्या 17 व्या वर्षी माझ्या वडिलांचे निधन झाले. दारिद्रय़ म्हणजे उपासमार याची सवय होतीच. त्यात वडिलांचे निधन झाले म्हणजे पोरकेपण वाटय़ाला आले. एक भाऊ, एक बहीण आणि आई. त्यांना सांभाळणे, त्यांच्याही शिक्षणाची जबाबदारी स्वीकारायची आणि अन्न, वस्त्र, निवार्‍यासाठीही संघर्ष करायचा. आभाळ फाटले असे वाटले; पण अशाही वेळी समाजाचा चांगुलपणा मदतीला कसा धाऊन येतो याचा मी अनुभव घेतला. मला शिकवणार्‍या माझ्याच शाळेतील पी. जी. कुलकर्णी सर आणि रामशास्त्री सर यांनी मला पोटापाण्याला लावले. शाळेतील हुशार विद्यार्थी एवढेच माझे भांडवल होते. महिना शंभर रुपये पगार सुरू झाला. पशुपातळीवरच्या गरजा भागविण्याची सोय झाली आणि मला मॅट्रिकपर्यंत उपाशीपोटी राहून शिक्षण देणार्‍या माझ्या वडिलांची आठवण तीव्रतेने होऊ लागली. किमान त्यांचा फोटो तरी डोळय़ासमोर असावा असे वाटायचे; पण तोही काढण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे फोटोही नव्हता.

आणि अचानक एकेदिवशी फारफार तर 2 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर आकाराचा एक ग्रुप फोटो मला सापडला. त्यात मी, माझे वडील, आई, भाऊ आणि बहीण हे सगळेच होते. हा फोटो किती लहान होता याची आपण कल्पना करू शकाल. मी तो जीवाजतन केला.

माझे वडील आयटीआयमध्ये वॉचमन होते. त्यावेळी तिथे शिक्षण घेताना एका शिकाऊ विद्यार्थ्याने तो फोटो काढला होता. तो फोटो मी पाहिला तेव्हा अतिशय हरखून गेलो होतो. आयुष्यातला पहिलाच फोटो होता तो. त्यावेळी मी पाचवी-सहावीत असेल. आज मी त्या शिकाऊ विद्यार्थ्याचे नावही विसरलो आहे आणि कुठे 56 वर्षानंतर असा कुणीतरी फोटो काढत होता हेही मी विसरून गेलो होतो; पण वडिलांच्या निधनानंतर वडिलांनी जपून ठेवलेली काही कागदपत्रं शोधताना मला तो फोटो मिळाला आणि माझ्या आनंदाला गगन ठेंगणे झाले होते.

दरम्यान, मला कुणीतरी सांगितले की, या ग्रुप फोटोमधून वडिलांचा तेवढा फोटो वेगळा काढता येतो. तो एनलार्जही करता येतो; पण माझ्या लहानशा गावात मात्र अशी काही सोय नव्हती.माझा एक दूरचा नातलग मुंबई येथील प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनीत टर्नर म्हणून नोकरीस होता. तो मॅट्रिकला नापास झाला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तो कंधार तालुक्यातील कळंबचा. माधव जिंदे त्याचं नाव. वडील आयटीआयमध्ये नोकरीला असल्यापासून त्याला तंत्र शिक्षणाचं महत्त्व कळालं होतं. त्यावेळी नांदेडच्या आयटीआयमध्ये पुणे-जळगावहून विद्यार्थी शिकायला येत, पण आपल्या मराठवाडय़ातले विद्यार्थी मात्र तिथे शिकत नसत. माझ्या वडिलांनी माधवला टर्नरच्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. त्याची राहण्या जेवणाची सोयही आमच्याच घरी केली. त्यामुळे माधवचे आयुष्य पूर्ण बदलून गेले. शिक्षण पूर्ण करताच माधव मुंबईच्या प्रसिद्ध कंपनीत नोकरीस लागला. त्याला माझ्या वडिलांबद्दल अतिव आदर होता. म्हणून मी त्याला विचारलं. तो फोटोही त्याला दाखवला. माझ्या वडिलांचा फोटो पाहून त्याच्या डोळय़ांत अश्रू तरळले. त्याने तो फोटो मी सोबत नेतो, असे सांगितले. मुंबईच्या फोटो स्टुडिओमध्ये चौकशी करतो, असे सांगितले. मला तो फोटो देववत नव्हता; पण फोटो एनलार्ज करून मिळणार याचाही मला आनंद होत होता. मी तो फोटो माधवला दिला. माधव मुंबईला गेला. मी अधूनमधून त्याला पत्र पाठवत होतो.

माधव मुंबईत पवईत राहायचा. त्याची कंपनी विद्याविहार ते कुर्ला या रस्त्यात होती. विद्याविहार स्टेशन नुकतेच सुरू झाले होते. त्याने तो फोटो आपल्या पाकिटात ठेवला होता. विक्रोळी ते विद्याविहार असा पास त्या पाकिटामध्ये असे. त्यामुळे पाकीट पाहिले की, त्याला फोटो एनलार्ज करण्याची आठवण होत असे. वेळ मिळाला की तो कुल्र्यात जायचा; पण कुठलाही स्टुडिओ त्याला मिळत नव्हता. पत्रातून तो मला कळवायचा. इथे फोटो मोठा करून मिळू शकतो. काळजी करू नकोस; पण योग्य असा स्टुडिओ मात्र त्यास सापडत नव्हता. अखेर त्याला एका स्टुडिओचा पत्ता कळाला. तेही मला त्यानं कळवलं. आता मला माझ्या वाडिलांचा फोटो मोठा करून मिळणार. तो मी भिंतीवर लावणार आणि रोज येताजाता माझे वडील मला आशीर्वाद देताहेत हे मला दिसणार असल्यामुळे मी हरखून गेलो होतो.

पण काही दिवसांनंतर माधवने पत्रात लिहिले, मी फोटो स्टुडिओत दिला आहे; पण काम काहीसं वेळखाऊ असल्यामुळे काही दिवस थांबावं लागेल. महिना दोन महिने लोटले. मी मात्र फोटोसाठी अतिशय अधीर झालो होतो; पण माधव काही कळवत नव्हता. आणि अचानक त्याचं एका दिवशी पत्र आलं. त्यात त्यानं लिहिलं होतं, दिवाळीला येताना फोटो घेऊन येतो. आता मी दिवाळीची वाट पाहू लागलो.

आणि एकेदिवशी माधव फोटो घेऊन आला. येतानाच त्याने तो फोटो फ्रे म करून आणला होता. संपूर्ण ग्रुप एनलार्ज केलेला फोटो आणि एक माझ्या वडिलांचा एनलार्ज केलेला फोटो आहे. दोन फोटो होते. ते दोन्ही फोटो माझ्याकडे देताना एका खूप मोठय़ा जबाबदारीला पूर्ण केल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर होता; पण त्या आनंदामध्ये त्याच्या मनात लपलेली त्याची गलबल मला त्या दिवशी मुळीच कळाली नाही.

उन्हाळी सुट्टय़ा लागल्या आणि मी मुंबईला गेलो. प्रथमच मुंबई पाहात होतो. माझी छाती दडपून गेली होती; पण त्याने पत्रात तपशील इतका चांगला कळवला होता की, मी थेट सायंकाळी मार्केट गेटला रस्त्यावरील झोपडीवजा त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. माधव डय़ुटीवर गेला होता. परत आल्यानंतर माझ्या गळय़ात पडला. आणि त्यानंतर त्याने जी हकिकत सांगितली ती ऐकून मी आश्चर्याने थक्क झालो. तो सांगू लागला, मी वेळ मिळेल तसा कुल्र्यात जाऊन एकेका स्टुडिओत शोध घेऊ लागलो. अखेर एका स्टुडिओचा पत्ता लागला आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी मी जायचं ठरवलं; पण नेमके दुसर्‍या दिवशी कंपनीत जाताना माझं पाकीट मारलं गेलं. पाकिटात 20-21 रुपयेच होते; पण माझा पास आणि मामांचा तो दुर्मिळ फोटो होता. मी हादरून गेलो. तुला कसे कळवावे ते कळेना. मी कुर्ला स्टेशन, विद्याविहार स्टेशन आणि विक्रोळी स्टेशन या तिन्ही स्टेशनचे प्लॅटफॉर्म अक्षरश: पिंजून काढले. पण पाकीट सापडलं नाही.

'मग कुठं सापडलं?'

कुठं सापडलं, सापडलंच नाही. एके दिवशी तर विक्रोळी ते विद्याविहार अशी रेल्वे ट्रॅकने पायपीट केली. पोलीस स्टेशनमध्ये नोंद करावी तर पाकिटात रक्कम एवढी किरकोळ की, त्यांनीही माझी दखल घेतली नसती. त्या पाकिटात लाखो रुपये देऊनही न मिळणारा फोटो होता; पण त्याची किंमत पोलिसांना कुठून? मी वेडापिसा होऊन 8-15 दिवसांत पुन्हा पुन्हा प्लॅटफॉर्मवर शोध घेत होतो; पण पाकीट मिळालं नाहीच.

'मग? हा फोटो कसा मिळवलास?'

तेच तर सांगतोय. मी तुला खोटं पत्र लिहिलं. त्यावेळी मी फोटो पाकिटासकट हरवला होता. 15-20 दिवस उलटून गेले. मी बेचैनच झालो आणि एकेदिवशी माझ्या दारात चोरटाच उभा राहिला. त्याच्या हाती माझा पत्ता असलेलं एक बेरंग पाकीट होतं. दंड म्हणून पोस्टाचा स्टॅम्प न लावताच त्या पाकिटासाठी 5 रुपये भरून पाकीट सोडवून घ्यावं, असं कळवलं. मी ते पाकीट हाती घेतलं. पाठवणार्‍याचा पत्ता कुठेच नव्हता. पाच रुपयांची रक्कम जास्त नव्हती; पण हे कुणी पाठवलं आणि का पाठवलं यामुळे मात्र मी बेचैन झालो होतो. अखेर मी ते पाकीट पाच रुपये देऊन सोडवून घेतलं. आणि तुला सांगतो, ते पाकीट उघडताच मी आनंदाने वेडय़ासारखाच नाचू लागलो. त्या पाकिटात मामांचा फोटो होता आणि माझी रेल्वेची पास. रेल्वेच्या पासवरून पाकीट चोराने माझा पत्ता शोधून या दोन्ही गोष्टी माझ्याकडे परत पाठवल्या होत्या. तर त्या चोराने परत प्रत्यक्ष फोटो आणून दिला असता तर मी त्याला बक्षीस म्हणून 50 रुपयेही दिले असते. मी त्या चोराचे मनातल्या मनात आभार मानले.

आजही माझ्या वडिलांचा तो एनलार्ज केलेला फोटो माझ्या घरात आहे. तो ग्रुप फोटोसुद्धा माझ्या घरात आहे. कृतज्ञतेनं भारावलेला माझा मित्र आज जगात नाही आणि माझ्यावर अकारण उपकार करणारा तो चोरही मला कधी सापडला नाही.

एखाद्या कथा, कादंबरीत आढळणार नाही, असा स्तिमित करणारा हा प्रसंग मी अजून विसरलेलो नाही. मी नाटय़लेखक आहे. दुसर्‍याचं मन जाणून चित्रण करणारा एक लेखक आहे; पण चोरांविषयी मुळीच आपुलकी नसूनही हा चोर काय माझ्या मनात घर करून आहे. त्या चोरालासुद्धा त्या फोटोला पाहून तो कुणाचा तरी दुर्मिळ फोटो असावा, असे वाटले असेल काय? त्यामुळे ज्याचा तो असेल तो किती हैराण झाला असेल याचा विचार त्याने केला असेल काय? कदाचित असेच घडले असावे. चोर म्हणून जगण्यातला निब्बरपणा अजून स्वभावात आला नाही, असा तो चोर असावा. खरे तर त्याच्या स्वभावातल्या या कोवळेपणास खतपाणी घालता आले तर त्यातूनही चांगला माणूस घडू शकतो. शांताराम बापूंच्या 'दो ऑंखे बारा हात' या जुन्या सिनेमाची आठवण होते, पण चोरांचा बंदोबस्त करणार्‍या कुठल्याही करडय़ा व्यवस्थेजवळ हा असला उद्योग करायला ना वेळ असतो ना माणसांबद्दल असणारे मन. एखादाच कुणी त्याच्यासारखा महामानव असतो जो खून करायला आलेल्या माणसाचंही एका कार्यकर्त्यात रूपांतर करतो. जणू या महामानवासमोर तथागत गौतमांचा आदर्श असावा. अंगुलीमालालाही त्या सत्पुरुषाने धम्मसेवक केले. आपण तेवढे मोठे नक्कीच नाहीत; पण अशा प्रेरणेने कार्य करणार्‍या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकत्र्यांकडे किमान आस्थेने पाहता यावं एवढं आपलं मन तरी संवेदनक्षम ठेवू शकतो ना?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment